माथेरान- भाग 2

कॉव्हेनन्टर्स पंथियांमध्ये (स्कॉटलंडमधील ख्रिस्ती धर्मियांचा एक पंथ) अशी एक समजूत होती की त्यांचे पर्वत किंवा टेकड्या या त्यांच्याबरोबर चित्रगुप्ताच्या दरबारात येतात. त्याच धर्तीवर माझ्या असे ऐकण्यात आले आहे की, भारतात आपले सर्व आयुष्य घालवल्यावर जे लोक (अर्थातच इंग्रज), म्हातारपण, जास्त श्रीमंती, व्याधीग्रस्तता, बदल हवा म्हणून किंवा नुसता आळशीपणा या सारख्या कारणांमुळे, भारत सोडून इंग्लंडला परत जाउन आपले एकाकी आयुष्य जगत असतात त्यांना भारतातल्या पर्वतराजींच्या स्वप्नांनी पछाडलेले असते. त्यांना माथेरान व तेथील सुखद वनराई यांची स्वप्ने रात्री पडत राहतात आणि मग अचानक स्वप्नामधून जाग आल्यावर त्यांना मोठ्या दुख्खद अंतकरणाने इंग्लंडधील नोव्हेंबर महिन्यातील थंडी किंवा धुक्याच्या सत्याला सामोरे जावे लागते. माथेरानला भेट देणार्‍या जवळ जवळ प्रत्येकाचे कुठेतरी कोणाबरोबरतरी नाजूक स्नेहसंबंध माथेरानमधे जुळून येतात. माथेरानच्या मातीमधेच हा एक नैसर्गिक स्नेहसंबंध वर्धनाचा गुण आहे. फार पूर्वी अशी प्रथा असे की प्रत्येक लहान मुलाला वर्षातून एकदा तरी जेरुसलेमला न्यायचे. त्याच धर्तीवर मी म्हणेन की प्रत्येक इंग्लिश आई आपल्या मुलांना वर्षातून एकदा तरी माथेरानला नेतेच. हे मी सांगायला विसरलो की माथेरान या शब्दाचा स्थानिक भाषेतील अर्थ “वनराई फुललेले मस्तक” असा आहे. या वनराई फुललेल्या मस्तकाच्या आवती-भोवती जे स्नेह-संबंध जुळून येतात त्यांची किंमत सोन्याचांदीच्या भावांमधे कधीच करता येत नाही. त्यामुळेच या स्नेह-संबंधांमुळे निर्माण झालेल्या जवळिकीपुढे सोन्याचे तेज अगदीच निष्प्रभ वाटते. फुलांनी मोहोरलेल्या एखाद्या “वारस” वृक्षाच्या शुभ्र फुलांप्रमाणे निर्भेळ असलेले मायेचे किंवा प्रेमाचे बंध येथे जुळतात व कधीच न संपणार्‍या उन्हाळ्यात माथेरानची वनराई जशी हिरवीगार राहते त्याचप्रमाणे हे बंध नेहमीच ताजेतवाने रहातात. स्पेन मधे एक विचित्र समजूत आहे. या समजुतीप्रमाणे मदनाचा जन्म वेरुळ लेण्यांमध्ये झाला होता. पण इथले अनेक लोक (अर्थातच इंग्रज) असे मानतात की मदनाचा जन्म माथेरानलाच झाला असला पाहिजे आणि त्यामुळेच या लोकांच्या कैलास लेण्यांचे मजले, या मनोरम आणि निसर्गरम्य स्थानामधेच रचले जातात. परंतु प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू ही असतेच. त्याप्रमाणे अनेक दुख्खी निरोप किंवा विरह यांना सुद्धा माथेरान साक्षी असते. कधी अफगाणिस्तान मधील युद्धाचे ढग क्षितिजावर जमा होतात तर कधी सूदान आणि अ‍ॅबिसिनिया मधील गिधाडांचे पंख माथेरानवर घिरट्या घालू लागतात. अशा वेळी एखादा सैनिक आपल्या प्रियेचा निरोप घेताना माथेरानला दिसतो. युद्ध संपेपर्यंत तो परत येत नाही हे खरे! पण एक दिवस तोही माथेरानला परततोच.

मायेचे आणि प्रेमाचे हे नाजूक बंध इथेच सोडून आपण आता दुसर्‍याच एका जगाकडे-कीटक आणि सरपटणारे प्राणि यांच्या जगाकडे-वळूया. एलिफंटा बेटावर सापडणारा प्रसिद्ध सोनेरी कीटक येथे उडताना दिसतो. माझी खात्री आहे की प्रसिद्ध लेखक एजर अ‍ॅलन पो याने आपली ‘सोनेरी कीटक’ ही गोष्ट अशाच कोणत्या तरी कीटकाला बघून लिहिली असली पाहिजे. कीटकशास्त्राच्या पुस्तकांत तुम्हाला या कीटकाचा उल्लेख सुद्धा सापडणार नाही. फ्रान्सिस बकलन्ड (1826-70) या प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञाला या कीटकाचे दोन नमुने पाठवण्यात आले होते व ते बघितल्यावर या कीटकांसारखे संदर कीटक आपण आपल्या आयुष्यात यापूर्वी कधी पाहिले नव्हते असे उद्‌गार त्याने काढले होते. मुंबई इलाख्यावर जेंव्हा टोळधाड आली होती (1890) तेंव्हा चौक पॉइन्टवर त्यांचे थवे लाखोंनी उतरले होते आणि आसमंतात दिसणारी प्रत्येक हिरवी गोष्ट त्यांनी खाऊन फस्त केली होती. झाडांचा रंग तेंव्हा लालभडक झाला होता तर फांद्या गुलाबी-लाल दिसत होत्या. ते दृष्य अक्षरशः अद्भुत दिसत होते. डार्विनने हाच लाल रंग दक्षिण अमेरिकेतील “पांपस” या सपाट प्रदेशात बघितला होता. तो या टोळधाडीचे वर्णन करताना लिहितो. “आम्ही जवळ गेल्यावर भुर्र आवाज करत त्यांनी उड्डाण केले”. एका भयानक घटनेचे इतके सौम्य वर्णन कोणी केले नसेल.

माथेरानला साप आहेत का? या प्रश्नाचे सरळ उत्तर देणे कधीच शक्य होणार नाही. तुम्हाला सापाचे दर्शन हवे असले तर तो तुम्हाला दिसणारच नाही पण तुम्हाला सापापासून चार हात दूर रहायचे असले तर ते तुम्हाला कोठेही, तुमच्या अंथरूणात, बुटांमध्ये, स्वच्छता गृहात सरपटताना दिसतील. माथेरानमधे सापांचे दर्शन तुम्हाला अत्यंत अनपेक्षित ठिकाणी आणि अनपेक्षित वेळी होते. माथेरानच्या सर्पांबद्दल अनेक सुरस कथा ऐकायला मिळतात. एका कथेप्रमाणे एक इंग्रज महिलेला आपल्या हातरुमालात एक सर्प वेटोळे करून बसला आहे असे बर्‍याच उशीरा लक्षात आले होते तर दुसर्‍या एका कथेप्रमाणे मायकेल स्कॉट याने माथेरान ते नेरळ या प्रवासात आपल्या कोटाचा खिसा जोराने दाबल्यामुळे त्यात बसलेल्या सर्पाचा मृत्यू झाला होता व हे त्याला नेरळला पोहोचल्यावर लक्षात आले होते. डॉ. सिम्पसन हे आपल्या घोड्यावरून रपेट करत असताना एका नागाने त्यांच्यावर हल्ला चढवला होता व डॉक्टरांनी हातातल्या चाबकाचे फटके त्या नागावर लगावल्यावर तो पसार झाला होता अशी एक कथा सांगितली जाते. परंतु मला सर्वात आवडणारी सर्पकथा ही पील याच्या भोजनावळीच्या वेळची आहे. ही पार्टी चालू असताना एक सर्प एका पुष्पगुच्छातून अचानक बाहेर आला व तो डायनिंग टेबलवरून सरपटत गेल्यामुळे भोजनास बसलेले मान्यवर आणि विशेषेकरून महिला यांच्यामध्ये कल्पनातीत गोंधळ व त्यांची घाबरगुंडी उडाली होती. ही कथा ऐकताना मला क्लिओपात्रा राणीच्या अंजिरांच्या करंड्यातून बाहेर आलेल्या सर्पाची आठवण झाली होती. अर्थात क्लिओपात्रा त्या सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडली होती. येथे तसे काहीच घडले नव्हते. ओजनाला आलेली मंडळी मदिरा आणी अक्रोड यांचा आस्वाद घेत असताना त्या सर्पाने टेबलावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता व कोणीतरी एक जाडजूड पुस्तक त्याच्या डोक्यावर मारल्यामुळे त्या बिचार्‍या सर्पाचाच बळी गेली होता. ते पुस्तक म्हणजे सध्याच्या चिल्लर पुस्तकांपैकी नसून फौजदारी कायद्याचा शब्दकोष असल्याने चांगलेच जाडजूड असले पाहिजे व त्यामुळे तो सर्प मेला होता का पळून गेला होता याबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण मला तरी दिसत नाही.

माथेरानमधे असलेल्या धार्मिक उपासना गृहांमधे तेथील इंग्लिश चर्च मला सर्वात आवडते. तेथे देण्यात येणारी प्रवचने जरी कंटाळवाणी असली तरी एकूण वातावरण शांत आणि आल्हादकारक असते. एखाद्या पक्षाची चिवचिव किंवा पानांची सळसळ हे स्पष्टपणे ऐकू येतात आणि चर्चच्या ऑर्गनचा आवाज या सर्वात मिसळून जातो. धनगर लोकांचे श्रद्धास्थान असलेले श्री पिसरनाथ मंदिर याच्या अगदी उलट आहे. काही दगड एकमेकावर रचून हे मंदिर बनवलेले अहे व पूजा केली जाते ती मूर्तीसुद्धा एक पाषाणच आहे. मंदिराजवळ गेल्यावर तेथील पुजारी म्हणत असलेली आरती नेहमीच ऐकू येते. हे मंदिर, जेथे जाण्यास अजिबात उत्साहवर्धक वाटत नाही अशा जंगलाच्या एका कोपर्‍यात बांधलेले आहे. अर्थात माथेरानची धनगर जमात एवढी मागासलेली आहे की त्यांच्या या मंदिराबद्दल, आपण जास्त अपेक्षा ठेवणेही योग्य ठरणार नाही व तशी अपेक्षा बाळगणे हा सुद्धा त्यांच्यावरचा एक प्रकारचा अन्याय होईल. धनगरांच्यात नास्तिक असतात की नाही ते मला माहिती नाही परंतु माझी खात्री आहे की जर कोणी असा निघालाच तर जमातीतील इतर मंडळी त्याला लाथा बुक्क्यांचा प्रसाद देऊन वठणीवर आणत असतील.

माथेरान ही मुळात अतिशय शांत अशी जागा आहे. एखाद्याला आवाज किंवा गोंगाट हे खूप क्लेशदायक वाटत असतील तर त्याच्या मनाला, माथेरान हे संपूर्णपणे आवाज विरहित असल्याने, येथे नक्की शांतता लाभेल. चाके लावलेल्या कोणत्याही वाहनाचा आवाज माथेरानला येत नाही त्यामुळे व्हेनिस, जेरुसलेम किंवा टॅन्जिअर इतकीच शांतता येथे असते. काही वेळा माथेरानला लोक मोठ्या संख्येने आलेले असतात पण ते तुम्हाला दिसत नाहीत. माझा एक मित्र त्यामुळेच माथेरानची तुलना सशांच्या बिळाशी करतो. तो म्हणतो की सशाच्या बिळाजवळ आपल्याला हे माहीत असते की इथे ससे आहेत पण ते दिसत कधीच नाहीत. माथेरानचा सूर्य जेंव्हा अस्ताला जातो- आपण एखाद्या एकाकी बंगल्यात रहात असलो तर तो जरा जास्तच लवकर मावळतो- तेंव्हा माथेरान थोडेसे भितीदायक सुद्धा वाटते. अशा रात्री रातकिड्यांची रात्रभर चालणारी आणि सहन न होणारी किरकिर, जंगलातील वृक्षवाटिकेत, विस्तारलेल्या वडाच्या झाडावर (उलटे लटकण्यासाठी) सर्वोत्तम जागा शोधत उड्डाण करणार्‍या वटवाघळांचा फडफडाट, हे सर्व आवाज कानावर दुख्खी स्वरांसारखे पडू लागतात व मन कापसासारखे होते. त्याला स्वतःच्याच शरिराचा भार सोसेनासा होतो.

माथेरानला भल्या पहाटे प्रथम काय ऐकू येत असेल तर अन्नाच्या शोधात झाडांवरून उड्या मारत जाणार्‍या वानरांचे तार स्वरातील चित्कार आणि चकोत्रीचे पक-पक. माथेरानमधे चकोत्री पक्षी एवढ्या विपुलतेने आढळतात की हे पक्षी आता माथेरानच्या परिसराचा एक भागच बनून गेले आहेत. मोठ्या गैरहजेरी नंतर माथेरानला परत जाण्याची कधी वेळ आली तर पकोत्रीची पक-पक ही तुमच्या स्वागताचा एक भाग असते. माथेरानचा गाणारा पक्षी कोण? या प्रश्नाचे उत्तर मात्र बुलबुल असेच द्यावे लागेल. झाडाच्या सर्वात वरच्या शेंड्यावर बसून माथेरानचे बुलबुल आपले गायन सतत चालू ठेवतात. माथेरानला बगळे दिसत नाहीत असे काही लोकांना वाटते पण हे असत्य असल्याचे मी खात्रीने सांगू शकतो. एकाकी तळ्यांमध्ये बगळ्यांची माळ अतिशय डौलदारपणे पाण्यावरून जलक्रमण करताना अजूनही दिसते. पोहण्यातला त्यांचा डौल व्हिक्टोरिअन जमान्यातील आमच्या महिलावृंदालाही लाजवील असा असतो. माथेरानमधे पाणतळ्यांच्या आसपास पक्षी जरी विपुलतेने दिसत असले तरी एकंदरीत पाहता माथेरानला प्राणीजगत फारसे भेट देताना दिसत नाही हे मात्र खरे आहे. पॅनोरमा पॉइंटवर जाऊन समोरच्या दरीत तुमच्या नजरेसमोर विस्तारलेल्या जंगलावर एखादा मोठासा दगड अगदी कितीही जोराने भिरकावला तर पक्षांच्या किंवा अगदी एका पक्षाच्या भिरभिराटामुळे तिथली शांतता भंग पावली आहे असे सहसा होत नाही. डार्विनच्या मताने जेथे माकडे खूप संख्येने असतात तेथे पक्षी कमी प्रमाणात आढळतात. गाणारे पक्षी माणसांच्या पाठेपाठ जात असले तर माथेरानला जास्त मंडळींनी भेट दिली तर पक्षांची संख्या खरे तर वाढायला पाहिजे. पण तसे काही होताना दिसत नाही.

माथेरानमधे अनेक उणीवा आहेत. ग्लेनब्युरी कॉटेजमधे रहाणार्‍या श्रीमती मॅकक्लार्टी या माथेरानच्या रस्त्यांना नापसंत करतात. त्यांच्या मताने माथेरानला कोठेही जायचे असले तरी सारखे वर चढा व खाली उतरा असे करावे लागते. माथेरान नेरळपासून 7 मैलावर आणि समुद्र-सपाटीपासून 2500 फूट उंचावर आहे त्यामुळे खडी चढण चढल्याशिवाय माथेरानला पोहोचताच येते नाही. घोड्यावरून वर चढण्यास कमीत कमी चाळीस मिनिटे तरी लागतातच. माथेरानचे रस्ते धुळीने भरलेले असतात व मार्च महिना एकदा सुरू झाला की गरम वारे वाहू लागतात, मुंबईपेक्षा तुम्ही सूर्याच्या जास्त जवळ आहात असे भासू लागते आणि दिवस किंवा रात्री या तुम्हाला पुढे येणारे दिवस कसे असणार आहेत याबद्दल सूचनाच जणू देऊ लागतात. या कालातच मग तुम्हाला माथेरानच्या गल्ल्या, तिथली वनराई किंबहुना तिथले सर्वच आवडेनासे होते. घनदाट झाडीमुळे हवा खेळत नाहीये असे वाटू लागते आणि प्रत्येक वेडीवाकडी गल्ली हवा खेळती ठेवण्यास प्रतिबंध करते आहे असे वाटू लागते. माझे मित्र मिस्टर बर्टन यांच्यासारखी मग तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करणे सुरू करता. “चर्चकडे” यासारख्या रस्त्यांवर लावलेल्या मार्गदर्शक पाट्यांबद्दल तुम्ही तक्रार करता; (जसे तुम्हाला तो रस्ता कोठे जातो हे माहितच नाही आणि त्यामुळे दिशा दर्शवणे आवश्यक वाटते आहे) वर आकाशाकडे बघून तुम्ही तक्रार करता; पायाखालच्या जमिनीकडे बघून तुम्ही तक्रार करता; तुमच्या पाईप मधला तंबाखू तुम्हाला अचानक मातीसारखा दिसू लागतो अणि पाईपमधील राख एखाद्या भट्टीची आठवण करून देते. अंधत्व प्राप्त झालेले मिस्टर स्टर्लिंग 1871 मध्ये काही आठवड्यांसाठी माथेरानला राहिले होते. त्यांना माथेरानची गर्द झाडी दिसत नसली तरी त्यांनी ती अनुभवली होती व त्यावर सडकून टीकाही मोठ्यांदा केली होती. त्यांनी म्हटले होते की “मी भेट दिली ते माथेरानचे पॉइंट सोडले तर माथेरानला मोकळी हवा कुठेच अनुभवता येत नाही”.

माथेरानचे धनगर व कातकरी हे एका प्रकारचे वाळलेले गवत विणून त्यापासून जे अलंकार तयार करतात त्यांचा ओझरता का होईना! पण उल्लेख या लेखात करणे मला गरजेचे वाटते आहे. 1878 मध्ये पॅरिस येथे जे आंतराष्ट्रीय प्रदर्शन भरले होते त्यावेळी प्रसिद्ध केलेल्या हस्तपुस्तिकेमध्ये सर. जॉर्ज बर्टवूड यांनी या अलंकारांबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हे अदिवासी हे गवत विणून त्यापासून गळपट्टे, गळ्यातील हार, कंगण, पायातील कडी आणि कंबरपट्टे हे सर्व तयार करतात. गवताच्या या अलंकारांचे डिझाइन हे भारतातील सर्व स्त्रिया ज्या प्रकारचे सुवर्ण अलंकार परिधान करतात त्यासारखेच असते. गळपट्यांचे डिझाइन प्राचीन कालखंडात फ्रान्समधील गॉल अदिवासी ज्या पद्धतीचे गळपट्टे घालत असत त्याच पद्धतीचे पद्धतीचे म्हणजे पीळ किंवा वेणीचे पेड घालून बनवलेले असते. गॉल लोकांशी तुलना ही माझी कल्पना आहे आणि माझ्या मताने ती सयुक्तिक आहे.

माथेरान आणि महाबळेश्वर या दोन्हींना त्यांची भक्तमंडळी आहेत आणि या दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे. महाबळेश्वर हे पाच नद्यांचे उगमस्थान आहे व त्यापैकी एक नदी, पवित्र मानलेली व बंगालच्या उपसागराला मिळणारी, कृष्णा नदी ही आहे. महाबळेश्वरला कृष्णा नदीच्या उगमाजवळ जे मंदीर आहे ते जॉर्डन नदीच्या उगमाजवळ असलेल्या ”बनिआज” मंदिरापेक्षाही प्राचीन बहुधा आहे. महाबळेश्वरमधून उगम पावणर्‍या वेण्णा नदीचे खोरे हे माथेरानच्या उल्हास नदीच्या खोर्‍यापेक्षा जास्त नयनमनोहर आहे यात शंकाच नाही. महाबळेश्वरला माथेरानचा मोठा भाऊ म्हटले तरी चालेल. माथेरानच्या मानाने महाबळेश्वर जास्त सुयोग्य पद्धतीने आणि पद्धतशीरपणे वसवले गेले आहे व त्याला निसर्गाची सुद्धा साथे लाभलेली आहे. त्यामुळेच महाबळेश्वरला राहणे हे जास्त सुखकर होते. माथेरानचा खडबडीत रानटी आराखडा त्यामुळे महाबळेश्वरला दिसत नाही व याच कारणासाठी रानटी आणि कडक परिसराची आवड असलेल्या अनेक इंग्रजांना महाबळेश्वर आवडत नाही. माथेरान त्या मानाने तुकड्या-तुकड्यात विभागलेले आहे. मानव किंवा निसर्ग यांच्या प्रयत्नांनी माथेरानचा जो भाग मोकळा केलेला आहे तो सोडला तर माथेरानचा बाकी सर्व परिसर हा घनदाट वृक्षराईने झाकलेला आहे. या झाडीच्या मुळाशी असलेल्या मातीतील ओलावा अगदी मॉसूनचे आगमन होण्याच्या वेळेपर्यंत टिकून राहतो. यामुळे आजूबाजूचा पठारी प्रदेश सिरिया मधील वाळवंटासारखा पिवळट ब्राऊन रंगाचा झाला तरी माथेरानच्या वृक्षराईतील झाडांची पाने तजेलदारच दिसतात आणि ते दमास्कस पेक्षाही जास्त हिरवेगार दिसते. हातकागदाचा एखादा कागद चुरगळून टेबलावर ठेवला तर तो जरा वेळाने जसा परत उलगडतो. माथेरानचा परिसर तसाच त्या उलगडलेल्या कागदासारखा प्रत्यक्षात आहे. खोल घळी, अरूंद घाटनळी आणि इंग्रजी व्ही आकाराच्या मोठ्या दर्‍या हे भौगोलिक विशेष माथेरानला चहुबाजूला दिसतात.

11 जून 2018

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Matheran Hill - Its People, Plants and Animals ह्या JY Smith, Bombay Medical Staff नावाच्या लेखकाने लिहिलेल्या आणि १८७१ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात प्रारंभी माथेरानच्या स्थापनेबद्दल मनोरंजक माहिती आहे. ती सर्व भाषान्तरित करण्याऐवजी येथेच पुस्तकाची पहिली ५ पाने चिकटवीत आहे,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंदराव, हे आवडलं. याची स्कॅन-पिडिएफ बरी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरट बाबा , परवा उल्लेख केला तो व्हरांडा , वर उल्लेख केलेल्या कॅप्टन Barr नि बांधलेला बंगला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दस्तुरीच्या उजवीकडचा {व्ह्यु} पॅाइंट बॅरी पॅाइंट हा Barry/Barr दोन वेगळेही असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माथेरानला आत्तापर्यंत पांच वेळा जाऊन आलो, तरी एवढी माहिती नव्हती. मला तरी, तुलनेने, महाबळेश्वरपेक्षा माथेरानच जास्त आवडते. त्याचे प्रमुख कारण, वाहने नसणे. वडील जेंव्हा टाटात नोकरीस होते तेंव्हा, टाटा हॉलिडे होम मधे, दिवसाला फक्त आठ आणे भाडं होतं. पंधरा दिवस रहाण्यासाठी तिथे तात्पुरते रेशन कार्डही काढले होते. फक्त , ५ पैशांचा पतंग तिथे २५ पैशाला, म्हणजे फारच महाग वाटला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही हॅाटेलांचे मालक तिथेच राहतात. मुंबईत येऊन जाऊन असतात. ओफ सिजन असला की यांना (आणि यांच्या कँटिन स्टाफला गप्पा मारायला कुणी हवेच असते. बरीच माहिती कळू शकते, थोडी किल्ली मारायची आइडिया/शक्कल हवी.
एकदा गिरिविहारमध्ये एकटाच राहिलेलो. रात्री मालकाने बाटली मारली आणि बरळत होता कायकाय.
सकाळी कुक,वेटर, मी आणि मालक चौघेच नाश्त्याला. मग दुधाचाच चहा केला. भरपूर पोहे. ( चहापोहे २५ आणि पूर्ण फॅम्ली रुमचे भाडे १५०) आचारी बोलला आता सिजनला एकेका कपल'चे पाच हजार रु घेतलेत, तुम्हाला १५०रुपयांत रुमच दिली याने.
आदल्या दिवशी रूम द्यायलाच तयार नव्हता. " पुरा माथेरान खाली है लेकिन अकेले आदमी को रुम देने का नही पोलिस ने बोला है। वैसा मेरा लायसन है होटल का।" मी स्याकमधून इलेक्ट्रिक, फोनबिल बाहेर काढले. " अरर, इसको रुम दिखाओ, १५० रुपिया।" मग गप्पा झाल्या.
मजा असते माथेरानमध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मस्त आहे. गफ्फा काय झाल्या? (डायवर, वेटर, आचारी आणि दारू प्यायलेला माणूस हे खरे ज्ञानी असतात)
तुम्ही ट्रेक ला जाताना लाईट बिल बरोबर का ठेवता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गफ्फा ,दारू प्यायलेला माणूस हे खरे ज्ञानी असतात)
म्हणजे हे निर्बंध मोकळेपणाने मतं देतात. बाजुच्या हॅाटेलवाल्याने एकाला/कपलला रुम दिलेली त्याबद्दलची काही माहिती सांगत होता. इतक्या रिकाम्या माथेरानला इतक्या टोकाच्या हॅाटेलात रुम घेणारे गिह्राइकही विशेषच असणार म्हणा. किंवा ते याच्याकडे येण्याची त्याची इच्छा असणार!
लाइट बिल/टेलिफोन बिल/झेरॅाक्ससह(+) हे (एकट्याने) प्रवास करताना कधीही उपयोगी पडते. पुर्वी आधार नव्हतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" पुरा माथेरान खाली है लेकिन अकेले आदमी को रिम देने का नही पोलिस ने बोला है। वैसा मेरा लायसन है होटल का।" मी स्याकमधून इलेक्ट्रिक, फोनबिल बाहेर काढले. " अरर, इसको रुम दिखाओ, १५० रुपिया।" मग गप्पा झाल्या.
मजा असते माथेरानमध्ये.

ही काय भानगड आहे म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ही काय भानगड आहे म्हणे?"
त्यावेळी मुंबईत काही अतिरेकी स्फोट वगैरे घटना नुकतीच होऊन गेलेली आणि पोलिसांचा आदेश निघालेला एकट्या अथवा संशयास्पद माणसास रुम द्यायची नाही. ( धार्मिक/तिर्थस्थानी असलेल्या धर्मशाळेत एकट्याला रुम न देण्याचा कायमचा नियम वेगळ्या कारणासाठी असतो. अचानक खूप भाविक आले तर ते तुमच्या रुममध्ये घ्यावे लागतात या अटीवर. उदा० पावस, त्र्यंबकेश्वर, भिमाशंकर, पंढरपूर.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0