आंबट गोड

(असच काही आठवलं म्हणून ....)

आज बस जवळ जवळ रिकामीच होती. आणि मला चक्क बसायला जागा मिळाली होती. उभ्याने प्रवास करणारे नव्हतेच. त्यामुळे आजचा प्रवास सुखद असेल असे वाटत तरी होते.
तेव्हढ्यात "आई ग्गं !!! कित्ती आंबट आहे. " असे जरा मोट्ठ्या आवाजातले उद्गार ऐकू आले.

मी वळून आवाजाच्या दिशेला पाहिले. दोन शाळकरी मुली त्यांची दप्तरे पुढ्यात घेऊन बसल्या होत्या. त्यांच्या हातात कसल्यातरी गोळ्यांची निळसर रंगाची पत्र्याची डबी होती.
"मग मी सांगितलं होतं तुला आधी. " त्यातलीच एक तिच्या बरोबर असलेल्या मुलीला म्हणाली.
मला ते ऐकून हसायलाच आले.
" काय तरी या मुली? माहीतीय तरी परत परत तीच चव घ्यायची किती हौस? "
त्या चिमण्यांची चिवचिव अखंड चालूच होती. आणि माझ्या मनात भूतकाळाचे पट उलगडत होते.

आमच्या शाळेत कॅन्टिन वगैरे काही नव्हतेच. पुण्यनगरीतील मराठी माध्यमामध्ये शिक्षण देणारी मुलींची शाळा. शाळेच्या इमारतीसमोर मोठे पटांगण . तिथेच एक भलेमोठे चिंचेचे झाड होते. झाडाभोवती सुबकपणे बांधलेला प्रशस्त पार होता. मधल्यासुट्टीत आम्ही तिथेच जमत असू. गोल रिंगण करून झाडाच्या सावलीत डबे खाणे, अखंड बडबड आणि हसणे खिदळणे चालू असे. बाकी वेळ चिडीचुप्प असणारी शाळा त्यावेळी गजबजून जात असे.

तिथेच पारावर एक मध्यमवयीन बाई ( सगळे त्यांना मावशी म्हणत ) एक मोट्ठा अॅल्यूमिनियमच डबा घेऊन बसत असत. त्या डब्यात कधी पोहे तर कधी उपमा असे काही असे. कागदाचा द्रोण करून, त्यात डावाने तो पदार्थ त्या देत असत. ज्या मुलींकडे डबा नसेल (असे फारच क्वचित घडे) त्या त्यांच्याकडून तो पदार्थ विकत घेत. शाळेच्या प्रवेश दाराजवळ टोपल्या घेऊन दोनचार जण काहीबाही विकत असत. त्यांत लाल, हिरव्या, गाभुळलेल्या (म्हणजे ज्यात चिंचोके असतात अशा) चिंचा , राय आवळे, कधी बोरे, करवंद, पेरू असं बरच काही असे. पांढऱ्या रंगाच्या कागदामध्ये गुंडाळलेली कसली तरी गोड वडी, आलेपाक, दाण्याची चिक्की इ. काहीबाही देखील मिळे. कधीमधी जर आईने पैसे दिले असतील तर त्यातलं काही विकत घेता येई. चार किंवा आठ आण्यात चिंचेचा किंवा रायआवळ्याचा एक वाटा मिळे. इतरही वस्तूची किंमत साधारणपणे तशीच काही. एक रुपयामध्ये बराच मेवा विकत घेता येत असे. जे काही विकत घेऊ ते सगळ्या जणीत वाटून घ्यायचे हा अलिखित नियमच होता. आंबट चिंचा, आवळे खाताना दात आंबत, बरोबरीच्या तिखट मिठाने डोळ्यात पाणी येई . पण हौस मात्र अमाप.

शाळेत बोर्डाच्या परीक्षेचे केंद्र असे. त्या मुळे वार्षिक परीक्षेची वेळ काहीवेळा दुपारी दोन अडीच अशी असे. कधी कधी दोन विषय एकाच दिवशी. एप्रिल महिन्याचे कडक ऊन, आणि अभ्यासाचा ताप...
मग आई डब्याबरोबर एका काचेच्या बाटलीत बर्फ घातलेले लिंबाचे सरबत देई. त्यात देखिल सगळ्यांचा घोटघोट वाटा असेच.
त्याच सुमारास कैऱ्या यायला लागत. मध्ये कोवळी बाठ असलेली बाळकैरी खाण्याचा आनंद तर अवर्णनीय.

कैऱ्याच्या आगमनाने उन्हाळी सुट्टीची वर्दी मिळायची. मग सगळीकडे उसाच्या रसाची गुऱ्हाळे दिसू लागत. बाजारात येता जाता मोगरीच्या फुलांचे गजरे असत. त्याबरोबर अबोली चे गजरे, शेवंतीच्या वेण्या, गुलाब , पिवळा सोनचाफा, हिरवा कवठी चाफा इ सुगंधित जमाव असे. त्यात निशिगंध, अॅस्टर सारखी शोभेची फुले असत. कधी कधी कृष्ण कमळ देखिल मिळे. तिथेच झेंडू आणि कसली कसली फुले आणि पाने वापरून केलेले हार, माळा आणि तोरणे असत. सारा परिसर शोभिवंत दिसत असे.

तिथेच बाजूला पिवळे धमक फणसाचे गरे, टप्पोरी जांभळे, काळीशार डोंगरची मैना इ. मंडळी हजर असत. मग आंब्याचा घमघमाट येई. हारीने मांडून ठेवलेले रसदार पायरी, तोतापुरी इ. जातीचे आंबे दिसत. तिथे एक गोटी आंबा नावाचा प्रकार देखिल असे. त्याची साल हिरवी, पण आतला गर पिवळा. एखाद्या मोठ्या गोटीच्या आकाराचा तो आंबा. त्यात सगळ्यात उठून दिसे तो म्हणजे फळांचा राजा हापूस. तजेलदार सोनकेशरी सालीच्या सुवासिक हापुसची स्वारी, पिवळ्या गवताच्या राशीवर दिमाखात विसावलेली असे. असे रस, रंग, गंध भरलेले ते दृश्य पाहून बघणाऱ्याचे डोळे निवत.
समृद्धी याहून काय वेगळी असते हो?

बाजूला असलेल्या मंडईचे वातावरण तर काही आगळेच असे. सगळीकडे गर्दी, कलकलाट. एखादे ठिकाणी भांडण देखिल चालू असे. भांडणारे आणि त्यांचे भांडण चवीचवीने बघत उभे असलेले बघे , हे कुठल्यातरी वेगळ्याच जगात असत.

तिथे हिरव्यागार कैऱ्या, पातळ पिवळ्या सालीची लिंबे आणि वळणदार पोपटी हिरव्या मिरच्यांचे ढीग लागलेले असत. त्याच्या भवताली आयाबायांची गर्दी. ही वर्षभरासाठीच्या लोणच्याची तयारी असे. बाजूला एखादा कुणी मोठ्या लाकडी पाटाची विळी घेऊन बसलेला असे. खरेदी केलेल्या कैऱ्या त्याच्याकडे द्यायच्या. मग तो आपण सांगू तशा लहान मोठ्या फोडी करून देत असे. किंमतीसाठी केलेली घासाघीस, वजन-मापाच्या बाबतीत एकमत न झाल्याने चढलेले आवाज, "वहिनी तुम्ही नेहमीच्या म्हणून तुमच्या पिशवीमध्ये मी जास्तीच्या कैऱ्या घातल्यात बरं का! कुणाला बोलू नका " अशी केलेली मखलाशी, या सर्व आवाजांचे, आणि तिथे विक्रीसाठी असलेल्या भाज्या, फळे इ. चा संमिश्र वास याचे एक स्वतंत्र विश्व तयार होई. मंडईत आलेला प्रत्येकजण त्या विश्वाचा एक अविभाज्य घटक बनून जाई.

उन्हाळी सुट्टी सुरू झाली की आईचे काम वाढत असे. तिला बिचारीला जराही उसंत नसे. आधीच आम्ही भावंडे घरात, त्यात पाहुणे रावळे त्यांची ऊठबस. आणि मदतीला कुणीच नाही. पण त्यातही ती लोणची, पापड्या, कुरडयांचा घाट घालत असे.
आमचा दोन मजली वाडा होता. तळमजल्यावर आमचे घर होते. माझे दोन काका, आत्या, आत्येभाऊ, वहिनी सगळे एकाच वाड्यात असत. बरेच भाडेकरूही होते. आमच्या घरासमोर मोट्ठे दगडी अंगण होते. त्याच्या बाजूला व्हरांडा तिथे काही घरे, आणि वर दोन मजले. असा ऐसपैस कारभार होता.
उन्हाळ्यात त्या अंगणात सगळ्यांची वाळवणे घातलेली असत. कुणाच्या पापड्या, तर कुणाच्या कुरडया, कुणी लाटलेले (पोळपाटावर) पापड देखिल असत. बटाट्याचा कीस , सांडगे हेही असत. साठवणीचे घेतलेले गहू, तांदूळ तिथेच ऊन घेत पहूडलेले असत. तिखटासाठीच्या लाल मिरच्या, हळकुंडे असेही काहीबाही असे. त्याच्या राखणदारीचे काम, कुणीही न सांगता आम्ही आपणहून करीत असू.

लोणचे करायचे म्हणजे एक साग्रसंगीत सोहळाच असायचा. आधी घरात असलेल्या चिनी मातीच्या बरण्या स्वच्छ धुऊन घ्यायच्या. खराब झालेल्या असतील तर नवीन आणायच्या. त्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या. त्याच्या तोंडावर बांधण्यासाठी मऊ कापडाचे दादरे तयार ठेवायचे. मग मंडईतून आणलेल्या कैऱ्यांच्या फोडी धुऊन, निथळून कोरडया करून घ्यायच्या. एका परातीत आई लोणच्यात घालायचे मसाले, मीठ इ एकत्र करायची. मग चिनीमातीच्या बरणीमध्ये लाकडी रवीने मोहरी घुसळून घ्यायची. मोहरी घुसळताना तिच्या वासाने नाकाला झिणझिण्या येत मग मसाला लावलेल्या फोडी बरणीमध्ये भरायच्या. त्यावर भरपूर तेलाची फोडणी ओतायची. त्याचा लालभडक तवंग दिसला पाहिजे. मग त्यावर झाकण घालून त्यावर घट्ट आवळून दादरा बांधायचा. अशीच मिरची आणि लिंबाची लोणची व्हायची. माझी आत्या मिश्र भाज्यांचे लोणचे करायची. त्याची देखील चव अप्रतिम असे.

कैरीचे पन्हे, कोकम, लिंबाची सरबते असेही प्रकार असत. मग दुपारच्या वेळी पत्त्याचे, कॅरमचे डाव रंगत. संध्याकाळी लगोरी, लपाछपी चे खेळ चालत. सगळा वाडा कसा जिता जागता, हसता खेळता होऊन जाई. सगळेजण मिळून कधी पोहायला तलावावर तर कधी सकाळी पर्वतीवर जात असू. त्यावेळी पर्वती इतकी झोपडपट्टीने वेढलेली नव्हती. स्वच्छ, शांत आणि सुंदर होती. तिथे काहीही वस्तू अगर पदार्थ विक्रीस नसत. पायथ्याला फारतर पेरू वगैरे मिळत. उसाच्या रसाचे एक गुऱ्हाळ पण होते. पण आतासारखा गजबजाट नव्हता.

एखाद्या दिवशी बाबा आंब्याची पेटी घेऊन येत. एका पेटीत ४ डझन आंबे असत. मग आमरस करून किंवा फोडी करून, किंवा नुसताच साली काढून अशा विविध प्रकाराने आंब्याची पेटी संपून जाई. एक संपली की बाबा दुसरी पेटी आणत. माझ्या आत्येबहीणीच्या घरी आंब्याची झाडे होती. कधी कधी ती पण खूप सारे आंबे घेऊन येई. जो पर्यंत आंबे बाजारात आहेत, तोवर घरात कुठला न कुठला आंबा असायलाच हवा असच जणू ठरलेले होते.

सुट्टीत एकदा तरी सिंहगडावर जायचे ठरायचेच. इतरवेळी उन्हं येईपर्यंत लोळत पडलेली मुले पहाटे पहाटे उठून तयार व्हायची. बसने पायथ्या पर्यंत जाऊन मग गड चढायचा. त्यावेळी तिथे डांबरी रस्ता नव्हता. गडावर कुठलेच वाहन नसे. कल्याण दरवाजापर्यत पोहोचेपर्यंत दुपार होई. ऊन तापलेले. तोंडे लाल लाल झालेली असत. तिथे जरा विसावले की, मातीच्या लहान मडक्यांमध्ये लावलेले दही आणि ताक घेऊन कुणी यायचे. आम्हाला ते जणू अमृतच वाटायचे. गडावर झुणका भाकरी खायची. आणि लगेच गड उतरायला सुरुवात करायची. कारण अंधार व्हायच्या आधी पायथा गाठायचा असायचा.
कधी उगीचच सारसबागेत जायचे. तिथे भेळ, पाणीपुरी घ्यायची. तो पर्यंत अजून पावभाजीचा उदय झालेला नव्हता, आणि सारसबागेची चौपाटी बनलेली नव्हती. तळ्यातल्या गणपतीच्या देवळात जायचे. "परीक्षेचा निकाल जरा बरा लागू दे" अशी बाप्पाला विनंती करायची, त्याच्या समोरची घंटा वाजवायचा निष्फळ प्रयत्न करायचा, कारण तिथपर्यंत हात पोहोचायचे नाहीत. तिथल्या रांजणातले गार गार पाणी प्यायचे आणि परत घरी यायचे. असा साधासुधा कार्यक्रम.

म्हणता म्हणता सुट्टी संपून जाई. मग शाळेच्या तयारीची लगबग सुरू होई . पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिली, खोडरबरे याची खरेदी सुरू होई. पुस्तक, वह्यांना कव्हरे घालायचा कार्यक्रम पार पडे. त्या कोऱ्या पुस्तकांचा वास आठवण करून देई की आता सुट्टी संपली. मग नेहमीचा आखीव दिनक्रम सुरू होई. पण कितीतरी दिवस सगळ्या आंबट गोड आठवणींची मनात उजळणी चालूच राही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय नेम आहे न बा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी सदैव तिकडेच लक्ष असेल, म्हणजे कायम फिल्डिंग असेल तर नेम लागणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर ...

स.पे. चे रहिवाासी तुम्ही , ओळखणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

न बा गप्प बसले म्हणून मला खुलासा देणे जरुरी वाटते.
न बा हे स पे चे नाही तर ना पे चे रहिवासी असावेत.
बाकी शाळा डे ए सो चीच असल्याने ममत्व असू शकते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा हे स पे चे नाही तर ना पे चे रहिवासी असावेत.

बरोबर. (तत्कालीन.)

बाकी शाळा डे ए सो चीच असल्याने ममत्व असू शकते.

रेणुका स्वरूप ही डेएसोची नव्हे. मएसोची. (मुलींची भावे स्कूल.)

(परंतु बोर्डाचे सेंटर म्हटल्यावर ट्यूब पेटली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ममत्व महत्वाचे.
बाकी तपशील मिथ्या.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुजुरपागेतला पार वेगळा होता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आमच्या कडे म्हणजे हुजूरपागेत, प्लेशेड, बुचाची, जांभळाची व विलायती चिंचांची झाडे होती. खूप गुलमोहोर व लाल मोठ्या मुंग्यांची पानांनी विणलेली घरटी. मुंग्यांच्या दूध देणाऱ्या गायी असतात मला आता इंग्रजी नाव आठवत नाही (बहुतेक ॲफिड) त्याही होत्या झाडाझाडांवरती. मी त्यांना डिवचायचे म्हणजे काडी टोचली की त्या दूध (द्रव लहानसा थेंब) देत. मुंग्या येउन पट्टकन तो थेंब गोळा करुन जात. खूप पक्षी होते. एकदा एक कावळा झाडावर अडकला होता व उलटा लोंबकळत होता. काही दिवसांनी मेला बिचारा. मधल्या सुट्टीत आम्हाला त्याच्याकडे पाहून, वाईट वाटे.
_______________
उत्तम स्मरणरंजनात्मक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री बालिका मधली सुटी खीखीखी करत घालवत असल्या तरी आम्ही पुरुष बालके ख्याँख्यँख्याँ करत असू.

*: घोडीघोडी नावाचा खेळ होता दंगलीचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या शाळेत कॅन्टिन वगैरे काही नव्हतेच. पुण्यनगरीतील मराठी माध्यमामध्ये शिक्षण देणारी मुलींची शाळा.

नक्की खात्री नाही, परंतु त्या काळात बहुधा कोठल्याच शाळेला कँटीन नसावे. ते लाड कॉलेजात - गेला बाजार ज्युनियर कॉलेजात - गेल्यानंतरचे. आणि, सहसा तास बुडवूनच तेथे जाऊन तासनतास घालविण्याचा शिरस्ता असे. तेथे मिळणारे पदार्थ खरे म्हटले तर तसे भिकारच असत, परंतु एकंदरीत रैट ऑफ प्यासेज होता तो. शेंबड्या (ॲज़ इन, इयत्ता दहावीपर्यंतच्या) पोरांकरिता नव्हे!

----------

बाकी, लेखात (तसा छानच झालाय, परंतु) ठिकठिकाणी 'वाहिनीं'/'वाहिन्यां'चा झालेला उल्लेख अंमळ चक्रावून गेला. आपल्याला बहुधा 'वहिनी'/'वहिन्या' वगैरे म्हणायचे असावे, असा अंदाज बांधून तसा फिल्टर लावून लेख वाचता आला खरा, परंतु तरीही.

हा ऑटोकरेक्टचा फटका म्हणावा काय? तसे असल्यास, मराठीतले ऑटोकरेक्ट हे 'वहिनी'चे केवळ 'वाहिनी'च करते, हा त्या ऑटोकरेक्टच्या अतीव सौजन्याचा नमुना मानावा लागेल. माझ्या मोबाईलचे इंग्रजी ऑटोकरेक्ट हे रोमन लिपीत 'vahini' असे टंकल्यास त्याचे जे काही करते, ते छापण्यायोग्य नाही इतके अर्वाच्य आहे. परंतु ते एक असो.

तर सांगण्याचा मतलब, लेखात ठिकठिकाणी उगविणाऱ्या 'वाहिन्या' या कालविसंगत वाटल्या. पुण्यात त्या काळात फक्त एकच 'वाहिनी' - ब्याण्ड तीन च्यानेल पाच. सिंहगडावरून सहक्षेपित होणारी. ब्लॅक-अँड-व्हाइटमधली. बहुतकरून मुंबईचे, परंतु पावसाळ्यात क्वचित्प्रसंगी मुंबई अधिक कराचीचे चित्र नियमितपणे दाखविणारी. आणि मग, तसे झाले, की मुंबईही मरो नि कराचीही मरो, म्हणून सर्व ठरलेले कार्यक्रम बंद करून मग एफटीआयआयच्या संग्रहातल्या कार्टून्सच्या किंवा तत्सम खरोखर मनोरंजक फिती वाजवून दाखविणारी. गेऽले ते दिवस! परंतु तेही असो. चालायचेच. कालाय तस्मै नमः, वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

"वाहिनी" ची "वहिनी" केलीय ..

खरय कॅन्टीन कुठल्याच शाळेत नसत.

पण कॉलेज च्या कॅन्टीन मधे मिळणाऱ्या काळ्या मिचकुट चहाची सर, जगातल्या भारीतल्या भारी चहाला येत नाही हे तुम्हाला मान्य असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||