जिगरवाला मन्सूर

झाडून सगळ्यांनीच महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे, असा एक संकेत रूढ होत चालला आहे. म्हणजे, सगळ्यांनीच सहा आकडी पगार कमावला पाहिजे. सगळ्यांनीच उत्साहीपणे सण वगैरे साजरे केले पाहिजेत. सगळ्यांनीच विकेंडला मॉल आणि मल्टिप्लेक्सला गर्दी केली पाहिजे. सगळ्यांनीच मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणात राहून स्वतःची जबरी प्रगती करून घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे, मी महत्त्वाकांक्षी आहे, हे सिद्ध करण्यासाठी एका न संपणाऱ्या रेसमध्ये ऊर फुटोस्तर पळलं पाहिजे. जो माणूस यातलं काहीही करायचं नाकारून आपल्या अटींवर आयुष्य जगतो, त्याला हे सगळे महत्त्वाकांक्षी लोक एक लेबल लावतात, ‘पलायनवादी’! अशा लोकांना सहसा नात्यांमधल्या कार्यक्रमात फारसं महत्त्व मिळत नाही, मित्रांच्या गेट-टुगेदरमध्ये यांना गृहीत धरतात, आणि यांची बायको यांना आजूबाजूच्या महत्त्वाकांक्षी लोकांची उदाहरण देते. पण काही लोक हा ‘पलायनवाद’ असा काही निभावतात की वाटतं, वा! क्या बात है. असाच एक माणूस म्हणजे, मन्सूर खान. कोण हा मन्सूर खान? आपलं एेन भरात असणारं फिल्म इंडस्ट्रीमधलं करिअर सोडून, महानगरीय जीवनशैली सोडून एका खेड्यात राहायला गेलेला माणूस म्हणजे, मन्सूर खान...
आमीर खानचा भाऊ किंवा नासीर हुसेनसारख्या दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शकाचा मुलगा इतकीच मन्सूर खानची ओळख कधीच नव्हती. फिल्मी परिवारातून असला तरी मन्सूर हा नेहमीच स्वयंप्रकाशित तारा होता. विलक्षण मनस्वी, उन्मेषी, प्रसंगी कठोर, पॉम्पस. पेशाने दिग्दर्शक असणाऱ्या या माणसाने, इनमिन चार चित्रपट दिग्दर्शित केले. प्रत्येक चित्रपटाला भरपूर वेळ द्यायचा, ही याची पद्धत. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामधून आमीर खान नामक धुमकेतू अवतरला. आमीरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भक्कम बेस मिळवून देणारा हा चित्रपट मन्सूरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर त्याने केलेला ‘जो जीता वो ही सिकंदर’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात वाढलेल्या प्रत्येकाच्या नॉस्टॅल्जियाचा अविभाज्य हिस्सा आहे. पण हा लेख मन्सूरच्या चित्रपटक्षेत्रातल्या योगदानाबद्दल नाही. ते बहुतेकांना माहीत आहे. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर मन्सूरने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई सोडून तो अजून दुसऱ्या कुठल्याही महानगरात शिफ्ट झाला नाही. त्याने निवड केली, तामीळनाडूमधल्या कुनुर या निसर्गरम्य जागेची. मुंबई सोडण्याचा निर्णय घेण्याअगोदरच त्याने बॉलीवूडमधलं जोरात चाललेलं करिअर संपवण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवटचा ‘जोश’ (शाहरुख खान व ऐश्वर्या राय अभिनित) आपटला असला तरी मन्सूर हा एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे, याबद्दल कुणाचं दुमत नव्हतं. शिवाय आमीरसारखा सुपरस्टार बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मग हा टोकाचा निर्णय मन्सूरने का घेतला?
मन्सूर हा जात्याच बुद्धिमान आणि विचारी माणूस. चित्रपटक्षेत्रात तो फक्त घराण्याचं नाव राखण्यासाठी आला होता. पण त्याच्यातल्या निसर्गप्रेमी माणसाला महत्त्वाकांक्षेच्या लालसेपायी निष्ठुर होत चाललेली मुंबई कधीच भावली नव्हती. आपण एका निरर्थक ‘रॅट रेस’चा भाग आपली इच्छा नसताना बनलो आहोत, ही जाणीव त्याला पोखरून काढत होती. मुख्य म्हणजे, वेगवान, कोंदट, शहरी जगण्याचा त्याला कंटाळा आला होता. शूटिंगसाठी तो काही वेळा कुनुरला गेला होता. त्याला ती जागा खूप आवडली होती. शिवाय तिथे त्यांचे एक पिढीजात घर होते. पण या बाबतीत बायकोला आणि दोन मुलांना कसे कन्व्हिन्स करावे, असा प्रश्न होता. तब्बल एक वर्ष मन्सूरने त्यांची मनधरणी केली. शेवटी, घरचे लोक तयार झाले. मन्सूर त्याच्या बायकोपोरांसकट कुनुरला स्थलांतरित झाला. पण हा निर्णय राबवणं तितकंसं सोपं नव्हतं. एक पूर्ण वाढलेलं झाड उपटून ते दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा हा प्रकार होता. अनेक समस्या होत्या. विशेषतः आर्थिक समस्या. मुंबईमधली आपली प्रॉपर्टी विकून मन्सूरने जमिनीचा एक तुकडा कुनुरमध्ये विकत घेतला. तिथे त्याने शेती आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. पण त्यातून एक चांगलं आर्थिक उत्पन्न सुरू व्हायला काही वेळ लागला. दरम्यान मन्सूर आणि परिवाराला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण ते ठामपणे सगळ्यांना तोंड देत उभे राहिले. दरम्यान मन्सूरने साबण कसा बनवावा, ब्रेड कसा बनवावा, वगैरे आवश्यक गोष्टी शिकून घेतल्या. हल्ली बहुतेक गोष्टी ते घरीच तयार करतात. आज मन्सूर स्वतःच्या अटीवर एक अतिशय सुंदर आयुष्य जगत आहे.
मन्सूरने आपल्या या अनुभवावर चांगलं लिखाण केलं आहे. सध्या त्याच्या ‘द थर्ड कर्व्ह’ या पुस्तकाला मोठी मागणी आहे. २००८च्या जागतिक मंदीनंतर जगासमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न आणि त्याचा तुमच्या-आमच्या आयुष्यावर होणारा परिणाम यावर मन्सूरने ‘द थर्ड कर्व्ह’ या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत लिहिलं आहे. भूगर्भातल्या तेलाचे वेगाने संपणारे साठे आणि कमजोर होत चाललेली आपली बँकिंग सिस्टम यामुळे अख्ख्या मनुष्यजातीसमोर लवकरच गंभीर असे जीवनमरणाचे प्रश्न उभे ठाकणार आहेत, अशी त्याची मांडणी आहे. यावर त्याच्या मते एकच सोल्युशन आहे ते म्हणजे, आपल्या भौतिक गरजा कमी करून माणसाने निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जावे आणि निसर्ग संवर्धन करावे. आपल्या अनुभवातून तावूनसुलाखून निघालेला मन्सूर सध्या वेगवेगळ्या आयआयएम संस्था, याहूसारख्या कॉर्पोरेट संस्था, सिम्बायोसिस सारख्या शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी लेक्चर देतो. कुणीतरी मध्यंतरी त्याला विचारलं, ‘पुढचा चित्रपट कधी बनवणार?’ त्या वेळेस हसत हसत त्यानं उत्तर दिलं, ‘कधीच नाही.’
देशातल्या अनेक चळवळींना मन्सूर सक्रिय पाठिंबा देतो. मध्यंतरी आमीर खानने नर्मदा आंदोलनाला जो सक्रिय पाठिंबा दिला होता, त्यामागे मन्सूरच्या या विचाराचा प्रभाव होता. त्या बदल्यात भाजप समर्थकांनी आमीरच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे खेळ गुजरातमध्ये बंद पाडले होते. असो.
नाना पाटेकरसारखा अवलिया कलावंत याच वाटेवरून चालतो आहे. सध्या नाना पुण्याजवळ एका फार्म हाउसवर शहरी गजबजाटापासून दूर एक शांत आयुष्य जगतो आहे. पण नाना आणि मन्सूरमधला मुख्य फरक हा की, नाना अजूनही अभिनयात सक्रिय आहे. मात्र मन्सूरने शो बिझिनेसमधून पूर्ण निवृत्ती घेतली आहे. या दोघांनाही वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये तुम्ही हा निर्णय का घेतलात, या अर्थाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर नाना आणि मन्सूर यांनी त्याला दिलेली उत्तर उद‌्बोधक आहेत. नानाचं उत्तर होतं की, ‘शहरांमध्ये मला पक्ष्यांची किलबिल ऐकू येणं बंद झालं होतं.’ मन्सूरच उत्तर होतं, ‘कारण मला रात्री शांत निवांत झोपायचं होतं.’ नियती पण काय एक एक काष्ठ जमवते नाही?

(पुर्वप्रकाशीत)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे माहीत नव्हतं मन्सूर खानबद्दल. इंट्रेष्टिंग आहे. तुमच्या लेखाचा मुख्य भर मन्सूरसारख्या लोकांनी चाकोरीबाहेरच्या गोष्टी करण्याचा धीर करण्याबद्दल आहे, हे मला कळतं आहे. पण थोडं अवांतर: (थोडी रा०घां०च्या पक्षातून बोलणार आहे, देवा मला माफ कर! ;-)) अशा प्रकारची राहणी किती जणांना परवडू शकेल? आर्थिक बाबतीत तर सोडाच, पण प्रत्येकानं एक जमिनीचा तुकडा घ्यायचा म्हटलं नि त्यातून स्वतःपुरतं उत्पादन काढायचं म्हटलं तर ते कितपत प्रॅक्टिकल आहे? ज्यांची पिढीजात घरं कुठेच नाहीत त्या लोकांनी कुठे जायचं? काय खायचं? काय करायचंं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमचा मुद्दा बरोबर आहेच . सगळ्यांनाच हे जमेल असे नाही . सगळेचजण privileged घरातून आलेले नसतात . तरी सुरुवातीच्या काळात बरेच आर्थिक प्रश्न मन्सूरला पण भेडसावत होतेच .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

तरी सुरुवातीच्या काळात बरेच आर्थिक प्रश्न मन्सूरला पण भेडसावत होतेच .

हे प्रश्न कदाचित असे असतील " १० एकर चे फार्म हाऊस घेऊ का २० एकर चे घेऊ?" "मरीन ड्राइव्ह ला आधीच एक २००० चौ फुटांचा फ्लॅट आहे, मग अजुन एका फ्लॅट ची गरज आहे का?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्थिक प्रश्न म्हणजे गरजा आणि उत्पन्न यांच्यातली तफावत अस अपेक्षित होत . ते प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळे असू शकतात . वडापाव खाण्यासाठी पैसे नसणे म्हणजेच आर्थिक समस्या हे थोड एकांगी होत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

शिवाजी महाराजांच्या धर्ती वर

"मेरा बाप भी नासीर हुसेन जैसा पैसेवाला होता तो मै भी उटी मे बडासा फार्म हाऊस बनाती" असे म्हणावेसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापेक्षा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातले एक जबराट उदाहरण पहावे. मधुचंदन नामक हा प्राणी क्यालिफोर्निया इथे १३ वर्षे नोकरी करून मग गावी परत आला आणि बघता बघता अख्ख्या जिल्ह्यातले शेतकरी कर्जबाजारी होते ते पैसे बाळगू लागले. त्याने एक ऑरग्यानिक अ‍ॅग्रो प्रॉडक्टवाली कंपनी बनवलीये. तुफान इन्स्पायरिंग आहे. त्याबद्दल इथे वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं