काही उत्कृष्ट चित्रपटांचा रसास्वाद

पडद्यावरचे विश्वभान’ या पुस्तकाचे लेखक, संजय भास्कर जोशी, यांच्या मते श्रेष्ठ चित्रपटाचे अगदी सर्वात मूलभूत लक्षण म्हणजे चित्रपटाच्या पटकथेतला अनावश्यक फालतूपणा, सवंग आणि बाष्कळ विनोद, अनाठायी घुसटलेली गाणी (व नाचसुद्धा!) आणि बेगडी भावुकता या घटकांचा पूर्णपणे अभाव असणे. एकदा हा निकष लावला की आपण इतकी वर्षे पाहत आलेल्या शेकडो चित्रपटांपैकी 90-95 टक्के चित्रपटांची हकालपट्टी करावी लागेल. कारण या लेखकानी वा चोखंदळ रसिक/समीक्षक यांनी निवडलेल्या चित्रपटांच्या यादीतील अगदी तुरळक चित्रपट आपल्या पाहण्यात आले असतील. पुस्तक वाचून संपल्यानंतर आवडलेला किंवा लोकप्रिय चित्रपट व उत्कृष्ट चित्रपट यातील फरक नक्कीच जाणवू लागतो. मग काही तुरळक चित्रपट वगळता चित्रपट पाहण्यासाठी आपण केलेला आटापिटा, घेतलेले श्रम, वाया घालविलेला पैसा याबद्दल हळहळ वाटू लागते. कारण तद्दन सुमार चित्रपटांच्या गर्दीतून चांगले चित्रपट समजून घेण्यासाठी आपल्यातील ‘नीरक्षीरविवेकबुद्धी’ तितकीशी तल्लख नसते. म्हणूनच या लेखकासारखे समीक्षक नेमके हेच हेरून आपल्याला एका वेगळ्या विश्वाची सफर करून आणतात.

सुमारे पंचवीस गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथांचा परिचय, त्यातील नेमका आशय व चित्रणामागील परिश्रम याबद्दलची लेखकाची मांडणी वाचताना आपण थक्क होऊन जातो. इंग्रजी, चायनीज, इराणी, तिबेटी, मेक्सिकन्, जपानीज, अशा अनेक भाषेतील हे चित्रपट आहेत. मुळात लेखकाचा भर आशय व कथानक यातील वैशिष्ट्य यावर असल्यामुळे चित्रपटातील तांत्रिक बाबी गौण ठरतात. लेखकाने चित्रपट समीक्षकांची नेहमीच्या पठडीतील परिभाषा न वापरता, वाचकांशी संवाद साधतात; कथानक व आशयाभोवती लेखांचा डोलारा उभे करतात. त्यामुळे एकेक लेख वाचून झाल्यानंतर या चित्रपटांचा आस्वाद घ्यावेसे वाटू लागते. एकदा पाहिलेले असल्यास पुन्हा पुन्हा पाहाविशी वाटते. लेखकाने सुचविलेल्या जागा खुणावू लागतात व चित्रपटांचे श्रेष्ठत्व लक्षात राहते.

p2

गुलाम रमझानी या इराणी दिग्दर्शकाचा इराणी भाषेतील हयात या सुरेख चित्रपटाचे कथानक मनाला चटका लावणारी आहे. हॉलिवुड व/वा भारतीय चित्रपटांची भ्रष्ट नक्कल करण्यात धन्यता मानणारी इराणी चित्रपटसृष्टी 1979च्या क्रांतीनंतर अब्बास किरियोस्तामी, मोहसीन मखबलमाफ, मजिद मजिदी, असगर फिरहादीसारख्या प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शकांचे चित्रपट सुजाण रसिकांचे लक्ष वेधून घेतले. राजकीय व धार्मिक सेन्सॉरशिप असूनसुद्धा त्यातून वाट काढत या दिग्दर्शकांनी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले आहे.

काही चित्रपट मनाला श्रीमंत करत करत डोळ्याचेही अक्षरशः पारणे फेडतात. एखादी सुंदर कविता म्हटल्यासारखे चित्रपटातील दृश्ये, आशय व कथानक उघडत जातात. तास-दीडतासाच्या कालावधीत दृक्-श्राव्य आनंद देणारे असले चित्रपट पाहताना प्रत्येक चौकट-न-चौकट आपल्या डोळ्यात सामावत जातो व एका वेगळ्या अनुभवातून तरंगत राहतो. अशाच उत्कृष्ट चित्रपटापैकी ‘पोस्टमेन इन द माउंटन्स’ हा चीनी चित्रपट असून लेखक याबद्दल भरभरून लिहितात. हळुवार सांगितलेली चित्रपटाची ही कथा अत्यंत सरळ,साधी व गुंतागुंत नसलेली आहे. त्यात अस्सल प्रादेशिकता आहे. माणसाची, प्राण्याची आणि निसर्गाची व या सर्वांची एकमेकाशी असलेल्या कोवळ्या संबंधाची आहे. आणि या संबंधातून निर्माण झालेल्या मूल्यांची ही कथा आहे.

शॉशँक रिडेम्प्शन हा हॉलिवुड इंग्रजी चित्रपट. भरपूर लोकप्रिय असूनसुद्धा लेखकाने उत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत समाविष्ट केल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसू शकेल. कारण बहुतेक वेळा गल्लाभरू, लोकप्रिय चित्रपट उत्कृष्ट ठरत नसतात. कदाचित हा चित्रपट नियमाला अपवाद ठरणारा असू शकेल. चित्रपटाचा गाभा आशा आणि स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्याभोवती गुंफलेली आहे. मॉर्गन फ्रीमनच्या मते आशा ही सर्वात धोकादायक आणि वाईट गोष्ट असते. परंतु टिम रॉबिन्स मात्र मॉर्गन फ्रीमनला आशाच माणसाच माणूसपण जीवंत ठेऊ शकते, हे पटवून देत असतो. शेवटी दोघे स्वतंत्र होऊन तुरुंगातून कायमची सुटका करून घेतल्यानंतर दूरपर्यंत पसरलेल्या अथांग समुद्र किनाऱ्यावर भेटतात तेव्हा प्रेक्षकसुद्धा नकळत भारावून जातात.

सॅम मेडिस या दिग्दर्शकाचा, अनेक ऑस्कर पारितोषके जिंकणारा अमेरिकन ब्यूटी हा विसाव्या शतकाच्या परिप्रेक्ष्यातील भौतिकतेच्या आहारी गेलेल्या समाजावर आणि मिडल लाइफ क्रायसिसच्या पार्श्वभूमीवर बेतलेला अत्यंत गुंतागुंतीचा तरी सौंदर्याचा शोध घेणारा एक जबरदस्त चित्रपट आहे.

p3

पोर्फा (दि कप) हा तिबेटियन भाषेतील एक सुंदर चित्रपट आहे. पोर्फा म्हणजे कप, फुटबॉलचा वर्ल्ड कप. जरी शीर्षकाचा संबंध वर्ल्ड कपशी असला तरी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिबेटी मठातील भिक्षूंच्या देखरेखीखाली जीवन जगणाऱ्या मुलांच्या मनातील वर्ल्ड कपचे आकर्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे. धार्मिक, आध्यात्मिक व परंपरा इत्यादींचे शिक्षण घेणाऱ्या व कडक शिस्तीच्या अंमलाखाली वाढत असलेल्या मुलांच्यामध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याबद्दलचे प्रचंड कुतूहल. मठाधिपतींची करडी नजर, नैतिकता आणि वर्तणुकीबद्दलचे कठोर नियम आणि त्यांच्या तंतोतंत पालनाचा टोकाचा आग्रह, असूनसुद्धा बारा ते अठरा वर्षातील या मुलांना स्वैर हुदडावेसे वाटते, काही तरी जाणून घ्यावेसे वाटते, नियमांची चौकट मोडाविशी वाटते, प्रार्थनेच्या वेळी डुलकी घ्यावीशी वाटते व फुटबॉलसुद्धा खेळावेसे वाटते.

राजेश खन्नाचा गाजलेला चित्रपट बावर्ची बघून आल्यानंतर घरघरातील भांडणं मिटवावेसे वाटू लागते. राजेश खन्नाचा (की अमिताभ बच्चनचा) आनंद चित्रपट पाहून आल्यानंतर (पुढील दोन-तीन दिवस तरी) आपणही जगाला आनंद देत फिरावेसे वाटत असते. तशाच प्रकारचा मूड डेड् पोएट्स सोसायटी या चित्रपटातील गंमतीशीर प्रसंग पाहिल्यानंतर आपणही शिक्षक होऊन विद्यार्थ्यांचे जीवन बदलून टाकावे असे वाटल्यास नवल नाही. आपल्यापैकी बहुतेकांच्या विद्यार्थी दशेत मनस्वी आवडलेला एखादा शिक्षक वा आवडलेली एखादी शिक्षिका नक्कीच भेटले असतील. तशा व्यक्तींची आठवण जागविणारा शिक्षक, रॉबिन विलियम्सने या चित्रपटात रंगविला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षक (व पालकांनीसुद्धा) आवर्जून पाहण्यासारखा हा एक सुरेख चित्रपट आहे.

p4

जॉर्ज ऑर्वेल लेखकाचे ‘नायंटीन एटीफोर’ वा एच जी वेल्सचे ‘दि टाइम मशीन’ वा हक्स्ले याचे ‘दि ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या कादंबऱ्या वाचकांना काल्पनिक समाजात भविष्यात काय घडू शकेल याचा अंदाज वर्तविलेले असल्यामुळे वाचकांना एका वेगळ्या जगात नेवून सोडतात. समाजातील विसंगतीवर बोट ठेवत अतिरेकाचे उपरोधपूर्ण काळेकुट्ट चित्रण केलेल्या अशा प्रकारच्या लेखन प्रकारातील आशयाला डिस्टोपिया (युटोपियाच्या विरोधी अर्थाने) असे म्हटले जाते. या प्रकारच्या आशयावरील भयपट पाहत असताना मन सुन्न होऊन जाते. ‘सारे कसे छान छान’ अशा गुलछबू चित्रपटांची सवय झालेल्यांना असले चित्रपट धक्कादायक ठरतात. याच मालिकेतील फॅरनहीट 451 हा चित्रपट असून आपल्या समाजातील दोषावरच अतिशय कठोरपणे टीका-टिप्पणी येथे केली आहे. मूळ लेखक रे ब्रॅडबरी यानी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवरून या चित्रपटाची पटकथा बेतलेली आहे. फ्रॅन्स्वा त्रूफा या फ्रेंच दिग्दर्शकाने रे ब्रॅडबरीच्या कादंबरीतील गाभा पकडून विलक्षणरित्या चित्रित केला आहे. आजही जगात अनेक पुस्तके आणि त्यातून व्यक्त होणारे विचार दडपले जातात. हा चित्रपट अशांसाठी चपराक आहे.

डेझिल वॉशिंग्टन या गुणी अभिनेत्याने दिग्दर्शित केलेला दि ग्रेट डिबेटर्स हा शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्षावर बेतलेला एक उत्कृष्ट चित्रपट आहे. कॉलेजमधील सांघिक वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने वांशिक भेदाभेदातील अंतर्विरोध, संघातील स्पर्धेत भाग घेणाऱ्यांचे एकमेकाशी असलेले नाते, मतभेद, शौडषावस्थेतील ताणे-बाणे, जबरदस्त समूहभावना इत्यादींचे सुरेख चित्रण या चित्रपटात बघावयास मिळते. चित्रपटाच्या अंतिम भागात स्पर्धेतल्या वादविवादाच्या शेवटच्या फेरीचे चित्रण फार सुरेखपणे टिपलेले आहे.

अँथनी हॉपकिन्स या गुणी नटाच्या प्रभावी अभिनयाची प्रचीती देणारा इन्स्टिंक्ट हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी पृथ्वीवर माणसाने आपल्या आक्रमक व आग्रही आणि पझेसिव्ह स्वभावामुळे मांडलेला उत्पात व सृष्टी आणि सृष्टीतील प्राणी जगतावर प्रभुत्व मिळविण्याची सततची हाव आहेत. या विकृतीविरुद्ध लढणारा एक विक्षिप्त व चक्रम डोक्याच्या संशोधकाची भूमिका अँथनी हॉपकिन्स यानी वठवलेली आहे.

p5

लेखकाच्या मते लाइफ इज ब्यूटिफुल हा चित्रपट आपल्या जगण्याच्या किंवा जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनालाच बदलून टाकणारा आहे. पराकोटीच्या दुःखाकडे, संकटाकडे आणि विपरीत परिस्थितीकडे सकारात्मकरित्या कसे पाहता येईल असा एक वस्तुपाठच हा चित्रपट प्रेक्षकासमोर ठेवतो. हा एक अद्भुत सुंदर चित्रपट आहे, एक अत्युत्कृष्ट चित्रपट आहे असे चित्रपट पाहून संपल्यानंतर आपोआप लक्षात येईल. दुष्ट माणसं फार फार तर शरीरावर सत्ता चालवतील. पण आत्म्याचे स्वातंत्र्य आपल्यावरच अवलंबून असते. ते आपण कोणत्याही परिस्थिती अबाधित ठेवू शकतो, हेच चित्रपट सांगू इच्छित आहे.

अमेरिकन सिनेटमधील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या मि. स्मिथ गोज टु वॉशिंग्टन या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंका पिटणारी अमेरिकन वृत्तपत्रे आणि अमेरिकन काँग्रेसकडून प्रखर विरोध झाला होता, हे सांगूनही कुणाचाही विश्वास बसणार नाही. फॅसिस्ट प्रवृत्तीच्या काही युरोपियन राष्ट्रांनीसुद्धा या चित्रपटावर बंदीची कुऱ्हाड उगारली होती.

आपल्या येथील चित्रपटातील प्रेम म्हणजे धो धो पडणाऱ्या पावसात ओले-चिंब झालेल्या नायक-नायिका, नाच-गाणी, असेच काही तरी बघायला मिळते. थोडक्या प्रेम सोडून सर्व काही त्यात असते. परंतु दि रोड होम या चायनीज चित्रपटात प्रेमकथा असूनसुद्धा नाच-गाणी तर नाहीतच पण नायक-नायिका, खलनायक-नायिकासुद्धा नाहीत. रस्मे-रिवाज, बेरेहम समाज, खानदान की इज्जत, गरीब-श्रीमंत इत्यादी गल्लाभरू मसालासुद्धा त्यात नाही. कंटाळा घालवण्यासाठी बाष्कळ विनोद नाहीत. मेरी माँ, बहन म्हणत धाय मोकलून म्हटलेले रडगाणे नाहीत. वारंवार मन भरून याव, गालावर आनंदाश्रू ओघळावीत अशी एक अप्रतिम प्रेमकथा रोड होम मध्ये चित्रित केले आहे.

शटर आयलंड हा एक भन्नाट सायको थ्रिल्लर आहे. कदाचित दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी यानी हिचकॉकला वाहिलेली ही आदरांजली असावी. हिचकॉकच्या चित्रपटाप्रमाणे येथेही रहस्य, भीती, व उत्कंठा यांचा लपाछपीचा खेळ आहे. राक्षस म्हणून जगत राहणं चांगल का चांगला माणूस म्हणून मरून जाणं बरं या संभ्रमात शेवटपर्यंत ठेवणारा हा चित्रपट बघायलाच हवा अशी शिफारस लेखक करत आहे.

अब्बास किरियोस्तामी या इराणी चित्रपट दिग्दर्शकाचा टेन हा संपूर्ण चित्रपट फक्त एका कारमध्ये घडतो. ड्रायव्हिंग करणारी सुंदर, स्मार्ट आणि बुद्धिमान तरुणी आणि तिच्याबरोबर शेजारी बसणारे विविध जण यांच्या संभाषणामधून पटकथा उलगडत जाते. ही स्त्री व दुसरे कुणीतरी यांच्यात संवाद होतात ते दहा भाग म्हणजे चित्रपटाचे शीर्षक टेन. चित्रपट संपतो तेव्हा आपण काय पहात होतो त्यावर विश्वास बसत नाही. जगभर पुरुषाची अरेरावी आणि मग्रूरी सारखेच असते, हे आपल्याला कळू लागते. एखादी स्त्री आपले व्यक्तिमत्व, आपला स्वाभिमान समजून घेते, हेही आपल्याला कळते. त्या समजुतीच स्त्रियांनाही आत्मभान देऊ शकतात, हे पाहून आपण नक्कीच प्रभावित होतो.

सिएरा माड्रे या मेक्सिकोतील पर्वतराजीत दडलेल्या सोन्याच्या साठ्याचा शोध व त्यापोटी होत असलेला माणुसकीचा ऱ्हास 1948च्या ट्रेझर ऑफ सिएरा माड्रे या चित्रपटाचा गाभा आहे. ज्याला सोनं मिळतय तो माणूस कधीच श्रीमंतीत मरत नाही. कारण सोनं माणसाला भ्रष्ट करते. मुळात सोनं सापडेपर्यंत मैत्री, नातीगोती सगळे ठीक असतात; पण एकदा सोनं सापडलं की सर्व समीकरणं बिघडत जातात.

चॅर्ली चॅप्लिनच्या चित्रपटांची आठवण करून देणारा उम्बर्टो डी हा चित्रपट खरे पाहता नववास्तववादी लाटेतला एक महत्वाचा चित्रपट आहे. एकीकडे मन विषण्ण करणारे प्रसंग व त्याच वेळी खोल कुठेतरी आशेचे किरण असा ऊनपावसाचा खेळ पडद्यावर आपण बघू शकतो. जगण्याचा पेच अनाकलनीय व अन्याकारक वाटत असला तरी जगण्यावरचे प्रेम हाच जगण्याचा एकमेव मार्ग आहे, हेच जणू हा चित्रपट मनावर ठसविण्याचा प्रयत्न करत आहे की काय असे शेवटी वाटू लागते.

p6

कुटुंबाप्रतीचे कर्तव्य आणि प्रेम या चिरंतन मूल्याभोवती फिरणारा व्हाट्स ईटिंग गिल्बर्ट ग्रेप हा एक भावमधुर चित्रपट आहे. टीअरशेडिंग, आदर्शवादी, बाळबोध वळणाचासुद्धा नाही. सुरुवातीला कारुण्याची झालर असली तरी उगीच फापटपसारा नाही. एक छान, सुंदर चित्रपट बघितल्याचा आनंद मिळतो.

लाइव्हस ऑफ अदर्स हा जर्मन चित्रपटाचा आशय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. सरकारी सुरक्षा यंत्रणा आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनसामान्यांच्या रोजच्या जगण्यात केलेली लुडबुड व सावातंत्र्याची गळचेपी व या गळचेपीच्या विरोधात कलावंतानी केलेला संघर्ष यांचे फार सुरेख चित्रण येथे बघण्यास मिळतो. एकीकडे चित्तथरारक रहस्यकथा असलेला हा चित्रपट रहस्यपट न राहता एक समृद्ध आशयघन असलेला चित्रपट म्हणून उलगडत जातो.

अमानुष, अघोरी व अश्लाघ्य अशा प्रथाविषयींची मांडणी करणारा मूलाडे हा एक अप्रतिम चित्रपट आहे. पश्चिम आफ्रिकेतील एका खेड्यातील हे चित्रण आहे. निरक्षरता, अडाणीपणा आणि अंधश्रद्धेचे प्राबल्य असलेल्या या छोट्याशा खेड्यात पुरुष परिषदेची सत्ता चालत असते. या परिषदेची पंचायत सर्व निर्णय घेत असते. त्यांच्या अमानुष परंपरेत स्त्रियांचे शुद्धीकरण हा महत्वाचा अजेंडा असतो. या पारंपरिक प्रथेप्रमाणे, प्रत्येक मुलीचे अगदी लहानपणी, पाचव्या-सहाव्या वर्षी, तिच्या योनीचा काही भाग तीक्ष्ण चाकूने कापून टाकून नंतर शिवायचे ही ती पद्धत होती.

जिथे पर्यायच नसतो, तिथे बंड उभे राहते, क्रांती होते, लोक पेटून उठतात. या पार्श्वभूमीवरचा मुलाडे हा आफ्रिकन चित्रपट आहे. दिग्दर्शकाने कुठेही भडकपणा न आणता चित्रित केले आहे. अंगावर येणारे वास्तवच प्रेक्षकांना जास्त अस्वस्थ करते, यातच या चित्रपटाचे श्रेष्ठत्व आहे. या प्रकारच्या कहाण्यांना देश-काळाचे बंधन नसते. पती मेल्यावर ढोलताश्याच्या कर्कश आवाजात जिवंत पत्नीला जळत्या चितेवर ढकलले जाणे, किंवा विद्रूप करून उरलेले आयुष्य जगायला लावणे, एखादीला चेटकीण म्हणत दगडांनी ठेचून मारणे इत्यादी गोष्टी इतिहासाने बघितले आहेत. म्हणूनच हा चित्रपट फक्त आफ्रिकेतला न राहता सर्व देशातील स्त्रियाविरुद्धच्या प्रथाबद्दल विचार करण्यास भाग पाडतो. चित्रपटात कुठेही बटबटितपणा नाही. बारीकसारीक तपशिलातून चित्रपट उलगडत जातो. चित्रपटाचा एकसंध व सलग परिणाम होत असल्यामुळे चित्रपट संपला तरी आपल्या मनात तो चालूच राहतो. स्त्रियांच्या व्यथा मांडणारा मुलाडे अनेक दिवस पिच्छा न सोडणारा चित्रपट आहे.

इन अ बेटर वर्ल्ड हा डॅनिश चित्रपट नैतिकता, सूडभावना, क्षमा, प्रेम, हिंसा इत्यादी मानवी स्वभावांचा अत्यंत उत्कटतेने शोध घेणारा चित्रपट आहे. ग्राउंडहॉग डे या चित्रपटाची कथा अगदीच अफलातली आहे. आय अ‍ॅम डेव्हिड या चित्रपटाची कथा बारा वर्षाच्या एका कोवळ्या मुलाची आहे. अलेहांद्रो गोंजालेज या मेक्सिकन दिग्दर्शकाचा बर्डमन हा चित्रपट रचना, आशय व परिणाम या दृष्टीने फार आगळावेगळा चित्रपट आहे. दि पियानिस्ट या चित्रपटाचे दिग्दर्शन रोमन पोलान्स्की या ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाने केले आहे. एका पोलिश संगीतकाराच्या जीवनावर आधारलेल्या पटकथेवरून बेतलेला हा चित्रपट पहायलाच हवा या कॅटेगरीतला आहे.

य़ा पंचवीस उत्कृष्ट चित्रपटातील आशयाविषयीच्या टिप्पणी बरोबर लेखकाने दोन परिशिष्ट जोडले आहेत. एका परिशिष्टात तथाकथित दुर्बोध चित्रपट वा एकूण कलाप्रकार समजून का घ्यावे या बद्दलची लेखकाची मतं आहेत. प्रथमदर्शनी अनाकलनीय (व काही वेळा कंटाळवाणे) वाटणारी कलाकृतीची चिकाटीने मागोवा घेतल्यास, पुन्ह पुन्हा आस्वादल्यास आणि जाणकाराने तिच्याबद्दल जे लिहिले आहे ते वाचल्यास ती हळू हळू उलगडायला लागते व तो अनुभव अवर्णनीय असतो. अजून एका परिशिष्टामध्ये चित्रपटाचे अन्वयार्थ आणि दिग्दर्शकाचा दृष्टिकोन याबद्दल लिहिलेले आहे. काही मूलभूत भावना, मूल्ये, आणि विचार इतके वैश्विक असतात की स्वतंत्र प्रज्ञेचे कलावंत आपल्या प्रतिभेने ते साकार केल्यानंतरच आपल्याला अतीव आनंद देतात, असे लेखकाला वाटते. काही उत्कृष्ट चित्रपटातील बारकाव्यांचा उल्लेख करून लेखक आपले म्हणणे पटवण्याचा प्रयत्न करतो.

वैश्विक स्तरावर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या चित्रपटांची ओळख करून देताना लेखक काही लक्षणांचा उल्लेख करतो. चांगल्या चित्रपटात प्रेक्षकानुनय पूर्णपणे टाळले जाते, परंतु ते प्रेक्षकाभिमुख असतात. प्रेक्षकाच्या सर्जनशीलतेला आव्हानात्मक असतात. श्रेष्ठ चित्रपट वास्तवाचे तटस्थ चित्रण करतात. चित्रपट जगाची विभागणी केवळ सुष्ट वा दुष्ट अशा काळ्या पांढऱ्या रंगात न रंगवता सुष्टाच्या मनातील दुष्टपणा वा दुष्टाच्या मनातील चांगुलपणाही दाखवतात. व येथे समबल मानवी मूल्यांचा संघर्ष असतो. श्रेष्ठ चित्रपट प्रेक्षकावर निष्कर्ष लादत नाहीत तर प्रेक्षकाला विचार प्रवृत्त करतात. हे चित्रपट मानवी आत्मभानाची कहाणी सांगत असतात. उत्कृष्ट चित्रपटात जे दिसते व ऐकू येते त्यापेक्षा अधिक काहीतरी प्रेक्षकाच्या मनात निर्माण करत असतात. हे चांगले चित्रपट स्थलातीत व कालातीत असतात.

लेखकानी आखून घेतलेले हे मापदंड त्यानी वर्णन केलेल्या चित्रपटाबद्दल तंतोतंत जुळतात, हे संपूर्ण पुस्तक वाचताना जाणवते. चित्रपटांना कलाकृतीच्या उंचीवर नेणारे हे एक संग्राह्य पुस्तक आहे.

पडद्यावरचे विश्वभान
संजय भास्कर जोशी
मौज प्रकाशन गृह
किमत 350 रु, पृ. सं 176

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet