चाळ नावाची गचाळ वस्ती
लेखिका - मुग्धा कर्णिक
खोताची वाडी. माझ्या जन्मापासून ते वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत माझं बालपण, किशोरवय, तारुण्य खोताच्या वाडीत गेलं. खोताच्या वाडीतल्या सुंदरशा, हेरिटेज दर्जा लाभलेल्या, पोर्तुगीज शैलीतल्या लाकडी घरांमुळे अनेकांना याचं अप्रूप वाटणं स्वाभाविकच आहे.
त्या सुंदर घरांकडे असोशीने पाहतच मी वाडीतले रस्ते तुडवलेत. त्यांचं सौंदर्य, नेटकेपणा, कुंड्यांतून झाडं लावणं, वर्षा-दोन वर्षाला सुंदर रंग काढणं हे सारं मनात फार भरत असे. पण खोताच्या वाडीचा हाच भाग खरा मानून बाकी सारं जाजमाखाली लोटूनही चालायचं नाही. याच खोताच्या वाडीत अनेक गदळ रूपाच्या, जुनाट झालेल्या चाळी होत्या. निम्न मध्यमवर्गातल्या कुटुंबांनी व्यापलेल्या या चाळींत सुसंस्कृत-असंस्कृताची सरमिसळ होती. सर्वांची मुलं शाळेत जाऊ लागली होती. पण काही कुटुंबं अभ्यास-वाचनापासून अगदी दूर. तर काही अगदी बेताची परिस्थिती असूनही वाचन-व्यासंग वाढवणारी.
एकीकडे खोताच्या वाडीतली सुंदरशी टुमदार घरं आपली प्रायव्हसी जपत जगणं सुंदर करू शकणारी. आणि दुसरीकडे ओसांडून वाहणाऱ्या कचऱ्याच्या बादल्या, खिडकीतून थेट गटारांत ओतला जाणारा खरकटवाडा, कॉमन संडांसांतली अस्वच्छता, दुर्गंधी... अशा वातावरणात, खुराड्यासारख्या एकेका खोलीच्या घरात जगण्याचा पसारा मांडलेली चाळींतली घरं...
लेखाची सुरुवात वाचून संपन्न वारशाच्या खोताच्या वाडीबद्दल वाचायला मिळणार असं वाटलेल्यांनी पुढे वाचूच नये. कारण आता मी लिहिणार आहे, ते मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या खोताच्या वाडीतल्या चाळीबद्दल. सभोवार सुंदर-प्रसन्न असेल; पण तुम्ही जिथे राहता ती जागा खातेऱ्यातली असेल, तर त्या सुंदर सभोवाराच्या कौतुकात असूयेचेच रंग मिसळतात असं माझं होत असे. आणि त्या असूयेचं कारण आता या लेखातून मांडल्यासारखं होईल.
प्रायव्हसी या शब्दाला मराठीत किंवा हिंदीतही अचूक, अर्थवाही प्रतिशब्दच नाही. गोपनीयता, एकांतता वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत. पण प्रायव्हसी नाहीच. आपण तसे जरा प्रायव्हसीकडे फार लक्ष नसणारेच लोक. सांस्कृतिकदृष्ट्या की काय कोण जाणे.
‘आमच्या चाळीत’ हे शब्द भलेभले लोक हल्ली फार प्रेमाने उच्चारत असतात किंवा लिहीतही असतात. नीरा आडारकरांनी मुंबईच्या चाळींवर लिहिल्यानंतर त्याला खासच जास्त महत्त्व आलंय. पुलंची बटाट्याची चाळ निदान चाळीचे गुण-अवगुण सगळेच हसण्यावारी नेत दाखवून तरी देत होती. आता त्या चाळ नावाच्या वस्तीला सामाजिक भान ठेवून हसावं लागेल.
तर आमच्या चाळीत ‘प्रायव्हसी म्हणजे काय?’ असा प्रश्न कुण्णालाही, म्हणजे अगदी कुण्णालाही, पडला असता. तो शब्द माहीत नव्हता आणि त्याचा अर्थ कुणी सांगितला असता तरीही कळला नसता, अशी परिस्थिती होती. लहानपणापासून चाळवळण लागत गेलं की, त्या शब्दाशी कर्तव्यही राहणार नाही अशीच सगळी सोय. कोणतीच गोष्ट कुणापासून लपून राहत नाही. एखादी गोष्ट कुणाला न कळू देण्याचा प्रयत्न पार हास्यास्पद ठरणार म्हणजे ठरणारच. कुणाला काय होतंय, कुणाचं काय जमतंय, दुखतंय, बरं होतंय... सारं काही चाळजाहीर. त्याचं काही फारसं वाटायचंही नाही.
...आणि तरीही मला माझा वेगळा अवकाश हवा असायचा. मला प्रायव्हसी हवी असायची. शब्द माहीत नव्हता तरीही.
चाळीतले बरेचसे लोक मला उद्वेगच आणायचे. चारपाच लोक सोडले तर ते सारे मला बेक्कार वाटायचे हे सत्य आहे. सामान्य माणसांचं उदात्तीकरण जोरजोरात चालू असतं, तेव्हा मला माझ्या चाळीतली, आसपासच्या किंवा माहितीतल्या दहावीस चाळींतली सामान्य माणसं आठवतात. आणि त्या उदात्तीकरणातली ढोंगबाजी सहजच कळून जाते.
चाळींत राहणे हा अजिबात सुखद अनुभव नव्हता. जन्म तिथे झाला म्हणून, परवडत नाही म्हणून, पुढचा विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे लांब जाऊन बरी जागा घेतली नाही म्हणून, तिथे माणसं राहतात असं मला वाटायचं. ते ठीक. पण चाळ हे काहीतरी महान वसतिस्थान आहे म्हणून तिथे राहायचं असतं, हे बुलशिट. (बुलशिटलाही चपखल प्रतिशब्द नाही बरं.)
संडास, कचरा, उवा, थुंकणं, तंबाखूची मशेरी भाजणं, वगैरे घाणेरडेपणाने माझं चाळीतलं बालपण पार विटवून टाकलं होतं. मी कधीच असं म्हणून शकत नाही की लहानपण दे गा देवा. कारण माझं बालपण एका घाणेरड्या लोकांनी भरलेल्या गलिच्छ चाळीत गेलं.
आमच्या चाळीतली एक बाई आपल्या तीन-चार पोरींच्या केसातल्या उवा जेव्हा कधी काढायला बसायची... एक-दोन तास हा कार्यक्रम चाले. तिच्या बाजूला तिची शेजारीण मैत्रीण बसे. कुजबुजत्या आवाजात इकडतिकडच्या भानगडींची चावून चावून चर्चा करता करता उवा मारल्या जात.
ते दृश्य पाहून मला कोरड्या ओकाऱ्यांचे हमके येत राहायचे. पण त्या दोघी, आणि त्यांच्या समोर बसलेल्या पोरी, सुखाने गप्पा मारत फिदफिदत असत. तिथे एक टीप ठेवलेलं असे - म्हणजे काय विचारा - पाण्याचं पिंप म्हणजे टीप. सापडलेल्या उवा ती या टिपाच्या लोखंडी झाकणावर टचाटच मारत असे. किंवा चाळीच्या मधल्या चौकाचा एक जुनाट लाकडी कठडा होता त्यावरही त्या उवांचा खचाखच मृत्यू घडे. त्यावर पडलेले उवांचे मृतदेह साफ करणं वगैरेची काही गरजच नव्हती हे तिला चांगलं माहीत होतं. गेल्या कित्येक वर्षांचे उवांचे जीवाश्म त्या लाकडाशी तद्रूप झालेले असतील. एकदा तिला ’तिथे उवा मारू नका किंवा ते स्वच्छ तरी करा’ असं सांगितल्यावर तिला केवढातरी फणकारा आलेला. कुणीही थोड्याशा स्वच्छतेची अपेक्षा केली की ‘एवडं हाय तर ब्लाकमदे जा की ऱ्हायला…’ हा डायलॉग पडायचाच. म्हणजे उदाहरणार्थ, कॉमन संडासांच्या समोरच्या भागात एक चौक होता. तिथे पाण्याचा नळ होता. काही पाण्याची पिंपं भरून ठेवलेली असायची. तिथं शिरण्याच्या दारातच एक म्हातारी मुतायला बसायची. तिला पाणी टाकायला सांगितलं किंवा ‘इथे नको, जरा पुढे बसा’ म्हणून सांगितलं की ती हा डायलॉग टाकणार. संडासात पुरेसं पाणी टाकलं नाही म्हणून कुणी बोललं की हा डायलॉग ठरलेलाच.
आमची एक म्हातारी सारं काही रिसायकल करण्यात एकदम माहीर होती. ती कोळशाच्या वखारीतून कोळशाची धूळ झाडून गोळा करून आणायची; मग गिरणीतून थोडं पीठ, घरोघरी चाळलेल्या पिठातला कोंडा असं कायकाय जमवायची. मग एक दिवस तो सगळा काला शेणात एकवट करून त्याचे छोटेछोटे गोळे करून ठेवायची. आमची खेळण्याची जेमतेम जागा त्या काल्याने काळी घाण झालेली असायची. स्वतः त्याची साफसफाई करावी असा विचारसुद्धा ती मनात येऊ द्यायची नाही. ‘ब्लाकमध्ये राहायला जा की’ या डायलॉगच्या रिसीव्हिंग एण्डला असलेली माझी आई ती घाण स्वच्छ करायची. आणि ती कधीच स्वतःच्या ब्लॉकमधे राहायला जाऊ शकली नाही…
चाळीच्या मधल्या पॅसेजच्या टोकाला एक खिडकी होती. वरच्या बाजूला दोन लाकडी कवाडं आणि खालच्या बाजूला रॉट आय़र्नचं नक्षीदार ग्रिल. या खिडकीत उभं राहिलं की समोरच्या बाजूच्या ख्रिश्चन वस्तीची देखणी घरं दिसायची. उजवीकडे जरा वाकून पाहिलं की खोताच्या वाडीतला एक सर्वांत जुना आणि देखणा बंगला दिसायचा. खालचा रस्ताही दिसायचा. बरं वाटायचं तिथे उभं राहायला. माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या कातरलेल्या चतकोर आभाळापेक्षा मोठा आभाळाचा तुकडा दिसायचा. थोडं पुढे वाकून डावीकडे पाहिलं की आमच्या शाळेच्या गच्चीवरचा पत्रा दिसायचा. बरं वाटायचं तिथे. पण त्या लोखंडी ग्रिलच्या प्रत्येक नक्षीदार वळणात ढेकणांची लेंढारं असायची. तिला चुकूनही टेकून उभं राहून चालायचं नाही. कधीकधी आई त्यावर ढेकणांचं औषध आणून मारत असे. पण शेजारच्या त्याच रिसायकलवाल्या म्हातारीच्या घरात ढेकणांचं आगरच होतं. त्यामुळे औषधाचा परिणाम जेमतेम पंधरा दिवस टिकत असे. मग आणखी त्या खिडकीच्या लाकडी कवाडांवर लोक आपल्या जुन्याजुन्या गोधड्या वाळत घालत. त्यांचा घामट कुबट वास नकोनको व्हायचा. कुठलं आभाळ पाहताय...
चाळीच्या समोर डावीकडे आणखी एक चाळ होती आणि उजवीकडे आणखी एक. या दोन चाळींच्या मधे एक चिंचोळं गटार होतं. तिथं त्या दोन चाळींतला कचरा टाकला जायचा. भाज्यांचा कचरा, मच्छीची सालं, कोलंबीची सालं, आंबलेलं अन्न, आणि माणसां-कुत्र्यांचं मूत - सारं तिथंच. तिथं उंदीर, घुशी, मांजरं, कुत्री यांच्या गुरगुराटी लढाया चालायच्या. या गटाराचं टोक माझ्या बालपणाच्या वाट्याला आलेल्या एकमेव खिडकीसमोरच यायचं. घरात बंद होऊन बसल्यावर कधी चुकून त्या खिडकीतून बाहेर बघण्यासाठी नाक गजांना टेकवलं तर समोर दिसायचा एखादा मुतायला उभा राहिलेला पाठमोरा माणूस. हे सारखं चालूच असायचं... कधीकाळी वाऱ्याची झुळूक सुटलीच तर ती या सर्व घाणीचा मजमुआ घेऊन घरात शिरायची. नको तो वारा, असं करून जायची.
ही इमारत जेव्हा अगदीच खिळखिळी आणि धोकादायक झाली, तेव्हा तिथल्या रहिवाशांना बाहेर काढून ती रीतसर पाडण्यात आली. तिथं राहणाऱ्या आमच्या लाडक्या म्हात्रेकाकू सोडून जाणार म्हणून खूप दुःख झालेलं. पण जेव्हा ती इमारत पाडली आणि समोरचं आभाळ अचानक मोकळं झालं, तेव्हा मला झालेला आनंद चोरून ठेवूनही लपत नव्हता. जागा असती तर खरोखरची नाचलेच असते मी तेव्हा. आणि शिवाय गटारात टाकली जाणारी घाणही बरीच कमी झाली. कितीकिती फायदे होते…
या आमच्या चाळीत खाली राहणारं एक कुटुंब होतं. त्यांची बारा बाय बाराची खोली आणि त्यात तब्बल एकोणीस माणसं जगत होती. भांडणतंडण, शिव्यागाळी, मारामाऱ्या सारं चालायचं त्यांचं आपसांत. एका आईबापांपासून जन्मलेली एकूण नऊ मुलं, त्यांच्या बायका, त्यांची पोरं. त्यातला एक अव्वल बेवडा. तो रोज रात्री अकरा वाजता दे धूम दारू पिऊन यायचा आणि बायकोला मारमार मारायचा. त्यांची तीन लहान मुलं सोबत रडत असायची. हे सगळं चाळीच्या कॉमन चौकात चालायचं. पार दुसऱ्या मजल्यापासून लोक दडदडत खाली यायचे आणि गोंद्या बायकोला कसा मारतोय ते जिन्यांवरून ओठंगून पाहत रहायचे. पण कुणीही तिला सोडवायला जात नसे. तिला भरपूर मारून तो थकला की शिव्या घालतघालत तिथंच आडवा व्हायचा. आणि लोकं म्हणायची, “चला, झालं. चला आपणही आपापल्या घरी झोपायला.” त्यांच्या घरातली सगळी पुरुषमाणसं बाहेरच झोपायची. जसा असेल तसा ओढत त्या बेवड्याला त्याचे भाऊ एका कडेला टाकत आणि अंथरुणं टाकून आडवे होत. हा जवळपास दिवसाआडचा तमाशा असे. आणि जवळपास सारे शेजारी ते चवीने पाहत. त्यांच्या घरातलेही ‘आपण नाय बा नवराबायकोच्या भांडणात पडत’ म्हणून मुकाट उभे असायचे. त्याचा मुलगा मोठा झाला, तेव्हा कुठे त्याने आपल्या त्या अपघाती बापाचा हात पिरगाळून थांबवला. पण त्यानंतर दोनेक वर्षांतच तो बेवडा मेलाच. आणि बायको जराशी सुखाने जगू लागली. माझ्या लक्षात आहेत, ते चवीने मारहाण पाहणारे चाळकरी. आणि तो बेवडा मेल्यानंतर तिच्या अंगावर थोडं मांस चढल्यावर “वा! आता मज्याय बुवा!” असं तिच्याबद्दल बोलणारेही.
या चाळीत ‘कोण कुणाला लागू आहे’ वगैरे चर्चा दबक्या आवाजात चवीने होत असत. तरुण किंवा किशोरवयीन पोरापोरींची लफडी चालू असत, जुनी बंद होत असत, नवी होत असत. कुणाचीतरी रिकामी खोली मिळवून सेक्स चालत असे. पोटंही पाडली जात. मोठ्या वयाच्या बाया नि बाप्येही लफडी करत आपसांत. प्रायव्हसी नसलेल्या त्या बुजबुजत्या, कुजबुजत्या जगात सारं काही प्रायव्हेट उघडपणे चालायचं.
प्रायव्हेट मत्सर उघडपणे.
प्रायव्हेट प्रेम उघडपणे.
बरंच कायकाय प्रायव्हेट उघड.
माझ्या लक्षात आहेत, मला चांगले मार्क्स मिळाले की कसेबसे ‘छान’ म्हणणारे किंवा ‘आमचीपण पोरगी पास झाली हां तुझ्याइतका अभ्यास न करता’ असंही तुच्छतेने म्हणणारे शेजारी. माझ्या चश्म्यावर, माझ्या अपरोक्ष केल्या जाणाऱ्या कमेन्ट्स लक्षात आहेत. ‘काय मोठी जगावेगळी आहे माहीतीये’, ‘आले स्कॉलर’, ‘ए तिला काय बोलू नकोस हां, ती क्काय बाबा स्कॉलर आहे.’... अशा वाक्यांनी मला भोकं नाही पडली, पण त्या माणसांचं स्वरूप समजून घ्यायला मदत झाली.
आम्हांला घराचं दार बहुतेक वेळा बंद ठेवणं भाग पडायचं. कारण मधल्या चिंचोळ्या पॅसेजमधून सतत चाळीतल्यांची, त्यांच्याकडे आलेल्या लोकांची ये-जा चाललेली असायची. दार उघडं सापडलं की येणार्या-जाणार्यांतले बहुतेक सारे अकारण काहीतरी बोलत थांबायचे किंवा घरात काय चाललंय ते निरखत, नजरेने टिपत चौकश्या करत राहायचे. कुणाच्याही घरात वाद झाला तर सारे शेजारी आपापल्या दारात उभे राहून कानोसा घेत सारं काही ऐकत राहायचे. हीच फुकटची करमणूक होती त्यांची.
अशा वेळी मी कळत्या वयातली सारी वर्षं... सारे दिवस सकाळी सातआठ वाजता घर सोडायचं आणि रात्री आठनऊ वाजता परत यायचं असा शिरस्ता ठेवला होता. शाळेत असेपर्यंत अर्धा दिवस शाळेत जायचा. एकदोन तास असेच खेळण्यात. मग घरी आलं की चाळीचा असंगसंग व्हायचा. कॉलेजमधे जायला लागल्यानंतर मग प्रायव्हसीची कन्सेप्ट डोक्यात मुरू लागली. बारावीत कॉलेजमधे गेल्यानंतर काही निमित्तांनी इतर मित्रमैत्रिणींची मोठमोठी घरं पाहिली. मध्यमवर्गीय मैत्रिणींची निदान दोन खोल्यांची घर पाहिली, तरी मला वाटे - आपल्या घराला आणखी एकच छोटी जरी खोली असती तरी किती बरं वाटलं असतं. थोडीतरी प्रायव्हसी मिळाली असती... होय, तोवर त्या शब्दाचं भान टोकदार झालेलं.
मी एल्फिन्स्टनमधे असताना आणि नंतर विद्यापीठात असतानाही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा तिथेच असायचे. लेक्चर्स झाली की लायब्ररीत. शिवाय डाव्या विद्यार्थी चळवळीत बराच वेळ जायचा. शहरभर फिरत, चर्चाविचर्चा करत, प्रदर्शनं पाहत, सिनेमा नाटकं पाहत, कदाचित नकळतपणे मी चाळीपासून लांब राहत होते. एक वर्षभर तर आस्वलीला राहून एक वेगळाच अवकाश अनुभवला.
अगदी खाजगीपणे माझं मन वाढतविस्तारत जात होतं. त्या चाळीला कळलंच नाही मी तिच्या अवकाशाची कधी उरले नाही ते.
काही चाळींनी आपल्या छपरांखाली अनेकांना आनंद दिला असेलही. मी नाकारत नाही. पण तरीही आज मी चाळ या एका तुलनात्मकदृष्ट्या गरिबीतल्या निवासी गरजेचं उदात्तीकरण करू शकत नाही. तिच्या विषण्ण छायेचा काळवंडलेपणा माझ्या मनावरून धुऊन काढला आहे मी कायमचा.
त्या विषण्ण छायेला खोताच्या वाडीच्या या वेगळ्या सौंदर्याचा साज होता हा एक सुंदरसा योग. पण त्या सौंदर्याच्या कुशीत राहूनही काही लोक, काही परिसर आपला दळभद्रीपणा सोडू इच्छितच नव्हते हे मनात अजूनही खुपतं.
हे झाले, मी तेव्हा तिथे राहत असतानाचे अनुभव. लग्न झाल्यानंतर मी तिथे जात राहिले, कारण आईबाबा तिथेच होते. नवरा-मुलगी-मुलगा यांना घेऊन त्या दहाबायबाराच्या खोलीत राहण्याची धडपड कधी केलीच नाही. मी आणि मुलं क्वचित कधीतरी एखादी रात्र तिथे राहिलोय. अगदी चारपाच वर्षांची होईपर्यंत मुलं तिथे आजीआजोबांच्या प्रेमाने राहत असत. नंतर त्यांनाही आपलं मोठं घर आणि हा चिमटलेला अवकाश यांतल्या फरकाशी जुळवून घेता येईना, तेव्हा आईबाबाच आमच्या घरी येऊन राहू लागले. आईबाबा आजारी पडत; तेव्हा त्यांना टॅक्सीत, गाडीत घालून घरी आणण्याची तजवीज करत असू. तत्पूर्वी एखादा दिवस, एखादी रात्र मी तिथे काढत असे.
तोवर चाळीची डागडुजी झाली होती. आणि संडासाच्या दाराभिंतींच्या मधल्या फटींतून झुरळांच्या मुंड्या डोकावण्याचं तरी किमान बंद झालं होतं. नव्या फरशा बसल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे संडासात दिवे लावायला हवेत हे अखेर तिथल्या सर्वांना पटलं होतं आणि तेवढा खर्च सगळे मिळून करू लागले होते.
आज इतक्या वर्षांनंतरही तिथली बरीचशी कुटुंबे तिथेच राहत आहेत. त्यांची पुढली पिढी मात्र चाळ सोडून उपनगरांतील 'सेल्फ-कंटेन्ड' घरांत राहायला गेली. काय शब्द मराठीत रुळला पाहा... टॉयलेट घरातच असलेलं आणि पाणीही घरातच भरता येईल असं घर म्हणजे सेल्फ-कंटेन्ड घर. कॉमन संडासांत रात्रीबेरात्री जाण्याचा अघोरी अनुभव टळला यातच अनेकांचं सुख सामावलं होतं हे मला माहीत आहे.
आता माझ्या पिढीतले जे लोक चाळींमधलं जगणं मागे टाकून आले त्यांच्याबद्दल. एकंदर अभावाची परिस्थिती - अभाव हा इथे सापेक्ष शब्द आहे. खाऊनपिऊन सुखी असलेला मध्यमवर्ग अभावग्रस्त कसा हा प्रश्न येणारच. कारण काही घरांतून अजूनही नित्यनेमाने पोट भरण्याची रोजची मुश्किल असते. पण तुलनेने अभाव होता.
उदाहरणार्थ, आम्हां निम्न मध्यमवर्गीयांच्या मुलांकडे एक गणवेष तोकडा होईपर्यंत किंवा ढुंगणावर विटका दिसू लागेपर्यंत वापरण्याची पद्धत होती; बाहेर घालायचे कपडे नेमकेच तीन-चार असत, समारंभांना जाण्याचे कपडे तेचतेच असत. खाऊ म्हणून, घरात शिजलेले बेगमीचे पदार्थ असले तरच आणि तोच. दुकानांतून गोळ्याबिस्किटं घेणं म्हणजे चैन असे. कॅडबरी वगैरे खाणे, दोन वर्षांतून एखाद्या वेळी, मोठ्ठा बोनस - बाबांना बोनस मिळाला तर... सकाळी नाश्त्यात चहा-बटर-खारी-टोस्ट म्हणजे फारच मौज, नाहीतर रात्रीची शिळी चपाती चहात बुडवून खाणे हे नित्याचं होतं. चप्पलजोड एकच असे. शाळेत पीटी किंवा स्काउट-गाईडसाठी घेतलेले पांढरे वा तपकिरी कॅनव्हासचे जोडे म्हणजे कोण स्मार्ट वाटे. कंपासपेट्या गंजून ठिपके पडेपर्यंत वापरल्या जात. हरवून नुकसान होतं म्हणून आया नव्या पेन्सिलींचे दोन सारखे तुकडे करून एकेक वापरायला देत. फाउंटन पेनांच्या गळक्या सांध्यांतून, लिहित्या बोटांच्या दोन बाजवांना सतत शाई लागलेली असे... दप्तर किंवा अल्युमिनियमची ती छोटी बॅग सर्वांनी निदान चारपाच वर्षं तरी वापरायचीच असे. अनेक मुलं शालेय पुस्तकं सेकंडहँडच घेत. त्यासाठी आधीच्या वर्गातल्या मुलामुलींकडे क्लेम लावलेला असे आणि त्यांच्या आया- रिझल्टच्या दिवशी घरी येऊन ती पुस्तकं घेऊन जात... ट्रिपला कधीतरी एसटीच्या गाडीतून जायचं तर कितीकिती मजा वाटे. आणि डब्यातली पुरीभाजी हे उच्चकोटीचं सुख असे. पावसातले रेनकोट काखांतून फाटले तरी आम्ही खुशाल वापरायचो. किंवा मोडक्या छत्र्यांचंही काही वाटायचं नाही. भिजायचंही काही वाटायचं नाही. पण लागोपाठ भिजलं तर शाळेच्या गणवेषाचे दोनच जोड असल्यामुळे ते वाळायची पंचाइत होऊन आईचा ओरडा खावा लागायचा... वगैरे. चीज-लोणी वगैरे माहीत नव्हतं. आइस्क्रीम वर्षांतून एकदादोनदा. बरीच मुलं रस्त्यावर फिरणाऱ्या गाडीतल्या आइसकॅंडीलाच आइस्क्रीम समजायची.
आणि मग श्री. म. माट्यांच्या ‘दमडी’चा धडा वाचून तिला खोबऱ्याचा तुकडा खाऊन वाटणाऱ्या सुखाने आमचा जीव गदगदून यायचा... मग ‘उपेक्षितांचे अंतरंग’ आख्खंच वाचून काढल्यावर अभाव याला म्हणतात हे शब्दांविना मनात उतरायचं. आमच्या स्वतःच्या परिस्थितीत खरं तर काही अभाव आहे हेसुद्धा तेव्हा तसं कधी जाणवलं नव्हतं.
ते जाणवलं मागे वळून पाहताना. त्या चिवट-चिकट काटकसरीच्या परिस्थितीतून आईवडिलांनी शिकवल्याचं चीज करून, स्वतःच्या अक्कलहुषारीने, जिद्दीने आमच्या पिढीने स्वतःची परिस्थिती बदलली. देशाचं अर्थकारण बदलत गेलं याचे फायदे आम्हांला उत्तरतारुण्यात - तिशीनंतर म्हणजे साधारणतः एकोणीसशेनव्वदच्या अलीकडेपलीकडे - चांगल्या प्रकारे मिळू लागले.
आमच्यापैकी काही बुद्धिवान लोकांना बाहेरचं जग पाहण्याचीही संधी शिक्षणातूनच मिळालेली. तर जे बेतास बात होते, त्यांनाही पदवी घेतल्यानंतर नोकऱ्या वगैरे मिळू शकल्या होत्या. थोडक्यात क्रयशक्ती वाढली होती आणि मिळवलेला पैसा स्वतःवर आणि स्वतःच्या मुलांवर खर्च करावा ही अक्कलही आली होती असं बऱ्याच अंशी दिसू लागलं.
अगदी फुळकवणी वरण आणि संध्याकाळी त्याच वरणाला फोडणी घालून आंबट वरण याच्याशी जेवायची सवय झालेले किंवा थोडे महागातले आवडते पदार्थ महिन्यातून दोनदाच खाण्याची सवय असलेले आम्ही लोक जेवणाखाण्यावर हात सैल सोडू लागलो. कपड्यालत्त्यांवर खर्च करू लागलो. मुलांच्या स्मार्ट-युनिफॉर्म्स, शूज, इतर कपडे, खेळणी यांवर खर्च करताना - हे आपल्याला मिळालं नाही, ते यांना मिळू दे - असा एक भाव नक्कीच असायचा.
आम्ही सारे व्यक्तीकेंद्री झालो. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला जीवनाचा केंद्रबिंदू मानू लागलो. कुटुंबातल्या सर्वांना - मग ते वृद्ध आईवडील असोत वा एकमेक वा मुलं - यांच्यासाठी पैसा खर्च करावा हे भान आलं.
मला आठवतं - माझे बाबा बिचारे लेकीसाठी आपल्या मरणानंतर काही पैसा ठेवायचा म्हणून बरीच काटकसर करायचे. आई माझ्यासाठी किंवा नातवंडांसाठी जरी काही खर्च करू लागली तरी तिला टोकायचे - 'पैसे जरा जपून वापर. थोडे शिल्लक टाकले तर काही बिघडत नाही.' शेवटी त्यांना त्यांच्या बचतीचा सर्वात मोठा चेक मिळालेला सदतीस हजाराचा. त्यांनी तो मला आनंदाने दाखवला आणि म्हणाले, “हे बघ. मला पहिल्यांदाच केवढा मोठा चेक मिळालाय…” किती हिंमतीने मी 'अरे वा, मस्त, पार्टी करू या' वगैरे म्हटलं, ते माझं मला माहीत... कारण तेव्हा माझा महिन्याचा पगार तेवढा होता. नवऱ्याचाही तेवढाच... मला आठवल्या त्या साऱ्या गोष्टी, ज्यांवर ते हे पैसे खर्च करून मी कितीतरी समृद्ध अनुभव घेऊ शकले असते, आईलाही सुखाचे क्षण देऊ शकले असते.
तर हे माझे बाबा इतर अनेकांच्या बाबांसारखेच चंगळवादी अजिबातच नव्हते.
आणि आम्ही चंगळवादी आहोत, असं काही सैद्धान्तिक विचार मांडणारे लोक म्हणत आहेत. फारच छान. आम्ही जगतोय.
होय. आमच्या कॅटेगरीतल्या वर्गातल्या माणसांना घरात छान सजावट आवडते. करमणूक आवडते. छानछान मॉल्समधे जाऊन एखादी वस्तू आवडली तर घेऊन टाकायला छान वाटतं. जग पाहायला आवडतं. चांगलंचुंगलं खाण्यात या वर्गाला कसलाही अपराधगंड नाही. पुस्तकांसाठी सतत लायब्ररीवर अवलंबून न राहता पुस्तकं विकत घेणं, घरातल्या प्रत्येकासाठी किंडल विकत घेणं बिनदिक्कत करणार आम्ही.
(इथे सण-परंपरा पाळण्यासाठी खर्च करणारे आणि सोनेहिरे घेण्यात पैसा घालणारे यांवर मी काहीच भाष्य करू शकत नाही, कारण त्या खर्चाला माझा तात्त्विक विरोध आहे. पण त्यातलंही एक तत्त्व मला मान्य आहे. त्यांच्या कष्टाचा पैसा असेल, तर त्यांनी काहीही करावं त्याचं. त्यांचा फायदा, त्यांचा तोटा.)
हे सगळं सोडून सामाजिक जाणीव ठेवून सारा पैसा त्यासाठी द्यावा असलं काही करणार नाही आम्ही. एक काळ बाजूला सारून इथवर आलोत, त्यात करू थोडी चंगळ. कुणी महामानवांचे दाखले दिले तर कौतुकच आहे त्यांचं. पण तो त्यांचा चॉइस आहे - हा आमचा. त्यांना त्यात आनंद आहे, म्हणून ते त्या वाटेला गेले. सर्वांना ते जमणार नाही. प्रत्येकाचा आनंद वेगळा. आणि प्रत्येकाला तो शोधायचा हक्क आहे.
भ्रष्टाचार करून चंगळ करणारांचा विषय वेगळा आहे.
आपल्याला मिळालेल्या संधीतून पैसा कमावून लोक चंगळ करतील, नाहीतर सारं दान करतील. हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. या वर्गातील अनेक लोक थोडंफार सामाजिक देणं देत राहतात. पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून मग लायक व्यक्तींना मदत करण वेगळं. (त्यात त्याग नाही, असं म्हणतात). त्याग करणं नाकारण्यात काहीही चूक नाही.
चाळींचा त्याग केलेल्या अनेक व्यक्तींनी आपल्या भूतकाळातल्या कळकटपणालाच कायमचा निरोप दिला आहे. आणि अशा प्रकारे धडपडलेल्या माझ्या या सार्या सहप्रवाशांना मानवी आनंदाच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळत राहील.
आणि त्यांनी आपल्या बदललेल्या परिस्थितीचा मनाशी जरूर अभिमान बाळगावा.
आपण कमावलंय, मित्रांनो.