रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरींशी माझी ओळख खूप, खूपच जुनी. मी तेव्हा कॉलेजात होतो. ‘बालनाट्य’ या त्यांच्या संस्थेला त्यांचं ‘राक्षसराज झिंदाबाद’ हे नाटक गोव्याला न्यायचं होतं आणि आयत्या वेळी मुख्य भूमिकेतली एक मुलगी मिळेना. त्यांच्या ग्रूपबरोबर असणाऱ्या मीना सुखटणकरने त्यांना माझ्या बहिणीचं नाव सुचवलं. ते आणि मधुकर नाईक आमच्या घरी बहिणीशी बोलायला आले. मी गॅलरीत बसलो होतो. मीना त्यांना घेऊन आली आणि त्यांना हॉलमध्ये सोडून बाहेर, माझ्याजवळ गॅलरीत आली. खरं सांगायचं, तर मला मतकरी काय बोलले हे आठवत नाही; मीनासारखी गोड मुलगी ओळख नसताना अशी शेजारी येऊन बसते आणि बोलायला लागते, या धक्क्याने मी लटपटलो, हेच आठवतंय.

मी तेव्हा बऱ्यापैकी बावळट होतो. नंतर बहिणीला घरी आणायला मी त्यांची तालीम संपायच्या वेळी जात असे. मतकरी, प्रतिभाताई, दिलीप प्रभावळकर, विद्या वैद्य, मधुकर नाईक, शशांक वैद्य, हे तिथे असत. वसंत सोमण, प्रदीप भिडे असत की नाही, आठवत नाही. (अजित देशपांडे, मीनल जोशी -नंतर परांजपे, विदुला वैद्य, रवी पटवर्धन, जयश्री बांगर, अरविंद औंधे, प्रभाकर सावंत, विनोद भट, पुष्कळ नावं आठवली!) मी नाटकं बघत होतो, साहित्य वाचतही होतो. रत्नाकर मतकरी हे नाव मला कितीतरी अगोदरपासून, मी शाळेत असल्यापासून माहीत होतं. त्यांच्या ‘नवल’मधल्या गोष्टी मी वाचत असे. मला त्या बेफाट आवडत असत. साहित्यिक या प्राण्याला माझ्या खाजगी विश्वात प्रचंड ग्लॅमर होतं. मतकरींशी किंवा त्यांच्याशी सलगी करू शकणाऱ्या आणखी कोणाशीही बोलायला जाणं मला शक्य नव्हतं. मी अवघडून बाजूला रहायचो आणि तालीम संपली की बहिणीला घेऊन घरी यायचो.

रत्नाकर मतकरी

त्यांच्या भयकथा माझ्यावर परिणाम करून गेल्या. ‘कळकीचं बाळ’, ‘खेकडा’, ‘जेवणावळ’, ‘निमाची निमा’ व्यवस्थित आठवतात. ‘आणि माझ्या हातातला सुरा गळून पडला!’ असा कायच्या काय धक्कादायक शेवट असणारी गोष्ट आठवते. असाच शेवट ‘जेवणावळ’ या कथेचा होता. लोकांच्या मृत्यूची स्वप्नं पडणाऱ्या एका लहान मुलाला पेढा खाण्याचं स्वप्न पडतं, तेसुद्धा भयंकरच. शेवटच्या वाक्यापर्यंत सस्पेन्स धरून ठेवणे, हे अचाट आहे! एका कथेच्या शेवटी ‘अब दादाको हाथपाँव काटना नही पडेगा’ असं आहे. तो शेवट येईपर्यंत आपण वेगळी अपेक्षा बाळगतो आणि भलतंच होतं. चुटपुट लागते, म्हणणं बरोबर नाही; लेखकाला जाब विचारावासा वाटतो!

अशा कथा इतक्या सातत्याने आणखी कोणी लिहिलेल्या मला माहीत नाहीत. आजच्या मानाने कथा कमी लांबीच्या असत. त्यांची शैली वाचकाला सुरुवातीपासून गुंगवून टाकत असे. कथेमधली पात्रं जरूरीपुरती भरीव असत. घटना महत्त्वाच्या. कथेबाहेरचे तपशील अगदी कमी. ‘भयकथा’ हे एक लेबल झालं; ‘नवल’मध्ये असल्याच कथा असत आणि त्यांना वेगवेगळी लेबलं असत.

एक वैज्ञानिक प्रयोग आठवतो. लहानशा भोकातून दिसणारं पलीकडचं दृश्य अगदी अल्प काळ, ओझरतं बघायचं आणि काय दिसलं, हे सांगायचं. सगळ्यांना प्रत्यक्षात तिथे नसलेल्या पण सहज परिचित असलेल्या गोष्टी 'दिसतात'. यावरून निष्कर्ष असा निघतो की मेंदू अपुऱ्या माहितीवरून पटापट ठरवत पुढे जातो. कारण जग परिचित गोष्टींनी भरलेलं आहे आणि जे दिसलं, ते त्यापैकी काहीतरी असणार, असं मेंदू गृहीत धरतो. तर जगताना आपण कोणकोणत्या संदर्भात काय काय आणि कोणत्या थरापर्यंत गृहीत धरत जातो, याचा तलास मतकरी त्यांच्या तथाकथित भयकथांमधून लावत जातात, असं म्हणता येईल.

नारायण धारपसुद्धा भयकथा लिहीत. त्या अस्सल भयकथा असत. भय, हेच त्यांच्यातलं सूत्र असे. धारपांच्या कथेतलं गूढ सहसा अ-नैसर्गिक, अतार्किक असे. मानवी आवाक्याच्या, कधी कधी मानवी आकलनाच्या बाहेरचं असे. मतकरींच्या कथेत अगदी उलट. मतकरींचं ‘रहस्य’ सहसा मानवी जगातलंच असे. पण यातला ‘सहसा’ पूर्णपणे बाजूला ठेवूनही मतकरी आणि धारप यांच्यात एक भला मोठा फरक सांगता येईल. मतकरींच्या सगळ्या कथांमध्ये मानवी समाज, हे पात्र पार्श्वभूमीवर अपरिहार्यपणे आहे. धारपांच्या कथेत नाही. धारपांसाठी समाज नाममात्र निमित्त. मतकरींच्या कथाविश्वातल्या मूल्यव्यवस्थेचं समाजाविना चालतच नाही! आणि हे केवळ कथेबद्दलच नाही, तर त्यांच्या एकूण साहित्याबद्दल म्हणता येईल.

रत्नाकर मतकरींची दुसरी मोठी ओळख म्हणजे बालनाट्य. आयुष्यातली काही वर्षं त्यांनी बाकी सगळं सोडून केवळ बालनाट्य केलं. मुलांना त्यातला निरागस विनोद प्रचंड आवडत असे. त्यांच्या नाटकांमध्ये चमत्कार, अद्भुतता कमी असे. बोलबच्चनगिरीचं - आदर्श वर्तनाचे धडे - त्या नाटकांना वावडं होतं. मी नाटकांच्या तालमी बघत असल्याने एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे नाटकात काम करणारे सगळे एन्जॉय करत असत. त्यामुळे प्रयोग हमखास रंगत असे. बालप्रेक्षकांना रंगून जायला वेळ लागत नसे. ‘अलबत्या गलबत्या’मधली दिलीप प्रभावळकरांची चेटकीण कोण विसरेल!

सगळं छान असलं तरी लहान मुलांची नाटकं करणं हा एक तापदायक उद्योग होता. लहान मुलांसाठी वेगळं काही करावं, ही जाण तेव्हा पालकांना, शाळांना, शिक्षकांना नव्हती. मतकरींना जणू स्वत:ची हौस असल्यासारखं धावावं लागे. एकूण व्यवहार तर आतबट्ट्याचाच. शाळांसकट कोणालाही फार रस नाही, हे स्वीकारून मतकरींना शेवटी ते थांबवावं लागलं.

त्यांनी एकांकिकांमध्ये पुष्कळ प्रयोग केले. ‘प्रेमकहाणी’ला तीन शेवट होते. 'पोर्ट्रेट'मध्ये दोनच पात्रं होती आणि त्यातलं एकच बोलतं. त्यांची किती नाटकं रंगभूमीवर आली नाहीत, याचा शोध घ्यायला हवा! १९९५ ते १९९९ यापैकी एका वर्षात त्यांची अकरा नाटकं आलेली मला आठवतात. जुन्या, अत्र्यांच्या नाटकांच्या नवीन, दोन अंकी रंगावृत्ती त्यांनी काढल्या आणि त्या बहुतेक सगळ्या यशस्वी झाल्या. ‘आरण्यक’ हे अगदी वेगळं नाटक. 'लोककथा७८', 'चुटकीचं नाटक' ही सरळ सरळ प्रायोगिक नाटकं होती. मतकरींनी नाटकांच्या रंगावृत्त्या काढल्या, रूपांतरं केली; पण नाटक या माध्यमावर त्यांची चांगली पकड होती आणि नवीन आवृत्ती कधी फसली नाही. ‘अॅडम’ ही त्यांची कादंबरी मात्र मी वाचलेली नाही.

मतकरींनी त्यांची राजकीय मतं कधी लपवून ठेवली नाहीत. इतकंच नाही, त्या मतांसाठी लेख लिहिणे, रस्त्यावर उतरणे, भाषण देणे यातही ते कधी डगमगले नाहीत. सामाजिकता त्यांच्या नैतिकतेच्या केंद्रस्थानी होती. त्यांच्या जगण्याचा आधार होती. मतकरी ही व्यक्ती आणि मतकरी हा लेखक, यांच्यात अंतर नव्हतं.

मतकरींशी बोेलताना त्यांचा उत्साह जाणवायचा. बँकेत माझ्या डिपार्टमेंटला आलेल्या रेमंड डिसोझा या ऑफिसरने त्यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘अरे, ही यूज्ड टू सडनली पुल अ पेपर आणि स्टार्ट रायटिंग फ्यूरियसली. एनी टाइम.’ असं त्याने मतकरींना येणाऱ्या लिखाणाच्या ऊर्मीचं वर्णन केलं होतं. मतकरी हातखंडा लेखक होते. आशयापेक्षा विषयच त्यांना प्रेरणा देत असावा. ते भरपूर बोलत. लिखाणाबद्दल बोलत, लिखाणाच्या प्रक्रियेविषयी बोलत. त्यांचं बोलणं, त्यांच्या गप्पा यातून ते साहित्यनिर्मिती, कलासृजन या गोष्टींना जणू डीमिस्टिफाय’ करत. या गोष्टींभोवती जे ‘कलावंताची प्रतिभा’ नामक वलय असतं, सर्वसामान्यांपासून कलावंतांना वेगळं काढणारा रहस्यमय गुणधर्म असतो, त्यावरचा बुरखा जणू काढून टाकत. त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेमुळे, त्यांच्या मोकळ्याढाकळ्या बोलण्यामुळे आणि ते ज्या सहजतेने चळवळीतल्या कार्यकर्त्याची भूमिका घेत, त्यामुळे त्यांच्या साहित्याकडे बघण्याचा ‘उच्चभ्रू’ दृष्टिकोन बदलला असावा. त्यांनी कधीही स्वत:चं स्तोम माजवलं नाही आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांना भेटणं अजिबात कठीण नव्हतं आणि ते भेटल्यावर त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणंदेखील नव्हतं. यात कुठे थोरपणाची अपेक्षित लक्षणं त्यांच्यात दिसत नसत. त्यांना देशात घडणाऱ्या घटनांविषयी चिंता जरी वाटली, तरी त्यांच्या आनंदी, उत्साही मनोवृत्तीला तडा गेला नाही.

मतकरींची दखल घेतल्याविना मराठी साहित्याचं यथार्थ दर्शन होणार नाही.

रत्नाकर मतकरी
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह!! समयोचित आणि रोचक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रत्नाकर मतकरींशी माझी ओळख खूप, खूपच जुनी.

लेखाचा सारांश पहिल्याच वाक्यात देण्याचा प्रयोग रोचक तथा अभिनव आहे.

असो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तेव्हा बऱ्यापैकी बावळट होतो

आणि ह्या वाक्यातलं गृहीत फारच आत्मविश्वासदर्शक वाटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकालच्या अनेक सिनेमांमध्येही हे असलं दिसतं. गोष्टीचा शेवट पहिल्या सीनमध्ये दाखवायचा आणि मग गोष्ट सुरू करायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पहिलं वाक्य सोडता बाकी लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0