चाळ नावाची गचाळ वस्ती
चाळ नावाची गचाळ वस्ती
लेखिका - मुग्धा कर्णिक
खोताची वाडी. माझ्या जन्मापासून ते वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत माझं बालपण, किशोरवय, तारुण्य खोताच्या वाडीत गेलं. खोताच्या वाडीतल्या सुंदरशा, हेरिटेज दर्जा लाभलेल्या, पोर्तुगीज शैलीतल्या लाकडी घरांमुळे अनेकांना याचं अप्रूप वाटणं स्वाभाविकच आहे.
त्या सुंदर घरांकडे असोशीने पाहतच मी वाडीतले रस्ते तुडवलेत. त्यांचं सौंदर्य, नेटकेपणा, कुंड्यांतून झाडं लावणं, वर्षा-दोन वर्षाला सुंदर रंग काढणं हे सारं मनात फार भरत असे. पण खोताच्या वाडीचा हाच भाग खरा मानून बाकी सारं जाजमाखाली लोटूनही चालायचं नाही. याच खोताच्या वाडीत अनेक गदळ रूपाच्या, जुनाट झालेल्या चाळी होत्या. निम्न मध्यमवर्गातल्या कुटुंबांनी व्यापलेल्या या चाळींत सुसंस्कृत-असंस्कृताची सरमिसळ होती. सर्वांची मुलं शाळेत जाऊ लागली होती. पण काही कुटुंबं अभ्यास-वाचनापासून अगदी दूर. तर काही अगदी बेताची परिस्थिती असूनही वाचन-व्यासंग वाढवणारी.
एकीकडे खोताच्या वाडीतली सुंदरशी टुमदार घरं आपली प्रायव्हसी जपत जगणं सुंदर करू शकणारी. आणि दुसरीकडे ओसांडून वाहणाऱ्या कचऱ्याच्या बादल्या, खिडकीतून थेट गटारांत ओतला जाणारा खरकटवाडा, कॉमन संडांसांतली अस्वच्छता, दुर्गंधी... अशा वातावरणात, खुराड्यासारख्या एकेका खोलीच्या घरात जगण्याचा पसारा मांडलेली चाळींतली घरं...
लेखाची सुरुवात वाचून संपन्न वारशाच्या खोताच्या वाडीबद्दल वाचायला मिळणार असं वाटलेल्यांनी पुढे वाचूच नये. कारण आता मी लिहिणार आहे, ते मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या खोताच्या वाडीतल्या चाळीबद्दल. सभोवार सुंदर-प्रसन्न असेल; पण तुम्ही जिथे राहता ती जागा खातेऱ्यातली असेल, तर त्या सुंदर सभोवाराच्या कौतुकात असूयेचेच रंग मिसळतात असं माझं होत असे. आणि त्या असूयेचं कारण आता या लेखातून मांडल्यासारखं होईल.
प्रायव्हसी या शब्दाला मराठीत किंवा हिंदीतही अचूक, अर्थवाही प्रतिशब्दच नाही. गोपनीयता, एकांतता वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत. पण प्रायव्हसी नाहीच. आपण तसे जरा प्रायव्हसीकडे फार लक्ष नसणारेच लोक. सांस्कृतिकदृष्ट्या की काय कोण जाणे.
‘आमच्या चाळीत’ हे शब्द भलेभले लोक हल्ली फार प्रेमाने उच्चारत असतात किंवा लिहीतही असतात. नीरा आडारकरांनी मुंबईच्या चाळींवर लिहिल्यानंतर त्याला खासच जास्त महत्त्व आलंय. पुलंची बटाट्याची चाळ निदान चाळीचे गुण-अवगुण सगळेच हसण्यावारी नेत दाखवून तरी देत होती. आता त्या चाळ नावाच्या वस्तीला सामाजिक भान ठेवून हसावं लागेल.
तर आमच्या चाळीत ‘प्रायव्हसी म्हणजे काय?’ असा प्रश्न कुण्णालाही, म्हणजे अगदी कुण्णालाही, पडला असता. तो शब्द माहीत नव्हता आणि त्याचा अर्थ कुणी सांगितला असता तरीही कळला नसता, अशी परिस्थिती होती. लहानपणापासून चाळवळण लागत गेलं की, त्या शब्दाशी कर्तव्यही राहणार नाही अशीच सगळी सोय. कोणतीच गोष्ट कुणापासून लपून राहत नाही. एखादी गोष्ट कुणाला न कळू देण्याचा प्रयत्न पार हास्यास्पद ठरणार म्हणजे ठरणारच. कुणाला काय होतंय, कुणाचं काय जमतंय, दुखतंय, बरं होतंय... सारं काही चाळजाहीर. त्याचं काही फारसं वाटायचंही नाही.
...आणि तरीही मला माझा वेगळा अवकाश हवा असायचा. मला प्रायव्हसी हवी असायची. शब्द माहीत नव्हता तरीही.
चाळीतले बरेचसे लोक मला उद्वेगच आणायचे. चारपाच लोक सोडले तर ते सारे मला बेक्कार वाटायचे हे सत्य आहे. सामान्य माणसांचं उदात्तीकरण जोरजोरात चालू असतं, तेव्हा मला माझ्या चाळीतली, आसपासच्या किंवा माहितीतल्या दहावीस चाळींतली सामान्य माणसं आठवतात. आणि त्या उदात्तीकरणातली ढोंगबाजी सहजच कळून जाते.
चाळींत राहणे हा अजिबात सुखद अनुभव नव्हता. जन्म तिथे झाला म्हणून, परवडत नाही म्हणून, पुढचा विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे लांब जाऊन बरी जागा घेतली नाही म्हणून, तिथे माणसं राहतात असं मला वाटायचं. ते ठीक. पण चाळ हे काहीतरी महान वसतिस्थान आहे म्हणून तिथे राहायचं असतं, हे बुलशिट. (बुलशिटलाही चपखल प्रतिशब्द नाही बरं.)
संडास, कचरा, उवा, थुंकणं, तंबाखूची मशेरी भाजणं, वगैरे घाणेरडेपणाने माझं चाळीतलं बालपण पार विटवून टाकलं होतं. मी कधीच असं म्हणून शकत नाही की लहानपण दे गा देवा. कारण माझं बालपण एका घाणेरड्या लोकांनी भरलेल्या गलिच्छ चाळीत गेलं.
आमच्या चाळीतली एक बाई आपल्या तीन-चार पोरींच्या केसातल्या उवा जेव्हा कधी काढायला बसायची... एक-दोन तास हा कार्यक्रम चाले. तिच्या बाजूला तिची शेजारीण मैत्रीण बसे. कुजबुजत्या आवाजात इकडतिकडच्या भानगडींची चावून चावून चर्चा करता करता उवा मारल्या जात.
ते दृश्य पाहून मला कोरड्या ओकाऱ्यांचे हमके येत राहायचे. पण त्या दोघी, आणि त्यांच्या समोर बसलेल्या पोरी, सुखाने गप्पा मारत फिदफिदत असत. तिथे एक टीप ठेवलेलं असे - म्हणजे काय विचारा - पाण्याचं पिंप म्हणजे टीप. सापडलेल्या उवा ती या टिपाच्या लोखंडी झाकणावर टचाटच मारत असे. किंवा चाळीच्या मधल्या चौकाचा एक जुनाट लाकडी कठडा होता त्यावरही त्या उवांचा खचाखच मृत्यू घडे. त्यावर पडलेले उवांचे मृतदेह साफ करणं वगैरेची काही गरजच नव्हती हे तिला चांगलं माहीत होतं. गेल्या कित्येक वर्षांचे उवांचे जीवाश्म त्या लाकडाशी तद्रूप झालेले असतील. एकदा तिला ’तिथे उवा मारू नका किंवा ते स्वच्छ तरी करा’ असं सांगितल्यावर तिला केवढातरी फणकारा आलेला. कुणीही थोड्याशा स्वच्छतेची अपेक्षा केली की ‘एवडं हाय तर ब्लाकमदे जा की ऱ्हायला…’ हा डायलॉग पडायचाच. म्हणजे उदाहरणार्थ, कॉमन संडासांच्या समोरच्या भागात एक चौक होता. तिथे पाण्याचा नळ होता. काही पाण्याची पिंपं भरून ठेवलेली असायची. तिथं शिरण्याच्या दारातच एक म्हातारी मुतायला बसायची. तिला पाणी टाकायला सांगितलं किंवा ‘इथे नको, जरा पुढे बसा’ म्हणून सांगितलं की ती हा डायलॉग टाकणार. संडासात पुरेसं पाणी टाकलं नाही म्हणून कुणी बोललं की हा डायलॉग ठरलेलाच.
आमची एक म्हातारी सारं काही रिसायकल करण्यात एकदम माहीर होती. ती कोळशाच्या वखारीतून कोळशाची धूळ झाडून गोळा करून आणायची; मग गिरणीतून थोडं पीठ, घरोघरी चाळलेल्या पिठातला कोंडा असं कायकाय जमवायची. मग एक दिवस तो सगळा काला शेणात एकवट करून त्याचे छोटेछोटे गोळे करून ठेवायची. आमची खेळण्याची जेमतेम जागा त्या काल्याने काळी घाण झालेली असायची. स्वतः त्याची साफसफाई करावी असा विचारसुद्धा ती मनात येऊ द्यायची नाही. ‘ब्लाकमध्ये राहायला जा की’ या डायलॉगच्या रिसीव्हिंग एण्डला असलेली माझी आई ती घाण स्वच्छ करायची. आणि ती कधीच स्वतःच्या ब्लॉकमधे राहायला जाऊ शकली नाही…
चाळीच्या मधल्या पॅसेजच्या टोकाला एक खिडकी होती. वरच्या बाजूला दोन लाकडी कवाडं आणि खालच्या बाजूला रॉट आय़र्नचं नक्षीदार ग्रिल. या खिडकीत उभं राहिलं की समोरच्या बाजूच्या ख्रिश्चन वस्तीची देखणी घरं दिसायची. उजवीकडे जरा वाकून पाहिलं की खोताच्या वाडीतला एक सर्वांत जुना आणि देखणा बंगला दिसायचा. खालचा रस्ताही दिसायचा. बरं वाटायचं तिथे उभं राहायला. माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या कातरलेल्या चतकोर आभाळापेक्षा मोठा आभाळाचा तुकडा दिसायचा. थोडं पुढे वाकून डावीकडे पाहिलं की आमच्या शाळेच्या गच्चीवरचा पत्रा दिसायचा. बरं वाटायचं तिथे. पण त्या लोखंडी ग्रिलच्या प्रत्येक नक्षीदार वळणात ढेकणांची लेंढारं असायची. तिला चुकूनही टेकून उभं राहून चालायचं नाही. कधीकधी आई त्यावर ढेकणांचं औषध आणून मारत असे. पण शेजारच्या त्याच रिसायकलवाल्या म्हातारीच्या घरात ढेकणांचं आगरच होतं. त्यामुळे औषधाचा परिणाम जेमतेम पंधरा दिवस टिकत असे. मग आणखी त्या खिडकीच्या लाकडी कवाडांवर लोक आपल्या जुन्याजुन्या गोधड्या वाळत घालत. त्यांचा घामट कुबट वास नकोनको व्हायचा. कुठलं आभाळ पाहताय...
चाळीच्या समोर डावीकडे आणखी एक चाळ होती आणि उजवीकडे आणखी एक. या दोन चाळींच्या मधे एक चिंचोळं गटार होतं. तिथं त्या दोन चाळींतला कचरा टाकला जायचा. भाज्यांचा कचरा, मच्छीची सालं, कोलंबीची सालं, आंबलेलं अन्न, आणि माणसां-कुत्र्यांचं मूत - सारं तिथंच. तिथं उंदीर, घुशी, मांजरं, कुत्री यांच्या गुरगुराटी लढाया चालायच्या. या गटाराचं टोक माझ्या बालपणाच्या वाट्याला आलेल्या एकमेव खिडकीसमोरच यायचं. घरात बंद होऊन बसल्यावर कधी चुकून त्या खिडकीतून बाहेर बघण्यासाठी नाक गजांना टेकवलं तर समोर दिसायचा एखादा मुतायला उभा राहिलेला पाठमोरा माणूस. हे सारखं चालूच असायचं... कधीकाळी वाऱ्याची झुळूक सुटलीच तर ती या सर्व घाणीचा मजमुआ घेऊन घरात शिरायची. नको तो वारा, असं करून जायची.
ही इमारत जेव्हा अगदीच खिळखिळी आणि धोकादायक झाली, तेव्हा तिथल्या रहिवाशांना बाहेर काढून ती रीतसर पाडण्यात आली. तिथं राहणाऱ्या आमच्या लाडक्या म्हात्रेकाकू सोडून जाणार म्हणून खूप दुःख झालेलं. पण जेव्हा ती इमारत पाडली आणि समोरचं आभाळ अचानक मोकळं झालं, तेव्हा मला झालेला आनंद चोरून ठेवूनही लपत नव्हता. जागा असती तर खरोखरची नाचलेच असते मी तेव्हा. आणि शिवाय गटारात टाकली जाणारी घाणही बरीच कमी झाली. कितीकिती फायदे होते…
या आमच्या चाळीत खाली राहणारं एक कुटुंब होतं. त्यांची बारा बाय बाराची खोली आणि त्यात तब्बल एकोणीस माणसं जगत होती. भांडणतंडण, शिव्यागाळी, मारामाऱ्या सारं चालायचं त्यांचं आपसांत. एका आईबापांपासून जन्मलेली एकूण नऊ मुलं, त्यांच्या बायका, त्यांची पोरं. त्यातला एक अव्वल बेवडा. तो रोज रात्री अकरा वाजता दे धूम दारू पिऊन यायचा आणि बायकोला मारमार मारायचा. त्यांची तीन लहान मुलं सोबत रडत असायची. हे सगळं चाळीच्या कॉमन चौकात चालायचं. पार दुसऱ्या मजल्यापासून लोक दडदडत खाली यायचे आणि गोंद्या बायकोला कसा मारतोय ते जिन्यांवरून ओठंगून पाहत रहायचे. पण कुणीही तिला सोडवायला जात नसे. तिला भरपूर मारून तो थकला की शिव्या घालतघालत तिथंच आडवा व्हायचा. आणि लोकं म्हणायची, “चला, झालं. चला आपणही आपापल्या घरी झोपायला.” त्यांच्या घरातली सगळी पुरुषमाणसं बाहेरच झोपायची. जसा असेल तसा ओढत त्या बेवड्याला त्याचे भाऊ एका कडेला टाकत आणि अंथरुणं टाकून आडवे होत. हा जवळपास दिवसाआडचा तमाशा असे. आणि जवळपास सारे शेजारी ते चवीने पाहत. त्यांच्या घरातलेही ‘आपण नाय बा नवराबायकोच्या भांडणात पडत’ म्हणून मुकाट उभे असायचे. त्याचा मुलगा मोठा झाला, तेव्हा कुठे त्याने आपल्या त्या अपघाती बापाचा हात पिरगाळून थांबवला. पण त्यानंतर दोनेक वर्षांतच तो बेवडा मेलाच. आणि बायको जराशी सुखाने जगू लागली. माझ्या लक्षात आहेत, ते चवीने मारहाण पाहणारे चाळकरी. आणि तो बेवडा मेल्यानंतर तिच्या अंगावर थोडं मांस चढल्यावर “वा! आता मज्याय बुवा!” असं तिच्याबद्दल बोलणारेही.
या चाळीत ‘कोण कुणाला लागू आहे’ वगैरे चर्चा दबक्या आवाजात चवीने होत असत. तरुण किंवा किशोरवयीन पोरापोरींची लफडी चालू असत, जुनी बंद होत असत, नवी होत असत. कुणाचीतरी रिकामी खोली मिळवून सेक्स चालत असे. पोटंही पाडली जात. मोठ्या वयाच्या बाया नि बाप्येही लफडी करत आपसांत. प्रायव्हसी नसलेल्या त्या बुजबुजत्या, कुजबुजत्या जगात सारं काही प्रायव्हेट उघडपणे चालायचं.
प्रायव्हेट मत्सर उघडपणे.
प्रायव्हेट प्रेम उघडपणे.
बरंच कायकाय प्रायव्हेट उघड.
माझ्या लक्षात आहेत, मला चांगले मार्क्स मिळाले की कसेबसे ‘छान’ म्हणणारे किंवा ‘आमचीपण पोरगी पास झाली हां तुझ्याइतका अभ्यास न करता’ असंही तुच्छतेने म्हणणारे शेजारी. माझ्या चश्म्यावर, माझ्या अपरोक्ष केल्या जाणाऱ्या कमेन्ट्स लक्षात आहेत. ‘काय मोठी जगावेगळी आहे माहीतीये’, ‘आले स्कॉलर’, ‘ए तिला काय बोलू नकोस हां, ती क्काय बाबा स्कॉलर आहे.’... अशा वाक्यांनी मला भोकं नाही पडली, पण त्या माणसांचं स्वरूप समजून घ्यायला मदत झाली.
आम्हांला घराचं दार बहुतेक वेळा बंद ठेवणं भाग पडायचं. कारण मधल्या चिंचोळ्या पॅसेजमधून सतत चाळीतल्यांची, त्यांच्याकडे आलेल्या लोकांची ये-जा चाललेली असायची. दार उघडं सापडलं की येणार्या-जाणार्यांतले बहुतेक सारे अकारण काहीतरी बोलत थांबायचे किंवा घरात काय चाललंय ते निरखत, नजरेने टिपत चौकश्या करत राहायचे. कुणाच्याही घरात वाद झाला तर सारे शेजारी आपापल्या दारात उभे राहून कानोसा घेत सारं काही ऐकत राहायचे. हीच फुकटची करमणूक होती त्यांची.
अशा वेळी मी कळत्या वयातली सारी वर्षं... सारे दिवस सकाळी सातआठ वाजता घर सोडायचं आणि रात्री आठनऊ वाजता परत यायचं असा शिरस्ता ठेवला होता. शाळेत असेपर्यंत अर्धा दिवस शाळेत जायचा. एकदोन तास असेच खेळण्यात. मग घरी आलं की चाळीचा असंगसंग व्हायचा. कॉलेजमधे जायला लागल्यानंतर मग प्रायव्हसीची कन्सेप्ट डोक्यात मुरू लागली. बारावीत कॉलेजमधे गेल्यानंतर काही निमित्तांनी इतर मित्रमैत्रिणींची मोठमोठी घरं पाहिली. मध्यमवर्गीय मैत्रिणींची निदान दोन खोल्यांची घर पाहिली, तरी मला वाटे - आपल्या घराला आणखी एकच छोटी जरी खोली असती तरी किती बरं वाटलं असतं. थोडीतरी प्रायव्हसी मिळाली असती... होय, तोवर त्या शब्दाचं भान टोकदार झालेलं.
मी एल्फिन्स्टनमधे असताना आणि नंतर विद्यापीठात असतानाही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा तिथेच असायचे. लेक्चर्स झाली की लायब्ररीत. शिवाय डाव्या विद्यार्थी चळवळीत बराच वेळ जायचा. शहरभर फिरत, चर्चाविचर्चा करत, प्रदर्शनं पाहत, सिनेमा नाटकं पाहत, कदाचित नकळतपणे मी चाळीपासून लांब राहत होते. एक वर्षभर तर आस्वलीला राहून एक वेगळाच अवकाश अनुभवला.
अगदी खाजगीपणे माझं मन वाढतविस्तारत जात होतं. त्या चाळीला कळलंच नाही मी तिच्या अवकाशाची कधी उरले नाही ते.
काही चाळींनी आपल्या छपरांखाली अनेकांना आनंद दिला असेलही. मी नाकारत नाही. पण तरीही आज मी चाळ या एका तुलनात्मकदृष्ट्या गरिबीतल्या निवासी गरजेचं उदात्तीकरण करू शकत नाही. तिच्या विषण्ण छायेचा काळवंडलेपणा माझ्या मनावरून धुऊन काढला आहे मी कायमचा.
त्या विषण्ण छायेला खोताच्या वाडीच्या या वेगळ्या सौंदर्याचा साज होता हा एक सुंदरसा योग. पण त्या सौंदर्याच्या कुशीत राहूनही काही लोक, काही परिसर आपला दळभद्रीपणा सोडू इच्छितच नव्हते हे मनात अजूनही खुपतं.
हे झाले, मी तेव्हा तिथे राहत असतानाचे अनुभव. लग्न झाल्यानंतर मी तिथे जात राहिले, कारण आईबाबा तिथेच होते. नवरा-मुलगी-मुलगा यांना घेऊन त्या दहाबायबाराच्या खोलीत राहण्याची धडपड कधी केलीच नाही. मी आणि मुलं क्वचित कधीतरी एखादी रात्र तिथे राहिलोय. अगदी चारपाच वर्षांची होईपर्यंत मुलं तिथे आजीआजोबांच्या प्रेमाने राहत असत. नंतर त्यांनाही आपलं मोठं घर आणि हा चिमटलेला अवकाश यांतल्या फरकाशी जुळवून घेता येईना, तेव्हा आईबाबाच आमच्या घरी येऊन राहू लागले. आईबाबा आजारी पडत; तेव्हा त्यांना टॅक्सीत, गाडीत घालून घरी आणण्याची तजवीज करत असू. तत्पूर्वी एखादा दिवस, एखादी रात्र मी तिथे काढत असे.
तोवर चाळीची डागडुजी झाली होती. आणि संडासाच्या दाराभिंतींच्या मधल्या फटींतून झुरळांच्या मुंड्या डोकावण्याचं तरी किमान बंद झालं होतं. नव्या फरशा बसल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे संडासात दिवे लावायला हवेत हे अखेर तिथल्या सर्वांना पटलं होतं आणि तेवढा खर्च सगळे मिळून करू लागले होते.
आज इतक्या वर्षांनंतरही तिथली बरीचशी कुटुंबे तिथेच राहत आहेत. त्यांची पुढली पिढी मात्र चाळ सोडून उपनगरांतील 'सेल्फ-कंटेन्ड' घरांत राहायला गेली. काय शब्द मराठीत रुळला पाहा... टॉयलेट घरातच असलेलं आणि पाणीही घरातच भरता येईल असं घर म्हणजे सेल्फ-कंटेन्ड घर. कॉमन संडासांत रात्रीबेरात्री जाण्याचा अघोरी अनुभव टळला यातच अनेकांचं सुख सामावलं होतं हे मला माहीत आहे.
आता माझ्या पिढीतले जे लोक चाळींमधलं जगणं मागे टाकून आले त्यांच्याबद्दल. एकंदर अभावाची परिस्थिती - अभाव हा इथे सापेक्ष शब्द आहे. खाऊनपिऊन सुखी असलेला मध्यमवर्ग अभावग्रस्त कसा हा प्रश्न येणारच. कारण काही घरांतून अजूनही नित्यनेमाने पोट भरण्याची रोजची मुश्किल असते. पण तुलनेने अभाव होता.
उदाहरणार्थ, आम्हां निम्न मध्यमवर्गीयांच्या मुलांकडे एक गणवेष तोकडा होईपर्यंत किंवा ढुंगणावर विटका दिसू लागेपर्यंत वापरण्याची पद्धत होती; बाहेर घालायचे कपडे नेमकेच तीन-चार असत, समारंभांना जाण्याचे कपडे तेचतेच असत. खाऊ म्हणून, घरात शिजलेले बेगमीचे पदार्थ असले तरच आणि तोच. दुकानांतून गोळ्याबिस्किटं घेणं म्हणजे चैन असे. कॅडबरी वगैरे खाणे, दोन वर्षांतून एखाद्या वेळी, मोठ्ठा बोनस - बाबांना बोनस मिळाला तर... सकाळी नाश्त्यात चहा-बटर-खारी-टोस्ट म्हणजे फारच मौज, नाहीतर रात्रीची शिळी चपाती चहात बुडवून खाणे हे नित्याचं होतं. चप्पलजोड एकच असे. शाळेत पीटी किंवा स्काउट-गाईडसाठी घेतलेले पांढरे वा तपकिरी कॅनव्हासचे जोडे म्हणजे कोण स्मार्ट वाटे. कंपासपेट्या गंजून ठिपके पडेपर्यंत वापरल्या जात. हरवून नुकसान होतं म्हणून आया नव्या पेन्सिलींचे दोन सारखे तुकडे करून एकेक वापरायला देत. फाउंटन पेनांच्या गळक्या सांध्यांतून, लिहित्या बोटांच्या दोन बाजवांना सतत शाई लागलेली असे... दप्तर किंवा अल्युमिनियमची ती छोटी बॅग सर्वांनी निदान चारपाच वर्षं तरी वापरायचीच असे. अनेक मुलं शालेय पुस्तकं सेकंडहँडच घेत. त्यासाठी आधीच्या वर्गातल्या मुलामुलींकडे क्लेम लावलेला असे आणि त्यांच्या आया- रिझल्टच्या दिवशी घरी येऊन ती पुस्तकं घेऊन जात... ट्रिपला कधीतरी एसटीच्या गाडीतून जायचं तर कितीकिती मजा वाटे. आणि डब्यातली पुरीभाजी हे उच्चकोटीचं सुख असे. पावसातले रेनकोट काखांतून फाटले तरी आम्ही खुशाल वापरायचो. किंवा मोडक्या छत्र्यांचंही काही वाटायचं नाही. भिजायचंही काही वाटायचं नाही. पण लागोपाठ भिजलं तर शाळेच्या गणवेषाचे दोनच जोड असल्यामुळे ते वाळायची पंचाइत होऊन आईचा ओरडा खावा लागायचा... वगैरे. चीज-लोणी वगैरे माहीत नव्हतं. आइस्क्रीम वर्षांतून एकदादोनदा. बरीच मुलं रस्त्यावर फिरणाऱ्या गाडीतल्या आइसकॅंडीलाच आइस्क्रीम समजायची.
आणि मग श्री. म. माट्यांच्या ‘दमडी’चा धडा वाचून तिला खोबऱ्याचा तुकडा खाऊन वाटणाऱ्या सुखाने आमचा जीव गदगदून यायचा... मग ‘उपेक्षितांचे अंतरंग’ आख्खंच वाचून काढल्यावर अभाव याला म्हणतात हे शब्दांविना मनात उतरायचं. आमच्या स्वतःच्या परिस्थितीत खरं तर काही अभाव आहे हेसुद्धा तेव्हा तसं कधी जाणवलं नव्हतं.
ते जाणवलं मागे वळून पाहताना. त्या चिवट-चिकट काटकसरीच्या परिस्थितीतून आईवडिलांनी शिकवल्याचं चीज करून, स्वतःच्या अक्कलहुषारीने, जिद्दीने आमच्या पिढीने स्वतःची परिस्थिती बदलली. देशाचं अर्थकारण बदलत गेलं याचे फायदे आम्हांला उत्तरतारुण्यात - तिशीनंतर म्हणजे साधारणतः एकोणीसशेनव्वदच्या अलीकडेपलीकडे - चांगल्या प्रकारे मिळू लागले.
आमच्यापैकी काही बुद्धिवान लोकांना बाहेरचं जग पाहण्याचीही संधी शिक्षणातूनच मिळालेली. तर जे बेतास बात होते, त्यांनाही पदवी घेतल्यानंतर नोकऱ्या वगैरे मिळू शकल्या होत्या. थोडक्यात क्रयशक्ती वाढली होती आणि मिळवलेला पैसा स्वतःवर आणि स्वतःच्या मुलांवर खर्च करावा ही अक्कलही आली होती असं बऱ्याच अंशी दिसू लागलं.
अगदी फुळकवणी वरण आणि संध्याकाळी त्याच वरणाला फोडणी घालून आंबट वरण याच्याशी जेवायची सवय झालेले किंवा थोडे महागातले आवडते पदार्थ महिन्यातून दोनदाच खाण्याची सवय असलेले आम्ही लोक जेवणाखाण्यावर हात सैल सोडू लागलो. कपड्यालत्त्यांवर खर्च करू लागलो. मुलांच्या स्मार्ट-युनिफॉर्म्स, शूज, इतर कपडे, खेळणी यांवर खर्च करताना - हे आपल्याला मिळालं नाही, ते यांना मिळू दे - असा एक भाव नक्कीच असायचा.
आम्ही सारे व्यक्तीकेंद्री झालो. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला जीवनाचा केंद्रबिंदू मानू लागलो. कुटुंबातल्या सर्वांना - मग ते वृद्ध आईवडील असोत वा एकमेक वा मुलं - यांच्यासाठी पैसा खर्च करावा हे भान आलं.
मला आठवतं - माझे बाबा बिचारे लेकीसाठी आपल्या मरणानंतर काही पैसा ठेवायचा म्हणून बरीच काटकसर करायचे. आई माझ्यासाठी किंवा नातवंडांसाठी जरी काही खर्च करू लागली तरी तिला टोकायचे - 'पैसे जरा जपून वापर. थोडे शिल्लक टाकले तर काही बिघडत नाही.' शेवटी त्यांना त्यांच्या बचतीचा सर्वात मोठा चेक मिळालेला सदतीस हजाराचा. त्यांनी तो मला आनंदाने दाखवला आणि म्हणाले, “हे बघ. मला पहिल्यांदाच केवढा मोठा चेक मिळालाय…” किती हिंमतीने मी 'अरे वा, मस्त, पार्टी करू या' वगैरे म्हटलं, ते माझं मला माहीत... कारण तेव्हा माझा महिन्याचा पगार तेवढा होता. नवऱ्याचाही तेवढाच... मला आठवल्या त्या साऱ्या गोष्टी, ज्यांवर ते हे पैसे खर्च करून मी कितीतरी समृद्ध अनुभव घेऊ शकले असते, आईलाही सुखाचे क्षण देऊ शकले असते.
तर हे माझे बाबा इतर अनेकांच्या बाबांसारखेच चंगळवादी अजिबातच नव्हते.
आणि आम्ही चंगळवादी आहोत, असं काही सैद्धान्तिक विचार मांडणारे लोक म्हणत आहेत. फारच छान. आम्ही जगतोय.
होय. आमच्या कॅटेगरीतल्या वर्गातल्या माणसांना घरात छान सजावट आवडते. करमणूक आवडते. छानछान मॉल्समधे जाऊन एखादी वस्तू आवडली तर घेऊन टाकायला छान वाटतं. जग पाहायला आवडतं. चांगलंचुंगलं खाण्यात या वर्गाला कसलाही अपराधगंड नाही. पुस्तकांसाठी सतत लायब्ररीवर अवलंबून न राहता पुस्तकं विकत घेणं, घरातल्या प्रत्येकासाठी किंडल विकत घेणं बिनदिक्कत करणार आम्ही.
(इथे सण-परंपरा पाळण्यासाठी खर्च करणारे आणि सोनेहिरे घेण्यात पैसा घालणारे यांवर मी काहीच भाष्य करू शकत नाही, कारण त्या खर्चाला माझा तात्त्विक विरोध आहे. पण त्यातलंही एक तत्त्व मला मान्य आहे. त्यांच्या कष्टाचा पैसा असेल, तर त्यांनी काहीही करावं त्याचं. त्यांचा फायदा, त्यांचा तोटा.)
हे सगळं सोडून सामाजिक जाणीव ठेवून सारा पैसा त्यासाठी द्यावा असलं काही करणार नाही आम्ही. एक काळ बाजूला सारून इथवर आलोत, त्यात करू थोडी चंगळ. कुणी महामानवांचे दाखले दिले तर कौतुकच आहे त्यांचं. पण तो त्यांचा चॉइस आहे - हा आमचा. त्यांना त्यात आनंद आहे, म्हणून ते त्या वाटेला गेले. सर्वांना ते जमणार नाही. प्रत्येकाचा आनंद वेगळा. आणि प्रत्येकाला तो शोधायचा हक्क आहे.
भ्रष्टाचार करून चंगळ करणारांचा विषय वेगळा आहे.
आपल्याला मिळालेल्या संधीतून पैसा कमावून लोक चंगळ करतील, नाहीतर सारं दान करतील. हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. या वर्गातील अनेक लोक थोडंफार सामाजिक देणं देत राहतात. पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून मग लायक व्यक्तींना मदत करण वेगळं. (त्यात त्याग नाही, असं म्हणतात). त्याग करणं नाकारण्यात काहीही चूक नाही.
चाळींचा त्याग केलेल्या अनेक व्यक्तींनी आपल्या भूतकाळातल्या कळकटपणालाच कायमचा निरोप दिला आहे. आणि अशा प्रकारे धडपडलेल्या माझ्या या सार्या सहप्रवाशांना मानवी आनंदाच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळत राहील.
आणि त्यांनी आपल्या बदललेल्या परिस्थितीचा मनाशी जरूर अभिमान बाळगावा.
आपण कमावलंय, मित्रांनो.
प्रतिक्रिया
साधेपणाच्या गोडव्याचा खोटा
साधेपणाच्या गोडव्याचा खोटा मुलामा न देता रोखठोकपणे लिहीलेले चाळीतील जीवनाचे चित्र, जवळजवळ कोलाजच -मानवी स्वभाव, परिस्थितीजन्य अडचणींचे.
हमके, बाजवे हे शब्द तर फारच आवडून गेले.
छान दीर्घ लेखन! मनातील गोष्टी
छान दीर्घ लेखन! मनातील गोष्टी स्पष्ट नी नेमक्या शब्दांत लिहिलेल्या असल्या की वाचणार्याला त्या/पटोत ना पटोत आवडून जातात हे नक्की. अशावेळी पटण्याजोगे लिहिल्यावर तर आनंदच आहे.
ऑलमोस्ट ७०एकवर्षांपूर्वीही माझ्या आजीला चाळ हा प्रकार कधीच न आवडल्याने दूर दहिसरला भाड्याने पण चाळीत नसलेले घर आजोबांनी घेतल्याची आठवण आली!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चाळीत राहण्याचा अनुभव नाही पण
चाळीत राहण्याचा अनुभव नाही पण आमची एक मावशी चाळीत राहायची, तिच्याकडे गेल्यावर लेखात वर्णन केलेल्या बर्याच गोष्टी दिसायच्या. चाळीतल्या आयुष्याचे उदात्तीकरण करणारे इतके लेख वाचले आहेत की त्यानंतर असा रोखठोक लेख फारच आवडून जातो.
चाळ
चाळीत राहिलेलो असल्यामुळे लेखिकेच्या अनुभवाशी मिळताजुळता अनुभव घेतलेला आहे. लेख अतिशय आवडला आणि पटला.
माझ्या पौगंडावस्थेतच मला माझा असा एक अर्थशास्त्रीय विचार कळला होता. तो असा की एकंदर आर्थिक उतरंडीत अंबानींच्या "अँटेला"पासून ते प्लॅटफॉर्मवर राहाणार्या महारोग्यापर्यंतच्या कोट्यावधी लोकांपर्यंत हजारो आर्थिक स्तर असले पाहिजेत. मग त्यात गरीब-श्रीमंत नक्की कसं ओळखायचं ? तर माझ्यामते "श्रीमंत असण्या"पेक्षा "गरीब नसण्याची" एक साधी सरळ सीमारेषा आहे. ती म्हणजे, स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःचं प्रसाधनगृह असणं.
सार्वजनिक प्रसाधनगृह वापरावं लागणं ही एकंदर माणसाच्या डिग्निटीची विटंबनाच आहे. आणि यादृष्टीने चाळीत आणि झोपडपट्टीत तसा फार फरक नाही. शेजारी गटार नाही इतकाच काय तो फरक. बाकी तीच गैरसोय आणि तीच सार्वजनिक अस्वच्छता.
प्रायव्हसीचा हा मुद्दा लेखात खूपच चांगल्या रीतीने आलेला आहे. प्रायव्हसी आणि डिग्निटीच्या या अभावाने माणसाच्या एकंदर विचारसरणीवर दूरगामी परिणाम होतो. अगदी साधं उदाहरण देतो. शाळेत असताना अनेक मित्र ब्लॉकमधे राहाणारे - किंवा अधिक नेमकेपणे सांगायचे तर स्वतःच्या कुटुंबापुरती प्रसाधनगृहे असलेल्या व्यवस्थेमधे जन्मले, वाढले. यातले अनेक जिवलग मित्र बनले. परंतु मी अनेकदा माझ्या मित्रांकडे जाऊन राहिलो पण कुठल्या मित्राला माझ्याकडे राहाण्याकरता बोलावण्याचं कधी झालं नाही.
एकोणीसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत , मध्यमवर्ग ही संस्थाच हळुहळू अस्तित्त्वात येत असताना, शहरीकरण होत असताना चाळीची व्यवस्था अस्तित्त्वात आली आणि साधारण शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी ती व्यवस्था अपरिहार्य असणार. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात झपाट्याने शहरीकरणाचं बकालीकरणात रूपांतर होत असताना ज्या "मध्यमवर्गीयां"ना आपलं आयुष्य चाळीत काढावं लागलं तो माझ्यामते skewed economic development चा एक परिणाम आहे. अमाप वाढलेल्या धारावीसारख्या झोपडपट्ट्या आणि अन्य नागरी सेवांची/व्यवस्थांची भीषण स्थिती ही अर्थातच अधिक शोचनीय बाब आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
तर माझ्यामते "श्रीमंत
सहमत आहे. नऊ बिर्हाडातल्या चाळीस लोकांत एक कॉमन संडास असलेल्या वाड्यात माझं बालपण गेलं. (मोरी मात्र प्रत्येक बिर्हाडात, अगदी उंचवटा-पडदावाली का असेना, पण शेप्रेट होती.) आसपासचे वाडेहुडे, चाळी अशा कॉमन संडासवाल्याच होत्या.
खरं सांगायचं तर मला कॉमन संडास असण्यात काही गैर वाटत नसे, अजूनही वाटत नाही. ज्या ठिकाणी दिवसातली सरासरी दहा मिनिटं काढायची, ती जागा स्वत्ताची एक्स्क्लूजिव नसली तर काय फरक पडतो?
पण स्वतंत्र प्रसाधनगृहं "आर्थिक-सामाजिक स्थितीचं माप" म्हणून वापरताना हा विचार चालत नसावा. एक दामले नामक मित्र "लोणीविके दामले आळी" मध्ये राहत असे. त्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि इतर मित्रांची परिस्थिती यात फारसा फरक नव्हता. त्याच्याबरोबर बोलताना एकदा कॉमन संडासाचा विषय निघाला. एकदम स्मग चेहरा करून तो म्हणाला, "आम्ही काय कॉमन संडासात जात नाही काय! आम्ही घरमालक आहोत!"
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
खरं सांगायचं तर मला कॉमन
सहमत आहे, मात्र मला तेथील स्वच्छतेच्या अभावाची चिड आहे (व चारचौघातून पाणी/बादली हातातून घेऊन नाचवत जाण्याबद्दल एक अढी आहे). स्वच्छ असल्यास व तिथेच नळ (नि स्वच्छ बालदी/हँड शॉवर वगैरे) असल्यास प्रॉब्लेम इल्ले.
शिवाय वय वाढल्यावर अश्या दूरवरच्या संडासांचा त्रास होताना बघितले आहे (काहिं चाळिंत तर पुरूषांचे ठराविक मजल्यावर वगैरे भानगड असते. तिथे वयस्कांना फक्त या विसर्जनासाठी मजले चढौतार करताना बघुन वाईट वाटते.)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
...
'Public declaration of a private intention' असे याबद्दलच म्हटले गेले असावे काय?
('धोंडोपंत / यमुनाबाई परसाकडे चालले / चालल्या' ही घटना आख्ख्या - किंवा समोरासमोर असतील तर दोनदोन - चाळीला / चाळींना (विनाकारण) जाहीर करणारी व्यवस्था!)
चाळीत?????? काय सांगताय काय?
भलतीच अप्पर मिडल क्लास चाळ दिसतेय की हो तुमची! (की भारी अपेक्षा म्हणायच्या?)
इथे "हँड शॉवर" म्हणजे
इथे "हँड शॉवर" म्हणजे न्हाव्याकडचा फुसफुस पंप असावा. कोणाला प्रपात आवडतो, कोणाला तुषार. आ० आ० आ०
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ज्या ठिकाणी दिवसातली सरासरी
नेमक्या आपल्या १० मिनिटात आणखी किती जणांची १० मिनिटं ओव्हरलॅप होउ शकतात हे पण बघायला हवं ना..
स्वच्छतेचा मुद्दा आहेच. प्रत्येकाच्या स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या असतात. त्यामुळे कॉमन जागा ही सर्वात कमी स्वच्छतेच्या स्टँडर्ड असणार्याइतकी स्वच्छ राहू शकते.
सहमत
चाळीमधली सार्वजनिक प्रसाधनगृहे ही निदान छोट्या समूहापुरती तरी खाजगी होती. आम्हाला लहानपणी ग्रामपंचायतीने बांधलेल्या 'सर्वांसाठी खुल्या' सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करावा लागलाय. ही प्रसाधनगृहे सर्वच अर्थाने खुली होती. पुरुषांना निदान गावाबाहेरची मोकळी आवारे किंवा ओढ्याचा काठाआडची झुडपांचा आडोसा असा पर्याय असायचा. स्त्रियांची मात्र फारच कुचंबणा होत असे. सूर्योदयापूर्वी कसेबसे उरकून घ्यावे लागे. काही कारणास्तव संध्याकाळी जावे लागले तर सोबत कायम एखादी व्यक्ती राखणदार म्हणून आवश्यक असे. घरात स्वतःचे प्रसाधनगृह बांधल्यावर अतिशय श्रीमंत झाल्यासारखे वाटले होते. हवे तेव्हा कितीही वेळ निवांत बसता येण्यासारखे सुख नाही.
...
मी या संदर्भात जे काही थोडेसे(च) वाचले आहे (दुवा १ (पहा: 'The Cotton Mills' हा परिच्छेद), दुवा २ (पहा: 'Social Dimensions' हा परिच्छेद)), त्यानुसार, 'चाळ' ही मुळात आख्ख्या कुटुंबाने नांदावे या उद्दिष्टाने बांधलेली संरचनाच नव्हती मुळी. तर, 'गावाकडून (कोकणातून?) मुंबईत गिरणीत काम करण्याकरिता (कुटुंबाला गावीच ठेवून) येणार्या (आणि कधीमधी सुट्टीत गावी कुटुंबाकडे जाऊन येणार्या) कामगारांच्या राहण्याच्या सोयीसाठी म्हणून बांधलेली हॉस्टेलवजा इमारत' इतकेच त्याचे मर्यादित स्वरूप अपेक्षित होते. (आणि या दृष्टिकोनातून पाहिल्यास ती एवढीशी परंतु स्वतंत्र खोली आणि मजल्यावरील किंवा इमारतीबाहेरील सामायिक संडास ही व्यवस्था सड्या कामगाराकरिता मुबलक - अगदी लक्झूरियस म्हणता येण्याजोगी - वाटावी.) परंतु कसचे काय नि कसचे काय!
उत्तम
उत्तम माहिती. टी आय एफ आर संस्थेतल्या पिव्वर भौतिकशास्त्र या विभागात तुम्हाला ती कशी सापडली याचं आश्चर्य मात्र वाटतं आहे
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
...
खूप जुनी साइट आहे ती. फार पूर्वी मुंबईबद्दल अशीच काही गूगलगिरी करताना सापडली होती. बहुधा टीआयएफआरला मुंबईबाहेरून येऊन भेट देणार्या मंडळींना उपयोगी पडावी म्हणून मुंबईबद्दलच्या सामान्य माहितीचे संकलन या उद्दिष्टाने ती काढली असावी, असे वाटते. मुंबईच्या भागाभागाच्या, उपनगराउपनगराच्या इतिहासाबद्दल आणि विविध अंगांबद्दल रोचक आणि तपशीलवार अशी बरीचशी माहिती तेथे संकलित आहे. (अलीकडे साइट अद्ययावत करण्याचे वारंवार प्रयत्न बहुधा होत नसले, तरीही. किंबहुना, बर्याच वर्षांत अद्ययावत केलेली नसावी, अशी शंका आहे. परंतु आहे ते रोचक आहे.)
खेड्यात संपन्न व धार्मिक
खेड्यात संपन्न व धार्मिक कुटुंबात वाढल्याने चाळीविषयी काही माहित नाही.पण शहराचे आकर्षण होते.मामाकडे पुण्यात यायचो तेव्हा वाडा संस्कृती विषयी परिचय झाला होता. डामरी रस्ते, रंगीबेरंगी विजेचे दिवे, चहात पाव बुडवून खायला मिळणे,आइस्क्रिम व नळाला येणारे पाणी यांच फार आकर्षण वाटे.
मामेभावंडांना आमच्या शेतीच आकर्षण वाटे. बैलगाडी गाय वासरु हुरडा पानमळा केळी विहीर आंबे टेकडी माती हे त्यांचे आकर्षणाचे विषय.
लेख आवडला. चाळ हा बर्याच लोकांचा व साहित्याचा नॉस्टलजिक विषय आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com
आतिशय (होय, आ) आवडला आहे! चाळ
आतिशय (होय, आ) आवडला आहे! चाळ भिकारच असतेच. (द्या काय साहित्यिकली फाशी द्यायची ती.)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+
कधी नव्हे ते सहमत आहे! (कधी 'मार्मिक' देऊ शकेन असे वाटले नव्हते.)
- (रूढार्थाने चाळीत 'वाढलो' नसलो, तरी कधी काळी सुट्ट्यांत चाळीत अनेकदा जाऊनयेऊन भेट देऊन राहिलेला) 'न'वी बाजू.
चाळ आणि गाव याविषयी थबथब
चाळ आणि गाव याविषयी थबथब ओथंबणारे साहित्य सतत घश्यात कोंबले गेल्यामुळे आपल्याला गाव नाही, आपण शहरात आणि ब्लॉकमधे वाढलो याचे न्यूनगंड यावेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
हुश्श झाले हे वाचून...
- नी
काहीसा सहमत
गावात राहण्याचा / वाढण्याचा अनुभव नसल्याकारणाने (आणि त्याबद्दल फारसे अप्रूप वा कुतूहलही नसल्याकारणाने) कोणीही कितीही काहीही म्हणो, परंतु 'आपण गावात राहिलो / वाढलो नाही' याविषयी न्यूनगंड वाटण्याचा प्रश्न (आमच्या बाबतीत) सुदैवाने नव्हता. परंतु चाळीत राहण्याचा (अधूनमधून भेट देऊन का होईना) स्वल्पानुभव दुर्दैवाने गाठीशी असल्याकारणाने, 'चाळ' आणि 'चाळसंस्कृती' यांचे गोडवे गाणारी मंडळी डोक्यात जातात.
(कोणाची अपरिहार्यता समजू शकतो, परंतु अभिमान? 'आयुष्यात यातून बाहेर पडण्याची, काही अधिक बरे गाठण्याची आमची कुवतच नाही; हीच आमची मर्यादा आहे' याची ही अस्पष्ट / अव्यक्त कबुलीच तर नव्हे ना? आणि आयुष्याचा मोठा भाग त्या वातावरणात काढल्यानंतर अखेरीस स्वकमाईच्या वा पोरकमाईच्या बळावर - किंवा स्त्रियांच्या बाबतीत क्चचित विवाहाद्वारे आणि तारुण्यातसुद्धा - त्यातून बाहेर पडल्यावरसुद्धा त्याबद्दल नॉस्टाल्जिक वगैरे होणारी मंडळी तर निव्वळ अनाकलनीय आहेत. ('तमसो मा ज्योतिर्गमय' हे सपोज़ेडली आपल्याच संस्कृतीत सांगून ठेवलेले आहे ना?)
आणि मग लोक सदाशिव पेठेसच तेवढी नावे का ठेवतात?)
अवांतर: 'बटाट्याची चाळ' हे चाळीतील जीवनाचे सूक्ष्मनिरीक्षण आणि अचूक वर्णन म्हणून ठीकच आहे - नव्हे, उत्तम आहे. परंतु त्याअखेरचे 'चिंतन' हा भाग कधी 'याबद्दल - आणि केवळ याचबद्दल - पु.ल. या इसमास त्याच्या हयातीतच उलटा टांगून ती प्रॉव्हर्बल मिरच्यांची धुरी वगैरे द्यावयास हवी होती' असा असुरी विचार डोक्यात येण्याइतपत डोक्यात जात असे. ('अभिव्यक्तिस्वातंत्र्य' वगैरे संकल्पना त्या काळी डोक्यात रुजणे तर राहोच, शिरलीसुद्धा नव्हती.) पण आता अधिक विचार करता असे वाटते, की ते 'चिंतन' हे 'पु.लं.चे विचार' म्हणून न घेता, 'चाळीच्या / चाळीत वाढलेल्या व्यक्तीच्या बुटांत स्वतःस उभे करून तिच्या मनोगताचे हुबेहूब चित्रण करण्याचा पु.लं.चा प्रयत्न' अशा दृष्टीने त्याकडे पाहिले असता ते ठीकच आहे. (भले पु.लं.चे स्वतःचे या बाबतीतील प्रत्यक्ष विचार काय होते, ते पु.लं.नाच ठाऊक - आणि लखलाभ!)
असो.
बाबौ... पण ऑलमोस्ट बरोबरेय!
बाबौ...
पण ऑलमोस्ट बरोबरेय!
- नी
बायदवे हे नीरा आडारकरांचं
बायदवे हे नीरा आडारकरांचं कोणतं पुस्तक आहे? नाव कळू शकेल का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
http://middlestage.blogspot.f
http://middlestage.blogspot.fr/2011/04/on-neera-adarkars-anthology-chawl...
हे असावं.
अवांतरः सूर्याची पिल्ले या नाटकाच्या रेकॉर्डिंगमध्ये एक पात्र नीरा आडारकर यांनी रंगवलय. त्या याच आहेत का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
साडे सहा हजार रुपयांचं
साडे सहा हजार रुपयांचं पेपरब्याक पुस्तक! नक्की काय-भ्रू लोकांना डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक बाजारात आणलं आहे?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अर्थात चाळवाल्या
अर्थात चाळवाल्या लोकांना!
घरासाठी कर्ज वगैरे घ्यावं न लागल्यामुळे आजकाल चाळकरी लोकांकडे दाबून कॅश असते असं मागे एकदा पेपरांत वाचलं होतं बॉ!!
अणि तसंही चाळीत कधीही न राहिलेला माणूस चाळीवरचं पुस्तक कशाला विकत घेईल?
साडेसहा हज्जार रुपयांत किती पापलेटं येतील, माहितिये?
नसेल तर त्या आडारकर बाईंनाच विचार, त्यांना नक्की माहिती असणार!!!
सुरेख, अतिशय सुरेख वर्णन!
सुरेख, अतिशय सुरेख वर्णन!
ते काही चाळींच्या गॅलर्यांमध्ये ठेवलेले पाणी तापवायचे बंब, त्यासाठी इंधन म्हणून वापरण्यात येणार्या नारळाच्या करवंट्या, त्या जाळल्यावर होणारा खोबरेल तेलाचा वास असलेला धूर!!!
आम्ही त्यावेळेस भाड्याच्या पण मोकळ्याढाकळ्या ठाणे जिल्ह्यातल्या जागेत रहात असू. आत्याकडे गिरगावात चाळीत जायला फारसं आवडायचं नाही. आत्याला मात्र आमच्याकडे यायला सहाजिकच खूप आवडायचं. पण दर वेळेस आल्यावर बोलतांना मात्र आमच्या बाबांना, "अरे देवा, काय कुठे घर घेतलंयस! प्रवासात जीव शिणून गेला अगदी!!" वगैरे, वगैरे!!
चाळीचा अनुभव नाही आणि तो
चाळीचा अनुभव नाही आणि तो प्रकार कधीच आवडला नसता याची खात्री आहे. लेखाच्या शेवटचा सूर मात्र अनाठायी वाटला.
लेख अतिशय आवडला. माझा जन्म
लेख अतिशय आवडला. माझा जन्म आणि लहानपण चाळीतच गेलं त्यामुळे यातल्या अनेक अनुभवांशी सांधा जोडता आला. पुरेसं लहान असताना त्या वातावरणात एक गंमत असायची. पण मोठं होताना त्या वास्तवातल्या गोष्टी टोचायला लागल्या होत्या.
संडासात जाणं हा अत्यंत नकोसा वाटणारा अनुभव होता. लहानपणीही. मला झुरळांची प्रचंड भीती होती. संडासाची जमीन मातीची, आणि कुजलेल्या लाकडी कोपऱ्यांतून झुरळांच्या मिशा हलताना अंधारात, फटीतून येणाऱ्या शून्य वॉटच्या दिव्याच्या प्रकाशातून दिसायच्या. त्यामुळे 'सरासरी दहा मिनिटं' जायचं असलं तरीही त्याचे ओरखडे बराच काळ राहायचे.
माझ्या व्यक्तिगत अनुभवापलिकडेही - या लेखात नव्वदोत्तरीचा विषय अत्यंत वैयक्तिक पातळीवर हाताळला आहे हे आवडलं. ही वैयक्तिक कथा असली तरी प्रचंड मोठ्या वर्गासाठी असलेलं हे वास्तव आहे. नव्वदपूर्व काळात चाळीत राहिलेला आणि त्यानंतर फ्लॅटमध्ये गेलेला एक फार मोठा शहरी वर्ग आहे. हा वर्ग भारतात आर्थिकदृष्ट्या वरच्या दहा टक्क्यात आहे.
मागे वळून पाहाताना लक्षात येतं की त्या काळी शहरांतल्या तशा चाळींत राहाणारेही भारतात आर्थिकदृष्ट्या वरच्या दहा टक्क्यांतच होते. त्याखालच्या वर्गाच्या परिस्थितीची कल्पनाही करवत नाही.
मला विचारा उरलेल्या ९०% ची
मला विचारा उरलेल्या ९०% ची परिस्थीती!!
मुंबईपासून ५०-६० किमी अंतरावर असलेल्या एका कारखान्याच्या गावाच्या परीघावर वाढलेल्या एका बांडगुळासारख्या वस्तीत रहायचा फर्स्ट हँड अनुभव आहे माझ्याकडे. चाळीत रहाणारे श्रीमंतच असावेत कारण ९ घरात मिळून एक संडास म्हणजे चैनच!! आमच्या ***नगरात १०००० लोकांमधे वट्ट ६ संडास होते, हागर्या पिवळ्या सरकारी रंगात कधीकाळी रंगविलेले. ३ बायकांना आणि ३ पुरुषांना. १२ वर्षाखालील पोरं आणि ८ वर्षाखालील पोरींना बाहेरच बसवायची पद्धत होती. संडासाच्या १० मीटरच्या परिघात ही मुले बसत. याच्याबरोबर मधून एक कॅटवॉक करण्याजोगी पायवाट जाई थेट संडासापर्यंत! संडासाच्या भिंतीलगत १/२ मिटरवर अजून एक पिवळी भिंत होति, तिचे प्रयोजन काय कधीच कळले नाही. पण या फटीत भरपुर डुकरे आणि त्यांची भरमसाठ पोरे असायची. त्यावेळी त्यांना नावेही दिलेली आठवतात. ग्रेयीश केसाळ, हडकुळं दिल्ली डुक्कर, काळंभोर आफ्रीकन डुक्कर आणि पांढरं विथ गुलाबी पाऊट असलेलं अमेरीकन डुक्कर!! डुकरांची पोरं भलतीच लवकर अॅक्टीव्ह होतात! ती पोरं आणि संडासाच्या आतल्या भिंती म्हणजे अर्थात सेक्स एजुकेशनचे फ्री क्लासेस होते.. रम्य ई.ई. पावसाळा तर केवळ अवर्णनीय!! स्वच्छता ई.ई. गोष्टी बहुतेक परग्रहावर असाव्यात...
संडासात म्युन्सिपाल्टीने लावलेला लाईट मोजून १५ मिनीटे टीकत असे, नंतर गायब होत असे. लावणाराच काढून घेऊन जातो असा प्रवाद होता. तिन्ही संडासांच्या भिंतीवर पाईपलाईन सद्रुष्य काहितरी होते पण त्याला नळाची तोटी कधीच पाहिली नाही. आमच्या घरापासून १५० मिटरचे अंतर आम्ही डालडाचा डब्बा-बालटी मार्च करुन जात असु! या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोपटीवजा दुकाने होती. पान-सिगारेट वाले होते. एकटे कधीच नाही, नॉर्मल्ली आम्ही ५-६ मैत्रिणी एकत्रच जायचो....
(स्च्यच्युटरी वॉर्निंग..!!) : जेवतांना किंवा एकंदरीतच असहिष्णुता असेल तर पुढे वाचू नये...
काही वर्षांनी आणखीन नवे ६ संडास बांधले. पण त्यांच्या टँकच्या कल्चरमधे काहितरी गडबड झाली. आणि त्यात बोट-बोट लांबीच्या बारकुसं काळं थेंबासारखं तोंड असणार्या अळ्या झाल्या. वर कोणीतरी दिवसाला १० मिनीटे जायची जागा असे काही तरी लिहीलेय. तर, या नव्या जागेत मोजून पहील्या १० सेकंदात अळ्या पावलावर चढलेल्या असायच्या. त्यानंतर बसल्याजागीच त्या टिचकीने उडवीणे हा खेळ खेळावा लागायचा. शप्पथ सांगते, यामुळे खरं तर फायदाच व्हावा असे काहीतरी असावे...कारण आजतागायत संडासात गेल्यावर एक मिन्टात बाहेर यायची सवय लागलीय!!
भारत गरीब देश आहे असं म्हणतात पण हे मला अजिब्बात पटत नाही. भारत खरं म्हणजे श्रीमंताचा , श्रीमंतांसाठी असलेला देश आहे. पैसे कमी असतील तर या देशात जगायला तुम्ही नालायक आहात. आणि याचा जन्मभराचा धडा मिळण्यासाठीच वरची व्यवस्था असते. देश पहिल्यांदा सोडला तेंव्हा शेवटचे दृष्य आठवतेय ते जुन्या विमानतळाच्या भिंतीपलीकडे दिसणारी सार्वजनीक संडासाची मोठ्ठी रांग!
या सगळ्या प्रकारचा ईतका प्रचण्ड फोबिया झालाय की अजूनही स्वप्न पडतात ती फुटक्या संडासात पडत असल्याचीच...
ह्या सार्वजनीक जगाचा आणि माणसांचा ईतका अनुभव आणि असल्या वयात घेतलाय की जेंव्हा मी असं म्हणते तेंव्हा कित्येक जण चिडतात पण पुस्पा....आय रीयली हेट ईंडीया....
आय हेट इंडिया हे तू लिहीलस
आय हेट इंडिया हे तू लिहीलस म्हणून धीर करुन अवांतर करते आहे.
.
गर्दीतील धक्क्यांचे जे अतिशय अघोरी (मानसिक स्वास्थ्याकरता) आणि गलिच्छ, थर्ड्क्लास अनुभव आले त्यातून हे ठरविले की मुलीला हे फेस करायला लागता कामा नये. किंबहुना मुलगी झाली आणि तिच्या नशीबी गर्दीतील मॉलेस्टेशन नक्की कितव्या वर्षी येइल असा विचार सुरु झाला : (. पण इच्छाशक्ती म्हण आणि नशीब व देवाची कृपा म्हण - ती ३ वर्षाची असताना अमेरीकेत आलो.
.
इथे भयंकर स्ट्रगल आहे, बायपोलर डिटेक्ट होण्याचा काळ अतिशय कठीण होता कारण मॅनिया त्या काळात चरमसीमेवर होता, मी एकटी कमावत होते आणि जॉब गेला तर? - रेसिंग थॉट्स, कोणीतरी चापट मारुन उठवतय असे भास, वाईट स्वप्ने, निद्रानाश, औषधांची ट्रायल & एरर बरेचदा अशी एरर की गुदमरुन जीव जायची पाळी यायची, बरं काऊन्सिलर कधी मला नालायक समजुन मुलीला माझ्यापासून दूर करेल व फोस्टर केरमध्ये टाकेल ही अपरिमीत पण रास्त भीती आणि हे सर्व पार पडूनही मी हेच म्हणेन की गर्दीतल्या मॉलेस्टेशनपेक्षा मी या गोष्टी फेस करायला तयार आहे.
.
अगदी हेट इंडिया नाहीच म्हणणार मी पण तसच काहीसं - तिथल्या अघोरी गर्दीचा विशेषतः लहान मुलींशी केल्या जाणार्या वागणुकीचा, छळाचा मी निषेधच करते.
बाप रे!
बाप रे!
मुंबईच्या जवळ ही परिस्थिती आणि ठाण्यात राहून मला असं काही असतं याची कल्पनाही नव्हती. वाचतानाही अंगावर काटा आला. हे असं आयुष्य जगायचं ... हे मनुष्यांचं आयुष्य नव्हेच.
तरीही लिहिण्याबद्दल आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इयत्ता चौथीपर्यंत चाळीत
इयत्ता चौथीपर्यंत चाळीत राहिलो. नंतर ब्लॉकमध्ये. त्यामुळे कळत्या वयात चाळीचा अनुभव नाही.
चाळीतल्या जीवनाचे उदात्तीकरण वाचण्यापूर्वीच वपु काळ्यांचं लेखन वाचलं गेल्यामुळे असेल पण चाळीविषयी नॉस्टाल्जिया किंवा तिरस्कार काहीच झालं नाही.
------------------
लेखात लिहिलेले गचाळपणाचे वर्णन खरे आहेच पण त्या ठिकाणी राहणार्या लोकांना तसं राहण्याची आवड होती असा काहीसा सूर लेखात (आणि प्रतिसादांत) जाणवला. ते काही पटत नाही. बहुतेक लोक तिथे रहात कारण दुसरीकडे राहणे परवडत* नसे.
अनेक कर्तबगार लोकांनी आपली आयुष्ये तिथे सुरू केली असतील कारण आयुष्याच्या सुरुवातीला सहसा पैसा कमी असे. त्यातले जे शिक्षित आणि कर्तबगार असत ते काही वर्षातच मोठी स्वतंत्र घरे घेत असत. जे तिथे शिल्लक रहात ते कर्तबगारीने आणि शिक्षणाने कमी* असत. मग ते आपल्या अभावग्रस्त जीवनाचं तत्त्वज्ञान करत असत.
*यात सर्वस्वी दोष त्यांचा असे असे म्हणणे नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मग ते आपल्या अभावग्रस्त
हे वाक्य आवडले.
चाळीचं कौतुक करणारी पुस्तकं
चाळीचं कौतुक करणारी पुस्तकं कोणती आहेत. दोन चार नावं?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
असेच म्हणतो.
असेच म्हणतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वर नबा यांनी उल्लेख
वर नबा यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 'बटाट्याची चाळ' चाळीचे कौतुक करणारी नसली तरी लेखात जी वास्तवता आहे, तिला टाळते. आता पुलं विनोदी लेखक आहेत आणि 'जे जे चांगलं तेच दाखवायचं' हा त्यांचा सर्वसाधारण दृष्टीकोन आहे हे मान्यच. लेखक म्हणून त्यांना ते स्वातंत्र्य आहेच. पण पुलंची लोकप्रियता बघता जर फक्त 'बटाट्याची चाळ' वाचली असेल तर कळत-नकळत चाळीविषयी एक आदर्शवादी दृष्टीकोन तयार होऊ शकतो१. कदाचित माझ्या चाळीच्या अनुभवामुळेच की काय, पण पुलं आवडते लेखक असूनही 'बटाट्याची चाळ' मला फारसं कधीच आवडलं नाही. चाळीतील आयुष्याचे इतर गोड अनुभव वर्तमानपत्रे, मासिके, ब्लॉगवरील लेखांमध्ये वाचले आहेत.
याउलट किरण नगरकरांचं 'रावण अँड एडी' वाचलं तर लेखात आहे तशीच दाहक वास्तवता समोर येते.
१. जसं 'अपूर्वाई' वाचल्यावर पहिल्यांदा परदेशी गेलं तर त्याच नजरेतून सगळं बघितलं जातं हा माझा अनुभव आहे. हे लक्षात आल्यावर मला प्रयत्नपूर्वक दृष्टीकोन बदलावा लागला.
ओके
काही प्रतिसादात चाळीचं कौतिक असलेलं साहित्य पाहून वीट आला असा स्वर आहे. ही नक्की कुठली पुस्तकं ते जाणून घ्यायचं होतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला तर (मुंबईत) चाळ (नि
मला तर (मुंबईत) चाळ (नि पुण्यात वाडे) म्हणजे थोर उदत्त वगैरे कैतरी नि ब्लॉकवाले म्हणजे अगदीच माणूसघाणे हा अॅटिट्युड खूपच लहानपणापासून मुरलेला आठवतोय.
छापील लेखन आठवता येईलच. तुर्तास जालावर डोकावू
इथे बघा
इथे लेखक म्हणतातः
प्रहारमध्ये आपापल्या घरांबद्दलचे लेखन असते. त्यात अनेक लेख चाळींबद्दल्ही असतात. सहज गुगल केल्यावर मिळालेला हा लेख बघा
अश्या प्रकारची वाक्ये अगसीच सहजतेने फेकली जातातः
या चाळींमध्ये रहाणे ही अपरिहार्हता आहे /असेलही पण त्यासारखी "मज्जा" कुठ्ठे कुठ्ठे नै हे ऐकून मात्र कंटाळा आला आहे.
अजूनही उदाहरणे देता येतील. पण तुर्तास मुद्दा अधिक स्पष्ट करण्यापुरते इतके पुरेल का?
(दिलेले दुवे ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. त्या चाळींना प्रत्यक्ष भेट न दिल्याने चाळींबद्दल काहीही मत नाही)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
BLOG: निरोप श्याम सदनला... बंध मनातला...
https://marathi.abplive.com/blog/blog-by-ashwin-bapat-on-redevelopment-o...
'सखी शेजारिणी'...
पुस्तकांबाबत माहीत नाही, पण 'सखी शेजारिणी' या कवितेच्या शेवटच्या कडव्यातील शेवटची ओळ पहा. आपल्या गर्लफ्रेंडला चाळ बांधून पाहायला सांगणारा कवी हा केवळ मराठीच असू शकतो.
(मराठी कवी हा कविकल्पनेतसुद्धा बंगले वगैरे बांधण्याचा विचार करू शकणार नाही. (महाल वगैरे तर सोडाच.) तो चाळच बांधायच्या बाता करणार. त्याची 'मोठ्ठ्या घरा'च्या कल्पनेची भरारी चाळीपर्यंतच. भरपूर खोल्या असणारे घर!
असो.)
लेखिकेचा विकृत दृष्टीकोन वाक्यावाक्यागणिक दिसतोय .
लेखिकेचा (?) विकृत दृष्टीकोन वाक्यावाक्यागणिक दिसतोय.
जब्ब्बरदस्त लेखन. प्रचंड
जब्ब्बरदस्त लेखन. प्रचंड आवडले!!
चाळीत कधीच राहीलो नाही, पण तिच्याबद्दल वाटणारं आकर्षण या लेखामुळं अचानक कमी झालं. खुपच गचाळ!
अवांतर:
आता माझ्या पिढीतले जे लोक चाळींमधलं जगणं मागे टाकून आले त्यांच्याबद्दल.>>>>>>>>>>
या वाक्यापर्यंत लेख अगदी ऊत्कृष्ठ वाटला. त्यानंतर उगाचच वाढवायचा म्हणुन वाढवलाय असं वाटलं.
आवडला.
चाळींतलं सहजीवन, एकोपा, साधासुधा भाबडेपणा याबद्दल उसासेटाकू स्मरणरंजन खूप ऐकलंय. पण हे सर्व 'पदरी पडलं, पवित्र झालं' या भावनेतूनच होतं हेही जाणवायचं. शिवाय आपल्याकडे धट्ट्या-कट्ट्या गरीबीचं फारच प्रस्थ. लादलेलं असलं तरी वास्तव ते वास्तवच. त्याच्या गौरवीकरणाची किंवा उदात्तीकरणाची धडपड केविलवाणी वाटत आली. चाळीत कायम वास्तव्याचा योग आला नाही पण नातेवाईकांमुळे या जगाशी लहानपणापासून संबंध आले. चाळीत शिरताना 'नवीन कोण' ते बघायला वरच्या मजल्यांच्या गॅलर्यांतून डोकावणारी मुंडकी पाहिली की इतक्या नजरा उगीचच आणि एकदम झेलण्याची सवय नसल्याने कसंसंच व्हायचं. प्राय्वसीचा मुद्दा अगदी नेमका पकडलाय. खाजगीपणा न मिळाल्यामुळे आलेला चिडचिडेपणा, दुसरे काहीच हाताशी नसल्यामुळे करावा लागणारा आत्मगौरव, झुंडीत लपून जाण्याची इच्छा कारण वैयक्तिक ताठ जगू शकण्यातली असमर्थता आणि त्यामुळे आलेली असहायता. गंगाधर गाडगिळांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी 'किडलेली माणसे'मध्ये हे सर्व नेमकं पकडलं होतं.
'तर मग ब्लॉकमध्ये जा राहायला' हे तर घोषवाक्यच होतं. मुंबईतलं दुसरं असंच लोकप्रिय वाक्य म्हणजे 'जा तर मग फस्स्क्लास्मध्ये'. म्हणजे प्राप्त परिस्थितीविरुद्ध कसलीही हालचाल करायची नाही. ती परिस्थिती सुसह्य होण्यासाठी कृती तर करायची नाहीच पण तशी अपेक्षाही अजिबात ठेवायची नाही. आम्ही नाही का जगलो? मग तुम्हालाच का टोचतंय?
आणि आता तर याचीच पुढची पायरी म्हणजे 'चालते व्हा पाकिस्तानमध्ये. आमचं आम्ही बघून घेऊं. तुमच्याशिवाय काssही अडत नाहीय इथे. मारे सुधारणा करताहेत'!
आणखी आवडलेलं म्हणजे 'पुस्पा, आय हेट टियर्स'चा बदलून वापर.
लेख एकंदरीत आवडला, शेवटी जरा घसरल्यासारखा वाटला. नव्वदोत्तरीपर्यंत पोचायचंच असं काही होतं का? पण आवडला. धन्यवाद.
चाळीत
जन्मापासून ते २७ वर्षापर्यंतचा चाळ साकीनाक्याच्या बैठ्या चाळीतच काढला. गिरगाव, लालबाग, परेल च्या चाळी आणि आम्ही जिथे राहत होतो त्या चाळींमधे जमीन अस्मानचा फरक असायचा. मला वाटतं की मुळातचं स्त्री आणि पुरुष यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बरीच तफावत असते त्यामुळे स्त्रियांना ज्या प्रमाणात हा लेख भावला असेल त्या प्रमाणात पुरुषांना भावला (आवडला) असेलच असे नाही.
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे 'ब्लॉकमध्येही सर्व सण साजरे केले जातात पण त्याला चाळीची सर नाही' हे वाक्य तर मला तंतोतंत पटते कारण माझा अनुभव तेच सांगतो पण इतरांचा अनुभवही तसाच असेल असे नाही.
चाळीत राहण्यात मुख्य अडचण म्हणजे सार्वजनिक संडास हाच असतो. तरी आमच्या चाळीत ३६ खोल्यांमागे ६ संडास होती आणि इतर चाळींच्या मानाने आम्ही सुखीच होतो असे जाणवत असे. जरा वरती म्हणजे भटवाडी, पंतनगर बाजूला गेले की तिकडे आपण कुठे चाललोय याचा पुरावा कमीतकमी अर्धा एक किलोमिटर तरी वागवायला लागायचा. मात्र अजून पुढे म्हणजे घाटकोपर स्टेशनच्या बाजूला गेले की तिकडे गुजरात्यांच्या चाळी होत्या. (गिरगांव लालबाग स्टाईल). तिकडे जीना चढून जायचं म्हणजे कोपर्यावरची घाण ओलांडण्याला पर्याय नसायचा. अगदी नाकतले किडे मरतील असा वास ! त्यामानाने आमच्या घाट्यांच्या आणि कोकणाटांच्या चाळी म्हणजे फारच स्वच्च्छ वाटायच्या.
शिवाय आमच्या संडासाजवळ एक पाण्याची टाकी देखील बांधली होती व त्या जवळ नेहमी दोन चार चिंपाटे (नव्वदोत्तरी नंतरच्यांनो कृपया ह्या शब्दाची नोंद घ्या) पडलेली असत. त्यामुळे घरुनच चिंपाट नेलेच पाहिजे असा आमच्याकडे नियम नव्हता. तसेच घरटी एकच चिंपाट असले तर हातघाईच्या वेळी शेजारच्यांचे चिंपाट न विचारता घेऊन जाण्याचीही पद्धत सर्रास होती. मात्र ती कार्यभाग उरकल्यावर प्रामाणिकपणे आपापल्या जागी आढळायची. सहसा पीक अवर्सची सुरुवात सकाळी ६.३० पासून व्ह्यायची. यात ७.००-७.३० च्या दरम्यान शाळा कॉलेज असल्यामुळे लहान मुले, किशोरवयीन मुलामुलींचा भरणा अधिक असायचा. नंतर नोकरीवर जाणार्याचा नंबर लागायचा. डॉक्टरकडे गेल्यावर कसे आपण शेवटचा नंबर कोणाचाय ? असे विचारतो तसे आम्ही तिथे विचारत असू. एखाद्याला अर्जंट असेल तर तो आपल्या अगोदरच्या नंबरवाल्याला एखादे कारण सांगून अर्ली बर्ड देखील व्हायचा. मात्र कोणी आतमधे जास्त वेळ बसला तर बाहेरुन दार ठोठावणारेही काही नग होते.
स्त्रियांचे कार्यक्रम बहुधा १० नंतर दुपारी ४.०० पर्यंत त्यांच्या सवडीनुसार चालत. यावेळेत पुरुष मंडळी नसत त्यामुळे चोरटेपणाची भावना थोडी कमी व्हायची.
सुरुवातीला मला पीक अवर्सचा अंदाज नसल्याने फार वेळ नंबरात उभे रहावे लागायचे. इतका वेळ की तेवढ्या वेळेत मी नवाकाळ पेपर पुर्ण वाचून काढत असे. मात्र जसजसा वेळेचा अंदाज येत गेला तसतसा वेटिंग पिरियड कमी होत गेला.
प्रायव्हसीचा मुद्दा आमच्याकडे महत्त्वाचा होताही आणी नव्हताही. आपण माणसांत किती पाघळायचं ह्या प्रमाणावर प्रायव्हसीचा रेशीयो ठरतो. मी माझी पाघळायची लेव्हल अगोदरच ठरवून घेतली असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही. शिवाय आमच्या दरवाज्या खिडक्यांना आतून कड्या लावता येत असत आणि त्यांना कोठे फटीदेखील नव्हत्या. तसेच अगदी फटीत डोकावून पाहण्या इतके स्थितप्रज्ञ आमच्या आजूबाजूला नव्हते हा देखील एक मुद्दा होताच.
शिवाय त्याकाळी ब्लॉकमधे राहणे ही बर्याच जणांच्या बाबतीत अशक्यप्राय गोष्ट होती त्यामुळे आपण जसे आहोत तसेच गोड मानून घेणे भाग होते. याच विचारातून चाळीचे उदात्तीकरण करणारे लिखाण झालेले असू शकते. आमच्या येथे होणार्या किर्तनात कधी कधी हा मुद्दा यायचा. बुवा सांगायचे 'पुर्वीच्या जमान्यात माणसं घरात खायचे आणि बाहेर जायचे. आता बघा, बाहेरुन खाऊन येतात आणि घरात जातात.'
खरी अडचण झाली ती लग्न झाल्यावर. बायको छोट्या शहरातून आली असली तरी तिच्या माहेरी घरात स्वतंत्र टॉयलेट होते. जेव्हा लग्न होऊन ती सासरी आली तेव्हा ३-४ दिवस तिला जेवणच गेले नाही. तिकडे जायच्या कल्पनेनेच तिचं जेवण कमी झाले. लग्नानंतर आम्ही तिथे जवळपास ४-५ वर्षे राहिलो पण तिला शेवटपर्यंत या बाबतीत जुळवून घेणे कठीणच गेले. या काळात ती वारंवार आजारी पडायची.
कदाचित निबर पुरुष मानसिकतेमुळे मला ह्या सगळ्याचा इतका त्रास झाला नाही किंवा मी हे अशाप्रकारे विनोदी पद्धतीने लिहू शकत असेन. पण स्त्रियांना त्रास होतोच / त्यांची कुचंबणा होते हे सत्य नाकारण्यात काही तथ्य नाही.
म्हणूनच चाळ कुणाला वाचाळ वाटू शकेल, कुणाला गचाळ वाटू शकेल तर कुणाला मधाळ वाटू शकेल. शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हेच खरे !
आणि हो, लेख आवडला ते सांगायच राहिलचं.
भाऊ, तुम्ही लिहीत रहा!
भाऊ, तुम्ही लिहीत रहा!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
+१
असेच म्हणतो. दार ठोठावण्यावरुन 'रामनगरी'तला प्रसंग आठवला. चाळीतून ब्लॉकमध्ये आल्यानंतरही राम नगरकरांच्या सौभाग्यवतींना नवऱ्याने बाहेरून दार ठोठावल्याशिवाय काम पूर्ण झाल्याची जाणीव झाली नाही.
मला वाटतं की मुळातचं स्त्री
तीव्र सहमती. स्त्रीपुरुषांच्या विचारपद्धतीत फरक असतो की नाही याबद्दल मी साशंक आहे. पण स्त्रीपुरुषां'बद्दल' विचार करण्याच्या पद्धतीत मात्र फरक असतोच असतो. आधीच स्त्रियांवर संस्कार घडवायला, त्यांना वळण लावायला आणि त्यांचं वळण जपायला, त्यांच्या चारित्र्याची शहानिशा करायला लोक उत्सुक असतात. चाळीसारख्या सदासर्वसार्वजनिक अवकाशात तर या प्रकाराला कितीचा गुणाकार होत असेल, याची फक्त कल्पनाच केलेली बरी. मध्यंतरी 'बालकपालक' नामक सिनेमा पाहिला, त्यात एक चाळ होती. तिथले पोरांवर हौसेनं नजर ठेवणारे एक गृहस्थ पाहिले आणि अंगावर काटाच आला. पालक ठेवतात ती नजर कमी, म्हणून हे असले लोक.
बाकी संडासला जाणे या गोष्टीमुळे कुचंबणा होण्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. पण संडासला एकदा गेल्यानंतर आतून कडी लावण्याची सोय तरी बहुतांश ठिकाणी असते. चाळीतल्या बाथरुम्स किंवा मोर्या हे एक स्वतंत्र प्रकरण असतं. त्याला कडी लावण्याजोगा दरवाजा असेलच असं नाही. बरेचदा ते काम एखाद्या पडद्यावर भागवलेलं. बरं, ती मोरी असून-असून किती मोठी असणार? त्यातच पाणी साठवण्याची भांडी. अशा ठिकाणी अंघोळीसारखं काम कसं बुवा करायचं? खाजगीपणा, जागा, स्वच्छता, चैन... कशाचीच काहीच तजवीज नाही. अंघोळ तर अंघोळ, ती दिवसातून एकदाच करायची असते. दहा मिनिटे-नियम त्यालाही लावून मोकळं होता येईल. पण एकीला जाणं? ते तर दिवसातून अनेकदा करावं लागतं. ते अशा मोरीत करणं इतकं गैरसोयीचं आणि अस्वच्छ आणि अ-खाजगी असतं, की बस. त्यात पाळीबिळीसारखं प्रकरण असेल, तर...
तर एकूणच आपल्या थोर्थोर भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टींप्रमाणे, चाळ हे प्रकरणही आवडवून घ्यायचं असल्यास पुरुषांना तशी फट थोडी जास्त आहे. बायकांना मात्र तीच गोष्ट अधिक जाचक-हिंस्र-किळसवाणी जास्त वाटणार, असं मलाही वाटतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+
सहमत आहे.
<फेमिनिझम ऑन> महिलांवर अन्याय करण्याची अजून एक संधी म्हणूनच "पुरुषांनी" चाळ हा प्रकार अस्तित्वात आणला. <फेमिनिझम ऑफ>
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पुरुषांवर अन्याय वा त्यांची
पुरुषांवर अन्याय वा त्यांची गैरसोय होत नाही असं नाही. फक्त त्यांना चाळ आवडवून घ्यायची असल्यास फट थोऽडी जास्त आहे, इतकंच. त्यावरून फेमिनिझमला (तोही स्यूडो!) झोडणं म्हणजे... असो! गंमत करताय, असं गृहीत धरते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
>>फक्त त्यांना चाळ आवडवून
>>फक्त त्यांना चाळ आवडवून घ्यायची असल्यास फट थोऽडी जास्त आहे, इतकंच.
म्हटलं तर गंमत करतोय पण चाळ आवडवून कोणालाच घ्यायची नसते.
अगदी पुरुषी बुरखावादी मानसिकतेतून विचार केला तरी आपल्या घरातील बायका 'त्या' निमित्ताने इतरांच्या नको तशा दृष्टीस पडू नयेत म्हणून पुरुष ती व्यवस्था मोडण्याचा/त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील ही शक्यता जास्त.
तेव्हा पुरुष may not bother हे गृहीतक + निष्कर्ष चुकीचा आहे.
----------------------------------
इथे अवांतरच आहे पण ही कुचंबणा वगैरेवाली परिस्थिती सुधारण्यासाठी महिला स्वत:कडून "तक्रार करण्याखेरीज" काय उपाय करण्याचा प्रयत्न करतात हे जाणून घ्यायला आवडेल. :?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझ्या माहितीतल्या ४
माझ्या माहितीतल्या ४ पुरुषांनी (एक माझ्या वडिलांच्या वयाचे स्नेही, दोन माझ्याच वयोगटातले मित्र - त्यांतला एक सांस्कृतिक दृष्ट्या ज्याला वेल-रेड म्हणता येईल असा आणि एक वाचनाबिचनाशी दूरवरचाही संबंध नसलेला, आणि चौथा नातेवाईक असा समवयस्क मुलगा) त्यांना चाळ हे प्रकरण आवडत असल्याचं सांगितलं. किमान त्यात इतकं खुपण्यासारखं तरी काही नाही, असं त्यांचं मत दिसलं. (आणि यांच्यातला एकही पुरुष पुरुषी माज असणारा नाही. मला तरी त्याच्या बरोबर उलट असाच अनुभव आहे.)
दुसरं म्हणजे - सरसकट पुरुषांची मानसिकता बुरखावादी असते असं माझं प्रतिपादन अजिबातच नाही. किंबहुना माझ्या प्रतिसादात बुरखावादाचा काही संबंधच नाही. फक्त पुरुषांना ही व्यवस्था स्त्रियांइतकी खुपत नसावी, इतकंच निरीक्षण मी मांडते आहे.
'मे नॉट बॉदर' असंही माझं मत नाही. ज्यांना तिथून बाहेर पडायचं आहे, ते बाहेर पडायचे प्रयत्न करतातच.
हे सगळं असू दे - तुम्हांला एका निराळ्या चाकोरीतलं (ट्रॅक) उदाहरण देते. परदेशी स्थायिक झालेल्या दाम्पत्याला विचारा, भारतात परत जायला आवडेल का? (आता पुन्हा हे काहीसं सुलभीकृत - सरसकटीकरण केलेलं निरीक्षण आहे. ही मर्यादा आहेच) बहुतांश पुरुष आनंदानं होकार भरतील. किमान त्यांची इच्छा तरी दिसेल. प्रत्यक्ष कृती घडेल की नाही, हा अजून निराळा भाग आहे. पण स्त्रिया? विवाहित स्त्रीला भारतात परतायची इच्छा नसते. तेच ते एकत्र कुटुंबाचे धबडगे, किमान त्यांची दडपणं, घरकामाला हात न लावणारे पुरुष (किमान त्याला मान्यता देणारी समाजपद्धती), संस्कृती जपण्याच्या अपेक्षा... यांच्यात त्यांना अजिबात परतायचं नसतं. कारण या सार्याशी म्हटलं तर झगडता येतंच. पण हे झगडे करायची ताकद-हिंमत नसलेल्या आणि त्यातून सहीसलामत निसटू मात्र पाहणार्या अनेक स्त्रिया असतात.
अशा प्रकारची स्त्रियांची प्रवृत्ती चाळीच्या बाबतीतही असते, इतकं मर्यादित निरीक्षण. आता तुम्ही पुन्हा विचाराल... की किती स्त्रिया परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात... तर तो पुन्हा निराळा मुद्दा झाला. त्याबद्दल स्वतंत्र चर्चा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
.....
Just a min.
I think there is biological reason as well.
Mulinna ekunach vaas/gandh (sugandh kimva durgandh, kasaahi) jaast teevratene jaanavto; ase aikle aahe.
Shivaay anubhavahi aahe.
My wife or female friends advise to skip a patch/road and go by alternative rpute many a times, because they get terrible smell around.
When i go 10-15 feets ahead, i too sense the same terrible smell.
That means, their smelling senses r much stronger than mine.
Someone told me that overall female/women hv steong smelling sense.
Now, if this is true, it means; they must be getting more irritated because of toilet odour ; making them much more uncomfortable. This might affect their opinion abt public toilet, atleast to some extent.
P. S.
Plz accept my sincere apology for butchering english through my reply. I m nt good at english, and dev naagari font is nt avlbl in this machine. Bhaavnaao ko samjho.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
>>आता तुम्ही पुन्हा
>>आता तुम्ही पुन्हा विचाराल... की किती स्त्रिया परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात... तर तो पुन्हा निराळा मुद्दा झाला. त्याबद्दल स्वतंत्र चर्चा.
माझा प्रश्न पलायनाचा नव्हता. पलायन न करता प्रश्न सुसह्य करण्याचा प्रयत्न करण्याचा होता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अवांतर... काही बायका
अवांतर... काही बायका ज्यांच्यापुढे एकत्र कुटुंबाचा बागुलबुवा देशात परतल्यावर उभा नसतो त्यांना 'कामवाल्या' या एका कारणासाठी कधी कधी मनापासून देशात परत यावेसे वाटते. क्षणिक का होईना.. (हे मजेनेच घेणे!)
शहरातून गावात जायला मुली बायकांचा नकार अश्याच गोष्टींसाठी असतो. एकीकडे स्वतःचे आकाश विस्तारत असते. पद्धती, ठराविकपणे वागण्याचे दडपण, अमुकची सून असे आलेले राज्य निभवणे यातले महानपण फोल आहे हे उलगडलेले असते त्यामुळे ते वर्षातून एखादा दिवस निभवण्याची तयारी असते. कायमचे कोण करेल?
- नी
बायकाच कशाला 'स्वतःची कामे
बायकाच कशाला 'स्वतःची कामे स्वतः करावी लागतात त्यासाठी सहज व स्वस्त मनुष्यबळ मिळत नाही' हे माझेही भारतात परतण्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक होते.
दर आठवड्याला कपड्यांना इस्त्र्याकरा, कपडे धुवा, रोज भांडी घासा. तरी बरं लॉन वगैरे असलेलं घर नव्हतं नाहितर ती उस्तवार, बर्फ काढा, घराचं - बाथरुमची क्लिनिंग करा, पोळ्या करा, गाडी असेल तर स्वत:च पुसा! छ्या छ्या छ्या! इतक्या गरीबीत कोण रहाणार!
साधारणतः जर भारतात राहिल्याने व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करवणारा सभोवताल असेल तर आणि कुटुंबात अतीकर्मठ वातावरण असेल तर लोक परदेशांत रहाणे पसंत करतात असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. आर्थिक कारणाने रहाणारे अल्पसंख्य असावेत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
!
अतिशय धाडसी विधान, इतकेच निरीक्षण नोंदवून गप्प बसतो.
प्रत्येकच मुद्द्यावर लिहिता
प्रत्येकच मुद्द्यावर लिहिता येईल पण तुम्ही म्हणता ते सहाजिक आहे असे वाटते. उदाहरणार्थ हे बघु
हे पुरूषांना वाटणे साहजिक आहे कारण त्यांच्या सण साजरे करण्यामध्ये येणार्या गोष्टीत त्याला स्वतःला किती कष्ट करावे लागतात? त्या 'साजरे' होण्यामागची उस्तवार, पदार्द बनवणे, दरम्यान पोरांची उस्तवार, इतर रोजची कामे वगैरे बायकांवरच पडते. अशावेळी ब्लॉकमध्ये तेवढे खाजगीपण असल्याने बायकांना जमेल तितके/जमेल तसे काम करता येते किंवा अगदी नवर्यालाही सहभागी होता येते. चाळीत मुळात बाईने छे बाई यंदा "दिवाळीत मला फराळ बनवायला अजिब्बात वेळ नाही" इतके कुजबुजले तरी ते चाळ्भर होणार! त्यात त्या घाणीत वाळवणं वगैरे करण्याच्या पाकृ असतील तर जागा शोधणे नाहितर गच्चीसाठी भांडणे वगैरेत पुरूष सहभागी व्हायला घरीच नाही (ते नाक्यावर गप्पा झोडत नैतर चौकात क्यारम खेळात असणार).
पुरूषांच्या दृष्टीने सण साजरे म्हणजे गप्पांना भरपूर मित्रपरिवार, रात्र-रात्र गफ्फा हाकणे, पत्ते, 'बसणे', भरपूर घरांतून त्या त्या सणवाराचे खायला मिळणे इत्यादी. त्याला काय झालंय चाळीतला सण न आवडायला!?
अर्थात हे लाऊड थिंकींगने दिलेले निव्वळ जनरलाईज्ड उदाहरण प्रत्येक स्त्री-पुरूष असेच असतील वगैरे म्हणणे नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कुणीतरी
कुणीतरी 'सांप्रत काळातील पुरुषांची गृह आणी बाह्य कर्मे' अशी एखादी मार्गदर्शिका उपलब्ध करुन दिल्यास आमच्यासारख्या गरीब पुरुषांची कानकोंडे होण्यापासून सुटका होईल. आपण कळत नकळत स्त्रियांवर फारच अत्याचार करतोय असे पदोपदी जाणवल्यामुळे फार दु:ख होते हो !
कल्जी नको. चाळीत पुरुषांवर
कल्जी नको. चाळीत पुरुषांवर 'पुरुषार्थ' दाखवायचेही प्रेशर अधिक असते. चाळीत कितीही आवड असली तरी एखादा पुरुष विणकाम, रोजचे जेवण, भाज्या चिरणे/निवडणे वगैरे करतान दिसला तर टोमणे/त्रास होतोच. शिवाय भांडणे न आवडणारे, क्रिकेट न आवडणारे, बाईक वगैरे न आवडणार्या पुरुषांचे हाल कमी नसावेत. पण अर्थात या तुलनेने कमी फ्रिक्वेन्सीने व तीव्रतेने घडणार्या गोष्टी (त्यात पुरूष घराबाहेर) असल्याने बायकांना अधिक ताप होतो.
---
तसेही माझ्या एका मित्राच्या मते पुरूषांना (फक्त नि फारतर) रात्री बिछान्यापुरता एकांत हवा असतो, एरवी तो 'समाजशील' असणे पसंत करतो त्यामुळे त्याला चाळीचा त्रास होण्याची शक्यता कमीच!
-----
बाकी नकळत स्त्रियांवर अत्याचार करतोय ही जाणीव असणे हे चांगले लक्षण आहे. दरवेळी त्यावर काही उपाय करता येण्यासारखी परिस्थिती असेलच असे नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिवाय
शिवाय मला वाटते चाळीत बायकांवर पिअर प्रेशर अधिक असावे. म्हणजे १) बाप रे, शेजारच्यांच्या करंज्यादेखील झाल्या. आपल्याकडे कशाचाच पत्ता नाही अजून. २) त्यांच्याकडे सात जिन्नस झालेत. आपल्याकडे तीनच. त्यांच्याकडचे ताट मिरवत येणारच. परत करताना मी काय घालू ताटात. ३)बंडूतात्या हॉस्पिटलमध्ये आहेत. अख्खी चाळ जाऊन भेटून आली. आपण अजून इथेच. ४)हेच सगळे बारशी, बाळंतविडा, मयत, सुतकातली जेवण वगैरेची मदत, मयत घरात दिवाळीआधी फराळ पोचवण्यातला पय्ला नम्बर वगैरेसाठी.
म्हणजे "
एकंदरीतच बायका तणावाखाली असतात. आणि चाळीत अधिकच."वाचाळ
चाळ असो वा नवनवीन महाकाय सोसायट्या- हे सर्व कोणत्या प्रक्रियेतून घडतं याची अतिशय बालिश समज या लेखातून दिसते आहे. "आपल्या बदललेल्या परिस्थितीचा मनाशी जरूर अभिमान बाळगावा. आपण कमावलंय, मित्रांनो." असं लेखिका म्हणते, पण "आपण" कोण याचा खोलवर विचार त्यांनी केलेला नाही. त्यामुळं या लेखनात जातवर्गीय उच्चभ्रूपणा एवढ्या उघडपणे दिसत असूनही त्याबद्दल इथं काहीच तक्रार कोणाला करावी वाटत नाही, हे खेदजनक आहे. आम्ही पिशवीतून दूध घेतो, त्यासाठी आम्ही वाट्टेल तेवढे पैसे मोजू- असं म्हणता म्हणता दूध प्लास्टिकची पिशवीच देते, असं समज करून घेतल्यासारखा हा लेख आहे. आम्ही स्टीलच्या वस्तू घ्यायला पैसे मोजतो, मग खाणी कुठेही का होईनात. आमच्या घरात चोवीस तास नळाला पाणी असावं म्हणून आम्ही पैसे मोजतो, मग धरण कुठंही का बांधेनात, असं हे आहे. असो. लेखिका डाव्या चळवळीतही वरवरच्या समजेमुळेच गेली असेल, असं या लेखावरून आणि गेल्या वर्षीच्या आयन रँडवरील लेखावरून वाटलं. त्यामुळे डावी विचारसरणी असो किंवा आयन रँडचं तत्त्वज्ञान असो, सगळंच वरवरचं दिसते आहे. आणि त्या वरवरचेपणाचा अभिमान व अभिनिवेशही आहे. उत्तम! शेवटी आम्ही बुद्धिमान असल्यामुळे वर आहोत, असं याचंही समर्थन पुढच्या दिवाळी अंकात करता येईल!
वास्तव सरळसोटपणे मांडायचं
वास्तव सरळसोटपणे मांडायचं नसतंच मुळी. एक तर ते लाथेने तुडवून दाखवायचं असतं किंवा ते थोर्थोर म्हणून गौरवायचं असतं. छे. असलं मुळमुळीत खरंखुरं वास्तव कधी वास्तव असू शकतं का? जळजळीत, दाहक असतं तेच खरं वास्तव.
किंवा,
मध्यमवर्गीयांचं कसलं आलंय डोंबलाचं वास्तव. ते तर त्यांच्या स्युडोवास्तवात गुंगलेले. यातून बाहेर येतील तो सुदिन.
कित्ती कित्ती मळमळ व्हावी
कित्ती कित्ती मळमळ व्हावी पण..
सदस्यत्व कालावधी पूर्ण ६ दिवसही नसताना गेल्या वर्षीच्या आणि पुढल्या वर्षीच्या लेखाबद्दल अधिकारवाणीने शेरेबाजी केल्याचे पाहून गंमत वाटली.
चळचळ
अर्धवट, सदस्यत्वाचा कालावधी आणि मत देणे यांचा काही अर्थाअर्थी संबंध आहे काय? माझ्या प्रतिक्रियेला तुम्ही सिद्ध केलेत त्याबद्दल धन्यवाद. आदल्या वर्षीचा अंक फक्त सदस्यांनीच वाचणे अपेक्षित होते काय तुम्हाला? तुम्ही पुन्हा इथे अर्धवट किंवा पूर्ण प्रतिसाद दिलात तरी त्यावर मला प्रतिसाद द्यायचा नाही, एवढेच बोलून थांबतो.
तुमच्या निमित्ताने राही यांच्या प्रतिसादावरही प्रतिसाद थोडक्यात नोंदवणे गरजेचे वाटते. माझ्या प्रतिक्रियेत मध्यमवर्गीय अभिव्यक्तीवर शेरेबाजी नव्हती. कर्णिक यांच्या लेखात चौकस दृष्टिकोनाचाच अभाव आहे. बदलांची दिशा, गती, त्यातील आपला सहभाग यांच्याबद्दलची त्यांची समज शंकास्पद वाटली, हे मत आहे. या संदर्भात मकरंद साठे यांची मुलाखत अधिक चिंतनीय वाटली. साठे पुण्यात राहातात व त्यांची जातीय पार्श्वभूमी काय आहे याच्याशी प्रतिक्रियेचा संबंध नाही. साठे यांच्या मुलाखतीत दृष्टिकोन चौकस होता, असे वाटले. (यावर साठे यांचे या संकेतस्थळावरील सदस्यत्व किती दिवसांचे आहे ते काढून प्रत्युत्तर दिले तर तो अर्धवट दृष्टिकोनाचा अजून एक दाखला म्हणावा लागेल).
मला वाटते
मला वाटते हा लेख म्हणजे एक अनुभवकथन आहे. विश्लेषण नाही. लेखन हे नुसते कथन असू शकते, त्यावर भाष्य असण्याची आवश्यकता नाही. (इथे मला श्रामोंच्या 'अशा तशा गोष्टी' आठवताहेत. निव्वळ कथन. कोणतेही भाष्य नाही. निष्कर्ष वाचकांनी काढायचे किंवा नाही काढायचे.) त्यामुळे चौकस दृष्टिकोन, बदलांची दिशा, गती, त्यातील आपला सहभाग वगैरे गोष्टी नसल्यामुळे कथन अपुरे राहिले आहे असे (जाणवत) नाही.
चाळीतले/झोपडीतले वास्तव्य ही त्या काळातली अपरिहार्यता असली तरी वास्तव ते वास्तवच ना.
शेवटचा परिच्छेद आवश्यक नव्हता असे मला वाटते. त्याविनाही लेख परिपूर्ण वाटला असता.
वाटणे
राही, तुमच्या वाटण्याचा आदर ठेवून काही गोष्टी नमूद करण्याचा प्रयत्न करतो.
श्रामोंच्या एवढी तटस्थता वरील लेखात नाही, असे मला वाटते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे "निव्वळ कथन" आहे, त्यात "कोणतेही भाष्य नाही", "विश्लेषण नाही" असे वाटत नाही. याची दोन उदाहरणे देतो.
चाळीबद्दलचे आपले मत देताना नीरा आडारकरांच्या पुस्तकाचा संदर्भ एवढ्या उथळपणे देण्याची काहीच गरज नव्हती. हे कुुठले पुस्तक? आडारकरांनी काय हेतूने लिहिले? तो हेतू यांना अप्रिय असेल, तर का? हे पुस्तक इंग्रजी आहे का मराठी? त्याचा वाचकवर्ग कोण? त्यांच्या पुस्तकामुळे "आमच्या चाळीत" असे प्रेमाने उच्चारायला "खासच जास्त महत्त्व" आले काय? असे अनेक प्रश्न त्यातून उत्पन्न होतात. या प्रश्नांची उत्तरे शोधली तर लेखिकेच्या दृष्टिकोनाची मर्यादा दिसते, असे मला वाटते.
"प्रत्येकाचा आनंद वेगळा. आणि प्रत्येकाला तो शोधायचा हक्क आहे", हा मुख्य मुद्दा आहे. तो मान्य करू. पण हा मुद्दा नकारात्मकपणे सिद्ध करण्यासाठी महामानवांच्या कौतुकाची टिंगल करण्याची गरज काय? शिवाय सामाजिक जाणीव ठेवून सारा पैसा कुठे द्यायची अपेक्षा लेखिकेकडून कोणी केली आहे? आपला आनंद सिद्ध करण्यासाठी हा शेरा मारण्याची गरज काय? या प्रश्नांची उत्तरे शोधली तर लेखिकेच्या विधानांमध्ये संकुचित अर्थाने उच्चभ्रू तुच्छतावाद दिसतो.
हे अवतरण लेखिकेच्या दृष्टिकोनाची मर्यादा खासच दाखवून देते. "आपल्याला मिळालेल्या संधी" या मुद्द्याावर इथे काही बोलणे योग्य होणार नाही. परंतु मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन लेखिकेने केली ती प्रगती त्यांनी मिरवणेही समजून घेता येईल, पण "संधी" मिळण्यासाठी आपले "सामाजिक स्थान" हा मुद्दा महत्त्वाचा असतो, असे मला वाटते. हा वेगळा आणि वादग्रस्त विषय आहे. त्या संदर्भात हृषिकेश यांचा प्रतिसाद पाहावा.
माझ्या आधीच्या प्रतिसादावरील प्रतिसादात तुम्ही "एक तर ते लाथेने तुडवून दाखवायचं असतं किंवा ते थोर्थोर म्हणून गौरवायचं असतं. छे. असलं मुळमुळीत खरंखुरं वास्तव कधी वास्तव असू शकतं का?" असे म्हटले आहे. माझे मत दृष्टिकोनाबद्दल होते, तपशिलाबद्दल नाही. असो.
चाळ असो वा नवनवीन महाकाय
या संपूर्ण परिच्छेदाचा गाभा हा आहे की - धागाकर्तीला ज्या विषयाची जाण असायला हवी त्या विषयांची जाण खोलवर नसून वरवरची आहे. म्हंजे सुपरफिशिअॅलिटी हा तुमचा मुख्य मुद्दा आहे.
तुम्हास जर त्या विषयांची खोलवर जाण जर असेल तर तुम्ही सांगा. कोणते तपशीलवार मुद्दे लेखिकेने मांडायला हवे होते ? त्याचे मायने काय असायला हवे होते ? तपशीलाचे मुद्दे हे पृथक नसतात. ते एकमेकांशी नातं राखून असतात. काही मुद्दे इतर मुद्द्यांशी बळकट नातं राखून असतात व काही मुद्दे नाजुक नात्याने बांधलेले असतात. त्यामुळे तुम्ही मांडलंत तर त्यांची गहनता आम्हासही समजेल व लेखिकेसही.
मला असं म्हणायचंय की - धागाकर्ती लेखिकेने जे मांडलंय त्यावर चर्चा करण्यासाठीच हे फोरम आहे. तेव्हा तुमचे तपशीलवार मुद्दे व त्यांचे खोलवर वर्णन जरूर मांडा.
दुसरं म्हंजे लेखिका अनुभवी लेखिका आहे हे तुम्हास माहीती आहे असा माझा समज आहे. अनुभवी लेखिकेस हे माहीती असते की तिच्या लेखनावर साधारण कोणत्या प्रकारची टीका होऊ शकते. त्यामुळे त्यातील काही टीकेस उत्तर देण्याची लेखिकेची तयारी सुद्धा असू शकते पण लेख अति लांबलचक होऊ नये म्हणून लेखिकेकडून कात्री लावण्यात येते. त्यामुळे तुमच्या आक्षेपांना असलेली उत्तरे त्या कात्री लावण्यामुळे वगळली गेलेली असू शकतात. याकडे ही लक्ष द्या.
------
चाळ असो वा नवनवीन महाकाय सोसायट्या- हे सर्व कोणत्या प्रक्रियेतून घडतं याची अतिशय बालिश समज या लेखातून दिसते आहे.
बालीश नसलेली व परिपक्व असलेली समज म्हंजे नेमके काय हे जाणून घ्यायची इच्छा आहे.
उत्तरं
मी माझी जाण दाखवण्याचा काही मुद्दा इथे गैरलागू आहे. लेखातील तपशीलांपेक्षा त्यामागील दृष्टीकोनाबद्दल माझे मतभेद आहेत. ते मी माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहिले आहेत.
लेखिका अनुभवी असेल, म्हणून त्यांच्याबद्दल तुम्ही बरेच अंदाज बांधलेले आहेत. टीकेला उत्तर देण्याची तयारी, "आक्षेपांना असलेली उत्तरे त्या कात्री लावण्यामुळे वगळली गेलेली असू शकतात"- यावर मला काहीच बोलायचे नाही. लेखिकेने मनात काय विचार केला असेल, त्यावर आपण अंदाज बांधून काही हाती लागेल असे मला वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर शुभेच्छा.
"बालीश नसलेली व परिपक्व असलेली समज म्हंजे नेमके काय हे जाणून घ्यायची इच्छा आहे." मलाही हे जाणून घ्यायची इच्छा आहे, म्हणून मी मकरंद साठे यांच्या मुलाखतीचे उदाहरण दिले. साठे यांची समाज परिपक्व असल्याचे वाचक म्हणून जाणवले. इथे असे म्हणताना स्वत:ची जाण दाखवायचा मुद्दा नसून, लेखकाच्या दृष्टीकोनाबद्दलचे हे एक मत आहे. एखाद्या चित्रपटाबद्दल आपण काही मत दिले म्हणजे लगेच चित्रपट बनवून दाखवा असे म्हणण्याची गरज नसते. त्यामुळे यां लेखाच्या विषयाबद्दलची माझी जाण हा आपल्या चर्चेचा विषय होऊ शकत नाहे. लेखाच्या विषयाबद्दल परिपक्व जाण नीरा आराडकर यांच्या पुस्तकात आहे, ज्यांच्यावर लेखिकेने अप्रत्यक्ष शेरा मारला आहे.
वरच्या एका प्रतिसादात तर माझ्या सदस्यत्व कालावधीवरून माझी "मळमळ" ध्धीकारली आहे. हाच वरवरच्या दृष्टिकोनाचा मुद्दा माझ्या प्रतिसादामध्ये उल्लेखलेला आहे.
म्हणून मी मकरंद साठे यांच्या
मकरंद साठे यांची समज परिपक्व आहे या निष्कर्षाप्रत तुम्ही कसे आलात ते सांगा. तुमच्या दृष्टीने मत व निष्कर्ष या दोन्हीत खूप भिन्नता असेल तरी ठीक आहे. मकरंदरावांनी उल्लेखलेल्या व वर्णिलेल्या कोणत्या बाबी/तपशील परिपक्वतेच्या निर्देशक आहेत ?
तुमचे प्रश्न
मी माझ्या प्रतिसादांमध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यातले तुम्हाला सोईचे वाटतील असे मुद्दे उचलून त्यावर तुम्ही एखादा प्रश्न तयार करता. मला त्या प्रश्नांना उत्तरे देण्यात रस नाही. माझे मुद्दे माझ्या समजेनुसार माझ्या प्रतिसादांमध्ये स्पष्ट केले आहेत. यावरही तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की, 'स्पष्ट केले आहेत' म्हणजे कसे ते दाखवा? अशा प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यात मला तरी रस नाही. कर्णिक यांच्या लेखाच्या संदर्भात आक्षेप होते ते मी नोंदवले, त्या संदर्भात आडारकरांच्या पुस्तकाचाही उल्लेख केला. लेखातील मला आक्षेपार्ह वाटलेली वाक्ये इथे उल्लेखित केली. त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही आणि पुन्हा वेगळेच वाक्य तोडून त्यातून एक प्रश्न उपस्थित करता. असे प्रश्न उपस्थित करायचा तुम्हाला अधिकार आहे. पण मला अशा सोईस्कर प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात रस वाटत नाही.
चाळीत रहायची कधी वेळ आली नाही
चाळीत रहायची कधी वेळ आली नाही पण मी फारशी समूहप्रिय वैगेरे नसल्याने चाळीची वर्णनं वाचूनही न्यूनगंड किंवा आपण हे मिस केलं वैगेरे कधी वाटलं नव्हता. माझं लहानपण चाळीत गेलं असतं तर माझ्या भावना या लेखाच्या जवळपास जाणार्^या असत्या. थोड्क्यात लेख आवडला.
अभिप्राय (अर्थात, 'दावू गाउनि आमुच्याच कविता...')
उत्कृष्ट लेख ! जमल्यास मुकुंद टाकसाळ्यांची 'पु.ल. 'बटाटा अपार्टमेन्टस'मध्ये' ही कथा वाचा. तुम्हाला आवडेल. ('टाकसाळीतील नाणी' या संग्रहात ती आहे.)
........
(कोणीतरी 'माहितीपूर्ण' द्या रे!)
अगदी हीच कथा
टाकसाळ्यांचीच कथा मलाही आवडली होती. पुलंची झकास रेवडी उडवली आहे. मेडिटेशन सेंटर, बो डेरेक वगैरे संदर्भही मस्त. मात्र कथेचे नाव आठवत नव्हते. (टाकसाळीतील नाणी किंवा गंमतजंमत या दोहोंपैकी एका पुस्तकात आहे हे आठवले होते).
अमुच्याच कविता? वर चेपुवरच्या
अमुच्याच कविता?
वर चेपुवरच्या प्रतिक्रियांमध्ये खुद्द मुकुंद टांकसाळ्यांचीच प्रतिक्रिया आहे. त्यांनीही हीच कथा सुचवली आहे.
कहीं नबा मुटां तो नहीं?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
चाळीचे अनुभव वाचणे उवा मारत
चाळीचे अनुभव वाचणे उवा मारत बसलेल्यांकडे बघण्यापेक्षाही वाइट या विचाराने चाळीत उशीरा आलो.आस्वली वाचल्यावरही हे हिचंच लेखन समजलं तरी चाळ नकोच वाटते.कांद्याची असो वा बटाट्याची.प्रतिसादही सगळे वाचले नाहीत.
लहानपणी काही चाळकय्रांकडे जात असे त्यामुळे हे सर्व पाहिले आहे.
प्राइवसीची ऐशीतैशी हे खरंच.
चाळ - बटाट्याची , ह्यांची , त्यांची , माझी …
हा लेख वाचून माझ्या अनेक अनुभवांना उजाळा मिळाला. परंतु मी चाळीत कधीच राहिलो नाही , वाड्यात राहिलो, आणि अस्वच्छता , भुरट्या चोऱ्या ( उदा : संडासातील नळ चोरणे ) अशा गोष्टींनी फार वैताग आणि उबग यायचा. (या घटकांमुळे अनेक मुलांचं बालपण (आजही )आपण कसे खराब करून टाकतो आहोत याचं काही भान अशा अनुभव-कथनाच्या निमित्ताने आला तरी पुष्कळ!!)
परंतु दुसरा एक फार महत्वाचा पैलू माझ्या वाड्याच्या अनुभवात आहे , तो म्हणजे अनेक लोकांमधील परस्पर सख्याचा, सोबत सणवार आनंदाने साजरे करण्याचा आणि एकमेकांना सहृदयतेने मदत करण्याचा.
आता एकीकडे 'बटाट्याची चाळ' आहे , ही चाळ वास्तववादी अनुभवाचं फार सुरेख पुलीय फिक्शन आहे आणि एकीकडे हे 'गचाळ वस्तीचे' अत्यंत वास्तववादी असे प्रसंगी खटकणारे असे वर्णन आहे तर या अनुभवांच्या विशाल पटाची आणि त्यातल्या विविध छटांची ओळख लेखकांनी करून द्यायलाच हवी आणि वाचकांनी करून घ्यायला हवी ( चाळी आणि वाडे अजून किती वर्षं राहतील माहित नाही).
Observer is the observed
सत्य स्थिती पासून लांब गेलेला लेख
स्वतंत्र लढा,दोन तीन युद्ध ,फाळणी,नवीनच मिळालेली राज्य व्यवस्था.
एकंदरीत विचित्र स्थिती.
अस्थिर वातावरणा मधून नुकतेच स्थिर स्थिती कडे प्रवास चालू होता.
त्या मुळे गरिबी.
शिक्षण नसणे.
ही स्थिती .
पण आताची पिढी जास्त पैसे कमावतो म्हणजे ती जास्त कर्तुत्व वान आहे असे नाही
आता देशात स्थिर वातावरण आहे ..
चाळीत एकोपा होता . अडी अडचणी ल लोक एकत्र येत जिव्हाळा होता.
फ्लॅट system तेव्हा नुकतीच सुरू झाली होती..
चाळ सोडा.
झोपपट्टीतील जीवन अजून बिकट होते.
पण झोपड्या बांधणारे दूर दृष्टी ची लोक होती
किती तरी एकर मध्ये पसरलेले तबेले,किती तरी एकर v सरकारी जमिनी वर उभ्या राहिलेल्या झोपड्या.
आज त्यांच्या कडे च मुंबई मध्ये जास्त फ्लॅट आणि जागा आहेत.
नाक मुरडणारे माध्यम वर्गीय नोकरी पेशा वाल्या लोकांकडे कर्ज काढून घेतलेले एकाध च घर आहे इमारतीत.
लेख आवडला.
लेख आवडला.