माथेरान - भाग 1

(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904) यांनी मुंबई, जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांना आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा माथेरान बद्दलचा 1890 मधे लिहिलेला लेख मला मोठा वाचनीय वाटला त्या काळचे माथेरान मुंबईच्या गोर्‍या साहेबांना कसे दिसत होते याची एक झलक आपल्याला या लेखात दिसते. वाचकांना या लेखाचा हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)

ऑक्टोबर महिन्याच्या एखाद्या संध्याकाळी, तिन्हीसांजा झाल्या असताना, माथेरानचा डोंगर चढून घनदाट वृक्षराईमधे दडलेल्या आणि एकमेकात गुंफलेल्या अरूंद गल्यांच्या चक्रव्यूहामधे असलेले आपले घर शोधण्याची तुमच्यावर कधी वेळ आलीच तर अशा वेळी, तुमच्या मनाची काही तयारी आधी झालेली नसली तर अचानकपणे नजरेसमोर येणारे माथेरानचे प्रथम दर्शन मोठे आश्चर्यजनक किंवा विस्मयकारी वाटते. माथेरानच्या डोंगराची खडी चढण चढल्याने शरीराला आलेला थकवा, सदसद्विवेकबुद्धीनुसार वागणार्‍या एखाद्या माणसासारखी इतकी गाढ निद्रा तुम्हाला देतो की सकाळी स्वतःच्या हाताचे बोट स्पष्ट दिसू शकेल एवढा उजेड तरी बाहेर होईपर्यंत जाग येण्याची शक्यताच नसते. जागृतावस्था आल्यावर अशा वेळी जर तुम्ही बाहेर डोकावलात तर आपण एका नव्याच आकाशाकडे आणि पृथ्वीकडे बघतो आहोत असे वाटत राहते. येथे येणारे लोक हे समोर दिसणारे दृष्य बघून ते एखाद्या कलाकाराने चित्रित केलेल्या चित्रासारखे दिसते आहे असे म्हणतात व ते खरेही आहे. एखादा कवी यावर म्हणेल की निसर्गासारखे चित्रण कोण मर्त्य मानव करू शकणार आहे? तर धर्मपंडित या समोर दिसणार्‍या चित्राचे सर्व श्रेय परमेश्वराला देत त्याची आळवणी करतील की तुझी लीला अगाध आहे. तू निर्माण केलेले हे पृथ्वीचे वैभव अफाट आहे. परंतु दुर्दैवाने माथेरान काही वेळा सर्वश्रेष्ठ भासत असले तरी बर्‍याच वेळा अगदी क्षुल्लक दिसते आणि वर उल्लेखिलेल्या आणि एखादी दैवी देणगी भासणार्‍या दृष्यासारखी दृष्ये तुरळक आणि अभावानेच आढळतात. उजाडणार्‍या पहाटेस किंवा धुक्याची चादर लपेटलेल्या कातरवेळी, अस्पष्ट, अव्यक्त आणि विशाल भासणारा माथेरानचा आसमंत, चित्रकाराने समर्थपणे आपल्या चित्रात प्रकाश आणि सावल्या यांचा खेळ रंगवावा तसा काहिसा वाटत राहतो. दूर क्षितिजावर अंधूक दिसणार्‍या टेकड्या, तुम्हाला आल्प्स पर्वतराजींची आठवण करून देतात तर समोरचा अस्पष्ट काळसर रिकामेपणा तुम्हाला मिल्टनच्या काव्यातील वृक्षराईची आठवण करून देतो. नजरेसमोर पसरलेले धुके समोर दिसणारी दरीखोरी अमर्याद्पणे विस्तारलेली आहेत की काय? असा भास निर्माण करतात. परंतु हे सगळे टिकते ते सूर्य वर येईपर्यंत! एकदा का त्याच्या रथाचे घोडे आकाशात वेगाने धावू लागले आणि तो माथ्यावरून आपले डोळे दिपवून टाकणारा प्रखर प्रकाश आकाशात आणि झाडांच्या शेंड्यांवर ओतू लागला की संपूर्ण परिसरच पिवळ्याधम्मक रंगात रंगवलेलला दिसू लागतो. समोरचे जगच मग बदलते. थोड्या वेळापूर्वी समोर दिसणारे व धुक्यात लपेटलेले, कोकणातले कोणा नदीचे खोरे, नदीचा चंदेरी प्रवाह आणि बाजूंना उभे असलेले रमणीय डोंगर हे सगळे अदृष्य होतात व समोर दिसू लागतो एक विस्तीर्ण उठावाचा नकाशा, किंवा मानवाच्या करमणूकीसाठी बनवलेले एक मोठे खेळणे! या आधी एखाद्या चर्चच्या मनोर्‍याप्रमाणे भासणार्‍या, आसमंतात विखुरलेल्या आणि एकमेकावर रचल्या गेलेल्या पाषाण शिला, आणि या शिलांच्या दोन्ही बाजूंनी उतरत गेलेल्या पर्वतराजी, आता कागदी पुठ्यावर वेडेवाकडे कातरकाम करून निर्माण केल्यासारख्या विचित्र आकाराच्या वाटू लागतात.
समोरचा लांबी, रुंदी आणि खोली असलेला देखावा आता जरा हात लांब केल्यावर त्याला स्पर्श करता येईल इतका जवळ आहे असे वाटू लागते. सर्व प्रकारचे आवाज (वाळलेया पानांच्यातून पळत जाणार्‍या सरड्याचा आवाज सुद्धा!, कोणतीही हालचाल, यासारख्या सजीवतेच्या खाणाखुणा एकदम नाहीशाच होतात.. रोजच्या मानवी व्यवहारांचे स्मरण करून देणारा दूरवर दिसणारा मुंबईतला घड्याळाचा मनोरा, अति उष्णतेने क्षितिजे झगमगत राहिल्याने दिसेनासाच होतो. आतापर्यंत तुम्हाला एवढी गौरवनीय भासणारी पर्वतराजी एखाद्या सांगाड्याचे रूप धारण करते. या सांगाड्याच्या फासळ्या आणि हाडे तुमच्यासमोरच्या सपाट जागेवर पसरली आहेत असे भासू लागते. आतापर्यंत नयनमनोहर आणि सुंदर भासणारे तुमचे नवे आकाश आणि पृथ्वी, याचे रूपांतर एखाद्या ज्वालामुखीतून आसमंतात पसरलेल्या धुळीत किंवा राखेत झालेले तुमच्या नजरेसमोर क्षणार्धात येते.
माथेरानला दिसणारे निसर्गसौंदर्य ही बहुधा फक्त आधुनिक जगाची मालमत्ता असली पाहिजे कारण आधुनिक जगतातील लोकच फक्त माथेरानचे कोडकौतुक करताना दिसतात. या आधी या भागावर स्वामित्व असणार्‍या मुसलमान किंवा मराठ्यांना माथेरानची माहितीच बहुधा नव्हती आणि याबद्दल मला त्यांची कींवच कराविशी वाटते. तुघलक आणि त्याचे सैनिक यांना दख्खन म्हणजे एक अभेद्य तटबंदी असलेला दुर्ग वाटत होता. औरंगजेबाचा इतिहासकार खफि खान, दख्खनचे वर्णन “नरकाचे एक उत्तम उदाहरण” या शब्दात मोठ्या नाखुषीने करतो. पण त्या गोष्टीला आता दोन शतके उलटली. एखाद्या वाचकाने, माथेरानची वसाहत फक्त पस्तीस वर्षांपूर्वीचीच आहे हे समजल्यावर असा प्रश्न आता विचारला की कां हो! स्वत:ला एवढे सर्वश्रेष्ठ मानणार्‍या इंग्रजांना, एवढ्या जवळ असलेल्या माथेरानला कां कधी जावेसे वाटले नाही? तर मला त्याचे फारसे आश्चर्य वाटणार नाही. कारण मुंबईला असलेले इंग्रज जरी गेली दोन शतके येथे (मुंबईला) राहून व्यापार करत असले, जेवणावळी उठवत असले आणि लग्नात मुंबई आंदण घेत असले तरी ही सत्य परिस्थिती आहे की गेल्या दोन शतकात, टोपी किंवा टोप घातलेल्या मुंबईच्या कोणत्याही इंग्रजाला, कोणत्याही निरभ्र आकाश असलेल्या दिवशी, स्वतःच्या घराच्या खिडकीतून बाहेर डोकावल्यावर, समोर दिसणार्‍या माथेरानच्या डोंगरावर कधीच जावेसे वाटले नाही. बहुतेक इंग्रजांना, माथेरानचा डोंगर समोर दिसत असला तरी लंडन, पॅरिस किंवा स्कॉटलंड यापुढे दुसरे काही सुचतच नव्हते. नाही म्हणायला एलफिन्स्टनने मात्र खंडाळ्याच्या कड्याजवळ एक घरकुल बांधले होते. इंग्रज लोक तब्येत सुधारण्यासाठी किंवा हवापालट करण्यासाठी बाणकोटला जात. 1771 मध्ये जॉन मॅकडोनल्ड या एका व्हॅलेने लिहून ठेवले आहे की तब्येत सुधारण्यासाठी मुंबईहून बाणकोटला जाणे हे त्याच उद्देशाने लंडनहून लिस्बनला (पोर्तुगाल) जाण्यासारखे आहे. याच काळात काही इंग्रज नौसेनेचे अधिकारी, तानसा तलावाजवळ असलेल्या वज्रेश्वरीच्या उष्ण पाण्याच्या झर्‍यांजवळ दोन महिने जाऊन राहिले होते. अर्थात त्यांना त्या वेळी कल्पनाच नव्हती की भविष्यात एक दिवस मुंबईची पाण्याची गरज या तलावातूनच भागवली जाणार आहे.
मग इंग्रजांनी मुंबई बंदराजवळची खाडी कां कधीच ओलांडली नाही?. या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्टपणे, खाडीच्या पलीकडचा भाग इंग्रजांच्या ताब्यात नधीच नव्हता, या शब्दात देता येते. कारंजा लाड (वाशी) इंग्रजांच्या ताब्यात 1775 मधेच आले होते. परंतु त्या पलीकडला पेशव्यांच्या ताब्यातील मुलुख इंग्रजांच्या अंमलाखाली 1817 मधे आला. असे असले तरी मुंबईची खाडी आणि पलीकडचा किनारा हे आंग्र्यांच्या अंमलाखाली होते आणि ते इंग्रजांच्या ताब्यात 1840 मध्ये आले. त्याच्या आधी आंग्र्यांच्या मुलुखात जाणे म्हणजे एक दिव्यच होते. पनवेलहून पुण्यापर्यंतचा प्रवास करणे त्यामुळेच सोपे नव्हते. मिस्टर करजेनव्हेन हा एक इंग्रज व्यापारी, परवानगीशिवाय आंग्र्यांच्या मुलुखात शिरल्यामुळे, 10 वर्षे गोराई (साष्टी) येथे नजरकैदेत होता.
माथेरानच्या निसर्गसौंदर्याला दाद देण्यासाठी माथेरानची इत्यंभूत माहिती होणे गरजेचे आहे. पांढर्‍या शेवंतीला फुलांमध्ये जे स्थान अहे तेच स्थान माथेरानला गिरिस्थानांमध्ये आहे. दख्खनमध्ये असलेल्या सर्व गिरिस्थानांमागे एक काहीतरी कथा असते. माथेरानच्या मागे कसलीही कथा नाही, कसलाही इतिहास नाही. इतिहासाच्या बाबतीत माथेरान संपूर्णतया मुके आणी बहिरे आहे. माथेरानच्या साधेपणाला कोणताही इतिहास परंपरा किंवा मर्दुमकी यांचा स्पर्शही झालेला नाही. त्यामुळेच पश्चिम भारताच्या इतिहासात कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा संदर्भही नसलेल्या माथेरानला काही स्थानच नाही. माथेरानचा डोंगर दुरून पाहिल्यास सह्याद्री पर्वतराजीमधील अगदी सर्वसामान्य डोंगरांसारखा दिसत असल्याने त्याची मोहिनी कधी कोणावरही पडलेली नाही. हा डोंगर अप्रसिद्धीच्या पदराखाली इतका लपलेला होता की 1850 साली या डोंगराला शोधून काढावे लागले होते. माथेरानच्या डोंगराला कोणताही इतिहासच नसल्याने आनंदाची गोष्ट म्हणजे या डोंगरावर साहजिकपणे कोणतीही तटबंदी नाही. जर मराठे या डोंगरावर कधी आलेच असले तरी त्यांनी पाषाण चिर्‍यांतून बांधलेल्या इमारतींच्या भिंती, टाक्या, तळी, खंदकाच्या भिंती यापैकी काही म्हणजे काही मागे सोडलेले नाही. नाही म्हणायला माथेरानच्या पॅनोरामा पॉइन्टला कधी गेलात तर दरवर्षी अनेक वादळांना तोंड देत असूनही उंच मान वर काढलेला व सागरगडाची (अलिबाग तालुका, रायगड जिल्हा) छोटी प्रतिमा भासणारा समोरचा पाषाण बघितल्यावर, त्याच्या भोवती तटबंदी, खंदक, त्यावरचा पूल आणि पुढे वर-खाली सरकणारा लोखंडी चौकटींचा दरवाजा हे सर्व कधीकाळी असले पाहिजे अशी कल्पना कोणाच्याही मनात येणे सहज शक्य आहे. कल्पनाविश्वात हरवलेल्या अशाच कोणीतरी, कदाचित या पाषाणाचे नामकरण, “ग़डाची सोंड” म्हणून केलेले असावे. नाहीतर एखाद्या खर्‍याखुर्‍या गडाची आठवण करून देणारे हे नाव पॅनोरामा पॉइन्टच्या पाषाणाला देण्याचे कोणतेही प्रयोजन मला तरी दिसत नाही. निरभ्र आकाश असलेल्या कोणत्याही दिवशी पॅनोरामा पॉइन्टवर उभे राहिले असताना समोर दिसणार्‍या चाळीस एक किलोमीटर्स त्रिज्येच्या परिघात, कर्नाळा, घनगड, विकटगड, मलंगगड आणि ज्यावर टाक्या, बुरुज खंदक या सर्वांचे भग्नावशेष दिसतात आणि ज्याला माथेरानची जुळा भाऊ म्हणता येते तो प्रबल किल्ला (शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली हा मुलुख येण्याच्या अगोदर कल्याणचा सुभेदार या किल्ल्यावर आपला उन्हाळा घालवत असे.) या सारखे, अगदी अनपेक्षित स्थानांवर उभे असलेले, निदान पन्नास तरी गड सहजपणे दिसू शकतात. असे अनेक गड या परिसरात विखुरलेले आहेत. मराठ्यांच्या अंमलात यापैकी प्रत्येक गडावर शिबंदी तैनात केलेली असे. या सर्व गडांना एक इतिहास आहे. मात्र माथेरानच्या डोंगरावर तुम्हाला इतिहास असलेली एखादी विहिर, भुताटकी साठी कुप्रसिद्ध असलेला एखादा वाडा, कोण्या मर्दाने मर्दुमकी गाजविल्यामुळे पावन झालेले किंवा कोण्या क्रूरकर्म्याच्य हिंसेमुळे भ्रष्ट झालेले एखादे स्थान यातले काहीही औषधाला सुद्धा सापडणार नाही, सह्याद्रीच्या कडेकपारींच्या आसपास असलेल्या या परिसराला, खरे तर बौद्ध पंथियांनी पाषाणकड्यांवर खोदलेल्या लेण्यांचे आगर म्हणता येईल इतकी लेणी माथेरानच्या जवळपास (कार्ले, भाजे, कोंडाणे वगैरे) आहेत परंतु माथेरानच्या पाषाणकड्यांवर कोणतेही भव्य खोदलेले लेणे तर सापडत नाहीच पण त्या शिवाय इतर अनेक डोंगरावर दिसतात तशा एखाद्या शिकाऊ शिल्पकाराने लेणी खोदण्याच्या चुकतमाकत केलेल्या प्रयत्नाच्या खाणाखुणाही कोठे आढळत नाहीत. माझी तर खात्रीच आहे की माथेरानच्या अनाघ्रात जंगलांमध्ये पाषाणावर खोदकामाच्या छिन्न्या चालवण्याचा आवाज कधी घुमलेलाच नाही. हिंदू धर्मिय देखील माथेरानच्या वाटेला बहुधा कधी गेलेच नाहीत. रायगड किंवा इर्शालगड चढत असताना पाषाणात खोदलेल्या आणि त्यावर शेंदूर लेपलेल्या मारुतीच्या प्रतिमा जशा दिसतात तशा माथेरानच्या डोंगरावर कोठेही बघायला मिळत नाहीत.
लुइझा पॉइन्टच्या टोकाला नैसर्गिक रित्या आकार मिळालेला, मानवी डोक्याच्या आकाराचा एक पाषाण दिसतो. विलक्षण गोष्ट म्हणजे या डोक्याच्या आकाराच्या पाषाणाच्या खालच्या बाजूस जो दुसरा पाषाण आहे तो अस्पष्टपणे मानवी खांद्याच्या आकाराचा दिसतो. येथे अशी एक दंतकथा सांगतात की हे मानवी डोके खोदण्याच्या प्रयत्नाची सुरूवात इजिप्तमधून येथे आलेल्या कोण्या शिल्पकाराने केली होती. दुर्दैवाने या परिसरात असलेल्या बौद्ध लेण्यामध्ये इजिप्त मधील शिल्पकारांनी आपली कला प्रदर्शित केल्याचा काहीच पुरावा कधीही मिळालेला नाही. त्यामुळे या दंतकथेला भाकडकथाच म्हटले पाहिजे. परंतु माझी खात्री आहे की जर इजिप्तमधील स्फिंक्स किंवा मेमनॉनची भव्य मूर्ती साकारणारे शिल्पकार मोठ्या संख्येने माथेरानला आले असते तर इजिप्तमधील या दोन्ही शिल्पांना लाजवणारे किंवा नगण्य ठरवणारे अतिविशाल शिल्प या शिल्पकारांनी लुइझा पॉइटच्या पाषाणातून साकारले असते.
माथेरानला इतिहास नसला किंवा येथे कोणत्याही पुराणवस्तू सापडत नसल्या तरी दुसरे एक गुणवैशिष्ट्य माथेरानमधे विपुलतेने आढळते व ते दाखवून देण्याचे श्रेय मी डेव्हिड लिव्हिंग्स्टन (1813-1873) या शास्त्रज्ञाला कृतज्ञतापूर्वक देऊ इच्छितो. सन 1865 मध्ये या शास्त्रज्ञाने माथेरानला भेट दिली होती. त्यावेळी त्याला त्याच्या बरोबर प्रवास करणार्‍या एका मित्राकडून (डी. ओवेन) अशी विचारणा केली गेली होती की पॅनोरामा पॉइन्टवर उभे राहिले असता जो देखावा दिसतो त्याच्यापेक्षा जास्त सुरेख देखावा त्याने आपल्या प्रवासात कोठे बघितला आहे कां? या प्रश्नाला लिव्हिंग्स्टनने अगदी सरळपणे आपण याच्यापेक्षा जास्त सुरेख देखावा आपल्या प्रवासांच्यात कधीच न बघितल्याचे कबूल करून टाकले होते. लिव्हिंग्स्टनच्या भेटीनंतर दोन-तीन वर्षांनंतर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन (1821-1890) या सुप्रसिद्ध लेखकाने सुद्धा माथेरानला भेट दिली होती. या भेटीच्या दरम्यान, पॅनोरामा पॉइन्टवर असताना, बर्टनला, लिव्हिंग्स्टनने पॅनोरामा पॉइन्टवरून दिसणार्‍या देखाव्याबद्दल काय उद्‌गार काढले होते ते कोणीतरी सांगितले होते. तेंव्हा त्याने काय उत्तर दिले असावे? तो म्हणाला होता की “लिव्हिंग्स्टनने कुठे काय जग बघितले आहे? त्याने फक्त स्कॉटलंड आणि थोडीफार आफ्रिका फक्त बघितली आहे.” आता यावर काय बोलणार? कोणाला काय आवडेल आणि आवडणार नाही? ते सांगता थोडेच येणार आहे. असे सांगतात की आफ्रिकेतील माल्टा देशाच्या एका रहिवाशाने इंग्लंडहून आपल्या देशाला परत गेल्यावर असे उद्‌गार काढले होते की “येथे असणार्‍या हिरव्यागार उसाच्या शेतांचा त्याच्या डोळ्यांना फार त्रास होतो आहे.” लंडनधील “दि स्टॅन्डर्ड” या वर्तमानपत्राचा वार्ताहर जे. ए. कॅमरॉन याला माथेरान मध्ये भटकंती करायला खूप आवडत असे व प्रत्येक भेटीनंतर तो गॅझेट मध्ये त्याबद्दल लिहित असे.
क्रमश:
8 जून 2018

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढली आहे.
माथेरानला एकटेच भटकण्यात फार मजा येते. माझा आवडता डोंगर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद चांगला वठला आहे. मर्दुमकी या शब्दाचा वापर आवडला.
तपशिलातली छोटीशी नजरचूक : " कारंजा लाड (वाशी) हे इंग्रजांच्या ताब्यात १७७५ मध्येच आले होते." हे विधान बरोबर नाही . लाडाचे कारंजे हे गाव वाशीम जिल्ह्यात येते तर कारंजा बंदर हे उरणजवळ येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते वाशीम म्हणायचे असेलसे दिसते. कारंजा लाड हे गाव वाशिम जिल्ह्यातच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखकाला करंजा बंदर अभिप्रेत आहे जे इंग्रजांच्या ताब्यात १७७५ मध्येच आले होते. आणि हे करंजा उरणजवळ एक महत्त्वाचे सागरी ठाणे होते.मुंबई बंदराच्या खाडीवर नजर आणि वर्चस्व राखण्यासाठी ते उपयुक्त होते. पण पनवेलीपलीकडचा माथेरानपर्यंतचा आणि पुढचा मुलूख १८१८ पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता त्यामुळे माथेरानला इंग्रज लोक उशीरा पोचले. लाडाचे कारंजे हे वाशीम जिल्ह्यातील गाव आणि नाव अन्य काही कारणांमुळे अलीकडे लोकांना अधिक माहितीचे असते त्यामुळे नजरचूक झाली असेल. वाशी या गावाला लष्करीदृष्ट्या त्या काळी काहीच महत्त्व नव्हते. खांदेरी उंदेरी, करंजा ही महत्त्वाची ठाणी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महिकावतीच्या बखरीत कोंडिविटे/ कोंदिविटे गावाचा उल्लेख आहे. कित्येक हौशी इतिहासप्रेमी हे कोंदिविटे म्हणजे कर्जतजवळचे कोंडिवटे गाव समजतात. कारण राजमाचीच्या ट्रेकसाठी हे पहिल्या पडावाचे (बेस विलेज) गाव असल्याने इतिहास आणि दुर्गप्रेमींच्या वर्तुळात ते अलीकडे परिचयाचे असते. पण महिकावतीच्या बखरीतले कोंदिवटे / कोंदिविटे म्हणजे महाकाली गुंफांच्या डोंगराच्या पायथ्यालगतचे पूर्वीच्या अंधेरी तालुक्यातले गाव. प्रतापपुर, मरोळ, कोंडिविटे ही बिंब राजाच्या राज्यात महत्त्वाची महसुली गावे होती. बिंब राजाचा मुलगा प्रतापबिंब याने मरोळनजीक प्रतापपुर वसवले जे आज परजापुर, परजापोर अशा नावांनी ओळखले जाते. कोंडिविटेच्या बाबतीत ही गल्लत एक मराठी संस्थळावर महिकावतीच्या बखरीवरील लेखमालेतही झालेली आहे. संस्थळावरील माहिती सहज उपलब्ध असल्याने बरीच वाचली जाते जाते आणि संदर्भ म्हणूनही दिली जाते. त्यामुळे या गल्लतीगफलती खऱ्याच मानल्या जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ इंग्रजी लेखात Karanja असा उल्लेख आहे. गूगल बाबाला शोध घ्यायला सांगितल्यावर कारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील गाव आणि उरण जवळचे कारंजा बंदर अशा दोन शक्यता पुढे आल्या. मूळ लेखात असाही उल्लेख आहे की आंग्रे यांच्या अंमलाखालील मुलुख इंग्रजांच्या ताब्यात 1840 पर्यंत तरी आलेला नव्हता. म्हणजे 1775 मध्ये कोकण किनारा व उरण जवळ असलेले करंजा बंदर आंग्रे यांच्या अंमलाखालीच तेंव्हा असले पाहिजे. त्यामुळे या लेखात उल्लखिलेले Karanaja हे गाव वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हेच असले पाहिजे असे मला वाटते. इतिहासाच्या एखाद्या अभ्यासकाने जुने कागदपत्र तपासून जर याच्या उलट स्थिती असल्याचे दाखवून दिले तर माझ्या अनुवादात योग्य तो बदल करण्यास माझी काहीच हरकत नसेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू १७२९ मध्ये झाल्यानंतर औरस पुत्र शेखोजी आणि संभाजी यांनी काही काळ आरमार सांभाळले. अनौरस पुत्र तुळाजी याला ब्रिटिश आणि छत्रपती+ पेशवे यांच्या सहकार्याने झालेल्या १७५६ साली विजयदुर्गच्या लढाईत कैद करण्यात आले. या लढाईत विजयदुर्ग जरी आंग्र्यांच्या ताब्यात काही काळ राहिला तरी ब्रिटिशांनी आंग्रे आरमाराचे होता होईल तेव्हढे नुकसान केले. कोंकण किनाऱ्यावरच्या आंग्र्यांच्या वर्चस्वाला शह बसला. ब्रिटिशांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले कारण आंग्र्यांच्यानंतर सरखेल बनलेले धुळप तेव्हढे प्रभावी नव्हते. संपूर्ण उत्तर कोंकणाच्या किनाऱ्यावरची हुकूमत ब्रिटिशांकडे आली. पुढे १८१८ मध्ये पेशवाई खालसा झाल्यावर आंग्रे यांनी ब्रिटिशांचे मांडलिकत्व पत्करले. विजयदुर्गावर नाममात्र ताबा राहिला. खरा ताबा ब्रिटिशांकडेच होता. मात्र, आंग्रे घराण्याचे पूर्वापार चालत आलेले एक वतन किंवा एक छोटेसे राज्य पुण्याजवळ होते. ते वीर राणा संक या नावाने ओळखले जाई. या संक राज्याचे पालनकर्ते म्हणून आंगरे यांना संकपाळ अशी उपाधी मिळाली होती. हे इटुकले ' राज्य' १८४० साली खालसा झाले. पण त्याच्या कितीतरी आधी सावंतवाडीपासून मुंबईपर्यंतच्या किनाऱ्यावर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली होती. अंतर्गत भागावर मात्र पेशवाई आणि इतर संस्थाने खालसा होईपर्यंत ब्रिटिशांना स्वैर शिरकाव नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंमळ गडबड आहे तपशिलात. १८४० साली खालसा झालेले राज्य म्हणजे "संक" नसून कुलाब्याचे संस्थान होते. आंग्र्यांचे अगोदरचे आडनाव संकपाळ हे खरेच, परंतु नंतर नंतर त्यांची देशावर काही जायदाद तीही पुण्याजवळ असल्याचा उल्लेख मला तरी माहिती नाही. तुम्हांला नक्की संदर्भ माहिती असल्यास द्यावा. आणि विजयदुर्ग ब्रिटिशांनी १८१८ मध्ये घेतला तो धुळपांकडून- आंग्र्यांकडून नव्हे. १७३४ मध्ये संभाजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर आंग्रे घराण्यात दुफळी झाली आणि एक पाती विजयदुर्ग तर दुसरी कुलाबा ही राजधानी करून राहू लागली. पैकी १७५६ मध्ये संपली ती विजयदुर्ग शाखा. कुलाबा शाखा १८४० पर्यंत सुरू राहिली. पुढे विजयदुर्ग धुळपांकडे होता. १८१८ साली तो ताब्यात घेतला तेव्हा धुळपांच्या एका जहाजाची मोजमापेही नोंदवल्या गेली. मराठी नौदलातील जहाजाचे प्रत्यक्ष मोजमाप आजवर या एकाच उदाहरणात मिळते. बाकी कुठेच नाही. पण मिळणार नाही असे नाही, कारण पेशवा दफ्तरातच आंग्रे दफ्तरही आहे, तब्बल सातेकशे रुमालवालं. त्यात ब्रह्मांड सापडेल हे नक्की.

मराठ्यांचे एकच एक साम्राज्य नसल्यामुळे अनेक शासकांची स्वत:ची नौदले होती. छत्रपतींच्या काळात एकच एक नौदल होते. पुढे बाजीरावाने वसईला स्वत: एक आरमार उभारले. छत्रपतींच्या आरमाराचा एक भाग कोल्हापूरकरांकडे आला (सिंधुदुर्ग किल्ला). आंग्र्यांचे एक नौदल आणि पुढे १७३४ ते १७५६ पर्यंत दोन नौदले. शिवाय गुजरातच्या गायकवाडांचेही एक आरमार होते छोटेसे- ५० जहाजे होती त्यात असे म्हणतात. हे झाले मराठा संघराज्यापैकी असलेल्यांची नौदले. जी मराठी राज्ये शिवपूर्वकाळापासून होती आणि कॉन्फेडरसीशी फटकून वागत त्यांपैकी सावंतवाडीकरांचेही आरमार शेवटपर्यंत टिकून होते. तुलनेने पूर्व किनाऱ्यावरील तंजावरवाले आणि पुढे ओरिसा सांभाळणारे नागपूरकर भोसले यांनी मात्र लढाऊ आरमाराचा उद्योग केलेला दिसत नाही. तंजावरवाल्यांची व्यापारी जहाजे दूरदेशी जात असे काही पुराव्यांवरून दिसते, परंतु ते तितपतच.

यात जर सिद्दीचे आरमार मोजले तर पश्चिम किनाऱ्याचे नाविक मिलिटरायझेशन नेटिव्हांमध्ये तुफान झाले होते असे म्हणावे लागते. तुलनेने पूर्व किनाऱ्यावर मात्र पाँडिचेरीचे फ्रेंच, कलकत्ता व मद्रासचे इंग्रज, नागपट्टण आदि ठिकाणचे वलंदेज आणि तरंगमबाडीचे "डिंगमार" ऊर्फ डेन्मार्कवाले हे वगळता नेटिव्हांची आरमारे काही दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संकपाळ आडनाव हे शंखपाळ पासून आलेय असे नुकतेच समजले, एका मित्राने त्याचे मूळ आडनाव आणि कुलनाव शंखपाळ हे सांगितले. त्याच्या लग्नपत्रिकेवर कंसात लिहिलेले होते ते, कागदोपत्री वेगळे आडनाव आहे, त्यांचे काही नातेवाईक संकपाळ लावतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय हे वाचले होते मध्ये कुठेतरी. फेसबुकावरच कुणीतरी सांगितलेले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१८४० मध्ये खालसा झालेले राज्य म्हणजे कुलाबा किल्ला हेच खरे आहे. वीर राणा संक अशा नावाच्या जहागिरीचा अथवा संस्थानाचा उल्लेख विकीवर आहे पण त्याला पुरावा दिलेला नाही. विकीवरची माहिती एरवीही पूर्णपणे ग्राह्य नसतेच.
पण १८४०च्या आधीपासूनच आंग्रेवंशज कंपनी सरकारचे मांडलिक झाले होते आणि त्या आधीपासूनच कंपनीसाठी त्यांचे मुंबईपुरतेतरी उपद्रवमूल्य अगदीच कमी झाले होते. त्यामुळे मुंबई बंदराच्या आजूबाजूला स्वच्छंद विहार करताना ब्रिटिश नागरिकांना असुरक्षित वाटण्याचे अथवा इतरांची परवानगी घेण्याचे कारण उरले नव्हते.माथेरानकडे ब्रिटिश आधीच का वळले नाहीत हा मूळ लेखकाला पडलेला प्रश्न पटण्याजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम लेख. आता मात्र, एतद्देशीयांनी माथेरानचे अर्धे सौंदर्य घालवून टाकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखात नसले तरी इथे परिच्छेद पाडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उघडा माळ असा भाग माथेरानवर फारच कमी त्यामुळे गडासाठी विचार झाला नसेल. नव्वद टक्के कड्यांवरची माती ढासळते, बुरुजांसाठी कामाची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हि जाहिरात नाही . पण माथेरान येथे 'व्हरांडा इन द फॉरेस्ट' इथे राहून साहेबी ( र्हान , खान , पान ) अनुभव घ्यावा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबापट, माथेरान पर्यटन धागा काढा. तुमचे अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरट बाबा , माझा अनुभव मर्यादित . तुमच्यापुढे तर अतिक्षुल्लक . तुम्हीच काढा. आणि फक्त माथेरान नको , इतरही सगळं येउद्या .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न पाहिलेलं बरंच आहे आणि ते तिथल्या हॅाटेलांविषयी असणार. मी कधी त्यांत गेलोच नाही.
बाहेरून पाहिलं तर रगबि,उषा एस्कॅाट, सिल्वन, बॅाम्बे इत्यादी हॅाटेलांच्या गेटबाहेर नेहमीच उत्तमोत्तम घोडे घेऊन घोडेवाले उभे असताना दिसतात.
माथेरानला येऊन राहाणे ही मुंबईतल्या बय्राच श्रीमंत ( पारशी, मुसलमान व्यापारी) कुटुंबांची लाइफस्टाइल आहे. दुपारच्या वेळी त्यातली कोणी ललना पेमास्टर पार्कमध्ये बाकड्यावर नॅावल वाचताना दिसेल. दोनचार दिवसांत माथेरान करण्या/उरकण्याच्या धडपडीत कोणी दिसणार नाही. माथेरानच्या झाडीत बय्राच गोष्टी लपलेल्या आहेत. हळूहळू शोधायच्या आयुष्यभर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माथेरानच्या सृष्टीसौंदर्याबरोबरच माझ्या मनात घर करून राहिली आहेत तिथली बऱ्यापैकी आक्रमक माकडं आणि बाथरुम्समधे असलेले पाद्रे किडे. शिवाय पर्यटकांची गर्दीच गर्दी.
भाषांतर ठीक आहे. पॅसिव्ह व्हाइस तसाच का राखावा बरं ?
... त्याला .... एका मित्राकडून (डी. ओवेन) अशी विचारणा केली गेली होती ... ऐवजी "सहप्रवासी डी. ओवेनने असं विचारलं" म्हटलं तर ? सहप्रवासी मित्रही होता हा तपशील समजा सुटला तर कितीसा फरक पडेल, वाक्य तर मराठी वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माकडे आणि किडे यांचा उल्लेख लेखाच्या पुढच्या भागात आलेला आहे.
कोणत्याही इंग्रजी लेखाचा अनुवाद करताना माझा असा प्रयत्न असतो की मूळ लेखाचा सूर आणि लज्जत ( tone and flavour) ही अनुवादात आली पाहिजे. मूळ लेख जर कर्मणि प्रयोगात लिहिलेला असला तर अनुवाद करताना तो तसाच राखावा असे मला वाटते. कर्मणि प्रयोगातील शब्दरचना मजकूराला काहीसा तटस्थ निरिक्षणाचा सूर देते. लेख जर मुळात इंग्रजी लेखकाने लिहिलेला असला तर त्याचा अनुवाद सुद्धा तसाच वाटला पाहिजे. त्याचे मराठीकरण करण्याची कल्पना मला फारशी रुचत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाद घालायचा कंटाळा आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तो प्रयोग " विचारणा केली गेली" आवडला कारण त्याकाळी लांबलचक पत्रे पाठवली जात, वेळ घेत ती पोहोचत, त्यांचं ठराविक वेळी वाचन होऊन तितकीच मोठी उत्तर पाठवली जात असत. आणि मग जतन केली जात असत. ( फळांच्या करंड्याही टपालाने पाठवत असावेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0