अंडी आणि सफरचंदं
कोरोनाचा हाहा:कार मार्च-एप्रिलच्या काळात सुरू झाला आणि जगभरातल्या सगळ्या सेवाभावी संस्था झडझडून कामाला लागल्या. दहा हात कमी पडतील अशा झपाट्याने लोकं काम करत होते/आहेत. परदेशाबरोबर भारतालाही या कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली होती. रोज सगळीकडे देशोधडीला लागलेल्या मजुरांच्या बातम्या, उद्या खायला काय अशी चिंता पडलेल्या साध्यासुध्या लोकांच्या बातम्या वाचून काळजी वाढायला लागली होती. परदेशात असताना स्वत:च्या देशाबद्दल असे काही वाचले की, मोठी अस्वस्थता येते, आणि अशावेळी उचलून पैसे देणे हा मदत करण्याचा एक ठोस उपाय असतो.
या कोरोनाच्या नानाची टांगच, कारण यावेळी हद्दच झाली, ह्याने कोणालाच सोडले नाही. अमेरिकेतही याने कहर केला. माझं काय होते सांगू का, परदेशातले भारतीय हे एका विशिष्ट आर्थिक स्तरातले असतात. अगदी सगळे करोडपती, अब्जोपती नसतीलही तरीही मॉडेल इमिग्रंट (model immigrant) मानले जावे असे कायदे पाळणारे, उच्चशिक्षित, दर घरामागे किमान एक जण वरच्या पदावर असे असतात. साहजिकच तुम्ही राहता, वावरता त्यातले बहुतांशी लोक साधारण सारख्या स्तरातले असतात, त्यामुळे मलाही परदेशातल्या गरिबीचे exposure तसे कमीच होते/आहे.
परदेशातली गरीबी हा मोठा नवलाचा विषय असतो. अनेकांना वाटते की, परदेशात गरिबीच नसते. आपण आपल्या देशातली टोकाची गरिबी पाहिलेली असते, त्याची नीटच जाणीव असते आपल्याला. भारत किंवा जगातल्या अनेक देशांच्या मानाने इथल्या गरिबांना मदत मिळण्याची शक्यता जास्त असते, नव्हे आहेच.
पण गरिबी हि गरिबी असते, ती जगात कुठल्याही देशातली असली तरी ती तितकीच कानकोंडी करणारी असते, मोराल, हिंमत खचवून टाकणारी असते.
या कोरोनाच्या काळात इथल्या अनेक गरीब घरांमधे जायला मिळाले/मिळतेय, तिथे राहणाऱ्या लोकांशी बोलता येतंय. जगाच्या उलटेच वागायचे असा आशीर्वाद वरून घेऊन आल्यामुळे जेव्हा लोक ग्रोसरी आणायला सुद्धा बाहेर पडत नाहीयेत तेव्हा आम्ही लोकांच्या घरी. काय बोलायचे आता? अनेक मित्र-मैत्रिणींनी फोन करून तुला काय पडलीय या लोकांसाठी बाहेर पडायची, 'ये कौन से तेरे सगे है?' हे लोक तुला उद्या हाड म्हणणार आहेत असे झाडले होते. आणि त्यांची काळजी, प्रेम, चिंता सर आँखोंपर.
तर मला करायला मिळालेले एक काम असे होते की, दर दोन आठवड्यांनी गरीब मुलांची यादी त्यांच्या पत्त्यासकट मला दिली जाते, त्या घराला लागणारे एक-दोन आठवड्याचे बेसिक सामान (फळं, पास्ता, ब्रेड, अंडी) बॉक्समधे भरून त्या घरच्या पायरीवर नेऊन ठेवायचे, घराची बेल वाजवायची. लोक बरे आहेत ना बघायचे आणि पुढे निघायचे. आम्ही मास्क लावलेले असतात, सतत हात धुतो, गाडीचे दार उघडायच्या आधी sanitizer लावतो.
पण मूळ स्वभाव पचकायचा असल्याने जाऊ तिथे बोलू (६-फूट लांबून) असे होतेच. आणि मग एक एक अनुभव जमा होत जातात. आपल्यात असलेला माज, कैफ कळत जातो.
तसे आपण आपल्याच कैफात असतो. आपले हे कैफ माझे घर, माझी नोकरी/धंदा, पैसा, पोरं, (सु किंवा कु)प्रसिद्धी इथून सुरु होऊन मला बाजारात गेल्यावर मिळणारी उत्तम भाजी, माझ्या घरच्या कुंडीत येणारी फुले असे कुठपर्यंतही जाऊ शकतात आणि यात चूक तर काहीच नाही. आपल्या यशाचा अभिमान असावाच पण माझ्यासारख्या काही नतद्रष्ट लोकांना त्याचा नकळत माज यायला लागतो. आणि या माजाचे मुखवटे चढत जातात आपल्याच चेहऱ्यावर. पण वरून तो सगळे बघत असतो, त्याला फार काही करायला लागत नाही. तो मधूनच एखादा प्रसंग, एखादा माणूस आपल्या आयुष्यात टाकतो काही काळासाठीच आणि आपला कैफात चढवून घेतलेला मुखवटा सर्रकन फाटून जातो. आणि त्यामागचे खरे आपण दुसरा कुठला तरी मुखवटा चढवेपर्यंत काही काळ का होईना स्वत:चे स्वतःला स्पष्ट दिसतो. असाच माझा कुठलातरी एक मुखवटा मागच्या काही काळात फाटला, and I am so glad it happened.
आम्ही जातो तेव्हा अनेकदा छोटी छोटी मुले आमची वाटच बघत बसलेली असतात. एका घराबाहेर इतका काचेच्या बाटल्यांचा खच पडला होता की, तिथून घरापर्यंत जायचे कसे असे वाटत असताना एक छोटा मुलगा, थांबा! मी येतो म्हणत अजून एका छोट्या बहिणीला आणि आईला घेऊन सामान घ्यायला आला. माझ्याच मुलाच्या वयाचा तो मुलगा होता. ती आई म्हणाली, आज तुम्ही आला नसतात तर आज फक्त दोन मुलांना देण्याइतकेच ओटमील घरात होते.
पिशवीतली अंडी व फळं पाहून तो छोटा मुलगा अक्षरश: नाचायला लागला. mom, I can’t believe it, it’s eggs and apples!!! मग त्याची आई म्हणाली आम्ही मिळेल ते व मिळेल तेवढं पुरवून खातोय आणि अंडी व सफरचंद त्याला खूप आवडतात आणि पण कधी त्याला मिळतच नाहीत. याक्षणी रंग, धर्म, गरीब श्रीमंत, "ये कौन से तेरे सगे है?" हे सगळं बाजूला पडून, तो अंडी पाहून नाचणारा मुलगा मला त्या क्षणी माझ्या मुलासारखा वाटला. मी तेव्हा फक्त एक आई होते, तशाच छोट्या मुलाची आणि त्याच्या पोटात भूक होती.
या अंडी आणि सफरचंदांनी माझ्या माजाचा एक मुखवटा सर्रकन फाडला. माझ्यासाठी हे एक थ्रिल्लिंग, इगो सुखावणारं असं काहीतरी होते पण कोणासाठी तरी ते आजचे जेवण होते.
त्याक्षणी माझा प्रिव्हिलेज्ड असण्याचा मोठा गिल्ट खाऊ की गिळू करत अंगावर धावून आला.
माझ्या भावासमान असणाऱ्या माझ्या एक जेष्ठ मित्राने मला सेवेबद्दल सांगितलेली एक गोष्ट आठवली. सेवा समोरच्याला जितकी मदत करते अनेकदा तितकीच किंवा त्याहून जास्त ती सेवा तुम्हाला मदत करत असते. हे वाक्य मला त्याक्षणी पटले. असे म्हणतात की, we rise by lifting others. Rise च माहीत नाहीत पण निदान माजाचा एक additional मुखवटा आयुष्यात कमी चढला आणि आयुष्याबद्दल कृतज्ञता मानण्याइतकी सजगता आली तरी भरून पावलं.
इतकीच ही गोष्ट अंडी आणि सफरचंदांची.
प्रतिक्रिया
>>>सेवा समोरच्याला जितकी मदत
>>>सेवा समोरच्याला जितकी मदत करते अनेकदा तितकीच किंवा त्याहून जास्त ती सेवा तुम्हाला मदत करत असते.>>>> अगदी मनातलं. आपल्यालाच मदत होते.
लेख फार आवडला. त्यातील भावना नीट पोचल्या. फार चांगले काम हातातून घडते आहे. चालू ठेवा. आणि बरोबर स्वत:चीही काळजी घ्या.
तुम्ही अत्यंत चांगलं काम करत
तुम्ही अत्यंत चांगलं काम करत आहात सृजन !!!
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.
खरंच. समाज कार्य करायची संधी
खरंच. समाज कार्य करायची संधी आली तर ती सोडू नये.
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
माजाचा मुखवटा नसलेली माणसं आजकाल कमीच भेटतात.
हॅट्स ऑफ टू यू, सृजन! हे महान
हॅट्स ऑफ टू यू, सृजन! हे महान कार्य सुरू ठेवा. तुम्हांला, तुमच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा!
तुमचं कार्य महान आहेच, पण
तुमचं कार्य महान आहेच, पण त्याहूनही जास्त भावलेली गोष्ट म्हणजे हे कार्य " सामान्यांसाठी/गरीबांसाठी काहीतरी हॉस्पिटलांनी/ सेवाभावी संस्थांनी/सरकारने मोफत काम केलं पाहिजे" छाप भाबडे आदेश वातानुकुलीत घरांमधे बसून, पोटभर जेवून ढेकर देता देता सोडणाऱ्या ममवंच्या गर्दीत/ पार्श्वभूमीवर, तुमच्या क्रियाशीलतेमुळे अजूनच उठून दिसत आहे.
The Journey Is the Reward...
छान लिहिलंय
छोटासा अनुभव फार प्रांजळपणे आणि विनम्रतेने लिहिला आहे. तुमचे वा इतरांचे या क्षेत्रातील अजून अनुभव वाचायला आवडेल.
छान लिहिलंय
छोटासा अनुभव फार प्रांजळपणे आणि विनम्रतेने लिहिला आहे. तुमचे वा इतरांचे या क्षेत्रातील अजून अनुभव वाचायला आवडेल.
सुरेख्
सुरेख उपक्रम, अनुभव आणि लिखाण.
छान उपक्रम व लेख्
छान उपक्रम व लेख्