निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण

---------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
---------------------------------

सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो. या अंगाने मी कबीरांच्या भजनांचा विचार केला नव्हता.

आता जेंव्हा मी संकेतच्या कमेंटच्या प्रकाशात या भजनाचा मला लागलेला अर्थ पुन्हा पाहिला तेंव्हा तर मी या भजनाच्या अजूनच प्रेमात पडलो. सजीव आणि निर्जीवांच्या आयुष्याचे भरजरी महावस्त्र विणणारा तो निर्गुण, निराकार आणि निनावी विणकर जेंव्हा त्याच्या अदृश्य हातमागावर, उभे आडवे धागे गुंफत असेल, त्यावर आपला अदृश्य धोटा फिरवत असेल तेंव्हा त्या विनाकारण होणाऱ्या विश्वनिर्मितीचा ध्वनी जर कुठला असलाच, तर तो झिनी झिनी असावा असे या कबीर नामक शेले विणणाऱ्या सगुण, साकार विणकराला वाटणे, मला स्वाभाविक वाटले.

व्यवसायाने विणकर. जन्माने, ईश्वर आणि जग यांच्यात संपूर्ण द्वैत मानणाऱ्या इस्लाम धर्माचा बंदा. दक्षिणेतील रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत मत पुढे घेऊन जाणाऱ्या, उत्तरेतील रामानंद स्वामींचा शिष्य. विष्णूच्या श्रीराम या सगुण अवताराचा भक्त. आणि शैव परंपरेतील नाथ संप्रदायाकडे ओढा. भक्तीमार्ग हाच मोक्ष मार्ग असे दर्शवणारा जीवनपट आणि त्याच वेळेला कुंडलिनी जागृती सारख्या हठयोगातील संकल्पनांचे निरुपण करणारे कबीर, मला आयुष्यावर प्रेम करणारे साधक म्हणूनच भेटतात. सगुण - निर्गुण, इस्लाम - हिंदू, पूर्ण द्वैत - विशिष्टा द्वैत, शैव - वैष्णव, भक्ती - योग अश्या परस्परविरोधी विचारधारांचा मेळ स्वतःच्या जीवनात घालणाऱ्या कबीरांना, रोजच्या जगण्यात ऐकू येणारा झिनी झिनी आवाज; विश्व, आपले अस्तित्व आणि त्यांचा परस्परसंबंध यांना जोडणारा वाटला यात नवल ते काय !

आता पहिल्या चरणाकडे वळतो.

पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

याच कडव्यातील नाद बिंदू या शब्दामुळे मी अडकलो होतो. त्यातल्या नाद शब्दामुळे, मला हे थोडसं बायबल मधल्या "In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God." सारखं वाटत होतं. पण त्याने सुसंगत चित्र तयार होत नव्हतं. मग परळीकरांचे पुस्तक हाती लागले होते.

परळीकर म्हणतात, "प्रथम शून्यातून (आकाशापासून, ब्रह्मरंध्रात) अनाहत नाद ऐकू आला आणि नंतर तेथे अमृताची साठवण केली. संपूर्ण शरीरात अनिर्वचनीय असा अदृश्य परमात्मा व्यापून राहिला आहे." हा भावार्थ वाचून मन शांत झाले नाही तरीही, अलख = अदृश्य, पुरुष = परमात्मा आणि निर्बानी = अनिर्वचनीय, हे शब्दार्थ मात्र चपखल बसले.

अध्यात्मात नाद शब्द ऐकला की अनाहत नादच असावा असे मला उगाच वाटते. आणि अनाहत नाद हा शब्द आल्यावर मला नेहमी ओंकाराची आठवण येते. मग कुठेतरी वाचलेलं आठवलं की हिंदू तत्वज्ञानातदेखील ओंकारापासून विश्व निर्मितीचा सिद्धांत आहे. शोधाशोध केली तेंव्हा आंतरजालावर तैत्तिरीयोपनिषद आणि विशेषतः बृहदारण्यकोपनिषद यात विश्वनिर्मिती बद्दल या कडव्याच्या जवळ जाणारी रचना सापडली.

आधी फक्त ब्रह्म होते. त्याने म्हटले अहस्मि. म्हणजे मी आहे. म्हणून ब्रम्हातून अहंची निर्मीती झाली. (हा अहं म्हणजे ओम असावा असे मी ठरवले.) मग एकटे असल्याने हे ब्रह्म रमू शकले नाही. त्याने स्वतःतून स्त्री रूप वेगळे काढले. अर्धनारीश्वर इथेच तयार झाला. आणि मग या युग्मातून विश्वनिर्मिती झाली. अश्या अर्थाचा श्लोक बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या चौथ्या ब्राह्मणात आहे. तर तैत्तिरियोपनिषदातील ब्रह्मानंदवल्ली या भागातील पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात परमात्म्यापासून सर्वप्रथम आकाश, आकाशातून वायू, वायुतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाण्यातून पृथ्वी, पृथ्वीतून वनस्पती, वनस्पतीतून अन्न आणि अन्नातून प्राण जन्माला आले अशी साखळी दाखवली आहे.

हे सगळं वाचायला छान वाटत होतं आणि या सर्वांचा पहिल्या कडव्याशी काहीतरी संबंध आहे असे वाटत होते. पण तो काय ते कळत नव्हते. कारण नाद शब्दाचा ओम च्या अनाहत नादाशी अंधुक संदर्भ लागला तरी बिंदूची उकल होत नव्हती. आणि तो "जमया पानी" चा उल्लेखतर माझ्या धडपडीकडे बघून हसतोय असं मला वाटत होतं.

मग एकदा असंच जाणवलं की ध्रुवपदाचा अर्थ लावताना मी, कुंडलिनी साधनेच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या साधकाला कबीर, ग्यानी गुरु म्हणत आहेत, असा विचार केला होता. पण त्यानंतर पहिल्या कडव्याचा अर्थ लावताना मात्र विविध धर्मातील विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताच्या मागे लागलो होतो. म्हणजे धृवपद व्यक्तीबाबत तर पहिले कडवे पूर्ण विश्वाबाबत अश्या उलट सुलट प्रकारे मी अर्थ लावत होतो. माझ्या अर्थ लावण्यातली विसंगती जाणवताच मी उपनिषदांतून सापडलेली विश्वोत्पत्तीची दिशा, एकट्या व्यक्तीच्या कुंडलिनी साधनेशी कुठे जुळते आहे का, ते शोधायच्या मागे लागलो. आणि मग ऐतरेयोपनिषदातील उल्लेख सापडले.

या ऐतरेयोपनिषदातील पहिल्या अध्यायात तीन खंड आहेत. पहिला खंड सृष्टी उत्पत्ती बद्दल, दुसरा मनुष्य शरीर उत्पती बद्दल तर तिसरा अन्न उत्पत्ती बद्दल आहे. हे वाचताना माझा युरेका क्षण आला. आणि ध्रुवपदापासून बाकीच्या सगळ्या कडव्यांची एकच एक सुसंगती लागू लागली.

पहिल्या अध्यायाचा पहिला खंड म्हणतो, सर्वात प्रथम परमात्मा एका निर्गुण ज्योतीच्या स्वरूपात होता. या ज्योतीला प्रकाश, उष्णता हे देखील गुण नव्हते. मग त्याला विश्वोत्पत्तीची इच्छा झाली. म्हणून त्याने अम्भ (स्वर्ग), मरीची (अंतरीक्ष), मर (पृथ्वी अथवा मर्त्य) आणि आप (जल अथवा पाताळ) या चार लोकांची रचना केली. यातील पृथ्वीलोक आणि अंतरीक्षलोक यांना एकत्रितरित्या हिरण्यगर्भ किंवा सृष्टीचे बीज म्हणतात आणि हा हिरण्य गर्भ पाताळलोकाच्या म्हणजे जलाच्या मध्यावर असतो.

अश्या तऱ्हेने चार लोकांची निर्मिती झाल्यावर मग परमात्म्याने त्यांचे लोकपाल निर्माण करण्यासाठी हिरण्यपुरुष निर्माण केला. त्याची निर्मिती अशी झाली. प्रथम हिरण्यगर्भातून त्या पुरुषाचे मुख तयार झाले. मुखातून वाचा आणि वाचेतून अग्नी तयार झाला. मग नाकपुड्या तयार झाल्या. नाकपुड्यातून प्राण आणि प्राणातून वायू तयार झाला. मग डोळे तयार झाले. डोळ्यातून दृष्टी आणि दृष्टीतून आदित्य (सूर्य किंवा प्रकाश) निर्माण झाला. मग त्वचा तयार झाली. त्वचेतून रोम आणि रोमातून वनस्पती तयार झाल्या. मग हृदय , हृदयातून मन आणि मनातून चंद्र तयार झाला. मग नाभी, नाभीतून अपान आणि अपानातून मृत्यू निर्माण झाला. मग जननेन्द्रिय, त्यातून वीर्य आणि त्यातून पुन्हा आप (चौथ्या लोकाचे तत्व) निर्माण झाले.

मग दुसरा खंड म्हणतो, अग्नी, वायू, प्रकाश अश्या सर्व देवता तयार झाल्या पण त्यांना आपले कार्य करण्यासाठी जडशरीर नव्हते. म्हणून परमात्म्याने मानवी शरीराची रचना केली. प्रत्येक देवाने या शरीरात आपापले स्थान घेतले. अग्नी - मुखातील वाक इंद्रियात, वायू - प्राणवायूच्या रूपाने नाकपुड्यात, सूर्य (किंवा प्रकाश) - दृष्टीतून डोळ्यात, दिशा - कानात, वनस्पती - त्वचेवरील रोमात, चंद्र - हृदयात स्थित असलेल्या मनात, मृत्यू - अपान वायूच्या रूपाने गुदमार्गातून प्रवेश करून नाभीत, तसेच आप किंवा जल देवता वीर्य रूपाने जननेन्द्रियात जाउन बसले.

म्हणजे, निर्गुणातून सगुणाची निर्मिती कशी होते? या प्रश्नाचे उत्तर देताना ऐतरेयोपनिषद जे सांगते त्याचे सार असे की, निर्गुण निराकार परमात्म्याच्या इच्छेमुळे अम्भ, अंतरीक्ष, मर आणि आप हे चार लोक तयार होतात. त्या चार लोकातील अम्भ लोक (स्वर्ग लोक) दूर राहतो. पाताळ किंवा जल किंवा आप लोक आधार बनतो. त्याच्या मध्यावर मर आणि अंतरीक्ष हे लोक उभे राहतात. त्या दोघांना एकत्रितरीत्या हिरण्यगर्भ म्हटले जाते. पण हे चारही लोक अजून निर्गुण असतात. त्यात गुणांचा संचार होण्यासाठी हिरण्यगर्भातून हिरण्यपुरुष निर्माण होतो. निर्गुण हिरण्यपुरुषाचे निर्गुण अवयव तयार होतात. मग त्या निर्गुण अवयवातून त्याचे प्रयोजन करणारा एकेक गुण तयार होतो. तेच हे लोकपाल. अग्नी, वायू, प्रकाश, वनस्पती (याचा अर्थ मी वस्तूंचे गुण असा लावला), चंद्र(कायम कमी जास्त होण्याच्या हिंदोळ्यावर चंचल रहाणारे मन), मृत्यू आणि वीर्यरूपी बीजाला सामावून घेणारे आप किंवा जल, हे या हिरण्यपुरुषाच्या अवयवातून निर्माण होणारे विविध गुण किंवा लोकपाल आहेत. यातील आप हा हिरण्यगर्भाला तोलून धरणारा लोक आहे आणि हिरण्य पुरुषाच्या अवयवातून तयार होणारा एक गुण म्हणजे लोकपाल देखील आहे. आता निर्गुणातून गुण तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण होते पण या गुणांना आपले प्रयोजन पूर्ण करण्यासाठी जडसृष्टीची आणि जड शरीराची गरज असते म्हणून मग ज्या क्रमाने गुण (लोकपाल) निर्गुणातून (म्हणजे हिरण्यपुरुषातून, जो पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्रित हिरण्यगर्भातून निर्माण झालेला असतो) तयार होतात त्याच्या उलट क्रमाने गुणरूपी लोकपालातून मनुष्याचा जडदेह (मातेच्या गर्भात) तयार होतो; अशी ही कल्पना आहे.

पण या मनुष्य शरीरात अजून चेतना नसते. म्हणजे निर्गुणातून सगुण तयार तर झाले पण त्यांचा आपापसात सांधा बसलेला नसतो. म्हणून हा गुणयुक्त जडदेह प्राणहीन किंवा चेतनाहीन असतो. चेतना म्हणजे ज्याच्या इच्छेने विश्वाचे हे महावस्त्र विणले जाते तो निर्गुणी परमात्मा. तो परमात्मा किंवा ती चेतना जोपर्यंत या जड देहात प्रवेश करत नाही तोपर्यंत सर्व गुणांना आपले कार्य करता येणे अशक्य असते.

चेतना आपल्या शरीरात कशी प्रवेश करते त्याचे वर्णन तिसऱ्या खंडात आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी या लोकपालांना आपण पंच महाभूते म्हणून ओळखतो. ही पंचमहाभूते इतर लोकपालांबरोबर मनुष्य देहाची आणि सृष्टीची रचना करण्यास कारणीभूत होतात. सर्व लोकपाल, मातेच्या उदरातील गर्भाच्या जड देहात आपापली जागा घेतात. आणि मग या शरीरात परमात्मा शिरतो. कुठून? तर लहान मुलाच्या डोक्यावर जो मऊ भाग असतो ज्याला आपण टाळू म्हणतो तिथून. कुंडलिनी साधकांच्या दृष्टीने, परमात्मा सहस्रार चक्रातून किंवा ब्रह्मरंध्रातून शरीरात प्रवेश करतो. आणि शरीरात चैतन्य सळसळू लागते. विविध इंद्रियांत आपापली जागा घेऊन बसलेल्या लोकपालांना हे चैतन्य वापरून आपले गुण प्रदर्शन किंवा आपली ताकद वापरता येते.

हे वाचून झाल्यावर नाद म्हणजे परमात्म्याची प्रकाशातीत असल्याने दिसू न शकणारी म्हणून अदृश्य किंवा अलख ज्योत. जिचा नाद अनाहत म्हणजे कुठल्याही आघाताशिवाय होत असतो. ज्याला आपण आपल्या वाचेने प्रकट करू शकत नाही म्हणून तो अनिर्वचनीय नाद. वाणी नसलेला नाद, निर्बानी नाद. बिंदू, म्हणजे चार लोकातील अंतरीक्ष आणि मर यांचा मिळून बनलेला हिरण्यगर्भ. पीछे जमया पानी, म्हणजे चौथा आपलोक ज्याच्या मध्यावर हिरण्यगर्भ स्थिर असतो, ही संगती लागली. सब घट पूरण, म्हणजे मातेच्या उदरातील पूर्ण वाढ झालेले (सर्व लोकपालांनी आपापली स्थाने घेऊन स्थिर झालेले) गर्भ. आणि त्यात सहस्रार चक्रातून शिरणारी परमेश्वरी चैतन्य शक्ती म्हणजे अलख पुरुष निर्बानी अशी संगती लागून, पहिल्या कडव्याच्या अर्थाचा माझा शोध पुरा झाल्याचे समाधान मला मिळाले. यात मी कुठे चुकलो असेन तर मला दुरुस्त करा.

आणि हो, आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार, गर्भ कधी सजीव गणला जातो? सर्व अवयव विकसित झाल्यावर की अंड फलित झाल्यावर ? या प्रश्नांच्या अंगाने कृपया वरील लिखाण वाचू नका. आधुनिक विज्ञानाने आपल्या हाती आलेल्या माहिती नुसार ते तितकेसे चपखल बसत नाही याची मला कल्पना आहे.

पण ऐतरेयोपनिषदाच्या काळात हे विज्ञान उपलब्ध नसताना, निर्गुण निराकारातून सगुण साकार सृष्टीची निर्मिती कशी होत असेल याबाबत आधी गुणरहित चैतन्य, मग त्याच्या इच्छेने क्षेत्र (लोक), मग हिरण्यगर्भ, मग हिरण्यपुरुष, मग त्याचे अवयव, त्या अवयवातून गुण (लोकपाल), मग गुणांच्या प्रकटनासाठी मानवशरीर तयार होताना पुन्हा उलटा प्रवास करीत, गुणातून शरीराचे अवयव आणि त्या शरीरात पुन्हा अवतरणारे चैतन्य ही कल्पना कवी कल्पना म्हणून बाजूला सारायची म्हटली तरी या कवीची कल्पना शक्ती प्रचंड असावी हे मानायलाच हवे.

आणि इतका सगळा विचार केवळ दोन ओळीत मांडणाऱ्या कबीराला देखील त्याच्या क्षेत्रातील गृहीतकांचा ग्यानी गुरु म्हटल्याशिवाय राहवत नाही. आता पाहिजे तर पुन्हा वाचा हे पहिलं कडवं,

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

---------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
---------------------------------

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्व लोकपाल, मातेच्या उदरातील गर्भाच्या शरीरात आपापली जागा घेतात. आणि मग या शरीरात परमात्मा शिरतो. कुठून? तर लहान मुलाच्या डोक्यावर जो मऊ भाग असतो ज्याला आपण टाळू म्हणतो तिथून. कुंडलिनी साधकांच्या दृष्टीने, परमात्मा सहस्रार चक्रातून किंवा ब्रह्मरंध्रातून शरीरात प्रवेश करतो. आणि शरीरात चैतन्य सळसळू लागते. विविध इंद्रियांत आपापली जागा घेऊन बसलेल्या लोकपालांना हे चैतन्य वापरून आपले गुण प्रदर्शन किंवा आपली ताकद वापरता येते.

षटचक्रदर्शनमध्ये हेच लिहीलय वेगळ्या शब्दात - https://www.scribd.com/doc/47888997/%E0%A4%B7%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A4%9...
.
https://html2-f.scribdassets.com/8r2nozibggu4hn9/images/15-7c45532565.jpg
____
अधिक प्रतिसाद, वाचल्यानंतर ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा. अगदी नेमका संदर्भ दिलात. तो श्लोक तिसरा श्लोक आहे म्हणजे अन्न उत्पती आणि चैतन्याचा जडदेहात प्रवेश याबद्दल बोलतो. त्याच्या आधीचे दोन श्लोक आणि हा एकत्र वाचले तर त्यांची सुनता है गुरु ग्यानी बरोबरची सुसंगती जाणवते.

मी पण तो संदर्भ वाचला होता. लिंकबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोरे जी, तुमची सूर्य रास वृश्चिक आहे का? एन्ड ऑक्टोबर किंवा नव्हेम्बरमधील जन्म. कारण सागते. मला वाटतं आपला बुध "वृश्चिकेचा" आहे. डिटेक्टिव्ह, ऑकल्ट मध्ये ओढला जाणारा. खाजगी वाटल्यास व्यनि करा. किंवा नाही सांगीतले तरी चालेल. बुध आणि सूर्य अगदी लागुन असतात. त्यामुळे सूर्य रास धनुही असू शकेल. पण मला वाटतं वृश्चिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही ... मी १९ जूनचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...जन्मानि तव एकोणीसजुन:ॽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मलो असतो जर वीसजून किंवा एकवीसजून
तर हातातून माथी निसटला असता लाडका मिथुन
म्हणून जन्माने मी एकोणीसजून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. साफ तोंडघशी पडलेले आहे. शेपूट घातलेली आहे. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या लवकर माघार नका. मी शिवाजी महाराज नसलो म्हणून काय झालं? आपण माझ्या जन्मतारखेवरून वाद सुरु करूया. :bigsmile: Biggrin ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ROFL आई ग्ग!!! मी पहील्यांदा इतका मस्त विनोद ऐकला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0