युवाल नोवा हरारी यांचे ‘’21 Lessons for the 21st Century’’

21 Lessons for the 21st Century - Yuval Noah Harari

युवाल नोवा हरारी यांचे ‘’21 Lessons for the 21st Century’’

“Contemplation of things as they are,
without substitution of imposture,
without the error of confusion,
is in itself a nobler thing than
the hole harvest of invention.” ——-Francis Bacon.

प्रदीर्घ चिंतन करून लिहिलेली पुस्तकं बरेचदा नजरेखालून जातात. पण वाचकालाही चिंतन करायला भाग पाडतील अशी पुस्तकं फार मोजकीच.

युवाल नोवा हरारी ( Yuval Noah Harari ) यांचं ‘’21 Lessons for the 21st Century’’ हे पुस्तक थोडं थोडं वाचत हातावेगळं केलं. थोडं थोडंच; कारण सह-संदर्भ हरारी कितीही हिरीरीने वाचायचा झाला तरी पानांची उलथपालथ करतच पुढे सरकायला पाहिजे ही आस्वाद प्रक्रिया मी त्यांचं बहुचर्चित ‘’सेपियन्स’’ वाचतांनाच अनुभवली होती( आणि आतातर त्यांचंच ‘’होमो डेउस‘’ही हाताशी आहे. ) नकळत हा क्रम बरोबर ठरला कारण मानवजातीचा भूतकाळ,वर्तमान आणि भविष्य अशी क्रमवार मांडणी या तीनही पुस्तकांमध्ये आहे.

स्वत:च्या व्यक्तिगत जीवनातही पठडी मोडून जगणारा हा लेखक जेव्हा, “In a world deluged by irrelevant information, clarity is power.” असं पहिलंच वाक्य लिहीतो आणि ते वाचतांना आपले डोळे तर विस्फारतातच पण कानही टवकारतात. कारण थेट तिथूनच, ‘’21 Lessons for the 21st Century’’ हा आपला आणि हरारींचा ‘संवाद” सुरू झालेला असतो.

एकविसाव्या शतकाच्या व्यामिश्र वर्तमानावर आजच्या एका अग्रणी तरुण इतिहाससंशोधक-मानववंशशास्त्रज्ञ-तत्त्वज्ञ विचारवंतानं टाकलेला क्ष-किरण कटाक्ष आहे. अतिशय थोडक्यात लिहायचं तर या शतकाच्या एकवीस महत्वाच्या आव्हानांवर हरारी यांनी त्यांचं आणि आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. परिशीलनातून आलेलं पारदर्शी असं आकलन हे त्यांचं बलस्थान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आकलन अगदी सोप्या पद्धतीने त्यांनी सामान्य वाचकांपर्यंत पोचवलं आहे.

या शतकाच्या रंगी आणि बेरंगी कल्लोळात आपल्याला वैचारिक दृष्ट्‍या दिशाहीन वाटणं अगदी स्वाभाविक आहे. गेल्या शतकातील दोन महायुद्धांनंतर आपण मानववंशाच्या इतिहासाच्या अशा तुलनेने शांततापूर्ण पण अस्थिर वळणावर आहोत जिथे महायुद्धं नाहीत पण छोट्या आणि मोठ्या युद्धांच्या शक्यतेचा ऋतू कधीच निवळत नाही. युद्धप्रवणता आणि दहशतवादाच्या ज्वालामुखीच्या मस्तकावरच चंगळवादी बाजारपेठा फोफावल्या आहेत , कुठे निर्वासितांचे ओघ संततधार वाहात आहेत, पर्यावरणाच्या किंकाळ्या उमटून जनअरण्यात विरून जात आहेत, आंतरजालाची पकड व्यक्ती आणि समष्टीच्या जीवनात विचित्र बरीवाईट स्थित्यंतरं घडवून आणत आहेत.बरं-वाईट, खरं-खोटं ? काय आणि कसं ठरवायचं ? माहितीच्या महापुरात बुद्धिभ्रंश अधिक होत आहे. राजकारणी, भांडवलशहा त्यांचे हितसंबंधी; सगळे बुद्धिभेद करण्याची दुकानं मात्र व्यवस्थित (आणि व्यवस्थेतही) चालवत आहेत.

या आक्रोशात हरारी एकवीस महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केन्द्रित करून थरारक भाष्य करतात. हा थरार हीच या पुस्तकाची वाचनीयता आहे. मध्येच एखाद्या जागतिक ठळक मथळ्यांची विषयाच्या अनुशंगानी उकल होते; तर कधी वरपांगी राष्ट्रीय हिताची वाटणारी भूमिका कालांतरानं कशी टाकाऊ ठरते; तर कधी रोजच्या जगण्या-वागण्यातल्या सवयी विज्ञान कशा हास्यास्पद ठरविते अशी परिचित विषयांची अव्याहत ये-जा सुरू रहाते.

त्यामुळे हे भाष्य एक रटाळ, अनाकलनीय, कृतक संहितेच्या ओझ्यानं वाकलेलं आणि संदर्भ-सूचीचा धाक दाखवणारं असं पुस्तक न राहता आपल्याशी संवाद करत करत आत्मप्रत्यय देतं — अंतर्मुख करतं.

हे एकवीस मुद्दे पाच भागात विभागलेले आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाचं आव्हान , राजकीय आव्हान, निराशा आणि आशा, सत्य, टिकाव धरण्याची लवचिकता (resilience ) असे पाच भाग. प्रत्येक भागात येणारी प्रकरणं एकातून एक कडी उलगडावी तशी येतात.

पहिल्या भागात वैज्ञानिक आव्हानाबद्द्ल बोलताना जैव तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान तसंच AI – Artificial Intelligenceचं वाढतं सत्ताग्रहण या क्रांतीवर हरारी लक्ष केंद्रित करतात. या आव्हानाची सांगड आजच्या वैचारिक पोकळीच्या वातावरणात या क्रांतीच्या होणाऱ्या परिणामांशी घालतात. साम्यवाद आणि उदारमतवाद क्रमश: निकामी झाले असताना, ग्लोबलायझेशनकडून अनेक देश व्यापारदृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या आपापल्या सीमेत सीमित होणं पसंत करत असताना एकीकडे विज्ञानाची आंधळी घोडदौड चालूच आहे. भविष्यात जैव आणि माहिती तंत्रज्ञान इतकी प्रगत होतील की अर्थव्यवस्थेचं आकलन सामान्य माणसाच्या आणि राजकारण्यांच्याही कक्षेतून निघून अधिकाधिक संगणकीकृत होत जाईल. आपले विचार,वाढलेलं आयुष्यमान , बदललेली आणि आक्रसत जाणारी उपजीविकेची साधनं सारं काही इतकं आरपार बदलत जाईल की एका नि:संदर्भ तिठ्यावर बावचळून आपण उभे असू. आपण नाही तर आपली पुढली पिढी. याचं अत्यंत मार्मिक आणि तपशीलवार चित्रण निरनिराळ्या देशांच्या इतिहास-वर्तमानाचे दाखले देत हरारी करतात. अगदी अलीकडची प्रसंगचित्रे त्यांच्या रडारवर येतात. विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाचं शीर्षक बोलकं आहे- आणि उपशीर्षक जणू एक गोळीबंद विधान. उदाहरणार्थ, या पहिल्या विभागातील पाच उपविभागांची शीर्षके-उपशीर्षके अत्यंत नेमकी आहेत. ‘’Disillusionment: The end of history has been postponed’’, ’’Work: when you grow up, you might not have a job’’,’’Liberty: Big Data is watching you’’, ‘’Equality:Those who own the data own the future’’ .

दुसऱ्या विभागात - राजकीय आव्हान- या विभागात समाज,संस्कृती, राष्ट्रवाद, धर्म आणि देशांतर ( Immigration ) या अत्यंत संवेदनाशील विषयांवरची पाच प्रकरणं येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं निर्माण केलेले प्रश्न, आण्विक युद्धाची टांगती तलवार, निकोप पर्यावरणाची घसरण अशा समस्या वैश्विक सामंजस्यानं सोडवल्या जाणं आवश्यक असताना समूहांची मानसिकता अजून जुनीच आहे. राष्ट्रवाद, धर्म, संस्कृती यांच्या कळपात मानवजात विभागली गेली होती आणि आजही तशीच आहे. तर एकीकडे जणू एकच वैश्विक आभासी संस्कृती आपल्याला पूर्णपणे घेरते आहे. विश्व कधी नाही इतकं जवळ आल्यासारखं वाटतं आहे. वर्तमानाचे विशिष्ट परिणाम सोशल नेटवर्किंगमार्फत झपाट्याने व्हायरल होत जात आहेत. तरीही माणसांचे वास्तवातील परस्परसंबंध खंडित स्वरूपाचेच आहेत. असे परस्परविरोधी ताण आपण अनुभवत आहोत. अशावेळी राष्ट्रवाद, धर्म या संज्ञांचं स्वत:च्या कोशातून निघून नीट आकलन करून देणं हरारींना आवश्यक वाटतं. ते इस्लाम, नाझी , ज्यू (त्यांचा स्वत:चा धर्म, ते इझ्रायेली आहेत) , हिंदू , ख्रिस्ती श्रेष्ठतावादावर समान अलिप्ततेनं हल्लाबोल करतात. आजच्या अर्थशास्त्राच्या निकषांवर आणि एकूणच इतरही समस्यांच्या संदर्भात- जसं की रोगनिवारण , शस्त्रास्त्रस्पर्धा, पावसाची अनियमितता - धर्मांचं अधुरेपण अधोरेखित करतात. जागतिकीकरणात एका संस्कृतीतील लोक दुसर्‍या देशात जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. निर्वासितांचा प्रश्न तर दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला आहे. अशा वेळी वंशवादाकडून सहिष्णु अशा सुसंस्कृततेकडे जाण्याचं ते आवाहन करतात.

निराशा आणि आशा या तिसर्‍या विभागात दहशतवाद, युद्ध, नम्रता, देव आणि धर्मनिरपेक्षता अशा विविध विषयांवर हरारी वस्तुनिष्ठ आणि इहवादी अशी मांडणी करतात. दहशतवाद आणि युद्ध यांच्या बागुलबुवाची भीती प्रत्यक्ष आकडे आणि दाखले देऊन ते कमी करतात पण मानवी निर्बुद्धतेमुळे केव्हाही मोठा उत्पात घडू शकतो याची सतत जाणीव देतात. या संदर्भातच नम्रता हे काहीसं विसंगत वाटू शकणारं प्रकरण वाचायचं आहे. कोणताही धर्म, किंवा संस्कृती सीमित स्थळ-काल अवकाशात बहरते. सोबतच ती कालसापेक्षही असते. मानवजातीच्या आणि पुढे विश्वाच्या अस्तित्त्वाच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला आपल्या तथाकथित सर्वश्रेष्ठ असण्याची भ्रामक जाणीव पडताळून पाहिली पाहिजे - ‘’Humility: You are not the centre of the world ‘’या प्रकरणाचा हा सारांश सर्वच धर्मांसाठी आहे. मग ‘’ईश्वर ‘’ या महासत्ताधारी संकल्पनेकडे येणे क्रमप्राप्त. तो अस्तित्त्वात आहे की नाही ? असला तर त्याचे स्वरूप काय ? या सनातन वादांचा परामर्ष अगदी थोडक्यात घेताना हरारी कोणतेच अंतिम विधान करत नाहीत पण अनेक पोकळ समजुतींचा पाचोळा करतात आणि ऊठ-सूठ कुठल्याही क्षुल्लक गोष्टीमध्ये ईश्वराला आणू नका. उलटपक्षी मानवी दु:ख कमी करण्याचे प्रयत्न करणारी ईश्वरनिरपेक्ष अशी संपूर्ण मानवी नीतीमत्ता जोपासा असा सल्ला देतात.

चौथ्या भागाचं नाव ‘’सत्य ‘’ असे आहे. सत्य हा माणसाचा निरंतराचा शोधविषय. या भागात अज्ञान, न्याय, पोस्ट-ट्रूथ ( post-truth )आणि सायन्स फिक्शन हे लेख आहेत. हरारी या युगातील आपल्या अपार अज्ञानाचा साठा उघडा पाडतात. स्पेशलायझेशनमुळे जितकी प्रगती झाली तितकेच एका अर्थी आपण निरक्षर होत चाललो आहोत हे अधोरेखित करतात. “न्याय’’ या संकल्पनेतही या युगात कसे क्रांतीकारी बदल झाले आहेत, आपली न्याय्यतेची कल्पनाच कशी कालबाह्य झाली आहे ते सोदाहरण सांगतात. आजचे नैतिक प्रश्न किती क्लिष्ट आहेत ते दाखवून देतात. सत्य आणि न्याय या मानवाच्या मूळ आदर्शवादी प्रेरणा आता कोलमडत जाऊन एका नव्याच ‘’सत्योत्तर‘’ ‘’Post-truth”च्या जगात आपण कसे प्रवेशत आहोत याची जाणीव या लेखनातून ते आपल्याला करून देतात. खरं तर आपण माणसं म्हणजे कायमच कल्पिताला सत्य मानण्याची क्षमता असणारे, कथानकावर जीवापाड प्रेम करणारे प्राणी. आता हे शास्त्रशुद्धपणे कसं आपल्याच गळी उतरवलं जातं आहे तेवढंच समजून घ्यायचं . यातूनच पुढे सायन्स फिक्शन हे प्रकरण येतं. अलिकडच्या सायन्स फिक्शनमधील मिथके कितपत संभाव्य यावरील हे भाष्य, त्यातील चित्रपट परीक्षणेदेखील वाचनीय आहेतच.

शेवटचा विभाग Resilience! या सर्व विपरीत परिस्थितीत आपला निभाव कसा लागावा — तर लवचिकतेने! पुढे जायचं आहे. पुढच्या पिढीची चिंता जमेल तितकी करायची आहे ती त्यांच्यावर चुकीचे संस्कार न करता. त्यांना भविष्याच्या आव्हानाचं मोकळं आकलन देऊन. म्हणून या विभागात शिक्षण, अर्थवत्ता आणि ध्यान ( meditation ) हे तीन उपविभाग येतात. पुढच्या पिढीला या आव्हानासाठी तयार करावं म्हणून शिक्षणप्रणालीचा नवा विचार शिक्षण या प्रकरणात येतो. अर्थवत्ता ( meaning ) या प्रदीर्घ प्रकरणात जीवनाचा अर्थ काय? माझा धर्म कोणता? याचं विवेचन करताना हरारी अगदी गीता, अर्जुन, बृहदारण्यक उपनिषद ,मृत्यू आणि पुनर्जन्म, होकसपोकसची बिब्लिकल उपपत्ति, बौद्धमत इथपासून ते The Lion Kingचं डिस्ने कथानक, समलैंगिकता अशा अनेक विषयांना विशुद्ध इहवादी भूमिकेतून स्पर्श करतातआणि अतिशय मार्मिक निरीक्षणे नोंदवतात. एकूणच वैश्विक विचारविश्वात सर्वनिर्मूलवाद आणि निराशा बळावलेली आहे, तिचे ढग दाटलेले असताना सत्यशोधक हरारी यांनाही ‘अत्त दीप भव स्वयं दीप हो’ सांगणारी गौतम बुध्दांची शिकवण अधिक आपलेशी वाटणं क्रमप्राप्त आहे.

याला अनुसरुन मांडणीचा शेवट हरारी त्यांनी भारतात गोएंकाजींकडून शिकलेल्या आणि सातत्याने अंगिकारलेल्या विपश्यनेवर करतात, श्वासांच्या रहदारीवर लक्ष केंद्रित करून स्वत:च्या आत काय आहे हे शांतपणे निरखणे होमो सेपियन्सना आता अधिक महत्वाचे वाटायला हवे ही त्यांची वैयक्तिक धारणा आहे हे नम्रतेने नोंदवतात. या विपश्यनेतून आलेल्या बळामुळे आपल्याकडून ही पुस्तकं लिहिली गेली असं लिहितात तेव्हा प्राचीन भारताची शहाणीव एका तरुण विचारवंताचं प्रेरणास्थान असावी याचा अचंबा वाटतो. “कौतुके करून | जगाचा प्रवास | सुखे स्वगृहास | यावे तैसे ‘’ असं काहीसं. अर्थात त्यातला दुराभिमान वगळून.

हरारी काय लिहितात हे महत्वाचं आहेच पण ते कसं लिहितात हे अधिक लक्षणीय आहे. सतत इतिहासातील ठोस घटना, वर्तमान वास्तवाचे संतुलित समग्र आकलन आणि त्यातून सिद्ध होणारी भविष्यदर्शी निरीक्षणं अशी मांडणी असूनसुद्धा त्यांचं विवेचन कुठेही बोजड किंवा हस्तिदंती मनोऱ्यातील गूढगुंजनासारखं वाटत नाही.
एका खूप मोठ्या पटावर खूप सखोल अभ्यासातून केलेल्या या नोंदी.

“These lessons do not conclude with simple answers. They aim to stimulate further thinking‘.’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतच असं सांगणारा हरारी जर Fransis Becon ला भेटला असता तर त्यानं ह्याला कडकडून मिठीच मारली असती.

अगदी मुळातून वाचावं असंच हे(ही) पुस्तक.

-विशाखा..
डाॅ. प्रशांत जोशी

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

येस्स्स या पुस्तकाबद्दल ऐकलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढती लोकसंख्या, वाढती खाणारी तोंडे बंद कशी करायची यावर ठाम उत्तर असण्याचा दावा करणारे नेते यापलिकडे कोणताच धडा नसेल.
हे सांगायला धर्म थिटे पडतील हे एकच सत्य. यासाठी शब्दबंबाळ पुस्तकांची गरज नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परीचय आवडला.
वाचन यादीत टाकण्यात आलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परीचय आवडला.

राहुल बनसोडेंनी पण मागे लोकसत्तात बुकमार्क मध्ये सदर लेखकाच्या सेपियन्सवर भाग १ भाग २आणि होमो डय़ीउस’ भाग १ भाग २ या पुस्तकांवर लेख लिहिले होते. ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी मुळातून वाचावं असंच हे(ही) पुस्तक.

वाचून मग काय होईल? ह्या पुस्तकात सांगितलेल्या घटना घडायला सुरुवात केव्हाच झालीय आणि ह्यात दिलेल्या सल्ल्यांच्या विरूद्ध सगळीकडे वागताहेत बहुसंख्य लोक. बाहेर जिनोसाईडची तयारी चालू असताना आपण घरात बसून हे पुस्तक वाचलं काय किंवा एखादे पीतपुस्तक वाचले काय, काहीही फरक नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाहेर जिनोसाइडची तयारी सुरु असतांना हे पुस्तक वाचलं तर तेवढच मन रमेल.
असाही ऐसी अक्षरे वर प्रतिसाद देण्यापेक्षा ते पुस्तक स्वत: वाचुन पाहील तर तुलनात्मक रीत्या दीड टक्का अधिक अर्थपुर्ण कृती होइल.
जेनोसाइड मध्ये सहभाग टाळुन्

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

फरक पडण्यासाठी नाही दिला प्रतिसाद. ऐसीवरच्या माझ्या प्रतिसादांनी फरक पडतो या भ्रमात मी नाही. मला प्रश्न हा पडला आहे की पीतपुस्तक वाचून मिळणारा दीड टक्का आणि हे पुस्तक वाचून मिळणारा दीड टक्का ह्यात फरक काय? दोन्हीकडे जिनोसाईडात सहभाग नसल्याचे समाधान आहे. हे पुस्तक वाचून फार तर आपण अधिक ज्ञानी, बहुश्रुत इत्यादी इत्यादी असल्याचे पावटक्का समाधान अधिक मिळेल; पण त्याबरोबरच अधिक ज्ञानाने येणारे पावटक्का अधिक दु:खही असेलच. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

बिग डेटा, आणि समबडी इज वॉचिंग यू.
गेला तो डेटा आणि बिग ब्रदर खड्ड्यात. आताची भाकरीचं बोला.
एखादी प्राणी जमात प्रचंड वाढू लागली की ते इतरांचं अन्न होतात किंवा आपसात लढून आपली संख्या कमी करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या समीक्षा लिहिण्याबद्दल नसून पुस्तकाच्या ऐवजाविषयी मतं टाकली.

तसा एक तर्क की एखादा लेखक चालला की प्रकाशक 'सीक्वल' काढण्याची गळ घालत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद पोस्टण्यात माझ्याकडून गमतीजमती होताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0