स्वराज्य सौदामिनी तारा राणी

2022 ते 2024 दरम्यान जसे जमेल तसे सोनी लीव्ह वर "स्वराज्य सौदामिनी तारा राणी" ही सोनी मराठी वरील सिरियल पाहून संपवली. एकूण 221 भाग आहेत. IMBD वर 10 पैकी 9.3 रेटिंग आहे. यात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची कथा पुढे सुरु होते. झी मराठी वर "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिका मी बघितली नव्हती कारण तेव्हा जमले नाही, पण ती आत्ता बघायला सुरुवात केली. नंतरचा इतिहास आधी पाहिला गेला आणि आधीचा इतिहास आता बघायला सुरुवात केली.

"स्वराज्य सौदामिनी तारा राणी" मध्ये बॅगराऊंड म्युझिक थांबतच नाही, प्रत्येक प्रसंगाला बॅगराऊंड म्युझिक आहेच आहे आणि "स्वराज्य रक्षक संभाजी" मध्ये बॅगराऊंड म्युझिक खूपच कमी आहे आणि सिरियल खूपच स्लो आहे, निदान आता तरी तसे जाणवत आहे. नंतरचे माहिती नाही. 772 भाग आहेत. असो.

दोन्ही सिरियल शेवटी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याच निर्मिती संस्थेच्या आहेत आणि लेखक कार्तिक राजाराम केंढे हेच आहेत. दोन्ही सिरियलमध्ये रामचंद्र पंत अमात्य आहेत आणि कलाकारही तोच घेतला आहे.

लेख वाचण्यापूर्वी एक महत्वाची सूचना म्हणजे मी इतिहासतज्ञ नाही, तर वेगवेगळ्या माध्यमातून (पुस्तके, चित्रपट, सिरियल्स, पेपरमधील लेख, विविध चर्चा ऐकून, जाणकारांशी बोलून ) इतिहास जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा सामान्य इतिहासप्रेमी आहे आणि हा लेख इतिहासाबद्दल नाही तर ऐतिहासिक सिरियलबद्दल आहे, याची नोंद घ्यावी!

प्रथम यात कोणकोणती पात्रे आहेत ते पाहू, म्हणजे पुढे तुम्हाला लेख समजण्यास मदत होईल:

शिवाजी महाराज (पाहुणे कलाकार, औरंगजेबाला घाबरवायला त्याच्या स्वप्नात, आरशात दिसत राहतात), छत्रपती महाराणी ताराबाई (छत्रपती राजाराम राजे यांची पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची सुपुत्री), छत्रपती राजाराम राजे (शिवाजी राजांची पत्नी सोयराबाई यांचे पुत्र), येसुबाई (छत्रपती संभाजी राजे यांची पत्नी), जानकीबाई (छत्रपती राजाराम राजे यांची पत्नी), शाहू महाराज (लहान, संभाजी आणि येसूबाई पुत्र), वसुधा बाई (छत्रपती राजाराम राजे यांची जिंजी येथील पत्नी), संताजी घोरपडे (सरसेनापती), बहिर्जी घोरपडे (संताजी घोरपडेचा भाऊ), धनाजी जाधव (सेनापती), सूर्याजी पिसाळ, खंडो बल्लाळ (बाळाजी आवजी यांचे पुत्र), हंबीरराव मोहिते (तारा राणीच्या आठवणीत येत राहतात), रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी पंत, प्रल्हाद पंत, गुणाजी (सेवक), सगुणा (स्वयंपाकीण / सेविका), भीमाबाई (स्वराज्यात राहणारी स्वयंपाकीण पण औरंगजेबाची हेर) नागोजी राव, गणोजी शिर्के (येसुबाईचा भाऊ), हिना, बेदनूर राणी चेनम्मा आणि तिमण्णा, औरंगजेब, जीनत ऊन नीसा (औरंगजेबाची अविवाहित मुलगी), असद खान (औरंगजेबाचा वजीर), केशव पंत (औरंगजेब वकील), कांबक्ष (औरंगजेबाचा मुलगा), जुल्फिकार (असदचा मुलगा), फक्र जहाँ (कांबक्षची बायको), मुकर्रब खान (ज्याने संभाजी महाराजांना पकडून द्यायला मदत केली होती), राजा अंगद राय वर्मा (संताजीचा मित्र), अमृत राव, आदिल खान, कासिम खान, दिलावर (फक्र जहाँ ने जीनत साठी आणलेला खोटा प्रियकर). आणखी बरीच छोटी मोठी पात्रे (कॅरेक्टर्स) आहेत.

अभिनयाबद्दल:

कलाकारांची निवड उत्तम आहे, अगदी चपखल! यातील सर्वच कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. सर्व सेट चांगले उभारले आहेत. कलाकारांच्या वेशभूषा अतिशय साजेशा झाल्या आहेत. सर्व कलाकार आपापली पात्रे जगली आहेत. स्वरदा ठीगळे पण शीर्षक भूमिकेत समरसून गेली आहे. संग्राम समेळ ने राजरामची भूमिका अशी निभावली आहे की यापेक्षा कुणी दूसरा राजरामची भूमिका करूच शकणार नाही असे वाटते! कुणाच्याही अभिनयाला नाव ठेवायला जागा नाही. इतकेच नाही तर अगदी शेवटी शेवटी एंट्री घेणारे फक्र जहाँ, कांबक्ष आणि दिलावरची भूमिका करणारे कलाकारपण भाव खाऊन गेले आहेत. असदची औरंगजेबाच्या प्रत्येक चांगल्या वाईट भावनेला अनुरूप भाव चेहऱ्यावर आणणण्याची लकब तर खूपच वाखणण्याजोगी आहे. मान गये भाई! रामचंद्र पंत अमात्य सकरणारा कलाकार खूपच चांगला आहे. गुणाजी आणि सगुणा साकरणाऱ्या कलाकारांनी कमाल केली आहे. तसेच अनंत जोग आणि अपूर्वा नेमलेकर फक्त अंदाजे दहा एपिसोड पुरते आहेत पण त्यांनी अभिनयाने एक वेगळीच छाप सोडली आहे. असे वाटायला लागते की ते संपूर्ण सिरियल भर असावेत.

या सिरियलमध्ये औरंगजेबाच्या फॅमिलीवर पण बरच फोकस आहे. विशेष करून जीनत आणि कांबक्ष ही त्याची दोन मुले यांच्यातील संबंध तसेच असद आणि जुल्फिकार यांच्यातील संबंध!

औरंगजेब कसा डोकेबाज, धूर्त, क्रूर आणि कावेबाज राजकारणी होता ते या सिरियलमधून दिसून येते.

संताजी घोरपडे साकारणारा अमित देशमुख याची भूमिका वेगळी उठून दिसते. त्याची बोलण्याची लकब आणि करुण शेवट मनाला चटका लावून जाते.

ही सिरियल जरूर बघावी अशीच आहे. तुम्हाला जास्त इतिहास माहीत नसल्यास खाली दिलेली कथा वाचल्यास तुम्हाला सिरियल समजण्यास मदत होईल आणि तारा राणी यांची जीवन कथा समजण्यास मदत होईल.

एकमेकांच्या राज्यातील घडणाऱ्या अंतर्गत घडामोडी तारा राणी आणि औरंगजेब यांना एकमेकांच्या राज्यात पेरून ठेवलेल्या हेराकडून समजतात. ते नेमके कसे केले जात होते हे या सिरियलमध्ये चांगल्या पद्धतीने दाखवले आहे.

जुल्फीकराचे काम करणारा अभिनेता पण अगदी स्मार्ट आणि चांगला घेतलेला आहे तो शोभून दिसतो

युद्ध प्रसंग:

यात युद्धाचे प्रसंग फार थोडे दाखवले आहेत. खर्च वाचवण्यासाठी तसे केले असावे. प्रत्यक्ष घोडेस्वारी, तलवारबाजी यात फार कमी दाखवली आहे, पण राजकारण आणि त्या काळाची परिस्थिती यावर खूपच बारकाईने अभ्यास करून दाखवले आहे. तसही युद्ध प्रसंग बघण्यापेक्षा ताराराणी यांनी औरंगजेबाला कसे राजकारण खेळून जेरीस आणले, त्याचे डाव कसे हाणून पडले हे बघणे आणि समजून घेणे जास्ती महत्वाचे आहे. काही ठिकाणी तलवार बाजी अगदीच लुटुपुटूची वाटते, पण बजेटची कमतरता आणि एक्शन डायरेक्टरचा खर्च त्यांनी वाचवला असावा. हरकत नाही!

सिरियलची थोडक्यात कथा:

सर्वच कथा सरळ रेषीय पद्धतीने मी सांगितलेली नाही. काही पात्रांचे आणि प्रसंगाचे ट्रॅक मी वेगवेगळे ठेऊन तिथल्या तिथेच कथेच्या शेवटी त्या पात्राचे काय होते असे सांगितले आहे. औरंगजेब मरतो तिथपर्यंतच या सिरियलची कथा आहे.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची कथा पुढे सुरु होते. औरंगजेब (यतीन कार्येकर) तुळापूर छावणीत ठाण मांडून बादलेला आहे. आता फक्त राजाराम (संग्राम संमेळ) मेला की स्वराज्य हातात येईल असे स्वप्न बाळगून राजाराम यांना तो विशालगाडवर मारेकरी पाठवून ठार मारण्याचा प्रयत्न करतो, पण संताजी आणि धनाजी तो हाणून पडतात. म्हणून ताराबाई (स्वरदा ठीगळे) आणि राजाराम हे गड उतार होतात. प्रवासात ताराबाई नकली राजाराम औरंगजेबाच्या तावडीत सापडवतात, ते समजल्यावर औरंगजेब तो खरा राजाराम आहे अशी अफवा पसरवतो.

येसूबाईंना (दीप्ती भागवत) औरंगजेबाच्या तावडीत असलेले राजाराम नकली आहेत हे माहीत नसते. त्यानुसार शरणागती म्हणून झुल्फिकार येसूबाई, शाहू, आणि जानकीबाई यांना कैद करायला येतो. त्या औरंगजेब कैदेत जातात कारण जुल्फिकारने वचन दिलेले असते की येसूबाई यांना औरंगजेबाकडे सन्मानाने बागवण्यात येईल. औरंगजेबाच्या छावणीत गेल्यावर येसुबाईंना नंतर कळते की हा सगळा औरंगजेबाच्या कावा असतो आणि राजाराम सुखरूप आहेत. पण आता तिथून सुटका करता येत नाही कारण छावणीत खूप बंदोबस्त असतो.

* * *

संभाजी महाराजांना औरंगजेबाने क्रूरपणे ठार मारलेले असल्याने संताजी धनाजी व इतर सर्वजण त्याच्यावर खूप संतापलेले असतात. एकदा संताजी औरंगजेब छावणी गुंबद तोडून आणतो पण औरंगजेब स्त्रियांच्या तंबूत लपून राहतो त्यामुळे तो सापडत नाही आणि वाचतो. नंतर तारा राणी संगमेश्वर जिंकतात जिथे शंभु राजांना पकडले होते. औरंगजेबाला हादरा बसतो. संगमेश्वर येथून कोकणावर राज्य करता येते. भीमाबाई स्वराज्याची गद्दार हेर असते. औरंगजेबाला खूप मदत करते पण पण नंतर ती पकडली जाते, तिचे मतपरिवर्तन होते. भीमा बाई नंतर तारा राणीला औरंगजेबच्या मारेकऱ्यापासून वाचवताना मरते.

राजाराम विविध संकटांचा सामना करत करत तमिळनाडूतील स्वराज्याच्या ताब्यातील जिंजी किल्ल्यावर सुखरूप पोहोचतात. तिथे झुल्फिकार कायम वेढा घालून बसलेला असतो. दक्षिणेकडील राणी चेनम्मा (अपूर्वा नेमलेकर) आणि तिमन्ना (अनंत जोग) यांना स्वराज्याच्या बाजूने वळवतात.

राजाराम जिंजीकडे लपून छापून जात असतांना चेनम्मा यांनी त्याना काही काळ त्यांना त्यांच्या बेदनूर राज्यात लपण्याची परवानगी द्यावी असे तारा राणी यांचे मत असते कारण औरंगजेबला खबर लागलेली असते की राजाराम जिंजी येथे पळून जात आहेत आणि त्याचे सैनिक राजा राम यांच्या मागे लागलेले असतात, पण तिमन्ना हा अधिकारी चेनम्मा यांना औरंगजेबाच्या विरोधात जाऊ नये आणि राजा राम यांना आसरा देऊ नये असा दबाव आणतो. पण राणी अविश्वसनीय साहस करून त्याना एनकेन प्रकारेन आपल्याकडे वळवतात. हा भाग खूप छान जमून आला आहे. साऊथ इंडियन लोकांची मराठी बोलण्याची लकब ऐकायला मजा येते की हो, म्हणतो मी!

* * *

नंतर प्रल्हाद पंत यांच्या सल्ल्यावरून राजाराम वसुधा बाई यांच्याशी लग्न करतात. जिंजीवरून राजाराम आबाजीला नागोजीच्या मध्यस्थीने झुल्फिकार सोबत खोटी मैत्री वाटाघाटी साठी पाठवतात.

पूर्वी गणोजी शिर्के हे संभाजीराजांचा ठावठिकणा मुकराब खानला सांगतात. त्यामुळे संभाजी महाराज पकडले गेलेले असतात. पण तारा राणींना पकडण्यासाठी औरंगजेब जेव्हा गणोजींना पाठवतात तेव्हा औरंगजेब येसुबाई यांच्या पश्चात चाटण मधून छोट्या शाहू महाराजांना जे विष देत असतो ते बंद करण्याचे वचन घेतात आणि पूर्वीच्या चुकीचे थोडे प्रयशचित्त करतात.

संताजी (अमित देशमुख) आणि धनाजी (रोहित देशमुख) यांची जोडी गाढ मैत्री असलेली म्हणून ओळखली जाते.

तारा राणी औरंगजेबाच्या छावणीत एकट्या जाऊन नकली औरंगजेबला ठार मारतात. नंतर समजते की तो नकली आहे. तेव्हापासून औरंगजेब ताराराणीचा धसका घेतो आणि त्याला समजते की नुसते राजाराम नाही तर तारा राणी जास्त धोकेदायक आहेत तसेच संताजी धनाजी यांच्या पराक्रमामुळे त्याला मराठ्यांवर विजय मिळवणे सोपे नाही असे वाटते. तो तारा राणी यांच्या जिवावर उठतो. कारस्थाने सुरु करतो.

कालांतराने तारा विशाल गडावरुन जिंजीला राजाराम यांना भेटायला जातांना औरंगजेब पुन्हा मुकरबला तिला मारायला पाठवतो. पण तारा समुद्र मार्गे जायचे ठरवतात. समुद्र मार्गे जातांना अनेक संकट आणि अडचणी येतात. रस्त्यातील एका गावात एक छोटे युद्ध होते, त्या गावातील काही मंडळी नंतर तारा राणीच्या स्वराज्य मोहिमेत सामील होतात. जनतेत असंतोष असतो की संभाजी नंतर आता स्वराज्याला राजा राहीला नाही. राजाराम परागंदा झाले आहेत आणि एक स्त्री ताराराणी स्वराज्य काय वाचवणार? दुसरीकडे मोगल सैन्य स्वराज्यातील जनतेला खूप त्रास देतात. अधून मधून तारा राणी वेश बदलून जनतेचा स्वराज्यावर उडालेला विश्वास पुन्हा मिळवण्यात यशस्वी होतात. जिंजीला पोहोचल्यावर राजारामची दुसरी राणी वसुधा ही तारा राणी वर कुरघोडी करते. पण तारा राणी पुरून उरतात.

दरम्यान येसूबाई छोट्या शाहू महाराजांना बराणपूर जाणाऱ्या पोत्यांमधून टाकून औरंगजेब छावणीतून सुटका करवण्याचा प्रयत्न करतात परंतु यशस्वी होत नाही.

मध्ये एकदा औरंगजेब नजरकैदेतील छोट्या शाहू महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा आग्रह करतो पण तो प्रयत्न शक्य होत नाही.

* * *

औरंगजेबाला त्याची मुलगी झीनत (मीरा सारंग) हिने त्याच्यानंतर त्याचा कारभार सांभाळावे असे वाटते आणि त्यासाठी तो तिला वेगवेगळ्या गोष्टी सांगून लग्न करण्यापासून परावृत्त करतो. परंतु औरंगजेबाचा त्याच्याजवळ रहात असलेला एक निकम्मा मुलगा कांबक्ष याची बायको फक्र जहाँ त्याला कसेही करून झीनतचे लग्न लावून देण्याचा औरंगजेबला आग्रह करण्याची विनंती करते. कारण त्याशिवाय कांबक्षचां सत्तेकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. त्यासाठी ती एक "दिलावर" नावाचा माणूस कांबक्ष ह्याच्या मदतीने शोधून आणते आणि तो झीनतला प्रेम पाशात अडकवतो परंतु औरंगजेबला असदच्या मदतीने हे समजते. तो त्यांचा डाव हाणून पडतो.

तारा राणी जिंजी येथे पुन्हा गरोदर राहतात. पूर्वी एका लढाईत मोगल सैनिकाने त्यांच्या पोटावर लाथ मारली असल्याने त्यांचे बाळ पोटात मरते. पण झुल्फिकार मुद्दाम गडाखाली रयतेला त्रास देतो. राणी गरोदर असल्याने बाहेर पडू शकत नाही म्हणून राजाराम आजारी असूनही त्याचा बंदोबस्त करायला जातात, यात खंडोजी पण असतात. पण राजाराम संकटात सापडतात पण राणी गरोदर असताना सुद्धा पुनः लढायला जाते आणि राजांना वाचवते.

राजाराम राजे पुन्हा वतनदारी सुरू करायचा निर्णय घेतात कारण औरंगजेबाने वतनदारी दिलेले स्वराज्यातील लोक वतनदारीच्या आमिषाने का होईना स्वराज्यकडे परत येतील म्हणून! पण वतनदारी पद्धत शिवाजी महाराजांनी बंद केलेली असते सुरुवातीला ताराराणींचा विरोध असतो परंतु नंतर त्या ऐकतात. पण वतनदारीला संताजी घोरपडेचा प्रचंड विरोध असतो. नंतर नागोजीरावपण स्वराज्याच्या वतनदारीला सामील होतात.

तिकडे विशाल गडावर संताजी धनाजी यांचे भांडण श्रेयवादावरून विकोपाला जातात. कुणी किती लढाया केल्या आणि कुणी किती मोहिमा केल्या, कुणी स्वराज्यात किती लूट आणून खजिना भरला वगैरे. केशव पंत हा औरंगजेबाच्या सांगण्यावरुन विशाल गडावरील काही गोष्टी हेरून अशा काही काड्या लावतो की संताजी धनाजी या दोघांत वादाची ठिणगी पडते. राणी त्यांना जिंजी बोलावून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण व्यर्थ!

संताजी घोरपडेचा भाऊ बहिर्जी औरगजेबाच्या तावडीत सापडतो. पण तो मोगलांना सामील होणे आणि संताजीला पण मोगलांना सामील होण्यास राजी करायचे वचन घेऊन त्याला सोडून देतो.

एकदा आदिल खानवर संताजी हल्ला करतो, त्याच्या बेगमला पुढे करून आदिल पळून जातो. ती संताजीच्या नकळत पेटाऱ्यातून लुटीसोबत जिंजी पोहोचते. राजाराम शहानिशा न करता संताजी यांची खरडपट्टी काढतात. शत्रूच्या स्त्रियांना आदराने वागवण्याच्या शिवाजी महाराजांच्या नियमाच्या विरुद्ध ही वागणूक असते त्यामुळे! स्वराज्याची इतकी सेवा करूनही राजाराम यांनी आपल्यावर इतका अविश्वास कसा दाखवला त्यामुळे संताजीचा असंतोष वाढत जातो.

नंतर औरंगजेब अशा काही घटना घडवतो की संताजीचा धनाजीबद्दल संशय वाढत जातो.

* * *

एकदा औरंगजेब मुलगा कांबक्षच्या नाकर्तेपणाला, नादानपणाला कंटाळून त्याला आणि सून फक्र जहाँ या दोघांना असदसोबत असदच्या मुलाकडे म्हणजे झुल्फिकारकडे जिंजी येथे पाठवतो. तिथे झुल्फिकार आणि कांबक्ष यांचे पटत नाही. झुल्फिकार कांबक्षला नजर कैदेत ठेवतो. ताराराणी जुल्फीकार आणि कांबक्ष मधील वैर वाढेल असा प्रयत्न करते.

राजाराम आजारी पडतात. पोटाचा आजार होतो.

* * *

औरंगजेब संताजीच्या भावाच्या मदतीने म्हणजे बहिर्जी मदतीने धनाजी संताजी यांच्यात पुन्हा भांडण लावण्याचा प्रयत्न करतो परंतु तसे होत नाही. बहिर्जी घोरपडे औरगजेबाला सामील असतो.

एकदा वेश बदललेले तारा राणी आणि खंडो बल्लाळ (ओंकार कर्वे) हे औरंगजेब सुनेला (फक्र जहाँ) गुंडांच्या तावडीतून सोडवतात.

संताजीने मुगल सरदार कासिम खान याला मारले. परत येताना झुल्फिकारने वेढा घातला. 40 मावळे. झुल्फिकार 200 माणसे. युद्ध होते, पण संताजी आणि मावळे पळून जातात. वेळ निघून गेल्यावर धनाजीची कुमक येते. पुन्हा संताजी धनाजी गैरसमज होतो की धनाजी मुद्दाम उशिरा आला.

एकदा सर्व वतनदार आणि तारा, राजाराम वगैरे स्नेह भोजना दरम्यान धनाजी संताजी यांच्यात खडाजंगी होते. संताजी बेछूट आरोप करतात. संताजीची जीभ खूप घसरते. जेवण न करता ते उठून जातात. राजाराम राजे संतापून त्यांचे त्यांचे सरसेनापती पद काढून घेतात. ते निघून जातात.

धनाजी कडून नागोजी तर संताजी कडून विठोजी आणि बहिर्जी घोरपडे असतात.

मध्य भारतातून आले अस सांगून आणि औरंगजेबाच्या तावडीत सापडले असे सांगून उमा नावाच्या बाईने औरंगजेबाची हेर म्हणून तारा राणी सोबत जिंजी प्रवेश मिळवला पण उमा आणि तिचा साथीदार पकडले जातात. कारण तर राणीला आधीपासून माहीत असते.

नंतर चुपचाप बहिर्जी घोरपडे औरंगजेबाला सामील होतात.

* * *

संताजी स्वराज्याने दिलेले राहते घर सोडून पत्नी आणि काही विश्वासू साथीदारांसह जंगलात भटकतो. संताजी फुटल्यानंतर कर्नाटकातील त्याचा मित्र अंगद राय वर्मा संताजीच्या भेटीला येतो. पण वाटेत तो आधी राजारामला बंदी बनवायला परस्पर गडावर जातो करण त्याला राजाराम यांनी संताजीला दिलेल्या वागणुकीबद्दल राग असतो. त्यामुळे संताजी बद्दल गौरसमज विकोपाला. पण ऐन वेळेस संताजीला कळते की आपल्याला भेटायला न येता मधूनच अंगद राय गडावर का गेला? तिथे संताजी जातो त्याला दिसते की अंगद रायने राजाराम यांना तलवारीच्या धारेवर ओलिस धरले आहे. संताजी अंगद रायचा तिथल्या तिथे आगळिक केल्याबद्दल वध करतो, राणी त्याला थांबायची विनवणी करतात पण तो निघून जातो.

धनाजींच्या माणसाकडून संताजीबद्दल राणी आणि राजा यांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न होतात कारण त्यांना धनाजी जाधवराव सरसेनापती व्हायचे असतात आणि स्वत:चा स्वार्थ साध्य करायचा असतो.

राणी संताजीकडून असतात करण त्याना अजूनही विश्वास असतो की ते स्वराज्यात परत येतील पण तिकडे सांताजी कुणालाही सामील न होता औरंगजेब विरुद्ध पण स्वतंत्र लढायचे ठरवतात आणि राजाराम राजे संताजीचे विरोधात गेल्यामुळे, राजा आणि राणी दोघांमध्ये भांडणे होतात. राजाराम हे आता राणीच्या पश्चात निर्णय घ्यायला लागतात. राणीनं डावलले जाते. त्याचा फायदा औरंगजेब घेण्याचा प्रयत्न करतो परंतु राणी म्हणते त्याप्रमाणे औरंगजेबाने याचा फायदा घेऊ नये यासाठी तिचा प्रयत्न असतो. या घटनांच्या वेळेस राजाराम राजे आजारी असतात.

नागोजी रावांच्या पत्नीच्या भावाला अमृत रावला संताजीने मारलेले असते त्यामुळे तिचे म्हणणे असते संताजीला मारावे कारण अमृत राव तिच्या स्वप्नात कायम येत असतात आणि बदला घे असे म्हणतात. ती डाव ती साधते.

नदीत अंघोळ करताना एकटा असतांना संताजीवर ती मारेकरी पाठवते आणि ते संताजीला मारून टाकतात. ही खबर ऐकून औरगजेब मिठाई वाटतो. येसुबाईंना पण देतो. त्या नाकारतात.

* * *

राणी जुल्फिकारला भेटायला जातात आणि तह करतात की त्याने पहारे ढीले करून जिंजीवरून विशाळगडाकडे राणी आणि कुटुंबीयांना जाऊ द्यावे.

तहात राणी असेही सांगतात की ताराराणी कांबक्षपेक्षा जुल्फिकार याला औरंगजेबाचा खरा वारसदार मानतात म्हणून राणी आणि कुटुंबीय जिंजी वरून निघून जातील आणि जुल्फिकारचा मार्ग कांबक्षवर कुरघोडी करायला मोकळा करतील. पण वेळेवर कांबक्ष डाव हाणून पडतो. जुल्फिकार तयार होतो, पण तिथे ठाण मांडलेला कांबक्ष हा जुल्फिकराला सख्त पहारे वाढवायला भाग पाडतो. पण या कमी जुल्फिकाराच्या सांगण्यावरुन त्याच्या सेवेत असलेला गणोजी शिर्के तारा राणी यांना मदत करतो.

राजा, राणी, खंडोजी, प्रल्हाद पंत, वसुधा राणी, वगैरे सर्व "गड उतार" व्हायला तयार होतात मात्र धनाजी हा कांबक्ष सैनिकांच्या तावडीत सापडतो. पण ते कांबक्षच्या सैन्याला मारून सुटतात. जुल्फिकार आणि असदला आनंद होतो.

कांबक्ष जिंजीवर राणी राजा यांना पकडायला जातो, तिथे ते नसतात फक्त सगुणा आणि गुणाजी असतात.

राजा, राणी, खंडोजी, प्रल्हाद पंत, वसुधा राणी, वगैरे सर्व विशाल गडी पोहोचतात. तिथे शंकराजी आणि रामचंद्र अमात्य स्वागत करतात.

असद, जुल्फिकार, काम बक्ष, फक्र जहाँ हे सर्व औरंगजेबाकडे परत जातात. त्याच्यासमोर जुल्फिकार आणि कांबक्ष भांडतात आणि दोष देतात की कुणामुळे तारा राणी पळून गेल्या. औरंगजेब वैतागतो आणि कुणीही कामाचे नाही असे म्हणतो.

विशाळगडावर श्रेय वादावरून रामचंद्र पंत आणि शंकराजी यांच्यात खूप भांडणे होतात. दोघांचाही दृष्टिकोण बरोबर असतो. राणी व्यथित होतात. विशालगडी राज्यकारभाराची सूत्रे ताराराणी पूर्णपणे स्वतःच्या हाती घेतात. रामचंद्र शंकराजी यांच्यातले भांडणामुळे औरंगजेब आनंदी होतो.

राजाराम यांचे आजारपण वाढते.

दौलताबादचा कुतुबशहा अबुल कासिम औरंगजेबाने कैदेत ठेवलेला असतो, तो आजारांचे अंतिम घटका मोजण्याची खबर येते, परंतु ताराराणी म्हणतात की सुन्नी पंथाचा औरंगजेब इतर कोणत्याही पंथ जिवंत राहू नये असे म्हणतो म्हणून त्यांनीच कुतुबशहाला खतम केले, आजारपणामुळे नाही. कुतुबशहाला बळ देऊन त्याला औरंगजेब विरुद्ध वापरायचे असे ताराराणी ठरवते.

तारा राणी आणि राजाराम यांचा मुलगा "शिवाजी दुसरा" यांचा जन्म होतो.

कामबक्ष आणि जुल्फीकार यांच्यात तणाव वाढतो.

शंकरजीचे नावे रामचंद्र पंत यांना आणि रामचंद्र पंतांचे नावे शंकराजी यांना अशी खोटे खलिते येतात. ते औरंगजेब पाठवतो. ही कल्पना झीनतची असते. दोघांमध्ये लिहिलेले असते की दोघे औरंगजेबला पूर्वीपासून सामील आहेत. पण राणी ते ओळखते आणि तो डाव हाणून पावते.

औरंगजेबाची तब्येत बिघडते.

गुणाजी आणि सगुणा विशाळगडी परत येतात.

वसुधाराणीने पूर्वी जिंजीला असतांना तारा राणीच्या पोटातील बाळाला मारण्यासाठी दुधात विष टाकल्याचे कबूल करते. तारा राणी ते विसरतात, आणि ते मात्र राणीना आधीच माहिती असते असे त्या वसुधाला सांगतात.

शिवाजी दुसरा पाच वर्षांचा होतो. राजाराम खूप आजारी होतात. वैद्य यानी सुचवल्यानुसार हवापालटसाठी सर्वजण सिंहगड जातात. स्वराज्याची राजधानी तारा राणी सातारा येथे हलवायचे ठरवतात. सिंहगडावर राजाराम मृत्यू होतो. राजाराम यांची अंतिम इच्छा असते की, सिंहगडावर त्यांची समाधी बनवावी.

जुल्फिकार ताराबाई यांच्या विरोधात जायला नाही म्हणतो कारण त्याला अजूनही विश्वास असतो की तहानुसार ती त्याला मुगल सत्ता मिळवायला मदत करेल. पण एकटा असद खान तारा राणी वर हल्ला करतो. तारा राणी जिंकतात.

औरंगजेब खूप आजारी होऊन संताजी, धनाजी, शिवाजी, राजाराम, तारा राणी यांच्या एकत्रित धसक्याने मरतो. औरंगजेब मेल्याची खबर तारा राणी यांचेकडे पोहोचते आणि सर्वजण आनंदाने तलवार उगारतात आणि म्हणतात "हर हर महादेव!" येथे सिरियल संपते.

* * *

पण नंतर शाहू महाराज आणि येसुबाई औरंगजेब छावणीतून कसे सुटतात, पुढे तारा राणी आणि शाहू महाराज यांच्यात युद्ध का होते? शिवाजी दूसरा कर्तुत्ववान निघतो की नाही? तारा राणी यांचा मृत्यू कसा होतो? हे या सिरियल मध्ये दाखवलेले नाही.

सोनी टीव्ही वरील हिन्दी मालिका "पेशवा बाजीराव" मध्ये तारा राणी यांच्या भूमिकेत पल्लवी जोशी असतात. त्यात शिवाजी दूसरा याचा लहानपणापासून कल हा लढणे आणि युद्धयाकडे नसतो असे दाखवले आहे, त्यामुळे राणी वैतागलेल्या दाखवल्या आहेत. तसेच पहिले पेशवा बाजीराव यांचे वडील हे शाहू महाराज आणि येसुबाई यांना औरंगजेब तावडीतून सोडवून आणतात असे दाखवले आहे.

नंतर त्यांच्या मुलाला (बाजीराव) शाहू महाराज (महेश माजरेकर) ही पूर्ण स्वराज्याची सत्ता सोपवतात हे आपण "बाजीराव मस्तानी" चित्रपटात पहिले असेलच. तसेच त्यानंतर बाजीराव मुलगा नाना साहेब पेशवे, माधवराव आणि विश्वासराव यांची कथा "कलर्स मराठी" वरील "स्वामिनी" तसेच पानिपत या चित्रपतात पहिले असेलच.

पण ही स्वराज्य सौदामिनी तारा राणी ही सिरियल एकदा तरी बघा की हो, म्हणतो मी!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet