Skip to main content

प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालय, कंटेम्प्ट वगैरे

Supreme but not Infallible

EMS नम्बूद्रीपाद एकदा म्हणाले की सुप्रीम कोर्टाला वर्गीय बायस आहे आणि ते शोषणाचे साधन आहे. त्यांना contempt jurisdictionमध्ये शिक्षा दिली होती. कालांतराने सुप्रीम कोर्टाचे जज (आणि निकालात अवघड इंग्लिश वापरा शाळेचे महागुरू) कृष्णा अय्यर देखील तेच म्हणाले. व्यक्तिगत पातळीवर जजला मूर्ख म्हणणे, शोषक म्हणणे, अमुक तमुक म्हणणे हे देखील चिरंतन काळ चालू आहे. ह्यात न्यायालयाचा अवमान होत नाही.

सुप्रीम कोर्ट हे एक संस्थात्मक रचना आहे. त्यात ३० -३२ न्यायाधीश असतात. ते देशाच्या नानाविध भागातून, वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर काम केलेले, वेगवेगळ्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत तयार झालेले असतात. ह्याचे पडसाद त्यांच्या निकालपत्रात दिसतात. त्यात त्यांचा बायस दिसू शकतो. आजुबाजुला प्रचंड राजकारण, समाजकारण घडत असते त्याचे पडसाद दिसतात.

एव्हढी मोठी संस्था, ज्याच्या सोबत हजारो वकील देखील काम करत असतात, त्या संस्थेत प्रासंगिक मतभेद, आरोप- प्रत्यारोप होत असतातच. मुद्दा असतो, मतभेद व्यक्त करण्याच्या पद्धतीचा. वकील हा officer of the court मानला जातो. एखाद्या सामाजिक प्रश्नावर वकिलांनी अर्ज, विनंती, खटले, पत्रव्यवहार करणे अपेक्षित असते. त्यांना त्याचे प्रशिक्षण असते आणि तेव्हढा विवेक त्यांना असणे आवश्यक असते. त्यांनी उठून कन्हैया कुमारला मारहाण करणे, हिंसक संप वगैरे करणे, हे अपेक्षित नाहीच. They have been trained to think and act dispassionately. विवेक न्यायाधीशांनादेखील असणे अपेक्षित आहे.

कोर्टाच्या वर्तनाची आणि निकालपत्रांची समीक्षा काही आज सुरू झालेली नाही. ती कोर्टाच्या स्थापनेपासूनच आहे. कोर्टाचे वर्तन देखील सर्व काळ आदर्श राहिलेले नाही. (अधिक माहितीसाठी) त्यामुळे टीकेत काहीही नावीन्य नाही.

ट्विटरचा वापर नवीन आहे. पण त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. पण विधान आणि scandalous विधान ह्यात काही मूलभूत फरक आहे. प्रशांत भूषण ह्यांनी स्वतः चे मत चीफ जस्टिस यांना कळविले होते का? किंवा उर्वरित न्यायाधीशांना कळविले होते का? म्हणजे ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत त्यांना काहीही न कळवता, सरळ ट्विटरवरती चिखलफेक करण्याचा त्यांचा हक्क त्यांनी बजावला. ह्यातून त्यांना रस कशात आहे? हे स्पष्ट होते. Change.org वरती ते याचिका दाखल करतात का? का ट्विट करून युक्तिवाद कळवतात खटल्यात? म्हणजे एक सुबुद्ध पद्धत न वापरता सरळ समाजमाध्यमातून चिखलफेक करून त्यांना नक्की साध्य काय करायचे आहे? परिवर्तन? चिखलफेक आनंद? त्यांच्या ह्या उथळ वर्तणुकीविषयी सहानुभूती वाटणारे लोक असतील कदाचित, पण त्यात मी नक्की नाही. आता प्रश्न असा आहे की, उथळपणा हा contempt कसा असू शकतो? ह्याचे काही फारसं समाधानकारक उत्तर ११८ पानात मला स्वतःला मिळालेले नाही. परंतू म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो ह्या "न्यायाने" (उपरोध) एखाद्या प्रशांत भूषणला शिक्षा झाली तर त्यात मी वाईट वाटून घ्यावे का?

आता ह्या सगळ्या प्रकरणात, मूळ मुद्दा बाजूला राहतो तो म्हणजे for the larger common good सर्वोच्च न्यायालय ही संस्था आणि त्याचे अस्तित्व, तुमच्या माझ्या साठी आवश्यक आहे, असं तुम्हाला वाटते का? मला निश्चित वाटते. सरकार नावाच्या अजस्त्र, सर्वव्यापी, महाशक्तिशाली यंत्रणेला चाप लावण्याची एकमेव आणि शेवटची संवैधानिक व्यवस्था ती आहे. त्याला हानी पोहचवणे आपल्या भल्याचे नाही. परंतु आज ऱ्हस्व दृष्टीने जे ह्या बाबीचा विचार न करता प्रशांत भूषण ह्याला हिरो करवून बसले आहेत, त्यांना हा विवेक नसावा हे दुर्दैवी आहे.

---
(लेखक व्यवसायाने वकील आहेत.)

प्रभुदेसाई Fri, 21/08/2020 - 15:40

का? ते सुद्धा सांगत नाही. भीती वाटते.

चिंतातुर जंतू Fri, 21/08/2020 - 15:51

In reply to by प्रभुदेसाई

का? ते सुद्धा सांगत नाही. भीती वाटते.

लेखातला मजकूर काही कंटेम्प्ट करणारा वाटत नाही. तुम्हाला तो तसा वाटला का?

अबापट Fri, 21/08/2020 - 16:19

In reply to by प्रभुदेसाई

का घाबरता ? भूषण व्यवसायाने वकील असे लिहिले आहे.
ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नसावेत.तुम्ही त्यांना प्रशांत भूषण समजलेत की काय ?

तिरशिंगराव Fri, 21/08/2020 - 18:51

थोड्याच वर्षांपूर्वी, एका जजने रेल्वे स्टेशनवरच कोर्ट भरवून एकाला शिक्षा सुनावली होती, असं वाचल्याचं आठवतं. रेफरन्स मिळाला तर याच प्रतिक्रियेत ॲड करीन.

गोल्डन ब्राऊन Fri, 21/08/2020 - 21:09

न्यायाधीश हे पगारी नोकर आहेत. त्यांना कायद्याच्या अभ्यास, खटल्याविषयी मनन, चिंतन करता यावे व दैनंदिन काम विना संघर्ष पार पडावं म्हणून बऱ्याच सुखसुविधा दिलेल्या असतात. आपण म्हणजे कुणीतरी अशी ऐट मिरवत असतात. त्यांना नोकराचाच दर्जा दिला गेला पाहिजे असे माझं वैयक्तिक मत आहे.

कासव Fri, 21/08/2020 - 22:57

प्रशांत भूषण ह्यांनी स्वतः चे मत चीफ जस्टिस यांना कळविले होते का? किंवा उर्वरित न्यायाधीशांना कळविले होते का? म्हणजे ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत त्यांना काहीही न कळवता, सरळ ट्विटरवरती चिखलफेक करण्याचा त्यांचा हक्क त्यांनी बजावला. ह्यातून त्यांना रस कशात आहे? हे स्पष्ट होते.

कसे काय स्पष्ट होते? ह्याचा खुलासा करता येईल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 22/08/2020 - 01:59

म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो ह्या "न्यायाने" (उपरोध) एखाद्या प्रशांत भूषणला शिक्षा झाली तर त्यात मी वाईट वाटून घ्यावे का?

ह्यात काळ नक्की कसा काय सोकावतो? हा प्रश्न औपरोधिक वाटू शकतो; पण मला खरोखर माहीत नाही म्हणून विचारला आहे.

समजा प्रशांत भूषण ह्यांनी संबंधित लोकांना खाजगीत कुठल्या प्रकारे, काही गोष्टी सांगितल्या असतील आणि त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशांत भूषण ह्यांनी ट्विटरचा आसरा घेतला असेल. किंवा खाजगीत कळवल्या नसतीलही, पण सध्याच्या जमान्याचं संपर्काचं माध्यम म्हणून ट्विटर वापरलं असेल; किंवा खूप लोकांपर्यंत हा विषय जावा म्हणून ट्वीट केलं असेल. (एरवी माझ्यासारख्यांचं ह्या गोष्टीकडे लक्ष जाणं अशक्यच.)

तर अपमान कसा होऊ शकतो, हे सोडून देऊ. काळ नक्की कसा सोकावतो, हे मला खरोखर समजलं नाही.

दुसऱ्या बाजूनं, आता कुणीही फोन-इंटरनेटधारी लोक फेसबुक-ट्विटरादी माध्यमं वापरू शकतात. लोकांपर्यंत हिंसक, धोकादायक, फूटपाडू विधानं पोहोचवण्यासाठीही ह्या माध्यमांचा वापर होतोय. सध्या फेसबुक अशा अहवालामुळे भारतात अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर न्यायालय आणि संसदेनं ही माध्यमं जरा मनावर घेऊन त्यांवर काही अंशी कायदेशीर नियंत्रण ठेवण्याचीही गरज आहे. (भरल्या सभेत 'आग आग' म्हणून ओरडणं बेकायदेशीर ठरेल, ह्या छापाचं नियंत्रण.) काळाबरोबर चालण्यासाठी एकंदरच सध्याचा (कु?)प्रसिद्ध प्रशांत भूषण संवाद ट्विटरसारख्या माध्यमांवर का होऊ नये? किमान चारचौघांसमोर असल्यामुळे जरा जास्त लाज बाळगली जाईल अशी आशा मला वाटते. (माझा भाबडेपणा गृहीत धरला आहेच.)

चिंतातुर जंतू Sat, 22/08/2020 - 09:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किंवा खूप लोकांपर्यंत हा विषय जावा म्हणून ट्वीट केलं असेल. (एरवी माझ्यासारख्यांचं ह्या गोष्टीकडे लक्ष जाणं अशक्यच.)
तर अपमान कसा होऊ शकतो, हे सोडून देऊ. काळ नक्की कसा सोकावतो, हे मला खरोखर समजलं नाही.

प्रशांत भूषण यांनी ट्विट केलं म्हणून काळ सोकावतो असं धागालेखकांचं म्हणणं नसावं. शिक्षा झाली म्हणून काळ सोकावतो, असं असावं.

प्रकाश घाटपांडे Sat, 22/08/2020 - 11:39

कंटेप्ट ऑफ कोर्ट हे आकलन व्यक्ति सापेक्श आहे की कायद्याची तांत्रिक बाब आहे?
कोर्टाच्या वर्तनाची आणि निकालपत्रांची समीक्षा काही आज सुरू झालेली नाही. ती कोर्टाच्या स्थापनेपासूनच आहे.>>> पण कालानुसार त्यात काही फरक पडला असेल ना? अभिव्यक्तीच्या माध्यमांचा तेव्हा स्फोट नव्हता. पण या अशा कंटेप्ट ऑफ कोर्ट मुळे भावना दुखावणे, श्रद्धा दुखावणे या प्रकाराला कायद्याचे अधिष्ठान मिळाले तर पुरोगामी लोकांचे अवघड आहे. समीक्षा व चिकित्सा यात नेमका फरक कसा करायचा? दोन्हीत विश्लेषण हे आलेच ना!

घाटावरचे भट Sun, 23/08/2020 - 16:35

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>पण या अशा कंटेप्ट ऑफ कोर्ट मुळे भावना दुखावणे, श्रद्धा दुखावणे या प्रकाराला कायद्याचे अधिष्ठान मिळाले तर पुरोगामी लोकांचे अवघड आहे.

माझ्या अल्प समजुतीप्रमाणे सगळे पुरोगामी लोक सरसकट 'कोर्टाने लोकशाही नष्ट करण्याचे काम केले आहे' अथवा ' सरन्यायाधीश भ्रष्ट होते' अशी विधानं सबळ पुरावे न देता ट्विटरसारख्या माध्यमातून करत नसावेत.

Rajesh188 Sat, 22/08/2020 - 12:52

सरकार सारख्या अवाढव्य राक्षसी ताकत असलेल्या यंत्रणा पासून सामान्य लोकांचे अधिकार जपायचे असतील तर न्याय यंत्रणा प्रबळ असलीच पाहिजे.
आणि ही संस्था स्वायत्त असणे पण खूप गरजेचे आहे.
हे लेखकाचे मत योग्य च.
अनियंत्रित टीका करण्या मुळे न्याय संस्था अविश्वास च्या भोवऱ्यात येतात आणि त्यांचे स्थान डगमगू शकते ही भीती चुकीची नाही.
त्याच मुळे कोर्टाचा अपमान करणे हा गुन्हा शिक्षेस पात्र असलाच पाहिजे..
पण न्याय यंत्रणा पण कधी चुकीचे निर्णय देते.गैर कारभार सुद्धा न्याय यंत्रणेत चालतो.
न्यायाधीश कायद्या पेक्षा स्वतःच्या मानसिकतेला ,मताला जास्त किंमत देतात न्याय देताना त्या मुळे अन्याय होतो.
मग त्यांच्या वर नियंत्रण ठेवणे पण गरजेचे आहे,त्यांच्या चुकीच्या निर्णय वर टीका होणे गरजेचे,समीक्षा होणे गरजेचे आहे.
अनियंत्रित न्याय व्यवस्था पण धोकादायक च.
अशी ही विचित्र समस्या आहे.
धरल तर चावते आणि सोडले तर पळते.
ह्या वर योग्य उपाय असायलाच हवा.