१८८९ मुंबई । सामाजिक संक्रमणावस्थेतले महानगर

१८८९ मुंबई । सामाजिक संक्रमणावस्थेतले महानगर

काळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक चौथा

'मुंबईचा वृत्तांत'
बाळकृष्ण बापू आचार्य, मोरो विनायक शिंगणे
मूळ आवृत्ती १८८९
प्रस्तावना आणि टिपणांसह नवीन आवृत्ती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, १९८० (संपादक: बापूराव नाईक)
पुस्तकाची पीडीएफ

“मुंबई नगरी बडा बांका, जशी रावणाची दुसरी लंका” हा चरण पठ्ठे बापूरावांनी लिहिलेल्या ‘मुंबईच्या लावणी’तला. ही लावणी १९१०च्या सुमारास लिहिली गेली, तेव्हाच ‘रावणाच्या लंके’शी मुंबईचे साम्य दिसायला लागले होते! पठ्ठे बापूराव आज जर मुंबईत अवतरले तर त्यांची काय स्थिती होईल याची केवळ कल्पनाच केलेली बरी, असे अकराळविकराळ स्वरूप आजच्या मुंबईने धारण केले आहे. पण केवळ स्वरूपच बदलले असे नाही, तर मुंबईचा आत्माही गेल्या तीसेक वर्षांत खूपच बदलला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबई हे औद्योगिक नगर म्हणून प्रकर्षाने पुढे आले. कापड आणि सूत गिरण्या हा त्या नगराच्या अभिवृद्धीचा महत्त्वाचा भाग होता, तसेच नाना प्रकारचे वायदेबाजार आणि व्यापारयोग्य वस्तूंची बाजारपेठ म्हणूनही मुंबईला अतोनात महत्त्व आलेले होते. मुंबईच्या या स्वरूपाला तडा गेला तो १९८०च्या दशकात झालेल्या कापडगिरणी संपामुळे. आणि त्यानंतर मुंबईचे स्वरूप झपाट्याने बदलू लागले. आज पुनर्निर्माणाच्या रेट्याखाली मुंबईचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जातो आहे आणि या बदलाची गती अभूतपूर्व आहे. इतकी, की अजून काही वर्षांनी हे शहर पन्नासेक वर्षांपूर्वीही कसे दिसत असे याची नामोनिशाणी उरणार नाही अशी चिन्हे आहेत, मग शंभर-दोनशे वर्षांपूर्वीची तर गोष्टच सोडा! अशा या प्रचंड गतिमान बदलाच्या चपेट्यात सापडलेल्या शहराचे यथातथ्य वर्णन करणारी पुस्तके म्हणूनच मुंबईच्या नागरी इतिहासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहेत. “मुंबईचा वृत्तांत” हे त्यांपैकीच एक पुस्तक.

तसे पाहिले तर मुंबईच्या वर्णनावर लिहिलेल्या पुस्तकांत हे काही एकमेव ठरेल असे पुस्तक अजिबातच नाही. मुंबईचे एक प्रसिद्ध नागरिक सर दिनशा एदलजी वाच्छा यांनी १८६० ते १८७५ या काळातल्या त्यांच्या आठवणी ‘शेल्स फ्रॉम दि सँड्स ऑफ बाँबे’ या नावाने १९२० साली प्रसिद्ध केल्या. त्यांच्याच एका आडनाव बंधूंनी, रतनजी फरामजी वाच्छा यांनी, १८७४मध्ये ‘मुंबई नो बहार’ हे पुस्तक गुजराती भाषेत लिहिले. त्याहीआधी १८६३ साली गोविंद नारायण शणै माडगांवकर यांनी लिहिलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकाला मराठीत अशा विषयावर लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचा मान जातो. याआधीच्या काळात देशी भाषांत नाही तरी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या अनेक पुस्तकांतून मुंबईचे वर्णन वाचावयास मिळते. मग ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकाचे वेगळे महत्त्व काय आहे? विशेषतः, १८६३ सालचे ‘मुंबईचे वर्णन’ हे तर मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड म्हणून गौरविले गेलेले पुस्तक आहे. मग ‘वृत्तांता’ला वेगळे का गणावे?

या प्रश्नाचे उत्तर या दोन पुस्तकांच्या लेखन आणि प्रसिद्धी काळामध्ये आहे. १८६३ सालची मुंबई आणि १८८९ सालची मुंबई यांच्यात पुष्कळ फरक पडला होता. नागरी व्यवस्थापन, सुधारणा, कर-आकारणी, वाहतुकीच्या सोयी या सगळ्या बाबतींत १८८९ सालची मुंबई १८६३च्या मुंबईपेक्षा खूप वेगळी झाली होती. गोविंद नारायण यांनी त्यांचे पुस्तक लिहिले तेव्हा आधुनिक सुधारणांपैकी फक्त रेल्वे मुंबईला लाभली होती. ‘कोटा’चे, म्हणजे फोर्ट सेंट जॉर्ज या इंग्रजांनी बांधलेल्या किल्ल्याचे, अस्तित्व अजून शाबूत होते. गटारे, सांडपाण्याचा निचरा वगैरे नागरी स्वच्छतेच्या गोष्टी, पिण्याच्या पाण्याची सोय, दिवाबत्ती वगैरे बाबी अजून दूर होत्या. (दिनशा वाच्छा यांच्या पुस्तकात १८६५ पूर्वीच्या दिवाबत्तीचे व्यवस्थेचे वर्णन ‘visible darkness’ असे आले आहे!) ही परिस्थिती बदलू लागायला एक आर्थिक अरिष्ट कारणीभूत झाले –म्हणजे ते ‘अरिष्ट’स्वरूप धारण करेल असे सुरुवातीला कोणाला वाटले नव्हते पण त्याची परिणती तशीच झाली.


 Bombay, Back Bay - 'Lee-Warner Collection: 'Bombay Presidency. William Lee Warner C.S.' taken by an unknown photographer in the 1870s
Bombay, Back Bay - 'Lee-Warner Collection: 'Bombay Presidency. William Lee Warner C.S.' taken by an unknown photographer in the 1870s

१८६१ साली अमेरिकेत यादवी युद्ध सुरू झाले आणि त्याचा परिणाम ब्रिटनमधल्या कापडउद्योगावर होऊ लागला; कारण हा उद्योग अमेरिकेतून येणाऱ्या कपाशीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. यादवी युद्धामुळे अमेरिकेतून येणाऱ्या कापसाची आवक घटली आणि त्यामुळे भारतात पिकणाऱ्या कापसाला अतोनात भाव चढला. भारतीय कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ मुंबई होती आणि तिथूनच तो निर्यात होई. भाव चढल्याने व्यापाऱ्यांचे, विशेषतः अडत्यांचे आणि सटोडियांचे फावले! त्यांच्या हातात अभूतपूर्व पैसे खेळू लागले. या सगळ्याचा परिणाम शहराचे महसुली उत्पन्न वेगाने वाढण्यात झाला. या पैशाचा विनियोग करण्यासाठी मुंबईचे नगर-व्यवस्थापन कमी पडू लागले. १८६५ साली अमेरिकेतले यादवी युद्ध संपले आणि ती बातमी कळतांच कापसाचे भाव एकाएकी कोसळले! कर्जाच्या बुडबुड्यावर आणि वायदेबाजारावर आकाशात विहार करत असलेली मुंबईची अर्थव्यवस्था दाणकन जमिनीवर आली! वायदेबाजार आणि शेअरमार्केटाला हवा देणाऱ्या ‘बँक ऑफ बॉम्बे’ सारख्या बँका या वावटळीत बुडाल्या. शेअरमार्केटाचा अनभिषिक्त सम्राट म्हणवणाऱ्या प्रेमचंद रॉयचंदला मोठा आर्थिक फटका बसला. १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद ज्यांची मुळातच कमाई मर्यादित होती पण शेअर मार्केटातल्या वाहत्या सुवर्णगंगेचा ज्यांना मोह पडला, असे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्यासारखे उच्च मध्यमवर्गीय दिवाळ्यात निघाले.

मुंबईच्या नागरी इतिहासात ही उलथापालथ महत्त्वाची आहे कारण या आर्थिक प्रलयापूर्वी अर्थव्यवस्थेची जी घोडदौड झाली तिच्यातून मुंबईच्या नागरी वाढीला आणि शहरीकरणाला मोठी गती मिळाली. १८७०च्या दशकात ‘कोटा’च्या भिंती ढासळल्या. तटबंदीच्या बाहेर गोळीबार करायला म्हणून जी मोकळी जागा सोडली होती, त्या ‘एस्प्लनेड’चे तीन मोठमोठ्या मैदानांत रूपांतर झाले. १८६०च्या आधी मुंबईची नगरपालिका तीन कमिशनर्सच्या आणि ‘जस्टिस ऑफ द पीस’ (जे. पी.) हे पद भूषविणाऱ्या उच्चपदस्थ लोकांच्या हाती होती. १८६५ साली नगरपालिका सुधारणेचा कायदा होऊन आर्थर क्रॉफर्ड हा नगरपालिकेचा एकमेव कमिशनर म्हणून नियुक्त झाला. क्रॉफर्डने सुधारणांचा धडाका लावला. कचऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक शौचगृहे, गॅसची दिवाबत्ती करणे, शहरातले खाटीकखाने दूर(!) वांद्र्याला हलवणे, मध्यवर्ती मंडई बांधणे (तिला नंतर त्याचेच नाव देण्यात आले), रस्ते आणि पूल बांधणे अशी नाना तऱ्हेची सुधारणावादी कार्ये क्रॉफर्डने पार पाडली. त्याला अनुरूप असा खर्चही प्रचंड प्रमाणात केला आणि महसुली वसुलाची धडाडीही तेवढीच दाखवली! विशेषतः मैला साफ करणाऱ्या हलालखोर लोकांच्या संपाचा प्रश्न त्याने ज्या तडफदारीने धसास लावला ते पाहता क्रॉफर्ड हा परिणामांची विशेष पर्वा न करता हाती आलेल्या सत्तेचा निरंकुश वापर करण्यात फारच तरबेज होता असे स्पष्टपणे दिसून येते. साहजिकच त्याचा शत्रूपक्षही निर्माण झाला आणि त्याच्यावर हडेलहप्पीचे आणि लाचखोरीचे आरोप होऊ लागले. त्यात अगदीच तथ्य नव्हते असेही नाही, परंतु या निमित्ताने ‘नगरपिता’ म्हणवणाऱ्या जे. पी. लोकांचा समूह जागा झाला आणि त्यांनी क्रॉफर्डच्या मनमानीला उत्तर म्हणून नागरी कायद्यांत आणखी सुधारणा व्हावी असा आग्रह धरला. या सुधारणांचा तपशीलवार इतिहास बघायचे हे स्थान नव्हे, पण यातूनच पुढे फेरोजशहा मेथांसारखे नागरी धुरीण नेतृत्व पुढे आले आणि त्याची परिणती १८८८ साली मुंबई महानगरपालिकेच्या कायदेशीर स्थापनेत झाली.

‘मुंबईचे वर्णन’ आणि ‘मुंबईचा वृत्तांत’ या दोन ग्रंथांच्या प्रसिद्धीकाळात मुंबईच्या नागरी जडणघडणीत इतका प्रचंड फरक पडल्यानेच त्यांचे अंतरंग काही बाबतींत पूर्णपणे वेगळे असणार हे साहजिक आहे. पण काही बाबतींत त्यांच्यात साम्यही आहे. दोन्ही पुस्तकांची भाषा एकोणिसाव्या शतकातली प्रचलित, ‘आंग्लाळलेली’ मराठी आहे. याशिवाय एक महत्त्वाचे साम्य म्हणजे दोन्ही पुस्तकांचे लेखन ‘प्रत्यक्षलक्षी’ आहे आणि त्यातून सतत आपल्याला हे लेखक आपले बोट धरून गोष्टी दाखवत आहेत, तपशील समजावत आहेत असा भास होत राहतो. शब्दांतून ‘देखावा’ त्यांची दाखवण्याची कला ‘दिखाव्या’पुरती नाही, तर तिला एक आंतरिक ओढ आहे. ही ओढ कसली, त्याचे वर्णन ‘वृत्तांता’चे लेखकद्वय शिंगणे आणि आचार्य हे प्रस्तावनेत सांगतात –
“...असल्या ग्रंथाचा उपयोग कोणता? तर, त्याचे उत्तर इतकेच की… देशाच्या एका लहानशा भागाची प्राचीन आणि अर्वाचीन माहिती आम्हास मिळाली तेवढी देऊन अंशतः तरी देशसेवा करावी”.

या देशसेवेच्या मागे हेतू होता, तो लोकांना ‘इतिहास सांगावा’ म्हणजेच :
“...यथाशक्ती प्रयत्न करून जी काही अल्पस्वल्प माहिती मिळवली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढे आणावी, बरीवाईट कशी काय असेल ती त्यांचे ते पाहून घेतील आणि आमचे दोष आम्हाला दाखवतील व तेणेकरून दुसऱ्या कोणत्याही कामास हात घालण्यास आम्हाला उमेद देण्यास ते कारणीभूत होतील”.


 Parsis worshipping the new moon at Bombay (Churchgate Station behind), stereoscopic photograph taken by James Ricalton in c. 1903
Parsis worshipping the new moon at Bombay (Churchgate Station behind), stereoscopic photograph taken by James Ricalton in c. 1903

तेव्हा, आपल्या प्रयत्नांतून लोकांना माहिती कळावी, ज्ञानप्राप्तीतून त्यांचे भले व्हावे आणि त्यांच्या मतमतांतरांतून आपल्यालाही शहाणपण प्राप्त व्हावे, ही लेखकद्वयाची उर्मी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जेरेमी बेंथॅम या ब्रिटिश तत्त्वज्ञाने सांगितलेल्या ‘उपयुक्ततावाद’ या तत्त्वज्ञानाचेच हे उत्तरकालीन प्रयोजन आहे. या विचारसरणीचा, मानवाच्या ‘आत्मिक अभिवृद्धी’च्या महत्त्वाचा पगडा पूर्ण एकोणिसावे शतकभर महाराष्ट्रातल्या विचारवंत समूहावर पडलेला होता. शिंगणे-आचार्य हे कोणी ‘थोर विचारवंत’ नव्हेत; सुशिक्षित मध्यमवर्गीय नोकरदार पार्श्वभूमीतून घडत गेलेल्या मराठी समाजघटकाचे ते अग्रणी म्हणता येतील. राजनिष्ठता तर त्यांच्या नसानसांत वाहताना दिसते. व्हिक्टोरिया राणीचा उल्लेख ते ‘आपल्या प्रिय राणीसाहेब, मलका माआझमा’ असा अत्यादरपूर्वक करतात. गव्हर्नर वगैरे ‘साहेब’ लोकांचाही उल्लेख ‘नामदार’, ‘मेहेरबान’ अशांसारख्या आदरार्थी उपपदाशिवाय करत नाहीत! “आपली राजनिष्ठा प्रकट करणे हा प्रजेचा धर्मच आहे” असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. त्या वेळी गाजत असलेल्या सनातनी विरुद्ध सुधारक या वादातही त्यांची भूमिका ही त्यांचा स्वतःचा कल सुधारणेकडे असूनही ‘दोन्ही पक्षांनी आक्रस्ताळेपणा न करता सामोपचाराने घेतल्यास हे प्रश्न सुटू शकतील’ अशी आहे. आर्थिक बाबतीत ते स्वदेशी वस्तूंचा वापर, आयात-निर्यातीतल्या तफावतीमुळे हिंदुस्तानला होणारा तोटा, सरकारने बसवलेले जाचक कर आणि त्यामुळे उत्तरोत्तर होत जाणारी महागाई अशा बाबींकडे नीट लक्ष पुरवतात असे त्यांनी या बाबतीत वेळोवेळी केलेल्या टिप्पण्यांवरून सहज जाणवते. राजकीयदृष्ट्या त्यांची मते मवाळ म्हणता येतील अशी आहेत. त्यांच्यासारख्या लोकांना ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ असे प्रकर्षाने वाटत होते. वैचारिकतेच्या दृष्टिकोनातून ‘काळ उभा करण्या’चे कसब यामुळेच ‘वृत्तांत’ उत्तम पार पाडते असे म्हणायला हरकत नाही.

पुस्तकाचा वर्ण्यविषय आहे अर्थातच मुंबई – पण ‘वृत्तांता’ची माहिती देण्याची पद्धत ही काहीशी ब्रिटिश गॅझेटिअरसारखी आहे. ‘काहीशी’ म्हणण्याचे कारण हे की, गॅझेटिअरप्रमाणे ‘वृत्तांत’ केवळ तपशीलांनी भरलेला नाही. तपशील हे ‘वृत्तांता’चे महत्त्वाचे अंग आहे, पण तपशिलाला ‘वृत्तांता’चे लेखक वाचनीयतेचे रूप देतात, ते त्यांच्या स्वतःच्या टिप्पण्यांमुळे. या टिपा-टिप्पण्या आणि काही वेळेला मनोरंजक शेरेबाजी हे शिंगणे-आचार्य यांच्या लेखनाचे एक प्रसन्न अंग आहे. गॅझेटिअरप्रमाणेच ‘वृत्तांता’ची सुरुवात प्राचीन इतिहासापासून होते. पहिले दोन भाग ऐतिहासिक वर्णनपर आहेत – पहिल्या भागात मुंबईच्या भूभागाची माहिती, भूगोल आणि भौगोलिकता (हवापाणी, पाऊस, वादळे, रोगराई आणि साथी इत्यादी) यांचा मुंबईशी आलेला संबंध, मुंबईची वसाहत, जमिनीच्या प्रतवारी, महसुलाच्या बाबी आणि त्यांचे उत्पन्न अशा बाबींचे विवरण आहे आणि दुसऱ्या भागात मुख्यतः राजकीय इतिहासाचे वर्णन आहे. तिसरा भाग हा ‘डेमोग्राफी’ विषयाला वाहिलेला आहे, अर्थात मुंबईतले ‘लोक’ हा त्याचा गाभा आहे. चौथा भाग ‘व्यापार’ आणि पाचवा भाग ‘सरकार आणि उत्पन्न’ या विषयांशी निगडित आहेत. सहाव्या आणि सातव्या भागात अनुक्रमे ‘शहराचे वर्णन’ आणि ‘प्रसिद्ध इमारती वगैरे’ आलेले आहेत. ‘परिशिष्ट’-स्वरूपात उरलेली माहिती ग्रथित केली आहे; तीत शिक्षण, व्यापारी कंपन्या, वेगवेगळी व्यावसायिक असोसिएशन्स, दळणवळणाची साधने, शहरातले विविध प्रकारचे व्यावसायिक (केमिस्ट्स, डेंटिस्ट्स, बुक सेलर्स) तसेच लोकोपयोगी सार्वजनिक संस्था यांचे तपशीलवार वर्णन आहे. यांपैकी लेखकद्वयाच्या लेखणीला अधिक बहार येते, ती अर्थातच सहाव्या आणि सातव्या वर्णनपर भागांत; पण इतरत्रही लेखन एकसुरी आणि तपशिलाच्या भरताडामुळे कंटाळवाणे होणार नाही याची यथोचित काळजी त्यांनी घेतली आहे.


 Photograph of Maratha? pupils in a Science class of the Elphinstone High School at Bombay, from the Archaeological Survey of India Collections: India Office Series (Volume 46), taken by an unknown photographer in c. 1873
Photograph of Maratha? pupils in a Science class of the Elphinstone High School at Bombay, from the Archaeological Survey of India Collections: India Office Series (Volume 46), taken by an unknown photographer in c. 1873

‘वृत्तांता’त मुंबई डोळ्यांपुढे उभी राहू लागते ती सुरुवातीच्या ऐतिहासिक प्रकरणांपासूनच. ही माहिती लिहायला फ्रायर, निबॉर, फ्रँकलिन इत्यादी पाश्चात्त्य लेखकांचा आधार शिंगणे-आचार्यांनी घेतला आहे. सात बेटांची मुंबई, तिच्यात भरतीच्या वेळेला पाणी भरल्यामुळे होणारी वाहतुकीची वाताहत, चोर-दरवडेखोरांचे भय, समुद्री चांचे आणि त्यांच्या धाडींची भीती, स्थानिक लोकांची ताड-माडांच्या झाडाला खत म्हणून माशांचा ‘कुटा’ घालण्याची पद्धत आणि तिच्यामुळे सर्वत्र सुटलेले दुर्गंधीचे साम्राज्य, मलेरिया, कॉलराच्या साथी आणि इतर रोगराई, “कुलाब्यापासून ब्याकबेच्या वाळूतून मलबार हिलवर जाणे म्हटले म्हणजे यमयातनाच सोसाव्या लागत,” कारण वाटेत सोनापुरात जळणाऱ्या प्रेतांपासून गटारांपर्यंत सगळे ओलांडावे लागे, यासारख्या वर्णनातून ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात मुंबई आली त्यानंतर पन्नास-शंभर वर्षांनी सुद्धा इथली परिस्थिती किती वाईट होती याचे प्रत्यंतर येते. पण उत्तर-अठराव्या शतकात ‘वरळीचा बांध’ घातल्यापासून थेट भेंडीबाजारापर्यंत जे भरतीचे पाणी शिरायचे त्याचा प्रादुर्भाव नष्ट झाला आणि शहराच्या उत्तरेकडची बरीच जमीन लागवड-योग्य झाली. तसेच एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला माहीमच्या खाडीवर असाच बांध घातला गेला आणि त्यामुळेही पिके घेण्याचे प्रमाण वाढीस लागले. ही लोकोपयोगी कामे करणारे अनुक्रमे हॉर्नबी आणि डंकन हे गव्हर्नर होते. अठराव्या शतकाच्या मध्यात किल्ल्याचे अपॉलो गेट, चर्चगेट आणि बाझार गेट हे भूमीसन्मुख असलेले तिन्ही दरवाजे सूर्यास्तानंतर अर्ध्या तासाने बंद होत. त्या आधी ‘पाव कलाक’ प्रत्येक दरवाजावर नगारा वाजवला जाई, तसेच चर्चमध्ये घंटानाद होई. त्यानंतर पूर्ण किल्ला सक्तीने ओस पाडला जाई. शहरातले लोक शहरात परत जात; बंदरात आलेल्या जहाजांवरच्या लोकांना पुन्हा जहाजावर जावे लागे. रात्री नऊ वाजता आणि पहाटे पाच वाजता तोफेचा बार काढण्याची पद्धत होती.

शहरातली वस्ती जशी वाढू लागली तसे सरकारने शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या बदल्यात त्यांना साष्टी बेटात इनाम गावे देणे सुरु केले. १८०६ साली अर्देशर दादी या पारशी गृहस्थाकडून शहरातली काही जमीन घेऊन त्याला मालाड, मागाठाणे, तुळशी, आरे, एकसर आणि कान्हेरी इतकी गावे सरकारने दिली - म्हणजे मुंबईत जागेला प्रमाणाबाहेर मागणी आणि किंमत यायची प्रथा किती जुनी आहे ते पहा! १८६५ च्या “शेर बाजाराच्या वेळेस” रामपार्ट रोच्या समोरची जागा ११५-१२० रुपये चौरस यार्ड प्रमाणे विकली गेली, पण “हल्ली ३०-४० रुपये चौरस यार्ड अशी किंमत आहे” असे लेखकद्वयाने नोंदवले आहे. “हल्ली जमीन केवळ सोन्याचा तुकडा होऊन इतकी दुर्मिळ झाली आहे की, शहरांत राहणाऱ्या लोकांस जागा पुरेनाशी होऊन, त्यांस राहण्याची पंचाईत पडते; म्हणून सरकारने मुंबई वाढवण्याचे प्रयत्न चालवले आहेत” अशी टिप्पणी त्यांनी केली आहे! हे प्रयत्न सव्वाशे वर्षे करून झाल्यावरही हा प्रश्न कायम आहे आणि आता शहराची वाढ ‘उर्ध्वगामी’ व्हायला लागली आहे हे आपण बघतो आहोतच. वसाहत करताना, किंवा घरे, रस्ते आदि बांधताना, सरकारातून ‘फजिनदार’ (मूळ शब्द पोर्तुगीज, Fazendor म्हणजे सरकारी खातेप्रमुख) याची परवानगी घ्यावी लागे. मुंबईच्या वसाहतकारांत १६४०च्या सुमारास सुरतेहून येऊन वसलेले पारशी, १५५०च्या सुमारास पोर्तुगिजांबरोबर आलेले सारस्वत, १३००च्या सुमारास आलेले मुसलमान, व्यापाराकरता म्हणून आलेले वाणी (बनिया किंवा भाट्ये) किंवा अरब (हे घोड्यांचा व्यापार करत), तसेच कसबी कामाकरता आलेले कामाठी, सोनार-शिंपी यांजसारखे लोक इत्यादी लोकांचा समावेश होई. यातून मुंबईचे अद्वितीय असे अठरापगड किंवा ‘कॉस्मोपॉलिटन’ रूप कसे तयार होत गेले याची प्रचिती येते. आज उच्च्भ्रू वर्गाचे हे आवडते रूप आहे, पण या रूपाची भुरळ आणि त्यातून येणारी मुंबईची ‘मायपोट’ अशी लिबरल ओळख याची वर्णने आपल्याला दिनशा वाच्छा यांच्या लेखनात किंवा माडगावकरांच्या ‘वर्णना’तही दिसतात. माडगावकर म्हणतात - “पहा! आज मुंबईमध्ये गरीब दुबळा, लंगडा लुळा, आंधळा पांगळा, बहिरा मुका, भला बुरा, चोर चोरटा, भोंट लबाड, खुळा भोळा, सोंगी ढोंगी, कोणी कसाही आला असतां अन्नवस्त्रांस मरत नाही. उद्योग मात्र केला पाहिजे म्हणजे शहरांत मनुष्य पाजीचा गाजी होतो!”


 Reclamation, Mody Bay, No. 1 jetty from north : Photograph by E Taurines of construction of the Victoria Dock in Bombay City taken about 1885
Reclamation, Mody Bay, No. 1 jetty from north : Photograph by E Taurines of construction of the Victoria Dock in Bombay City taken about 1885

प्रत्यक्षलक्षी वर्णनशैलीबरोबरच ‘वृत्तांत’ आपल्यापुढे काळ उभा करतो याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यातील वर्णने आपल्याला अनेकदा पुनःप्रत्ययाचा आनंद देतात. एका परीने हे स्मरणरंजनाला पूरक ठरते कारण त्यात इतके सगळे बदल होऊनही काही बाबती शंभराहून अधिक वर्षे झाली, तरी तशाच राहिलेल्या आहेत ही गोष्ट हृदयाला कुठेतरी दिलासा देणारी वाटते. कापसाच्या व्यापाराने उचल खाल्ली तेव्हा मुंबईत ‘शेअर मेनिया’ (शिंगणे-आचार्य हे शेअर्सना ‘शेर’ म्हणतात आणि हा मेनिया म्हणजे “शेरांचे खूळच” असे त्या वाक्प्रचाराचे भाषांतर देतात!) बोकाळला. याचे कारण म्हणजे मुंबईचा सर्वात मोठा ‘ॲसेट’ जो जमीन, तो या खेळात व्यापाऱ्यांनी ओढून आणला. जिथे समुद्र होता “ती जागा भरून काढण्याची नवीनच शक्कल” या वेळी निघाली आणि त्यासाठी कंपनी उभी करण्यात आली. या कंपनीचे शेअर्स वेड्यावाकड्या भावाने विकले गेले – “दलालांनी चार हजार रुपयांच्या शेरांची किंमत २५ हजार रुपयांपर्यंत वाढवली”!“या शेअर्सच्या खुळाने मुंबईला अगदी “वेडे करून सोडले होते; ते इतके की शहरातील बहुतेकांस रात्रीची झोप आणि दिवसा जेवण हेही सुचत नसत. रस्त्यांतून ‘काय भाव’ हा शब्द सर्वतोमुखी असे”. ज्या लोकांना नव्वदीच्या दशकात हर्षद मेहताने शेअर मार्केटात जी उछलकूद माजवली होती त्याची आठवण असेल, त्यांना ही परिस्थिती नक्कीच परिचयाची वाटेल. त्या वेळी रस्तोरस्ती ‘काय भाव’ असे विचारणारे लोक नव्हते, पण संध्याकाळी गर्दीच्या वेळी उच्चरवाने 'भाव कॉपी' विकणारे पोऱ्ये आणि ती उत्सुकतेने घेणारे मध्यमवर्गीय कारकून प्रकृतीचे लोक नक्कीच होते! ‘समुद्र हटवून तिथे जमीन निर्माण करायची’ कल्पना तसेच त्यातून निर्माण होणारा भ्रष्टाचार हा कफ परेड, वसंतराव नाईक आणि खाजगी बिल्डर्स यांच्या प्रकरणाची आठवण करून देईल. मुंबईच्या इतिहासात काही प्रकरणे ही तपशिलांत फरक पण एकंदरीत प्रवृत्तीत साम्य अशा प्रकारे पुन्हापुन्हा उभी राहिलेली दिसतात. त्याचेच प्रत्यंतर आपल्याला ‘वृत्तांता’त येत राहते, आणि म्हणून त्याची गोडी अधिकच वाढते.

लोकांच्या वागणुकीप्रमाणेच ‘तेव्हा आणि आता’ यांमध्ये महत्त्वाचे साम्य दाखवणारी बाब म्हणजे मुंबईतली गर्दी आणि वस्तीची दाटी! अर्थात शिंगणे-आचार्य यांच्या नजरेपुढची मुंबई ही माझगाव-भायखळ्याच्या पुढे विशेष सरकणारी नाही. परळला गव्हर्नर साहेबांचे वास्तव्य असलेले ‘गव्हर्नमेंट हाउस’ असल्याने तो भाग, किंवा क्वचित वरळी, माहीम हे भाग त्यांच्या वर्णनात डोकावून जातात, कारण ते मुंबईतल्या जुन्या ‘गावां’पैकी होते. पण दादर त्यांच्या ‘वृत्तांता’त केवळ रेल्वे जंक्शन म्हणून येऊन जाते. वांद्रे हे तर शहराच्या सीमेपार असलेले, कत्तलखान्यासाठी प्रसिद्ध आणि कुर्ला हे कचऱ्याचे ‘डम्पिंग ग्राउंड’ म्हणून! तेव्हा जी काही गर्दी शिंगणे-आचार्य यांना अभिप्रेत आहे ती केवळ आजच्या दक्षिण मुंबईतली. पण तिथेही पुनःप्रत्यय येतोच. जागा कमी असल्याने शहरात विशेष कुठे वृक्षराजी दिसत नाही, कारण “घरे एकमेकांना इतकी चिकटून बांधली जातात की झाडांना कुठली जागा उरणार?” असे त्यांचे निरीक्षण आहे. सकाळच्या आणि विशेषतः संध्याकाळच्या ‘रश अवर’चे आणि कचेऱ्या सुटतानाच्या वेळेला जिकडेतिकडे उडणाऱ्या गडबडीचे वर्णन ते करतात, म्हणजे आजच्या इतकीच तेव्हाही ही लगबग, धांदल उठून दिसण्यासारखी होती. १८८९ साली पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा मुंबईतली नागरी वाहतूक व्यवस्था घोड्यांच्या ट्रामगाड्या आणि बग्या, रेकले (बंद बैलगाडी), शिग्राम (बंद घोडागाडी), 'व्हिक्टोरिया' इत्यादी प्राणीमार्गी गाड्यांवर अवलंबून होती (फार काम करणाऱ्या माणसाला “अगदी ट्रामचा घोडा झालाय” असे म्हणायची पद्धत होती!) सहा आणि आठ माणसांनी वाहायच्या पालख्यासुद्धा दिवसाला साडेतीन रुपये देऊन भाड्याने घेता येत. मोटर गाड्यांचा प्रादुर्भाव मुळीच झाला नव्हता, पण “पायाने गती देण्याच्या लोखंडी गाड्या” काही लोक चालवत असत आणि त्यांना एक ते चार चाके असत. ट्राफिकच्या वेळी जिकडेतिकडे गाड्यांची धांदल उडे. “पैस पैस, बाजू बाजू” असे ओरडत गाडीवाले गाड्या हाकत आणि वाटेतल्या गर्दीला हटवत. “या शहरांत सावधगिरीशिवाय रस्त्यावरून जाणे म्हणजे धोक्याचे काम आहे; कारण चोहोकडून गाड्या फिरतात आणि त्यांच्या सपाट्यात सापडून बरीच माणसे वारंवार दगावतात” असेही लेखकद्वयाचे सांगणे आहे, म्हणजे अपघातांचे प्रमाणही लक्षणीय होते असे दिसते! पण याबरोबरच, ही गडबड, धांदल हेच शहराच्या भरभराटीचेही लक्षण होते आणि या शहरात सर्वत्र उद्योगी लोकांचे बस्तान बसले आहे याचेही द्योतक होते. याचमुळे ही गडबड पाहून मुंबई शहरावर “भगवान नी घणी कृपा ज छे” म्हणणारी गुजराती बाईही आपल्याला ‘वृत्तांता’त भेटते.

‘वृत्तांता’तून मुंबई उभी राहते ती तिच्या भूगोलाइतकीच तिच्या ठायी वसत असलेल्या अठरापगड लोकांतून सुद्धा. आजच्यासारखेच तेव्हाच्या मुंबईतही जात-पात, धर्म इत्यादी बाबींनुसार लोकवस्तीचे मोहल्ले किंवा काही प्रमाणात ‘घेटो’ निर्माण झालेले आपल्याला दिसतात. खाण्या-पिण्याच्या आणि स्वच्छतेच्या सवयी हे त्यामागचे मुख्य कारण असावे असे शिंगणे-आचार्य यांच्या वर्णनावरून वाटते. अर्थात तेव्हा ही बंधने अधिकच कडक होती. पण मुळातच वस्ती ही ‘कॉस्मोपॉलिटन’ असल्याने त्या बाबीला एक व्यावहारिक अंगही होते. जाती-पातीची बंधने होतीच, पण सोवळी-ओवळी कमी झालेली होती. त्यातूनही वेगवेगळ्या लोकांचे रहाणे आणि चलनवलन एकत्र, खेटून होत असल्याने नीती-रीतींनाही फाटे फुटणे साहजिक होते. ‘आमच्यात – म्हणजे अर्थातच दक्षिणी / मराठी / ब्राह्मण / उच्चजातीय मराठी वर्गात –नाही असे चालत’ हा एक सूर ‘वृत्तांता’त अनेकदा जाणवतो. काही लोकांची सोवळे-कल्पना किंवा स्वच्छता यांवर ताशेरेही ओढलेले दिसतात. गुजराती ब्राह्मणांत सोवळ्याचा विधिनिषेध नाही, “हे लोक गळ्यांभोवती रेशमी रुमाल लटकावून व हातांत एक पेला घेऊन पाहिजे त्यांस रस्त्याने खुशाल लोकांना धक्या देत जातात” पण तरीही ‘सोवळ्यात’ असतात, असे निरीक्षण लेखकद्वय नोंदवतात. पारशी लोकांच्या घराची बाहेरची स्वच्छताच काय ती बघून घ्यावी, एकदा आत गेले की “कुठे कोंबड्यांची विष्ठा, कुठे कुत्री ओकलेली, कुठे लहान मुलांचे मलमूत्र” असा सगळा कारभार असतो, आणि त्यांच्या घरावरून जातांना “सावधानीने जावे लागते कारण कधी काय अंगावर येऊन पडेल याचा नेम नसतो” असे त्यांचे म्हणणे आहे!


 Photograph of Malabar Point, Bombay taken by an unknown photographer in the 1860s.
Photograph of Malabar Point, Bombay taken by an unknown photographer in the 1860s.

‘वृत्तांता’त काळ उभे करण्याचे सामर्थ्य किमान चार प्रकारच्या वर्णनांतून जाणवते. मुंबईतला तत्कालीन जनसमूह किंवा समाज आणि लोकांची वागणूक यांचे वर्णन हे एक, विशिष्ट घटनांचे वर्णन हे दुसरे, सामान्य जनांना ज्या काही ‘अजब’ गोष्टी प्रत्यक्ष बघायला मिळत नाहीत त्यांचे वर्णन तिसरे, आणि शहरातल्या प्रसिद्ध किंवा बघण्यालायक वास्तू, रस्ते, नगरविशेष इत्यादींचे वर्णन हे चौथ्या प्रकारचे. लोक आणि त्यांच्या वागणुकीचे वर्णन करताना ‘वृत्तांता’चे लेखकद्वय काही हातचे राखून ठेवत नाहीत, ही एक चांगली बाब आहे. कित्येक जनसमूहांचे विशेष ते मोजक्या शब्दात सांगतात. उदाहरणार्थ मारवाडी लोकांचे हे वर्णन पहा –“मारवाडी तर ह्या शहरातल्या प्रत्येक गल्ली-कुच्चीत असायचाच. हे लोक मारवाडातून येतात त्या वेळी त्यांजजवळ एकादी तपेली, फाटके पागोटे, व अंगात खादीची बंडी एवढीच काय ती संपत्ती असते. पण तेच मुंबईत आले म्हणजे, आपल्या एकाद्या स्वजातीयाच्या दुकानात चाकरीने राहून पुढे हळूहळू दुकानात दिडकीपासून भाग ठेवून वाढत वाढत बरीचशी रक्कम हातांत खेळू लागली म्हणजे स्वतः दुकान काढतात. या लोकांचा इतर लोकांना फसविण्याच्या कामी हातखंडा असतो. १०० रुपये देऊन १२५ लिहून घ्यायचे व त्या रुपयांचे व्याज पैसे देण्यापूर्वीच कापून घ्यावयाचे असा ह्या लोकांचा धंदा असतो… हे लोक अशा जुलमाने पैसे घेतात, तरी हे लोक आहेत म्हणूनच मुंबईतील गरीब लोकांची काही अब्रू आहे… कारण कोणी कसाही मनुष्य येवो त्यास हे लोक पैसा देण्यास तयार!”

मारवाडी लोक उजळ माथ्याने फसवाफसवी करत असतच, पण नाना प्रकारे लोकांना फसवून त्यातून प्राप्ती करणारे ठकही मुंबईत बरेच होते. त्यांत बैरागी, संन्यासी वगैरे जीवनमुक्त असल्याचा आव आणून लोकांकडून अन्नधान्य दक्षिणा वगैरे उपटणारे लोक, कामाला गेलेल्या नवऱ्याने पैसे मागितले आहेत असा सांगावा घेऊन येऊन बायकांकडून पैसा काढणारे भामटे, आपण हकीम असल्याचे सांगून “क्यों जी आप का आवाज तो बहुत बैठ गया है. आप को निहायत जबर बीमारी पैदा हुई है” वगैरे संभाषणे करत त्या नसलेल्या आजारावर किमती ‘औषधे’ निरोगी लोकांच्या गळ्यात मारणारे यमराजसहोदर, ‘रिंग ड्रापर्स’ नावाचे खोटी अंगठी रस्त्यात टाकून तिच्याद्वारे सावज हेरणारे चोर असे नाना प्रकारचे लुच्चे लोक आणि त्यांच्या कार्यपद्धती आपल्याला ‘वृत्तांता’त वाचायला मिळतात. त्यांच्याबरोबरच सट्टेबाजी, जुगार वगैरे ‘नशीबा’वर अवलंबून असलेल्या खेळांत भाग घेऊन त्यांच्या नादी लागलेले लोकही आपल्याला इथे भेटतात. पावसाच्या सट्ट्याचे वर्णन लेखकद्वयाने फार छान केले आहे. ‘कलकत्ता मोरी’ नावाचा एक अभिनव सट्टा चाले. “कलकत्ता मोरी ह्मणजे एका प्रकारची चतुष्कोणाकृति पेटी असून तिला एक नळी असते. तिचें मूख बाहेर आलेलें असतें. आंत रेती भरतात. नळीच्या मुखाजवळच्या जाग्यांत मात्र रेती नसते. पाऊस पडून त्या नळींतून नियमित वेळांत पाणी बाहेर आलें की सट्टा लावणारा जिंकतो. आणि नळींतून पाणी बाहेर न आलें तर तो हरतो.” या सट्ट्याच्या अष्टौप्रहर वेळा लावल्या असत. तीन-तीन तासाच्या या खंडांत किती पाऊस पडतो त्याच्या अंदाजावर हे सट्टे लावले जात. सट्ट्याचे ‘बुकिंग’ घेणाऱ्या आणि त्याप्रमाणे पैसे देणाऱ्या पेढ्या कार्यरत असत. “पेढीवाले लोक जिंकणारास त्याचे पैसे देण्यात लुच्चेगिरी करत नाहीत” असे निरीक्षण ‘वृत्तांत’कारांनी नोंदवले आहे! चामड्याच्या वादीने जुगार खेळणाऱ्या लोकांबद्दल सांगताना ‘वृत्तांत’कार मुंबईकरांच्या विवक्षित वागण्यावर अचूक बोट ठेवतात - “आधीच मुंबईचे लोक म्हणजे विचित्र! कोणी सहज एकाद्या वस्तूकडे पाहू लागला म्हणजे, काय आहे, काय आहे, म्हणून विचारीत सहज पाच-पन्नास मंडळी तिथे जमते; परंतु काय आहे आणि काय नाही, याचा कोणासच पत्ता नसतो.”


 Kalbadevi Road, c. 1880
Kalbadevi Road, c. 1880

पण मारवाड्यांच्या किंवा फसवेखोरांच्या अशा वर्णनाबरोबरच ‘वृत्तांता’त आपल्याला भेटतात ते मुंबईतले धनाढ्य लोक आणि त्यांनी केलेल्या दातृत्वाचे तपशीलही. या दातृत्वात पिण्याच्या पाण्याच्या प्याऊ उभारण्यापासून ते हॉस्पिटल्सना मोठ्या देणग्या देण्याची उदाहरणे आहेत. सामान्य प्रकारची दाने आणि कायमस्वरूपी ‘दातृत्व’ यांच्यात फरक आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करणे किंवा जनावरांसाठी पांजरपोळ उभारणे यात भूतदयावादी दानाची वृत्ती असते. ती त्याज्य किंवा हीन निश्चितच नाही पण कायमस्वरूपी दातृत्वात एखादी मोठी देणगी देऊन तिच्याद्वारे लोकोपयोगी कार्ये करण्यासाठी सरकारवर नैतिक दबाव घालणे आणि त्या दबावाद्वारे सरकारकडून अधिक कायमस्वरूपी गुंतवणूक किंवा संस्थात्मकतेकडे अशा कार्यांचा रोख वळवण्याची एक प्रकारची शक्ती असे. आजच्या मुंबईमध्ये धनाढ्यांची संख्या वाढली असेल आणि दानधर्मही खूप होत असेल, पण दातृत्वाद्वारे अशी संस्थात्मक कार्याची आणि सरकारी गुंतवणूक करून घ्यायची वृत्ती मात्र फारशी दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागते. ‘वृत्तांता’त अशा कार्याची अनेक उदाहरणे दिसतात आणि त्यांत मुंबईच्या पारशी आणि बनिया वर्गाचा खूप मोठा सहभाग असल्याचेही दिसते. पारशी लोकांपैकी पेस्तनजी होर्मसजी कामा (कामा हॉस्पिटल), बैरामजी जीजीभॉय (शैक्षणिक संस्था), कावसजी जहांगीर (डोळ्यांचे हॉस्पिटल) इत्यादी लोकांच्या भरघोस देणग्या आणि त्यांच्याद्वारे झालेली सामाजिक कार्ये यांचे तपशील ‘वृत्तांता’चे लेखकद्वय पुरवतात. जमशेदजी जीजीभॉय हे तर या ‘शेठीयां’चे मुकुटमणीच! त्यांच्या दानशूरतेची छाप आजही आपल्याला अनेक संस्थांमध्ये दिसते. जे. जे. हॉस्पिटलमधल्या त्यांच्या पुतळ्याची आज लोक एखाद्या देवाप्रमाणे पूजा करतात! इतर समाजांच्या अध्वर्यू लोकांपैकी नाना शंकरशेट, नाखोदा मुहम्मद अली रोगे आणि मूळचे बगदादी यहूदी असलेले डेव्हिड आणि अल्बर्ट ससून यांची नावे या चिरकालीन दातृत्वासाठी घेणे आवश्यक आहे.

मुंबईतल्या जनसमूहांची सामाजिक वागणूक हा ‘वृत्तांता’च्या खुमासदार भागांपैकी एक भाग. शिंगणे-आचार्यांनी मुंबई शहरातल्या संधाकाळच्या देखाव्याचे वर्णन फारच बहारीचे केले आहे. त्यात इंग्रज. पारशी, मुसलमान, हिंदू असे अठरापगड लोक आपल्याला निरनिराळ्या गोष्टी करताना दिसतात. मुसलमान किबला करून (मक्केकडे तोंड करून चटई अंथरणे) नमाजाची तयारी करत आहेत, गोरे लोक “घोड्यावर बसून चेंडू फेकीत भोवऱ्याप्रमाणे गरगरा फिरत” आहेत, हिंदू लोकांचे पुजारी “चांदला करो महाराज” म्हणून लोकांना हटकत आहेत, पारशी लोक समुद्राच्या पाण्याने मावळतीच्या वेळी इतर लोकांपासून फटकून उभे राहून आपल्या विहित धार्मिक प्रार्थना करत आहेत, अशी निरनिराळी दृश्ये लेखकद्वय रंगवतात. या देखाव्याला “चणा ले रे गरमागरम” “गंडेरी ले रे गंडेरी”, “ताज्या भज्या”, “सोडा वॉटर” इत्यादी “चमत्कारिक स्वर” काढत या गोष्टी विकणारे फेरीवाले, चौपाटीवर सुरू असलेला इंग्रजी “ब्यांड”, कचेऱ्या सुटल्यावर दिवसाच्या हिशेबाच्या गप्पा करत आणि गाणी म्हणत घरी जाणारे लोक, अशा नाना प्रकारच्या ध्वनिचित्रांची जोडही त्यांनी दिली आहे आणि त्यामुळे हे वर्णन अगदी हुबेहून डोळ्यांपुढे उभे राहते!

मुंबईतल्या मिश्र वस्तीमुळे सतत चालू असलेले सणवार यांचीही माहिती ‘वृत्तांत’ पुरवतो. त्यांत आता इतिहासजमा झालेले काही सणही आहेत. हिंदू लोकांचा ‘ढोसले’ नावाचा एक सण, गुजराती लोकांची ‘गोवाळी अग्यारस’ नामक एकादशी, मोगल लोकांचा मोहरमच्या ‘कत्तलच्या रात्री’ला निघणारा आणि शिया-सुन्नींच्या मारामाऱ्यांना कारणीभूत होणारा तलवारी लावलेला मिरवणूकीचा घोडा हे पूर्णपणे विस्मृतीत गेलेले सण आपल्याला इथे भेटतात. ‘गोवाळी अग्यारस’च्या दिवशी लहान मुलांना गोपाळांचा वेश देऊन घरोघर पाठवले जाई आणि त्यांना खाऊ मिळे! श्वेतांबर जैन लोकांच्या डेऱ्यांत तीर्थंकराच्या मूर्तींना ‘आंगी’ चढवण्यासाठी चालणारे लिलाव, त्यात “पन्नासेठ नी आंगी एक मण” अशी सुरुवात झाल्यावर “मारी बे मण”, “मारी तीन मण” अशा अहमहमिकेने वाढत जाणाऱ्या बोली, आणि शेवटी जितके मण बोलले आहेत तितक्या मणाच्या तुपाचे ठराविक दराने दिले जाणारे पैसे, अशा वैचित्र्यपूर्ण सामाजिक रूढींचे दर्शन ‘वृत्तांत’ आपल्याला घडवतो. 'वृत्तांत’ लिहिला गेला तेव्हा गणेशोत्सवाला 'सार्वजनिक' रूप मिळाले नव्हते (ते मिळायला १८९३ सालची हिंदू-मुसलमान दंगल आणि टिळकांचे अभिनिवेशी राजकारण कारणीभूत झाले, हा नंतरचा इतिहास). पण तरीही मुंबईत विसर्जनाच्या मिरवणुका सार्वजनिक पद्धतीनेच निघत. त्यावेळी होणारा वाद्यांचा दणादणाट तेव्हाही “ब्रह्मांड भेदून देवांच्याही कानी जाईल”, इतका जोरदार असेच! काही लोक तर महिना-महिनाभर गणपती पूजत ही एक अभिनवच म्हणावी अशी माहिती आपल्याला इथेच समजते. गणपती आटोपल्यानंतर येणाऱ्या नवरात्रात वाणी आणि इतर गुजराती लोकांच्या बायका “गर्भे कुटीत असतात” –गरबा या पारंपरिक नाचाला शिंगणे-आचार्य यांनी दिलेले हे क्रियापद रूप अभिनवच म्हणायला पाहिजे! त्यांचे वर्णन करताना लेखक-द्वयाची लेखणी अचानक शृंगारिक हरदासी भाषेचा लहेजा धारण करते – “अशा नवयुवती वस्त्रालंकारादिकेकरून युक्त होत्सात्या आनंदाच्या भरात नृत्यगीतादिकेकरून कोणास मोह उत्पन्न करणार नाहीत?” धार्मिक उत्सवांत “विश्वयोषिता” (हाही शिंगणे-आचार्य यांचा एक अभिनव शब्द!) म्हणजे नाच-गाणी करणाऱ्या बायकांचे कार्यक्रम ठेवायची ही रूढ पद्धत होती. त्या वेळी जाणारे-येणारे लोक तिरक्या नजरेने या बायकांकडे कसा ‘डोळा ठेवून’ असत त्याची झलकही आपल्याला या वर्णनात मिळते!


 Muharram Procession, Bombay, c.1890
Muharram Procession, Bombay, c.1890

आपल्या वाचकवर्गाला शहाणे करावे असा लेखकद्वयाचा मानस असल्याने जिथे तो वर्ग सहज पोचू शकत नाही अशा काही ठिकाणांचा त्या लोकांना परिचय करून द्यावा हा त्यांचा हेतू असल्यास काही नवल नाही. यांपैकी काही ठिकाणे औद्योगिक आहेत. कापडाच्या गिरण्या हा मुंबईच्या औद्योगिक भूदृश्याचा महत्त्वाचा भाग होऊन या वेळी पस्तीसहून अधिक वर्षे झाली होती. (पहिली कापडगिरणी नानाभॉय दावर यांनी १८५२ साली सुरू केली.) तेव्हा या ठिकाणांत कापडाच्या गिरणीला पहिला मान मिळाला नसला तरच नवल. इथे कापूस गिरणीत आणण्यापासून तो साफ करणे, सरकी काढणे, पिंजणे, पेळू करणे, सूत कातणे आणि कापड विणणे, रंग देणे वगैरे सगळ्या प्रक्रियांचे वर्णन ‘वृत्तांत’ सादर करतो. वेगवेगळ्या यंत्रांद्वारे या क्रिया कशा केल्या जातात हे वर्णन करताना ‘वृत्तांता’ने अचंब्याचे वळण घेतले दिसते. दुसरे असेच ठिकाण म्हणजे मुंबईची टांकसाळ. यंत्रांनी नाणी पडणारी टांकसाळ मुंबईत १८३५ साली चालू झाली. इथे नाणी कशी पाडली जातात त्याचेही वर्णन ‘वृत्तांत’ साद्यंतपणे करतो. धातूचे पत्रे, त्यांच्यापासून चकत्या बनवल्या जाणे, त्या स्वच्छ करणे, त्यांचे वजन करणे आणि अखेरीस त्या यंत्रात घालून मिनिटाला शे-दीडशे नाणी पाडली जाणे याचेही वर्णन करताना ‘वृत्तांत’कार ‘काय हो चमत्कार’ अशा दृष्टीतून करतात. यंत्राच्या करामतीमुळे पारंपरिक चाली-रीती आणि समजुतींना कसे धक्के बसत त्याचा एक मासला आपल्याला या टांकसाळ-वर्णनात दिसतो. इथे प्रवेश केल्यानंतर जिकडेतिकडे नाणी आणि ती ज्यापासून बनतात ते धातूंचे तुकडे, चकत्या वगैरे पडलेले असतात त्यामुळे “टांकसाळ पाहावयास जाणारांपैकी कोणी देवभोळा मनुष्य तेथे पडलेल्या नाण्यांवर लक्ष्मी म्हणून पाय देणार नाही असे मनांत आणील तर त्यांस टांकसाळ पाहावयास मिळणेच नाही” अशी टिप्पणी ‘वृत्तांत’कारांनी केली आहे!

टांकसाळ किंवा कापडगिरणी अशा जागी जनसामान्यांना प्रवेश सामान्यतः प्रतिबंधित असला तरी विशेष परवानगी काढून त्या बघता येत असत. पण त्या वेळच्या मुंबईत अशाही काही जागा होत्या जिथे वर्णद्वेषी नियमांमुळे सामान्य, भारतीय लोक जाऊ शकत नसत! ब्रीच कॅन्डी इथे असलेला स्विमिंग पूल नावापुरता ‘सार्वजनिक’ असला तरी तिथे फक्त गोऱ्या लोकांनाच प्रवेश दिला जाई. अशा ठिकाणचे वर्णन करायचे तपशील शिंगणे-आचार्यांनी कुठून मिळवले असावेत त्याची काही माहिती ते देत नाहीत – पण वर्णन मात्र नेहमीप्रमाणेच साद्यंत आहे. इथल्या स्नानगृहात “शावर बाथ” नावाची एक दुष्प्राप्य चीज असे, ती त्या वेळच्या बहुतांश देशी लोकांना माहीत नसावी असे दिसते कारण त्याचे वर्णन “झारीसारख्या भांड्यातून पावसाच्या सरीप्रमाणे त्या झारीला मधोमध असलेल्या छिद्रांतून पाणी पडते आणि त्याखाली आंघोळ करणे त्याला शावरबाथ म्हणतात” असे अगदी बैजवार केले आहे! या स्नानगृहाप्रमाणेच सर्वसाधारण पांढरपेशा माणूस सहजी पोचणार नाही अशी जागा म्हणजे तुरुंग! ‘डोंगरीच्या तुरुंगातले आमचे शंभर दिवस’ या दीर्घ लेखांतून गोपाळराव आगरकरांनी त्याचा परिचय वाचकवर्गाला करून दिला होताच. पण शिंगणे-आचार्य तुरुंगाचे वर्णन करतात ते ती एक नैमित्तिक आचारांच्या पलीकडे नेऊन माणसाचे ‘माणूस’पण हिरावून नेणारी जागा कशी आहे त्या अनुषंगाने. तुरुंगात येताना बायकांची काकणे पिचवतात आणि पुरुषांची डोई भादरतात म्हणजे शेंडी कापून टाकतात, इतकेच नव्हे तर “जानवेही तोडून टाकतात, असे ऐकले आहे” – म्हणजे तुरुंगातले कैदी हे सामाजिक दृष्टीने ‘माणसे’ म्हणवायच्या लायकीचे राहतच नाहीत, आणि हे शिंगणे-आचार्यांच्या दृष्टीने त्यांना मिळणाऱ्या शिक्षेपेक्षाही कदाचित भयानक आहे! तुरुंगातल्या ‘ट्रायल’ वॉर्ड किंवा ‘हार्ड लेबर’ वॉर्ड यांना “तरळ” आणि “हाटली” अशी (पुलंनी म्हटल्याप्रमाणे) शब्दांचे कोपरे घासून निर्माण केलेली मराठी बोलीभाषेतली नावेही ‘वृत्तांता’त सापडतात. फाशीची शिक्षा अंमलात आणायच्या वेळी दैववशात फासाची दोरी तुटली किंवा “गव्हर्नर साहेब किंवा तशाच कुठल्या अब्रूदार माणसाची गाडी” तिथून गेली, तर त्या कैद्याला जीवदान मिळे. असे कैदी सुटू नयेत म्हणूनच ‘तुला जीव जाईपर्यंत फांसावर लटकावले जाईल’ असा निर्णय जजसाहेब द्यायला लागले!


 Bombay Street Scene (Bhendy Bazar Road) : a general street scene with horse-drawn trams in Bombay (Mumbai) taken by Bourne & Shepherd in the 1880s, part of the Earl of Jersey Collection, 'India. Bombay to Madras' album.
Bombay Street Scene (Bhendy Bazar Road) : a general street scene with horse-drawn trams in Bombay (Mumbai) taken by Bourne & Shepherd in the 1880s, part of the Earl of Jersey Collection, 'India. Bombay to Madras' album.

‘वृत्तांता’त आलेला आणखी एक मनोरंजक भाग म्हणजे मुंबई शहरात घडलेल्या काही घटना. पहिली आगगाडी सुरू झाली तेव्हा लोकांची तिच्याप्रती काय समजूत होती, पहिल्या दिवशी गाडीत कोणकोण बसले होते आणि त्यांनी मुंबई ते ठाणे हा प्रवास कसा केला त्याचे तपशील ‘वृत्तांत’ सांगतोच पण ते केवळ ‘साहेबाचा पोर मोठा अकली, बिनबैलाची गाडी कशी ढकली’ असे केवळ आश्चर्यपूर्ण नाही. रेल्वेमार्ग टाकणे आणि त्यावर गाड्या चालवणे ही कामगिरी मुंबईतल्या काही नागरिकांनी एकत्र येऊन कंपनी काढून केली होती आणि त्यात काय काय अडचणी आल्या, त्यांच्यावर कशी मात केली गेली त्याचेही वर्णन ‘वृत्तांत’कार करतात; म्हणजेच या सुधारणेच्या आर्थिक अंगाशीही ते परिचित आहेत असे दिसते. ‘वृत्तांत’ लिहिला गेला तेव्हा अर्थातच या पुढाकाराचे फायदे स्पष्टपणे दिसू लागले होतेच. ते अधोरेखित करण्यासाठी रेल्वे पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा सामान्य जनतेच्या या प्रकल्पाबद्दल कशा वेडगळ कल्पना होत्या त्याचे चित्र ‘वृत्तांत’ रंगवतो. त्या समजुतींत अशा यंत्रचलित गाड्या अस्तित्वात येणे केवळ अशक्यप्राय आहे हा समज एका बाजूला, आणि असे काही असलेच तर “आपले प्राचीन पूर्वज वेडे होते काय? त्यांनी अशा प्रकारचे शोध निश्चितच लावले असते!” असा सांस्कृतिक आत्मविश्वास दुसऱ्या बाजूला असे ध्रुवीकृत दृष्टिकोन ‘वृत्तांता’त डोकावतात. या बाबतीत आजही परिस्थिती विशेष वेगळी नाही हे आपण पाहत आहोतच!

रेल्वेची सुरुवात झाली तो प्रसंग ‘वृत्तांत’ लिहिला गेला त्याच्या आधी अनेक वर्षे घडला. पण १८८९च्या जवळपास घडलेला एक मोठा नागरी समारंभ म्हणजे राणी व्हिक्टोरिया हिची ‘गोल्डन ज्युबिली’ अथवा राज्यारोहणाचा सुवर्णमहोत्सव. या प्रसंगाचे वर्णन करताना ‘वृत्तांत’कारांची राजनिष्ठा अगदी ओसंडून वाहते! १८८७ हे वर्ष हिंदुस्तानाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहे” याचे कारण म्हणजे हा सोहळा असे त्यांचे मत आहे. हा समारंभ मुंबईच्या राजनिष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि धामधुमीने साजरा करून राणीसाहेबांप्रती आपले प्रेम व्यक्त केले, याबद्दल ते संतोष व्यक्त करतात. या प्रसंगी शहर दिव्यांनी सजवले होते, लोकांना सुटी देण्यात आली होती. चर्चगेट स्ट्रीटवर रस्ताभर जी काही शोभा आणली होती ती “केवळ अवर्णनीय” होती. कमानी, त्यावर टांगलेल्या हंड्या-गलासे, दुतर्फा टांगलेली आणि वाऱ्याने फडफडणारी ‘गॉड सेव्ह दि क्वीन’ अशी सुवर्णाक्षरे लिहिलेली निशाणे, खास केलेली रोषणाई वगैरे थाट होता. मुख्य समारंभ मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. गव्हर्नरसाहेबांचे या ठिकाणी मोठ्या थाटाच्या मिरवणुकीने आगमन झाले. मिरवणूक रस्त्याने जात असता नागरिक दोहो बाजूला उभे राहून महाराणींचा जयजयकार करत होते. ‘दरबार कक्षा’त गव्हर्नर आसनस्थ झाल्यावर महाराणींचे अभिनंदन करणारी आणि त्यांना दीर्घायुरारोग्य मिळावे म्हणून देवाची प्रार्थना करणारी मानपत्रे मुंबईच्या सन्माननीय नागरिकांनी त्यांना प्रदान केली. दळणवळणाच्या साधनांची मातब्बरी अशी की, दुसऱ्याच दिवशी खुद्द महाराणींनी तारायंत्राद्वारे मुंबईच्या नागरिकांकरता खास संदेश पाठवला, ज्यात त्यांनी या शुभेच्छांबद्दल त्यांचे वैयक्तिकरीत्या आभार मानले होते!

रेल्वे, सायकली वगैरेंनंतर ‘वृत्तांता’ची उडी जाते ती थेट विमानावर! सकृद्दर्शनी हे विचित्र वाटेल, पण अर्थातच ‘वृत्तांत’ ज्याला ‘विमान’ म्हणतो ते आजच्या रूढ अर्थाने विमान नसून, हवेपेक्षा हलक्या साधनांच्या आधाराने उडवले जाणारे बलून होते. बलूनिंग हा एकोणिसाव्या शतकात अनेक धाडसी लोकांचा छंद असे आणि हे लोक हा खेळ लोकांच्या मनोरंजनाकरता करून दाखवत. ‘वृत्तांता’मध्ये ‘मिस्तर कैट’ नावाच्या माणसाने १८५३ मध्ये मुंबईला ‘विमान’ उडवले होते आणि पुढे १८७३-७४मध्येही “परळास लालबागेत” असाच विमानोड्डाणाचा प्रयोग झाला होता. त्यानंतर २६ जानेवारी १८८९ रोजी मुंबईला पर्सिव्हल स्पीअर नावाच्या माणसाने विमान उडवण्याचे खेळ केले. स्पीअरच्या खेळाला तीन तीन रुपये तिकीट असूनही बरीच गर्दी लोटली होती आणि ते परळला जिथे होणार होते तिथवर जाण्यासाठी खास गाड्यांची सोय करण्यात आली होती. काही सरकारी आणि सावकारी कचेऱ्या अर्ध्या दिवसाच्या सुटीने बंद ठेवल्या होत्या. त्या गाड्या जिथे थांबतील तिथपासून ‘विमान’उड्डाणाचे प्रयोग जिथे होणार होते तिथपर्यंत ‘To balloon’ अशा पाट्या लावून गर्दी तिथे वळवण्यात आली होती. स्पीअरचे बलून मागच्या प्रकारांपेक्षा वेगळे होते कारण “त्याचे खालील तोंड मोकळे होते”. मि. स्पीअर सतराशे साठ फूट वर गेल्यानंतर “छत्रीच्या सहाय्याने खाली उतरू लागला”, पण त्याचे विमान वर जात राहिले. स्पीअरने तीन-चार मिनिटातच जमीन गाठली. त्याचे ‘विमान’ही ग्यास संपल्याने काही अंतरावर खाली उतरू लागून थोड्या वेळाने जमिनीवर आले.या वर्णनावरून बहुतेक स्पीअरने पॅरॅशूटसारख्या साधनाचा वापर करून बलूनमधून उडी मारली असावी असे दिसते. या प्रयोगाने प्रेक्षक लोक निश्चितच थक्क झाले असणार, कारण लेखकद्वयही “धन्य आहे अशा धाडसी मनुष्याची!!!” असे तीन उद्गारचिन्हांनी मंडित उद्गार काढतात.

‘वृत्तांत’ लिहिला गेला तेव्हा मुंबईचे आधुनिक अर्थाने नागरीकरण व्हायला सुरुवात झाली होती असे म्हटलेच आहे. आजच्या मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध इमारती तेव्हा बनलेल्या होत्या, रस्त्यांची वाढ झाली होती आणि उपनगरीय रेल्वेने लोक तेव्हाच्या साष्टी बेटातल्या वांद्रे किंवा अंधेरीपर्यंत जायला लागले होते. मुंबई बाहेरच्या जगाशी ‘वेगवान’ अशा आगबोटींनी जोडली जाऊ लागली होती – एडनसारख्या लांबच्या बंदरांतून या बोटी केवळ चार दिवसांत मुंबई गाठू लागल्या होत्या! प्रवासी लोकांसाठी उतरण्याची सोय व्हावी म्हणून हॉटेले निर्माण होऊ लागली होती. ‘एस्प्लनेड’सारख्या हॉटेलांत बाहेरगावच्या प्रवाशांची सोय पन्नास-साठ रुपयांपासून ते दोन-अडीचशे रुपये महिना दरांनी होत असे. वर्गवारीप्रमाणे त्यात खाजगी सेवेसाठी नोकराचाही समावेश असे. एकीकडे ‘ग्लोबल’ होऊ लागलेल्या मुंबईत दुसरीकडे जातपातीची बंधने, विशेषतः खाणेपिणे आणि कपडालत्ता अशा थेट ‘विटाळा’शी संबंध असलेल्या बाबतींत अजूनही बद्धमूल होती. देशी लोकांकरता ख्रिस्ती, मुसलमान किंवा पारशी लोकांची चाकरी अशा बाबतीत पत्करणे, आणि पत्करून घेणे हे अशक्यप्राय होते. या लोकांकडे चाकरी करायला बाटग्या लोकांची तयारी असे, पण हिंदू लोकांतल्या अगदी निम्न जाती सोडल्यास इतर लोक अशा आंतरधर्मीय चाकरीला राजी नसत. याच कारणाने देशी लोकांची मुंबईला केवळ धावती भेट देण्याच्या कारणाने फेरी झाली आणि कोण्या नातेवाईकाकडे उतरण्याची त्यांची परिस्थिती नसेल तर राहण्यासाठी योग्य स्थळांच्या अभावी त्यांची खूपच गैरसोय होई. ‘वृत्तांता’त आलेली बहुतेक हॉटेल्स ही उच्चभ्रू गोऱ्या वर्गाने उतरण्याच्या लायकीची आहेत. ‘वृत्तांता’च्या शेवटी जी माहितीपूर्ण परिशिष्टे दिली आहेत, त्यात बावीस हॉटेल्सची एक यादी आहे. पण त्यात ‘नारायण भोजन व वसतिगृह’ या केवळ एकमेव ‘नेटीवांकरता’ असलेल्या हॉटेलचे नाव आहे. त्याच्या उमरखाडी आणि ठाकुरद्वार अशा दोन ठिकाणी शाखा होत्या. खानावळ ही संस्थाही यावेळी मुंबईत दुर्मीळच होती आणि ज्या काही खानावळी होत्या त्यांच्यात मिळणाऱ्या जेवणाची लायकी अगदी यथातथा होती. त्याचे वर्णन वाचताना मुंबईत आलेल्या अभ्यागतांचे या बाबतीत काय हाल होत त्याची साद्यंत कल्पना आपल्याला येते! सोवळेओवळे, वाढप आणि भोजन यासंबंधीच्या रीती या काही एकसमान नसत, त्यामुळे अनोळखी ठिकाणी जेवायला जाताना लोकांची पुरती तारांबळ उडे. खानावळ चालवणारी एखादी गरजू विधवा बाई असे. पण तिचे अभ्यागतांवर अशा बाबतीत बारीक लक्ष असे! जेवायला जाणारा खाणावळीण बाईंच्या जातीचा नसेल तर त्याच्या तांब्या-ताटा-सोवळ्याची "गम्मत उडून" खाणावळीण बाई आणि तिच्या हाताखालचीची आपापसांत जी कुजबूज सुरू होते त्याचं "यथार्थ वर्णन करणे अशक्य होय" असं शिंगणे-आचार्य म्हणतात! जेवण म्हणजे पातळ वरण, एखादी भाजी, ‘केवळ आंबट वास येतो म्हणून ताक म्हणावे’ असे पाणी, सुपारीएवढ्या मुदीचा भात असे कदान्न असे आणि घरचे सुग्रास जेवण जो जेवत असे, त्याला हे अन्न घशाखाली उतवाताना ‘केवळ ओकारीच यायची बाकी’ राहत असे.

मुंबईतले रस्ते आणि इमारती यांची तपशीलवार माहिती ‘वृत्तांता’त येते. त्यापैकी कित्येक इमारती आजही मुंबईचे landmark म्हणून ओळखल्या जातात. काही इमारतींचा आसपास आता बदलला आहे. उदाहरणार्थ, टाऊन हॉलच्या समोर तेव्हा ‘बॉम्बे ग्रीन’ म्हणून ओळखले जाणारे मैदान होते, जिथे आता हॉर्निमन सर्कल आणि उद्यान आहे. त्या मैदानाच्या बाजूने नव्या इमारती उभ्या राहायला अद्याप दोन दशके वेळ होता. राजाबाई टावरसारखी ‘उंच’ इमारत हा लोकांच्या कौतुकाचा भाग होता. वर गेल्यावर खालच्या गाड्या माणसे इत्यादी कसे लहान दिसतात, रस्त्यावर उभे राहून त्याच्या शिखराकडे बघिताना डोईवरची टोपी किंवा अन्य शिरस्त्राण पडू नये म्हणून हाताने कसे धरून ठेवावे लागते, वगैरे वर्णन ‘वृत्तांत’कार पुरवतातच. त्याव्यतिरिक्त युनिव्हर्सिटी सिनेट हॉल, ओल्ड सेक्रेटरीएट, जनरल पोस्ट ऑफिस, व्हिक्टोरिया टर्मिनस वा बोरीबंदर स्टेशन, जेजे-कामा-जीटी इत्यादी हॉस्पिटले, एल्फिन्स्टन कॉलेज, निरनिराळ्या शाळा, मंदिरे, चर्चेस आणि मशिदी यांची साद्यन्त वर्णने ‘वृत्तांता’त वाचायला मिळतात. महालक्ष्मीच्या देवळाच्या प्रांगणात धाकजी दादाजी यांचे देऊळ असून “त्यांतील सर्व देवांस त्यांनी आपल्या मुलांची नावे दिली असून मुख्य शंकराचे लिंगास ‘धाकलेश्वर’ म्हणून आपलेच नाव दिले आहे म्हणून त्या देवांच्या दर्शनास फारसे कोणी जात नाही“ असे ‘वृत्तांता’त नोंदवले आहे! देवळांमध्ये अर्थातच वाळकेश्वर, बाबुलनाथ, गांवदेवी, मुंबादेवी, भुलेश्वर या जुन्या देवळांचे तसेच माधवबाग, कृष्णबाग, सुंदरबाग, अशा तुलनेने नवीन देवळांचे वर्णन आपल्याला इथे वाचायला मिळते. बाबुलनाथाच्या देवळाजवळ असलेल्या शेतांत त्या वेळी पावसाळी काकड्यांचे पीक घेतले जाई, आणि या काकड्या विशेष रुचकर असल्याने त्यांना भाव चांगला येई! चर्चेसमध्ये सेंट थॉमस कॅथीड्रल आणि सेंट अँड्रूजचे ‘स्कॉटिश चर्च’, सेंट जॉन म्हणजे अफगाण चर्च तसेच मशिदींमध्ये जुम्मा मशीद, जकेरिया मशीद, वरळीच्या समुद्रात असलेली हाजी अली आणि त्याची बहीण यांच्या कबरी, आणि माहीमच्या मखदूम बाबाचा दर्गा यांची वर्णी लागलेली आहे. इतरधर्मियांच्या उपासनास्थळांत पारशांच्या अग्यारी, आणि यहुद्यांचे सिनेगॉग यांचेही तपशील ‘वृत्तांत’ पुरवतो.


 Bombay, Street Scene (Carnac Road, looking towards West, Crawford Market on the left) Photograph of Carnac Road, Bombay from the Macnabb Collection (Col James Henry Erskine Reid): Album of Miscellaneous views, taken by Lala Deen Dayal in the 1880s.
Bombay, Street Scene (Carnac Road, looking towards West, Crawford Market on the left) Photograph of Carnac Road, Bombay from the Macnabb Collection (Col James Henry Erskine Reid): Album of Miscellaneous views, taken by Lala Deen Dayal in the 1880s.

समारोप म्हणून ‘मुंबईचा वृत्तांत’ हा “ काळ उघडा करणाऱ्या” पुस्तकांत का मोडतो याची पुन्हा एकदा उजळणी करू. ‘वृत्तांत’ अशा कालावधीचे प्रतिनिधित्व करतो, ज्यात औद्योगिक किंवा आधुनिक दृष्टीने ज्याला ‘शहरी’ राहणीमान म्हणता येईल, तशा जीवनपद्धतीने राहणारी जनता तुलनेने अतिशय कमी होती. हिंदुस्थानाचा विस्तीर्ण भूप्रदेश पारंपारिक पद्धतीच्या सरंजामी, बाजारपेठी गावांनी आणि शेतकी राहणीमानाच्या लोकांनी व्याप्त होता. ब्रिटिश अमदानीत, त्यांच्या प्रांतिक राज्यकारभाराची ठाणी म्हणून जी शहरे विकास पावली, त्यांत मुंबई हे अव्वल दर्जाचे व्यापारी स्थळ म्हणावे लागेल. मुंबईची नागरी वाढ हे सर्वस्वी ब्रिटिश राज्याचे फलित आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही विशिष्ट अर्थकारणे आणि विवक्षित आर्थिक धोरणांच्या मार्गाने या वाढीला मोठे प्रोत्साहन मिळाले. तिच्या वाढीत आर्थर क्रॉफर्ड, रिचर्ड टेम्पल, बार्टल फ्रीअर अशा ब्रिटिशांबरोबरच नाना शंकरशेट, प्रेमचंद रॉयचंद, जमशेदजी जीजीभॉय, डेव्हिड ससून, मुहम्मद अली रोगे अशांसारख्या मुंबईच्या धनाढ्य नागरिकांचा मोठा वाटा होता. हा काळ शांततेचा होता – अठराशे सत्तावन्न होऊन गेले होते, दक्खनी दंगली उलटल्या होत्या, लॉर्ड लिटनसारखा हुच्च व्हाईसरॉय परतून त्याच्या जागी रिपनसारखा उदारमतवादी राज्यकर्ता येऊन गेला होता. संक्रमण होत होते पण ते ‘क्रांतिकारक’ किंवा उलथापालथ घडवून आणणारे नव्हते, धीम्या गतीने होणारे होते. मंडलिक, तेलंग, फिरोझशाह मेथा यांच्यासारखे ‘सनदी’ सुधारणा-पद्धतीवर गाढ विश्वास असणारे स्थानिक राजकारणी याच काळात कार्यरत होते. पण एकीकडे असे पैसा आणि विद्या या दोन्ही दृष्टींनी दिग्गज असणारे लोक आपला ठसा उमटवत असतानाच दुसरीकडे ‘वृत्तांता’च्या लेखकद्वयासारखे लोक – जे राजनिष्ठ, मवाळ, मध्यमवर्गीय कारकुनी किंवा शिक्षक वृत्तीचे, पण तरीही विचक्षण आणि ध्येयप्रेरित होते – तेही याच काळात आपल्या परीने समाजाला दिशा द्यायचे कार्य करत होते. ‘वृत्तांता’चे पहिले महत्त्व हे आहे की, त्याद्वारे अशा लोकांकडे आपली नजर वळते. त्यांच्या जीवनशैलीचे, मतप्रणालीचे आणि एकंदरीतच ‘वर्ल्ड व्ह्यू’चे दर्शन आपल्याला ‘वृत्तांत’ घडवतो. त्यांची भाषा, त्यांचे आचार-विचार यांतून एक प्रकारचा नागरी, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, आंतरिक विचार करू पाहणारा आणि घडवणारा काल आपल्यापुढे उभा राहतो. ‘वृत्तांता’मुळे अशा नागरी जीवनाची एकंदरीत ‘चौकट’ काय होती ती आपल्याला दिसू लागते. तपशील – मग ते इतिहासाचे असोत, की लेखकांना समकालीन असलेल्या जीवनाचे – या चौकटीत अधिक रंग भरतात. लेखकांच्या भाषिक लहेजाने ते आणखीच गडद होतात. या सगळ्या बाबींतून आपल्याला मुंबई शहराचा वर्धिष्णु काल अनुभवायला मिळतो. मागे म्हटल्याप्रमाणे या काळात आणि आपल्या आजच्या काळात पुष्कळच तफावत आहे, आणि ती सगळ्याच बाजूंनी निर्माण झाली आहे, होतही आहे. उदाहरणार्थ, धनाढ्य नागरिकांचा शहर-सुधारणेच्या आणि नागरीकरणाच्या कार्यात जो हातभार एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला दिसतो, त्याच्या भागांशानेही तो आज दिसत नाही! पण असे असूनही काही बाबतींत आपल्याला आजच्या काळाचे प्रतिसादही या लेखनात दिसतात, जसे की गर्दी, जागांचे वाढते भाव, नागरिकांचे चमत्कारिक वर्तन, मुंबईचे बहुढंगी ‘कॉस्मोपॉलिटन’त्व आणि एकंदरीतच मुंबई कोणाला उपाशी घालत नाही, ही सर्वंकष समजूत! अशा भावनिक प्रतिसादांतून आणि ‘भूतकाळाच्या प्रतिध्वनी’तून जी ‘काळ उभा करण्या’ची अनुभूती ‘वृत्तांत’आपल्याला देतो ती केवळ सामाजिक इतिहासाच्या दृष्टीनेच अनन्य आहे असे नाही, तर स्मरणरंजन या मध्यमवर्गीयांच्या आवडत्या करमणुकीलाही अत्यंत पूरक आहे. ‘वृत्तांत’ वाचताना भूतकाळाच्या शांत-शीतल लहरी, नर्मविनोद आणि रंजक तपशील, यांच्याबरोबर आपल्याला अनुभवायला मिळतात, हे या पुस्तकाचे अद्वितीय लक्षण आणि यशही आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

अरे वा! फोटो किती सुंदर दिसत आहेत! फोटो आणि शैलेन यांना बघूनच वाचायची इच्छा अधिक बळावली आहे. आता जरा सावकाशीने वाचून काढेन.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

ग्रेट. अतिशय उत्कृष्ट.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिसुंदर. लेखन खूप आवडले. सर्वंकष परामर्श घेतला गेल्यामुळे अजूनच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम.
पण अशी जी पुस्तके आहेत ती मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय वगैरे मोठ्या वाचनालयांत फक्त तिथेच पाहता येतात. संदर्भ ग्रंथ.
फोटो- असे जुने फोटो नेहरु सेंटर ,वरळी येथे प्रदर्शित केले आहेत. ते पाहता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय आवडले, शैलेनराव .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्व लेखांचे एक खूप देखणं पुस्तक करणार आहात का संपादक मंडळ? मराठीतलं एक जबरा पुस्तक होईल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लेख छान झाला आहे.

१. राईट बंधूंच्या आधी शिवकर बापूजी तळपदे यांनी "विमान" उडवले म्हणतात ते बलून असावे काय?
२. गायब झालेल्या रूढीविषयी. माझ्या लहानपणी नवरात्रात गुजराती मुली एक भोके असलेले रंगीत मडके घेऊन घरोघरी जात. आणि काहीतरी गाणे/श्लोक म्हणत असत. मग त्यांना पाच दहा पैसे मिळत. हल्ली ती रूढी नाहीशी झालेली दिसते.
३. रुमाल ठेवला आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. राईट बंधूंच्या आधी शिवकर बापूजी तळपदे यांनी "विमान" उडवले म्हणतात ते बलून असावे काय?
हे साधे बलून नसून 'एअरशिप' प्रकारातलया 'डिरिजीबल' कॅटेगरीतले उड्डाण यान होते याबद्दल मला तरी शंका वाटत नाही. त्यांनी राईट बंधूंच्या आधी 'विमान' उडवले ही समजूत बहुधा 'विमान' या शब्दाच्या अशा योजनेद्वारे प्रसृत झाली असावी. 'आकाशात उडते ते विमान' अशी सोपी व्याख्या त्या काळी केली जाई, केली जाई, याला वृत्तांतातलेच वर्णन साक्षी आहे.

२. गायब झालेल्या रूढीविषयी. माझ्या लहानपणी नवरात्रात गुजराती मुली एक भोके असलेले रंगीत मडके घेऊन घरोघरी जात. आणि काहीतरी गाणे/श्लोक म्हणत असत. मग त्यांना पाच दहा पैसे मिळत. हल्ली ती रूढी नाहीशी झालेली दिसते.
वृत्तांतात अशा एका रूढींचा उल्लेख आहे पण ती पद्धत वाणी वगैरे लोकांमधल्या 'खालच्या' प्रतीचे लोक करतात असे म्हटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओव्हरऑल वृत्तांत हा मुंबईस कधी जाणे होत नसलेल्या मुंबईबाहेरील देशी लोकांसाठी लिहिलेला वाटतो. म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकात कुणी अमेरिका, इंग्लंड यांचे वर्णन ममव लोकांसाठी लिहिले असावे तसे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी आपला गोडसे भडजीचं प्रवास वर्णन या वरील लेख वाचूनच पुस्तक वाचलं.तुमचा डिजिटल दिवाळी २०१६ चा 'कम्फर्ट फूडची परमावधी' हा लेखही खासच होता. फारच सुंदर समीक्षा करता तुम्ही. वाचनवेडा खटोटोपी करत पुस्तकं मिळवतो आणि वाचतोच. हा लेख वाचल्यावर मूळ पुस्तकांपर्यंत जाणं आलं, नव्यानं शोध घेणं आलं. एखादी तपेली, फाटके पागोटे, व अंगात खादीची बंडी याच सामुग्रीवर येत, सुरुवात मुंबईत करून आज महाराष्ट्रातलं एकही मोठं शहर वगळता येत नाही जिथं मारवाडी आपलं दुकान नाही म्हणून खंत करतील. हिंदू लोकांचा ‘ढोसले’ सणाचा उल्लेख खूप लहानपणी गावी ऐकला आहे. हंड्या गलासे हा ही शब्द मुंबईचीच देण असावी असं वाटतं हंड्या झुंबरं असं वर्णन सगळीकडं ऐकू येतं. तरी आमच्या मूळ घरी हंड्या गलासे हा शब्द वापरीत. वरील लेखात असलेल्या ''काही लोक तर महिना-महिनाभर गणपती पूजत'' आमच्या भागातील म्हणजे तळ मराठवाड्यात काही लोकं एकवीस दिवसाचा गणपती बसवत, त्यांचं कोणीतरी नक्की मुंबई दर्शनाला गेल्याचा संभव नाकारता येत नाही. मुंबईत पेरलं की सगळीकडं उगवतं. ह्या गाव खेड्याच्या म्हणीला नक्कीच अर्थ आहे..ता. क. फोटो खूप सुंदर आहेत. वर उल्लेख झाल्याप्रमाणं या लेखांचं स्वतंत्र पुस्तक व्हावे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मुंबईचा वृत्तांत' बाळकृष्ण बापू आचार्य, मोरो विनायक शिंगणे अशाच प्रकारचे एक पुस्तक 'मुंबईचा वृत्तान्त अथवा मुंबईचा मार्गदर्शक' अशा नावाने १९२५ साली जयराम रामचन्द्र चौधरी (जोडाक्षर शिक्षणपाठ कर्ते) मु पिंपरूड, पो. फैजपूर जि. पूर्व खानदेश ह्यांनी लिहून प्रकाशित केले होते. किंमत रु १.

पुस्तक थोडे down market प्रकारातील आहे. लहान गावांतून मुंबई बघण्यासाठी आलेल्या लोकांना पुढे ठेवून ते लिहिले आहे हे स्पष्ट जाणवते. पण मुंबईतील तत्कालीन ट्रॅम, लोकल ट्रेन, रेल्वे आणि आगबोट, मुख्य रस्ते, पाहण्याची प्रमुख स्थळे, वीज आणि गॅसचे दिवे, प्रचलित वजनेमापे, प्रमुख बाजार, ठकबाजीचे प्रकार, घोड्यांच्या शर्यती आणि नाटक-सिनेमा थिएटरे, प्रख्यात व्यापारी आणि दुकाने अशा अनेक तत्कालीन गोष्टींची वर्णने त्यामध्ये मिळतात. १०० वर्षांपूर्वीच्या मुंबईची चांगली स्मरणयात्रा पुस्तकातून आजच्या वाचकास घडते.

दुसर्‍या महायुद्धातील CBI Theatre म्हणजेच China-Burma-India Theatre ह्या भागातील युद्धामध्ये भाग घेण्यासाठी आणण्यात आलेले अमेरिकन, ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सैनिक मुंबई बंदरात उतरल्यावर त्यांचे मुंबईतील काही दिवसांचे वास्तव्य सुरळित पार पडावे अशा हेतूने त्यांना दक्षिण मुंबईची तोंडओळख करून देणे हा हेतु असलेली एक पुस्तिका माझ्या नजरेस आली होती. तिचा परिचय करून देणारा माझा लेख ह्या संस्थळावर येथे उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त माहिती आहे ही.
श्री. ना. पेंडसे ह्यांच्या 'कलंदर' कादंबरीतूनही ६०/७० वर्षांपूर्वीच्या मुंबईचे सुरेख वर्णन आले आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय माहितीपूर्ण आणि तितकंच रसाळ लिखाण. खूप आवडलं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0