पाटवड्या - प्लेट-फुल ऑफ हॅपीनेस आणि मेमरीज

शाळेत वर्गात आम्ही मधल्या सुट्टीची वाट बघत असू. म्हणजे भूका लागल्यात म्हणून नव्हे तर आमच्या ग्रुपमधल्या सगळ्याचजणींच्या आया जागतिक दर्जाचे पदार्थ करत असत. कुणाच्याही डब्यात कधीच ठ दर्जाचं काहीच असत नसे. आणि वैविध्यही असत असे. शिवाय अतीप्रचंड गप्पा आणि दंगाही असेच. तर एक मैत्रिण डब्यातून पिठल्याची पोळी आणत असे. हा, आमच्याइकडं बेसनपिठाच्या धिरड्याला किंवा आंबोळीला पिठल्याची पोळी (उच्चार - पिठल्याई पोळी) म्हणतात. पोळीबरोबर ही तिखट पिठल्याची पोळी खायला भारी लागतंय. तर ह्या मैत्रिणीची आई आणि आज्जीपण ही पिठल्याची पोळी प्रचंड भारी करत असे. आमच्याही घरी होत असे पण ती मैत्रिणीच्या डब्यातली जगात भारी वाटत असे तेव्हा. मग दर चार आठ दिवसांनी आमची तिला फर्माईश असत असे की आण बाई आता पिठल्याची पोळी. तिच्या घरातले तिला आमच्यापायी नक्कीच ओरडले असणारेत भाज्या नसतील तेव्हा खायचा पदार्थ ही दर चारेक दिवसांनी मागायला लागली तर काय! तर ते एक असो. पिठल्याची पोळी प्रचंड आवडती असती आमची.

पिठलंच प्रचंड आवडतं असतंय. पिठलं, झुणका, मोकळं पिठलं, दूधातलं पिठलं, दह्यातलं पिठलं, पीठ फेरून केलेल्या भाज्या उदा. ढब्बू, मेथी, पालक, कोबी, वांगं आणि कुठल्याही, पिठल्याची पोळी, सुरळीच्या वड्या, पाटवड्या कधीही आवडते पदार्थ आहेत हे. च्यायला किती पटकन् आणि हव्या त्या चवीचे करता येतात या बेसनाचे पदार्थ!

तर पाटवड्या, याला पिठल्याच्या वड्या म्हणत असू अगदी अलीअलीकडपर्यंत. होय ना मग, पिठलं, पिठल्याची पोळी, पिठल्याची वडी, काय चुकीचंय मी म्हणते! तर पाटवड्या, याच्या आठवणी मस्त आहेत.

आजही मला कधीही स्वप्नात माझं किंवा आमचं घर म्हटलं की आम्ही आगोदर रहायचो ते अपार्टमेंटमधलं घरच दिसतं. आठवतं खूप. कळत्या वयाची सुरुवातच तिथं झाली. धमाल असायची फार तिथं. ते आमचं घर, ती आमची बिल्डींग, तिथली आमची माणसं सगळंच कसलं भारी होतं! आमच्या शेजारची ताई जगात बेस्ट भारी होती. माझी बहीण एकदम बारकी होती लहानपणी. आणि ती ताई काॅलेजात. मी पण खरंतर बारकीच होते. पाच सहा सात वगैरे वय अक्कल असती का शिंगं तरी फुटलेली असतात! पण तरी बारकीपेक्षा मोठी म्हणून बारकी नव्हे मी. तर ते असोच. ताईनं आम्हाला फार लळा लावला. तिच्याकडं कधीही तिनं नवीन नेलपाॅलीश आणलं की ते आगोदर आमच्या नखांवर लागत असायचं मग तिच्या आमच्याएवढ्याच असलेल्या बहिणी ज्या आमच्या बिल्डींगीत रहायच्या त्यांचा नंबर असायचा. कधीही मेहेंदी काढायची असूदे ताई आमच्या हातावरनी न कंटाळता, अतिशय सुंदर मेहेंदी काढत असे. तेव्हा मला कसलं भारी वाटायचं. ती स्वतः मेहेंदी भिजवून, कोनपण स्वतः तयार करायची. जागतिकच असायचं सगळं. बिल्डिंगीत सगळे सण मिळून साजरे करत असू आम्ही. दिवाळीला बिल्डींगीच्या आवारात ही ताई आणि आमची आणिक एक ताई माडीवरती रहायची ती, समोर रहाणारी एक ताई अशा तिघी मिळून भली मोठी प्रचंडच मोठी अशी इकोफ्रेंडली रांगोळी काढत. म्हणजे बिल्डींगीच्या आवारात पडलेल्या फुलापानांपासून वगैरे. आणि आम्ही बारकी मंडळी यांच्या हाताखाली सटरफटर कामं करत असू. खरंतर लुडबुडच असे ती. पण एकही ताई कधीही आम्हाला हटकली नाही किंवा ओरडली, रागावली नाही. दिवाळीत आमची फराळांची देवाणघेवाण तर होत असेच. पण एरवीही काहीतरी वेगळं केलं असेल तरी ती होत असे.

एक शिरस्ता होता आमच्या घरच्या थोरल्यांचा की काही झालं तरी एकटं एकटं गेलेलं असताना कुणाकडं काही खायचं नाही. (आम्ही हावरटपणा करून लाज घालवू या भीतीपायी हा शिरस्ता असणाराय सोडा) पण या ताईकडं आम्हाला सगळं माफ असत असे. ताई काॅलेजात होती त्यामुळं ती स्वयंपाकघरातही कायकाय पदार्थ कधीकधी करत असे. एकदा ताईनं जगात भारी पदार्थ केलेला. तो खाल्ला आणि तितक्यात आईनं हाक मारली "घरचा पाठ व्हायचाय, उद्या बाईंनी मारलं तर रडत सांगायचं नाही" बाईंच्या माराच्या भीतीनं तो पदार्थ आणखी खायच्या आत मला घरी पळावं लागलेलं. नंतर एकदोनदाही ताईनं तशा पाटवड्या ताटभरून आणून दिलेल्या. पण तेव्हा शिंगं फुटलेली आणि आपल्या आपल्यात मग्न असायचे दिवस वगैरे होते. त्यामुळं पदार्थ संपल्यावर आम्हाला जाग येत असे आणि फ्या तोंड करून आम्ही बसत असू. मग आमच्याकडं येणाऱ्या मीराबाई म्हणून होत्या त्या स्वतःच्या घरी बेष्टपैकी भाकरी आणि पाटवड्या करून आणून देत असत. त्या मला ए ताई म्हणायच्या. तर हा डबा त्यांच्या इतक्या कामांच्या गडबडीतून वेळ काढून केवळ मला आवडतंय म्हणून लक्षात ठेवून, भल्याच पहाटे उठून करून आमच्या घरी आणून देत असत. आणि आईला सांगत असत "वैनी ताईसाटी आनलीय पिटल्याची वडी आनी भाकरी, ठेवा तिच्यासाठी" आणि मग दुसऱ्या दिवशी भांडी घासायला आल्या की विचारत मला कसं झालेलं, आवडलं काय, तिखट नव्हतं ना वगैरे. पदार्थ भारीच असे. तेव्हा वाटत नसे काही पण आता जाणवतं कुणीतरी आपल्यासाठी केलेल्या बारीकशा गोष्टीचंही मोल. हे असं अनेकवर्षं सुरू होतं. मीराबाई देतायत म्हटल्यावर आई कधीच या पिठल्याच्या वड्या करायच्या फंदात पडली नाही. मिळतंय बेष्ट क्वालिटीचं आयतं घरात तर कशाला कष्ट करा. नंतर आम्ही ते घर विकलं आणि दुसरीकडं म्हणजे आताच्या घरी रहायला आलो. वनिता आमची आम्ही रहायला आलो त्या दिवसापासनं येती आमच्याकडं. तर मीराबाईंची कमी सर्वच बाबतीत भरून काढली म्हणायचं हिनं. कारण की वनिताला एकेदिवशी कळलं की मला पाटवड्या फारच आवडतात, त्या दिवशी संध्याकाळी बाई एक मोठा डबाभरून एकदम चविष्ट पाटवड्या घेऊनच आल्या की! कसलं भारी वाटतंय आपले असे लाड करून घ्यायला. त्यानंतर मग कधीपण तिला सांगायचं अवकाश की ती पाटवड्या करत असे. हे आत्ता परवा घरी गेलते तर तेवढ्या वेळात आणि करून दिलेली मला पाटवड्या. बेष्ट असतंय हे.

आता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे परवाच्या दिवशी आमच्याकडं वडे केले आणि कालवलेलं पीठ जरा जास्तच उरलं. इतक्यातच धिरडी करून झालेली. वडे केले तेव्हाच तळण झालं मग आता याचं करू काय असं झालं. मग आयड्या सुचली आणि स्वतःचे चोचले स्वतःच पुरवायची संधी सापडली. मिरच्या, आलं, लसूण वाटून घेऊन या कालवलेल्या पीठात घातलं आणि फोडणीत दिलं सोडून. जरा घोटून घोटून झाकण ठेवून दिलं आणि दणदणीत वाफ येऊ दिली. पातेल्यातलं मिश्रण एकाजागी गोळा होऊन शांतपणे खरंतर बद्दकन् बसलेलं दिसलं. मग तेलवलेल्या ताटात हे मिश्रण पसरून वरून नारळकोथिंबीर घातली आणि वड्या पाडल्या. हे सगळं होईतो मला भीती वाटत होती की हे नीट झालं असेल तरी का नाही. पण आणि म्हणून गरम असतानाच त्यातली एक वडी काढून तोंडात टाकायला आणि जे काय मन भरून आलं ते आलंच! आपल्या सुगरणपणाबद्दल आपल्यालाच मोठ्यानं शाबासकी देऊन "अवी यू आर ग्रेट" असं म्हणून घेऊन स्वतःचंच कौतुक केलं. दोनेक वड्या गरम असतानाच खाल्ल्या. फोटोबिटो काढले जे की गंडलेच! पण खरोखर मग या सगळ्याची, मैत्रिणी, शाळा, डब्याची सुट्टी, डबे, वाटणावाटणी, जुनं घर, शेजार, ताई, मीराबाई, वनिता सारंच आठवत गेलं. अंमळ इमोशनल व्हायला झालं. पण आपला आवडता पदार्थ आपल्याला परफेक्ट, भारी..नव्हे जगात भारी जमत असेल तर आपण खरंच ग्रेट असणार आहोत याचा साक्षात्कार झाला. खूपखूप आनंद झाला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फ्या तोंड हा वाक्प्रचार सर्वांत आवडला
लेखही छान घोळवुन घोळवुन लिहीलेला आहे. बालपणीच्या आठवणी रम्य असतात खऱ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपसून आपन तुमचा फॅन हे!
पिठल्याची पोळी == बेसनपोळी? लै आवडती ओ मलाबी. दूध चपाती चुरून, बरोबर गरम आन तिखट्ट बेसनाची पोळी. जगात भारी बनवती माझी आई (आणि बायको पण). चपाती फक्त पोळी नसती आमच्या नगरला. बाकी सगळ्या पोळ्या - बेसनाची पोळी, पुरणाची पोळी, मुगाची पोळी ... अजूक लै असतेत. भारी लेथा तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेसनपोळी मला वय वर्षे २४ पर्यंत माहीत नव्हती. एकदा क्लासमध्ये कोणा एका मुलाने आणली तेव्हा कळली. मस्त लागते. बाकी पिठले करत असू. आमच्या वरती होरणे म्हणुन एक रहात असत त्या खोबरं व शेंगदाण्याचे कूट किंचित घालून कोरडे पिठले करीत. काय सुरेख लागायचे ते. त्या काकू एक तर डायनॅमिक होत्या. माझ्या एकदम आवडीच्या होत्या. त्यांनी फक्त नर्सिंगचा कोर्सच केलेला नव्हता तर एकदा त्यांनी कोणाला तरी लागलं तर तत्काळ नर्सिंगचे द्न्यान उपयोगात आणून बँडेज बांधले. मुलींवर अतिशय चांगले संस्कार केलेले होते. हे मला त्या लहान वयातही म्हणजे ५-६ वीत कळे. त्या म्हणायच्या माहेरी जाच असला की मुलगी सासरी पट्टकन सरावते Smile
.
असो. लहानपण आठवले म्हणुन सांगीतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाटवड्या कधी खाल्ल्याच नाहीत. पण पिठलं, खासकरून ताकातल पिठलं, आणि गरम वाफाळता भात आणि तूप फू फू करत खाणे म्हणजे आहाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकृ नमुने लिहाच शिवाय आणखी काही इतर प्रयोग/आठवणी लिहाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं लिखाण वाचून माबोवरील राजेश्री पाटील यांचीच आठवण झाली. त्या देखील असंच छान लिहित. अलिकडे दिसत नाहीत.
बिटिडब्ल्यू पाटवड्या आणि रश्शी हे कॉम्बिनेशन आमच्या कडे पित्राच्या जेवणात करतात. खीर, वडे, पाटवड्या रश्शी, भजी, गुलगुले, आळुवडी, शाक भाजी हे जेवण असते पितृपक्षात. इतरवेळी पाटवड्या करत नाहीत पण मासवड्या करतात.‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

निरुपद्रवी प्रतिक्रिया देण्यासाठी चांगला धागा आहे. फेसबुकवर लाइक दिलंच होतं. अवंती, तुमची शैलीही रसाळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबांना तिरंगी आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0