मलंग

सध्या थियेटर मध्ये मलंग नावाचा सिनेमा आलाय, पाहिलेल्या ट्रेलर वरून सिनेमा त्या नावाशी किती मेळ खातोय हे मात्र थियेटर मध्येच जाऊन पाहण्याची रिस्क घ्यावी लागेल. अर्थात दिशा पटनी वगैरे लोक Instagram वरच चांगले दिसतात त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी थियेटर हि जागा काहीशी अयोग्य राहील असं मला वाटतं. मुळात थियेटर हे सिनेमामुळे आणि सिनेमे हे ऍक्टिंगमुळे बनतात, दिशा आणि ऍक्टिंग ह्यांचा संबंध आपण तसा न जोडलेलाच बरा! असो . पण एक गोष्ट मात्र मनाला फारच आवडून गेली आणि ती म्हणजे ह्या सिनेमाचं टायटल सॉंग. अप्रतिम लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं असं गाणं म्हणता येईल. पण ते पडद्यावर उतरवताना दिग्दर्शकाने जी काही कौशल्यांची उधळण केलीये ती मात्र अवास्तव वाटली, हे हि असो. पण ह्या गाण्याने मात्र मला लिहायला प्रवृत्त केलं. माझ्या Instagram वरच्या Bio मध्ये मी 'मलंग' असा शब्द फार आधीपासून लिहून ठेवला आहे हाच तो काहीसा माझा मलंग शब्दाशी प्रत्यक्ष संबंध म्हणता येईल. पण अप्रत्यक्षपणे माझ्या आयुष्यात ह्या शब्दाला खूप जास्त महत्व आहे.

मी एकोणवीस-वीस वर्षाचा, नुकताच इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतलेला, एका थियेटर मध्ये बसलोय आणि सिनेमा पाहतोय. अचानक गिटारची एक भन्नाट tune सुरु होते पाठोपाठ आयफेल टॉवर आणि पॅरिसचे सुंदर रस्ते दिसू लागतात. हातात कॅमेरा घेतलेला रणबीर कपूर मनसोक्त भटकतोय, यथेच्छ खातोय, पॅरिसमधल्या एका अनोळखी सुंदर मुलीला पॅशनेटली किस करतोय, चालत्या बोटीतून पाण्यात उडी मारतोय आणि मजेत काम देखील करतोय. हे सगळं पाहत असताना कानावर शब्द पडत असतात 'शामे मलंग सी, राते सुरंग सी' , 'मेरा फलसफा, कंधेपे मेरा बस्ता , चला मे जहाँ ले चला मुझे रस्ता'.... ती पडद्यावरची चित्रं , ते गाणं, रणबीरचा तो लुक, ते सुंदर पॅरिस शहर,तो थियेटर मधला अंधार, तुमचं काहीसं अल्लड असणारं, स्वप्नं पाहणारं वय, हे सगळं खूप परिणाम कारक असतं. ती पडद्यावरची चित्रं अगदी तुमच्या नकळत तुमची स्वप्न बनत असतात. आयुष्यात मलंग शब्द इथे पहिल्यांदा ऐकला, त्याचा अर्थ डोळ्यांनी पहिला. डोक्यात साठवला, मनात घोळवला, आणि तो आता कायम जगायचा असा काहीसा निश्चय करून मी थियेटर बाहेर आलो होतो.

आपण खूप मोकळेपणाने वावरत असताना अनेक धाग्यांनी बांधेलेलो असतो, अनेक गोष्टी आपल्या भोवती विणलेल्या असतात. एक विण नातेसंबंधांची असते, तर एक समाजाची असते, धर्माची असते, संस्कृतींची असते, संस्कारांची असते, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा एक न अनेक आवरणं आपल्या भोवती विणलेली असतात. आपण घेत असेलेले निर्णय, आपण जात असू त्या जागा, खात असू ते पदार्थ, पित असू ती द्रव्यं, घालत असू ते कपडे अशा एक न अनेक बाबींवर ह्या विणलेल्या आवरणांचा प्रचंड प्रभाव असतो. तुम्ही जे कधी पाहिलेलं नाहीये, ऐकलं नाहीये किंवा अनुभवलं नाहीए अशा अनेक गोष्टींना विनाकारण लावलेली लेबलं आपण पाहतो आणि त्या गोष्टी करण्यापासून मुकतो ते ह्या आपल्या भोवती विणून ठेवलेल्या विविध आवरणांमुळेच. हि आवरणं तुमच्यासाठी बरेचदा विधायक सिद्ध होता आणि बरेचदा विघातक सुद्धा. आपण एका अशा पिंजऱ्यात जगत असतो कि ज्याला कडी कुलूप काहीही घातलेलं नाहीये. खुश असतो आपण त्या पिंजऱ्यामध्ये, तो पिंजरा सोडून जावं असा विचारही आपल्या मनाला कधी शिवून जात नाही. पण एक दिवस असा येतो कि कोणती तरी व्यक्ती किंवा पुस्तक किंवा एखादी फिल्म तुम्हाला पिंजऱ्याबाहेरच्या जगाशी ओळख करून देते. आणि त्या दिवसापासून तुम्ही पिंजऱ्यात असता पण तुमच्या मनात मात्र पिंजरा नसतो, आणि तुम्ही लवकरच त्या पिंजऱ्याबाहेरच्या जगात पोहोचलेले असता. कोणत्याही आवरणांशिवाय. मलंग. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती होती ' सचिन कुंडलकर' जिने मला पिंजऱ्याबाहेरच्या जगाशी ओळख करून दिली.

मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं 'नाइन्टीन नाइन्टी' , सचिन कुंडलकर ने लिहिलेलं. मलंग ह्या शब्दाची व्याख्या म्हणजे हा माणूस आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही इतके भन्नाट अनुभव आहेत ह्या माणसाकडे. विशेष हे म्हणता येईल कि हा माणूस आयुष्याकडे अतिशय वेगळ्या अँगल ने पाहतो आणि पाहायला शिकवतो. हे पुस्तक वाचून आपण जे जगतो ते बरोबर जगतो ना? आपण खरंच जगतोय ना? जे काही करतोय ते बरोबर करतोय ना? जे करावंस वाटतंय तेच करतोय ना? असे एक न अनेक प्रश्न तुमच्या मनात रुंजी घालू लागतात आणि तुम्हाला वेळोवेळी विचलित करतात. पण ह्या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्याच पुस्तकात प्रत्येक पानागणिक सापडत जातात आणि तुम्हाला बदलवून टाकतात अगदी अंतर्बाह्य. बुरसटलेला समाज, एकमेकांवर कुरघोडी करणारे नातेवाईक, काही विचित्र परंपरा, काही मूर्ख गैरसमज, अवास्तव महत्व प्राप्त झालेले धर्म तुम्हाला जगण्यापासून किती विचलित करतात याची जाणीव तुम्हाला वेळोवेळी होत राहते. हि जाणीव होणं तुमच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. सचिन तुम्हाला स्वत्रंत करतो बेफिकीर करत नाही, तो तुम्हाला 'मलंग' बनवतो 'आवारा' बनवत नाही हेच त्याच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.

तसं पाहिलं तर मलंग हा सुफी संतांसाठी वापरला जाणारा एक उर्दू शब्द आहे. पण अनेक शायर, कवी आणि लेखकांनी ह्याला वेगवेगळे आयाम दिलेले आहेत. सिनेमा मध्ये जे नायक नायिका करतात, उदाहरणादाखल घेतलेला रणबीर कपूर समजूया, जे काही करतो ते त्या चित्रपटापुरतं असतं हे आपण सर्वच जाणतो. ते काही कुणाच्या जगण्याची व्याख्या होऊ शकत नाही. पण कोणतीही नवीन गोष्ट करताना, अनुभवताना त्या गोष्टीबद्दल तयार झालेले पूर्वग्रह मनात न ठेवता ती गोष्ट करता येणं हि मला स्वतंत्र होण्याची पहिली पायरी वाटते. उदाहरण द्यायचं झालं तर खाण्याच्या बाबतीत देखील अनेक अतार्किक समजुती बाळगणारा आपला समाज आहे. जिभेला जे रुचतं आणि पोटाला जे पचतं ते खावं असा जगभर प्रचलित असलेला प्रघात भारतात मात्र 'तुमच्यात चालतं का ???' इथे येऊन थांबतो? पुस्तकं वाचताना, सिनेमे पाहताना, संगीत ऐकताना, समाजात वावरताना सतत आपलं मन पूर्वग्रहदूषित का असतं ह्याचा विचार आपण करायला हवा. समाजाने फार पूर्वीपासून स्वतःसाठी काही निकष लावले आहेत, आणि आज एकविसाव्या शतकात पण ते फार काटेकोरपणे पाळले जातात, पण ते निकष तयार करताना काय परिस्थिती असेल ह्याचा विचार न करता ते आंधळेपणाने अनुसरले जातात हे खूपच निराश करणारं आहे. पण ह्या निकषांच्या आणि नियमांच्या चौकटीतून संयतपणे बाहेर पडणं हेच स्वतंत्र होणं आहे असं मला वाटतं. हे स्वातंत्र्य अनुभवत असताना तुमच्यावर खूप टीका देखील होऊ शकते कारण तुमचं मलंग होणं हे समाजासाठी तुम्ही त्यांच्या विरुद्धबंड केल्यासारखं आहे, जर तुमच्यावर होणारी हि टीका ऐकून तुम्ही बिलकुल विचलित होत नसाल तरच तुम्ही स्वतंत्र झाला आहात, मलंग झाला आहात असं मला वाटतं.

मत काहो पागल मुझे, मलंग हुं मै

बस इंसानी तासीर से अलग हुं मै

-किरण पावसे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

किती छान लिहिलंय!

कित्येकांना माहिती असतं कोण मलंग आहे ते पण तो त्याला स्वत:ला समजत नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

सचिन तुम्हाला स्वत्रंत करतो बेफिकीर करत नाही, तो तुम्हाला 'मलंग' बनवतो 'आवारा' बनवत नाही हेच त्याच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.

वाह!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच मलंग वय आणि जबाबदारीमुळे सरळमार्गी ममव होतात Smile
छान जमलाय लेख.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लइ भारी लिहिलयस मर्दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मलंग व्हावे की दबंग व्हावे या वैचारिक गोंधळात शेवटी काहीच होऊ शकलो नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पतंग झालो असे म्हणायचे आहे काय तिमा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कटी पतंग जास्त शोभून दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0