Skip to main content

गोष्ट एका अरभाट 'बिझनेस मॉडेलची'

सन १९९३. देशात उदारीकरणाचं वारं वाहू लागलं होतं. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव ही जोडगोळी देशाला गहाण ठेवत आहे, असा आरोप विरोधक उच्चरवात करत होते. बाहेरच्या उद्योगांसाठी आपले दरवाजे उघडले तर आपल्या लोकांचं काय होईल, असा प्रश्न तावातावाने विचारण्यात येत होता. नवीन आणि जुने असा संघर्ष सर्व क्षेत्रांत चालू होता. या संघर्षाचं चित्रपटसृष्टीमधलं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे, अभिनेता मिथुन चक्रवर्ती होता. त्या वेळी व्यावसायिक आघाडीवर त्याचं काही फारसं बरं चालू नव्हतं. नवीन दमाची ‘खान’ मंडळी तोपर्यंत बस्तान बसवू लागली होती. मिथुनचे चित्रपट एकामागून एक आपटत होते. तेव्हा अडगळीत जाऊ पाहात असलेल्या मिथुनने आपलं बस्तान रम्य हिलस्टेशन असणाऱ्या ‘उटी’ला हलवलं. तिथे त्याने लक्झरी हॉटेल सुरू केलं, त्याच हॉटेलमध्ये बसून मिथुनने एक अचाट ‘बिझनेस मॉडेल’ तयार केलं. आपल्याला चित्रपटात घेऊ इच्छिणाऱ्या निर्मात्यांना त्याने काही अटी टाकल्या. त्यातली सगळ्यात मोठी अट म्हणजे, चित्रपटाचं शूटिंग उटीमध्येच होईल. शूटिंगसाठी येणारं युनिट मिथुनच्या मालकीच्या हॉटेलमध्ये उतरेल. त्या बदल्यात मिथुन निर्मात्यांना सलग बल्क डेट्स देईल. प्री-प्रोडक्शन, शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन हे निर्मितीचे विविध टप्पे पार करून सिनेमा तीन ते चार महिन्यांत हातावेगळा होईल. या वेगामुळे निर्मात्याचं बजेट मर्यादित राहील, हा त्यामागचा मुख्य उद्देश.
बजेट कमी असलं तर परतावा सहज मिळेल, असं त्यामागचं गणित. छोटी शहरं आणि ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा तयार केलेला असल्याने तिथून सहज नफा कमावता येईल, हे चाणाक्ष निर्मात्यांना माहीत होतं. ‘बाकीचे स्टार्स चित्रपट सुरू करण्याची डेट देतात; मी चित्रपट पूर्ण कधी होईल, याची डेट देतो.’ असं मिथुन एका मुलाखतीमध्ये आत्मप्रौढीने बोलला होता. ते अगदीच खोटं नव्हतं. कारकिर्दीच्या उतरणीला लागलेला मिथुन आणि छोटे निर्माते यांच्यासाठी ही ‘विन विन सिच्युएशन’ होती. मिथुनच्या करियरला नवसंजीवनी मिळाली. इतकंच नव्हे, तर १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्षं तो देशामधला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमांनी ‘बी आणि सी क्लास सेंटर’वर चांगलाच धंदा केला. सिंगल स्क्रीन थिएटरच नव्हे तर ओपन थिएटर आणि व्हिडिओ पार्लरमध्ये पण हे चित्रपट चांगले चालले.
या चित्रपटांचा दर्जा काय होता, हे अर्थातच सांगायची गरज नाही. या चित्रपटांमध्ये कुठल्याही वैश्विक जाणिवा झळकत नव्हत्या. चित्रपट माध्यमांची सामाजिक जबाबदारी वगैरे शब्दबंबाळ गोष्टींशी त्यांचा दुरन्वये संबंध नव्हता. आपल्या प्रेक्षकाला काय पाहिजे ते द्यायचं आणि नफा कमवायचा, या निव्वळ व्यावसायिक उद्देशातून हे सिनेमे बनत होते. यातल्या बहुतेक चित्रपटांत मिथुन एक तर प्रामाणिक सरकारी अधिकारी असे किंवा श्रमजीवी वर्गातला (मिथुनचा मोठा चाहतावर्ग यातलाच आहे) असे. सर्व पात्र काळ्या आणि पांढऱ्या रंगात असत. नायिका बहुतेक आखीव, रेखीव आणि भरीव अशी दाक्षिणात्य अभिनेत्री असे. काळी कृत्ये करणाऱ्या खलनायकाचा एकदा नायकाने एकहाती नि:पात केला की, चित्रपटाचं सूप वाजत असे आणि प्रेक्षक पैसे वसूल झाले, या कृतार्थ भावनेने बाहेर पडत असे.
या काळात अनेक दिग्दर्शकांसोबत मिथुनने काम केले, पण त्याची जोडी जमली ती टी. एल. वी. प्रसादशी. या दिग्दर्शकासोबत १९९५ ते २००२ या काळात मिथुनने तब्बल २६ चित्रपटांत काम केलं आहे. कुठल्याही नटाने एकाच दिग्दर्शकासोबत सलग इतकं काम केल्याचं असं उदाहरण विरळाच. टी. एल. वी. प्रसादचा असा दावा आहे की, याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड‌्स’मध्ये झाली आहे. ‘मी जेव्हा एका सिनेमाचं शूटींग करत असतो तेव्हाच पुढचा सिनेमा लिहीत असतो आणि तिसऱ्या सिनेमाच्या संगीतासाठी काम करत असतो.’ हे टी. एल. वी. प्रसादचं विधान त्या वेळेस प्रसिद्ध झालं होतं.
शरद जोशींनी सांगितलेला ‘इंडिया’ आणि ‘भारत’ हा भेद सगळ्याच क्षेत्रांत दिसून येतो. अगदी सिनेमा आणि चित्रपट प्रेक्षकांमध्ये तो असतो. प्रेक्षकांमध्ये ‘मल्टिप्लेक्स प्रेक्षक’ आणि ‘सिंगल स्क्रीन’ प्रेक्षक असे दोन प्रकार आहेत, असे ट्रेड पंडित आणि चित्रपट निर्माते मानतात. आपला ‘पोटेन्शियल’ प्रेक्षक यापैकी कुठला आहे, हे लक्षात घेऊन निर्माते मार्केटिंगची रणनीती आखतात. पण समीक्षक, प्रसारमाध्यमे, पुरस्कार सोहळे, आणि अगदी ज्याचं पूर्ण लोकशाहीकरण झालं आहे, असं मानलं जातं, त्या सोशल मीडियावर पण सिंगल स्क्रीनमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाचा जो सिनेमा आहे, त्याला अनुल्लेखाने मारलं जातं. कसा असतो हा ‘सिंगल स्क्रीन सिनेमा?’ तर त्याचं एक ठरलेलं ‘टेम्पलेट’ आहे. अतिशय मर्यादित बजेट, काही अपवाद वगळता अनोळखी अभिनेते, सुमार संगीत, भडक अंगप्रदर्शन, बटबटीत संवाद, नायकाच्या बहिणीवर बलात्कार करणारा आणि एक टुकार तकिया कलाम तोंडात घोळवणारा खलनायक हे घटक एकत्र केले की, हे ‘टेम्पलेट’ तयार होतं. काही लोक याला ‘बी ग्रेड’ सिनेमा पण म्हणतात. सिनेमा म्हणून याचा दर्जा काय, यावर विवाद असू शकतात; पण जो सिनेमा वर्षानुवर्षं करोडो लोकांचं मनोरंजन करत आहे, त्याची व्यवस्थित नोंद व्हायला नको? हा लेख अशाच एका मिथुनयुगाची नोंद घ्यायचा प्रयत्न आहे, जो ‘लगान’मधला सूत्रधार म्हणतो त्याप्रमाणे, ‘इतिहास के पन्नों में कही खो गया...’

अतिशहाणा Tue, 01/03/2016 - 16:21

टीएलवी प्रसाद हे नाव खूपच प्रिय होतं. पौगंडावस्थेत त्याचा पिच्चर चुकवायचा नाही यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/03/2016 - 21:29

हे बिझनेस मॉडेल माहीत नव्हतं. रंजक माहिती.

मला खरंच प्रश्न आहे. बी ग्रेड सिनेमांना प्रेक्षकवर्ग मोठा आहे वगैरे म्हणतात. यांत स्त्रियांचं प्रमाण किती असतं? ५०% असावं अशीच अपेक्षा नाही; पण मल्टीप्लेक्समध्ये सिनेमे बघणाऱ्यांत स्त्रियांचं प्रमाण जेवढं असतं त्याच्याशी तुलना करता काय दिसत असेल?

विषारी वडापाव Fri, 04/03/2016 - 08:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी जितक पाहिलं आहे त्यावरून तरी स्त्रियांचा प्रतिसाद तुरळक असावा . याची दोन तीन कारण आहेत . एक तर हा सिनेमा 'बी आणि 'सी ' सेंटर वर जोरात चालतो (छोटी शहर आणि ग्रामीण भाग ) जिथे अजून पण स्त्रियांवर बरीच सामाजिक बंधन आहेत . वर या प्रकारचा सिनेमा हा बडजात्या /जोहर टाईप 'पारिवारिक चलचित्र ' नसतो . त्यामुळे बायकांनी काय करावे , काय करू नये , काय पाहावे , काय पाहू नये असले बंधन घालणाऱ्या या समाजात बायका अशा चित्रपटाला जाण्याची शक्यता कमी . कारण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अजून पण परिवाराने चित्रपट कुठला बघायचा वैगेरे निर्णय 'ब्रेड विनर ' पुरुष घेतो . अर्थातच परिस्थिती हळू हळू का होईना बदलत आहे . multiplex शी तुलनाच नको कारण तिथे येणाऱ्या प्रेक्षकांचे सामाजिक dimension वेगळ . असत .

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/03/2016 - 19:40

In reply to by विषारी वडापाव

बी-सी ग्रेड सिनेमे असतात, ते तुफान चालतात; थोडक्यात ही बहुसंख्यांची आवड आहे ही मांडणी होते. शहरी प्रेक्षकांशी तुलना करता ही मांडणी अयोग्य नाही. पण ते पूर्ण चित्रही नाही असं मला वाटतं. बहुसंख्य या संज्ञेमध्ये ग्रामीण, निमशहरी स्त्रिया मोजल्या जातात का, असा माझा प्रश्न आहे. तसं होत नसेल तर त्या बहुसंख्य या शब्दाला फार अर्थ नाही.

(अवांतर - हैद्राबादमध्ये मी काही काळ जाऊन-येऊन राहत होते. तिथे बंजारा हिल्स किंवा नव्याने उभारलेली हाय टेक सिटी या भागांत स्त्री-पुरुष प्रमाण डोळ्यांना जाणवेल इतपत विचित्र नव्हतं; ठाण्या-मुंबईत दिसतं तसंच. पण हाय टेक सिटीपासून चालत जाण्याच्या अंतरावर माधापूर, गच्चीबोली असे, अजून मध्यमवर्गीय न झालेले भाग आहेत. तिथे खालच्या आर्थिक वर्गातले, कष्टकरी लोक बहुसंख्येने दिसतात. पण पुरूषच दिसतात. रस्त्यावर स्त्रिया औषधालाच. शेअर रिक्षांतही स्थानिक स्त्रिया क्वचितच. या भागांतली सिनेमांची पोस्टरं अशीच बी-सी ग्रेड छाप. लिपी वाचता येत नाही, तेलुगु समजत नाही तरीही चित्रं पुरेशी बोलकी दिसतात. अशा सिनेमांना बहुसंख्येची पसंती असं म्हणता येणं कठीण वाटतं.)

मेघना भुस्कुटे Fri, 04/03/2016 - 10:26

या बिझनेस मॉडेलबद्दल ऐकलं होतं.
सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांबद्दलः
मला याबद्दल काहीशा संमिश्र भावना आहेत. मी साधारण दहा वर्षं अलीकडेपर्यंत (आणि काही प्रमाणात अजूनही) सिंगल्स्क्रीन चित्रगृहं चिकार वापरली. दुसरा काही पर्याय नव्हताच. मुंबईतली सिंगल्स्क्रीन चित्रगृहं उत्तम दर्ज्याची आहेत. एसी, प्रेक्षकवर्गाचा चित्रपटातला(च) रस, स्वच्छता, आवाजाची स्पष्टता, पडदा आणि प्रेक्षकांची नजर यांसाठी सांभाळलेली प्रमाणं, ढेकूण-डास इ... अनेक निकषांवर बरीच सुरेख चित्रगृहं मुंबईत अजूनही आहेत. पण मुंबईतून बाहेर पडल्यावर मात्र हे चित्र कमालीचं बदलतं. ठाण्यात अनुभवलेल्या या पार्श्वभूमीवर मला सध्याची मल्टिप्लेक्स चित्रगृहं अतिशय आवडतात. तिथे सिनेमा महाग असतो हे खरंच. पण घरून नीट पोट भरून गेल्यास आणि नीट पाहणी करून योग्य तो खेळ निवडल्यास तो तितका महाग पडत नाही. शिवाय सिनेमाचा अनुभव (दृश्य आणि ध्वनी अशा दोन्ही अतिमहत्त्वाच्या बाबतींत) प्रचंड सुधारतो. बाकी प्रेक्षकांकडून होऊ शकणारा त्रास नि स्वच्छता यांबद्दल तर बोलायलाच नको. दुसर्‍या महत्त्वाच्या बदलाबद्दल खूप बोललं गेलं आहे, ते म्हणजे चित्रपटकर्त्यांना उपलब्ध झालेला अवकाश. ज्या सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकांबद्दल तुम्ही बोलताहात, त्यानं नव्वदीपूर्वीच्या हिंदी चित्रपटांवर राज्य केलं. त्यांच्यासाठीच तर 'सबकुछ थोडंथोडं', 'लसावि', 'मसाला', 'फॉर्म्युला'... अशा प्रकारचे चित्रपट बनत असत. चित्रगृहांची क्षमता ठरलेली असल्यामुळेही लसावि काढण्यावाचून एका प्रकारे गत्यंतर नसे. अनेक संवेदनशील विषय हाताळण्यावर बंधन येई. खेळांच्या वेळा ठरावीक असल्यामुळे चित्रपटाचा वेळही ठरल्यासारखाच असे. (साधारणपणे अडीच तास. आजही आपल्याकडे व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांना गरज असो वा नसो, मध्यांतर घ्यावाच लागतो.) ही सगळीच बंधनं आता अदृश्य झाली आहेत. निराळे विषय, शैली, बजेट, प्रेक्षक, निर्माते, कलावंत... यांना प्रचंड अवकाश मिळाला आहे.
त्यामुळे सिंगल्स्रीन चित्रगृह जाण्याबद्दल थोडे नॉस्टाल्जिक अश्रू ढाळीन मी फार तर (तिथले विशिष्ट चवीचे सामोसे मला फार आवडतात!). पण एरवी मी मल्टिप्लेक्सच्या जगात सुखी आहे. शॉपिंग मॉल्स हा एक अनावश्यक आचरट प्रकार असला (नि तो यथावकाश गायब होणार असला), तरी मल्टिप्लेक्स चित्रगृहं मात्र बंद होणार्‍या मॉलांमध्येही चालतात हे बघून मी सुखावते. ती अशीच चालावीत, टिकावीत आणि लहान शहरांमधूनही बहरावीत हीच रंगदेवतेपाशी प्रार्थना. ;-)

चिंतातुर जंतू Wed, 09/03/2016 - 11:40

In reply to by मेघना भुस्कुटे

काही सिनेमे सिंगल स्क्रीनमध्ये पाहायला मला आवडतात. उदा. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'दुनियादारी', सलमान खानचे सिनेमे वगैरे. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथल्या प्रेक्षकांच्या कशाला काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं उद्बोधक असतं. मल्टिप्लेक्समध्ये हा प्रेक्षक अनुपस्थितच असतो किंवा आला तरी काहीसा अवघडलेला असतो. पुण्यात आता एक मध्यममार्ग निघालेला आहे - 'राहुल' किंवा 'मंगला' आता सिंगल स्क्रीन नाहीत, पण कोथरुडी मध्यमवर्गीय मल्टिप्लेक्सपेक्षा कळकट आणि स्वस्त आहेत. तिथला प्रेक्षक हा पूर्व पुण्यातल्या किंवा भांबुर्डा गावठाणातल्या सामान्य वस्तीतून येतो. मी इतक्यात तिथे 'बाजीराव मस्तानी' पाहिला. थिएटर हाउसफुल्ल होतं. एरवी सतत फोनचे चाळे करत, टाइमपास कमेंट पास करत सिनेमा पाहणारा इथला प्रेक्षक इतक्या तन्मयतेनं आणि शांतपणे चित्रपट पाहात होता की संजय लीला भन्साळीला काय 'जमलं' आहे ते सहज समोर कळत गेलं.

मेघना भुस्कुटे Wed, 09/03/2016 - 11:57

In reply to by चिंतातुर जंतू

कबूल. असं मला 'चक दे' पाहताना वाटलं होतं. 'लगान' बघताना जो जल्लोष अनुभवला होता, त्याची राहून राहून आठवण झाली. असाच 'दबंग' मी सिंगल्स्क्रीनी पाहिला होता, आणि मला अगदीच कळू शकतंय तुम्ही काय म्हणताहात ते.

विषारी वडापाव Wed, 09/03/2016 - 14:25

In reply to by मेघना भुस्कुटे

हा हा . खर आहे . प्रत्येक चित्रपटगृहाची आपली स्वतःची अशी एक sociology असते . पुण्यात अल्पना च्या आजूबाजुचा भवताल वेगळा आणि सिटी प्राईड कोथरूडचा वेगळा . इवन पिंपरी चिंचवड च बिग सिनेमाज वेगळ आणि पुण्यातल बिग सिनेमाज वेगळ .

बॅटमॅन Wed, 09/03/2016 - 14:27

In reply to by विषारी वडापाव

च्यायला तुमच्या पुण्यात हडपसर-येरवड्यातील अवाढव्य मॉल्स आणि तिथली मल्टिप्लेक्सेस येत नैत का आँ? मगरपट्ट्यातल्या सीझन्स मॉलमध्ये १२ स्क्रीनवालं सिनेपोलिस आहे. अख्खे पुणेमे ऐसा थेटर नै होगा. त्याच्या समोर अमनोरा मॉलमध्ये ८ स्क्रीनवालं आयनॉक्स आहे. ये तुम कैसे इग्नोर सकते यारो.

घाटावरचे भट Wed, 09/03/2016 - 21:49

In reply to by बॅटमॅन

पूर्व पुण्यातला बराचसा भाग हा टिपिकल पुणेकराच्या दृष्टीने गावाबहेर येतो म्हणतात... ;-)

नितिन थत्ते Thu, 10/03/2016 - 20:25

In reply to by घाटावरचे भट

+१.
तुळशीबागेच्या पूर्वेला जे आहे ते पुणंच नाही. नाना पेठ वगैरे तर कुठे आहेत कुणास्ठौक !!!

अनुप ढेरे Thu, 10/03/2016 - 20:30

In reply to by घाटावरचे भट

आजकाल रावेत/किवळे असल्या पूर्वी कधी न ऐकलेल्या ठिकाणचे लोक पुण्यात रहातो असं म्हणतात!

नितिन थत्ते Thu, 10/03/2016 - 21:12

In reply to by अनुप ढेरे

अहो तसं तर ठाण्याला किसननगरमध्ये राहणारे लोक मुलुंड चेकनाक्याला राहतो म्हणतात.

आणि लोढा पालावा ठाण्यापासून पाच मिनिटावर आहे असं लोढा बिल्डर म्हणतो.

रावेतचे लोक पुण्यात राहतो असं म्हणतात का हा प्रश्न नसून पुण्यातले (म्हणजे शनिवार वाडा-लकडीपूल- सारसबाग त्रिकोणातले) लोक काय म्हणतात हा आहे.

तसा भांबुर्डा सुद्धा बाहेरच.

बॅटमॅन Fri, 11/03/2016 - 12:13

In reply to by ऋषिकेश

नुसते तेवढेच नव्हे, तर पेठा सोडून कोथ्रुडात वसलेल्यांपैकी अनेक लोकही उपरेच आहेत. ;) पेशवाई काळात कोकणाहून आलेले.

बॅटमॅन Thu, 10/03/2016 - 20:32

In reply to by घाटावरचे भट

जब कि शहाजीराजांच्या वेळेपासून उल्लेख येतो तो याच भागाचा...नारायण, सदाशिव, इ. पेठा तर परवापरवा वसल्या.

राजन बापट Sun, 06/03/2016 - 00:26

लेख आणि त्याच्यावर झालेली चर्चा नि मतं उद्बोधक आहेत.

एक प्रश्न : इंटरनेट आल्यानंतर पोर्न इंडस्ट्रीचं चलनवलन बदललं, धंद्याचं परिमाण नि स्वरूप पालटत गेलं असं आपण पाहतो. तर मग हे असे स्वस्त मिथुनपट आणि "जवानीमें ओये ओये" "जंगल लव्ह" "रंगीन रातें" वगैरे मॉर्निंग शो-पट आणि तत्सम गोष्टींचं मार्केटही संपलं/जवळजवळ संपल्यात जमा झालं असं म्हणता येईल का?

विषारी वडापाव Sun, 06/03/2016 - 07:48

In reply to by राजन बापट

नक्कीच . इंटरनेट क्रांतीचा मोठा फटका यांना बसला आहे . बॉलीवूड मध्ये आलेल्या studio culture चा फटका पण यांना बसला . त्याचबरोबर या प्रकारच्या सिनेमाचे जे युएसपी आहेत (अंगप्रदर्शन , हाणामाऱ्या , कथेला दुय्यम महत्व ) ते मेनस्ट्रीम सिनेमाने अंगिकारले . (उदा .भट्ट कंपू ) त्याचा पण फटका बसला . मुख्य म्हणजे मिथुन ने पण असे चित्रपट करणे सोडले . अजून तरी त्यांना नवीन मिथुन तयार करणे जमलेले नाही

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/03/2016 - 22:28

studio culture म्हणजे नक्की काय, त्याचा फटका कसा बसला, यावरही स्वतंत्र लिहावं अशी विनंती.

विषारी वडापाव Tue, 08/03/2016 - 09:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा खर तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे . Independent producers चा काळ आणि आता स्टुडीयो कल्चर चा काळ यात प्रचंड फरक आहे . साल २००० नंतर भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलण्यात स्टुडीयो कल्चर चा सिंहाचा वाटा आहे .सध्या करण जोहर च धर्मा प्रोडक्शन , चोप्रांच यशराज प्रोडक्शन , अनुराग कश्यप ची Phantom फिल्म्स किंवा फरहान च्या एक्सेल प्रोडक्शन असेल यांनी आपल्या निर्मिती गृहांचा साचा स्टुडीयो कल्चरवर आधारित ठेवला आहे .

यावर लवकरच लिहितो .

विषारी वडापाव Tue, 08/03/2016 - 09:39

In reply to by नितिन थत्ते

हो . बॉम्बे talkies . हिमांशू रॉय आणि देविका राणी यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवलेली . यावर मराठीत अंबरीश मिश्र यांनी खूप सुंदर लिखाण केल आहे . १९९६ नंतर आपल्याकडे स्टुडिओ कल्चरच पुनरागमन झाल

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/03/2016 - 22:41

In reply to by विषारी वडापाव

गळ्यात पडणं सुरूच आहे तर आणखी थोडं - पेपरासाठी हजार शब्दांची मर्यादा असेल तरी इथे मर्यादा नाही. त्यांना हवं तर छोटा तुकडा दे, इथे आख्खा लेख हवा.

चिंतातुर जंतू Wed, 09/03/2016 - 11:31

माझ्या मते आजही ह्यासम बिझनेस मॉडेल भोजपुरी सिनेमानं अंगिकारलेलं आहे आणि हा सिनेमा अगदी मुंबईतही अतिशय लोकप्रिय आहे.

विषारी वडापाव Wed, 09/03/2016 - 14:31

In reply to by चिंतातुर जंतू

काही प्रमाणात दाक्षिणात्य व्यवसायिक मसालापट यात येतात . भोजपुरी भाषा निदान आपल्याला थोडी तरी समजते . पण सोलापूर , कोल्हापूर , आमचा परभणी नांदेड (किंबहुना अख्खी निझाम टेरीटरी ) या भागात तेलुगु मारधाड पट बघायला लोक बेफाम गर्दी करतात .

चिंतातुर जंतू Wed, 09/03/2016 - 14:36

In reply to by विषारी वडापाव

निजामशाही महाराष्ट्राचा मला अनुभव नाही, पण टीव्हीवर ते चित्ताकर्षक शीर्षक घेऊन डब केलेले दाक्षिणात्य सिनेमे लागतात ते लोकप्रिय असावेत असं वाटतं. अर्थात, दक्षिणेतली तेलुगू सिनेमाची लोकप्रियता मल्टिप्लेक्स काळापूर्वीपासून आहेच. 'घराना मोगुडू' प्रभृतींद्वारे ती मुंबईतही अनुभवलेली आहे. :-)

बॅटमॅन Wed, 09/03/2016 - 14:36

In reply to by विषारी वडापाव

एक बाल की खाल करेक्षण, कोल्हापूर-सांगली हे निजाम टेरिटरी नव्हेत बरं का. अगदी सोलापूरबी न्हवेच. ते त्यापुढं, तुमचे ते परभणी-नांदेड वगैरेकडं.

विषारी वडापाव Wed, 09/03/2016 - 14:51

In reply to by बॅटमॅन

नाय नाय निझाम एरिया म्हणजे परभणी नांदेड आणि मराठवाड्याचा एरिया हेच अपेक्षित होत , म्हणून परभणी नांदेड च्या समोर कंसात टाकल ते . व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे का हे ?

राजेश घासकडवी Fri, 11/03/2016 - 05:57

नव्वदीच्या दशकात हेच मॉडेल गोविंदानेदेखील वापरलं असं ऐकल्याचं आठवतं आहे. लग्नाचं कॉंट्रॅक्ट घेताना एक कॉंट्रॅक्टर म्हणायचे 'तुम्ही फक्त वधुवर आणा, बाकीचं आम्ही बघतो' तसंच काहीसं - तुम्ही फक्त कथा आणा, ती नसेल तर आमच्याकडे कथाही तयार आहेत, पैसे आणा फक्त. बाकीचं आम्ही बघू. साउथमधल्या कुठच्यातरी हॉटेलमध्ये सगळ्यांची राहाण्याची सोय, ठरलेले सेट्स, ठरलेले नट, ठरलेली इतर माणसं - या सगळ्यांतून काही महिन्यांत गोविंदास्टारर सिनेमा बनायचा.

अशोककुमारने मोडून काढलेलं स्टुडियो मॉडेल म्हणजे बहुधा जिथे हिरो हिरॉइन वगैरे सगळी मंडळी पगारावर असायची ते. हे जाऊन सगळेच इंडिपेंडंट कॉंट्रॅक्टरप्रमाणे कोणालाही आपली कला विकू शकायचे. मला वाटतं मिथुनच्या (आणि गोविंदाच्या) मॉडेलमध्ये या दोन्हीचा समन्वय होता. वीस कोटी खर्च करून आणि दोन वर्षं वाट बघून कदाचित शंभर कोटींचा धंदा होऊही शकेल. त्यापेक्षा दोनचार कोटी खर्च करून तीन महिन्यात तयार होणाऱ्या प्रॉडक्टमध्ये जर दहापंधरा कोटी कमवण्याची क्षमता असेल तर त्यासाठीही मार्केट आहे.

राही Mon, 14/03/2016 - 12:49

इथे पुण्याच्या मानसिक आणि भौगोलिक व्याप्तीवर अनेक प्रतिसाद दिसले.
एकदा मध्यप्रदेशात आम्ही काही जण गेलो असता आमचा पोशाख म्हणा अथवा बोलणेसवरणे म्हणा, यावरून आम्हांला ओळखून तिथले काही तरुण कार्यकर्ते भेटीस आले. 'हम कौन आप कौन'ची सलामी होऊन आम्ही मुंबईचे हे कन्फर्म झाल्यावर त्यातला एक जण (कदाचित जवळीक दाखवण्यासाठी) म्हणाला की त्याचा मामेभाऊसुद्धा मुंबईत राहातो. आम्ही 'कुठे?' म्हणून विचारल्यावर तो म्हणाला, 'बदलापूर'.
सगळा रायगड-ठाणे-पालघर टापू मुंबईच बनला आहे बाहेरच्यांसाठी.

मेघना भुस्कुटे Mon, 14/03/2016 - 13:37

In reply to by राही

रोज येऊनजाऊन नोकरीचं ठिकाण गाठण्याच्या दृष्टीनं जे ठिकाण मुंबईतल्या नोकरीला सोईचं, ते मुंबईत - असा सरळसाधा हिशेब असावा.