आमची भारतीय प्रमाणवेळ !

‘’अनेक बाबतीत विविधता व मतभिन्नता असलेल्या तुमच्या देशातील नागरिकांमध्ये एखाद्या बाबतीत तरी समानता आहे का हो?’’ असा प्रश्न जर आपल्याला एखाद्या परदेशी व्यक्तीने विचारला, तर त्याचे उत्तर ‘’होय, आम्ही भारतीय, ठरलेली वेळ न पाळण्याच्या बाबतीत समानधर्मी आहोत’’ असे देता येईल!

काय, दचकलात ना हे उत्तर ऐकून? पण वास्तव नाकारून कसे चालेल? आपल्याकडे कुठलाही प्रसंग असो, ठरलेली वेळ ही अभावानेच पाळली जाते. थोडाफार उशीर करणे हा आपला स्थायीभाव आहे. जर कोणी आपल्याला यावरून टोकले तर आपण अगदी बेफिकीरीने मान उडवत अन मनगटावरच्या घड्याळात बघत म्हणतो, ”हा हा, त्यात काय एवढे, ही तर आपली भारतीय प्रमाण वेळ !” वर पुढे खो खो हसून आपल्याला वेळेचे गांभीर्य नसल्याचे दाखवून देतो.

आपल्या शालेय जीवनात आपण वेळेचे महत्व शिकविणारी अनेक वचने, सुभाषिते वगैरे शिकतो. नमुन्यादाखल ही पाहा काही :
‘वेळेचे मूल्य पैशापेक्षाही जास्त असते’,
‘वेळ ही फुकट मिळणारी अमूल्य गोष्ट आहे’.

पण हे सर्व वाचण्यापुरते राहते. मोठे झाल्यावर व्यवहारात त्याचे पालन करण्याबाबत मात्र आपण अगदी उदासीन असतो. बहुसंख्य लोकांमध्ये ही उदासीनता भिनल्यामुळे समाजाच्या अनेक क्षेत्रात वेळ न पाळण्याच्या वृत्तीची लागण झालेली दिसते. त्यामुळे अनेकांना अनेक प्रसंगी नुकसान सोसावे लागते. बघूयात याची काही ठळक उदाहरणे.

बहुतेक सरकारी कार्यालये ही वेळेच्या बाबतीत बेशिस्तीचा वस्तुपाठ घालून देतात. बऱ्याच कर्मचाऱ्यानी कामावर उशीरा जाणे पण, तिथून निघताना मात्र बरोबर वेळेवर निघणे हा पायंडाच पाडला आहे. जसपाल भट्टी यांच्या एका दूरदर्शन मालिकेतील एक सरकारी कर्मचारी अगदी निर्लज्जपणे म्हणतो, ‘’ देखो, शाम ५ बजें दफ्तरसे मेरा निकलना बहोत जरूरी है, क्योंकी दिनमें दोनो टाईम मै कैसा लेट हो सकता हू?’’ बस्स, बहुतेक कर्मचाऱ्यांनी हे वाक्य अगदी वास्तवात आणलेले आहे. या अनागोंदीमुळे जनतेची असंख्य कामे रखडलेली असतात.पण, त्याची फिकीर कोणाला? अर्थात, गेल्या काही वर्षात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात हजेरीच्या ‘बायोमेट्रिक’ पद्धतीमुळे या बेशिस्तीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण आलेले आहे, हेही नसे थोडके.

बर, एक वेळ आपण सरकारी नोकरीचे सोडून देऊ. पण,खाजगी व्यावसायिकांमध्ये तरी काय स्थिती असते? समाजातील अनेक व्यवसाय हे संबंधीत ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ देऊन चालवलेले असतात. पण बऱ्याचदा तिथेही वक्तशीरपणाचा अभाव दिसतो. कधी खूप कार्यमग्न असलेले व्यावसायिक वेळ पाळू शकत नाहीत तर कधी ग्राहकही वेळेवर पोचण्यात बेफिकीर असतात. एकमेकांच्या वेळेची कदर करणे हा आपला अंगभूत गुण नाही, हेच खरे.

आता बघूयात जरा सांस्कृतिक आघाडीवर डोकावून.

बहुसंख्य सभा, संमेलने, उद्घाटनाचे कार्यक्रम इ. नियोजित वेळेपेक्षा उशीरानेच सुरू होतात. त्याची अनेक कारणे असू शकतात पण, मुख्य कारण म्हणजे समारंभाच्या प्रमुख पाहुणे वा अध्यक्षाना उशीरा येण्यातच भूषण वाटते. त्यातून ही मंडळी जर राजकारणी असतील तर मग विचारायलाच नको. अनेक शिक्षणसंस्थांमधील कार्यक्रम तर या बाबतीत अगदी बदनाम झालेले आहेत.कार्यक्रमाच्या दिवशी तेथील विद्यार्थी व कर्मचारी आदीना भल्या पहाटेपासून हजर राहावे लागते.तो कार्यक्रम मात्र वेळेवर सुरू न होता पाहुण्यांच्या येण्याच्या वेळेनुसार सुरू होतो व त्यांच्याच इच्छेनुसार संपतो. आपण वेळ न पाळल्यामुळे आपण हजारो लोकांच्या वेळेचा अपव्यय करतो याची जाणीव अशा मंडळीना कधी होणार?

हां, पण अशा मंडळीना सरळ करणारे काही मोजके संयोजक असतात. त्यासंबंधीचा हा एक घडलेला किस्सा. सुमारे २० वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था. तिचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम ठरला होता. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण होते. कार्यक्रमाचे सूत्रधार होते संस्थेतील एक कठोर शिस्तप्रिय गृहस्थ. कार्यक्रमाची वेळ होती सकाळी १० वाजता. हळूहळू सभागृह भरत होते. ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत पाहुण्यांचा पत्ता नव्हता. ९.५५ ला सूत्रधारांनी घोषणा केली की सर्वानी शांत बसावे, कार्यक्रम बरोबर १० वाजता सुरू होईल. १० वाजले. पाहुण्यांचा पत्ता नव्हताच. तसेच काही निरोपही नाही. १० च्या ठोक्याला सूत्रधारांनी कार्यक्रम सुरू केला. त्यांच्यापुढे बोलण्याची संस्थेतील कोणाची हिम्मत नव्हती. आता कार्यक्रम चालू झाला होता. सुमारे दीड तासाने बाहेर मुख्यमंत्री अवतरले. कार्यक्रम सुरू झाल्याचे त्याना कळले. त्यावर त्यांनी फक्त स्मित केले आणि त्याच क्षणी बाहेरच्या बाहेर निघून जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर संध्याकाळी त्यांनी संस्थाप्रमुखाना फोन करून दिलगिरी व्यक्त केली.तो कार्यक्रम यथासांग पार पडला, हे सांगणे नलगे.
असे वक्तशीर सूत्रधार व त्यांचा आदर करणारे मुख्यमंत्री हा योग दुर्मिळच मानावा लागेल! अन्यथा पाहुणा जेवढा अधिक प्रसिद्ध आणि वलयांकित तेवढा तो जास्तच उशीर करणार असे एक विचित्र समीकरण रूढ झालेले आढळते.

आपण नाटक, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम अशा करमणुकीच्या ठिकाणी तर पैसे मोजून जात असतो. तिथे यायची आपल्याला कुणी सक्ती केलेली नसते. तरीसुद्धा सर्व प्रेक्षक कार्यक्रमाच्या बरोबर वेळेवर तिथे हजर असतात का? बऱ्याच जणांना थोडे उशीरानेच अंधारात चाचपडत आत जाण्यात भूषण वाटते. त्यांच्या उशीरा आत येण्याने उपस्थित प्रेक्षक व कलाकार अशा सर्वांचाच रसभंग होतो हे त्यांच्या गावीही नसते. परदेशात कलाकारांच्या कुठल्याही मैफिलीत असे कोणीही करत नाही कारण तो कलाकारांचा अपमान समजला जातो.

निरनिराळ्या कारणांसाठी आपण सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असतो. त्यासाठी बस, रेल्वे आणि विमान ही साधने आपण वापरतो. या प्रवासांच्या बाबतीत वेळेचा काटेकोरपणा अजूनही समाधानकारक नाही, हे खेदाने म्हणावे लागते. आपले वाहन बरोबर ठरलेल्या वेळी निघाले व पोचलेसुद्धा तर स्वताला भाग्यवान समजायला हरकत नसावी. प्रवासाची वेळ पाळली न गेल्याने अनेक प्रवाशांचे काहीतरी नुकसान होत असते. पण, ही गोष्ट प्रवासी यंत्रणा पुरेशा गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. ‘’आपल्याला होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत’’ असे एक ध्वनिमुद्रित वाक्य वारंवार ऐकवले की त्यांचे काम झाले! जपानमध्ये अगदी दोन मिनिटांचा जरी उशीर वाहन यंत्रणेकडून झाला तर प्रवाशांना चक्क आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते, हे आपण फक्त वाचायचे अन सोडून द्यायचे. असो.

वेळ न पाळण्याच्या बाबतीत अग्रेसर असलेले अजून एक क्षेत्र म्हणजे आपली न्यायालये. ‘तारीख पडणे’ हा बदनाम वाक्प्रचार तेथूनच उगम पावला आहे. एखाद्या पक्षकाराला सुनावणीसाठी ठराविक तारीख व वेळ दिल्यानंतर त्यावेळेस प्रत्यक्ष काम होईलच असे बिलकूल नसते. तारखांवर तारखा पडत सुनावणी महिनोंमहिने लांबत जाते हा सार्वत्रिक अनुभव. याची कारणे काहीही असोत पण, नागरिकांच्या वेळेची किंमत नसणे हीच त्यामागची मनोवृत्ती.

तर सारांश हा की आपल्या नागरी जीवनात आपण कार्यालयीन, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा अनेक आघाड्यांवर वेळेबाबत दक्ष नसतो. एखाद्याने एखाद्या प्रसंगी वेळ न पाळण्याचे परिणाम हे त्या घटनेपुरते मर्यादित राहत नाहीत. हळूहळू सर्वांमध्ये ही वृत्ती मुरत जाते आणि मग तिचे सामूहिक परिणाम दिसू लागतात. एकदा का ‘चलता है’ ही सामाजिक मनोवृत्ती झाला की कार्यसंस्कृती झपाट्याने ढासळत जाते. अनेक मोठे सामाजिक प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास त्यातील प्रत्येकाने आपापली वेळ न पाळण्याचा अवगुण कारणीभूत आहे.

आपले कुठलेही काम वेळच्यावेळी करण्यासंबंधी एक हिंदी दोहा प्रसिद्ध आहे. तो म्हणजे ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब...’. परंतु, आपण भारतीयांनी आपल्या वेळेबाबतच्या बेफिकीरीने पुढील दोहा प्रचारात आणला आहे:

‘आज करे सो कल कर, कल करे सो परसो
जल्दी जल्दी क्या पडी है, जब जिना है बरसों ‘

असे काही लिहिताना मला मनापासून खेद वाटतो. ‘जाऊ द्या, आपण असेच आहोत’ असे हताशपणे म्हणून हा विषय सोडून द्यावासा वाटत नाही. आपण सर्वांनी मनात आणले तर हे चित्र नक्की बदलू शकू.

आजकाल आपल्याला प्रत्येक बाबतीत ‘स्मार्ट’ व्हायची घाई झाली आहे. पण, त्याआधी आपण वक्तशीर होण्याची नितांत गरज आहे.प्रत्येकाने वेळ पाळण्याचे बंधन स्वतःवर घातले तर कुणाचाच वेळ वाया जाणार नाही. त्यातून वाचवलेले कित्येक मनुष्यतास सत्कारणी लावता येतील. शिस्तबद्ध समाज घडविण्याच्या दृष्टीने टाकलेले ते एक महत्वाचे पाउल असेल.
***************************************************************

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

बरीच निरीक्षणे सहमत होण्याजोगी आहेत.
शिक्षणात वक्तशीरपणाचा समावेश झाल्याखेरीज ही सुधारणा होणार नाही. निव्वळ वेळच नाही, पण ट्राफिक नियम, सार्वजनिक स्वच्छता याबाबत म्हणता येईल.
सहज आणि उगीच खोटे बोलणे पण सर्वमान्य असल्यासारखे वाटते.
सगळीकडे उशीरा जाणारे लोक चित्रपटाला किंवा उशीर झाला, उशीरा येण्याने विमान सुटले तर गप ऐकून घेतातच.सगळीकडे वेळ पाळली गेली तर हे आपोआपच सुरळीत होईल.

‘बायोमेट्रिक’ पद्धतीमुळे हल्ली बर्‍याच सरकारी कार्यालयांतही लोक्स वेळेत येतात. पण येऊन करतात काय? हाही महत्त्वाचा मुद्दा असावा.

वीस वर्षांपूर्वीचे मुख्यमंत्री म्हणजे मनोहर जोशी होते ना? त्यांचे वा संस्थेचे नाव का टाळले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानमध्ये अगदी दोन मिनिटांचा जरी उशीर वाहन यंत्रणेकडून झाला तर प्रवाशांना चक्क आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते, हे आपण फक्त वाचायचे अन सोडून द्यायचे. असो.

हे खरे आहे का? कारण जपानमध्ये गेल्यावर काही वेगळच कळायचं.
जसं भारतात असताना ही अतिशयोक्ती ऐकली होती की अमेरिकेत दिवे जात नाहीत (पॉवर आऊटेज) काय तर म्हणे एडिसनच्या जयंतीला फक्त एकदा त्यांनी दिवे बंद ठेऊन श्रद्धांजली वाहीली होती. पण टेक्सास, मिनेसोटा, विस्कॉन्सिन राज्यात दिवे गेलेले अनेकदा अनुभवले आहेत. नेमके आईबाबा आलेले असतानाच २ दा गेलेले मग काय ऐकावं लागलं "अमेरीकेतही हा प्रकार आहे होय!"
.
बाकी बर्‍याच मुद्द्यांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं नाही होत, अत्यंत वेळेत तर असतातच, पण अपेक्शित उशीर आधीच सांगितला तर फाऊल धरत नाहीत!

मला जपानमधे दोन महिन्यात दोनदा ट्रेन उशीरा आल्याचे पहायला मिळालेय. जर्मनीत मात्र आजवर कधीच नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@शुचि : जपानबद्दल मी एका साप्ताहिकात वाचले होते. खरे खोटे जपानच जाणे !

@निरागस : मुख्यमंत्र्यांचा किस्सा मी पूर्वी 'अंतर्नाद' मासिकात वाचला होता.आता प्रत्यक्ष संदर्भ हाताशी नसल्याने नावे देणे टाळले आहे.बहुतेक ते सु. नाईक होते.''सुमारे २० व.'' हे 'सुमारे' या अर्थाने घ्यावे.तसेही या घटनेतील नावांपेक्षा मला कृती अधिक महत्त्वाची वाटते.

प्रतिसादाबाद्दल दोघांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

दुसर्‍याच्या वेळेला किंमत देऊन आपल्या दिरंगाईमुळे त्यांच्या वेळेवर अतिक्रमण होऊ न देणे - किमान तसे जाणीवपुर्वक प्रयत्न करणे - म्हणजे वक्तशीरपणा इतपत वक्तशीरपणाची आवश्यकता मला मान्य आहे आणि मी ती पाळतोही

मात्र स्वतःच्या बाबतीत कोणतीही गोष्ट करण्याची योग्य वेळ कोणती याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला हवे आणि त्याला वक्तशीरपणाच्या बुरख्यात अडकवू नये. "सगळं कस्स वेळच्या वेळी हव्वंच बै!" मधला हास्यास्पद अट्टहास केविलवाणा वाटू लागतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अवांतर : "आपण सर्वांनी मनात आणले तर .." यानंतर लिहिलेली कोणतीही गोष्ट कधीच अमलात येऊ शकत नाही. म्हणून असे बोलून वेळेचा अपव्यय करू नये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0