क्रोनोनॉट अरुण

अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते.
“ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले.
बाबांचा क्रिकेटवर थोडा राग होता. त्यांच्या मते क्रिकेट खेळणे म्हणजे वेळेचा अपव्यय. त्यापेक्षा हुतुतू ,खो-खो, आट्यापाट्या खेळणे जास्त आरोग्यदायी आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. पण सध्याचा जमाना मुलांशी प्रेमळपणाने वागण्याचा असल्याने ते आपली मते आपल्यापाशीच ठेवत असत. पेरेंट्स टीचर मीटिंग मध्ये अरुणच्या मिस (म्हणजे जुन्या काळी ज्यांना ‘बाई’ म्हणत असत त्या.) पेरेंट्सना निक्षून सांगत असत, “ट्रीट देम अॅज युअर फ्रेंड्स.” हे सगळे आठवत असतानाच अरुण ओरडला, “ गेम ओवर.”
“ अरुण हे बघ, माझे एक काम कर ना. कोपऱ्यावरच्या केमिस्टकडे जाऊन हे औषध घेऊन येशील?” बाबा हळुवारपणे म्हणाले.
“ऑफकोर्स येस, माय डिअर पपा.” अरुण आजकाल पपांशी इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. अरुण बाबांच्याकडून पैसे घेऊन खाली गेला तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला घेरले, “ अरुण , मॅचचं काय झाले?” “काय होणार.आपण जिंकलो.” अरुणने मॅचचा सविस्तर रिपोर्ट दिला. कुणी कसा कॅच घेतला. कुणी सिक्स मारली. शेवटी तो म्हणाला, “ मला खेळायला घ्या. माझी सकाळची बॅटिंग राहिली आहे ती द्या.”
अरुण म्हणाला ते खरे होते. सकाळी खेळत असताना बाबांनी हाक मारल्यावर त्याला जावे लागले होते. ती त्याची बॅटिंग राहिली होती.
“ अरे ,तू आता आलास आणि तुला लगेच बॅटिंग करायला पाहिजे. थोडी एक ओवर तरी फिल्डिंग कर, मग घे तुझी बॅटिंग,” बबड्या म्हणाला.बबड्या म्हणजे एक धटिंगण मुलगा होता. तसा स्वभावाने अगदी साधा. मात्र खेळायच्या वेळी तो सर्वांचा लीडर होता. गल्लीच्या टोकाला त्याच्या बाबांचे गॅरेज होते. तो सगळ्यांचा आवडता होता. वर्गांत तो एकटाच असा होता की ज्याच्या खिशांत पैसे खुळखुळत असत, तो खुशींत असला की मित्रांना चोकलेट,गोळ्या किंवा चण्या –मण्या खायला घालत असे. त्यामुळे त्याचे मित्र त्याला होमवर्क करायला मदत करत. परीक्षेत त्याच्या जवळ बसलेले त्याचे दोस्त त्याला पेपर कॉपी करून देत. अर्थात त्याला पास नापासची चिंता नसे.त्याची एवढीच माफक इच्छा असे की आपल्या मित्रांच्या बरोबर वरच्या वर्गांत जावे. “ आपल्याला काय बापाने गॅरेज कशासाठी खोलले आहे? तेथेच आपली नोकरी.” वडिलांना बाप म्हणणारा बबड्या सगळ्या शाळेंत एकटाच मुलगा होता. बाकी सर्वजण वडिलांना अगदी पिताश्री नाही पण आदराने बाबा असे म्हणत असत.
एक ओवर फिल्डिंग केल्यावर अरुणच्या हातांत बॅट आली. श्री बोलिंग करत होता. आताच ऐकलेल्याभारत पाकिस्तान मॅचची धून अरुणच्या डोक्यांत होती. एक छानपैकी सिक्स मारायची हुक्की त्याच्या डोक्यांत आली. त्या जोशात त्याने बॅट फिरवली. चेंडू हवेंत उंच उडाला आणि गल्लीच्या बाजूला असलेल्या एका पडक्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये जाऊन पडला.
“ अरुण आउट! जा पळ बॉल घेऊन ये.” सगळेजण एकसुराने ओरडले. श्रीने त्याच्याकडून बॅट घेतली. त्यांच्या खेळाचा नियमच तसा होता. जो कोणी चेंडू कुठल्याही बिल्डींगच्या कंपाऊंडमध्ये मारेल तो आउट आणि त्यानेच जाऊन चेंडू शोधून आणायचा.
त्या ओसाड पडलेल्या पडक्या बंगल्यांत जायची कुणाचीही इच्छा नसे. अरुणची तर मुळीच नव्हती. त्या बंगल्यांत म्हणे भूत होते एका म्हाताऱ्याचं.खूप वर्षांपूर्वी तो एकटाच तिथे रहात होता. आणि एकटाच मेला बिच्रारा. दोन चार दिवस कुणाला थांगपत्ता लागला नाही.जेव्हा असह्य दुर्गंधी यायला लागली तेव्हा कुणीतरी पोलिसांत तक्रार केली. त्याचा मुलगा दूर कुठेतरी परदेशांत स्थायिक झाला होता. त्याची वाट पहात पहात मेला. लोक म्हणायचे त्याचा आत्मा अजून मुलाची वाट पहात तिथे घुटमळतो आहे. म्हाताऱ्याचं भूत आपण बघितले आहे असे छातीठोकपणे सांगणारे बरेच लोक गल्लीत होते. पण त्या गरीब बिचाऱ्या म्हाताऱ्याने कधी कुणाला त्रास दिल्याचे ऐकण्यात आले नव्हते. तरी देखील अरुणचे मन त्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये जायला धजत नव्हते. पण करणार काय जायला तर पाहिजे होते. शेवटी रामनामाचा जप करत तो भिंतीवर चढला आणि त्याने पलीकडे उडी मारली.
बंगल्याच्या आजूबाजूला गवत माजले होते.त्यामध्ये चेंडू शोधणे म्हणजे जरा कठीण काम होते. त्याला एकदम आठवले की दिवसा भुते येत नाहीत. आता भुताची भीती थोडी कमी झाली होती.त्याच्या अंदाजाने चेंडू इथे जवळपास असायला पाहिजे होता. सताड वाढलेले गवत हाताने दूर करत तो चेंडू शोधू लागला. आहा मिळाला चेंडू! लवकर मिळाला हे बरे झाले. बाहेरून त्याचे मित्र ओरडत होते ,” अरे ,काय कारातो आहेस? मिळाला की नाही. का म्हाताऱ्याने पकडले तुला? “
त्याने चेंडू उचलून हातात घेतला तितक्यांत -------.
-----------------------------------------------------------------------------------
थोड्या वेळांतच अंधार प्रकाशाचा खेळ संपला आणि अरुणच्या समोर गल्लीचे दृश्य दिसू लागले. सगळी गल्ली रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशांत न्हाऊन निघाली होती. रस्त्याच्या दोनी बाजूला नविन चकाचक दिसणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. समोर दिसणारी चार मजली इमारत – त्यावर निऑन साईन होती “गुरुकृपा”! हे तर त्याच्याच सोसायटीचे नाव होते. त्याच्याच बाजूला “पंकजश्री” सोसायटीची बिल्डींग उभी होती. तिथे अरूणचा मित्र श्रीचे घर होते.क्रिकेटचा रंगात आलेला डाव सोडून त्याचे सर्व मित्र कुठे गेले?अरुणचे डोके चक्रावून गेले.” मी स्वप्नांत तर नाही?” त्याने स्वतःला चिमटा काढून खात्री करून घेतली. नाही, हे स्वप्न नव्हते. ज्या पडक्या ओसाड बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये तो असायला पाहिजे होता त्याऐवजी तो एका नवीन टुमदार बंगलीच्या लहानश्या बागेंत उभा होता. ज्या विटांच्या कंपाऊंडवरुन उडी मारून तो आंत आला होता ती भिंत पण अदृश्य झाली होती. त्याच्या जागी फुलांनी बहरलेल्या बोगनवेलीया दिसत होत्या. ओसरीवर एक झोपाळा होता. त्यावर एक म्हातारा डोळे मिटून हलके हलके झोके घेत होता. म्हाताऱ्याला बघून अरुणच्या अंगातून भीतीची लहर चमकून गेली. अरुणच्या पायातली शक्ति निघून गेली. हे तर म्हाताऱ्याचं भूत होते. बापरे ,कुठल्या भुताटकीच्या मायानगरींत आपल्याला ह्या म्हाताऱ्याने खेचून आणले आहे? अरुणला आईची तीव्र आठवण झाली आणि रडू कोसळले. तेवढ्यांत आतून म्हातारी बाहेर आली. तिने म्हाताऱ्याला त्याच्या तंद्रीतून बाहेर काढले. “ अहो, चला चहा झाला. आंत येता का बाहेर आणून देउ?” म्हातारा काही बोलायच्या आधीच तिचे लक्ष झाडाखाली घाबरून उभ्या असलेल्या रडक्या चेहेऱ्याच्या अरुणकडे गेले.
“ अगो बाई , अहो पहा तरी आपल्याकडे कोण छोटा पाहुणा आला आहे तो. अरे, इकडे ये असा. घाबरू नकोस. आणि असा भूत पाहिल्यासारखा चेहरा का केलास.” अरूणशी एवढ्या प्रेमाने कोणी आजी प्रथमच बोलत होती. ( भुते अशी प्रेमाने बोलतात काय ? ती तर आपल्याला घाबरवतात.) आजीच्या प्रेमळ शब्दांनी अरुणची भीती थोडी चेपली.
“ मी अरुण. अरुण तळपदे. समोरच्या सोसायटीत राहतो. पण आपण कोण? केव्हा इकडे राहायला आलात. हा बंगला पण नवीन दिसतो आहे म्हणून विचारतो आहे.”
म्हातारा आणि म्हातारी, दोघेही हसायला लागले.” तू वाट चुकून इकडे आलेला दिसतोस.तुझ्या आई बाबांचा टेलीफोन नंबर आहे का ? मी फोन करून त्यांना इकडेच बोलावतो. तोवर ये इकडे. खा काहीतरी. तुला चाकोलेट आवडते का?”
त्याला बाबांची शिकवण आठवली. अनोळखी माणसाकडून काही खायला घ्यायचे नाही.ते लोक गुंगीचे खायला देऊन मुलांना पळवतात. बाबांची आठवण झाली आणि त्याला आठवले की बाबांनी औषध आणायला सांगितले आहे. आपण खेळण्यांत दंग झालो आणि कम्प्लीटली विसरूनच गेलो. बापरे आता बाबा रागवणार. “ आजी, आजोबा मी जातो आता. मला बाबांचे काम करायचे आहे.”
पाठीमागे न बघता अरुण बंगल्याच्या बाहेर पडला. गल्लीमध्ये लोकांची ये-जा चालली होती पण एकसुद्धा चेहरा त्याच्या ओळखीचा नव्हता. एरवी गल्लीतल्या जवळ जवळ प्रत्येकाला तो ओळखत होता. मध्येच एखादी मोटारगाडी भुरकन जात होती, सर्व गाड्या अगदी निराळ्या दिसत होत्या. त्यांचे रंग आरशाप्रमाणे चमकणारे होते.त्यांच्या गल्लीत फक्त डॉक्टरकाकांची हिलमान गाडी होती.बाकी सर्वजण सायकली वापरत होते.त्या सायकलींना सर्वजण कळत नकळत गाडी म्हणत ती गोष्ट अलाहिदा.पण खरी गाडी डॉक्टरकाकांची हिलमान! आणि आता आपल्या गल्लीत ह्या एवढ्या गाड्या! आश्चर्यच म्हणायला पाहिजे! गाड्यावरून त्याला बबड्याची आठवण झाली. उद्या त्याला तो बंगला, ते आजी आजोबा, आणि ह्या स्वप्नातल्या गाड्या हे सांगितल्यावर त्याचा विश्वासच बसणार नव्हता. पण प्रथम बाबांचे औषध!
केमिस्ट गल्लीच्या कोपऱ्यावर होता, गल्लीच्या एका टोकाला बबड्याच्या बाबांचे गॅरेज होते तर दुसऱ्या टोकाला पाच मिनिटांच्या अंतरावर केमिस्टचे दुकान.अरुण जेव्हा दुकानापाशी पोहोचला तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. नाव तेच होते - -- ‘शाह अँड सन्स केमिस्ट’ ---.दुकानांत विजेच्या दिव्यांचा लखलखाट होता.( दिवेपण जरा निराळे दिसत होते.). दुकानातले नोकर दुसरेच दिसत होते. त्याच्या ओळखीचे जुने लोक कुठे दिसत नव्हते. भीत भीत त्याने बाबांनी औषधाचे नाव लिहिलेली चिठ्ठी कॉउंटरवरच्या माणसाला दिली. चिठ्ठी वाचून त्या माणसाला थोडे हसू आले. “ कुणी दिली ही चिठ्ठी?” “ माझ्या बाबांनी, का काय झाले?” “ जा, बाबांना सांग की हे औषध आता मिळत नाही. केव्हाच बंद झाले. ते बनवणारी कंपनी पण बंद होऊन कितीतरी वर्षे झाली.” त्याने खिशातून पेन काढून चिठ्ठीवर काहीतरी लिहिले, व ती अरुणला देऊन तो म्हणाला,” तुझ्या बाबांना विचार की हे मी इथे लिहिलेले मेडिसिन चालेल का?”
आता मात्र अरुण वैतागला. आधीच उशीर झालेला आणि त्यात हा प्रॉब्लेम. चिठ्ठी खिशांत टाकून खाली मान घालून त्याने घराची वाट पकडली.
अरुण पूर्णपणे गोंधळलेला होता. मगाशी त्याची खात्री झाली होती की तो स्वप्नांत नव्हता पण आता मात्र त्याला कळून चुकले की तो हे एक स्वप्न बघत आहे.जेव्हा गुरुकृपा सोसायटी आली तेव्हा त्याला थोडे बरे वाटले. एकदा घरी गेलो की आई बाबा भेटतील आणि आपला सारा गोंधळ दूर होईल. बाबांना तो सरळ सांगणार होता, “मी नाही जाणार बाहेर आता. तुम्हीच जा आणि तुमचे औषध घेऊन या.” हां जर की त्यांनी चोकोलेट बार द्यायचे कबुल केले तर मग ---- बघूया.
तो सोसायटीच्या गेटपाशी आला तेव्हा त्याला कशाचीच खात्री नव्हती. गेटवर वॉचमन खुर्चीवर बसून हातांत ट्रान्सिस्टर घेऊन गाणी ऐकत बसला होता.त्यांच्या सोसायटीत कधी असली वॉचमन वगैरेची नाटके नव्हती. वॉचमन ठेवणे ही मोठ्या लोकांची कामे होती. खरतर वॉचमन पाहिजेच कशाला? कधी कुणाकडे चोरी झाली तर ना. सोसायटीमध्ये लोकांची कायम वर्दळ असे. कुणाकडे लपवा छपवी नव्हती, लपवून लपवून काय लपवणार? सगळे तर साधे सुधे मध्यमवर्गीय. वॉचमनची नजर चुकवून आत जायचा अरुणचा बेत होता. पण वॉचमनने त्याला टोकलेच, “ ओ हिरो, काय काम आहे ? कुठे जायचे आहे?” अरुणला त्याचा राग आला. आपल्याला आपल्याच घरी जायला अडकाठी करणारा हा उपटसुंभ कोण?
“मी माझ्या घरी चाललो आहे. तुम्हाला इथे बसून वॉचमनगिरी करायला कोणी सांगितले आहे?” अरुणने पण त्याला उलट उत्तर दिले.
वॉचमन आता सावरून बसला. त्याने ‘ट्रान्सिस्टर’ बंद केला. त्याने आठ्या घालून अरुणला आवाज चढवून विचरले, “ नीट बोल. तुझे काय काम आहे. उगीच माझा वेळ वाया घालवू नकोस.”
“माझे नाव अरुण तळपदे. मी फ्लॅट नंबर २०३ मध्ये राहतो.”
त्याचा अविर्भाव बघून वॉचमन थबकला. तो जरा विचारात पडला.शेवटी त्याने आपला ‘ट्रान्सिस्टर’ घेतला. आश्चर्य म्हणजे त्या ‘ट्रान्सिस्टर’वर छोटी छोटी बटणे होती. अरुण असा बटणवाला ‘ट्रान्सिस्टर’ प्रथमच बघत होता. वॉचमनने बटणे दाबली आणि ‘ट्रान्सिस्टर’ कानापाशी नेला. तो आता काहीतरी लक्षपूर्वक ऐकायचा प्रयत्न करत होता. “ हलो, मी सिक्युरिटी बोलतो आहे. एक लहान मुलगा तुमच्याकडे आला आहे. त्याला पाठवून देउ?” अरुणला गम्मत वाटली. ‘ट्रान्सिस्टर’ पण आणि वॉकी टॉकी पण.
“ जा, पण सांभाळून जा. म्हातारा लई खडूस आहे.”
अरुण बिल्डींग मध्ये शिरला. समोरच्या दरवाज्याच्या बाजूला लहान दिवे लागले होते . त्यांची उघडझाप चालू होती. ही तर लिफ्ट होती. गावात त्यावेळी केवळ एकाच बिल्डींग मध्ये लिफ्ट होती. तिथे दुसऱ्या मजल्यावर बॅंक होती आणि चौथ्या मजल्यावर पोस्टऑफिस होते. शाळेत त्यांना मनीऑर्डर कशी करायची ते शिकवत होते.त्यावेळी मनीऑर्डरचा कोरा फॉर्म फुकट पोस्टऑफिसमध्ये फुकट मिळत होता. मास्तरांनी प्रत्येकाला फॉर्म आणायला सांगितले होते. त्याचे निमित्त करून तो आणि श्री त्या पोस्टऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा तो भीत भीत लिफ्टमधून “प्रवास’ करून आले होते. पण आपल्या सोसायटीत लिफ्ट केव्हा आली? त्याच्या डोक्यांत शंकांचे चक्री वादळ घोंगावू लागले. तो बंगला, तिथले आजी आजोबा, ते केमिस्टचे दुकान, तो वॉचमन, ही लिफ्ट.हे त्याने कधीही पाहिले नव्हते, काय होतंय हेच त्याला समजेनासे झाले. केव्हा एकदा बाबांना भेटतो असे त्याला झाले. लिफ्टमधून जायचे धैर्य नसल्यामुळे त्याने जिन्याने जायचे ठरवले.एकेका ढांगेत दोन दोन पायऱ्या चढत अरुण आपल्या घरापाशी पोहोचला. दरवाज्यावर बाबांच्या नावाची पाटी होती.ती वाचून अरुणला थोडे बरे वाटले. त्याने दरवाज्याची कडी ठोकायला सुरवात केली.दरवाजा धाडकन उघडण्यात आला होता.समोर रागीट चेहऱ्याचा म्हातारा उभा होता.
“ कोण आहेस तू? बेल नाही वाजवता येत ? दरवाज्याची कडी ठोकतोस. हे पहा शाळेच्या फंडासाठी पैसे मागायला आला असशील तर एक पाई पण मिळणार नाही,” म्हातारा तिरसटपणे आवाज चढवून बोलत होता. आपल्याच घरांत आपल्यावर ओरडणारा म्हातारा बघून अरुणला राग आला.
एक पाऊल आंत टाकून अरुण म्हणाला, “ ए आई, बाबा कुठे आहेत? तो केमिस्ट म्हणतो आहे की हे औषध त्याच्याकडे नाही.आणि हे आजोबा बघ माझ्यावर ओरडताहेत.”
“ए, जरा बाहेर ये आणि टीवीचा आवाज कमी कर,” म्हातारा पुन्हा ओरडत बोलला, “ हा मुलगा बघ. सरळ आत घुसायला बघतो आहे.तुझ्या आई बाबांनी तुला मॅनर्स शिकवले नाहीत काय? नाव काय तुझे? कुठल्या फ्लॅटमध्ये जायचे आहे? कुणाला भेटायचे आहे?” त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.
समोरच्या भिंतीवर एक आरसा होता.आरश्यांत सिनेमा चालू होता.आतल्या घरांतून म्हातारी बाहेर आली. तिन
टीपाय वरून काहीतरी उचलले. सिनेमाचा आवाज बंद झाला. “ मी अरुण, बाबांनी मला औषध आणायला पाठवले होते, कुठे आहेत माझे आई बाबा? औषध काही मिळाले नाही. केमिस्ट म्हणतो आहे की हे औषध चालेल का? विचार बाबांना. पण बाबा आहेत तरी कोठे? ” अरुण घाई घाईने बोलत होता. म्हाताऱ्याने अरुणच्या हातातली चिठ्ठी ओढून घेतली.
खिशातून चष्मा काढून आजोबांनी चिठ्ठी वाचली. मग चिठ्ठी आजीला दाखवली. आजीने दिव्याच्या उजेडांत धरून वाचली. “ काय आहे ही चिठ्ठी? मला काही समजत नाही. कोण आहे हा मुलगा?”
आजोबा उत्तर द्यायच्या मनस्थितीत नव्हते.ते समोरच्या भिंतीतून दूर दूर कुठेतरी बघत होते.ते स्वतःला हरवून बसले होते.भारावलेल्या माणसासारखा त्यांचा चेहरा दिसत होता.आजी काय बोलली ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नसावे. ते ज्या जगांत पोहोचले होये तेथे सर्व काही निशब्द होते. शब्दांची देवघेव नव्हती. आकार नव्हते. होता फक्त भावनांचा कल्होळ. सुंदर, निरामय, निरागस ! त्यांना लहानग्या अरुणाचा चेहरा अस्पष्ट अंधुक दिसत होता. चाळीस पन्नास वर्षापूर्वींचा तो प्रसंग त्यांच्या मनासमोर आला. छोटा अरुण औषध आणायला म्हणून जो बाहेर पडला तो पुन्हा कधी कुठेच कुणाला दिसला नाही. अरुण म्हणजे धुक्यात विरून गेलेलं स्वप्न ठरले. जुन्या जखमेची खपली निघाली. ही जखम कधी भरलीच नव्हती. कधी भरणारही नव्हती. पण त्यांनी स्वतःला सावरले. आज अरुण असता तर तो चाळीस पंचेचाळीस वर्षाचा असता. ह्याची उमज पडल्या बरोबर त्याच्या डोक्यातील अरुणचे विचार कुठल्याकुठे गायब झाले. आता त्याची जागा भीतीने घेतली. त्यांनी छोट्या अरुणचे मनगट घट्ट पकडले. “ अरे चोरा, आत्ता आले लक्षांत. तुला कुणीतरी पढवून इकडे पाठवून दिलेले दिसते आहे. सगळ्यांचे लक्ष ह्या फ्लॅटवर आहे. कधी मी मरतो ह्याची वाट बघताहेत. मग फ्लॅट हडप करायला मोकळे.बोल ,तुझा बोलवता धनी कोण आहे तो.पळ इथून आता. पुन्हा इकडे दिसलास तर तंगड्या तोडून गळ्यांत बांधेन आणि पोलिसांच्या ताब्यात देईन.” बोलता बोलता आजोबांना धाप लागली, तोंडाला फेस आला होता. आजोबांच्या त्या अवतारामुळे अरुण पुरता घाबरला. आपण चुकीच्या घरी आलो आहोत का? आपले बाबा असे म्हातारे, डोक्याला टक्कल पडलेले, अर्धे दात गायब, आणि दमेकरी ---- हे कसे शक्य आहे? ते बाबा तर नव्हतेच. पण फ्लॅट तर आपलाच होता. दारावर बाबांच्या नावाची पाटी सुद्धा होती. अनामिक भीतीने अरुणचे पाय लटपटायला लागले. तोंडाला कोरड पडली. ही त्या पडक्या बगल्यातल्या भुताची माया असणार. हा म्हातारा म्हणजे तेच ते भूत. हा आपल्याला झपाटणार त्या आधी इथून पळायला पाहिजे.
एका क्षणांत अरुण रस्त्यावर आला. इथे जरा सुरक्षित वाटत होते.आपण अनाथ झालो आहोत अशी तीव्र जाणीव त्याला झाली. आई-बाबा कुठे आहेत त्याचा पत्ता नाही. राहायला जागा नाही. सगळे मित्र कुठे नाहीसे झाले त्यांचा पत्ता नाही. ह्या अथांग जगात आपण एकटे आहोत. त्या अवस्थेत त्याला आठवण झाली ती बबड्याची. त्याला गाठला पाहिजे. तो त्या भुताला वठणीवर आणेल. बबड्याच्या बाबांचे गॅरेज गल्लीच्या दुसऱ्या टोकाला होते.अरुणने आपला मोर्चा तिकडे वळवला.
गॅरेजमध्ये तीनचार मुले काम करत होती. त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती. सगळ्यात मोठा मुलगा कारच्या चाकाचे नटबोल्ट टाइट करत होता. त्याने अरुणकडे तुच्छतेने बघत विचारले, “ क्या चाहिये?”
अरुणने देखील जोरांत विचारले,” बबड्या कुठे आहे?”
“बबड्या ? यहा बबड्या-बिबड्या कोई नही भेटत.चल भाग.”
“ अरे , बबड्या म्हणजे बबन”
दुसऱ्या एका मुलाच्या डोक्यांत थोडा प्रकाश पडला. “अरे, उसको साबसे मिळणा होता है. अबे ए बच्चू, सिद्धा बबनराव ऐसा बोल ना. इसको साबको दिखा दो रे कोई. इधर काम खोजता होगा.घरसे भाग के आया लगता . है ना?” अरुण काही न बोलता सगळ्यांत लहान मुलाबरोबर ‘बबनराव’च्या केबिनकडे निघाला. अर्ध्या तासांत त्याचा वर्गमित्र बबड्या बबनराव झाला होता. मोठं आश्चर्य म्हणायचे.
केबिनमध्ये एक पोट सुटलेला जाडजूड माणूस हातात ‘ट्रान्सिस्टर’ घेऊन त्यातली चित्रे बघत बसला होता. (कमाल आहे आता त्यांत चित्रेही दिसत होती.)केबिनमध्ये जीप गाडीतून कंडम केलेल्या दोन सीटा टाकलेल्या होत्या. बबड्या कुठेच दिसत नव्हता. जाड्याने ‘ट्रान्सिस्टर’ वरून नजर न हलवता विचरले,”छोटू क्या काम है?”
“उस्ताद ये लडका आपसे मिळणेको मंगता है. मै भागता.” एवढे बोलून तो नाहीसे झाला.
जाड्या माणसाने अरुणकडे पहिल्यांदाच नजर टाकत विचारले,”क्या काम क्या है“
“ बबन आहे का? माझे थोडे काम होते. त्याला सांगा अरुण आला आहे म्हणून.”
बबनरावांनी त्याच्याकडे विचित्र नजरेने बघितले, “ मीच बबन. अरुण म्हणजे -- ?” बबनरावांनी डोळे मिटून डोके खाजवून आठवण्याचा प्रयत्न केला,” काय आठवत नाही बोवा. ते जाऊदे तू काय घरातून पळून आला आहेस काय? काम पाहिजे? पण पोलीसांची काही भानगड नाही ना ? च्यायला, कुणाला मदत करायला म्हणून जावे--- ” अरुणला जरा बर वाटले. बबड्याची “च्यायला “ म्हणायची सवय अजून गेली नव्हती. त्याच्या उजव्या हातावरचा गोंदलेला नागही त्याला दिसला. नवरात्रीच्या जत्रेत ते सगळे गेले होते तेव्हा बबड्याने गोंदून घेतला होता. अरुणच्या आशेला थोडी पालवी फुटली.
“मी अरुण. अरुण तळपदे.काय आठवतेय का? आपण क्रिकेट खेळत होतो गल्लीत. मी बॅटिंग करत होतो.मी सिक्स मारली तर चेंडू गेला त्या पडक्या बंगल्यांत.-----“
त्याला मध्येच अडवून बबनराव बोलले,” तुला काम करायचे असेल राहा इथे दुसऱ्या मुलांच्याबरोबर. इकडे खूप शिकण्यासारखे आहे. कारचे इंजिन म्हणजे जादूच असते------“
आपणच मूर्ख आहोत. ज्या बबड्याला साधा अकराचा पाढा कधी पाठ करता आला नाही त्याची स्मरणशक्तीची परीक्षा घेतली आपण.
रस्त्यावर आल्यावर तो वाट फुटेल तिकडे जायला लागला. खिशांत एक दमडी पण नाही. पोटांत कावळे कोकलायला लागलेले. आता एकच आशा होती. कुठेतरी रस्त्याच्या बाजूला पडून झोपून जावे. सकाळी आईच्या कुशीत जागे होऊ तेव्हा हे भयाण स्वप्न संपलेले असेल. शहराचा परिचित भाग मागे पडला होता. अरुणला त्याची तमा नव्हती. चालता चालता कुठेतरी थकून पडलो की तिथेच झोपून जाऊ इतकाच विचार त्याच्या डोक्यांत होता.
इतक्यांत एक टक्कल पडलेला, अंगावर कुठेही केसाचा मागमूस – अगदी भुवईसुद्धा नसलेला एक जण्टलमन त्याला आडवा आला. त्याने उंची सूट परिधान केला होता. टाय सकट. डोळ्यावर काळा चष्मा होता. रात्रंदिवस काळा चष्मा घालणाऱ्या लोकांची अरुणला लहानपणापासून भीती बसली होती. त्यातून हा टकल्या. पण तो जेव्हा बोलला तेव्हा त्याचा आवाज गोड होता, “ तुझ नाव अरुण. अरुण तळपदे.” त्याला उत्तराची अपेक्षा नव्हती. त्याने कोटाच्या खिशातून तसलाच ‘ट्रान्सिस्टर’ बाहेर काढला. त्यावरून एक नजर फिरवली. पुन्हा त्याने अरूणकडे निरखून बघितले.तो स्वतःशी पुटपुटला,” सगळे काही मॅच होतंय.”
“ अरुण, तुझ्याकडचा तो चेंडू –तो माझा आहे – तो मला दे. हा चेंडू तुझा आहे. तो घे. बापरे केव्हढी उलथापालथ झाली होती. मला बॉसला एक्सप्लेनेशन देता देता नाकीनउ आले. बर झाले तू लवकर भेटलास. नाहीतर माझी अपघात खात्यांत बदली झाली असती. तुमच्या गल्लीतले लोक पण असेच आहेत. मागे ते पुरोहित काका. तीन दिवस मी त्यांना शोधत होतो. शेवटी सापडले एकदाचे. भूतकाळात रममाण झाले होते. वर्तमानांत यायला तयारच नव्हते. तुम्ही लोक फार विचित्र आहात बुवा. तुम्हाला भूतकाळांत तरी नाहीतर भविष्यकाळांत रहायला आवडते. कुणीही वर्तमानांत रहायला तयार नाही. आहे की नाही मोठी गंमत! ”
अरुणला पुरोहित काका आठवले. ते एकाएकी नाहीसे झाले होते.सगळीकडे शोधले त्यांना. मग तीन दिवसांनंतर एकदम घरात प्रगट झाले होते. त्यांना काहीही आठवत नव्हते.
“तुम्ही विश्वाच्या स्टॅबिलिटीवरच हल्लाबोल करता,” काळाचष्मावाले अंकल पुढे बोलले “ आणि आमच्याकडे इमर्जेन्सी .”
त्याने अरुणच्या हातातून चेंडू हिसकावूनच घेतला आणि अरुणला त्याचा चेंडू परत दिला. “ माझीपण चूकच झाली. मी त्या पडक्या बंगल्यात जायलाच नको होते. तिथल्या म्हाताऱ्याच्या भुताची ट्रान्सफर झाली होती पण तो तिथून जायलाच तयार नव्हता. त्याला समजावता समजावता नाकीनउ आले. शेवटी राजी झाला. पण त्या झमेल्यांत माझा हा रिमोट तिथेच हरवला होता..चल अरुण आभारी आहे. मला जायला पाहिजे. अजून एका सोलापूरच्या म्हाताऱ्याची केस मला अॅलोट झाली आहे आत्ताच . तो पंढरपूरला विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनाला गेला होता. तेथे जिवाशिवाची उरोउरी भेट झाली आणि तो जो हरखला तो हरवलाच! अजून पत्त्या नाही. पण जायच्या आधी तुझी मेमरी ठीकठाक करायाला पाहिजे. नाहीतर लोक तुला वेड्यात काढतील. हा इथे असा समोर उभा रहा.” त्याने रिमोटचे बटण दाबले. एकदम हजारो सूर्यांच्या प्रकाशापेक्षा जास्त प्रखर प्रकाशाने आसमंत उजळून निघाले.
-------------------------------------------
अरुणने कंपाऊंडवरून अलगद उडी मारली. त्याचे मित्र वाटच बघत होते.
श्री ओरडला, “किती वेळ खाल्लास, आम्हाला वाटले की तू त्या म्हाताऱ्याच्या भूताबरोबर झिम्मा फुगडी खेळत बसला आहेस.” बबड्या पण त्याच्या सुरांत सूर मिसळवत म्हणाला, “ चला, खेळ सुरु करा.”
“ अरे बापरे,” अरुणला एकदम बाबांच्या औषधाची आठवण झाली, “ ए मी बाबांचे औषध घेऊन येतोच,तुम्ही खेळायला सुरवात करा. मी हा आलोच.”
त्याने केमिस्टच्या दुकानाकडे धाव घेतली.
विश्वात जे व्हायचे ते बिनधास्त चालू होते.एक तरंग उठला होता. तो विरून शांत झाला.

.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"युआर" (UR) आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"?"
Daya, कुछ तो गडबड है.
I am not U R आठवले.
My name is Prabhudesai. Mukund Prabhudesai!
And I am a Writer.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक शंका:
मोठ्या झालेल्या (भविष्यातील) बबड्याला लहानपणीचा (त्याचा बालमित्र) अरुण ओळखता येईल.
तो त्याला अनोळखी माणसासारखा ट्रीट का करेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहो नील, यू लव्हेबल रास्कला!!
ओळखले नाही मला? कमाल आहे तुमची. अरे ( सॉरी -अहो ) काही दिवसापूर्वीच तू ( सॉरी –तुम्ही ) मला आणि माझ्या आईबांना दादर TT पासून फाऊनटनला घेऊन गेला होता. मी मागे आईबाबांच्या मध्ये बसलो होतो. मी तुम्हाला पाहताक्षणीच ओळखले आणि बाबांना म्हणालो, ” बाबा हा पहा नील, माझा शाळेतला मित्र. आपल्या घरी यायचा. त्याला श्रीखंडाच्या गोळ्या खूप आवडायच्या म्हणून तुम्ही एका डब्यांत गोळ्या भरून ठेवल्या होत्या त्याला द्यायला. आठवतं तुम्हाला?”
ते ऐकून तुम्ही हसायला लागला. इतका हसलात की चौकातला लाल सिग्नल तोडून टक्सी घुसवलीत. थँक गॉड दुपारची वेळ होती, पोलीस नव्हता. तुम्ही काय म्हणालात बाबांना आठवतंय ? नाही आठवत ना! मी सांगतो तुम्ही म्हणालात,” किती गोड मुलगा आहे तुमचा! “
बाबांनी आले रडगाणे सुरु केले,” कसला गोड? गधडा, आता तुमच्या वयाचा असायला पाहिजे होता. ह्याला काय रोग झाला आहे कुणास ठाऊक. जगातल्या कुठल्याही डॉक्टरला समजत नाही. आता एका parapsychologistला दाखवले तेव्हा त्याने तपासणी करून निदान केले की ह्याची सायन्स फिक्शन लिहायची आंतरिक इच्छा दाबली गेली आहे. त्याला कथा कादंबरी लिहू द्या. मग कदाचित त्याच्यात फरक पडेल. तिकडेच दाखवायला घेऊन चाललो आहोत.”
फाऊनटनला उतरताना तुम्ही माझा गालगुच्चा घेऊन एक पार्ले जी हातांत टिकवले आणि बाबांना सांगितले, “ ह्याने काही लिहिले तर तिकडे आपले “ ऐसीतैसी “ म्हणून आहे तिकडे छापा.”
पहा तुम्हाला हेही आठवत नाही मग आपण लहान असताना गल्ली क्रिकेट खेळत होतो ते आणि त्या श्रीखंडाच्या गोळ्या कश्या आठवणार? माफ करा पण तुम्ही पॉइंट काढला म्हणून---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुण गायब होतो तो काळ आणि ज्यात प्रकटतो तो काळ... ही साधारणतः कोणती वर्षे (इ.स.) असावीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mitron, aap chronology samajhiye
from 1960 to 2000 and back to 1960 (aproximately)
चूक भूल देणे घेणे.
अरुणची काही मिनिटे म्हणजे इतरेजनांची चाळीस वर्षे.
Story is based on Twin paradox.
थोडे आम्हाला पण स्वातंत्र्य द्याना राव! शेवटी ही एक फँटसी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0