मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का? (उत्तरार्ध)

मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का?’ या धाग्यावर लिहायला घेतलेला माझा प्रतिसाद लांबला म्हणून तो द्यायला जरा उशीर झाला. कौलाच्या धाग्यावर द्यायला हा प्रतिसाद जरा लांबलचक आहे म्हणून स्वतंत्र धाग्यात दिला आहे.

पुरस्कारांना फारसा अर्थ नसतो, किंवा त्यांत लॉबिंग वगैरे चालतं असे मुद्दे कदाचित खरे असतीलही; तरीही पूर्वीच्या काही वर्षांसाठीची राष्ट्रीय पुरस्कारांची यादी पाहिली* तर ती रोचक वाटते; म्हणून तिच्या आधारावर काही निरीक्षणं आधी नोंदवतो आहे.

नव्वदचं दशक मराठी सिनेमाला वाईट होतं असं म्हणता येईल. १९९०, १९९१, १९९४ आणि १९९७ साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार दिलाच गेला नव्हता. म्हणजे आपल्या हक्काच्या जागेवरदेखील दावा करावा अशी मराठी चित्रपटाची स्थिती दहापैकी चार वर्षं नव्हती. याउलट राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अनेक दाक्षिणात्य कलाकार इथल्या मराठी वाचकांना परिचित असतील. उदा : गिरीश कर्नाड, अदूर गोपालकृष्णन, एम्. टी. वासुदेवन नायर, मणी रत्नम्, ए. आर. रहमान, प्रभू देवा, गिरीश कासारवल्ली, रेवती किंवा संतोष सिवन. बंगाली पुरस्कारविजेतेसुद्धा मराठी माणसाला परिचित असतील: उदा : मृणाल सेन, सत्यजित राय, गौतम घोष, ऋतुपर्ण घोष, अपर्णा सेन.

मराठी सिनेमा या सर्वात कुठे नव्हता. तरीही मराठी माणसांना पुरस्कार मात्र मिळत होते. आनंद पटवर्धन, अरुणा राजे किंवा अरुण खोपकरसारखे मराठी दिग्दर्शक तेव्हा पुरस्कारप्राप्त अमराठी माहितीपट बनवत होते. हृदयनाथ मंगेशकर, अतुल कुलकर्णी, नाना पाटेकर, नितीन देसाई, अमित फाळके, पल्लवी जोशी यांसारखे अनेक मराठी कलाकार अमराठी चित्रपटांत पुरस्कार मिळवून जात होते. अरुणा दामले यांना चित्रपटविषयक लेखनासाठीचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी पुरस्कारप्राप्त लघुपट सातत्यानं बनवत होते. पण मराठी चित्रपट मात्र पुरस्कारांत फार कुठे दिसत नव्हते.

ज्यूरींमध्येसुद्धा जब्बार पटेल, किरण शांताराम, सुषमा शिरोमणी (!), सई परांजपे, सुमित्रा भावे, भास्कर चंदावरकर किंवा विजया मुळे असे मराठी चेहरे होते. (इतरत्र व्यक्त केलं गेलेलं एक मत म्हणजे रोहिणी हत्तंगडी आणि विजया मुळे या वर्षी ज्यूरीवर असल्याचा फायदा झाला असेल. पूर्वीच्या ज्यूरींची यादी पाहता मला तसं वाटलं नाही. अर्थात लॉबिंगची शक्यता तरीही नाकारता येत नाही.)

नाही म्हणायला नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटांना एखादा पुरस्कार अधूनमधून मिळून जाई: लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांना ‘एक होता विदूषक’मधल्या नृत्य संयोजनासाठी पुरस्कार मिळाला होता; ‘मुक्ता’ला राष्ट्रीय एकात्मतेविषयीच्या चित्रपटासाठीचा पुरस्कार होता; ‘दोघी’आणि ‘कैरी’ला सामाजिक आशयाच्या चित्रपटासाठीचा पुरस्कार होता.

हे चित्र २००० च्या दशकात हळूहळू बदलत गेलेलं दिसतं. नक्की काय झालं असावं?

गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांपैकी एक म्हणजे मराठी चित्रपटांची ही दुरवस्था पाहता त्यांना शासनाची मदत मिळू लागली. याचा गैरफायदा घेणारे लोक अर्थात असणार, पण काही जणांना त्याचा फायदासुद्धा झालेला असावा. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे तंत्रज्ञानाची उपलब्धता. नव्वदच्या दशकातला मराठी सिनेमा हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमाच्या तुलनेत गरीब दिसायचा. सिनेमास्कोप, चांगला फिल्म स्टॉक वगैरे मराठी सिनेमाला परवडत नसे. हळूहळू तंत्रज्ञान विकसित झालं तसं ते अधिक सुलभ रीतीनं आणि स्वस्तात उपलब्ध झालं. जागतिकीकरणामुळे यंत्रसामग्रीची आयात सोपी झाली. डिजिटल तंत्रज्ञान विकसित झालं तशा बऱ्याच गोष्टी संगणकावर करता येऊ लागल्या. महागडी यंत्रसामग्री लागेनाशी झाली. ध्वनी, छायाचित्रण, संकलन अशा सर्व अंगांनी सरासरी तांत्रिक दर्जात प्रगती झाली. याचा फायदा मराठी चित्रपटांना नक्कीच झाला. उदा : ‘डोंबिवली फास्ट’सारखा (२००५) चित्रपट पाहिला तेव्हा तंत्रज्ञानामुळे मराठी चित्रपटाचा बदललेला ‘लुक’ पटकन लक्षात आला. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहताना त्यात एक चकचकीतपणा आणि सफाई जाणवत होती. (मूळ धाग्यावर हा मुद्दा काही प्रतिसादांत होता.)

या चकचकीतपणामुळे धंदा करण्याचे वेगवेगळे मार्ग चित्रपटांना उपलब्ध झाले. नवीन मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या, मल्टिप्लेक्स अशा सुविधांमुळे चकचकीत सफाईदार सिनेमांना अधिक पैसा मिळू लागला. जागतिकीकरणाचे फायदे मिळालेला आणि अधिक सुखवस्तू झालेला शहरी मध्यमवर्गीय प्रेक्षक पैसे खर्च करून मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहू लागला आणि कदाचित डी.व्ही.डी.सुद्धा विकत घेऊ लागला. यात पैसा आहे हे दिसल्यावर मग रिलायन्स, सुभाष घई, अमिताभ बच्चन कॉर्प, यूटीव्ही वगैरे कॉर्पोरेट कंपन्यांनी मराठी सिनेमात पैसा गुंतवायला सुरुवात केली. हा एक महत्त्वाचा बदल म्हणता येईल.

पण हे सर्व कदाचित देशाच्या इतर भागांमध्येसुद्धा होत असेल. मग महाराष्ट्रात आणखी काहीतरी वेगळं घडलं का?

दर्जेदार सिनेमाच्या भुकेल्या प्रेक्षकासाठी महाराष्ट्रभर अनेक चित्रपट महोत्सव २०००च्या दशकात भरू लागले. आज केवळ मुंबई-पुण्यात नाही, तर नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी छोट्या चित्रपट महोत्सवांतून मराठी प्रेक्षकाला देशोदेशींचे सिनेमे पाहता येतात. माजिद माजिदीसारखा इराणी दिग्दर्शक किंवा 'पोस्टमन इन द माऊंटन'सारखा सिनेमा आज महाराष्ट्रात हजारो लोकांना माहीत आहे. यामुळे मध्यमवर्गीय प्रेक्षकाची रुचीसुद्धा थोडी बदलली असावी. आपल्या परंपरेपेक्षा वेगळ्या शैलीत (पण हृदयस्पर्शी कथा सांगणारा) सिनेमा केला तरी लोकांना तो आवडतो, याचा शोध दिग्दर्शक मंडळींनासुद्धा तेव्हा लागला असावा.

या पार्श्वभूमीवर ‘श्वास’ (२००४) आला तेव्हा हे पटकन जाणवलं की या सिनेमावर इराणी चित्रपटांचा प्रभाव आहे. लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली साधीशी पण हृदयाला हात घालणारी गोड गोष्ट आणि तिला (मराठी सिनेमांच्या एरवीच्या नाटकी सादरीकरणापेक्षा) वास्तववादी शैलीत पडद्यावर साकारणं हे खास इराणी चित्रपटांचे विशेष ‘श्वास’मध्ये होते. याआधी ‘कैरी’त (२०००) असं काहीसं होतं, पण कैरी आला तेव्हा महाराष्ट्रात इराणी सिनेमे तेवढे परिचित नसावेत आणि चित्रपट महोत्सव किंवा मल्टिप्लेक्सचादेखील इतका सुळसुळाट नव्हता. त्यामुळे कैरीचं यश मर्यादित राहिलं की काय असं वाटतं. आमिर खाननं नंतर ‘तारे जमीं पर’ (२००७) बनवताना ‘श्वास’चा धडा गिरवला असावा असं वाटतं. ‘लगान’ (२००१) आणि ‘तारे जमीं पर’ मधला शैलीचा फरक लक्षात येण्यासारखा आहे. म्हणजे ‘श्वास’ हा आमिर खानसाठी एक आदर्श असू शकेल. अशी उलटी गंगा पूर्वी क्वचित वाहायची.

चित्रपट महोत्सवांमुळे मुंबई-पुण्यात झालेला अजून एक फरक म्हणजे सांस्कृतिक गोष्टींत रस असणारा सुखवस्तू अमराठी प्रेक्षक मराठी सिनेमांकडे वळला. या प्रेक्षकाला आता सबटायटल्ससहित सिनेमे पाहायची सवय झाली होती. त्यांच्या सोयीसाठी मराठी सिनेमे निवडक मल्टिप्लेक्समध्ये सबटायटल्ससहित प्रदर्शित होऊ लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उच्चमध्यमवर्गीय अमराठी प्रेक्षकाला रुचतील असे विषय मराठी सिनेमात येत होते. नव्वदच्या दशकात मणी रत्नमच्या चित्रपटांना असा अ-दाक्षिणात्य प्रेक्षकवर्ग मिळत गेला होता. मराठी सिनेमाचं आता तसं काहीसं होत आहे असं वाटतंय.

या घटकांमुळे मराठी सिनेमा हा निव्वळ क्षेत्रीय न राहता राष्ट्रीय पातळीवर आकर्षण (मर्यादित प्रमाणात) खेचू शकत आहे. त्याचाच परिणाम कदाचित राष्ट्रीय पुरस्काराच्या ज्यूरीवर होत असेल.

असो. ही निव्वळ पुरस्कार मिळण्यामागची अंदाजपंचे कारणमीमांसा झाली. इतरांनी प्रतिसादात मांडलेले अनेक मुद्दे रास्त वाटतात. उदाहरणार्थ, सध्या ज्यांना पुरस्कार मिळताहेत त्यांतलं कुणीच सत्यजित राय किंवा अदूर गोपालकृष्णन् यांच्यासारखं जागतिक पातळीवर दखलपात्र वाटत नाही हा माझ्या मते आपण लक्षात घ्यायला हवा असा महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर भाषांमध्ये फारसं बरं काही होत नसेल ही शक्यता आहेच. बंगालात ऋतुपर्ण घोषनंतरच्या पिढीचं किंवा कर्नाटकात गिरीश कासारवल्ली यांच्यानंतरच्या पिढीचं कुणी नजरेत भरलं असं माझ्या पाहण्यात नाही; पण इतरांना कुणी गुणी दिग्दर्शक माहीत असले तर जरूर सांगा. विशिष्ट वर्गापुरता हा नवा मराठी सिनेमा मर्यादित आहे हेदेखील खरं आहे. मला वाटतं हिंदी चित्रपटांमध्येदेखील हा मुद्दा खरा आहे. ‘दबंग’ची लोकप्रियता ‘लाईफ इन अ मेट्रो’ला किंवा ‘दिल्ली बेली’ला मिळत नाही. शहरी, तरुण उच्चमध्यमवर्ग आणि सर्वसामान्य असा फरक कदाचित आपल्याकडच्या जागतिकीकरणानंतरच्या आर्थिक-सामाजिक वर्गफरकामुळे पडतो आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रात कदाचित त्याचं प्रतिबिंब इतर राज्यांहून अधिक प्रमाणात पडतं आहे.

असो. यावर अजून मतमतांतरं वाचायला अर्थात आवडतील.

* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संदर्भयादी इथे मिळेल : http://dff.nic.in/NFA_archive.asp

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

आढावा आवडला. शासनाची मदत, तंत्रज्ञानाची उपलब्धता, व चांगल्या थिएटर मधे मराठी सिनेमांना मिळालेली जागा (दहा पंधरा वर्षापूर्वी अनेक मराठी निर्माते त्यांना चांगली थिएटर उपलब्ध होत नाहीत असे मुलाखतीत म्हणायचे ऐकले वाचले आहे. )व शहरी प्रेक्षकांच्या खिशात नंव्वदी नंतर पैसा जास्त [??] आला व हटके (चाकोरी बाहेरच्या विषयांवरच्या) सिनेमांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद साथ असा एकत्रीत घडलेला प्रवास?

बादवे सुषमा शिरोमणी नावापुढे (!),असे चिन्ह का म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आढावा. यावरील चर्चा वाचण्यास उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पार्श्वभूमीवर ‘श्वास’ (२००४) आला तेव्हा हे पटकन जाणवलं की या सिनेमावर इराणी चित्रपटांचा प्रभाव आहे. लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली साधीशी पण हृदयाला हात घालणारी गोड गोष्ट आणि तिला (मराठी सिनेमांच्या एरवीच्या नाटकी सादरीकरणापेक्षा) वास्तववादी शैलीत पडद्यावर साकारणं हे खास इराणी चित्रपटांचे विशेष ‘श्वास’मध्ये होते.

हे पटण्यासारखे आहे. पण इराणी सिनेमात लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवलेल्या गोष्टी या फक्त सेंटिमेंटल नसून त्यांचे महत्त्व तेथील कडक सेन्सरशिप कायद्यांच्या संदर्भात पहायला हवे. गोड, निरागस पात्रं (आणि वरवरची सेंटिमेंटॅलिटी) अ‍ॅलेगरिकल (मराठी?) असून त्यांच्यातूनच कियारोस्तामी वगैरे सामाजिक परीक्षण, टीका करतात असे वाचल्याचे आठवते. हे सर्व इराणी दिग्दर्शकांना कितपत लागू आहे हे माहित नाही (मजीदी चे एखाद-दुसरे पाहिलेले चित्रपट कियारोस्तामीच्या दर्ज्याचे वाटले नव्हते) पण असे असल्यास श्वास सारख्या सिनेमाने त्यातील फक्त सेंटिमेंटॅलिटी घेतली असे म्हणावे का?

तांत्रिक सुधारणा, बाजारपट, भांडवल, इत्यादींवर भर दिला तर असा तर्क निघतो की सृजनता, चांगले चित्रपट करायची क्षमता आणि उत्सुकता ही केव्हाही मराठी सिनेमाजगात होतीच; फक्त काही फिल्म-बाह्य कारणांमुळे तिला प्रोत्साहन मिळू शकले नाही. पण असे बॉलीवुड बद्दल ही म्हटले जाते (अगदी सरसकट सांगायचे म्हणजे मल्टीप्लेक्स = क्रॉसोवर) आणि मला ते तितकं पटत नाही. नक्की का हे सांगणं जमत नाहीये, पण अलिकडे काही मराठी सिनेमे पाहिल्यावर असं वाटतं की त्यांची एक स्वतंत्र, विशिष्ट भाषा अशी नाही. कितीही स्वच्छ आणि चकचकीत दिसत असले, संगीताचा वापर, पात्रांची निवड-भूमिका, दिग्दर्शनाच्या शैली, इत्यादींमध्ये टाइटनेस जरी आला असला, तरी त्या पलिकडे वैचारिक कष्ट फारसे जाणवत नाहीत. तर मग बरे दिवस आणण्याचे श्रेय, आणि ते आल्याची कारणं नेमकी कुठे शोधावीत - चित्रपटांच्या आंतरिक, सृजनात्मक विश्वात, की बाह्य जगात? (हा प्रश्न अर्थात व्यापक आहे, आणि चित्रपटांनाच नाही, तर कुठल्याही कलेला, कलाकाराला, त्यांच्या यशापयशाला लागू आहे).

मी शाळा, बालगंधर्व आणि ध्यासपर्व अजून पाहिले नाहीत - या सिनेमांनी माझे हे विधान खोटे ठरवले तर मला आनंदच होईल. पण काही "क्रॉसोवर" मराठी सिनेमे पाहिल्यावर वाटतं, की शेवटी सर्वसाधारण नाटकात, कादंबरीत जी "अपेक्षित" पात्रं असतात, तीच इथेही दिसतात. अगदी फमिलियर आई, आजोबा, मित्र, कामवाली बाई, गडी, शेजारी इत्यादी. समांतर तर अगदीच सिक्सर होता, तो जाऊ दे. पण उत्तरायण पाहिला आणि वाटलं की कितीही "धाडशी" असा विषय घेतला, तरी शेवटी "अगदी आपल्या ओळखीच्या मंडळींपैकी एक" असे पात्रांना घडवायचा आट्टाहास दिसतो. मग संवाद ही आधीच माहित असतात, वेशभूषा, वातावरण.... विषयाला अनुसरून सगळे आपले एखादा जोरदार डायलॉग मारतात, पण मग ह्म्म्म, अरे देवा, बघ बाबा, हुश्श असे पुटपुटत शेजारच्या काकांसारखे अति ओळखीचे वाटू लागतात. काँटेंट किंवा फॉर्म दोन्हीमध्ये रिस्क घेतली जात नाही. हा पात्रांचा हुबेहूबपणा, खरेखुरेपणा प्रेक्षकांना ही अपेक्षित असतोच, म्हणून दिग्दर्शकही पात्रं त्याच धाटणीवर घडवतात का?

त्यातल्या त्यात शेवरी या चित्रपटात नीना कुलकर्णीच्या पात्रातला बदल, त्यातून स्त्रीच्या मातृत्वाबद्दल वगैरे नवीन काही मांडले होते. हरिश्चंद्राची फॅक्टरी पहिल्यांदा पाहताना बरंच काही कळलं नाही, अरे किती भरभर पळतोय सिनेमा असं वाटलं, पण नंतर संवादांच्या वेगातली लय, आणि त्यातला विनोद हेरल्यावर पुन्हा पाहताना मस्त मजा आली. इनोव्हेशन आवडले. नटरंगचे कथानक अगदीच असमाधानकारक होते, पण संगीताचा इतका मार्मिक वापर खूप आवडला. कुठेतरी फिल्मच्या भाषेबद्दल नवीन विचार भासले की चांगलं वाटतं, पण असं होतंय असं फारसं दिसत नाही. अर्थात, मी प्रत्येक नवीन मराठी सिनेमा पाहिला नाही, त्यामुळे या विधानाला हाणून पाडणार्‍या चित्रपटांची नावे अवश्य सुचवावी!

शेवटी - कादंबर्‍यांवर, गोष्टींवर सिनेमे मराठीत अलिकडे होत आहेत. याचा अर्थ सिनेमांना जास्त चांगल्या कथानकांची उपलब्धता आहे का? तुम्हाला कुठल्या कादंबर्‍यांवर सिनेमे पाहायला आवडतील? मेघना पेठ्यांच्या हंस अकेला मधली "स्ट्र" किंवा केसकर-गिजरे या पात्रांची कथा (आता शीर्षक आठवत नाही) कोणी पडद्यावर आणायला हवी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कितीही स्वच्छ आणि चकचकीत दिसत असले, संगीताचा वापर, पात्रांची निवड-भूमिका, दिग्दर्शनाच्या शैली, इत्यादींमध्ये टाइटनेस जरी आला असला, तरी त्या पलिकडे वैचारिक कष्ट फारसे जाणवत नाहीत. "

तुम्ही अगदी माझ्या मनातले विचार लिहिल्यासारखं वाटलं.

मी हल्लीच विहीर,शाळा आणि देऊळ पाहिले. परत परत पहावं असं या चित्रपटांमधे काहीही नाही. या सर्वांपेक्षा 'निशाणी डावा अंगठा' खूपच चांगला आहे.
तो मी कितीही वेळा पाहू शकते.

"तुम्हाला कुठल्या कादंबर्‍यांवर सिनेमे पाहायला आवडतील?"
छान प्रश्न विचारलात. उत्तरं काय येतात याबद्द्ल उत्सुकता आहे.
मला गो. नि. दांडेकरांच्या 'पूर्णामायेची लेकरं' या कादंबरीवर चित्रपट बघायला फार आवडेल.आणखीन आत्ता आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पण इराणी सिनेमात लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवलेल्या गोष्टी या फक्त सेंटिमेंटल नसून त्यांचे महत्त्व तेथील कडक सेन्सरशिप कायद्यांच्या संदर्भात पहायला हवे, कारण गोड, निरागस पात्रं (आणि वरवरची सेंटिमेंटॅलिटी) अ‍ॅलेगरिकल (मराठी?) असून त्यांच्यातूनच कियारोस्तामी वगैरे सामाजिक परीक्षण, टीका करतात असे वाचल्याचे आठवते. हे सर्व इराणी दिग्दर्शकांना कितपत लागू आहे हे माहित नाही (मजीदी चा एखाद-दुसरे पाहिलेले कियारोस्तामीच्या दर्ज्याचे वाटले नव्हते) पण असे असल्यास श्वास सारख्या सिनेमाने त्यातील फक्त सेंटिमेंटॅलिटी घेतली असे म्हणावे का?<<

कुणीतरी असं म्हणेल याची मला आशा होती! इराणी सिनेमात मुलांना केंद्रस्थानी ठेवण्यामागे तिथली कडक सेन्सॉरशिप असते हे खरंच आहे. किआरोस्तामी, जाफर पनाही किंवा मखमलबाफसारखे लोक सेन्सॉरशिपचे सर्व कडक नियम पाळून वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक टीका करण्यासाठी सिनेमा या माध्यमाचा जो वापर करत तो लक्षणीय आणि जागतिक पातळीवर महत्त्वाचा होता. आज जाफर पनाही तुरुंगात आहे आणि किआरोस्तामी परदेशात, कारण ती व्यवस्था त्यांना वाढू देतच नाही. आणि तरीही तिथे असगर फरहादी निर्माण होत आहेत आणि व्यवस्थेशी झगडत स्वतःच्या निर्मितीला परिपक्व करत आहेत.

आपली शोककथा तिथूनच सुरू होते - म्हणजे आपल्याला वाढायचं नाहीच आहे की काय असं वाटतं. मराठी सिनेमाच्या तथाकथित रसिक प्रेक्षकांना माजिद माजिदीसारखा बाळबोध दिग्दर्शक अधिक आवडतो. त्यातही 'फादर'सारख्या त्याच्या अधिक गंभीर सिनेमांपेक्षा 'चिल्ड्रेन ऑफ हेवन' सारखे सोपे सिनेमे अधिक भावतात. याचीच दुसरी बाजू म्हणजे आपले दिग्दर्शक इराणी सिनेमातली भावनिकता तेवढी पटकन उचलतात; इतर गोष्टी उचलत नाहीत. याला अपवाद म्हणून मी उल्लेख करेन तो 'विहीर'चा. त्यात असा लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवूनही सोप्या भावनिक गोष्टीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न होता. पण 'विहीर'ला आलेलं अपयश आणि नंतरच्या 'देऊळ'ला मिळालेलं यश ही सुसंस्कृत मराठी रसिकाची जाण दर्शवतं आणि आपल्या राष्ट्रीय पुरस्कारांची मर्यादाही.

>>अलिकडे काही मराठी सिनेमे पाहिल्यावर असं वाटतं की त्यांची एक स्वतंत्र, विशिष्ट भाषा अशी नाही<<

>>वैचारिक कष्ट फारसे जाणवत नाहीत.<<

>>काँटेंट किंवा फॉर्म दोन्हीमध्ये रिस्क घेतली जात नाही.<<

मार्मिक निरीक्षणं आहेत. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आणि 'विहीर'सारखे सन्माननीय अपवाद वगळता. त्यामुळेच मी 'बर्‍या दिवसां'विषयी प्रतिसाद देताना दृश्यभाषा, सृजन, कष्ट वगैरे गोष्टींचा उल्लेखच केला नव्हता.

जाताजाता माझ्या जुन्या लिखाणाची जाहिरातः

बालगंधर्वः http://www.misalpav.com/node/18012
विहीरः http://www.misalpav.com/node/11754
नटरंगः http://www.misalpav.com/node/10892
पुढचं पाऊलः http://www.misalpav.com/node/17722

अवांतरः इतर संस्थळांचे दुवे देत आहे म्हणजे त्या संस्थळांची जाहिरात करत आहे असं म्हणून धागा गोठवू नका ही नम्र विनंती Wink ही फक्त माझी जाहिरात आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डबल-डबल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इराणी सिनेमात मुलांना केंद्रस्थानी ठेवण्यामागे तिथली कडक सेन्सॉरशिप असते हे खरंच आहे. किआरोस्तामी, जाफर पनाही किंवा मखमलबाफसारखे लोक सेन्सॉरशिपचे सर्व कडक नियम पाळून वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक टीका करण्यासाठी सिनेमा या माध्यमाचा जो वापर करत तो लक्षणीय आणि जागतिक पातळीवर महत्त्वाचा होता. आज जाफर पनाही तुरुंगात आहे आणि किआरोस्तामी परदेशात, कारण ती व्यवस्था त्यांना वाढू देतच नाही. आणि तरीही तिथे असगर फरहादी निर्माण होत आहेत आणि व्यवस्थेशी झगडत स्वतःच्या निर्मितीला परिपक्व करत आहेत.

आपली शोककथा तिथूनच सुरू होते - म्हणजे आपल्याला वाढायचं नाहीच आहे की काय असं वाटतं.

खरंय. आपल्याकडे नुसते सेन्सर-बोर्डच नव्हे तर "एक्स्ट्रा सेन्सरी" शक्तींकडे ही आधी कुरनिसात करून सिनेमा प्रसिद्ध करणारे निर्माते-दिग्दर्शक आहेत, मग सामाजिक राजकीय टीका कसली? तरी ऐतिहासिक चित्रपटांच्या इंटीरियर्स आणि वेशभूषेत वगैरेत आता बारीक लक्ष दिलं जातंय ह्यातच समाधान मानायचे. पहले मर्चंट ऐवरी तो हो जाने दो, जफर पनाही बाद में....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील लेखात 'दोघी' चा उडता उल्लेख आहे पण मला वाटते की सुमित्रा भावे आणि सुनिल सुखटणकर यांचे अनेक चित्रपट या चर्चेत मुद्दामून उल्लेखण्यासारखे आहेत. मी पाहिलेले 'वास्तूपुरूष', 'देवराई', 'दहावी फ', 'एक कप च्या' हे सगळेच चित्रपट महत्वाचे वाटले (त्यातही काही जास्त आवडले). तांत्रिक दृष्ट्या (बेताच्या आर्थिक क्षमतेमुळे*) चकचकीत नसताना किंवा कलात्मक दृष्ट्या थोडे सरळधोपट (थोडे माहीतीपटाच्या बाजूला झुकणारे) असतानाही अर्थपूर्ण आणि सामाजिक मराठी चित्रपट सातत्याने दिल्याबद्दल सुमित्रा भावे आणि सुनिल सुखटणकर यांचा मोठा सहभाग आहे. मराठी चित्रपटांना थोडे चांगले दिवस आले आहेत का असा विचार त्यांचे चित्रपट पाहिल्यावर पहिल्यांदा माझ्या मनात आला होता.
अवांतर : १) मराठी चित्रपटांची खूप मोठी बाजारपेठ परदेशी असतानाही बरेच चांगले चित्रपट सहजासहजी मिळत नाहीत. 'पे पर व्ह्यू' सारखी योजना जालावर उपलब्ध केल्यास सिनेमागृहांतून उतरलेल्या चित्रपटांना त्याचा उपयोग होऊ शकेल असे वाटते, खास करून सामाजिक विषयांवरच्या चित्रपटांना.
२) << मराठी सिनेमाच्या तथाकथित रसिक प्रेक्षकांना माजिद माजिदीसारखा बाळबोध दिग्दर्शक अधिक आवडतो. >> ह्या विधानातला 'तथाकथित' रसिक' हा उल्लेख खटकला. भावनिकता ही नेहेमीच निर्बुद्ध असते असे नाही आणि एखाद्याला भावनिकता हा चित्रपटातला सर्वात मोठा दुर्गुण वाटत नसेल तर त्याला 'रसिक' म्ह्णताच येणार नाही का? माजिद माजिदीचे इतर काही पाहिले नसले तरी 'बरान' पाहिला होता आणि थोडा भावनिक असला तरी बाळबोध मुळीच वाटला नाही. मला जी भावली होती ती त्यातली भावनिकताही नव्हे तर एक छान कथा, सुरवातीचा भांडकुदळ 'झंप्या' आणि नंतर त्याचा झालेला त्यागी मजनू यातला किंचित विनोद आणि या कथेच्या पार्श्वभूमीवर असलेले अफगाण रेफ्यूजीजचे प्रश्न. (हे काही वर्षांपूर्वी, आता पाहिलं तर काय वाटेल माहित नाही.) किआरोस्तामीचा 'द विंड विल कॅरी अस' पाहिला आणि तोही अतिशय आवडला, त्यामुळे कोणत्या दिग्दर्शकाचा कोणता चित्रपट आवडेल हे थोडे व्यक्तीसापेक्ष असेलच, त्यावरून लगेच त्यांची अभिरुची मोडीत काढायची गरज दिसली नाही. महत्वाची हे आहे की इराण सारख्या प्रतिगामी समजल्या जाणारया देशातली चित्रपट विषयक समज इतकी प्र्ग्ल्भ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाही तुमच्या सुमित्रा भावे व सुनील सुकठणकरांच्या लिस्ट मधे टाका. अतिशय सुंदर आहे. लौकरच रिलीज होईल (मी एशियन फिल्म फेस्टिवल मधे पाहिला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या व्यक्तिगत आवडीनिवडीवर मला टीका करायची नाही. फक्त मी कशाला बाळबोध म्हणतो आहे ते स्पष्ट करतो.

सर्वप्रथम माजिद माजिदीचा 'बारान' घेऊ. तो सिनेमा वाईट नव्हताच. असा सिनेमा मराठीत बनला तर मला आनंदच होईल. त्यात एकंदर विषयाची निवड आणि सादरीकरण हे कृतक नाटकी (मेलोड्रामाटिक) न करता तरीही भावनिक होतं. भारतात असे सिनेमे पन्नासच्या दशकात सत्यजित राय काढत होते - उदाहरणार्थ अपू त्रयी. ते तर आपण अभिजात मानतो. तर मग आता ते बाळबोध का? तर आता तो एक धोपट फॉर्म्युला झाला आहे म्हणून. म्हणजे कसं?

- विषय निवडताना सामाजिक पार्श्वभूमी अशी घ्यायची की (उदारमतवादी लोकांच्या तरी) काळजाचा ठाव ती घेईल. बारानमध्ये अफगाण निर्वासितांचा प्रश्न ही जागा भरून काढतो. त्यात शिवाय स्त्रीवर असणार्‍या निर्बंधांचा मुद्दा येतो - वडील मेल्यावर मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार नाही, पण मुलाला मिळेल.
- प्रत्यक्ष कथा ही त्यातल्या व्यक्तिरेखांच्या साहाय्यानं अशी गुंफायची की त्या व्यक्तिरेखासुद्धा काळजाचा ठाव घेतील. दोन मुलं, त्यांच्यात आधी वैर, नंतर प्रेम आणि मग विरह हा वैश्विक फॉर्म्युला अशा वेळी खास उपयोगी पडतो. मग निर्वासितांना हाकलून द्या म्हणणारे प्रांतवादी सेनांचे पाईकसुद्धा थोडे संवेदनशील असतील तर सिनेमा पाहून रडतात.

वारान हेच करतो.

माजिदी असा कोणता न् कोणता फॉर्म्युला सातत्यानं वापरतो. पाहा: चिल्ड्रेन ऑफ हेवन (१९९७), कलर ऑफ पॅराडाईज (१९९९) आणि बारान (२००१).

आता त्याच काळातला आणि तुम्हाला आवडलेला 'विंड विल कॅरी अस' (१९९९) पाहा:

- एक फिल्म युनिट एका छोट्या गावात येतं आणि एका मरणासन्न म्हातार्‍या बाईच्या मरणाची वाट पाहतं. का? तर ती मेल्यावर गावात एक शोकसमारंभ होईल. त्यांना तो रेकॉर्ड करायचा आहे. पण म्हातारी मरतच नाही. मग काय? शुद्ध टाईमपास आणि तो सुद्धा कुठे? तर जिथे मोबाईल कव्हरेजसुद्धा येत नाही अशा बोअर ठिकाणी.

आता तुमच्या लक्षात येईल की इथे अशा बाय डीफॉल्ट काळजाचा ठाव घेईल अशा गोष्टींना बगल मारली आहे. तरीही खरं तर याचा बाळबोध फॉर्म्युला करायचा (आणि तोदेखील शहरी प्रेक्षकासाठी) तर ते सोपं आहे. उदाहरणार्थः

- यात 'पीपली लाईव्ह' टाईप मीडिआवगैरेवर प्रच्छन्न तोंडसुख घेता येईल. म्हणजे मीडिआवाले कसे क्रूर आहेत, म्हातारी मरावी अशी त्यांची इच्छा आहे वगैरे.
- यात 'दो बिघा जमीन' टाईप बिच्चारे निरागस खेडवळ 'नाही रे' आणि शहरी दुष्ट 'आहे रे' असा संघर्ष आणि हृदय पिळवटणारा समाजवादी शेवट दाखवता येईल.
- यात 'शुद्ध टाईमपास'च्या ऐवजी 'राम तेरी गंगा मैली' टाईप शहरी पुरुष आणि खेडवळ बाई यांची प्रेमकथा रंगवता येईल. मरणार्‍या म्हातारीची मुलगीच नायिका दाखवली तर नायक शेवटी पश्चात्तापदग्ध होऊन म्हातारी मरू नये म्हणून देवाला आळवेल.

वगैरे वगैरे.

पण किआरोस्तामी असे धोपटमार्ग सोडून देतो. म्हणून तो सिनेमा वेगळ्या उंचीवर पोचतो. आता हे निकष मराठी सिनेमांना लावून पाहा काय सापडतंय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी माजिदीचे इतर सिनेमे (सुदैवाने की दुर्दैवाने?) पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यावर टिप्पणी करू शकत नाहीय पण तुमचा मुद्दा समजला. धोपटमार्ग सोडून देणारा किआरोस्तामीचा सिनेमा मलाही उजवाच वाटला होता आणि ती तुलनाही पटते पण सध्याच्या मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपटांच्या तुलनेत 'बारान' ही उजवाच वाटतो. असो. पण प्रस्तुत चर्चेमुळे 'देऊळ' आणि 'विहीर' पहाण्याची उत्सुकता वाढली आहे. अजून प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशिष्ट चित्रपटांबद्दल बोलूनही सिनेमा कसा पहावा, सिनेमात काय पहावं यासाठी संपूर्ण चर्चा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अलिकडेच 'देऊळ' पाहिला आणि 'सिंहासन' नंतर मी पाहिलेला हा सर्वात महत्वाचा मराठी सामाजिक चित्रपट आहे असे लक्षात आले. काही वेळेस अशा महत्वाच्या कलाकृतींबद्द्लच्या साधक-बाधक चर्चांत त्यांच्या 'ताजेपणाच्या' काळात आपण अनुपस्थित होतो हा एक फायदाच आहे हे जाणवले. त्यामुळे त्या कलाकृतीकडे पहाण्याची आपली नजर ही स्वच्छ, पुर्वग्रहांनी डागाळलेली नसते आणि त्याचा आस्वाद आपल्या वैयक्तिक पातळीवर घेता येतो. 'देऊळ' अनेक पातळ्यांवर आवडला, 'गिरीश कुलकर्णी'चे त्याबद्दलचे हे भाषण देखिल खूप भावले म्हणून तो दुवा इथे टाकत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0