काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३१ मे २०२०... डी-डे

चला ऑल सेट !

रात्री मास्क, ग्लोव्ह्ज वगैरे सगळी तयारी केली.

बायको तर बॉर्डरवर चाललेल्या जवानासाठी होतात तशी सेंटीमेंटल झाली होती.

"अय जाते हुए लम्हो जरा ठेहरो" वाजणार असं वाटायला लागलं...

महादेवाची फॅन असल्याने बिचारीने रुद्राक्षाची माळसुद्धा बॅगेत टाकली.

सकाळी झटपट उठून वाकड ब्रिजवर तीन मुलं आणि पुण्यातील सत्संगी कोऑर्डिनेटर हरीश ह्यांना भेटलो.

अमित पटेल, कुशलेंद्र पटेल आणि सिजू पटेल.

तिघेही लहानखुऱ्या चणीचे.

अमित आणि कुशलेंद्र देखणे टीनएजर,

सिजू थोडा वयानी मोठा चेहेरा थोडाफार "रामगड के शोले"मधल्या डुप्लिकेट देवानंदसारखा.

कोऑर्डिनेटर हरीश पण माझ्यासारखा आय. टी. वाला.

चाकण वरून कदाचित एम. पी. च्या बसेस सुटतायत असं ऐकून होतो.

तिकडे एक फायनल प्रयत्न करायचं ठरवलं.

चाकण तसंही ऑन द वे च होतं.

तिकडे पोचलो आणि कळलं की बसेस सुटत होत्या पण दोन दिवसांपूर्वीच थांबल्या त्या.

चलो नाशिक!

कोऑर्डिनेटर आम्हाला ऑल द बेस्ट देऊन परत निघाले.

हो पण निघण्याआधी कोऑर्डिनेटर साहेबांनी सिजूची मांसामच्छी आणि मद्यपानावरून 'सत्संगी' शाळा घेतली.

त्यांची खरंच खूप मदत झाली पण प्रत्येकाचा किंचित का होईना अजेंडा असतोच नाही म्हटलं तरी.

सिजूही अगदी मान डोलावत होता पण मास्क आडचे त्याचे डोळे मात्र मिस्कील हसत होते.

शेवटी जगात फ्री लंच असं काही नसतंच हेच खरं!

फायनली ११ वाजता आम्ही निघालो.

Chakan

रेडिओवर "मन की बात" लागलं होतं.

थोडंसं ऐकलं पण बोअर झालो.

एफ एम लावून टाकलं.

पाठी तिघंही तसे गप्पच होते.

मी थोडा-फार बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अवघडून उत्तरं दिली

मी ही त्यांना मग जास्त पिळलं नाही.

तुम्ही दोन महिने भणंग पायपीट करत असलात तर तुमचा पिकनिकचा मूड असणं शक्य नाही हे मान्यच.

पण राजगुरूनगरजवळ "सोला बरस की बाली उमर को..." लागलं आणि सिजूनं मास्कमधून दबक्या आवाजात गायलाच सुरुवात केली.

आत्ता एक दुजे के ची गाणी आवडणारा माणूस अगदी यंग नसणारच. माझ्या आसपास वयाचा कदाचित...

पण एकंदरीत सगळेच थोडे रिलॅक्स झाले.

पुढे मंचर आळेफाटा संगमनेर...

सिन्नरच्या आधी एका चेकपोस्ट वर अडवलं पण मजुरांना सोडायला चाललोय बोलल्यावर लगेच सोडलं.

साधारण दीडला नाशिकला पोचलो.

द्वारका सर्कल नाशिक रोड शहराच्याही थोडं पुढे आहे.

तिकडे थोडी विचारपूस थडकलो.

हा नाशिक मधला एक मोक्याचा पॉईंट बेसिकली मुंबई पुणे आणि नाशिक शहरातून येणारे रस्ते इकडे एकत्र येतात.

इकडे आपल्या चेंबूरसारखी लायनीत ट्रॅव्हल कंपन्यांची ऑफिसेसही आहेत.

प्लॅन असा होता की तिघांना इथे सोडायचं .

मुंबई किंवा पुण्यावरून एम.पी.च्या दिशेनी जाणारा ट्रक-बस काहीतरी त्यांना मिळालं असतं.

पण द्वारका सर्कलला फुल्ल सामसूम.

इकडून ट्रक-बस मिळणं अशक्यच वाटत होतं.

बायकोनी सगळ्यांसाठी चीज पराठे दिले होते ते उभ्या उभ्या खाल्ले.

आता खरं तर प्लॅनप्रमाणे मी निघायचं होतं पण माझा पाय निघेना.

इकडून त्यांना शष्प काही वाहन मिळणार नाही हे सरळ सरळ दिसत होतं...

काय करावं?

सत्संग संस्थेचे नाशिकमधले कार्यकर्ते धनंजय म्हणून होते त्यांनी सांगितलं की पुढे जळगाव-रोड वर जकातनाक्याजवळ बसेस-ट्रक्स थांबतात तिथे काही मिळू शकेल.

चान्स घ्यायचं ठरवलं.

पुन्हा सगळे गाडीत.

जकात नाक्याच्या दिशेनी निघालो आणि बाजूनी एक लाल डब्बा जाताना दिसला.

त्याला स्लो करून ओरडून विचारलं कुठची गाडी म्हणून?

तो म्हणाला, "एम. पी. बॉर्डर"

भेंचो SSS द लॉटरी!!!

त्याला थांबवत गाडी लिटरली बसला आडवी लावली...

जॉनी गद्दारमध्ये आयटमला उचलायला नील-नितीन-मुकेश लावतो तशी...

(बाय द वे अप्रतिम पिक्चर)

खिडकीतून मुंडी काढणाऱ्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली.

तो बोल्ला, "मेडिकल सर्टिफिकेट आहे का?"

"आहे साहेब", मी.

तिघांचे ही पेपर्स क्लिअर होतेच.

"बरं"... ड्रायव्हर अडखळत बोलला.

तिघांनीही पटापट बॅगा काढल्या... एक एक सॅक होती फक्त

(आमच्या मुंबईतून पुण्याला जाताना सात-सात बॅगा असतात. फकिंग लाईफ! फकिंग पर्स्पेक्टिव्ह!!)

आनंदात आम्ही नंबर एक्स्चेंज मारले आणि स्कूलबसला लेट झालेल्या पोराच्या आईच्या गडबडीत मी त्यांना बसमध्ये पिटाळणार...

इतक्यात ड्रायव्हर बोल्ला, "नको नाय जमणार पाठच्या बसमधून या."

अचानक त्यानं पलटी मारली.

माझ्या पोटात बोगदा...

लिटरली हात जोडून विनवण्या केल्या मी.

मला रडायला यायचं बाकी होतं...

(ती गुजरात दंगलीमधल्या माणसाची प्रतिमा आहे ना हात जोडून विनवण्या करणारी...

मी माझ्या घाऱ्या डोळ्यांनी नी धूळभरल्या चेहेऱ्यानी तसाच दिसलो असणार असं मला नंतर हाईंड-साईट मध्ये वाटलं.)

पण ड्रायव्हरला काही दया आली नाही.

एक क्षणात तो गाडीच्या बाजूनी बस काढून निघून गेला.

त्या हायवेवरच्या भर्र उन्हात आम्ही चौघे हतबुद्ध!

हाता-तोंडाशी आलेला घास जाणं म्हणजे काय ते लिटरली कळलं मला त्यावेळी.

पण त्या तिघांना मात्र लॉकडाऊनने सवय करून दिली असावी अशा अगणित अपेक्षाभंगांची.

कोरड्या नजरेनी तिघांनीही बॅगा पुन्हा डिकीत टाकल्या.

ह्या जकातनाक्यावरही मरणप्राय सामसूम पुन्हा आम्ही बुचकळ्यात.

एक मिनटापूर्वी रस्त्याच्या उलट्या बाजूला एक आर. टी. वाले. मामा दिसले होते.

त्यांना कदाचित माहित असावं म्हणून पुढे यु-टर्न मारून आम्ही पुन्हा नाशिकच्या दिशेनी साधारण ५०० मीटर आलो आणि समोरच्या जळगाव रस्त्यावरून अजून एक एम. पी. ची बस पास झाली.

जले पे नमक!

आर. टी. ओ. मामानं पकडलं ते एखादी बस थांबवून देऊ शकतील का विचारलं.

ते म्हणाले, "पावर नाय! पण एक काम करा सरळ जावा हिकडून वीस एक किलोमीटर. विल्होळीच्या जैन मंदिरावरून बसेस सुटतायत दुसऱ्या राज्यातल्या मजुरांसाठी तिकडे जावा"

सरळ पुन्हा मुंबईच्या दिशेनी सुसाट निघालो.

द्वारका सर्कल, नाशिकचा बॉम्बे नाका पार करून पुढे परत यु टर्न मारला.

हे विल्होळीचं सुबक जैन मंदिर.

Jain Mandir

इकडे "करोना रिलिफ" चा बॅनर ही लावलेला आम्ही परत आशावलो.

पण गेटवर सूमसाम:

वॉचमन काकांना विचारलं तर ते म्हणाले दोन दिवसांपूर्वीपर्यंत सुटत होत्या बसेस इथून पण आता ते थांबलं.

कदाचित बॉम्बे नाक्यावरून सोडतायत वाटते.

पुन्हा नाशिकच्या दिशेनी सुसाट.

नाशिकचा बॉम्बे नाका!

नावातच सगळं आलं.

बॉम्बे नाक्याच्या बस स्टॅण्डवर आलो आणि एकदम लॉक-डाऊन अंगावर आला.

इकडेसुद्धा स्म्शानशांतता.

लायनीत लागलेल्या पन्नास साठ गप गुमान बसेस

आणि आख्ख्या स्टॅण्डवर दोनच माणसं एक कंट्रोलर आणि एक ड्रायव्हर.

त्यांना विचारलं, "एम. पी. च्या बसेस?"

ते म्हणाले, "तासाभरापूर्वीच दोन सोडल्या लागोपाठ..."

त्याच त्या दोन आमच्यासमोरून गेलेल्या. (मी दात ओठ खाल्ले!)

आईच्ची जय... काखेत कळसा...

द्वारका सर्कल आणि बॉम्बे नाका लिटरली २ किलोमीटर लांब आहेत एकमेकांपासून.

आम्ही पन्नास किलोमीटर आणि मोलाचा तासभर वाया घालवला होता केवळ कोणी नीट ठोस माहिती न दिल्यामुळे Sad

Route

मी कंट्रोलर साहेबांना अजून एक बस सोडण्याची विनवणी केली.

"तुम्ही बावीस माणसं आणा आत्ता अजून एक सोडतो."

आत्ता बावीस माणसं कुठून येणार?

हे तिघं जण होते.

पण ड्रायव्हरसाहेब म्हणाले,

"काळजी करू नका रात्रभरात जमतात माणसं.

उद्या सकाळी हंड्रेड पर्सेंट सोडतो बस.

ह्या लोकांना राहू दे एस. टी. स्टॅन्डवरच."

तसंही एस. टी. स्टॅन्ड निवांत होता.

इकडे त्यांना रात्र काढणं शक्य होतं...

तिघा पोरांचंही तेच मत पडलं.

नाशिकमधले सत्संगी धनंजय यांनी त्यांना रात्रीचं जेवण पोचवायची जबाबदारी घेतली.

एकंदरीत उद्या ते घराच्या दिशेनी निघतील अशी आशा वाटायला लागली.

मी पांच मिनिटांचा ब्रेक घेतला.

तो निवांत एस. टी. स्टॅन्ड थोडा नजरेत साठवला.

बाहेर परिस्थिती वाईट आहे पण उन्हाळ्यातल्या लख्ख संध्याकाळची ती निरव शांतता मला आवडली नाही असे काही म्हणवत नाही.

तोंडावर पाणी मारलं आणि तिघांचा निरोप घेतला.

त्यांना थोडे पैसे हवेयत का विचारलं तर अमित दुखावलाच एकदम...

"पैसे नही चाहिये, बिलकुल नही चाहिये" तो तटकन उत्तरला.

मलाच वरमल्यासारखं झालं आणि त्यांना मिठ्या मारायचा मोह टाळून मी परत निघालो.

Bombay Naka

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम.
भारी काम केलेत.
अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी काम मालक,
दंडवत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!!! बहोत खूब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0