संसर्गाख्यान: भारतीय परंपरा व इतिहासात रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

संसर्गाख्यान: भारतीय परंपरा व इतिहासात रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र

- शैलेन

करोनाव्हायरसची साथ येऊन तिने 'महासाथी'चे रूप धारण केले आणि अवघ्या मानवजातीची कोंडी झाली. लॉकडाऊन, विलगीकरण, जंतुविनाश (disinfection), संपर्कशोध (contact tracing) इत्यादी बाबी नेहमीच्या जीवनशैलीचा भाग होऊन बसल्या. वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकमेकांशी जोडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या जगात असे सूक्ष्म जीव काय हाहाःकार माजवू शकतात याचा वस्तुपाठच आपण अनुभवत आहोत. पण त्याबरोबरच हेही खरे आहे की, अशा प्रकारच्या आजाराच्या साथी काही मानवतेला अगदीच अज्ञात आहेत अशातली बाब नाही. असे प्रसंग मानवजातीवर आपल्या पंधराएक हजार वर्षांच्या इतिहासात अनेकदा येऊन गेल्याचे आपल्याला दिसते. किंबहुना, आज जसे 'संपर्कशोध' किंवा 'विलगीकरण' यांच्यासारखे शब्द जणू परवलीचेच बनले आहेत, तसेच सामाजिक प्रकारचे उपाय करून त्याद्वारे साथींना ताब्यात आणण्याचे प्रयत्नही सुमारे पाच-सहाशे वर्षांपासून मानवाला ज्ञात आहेत. काही प्रकारचे रोग एकाला झाले की दुसऱ्यांनाही होतात, ही संसर्गशीलतेची जाण आणि त्यावर उपाय म्हणजे जिथे प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणापासून दूर जाणे, रुग्ण लोकांपासून वेगळे राहणे हा आहे ही उमग, या दोन्ही बाबींचे पुरावे मध्ययुगापासूनच मानवजातीला ज्ञात आहेत असे दिसते.

पण असे असले तरी माणूस 'आजारी पडतो' म्हणजे नक्की काय होते याचे शास्त्रीय ज्ञान, जसे आज आपल्याला आहे, तसे पूर्वकालीन मानवांना निश्चितच नव्हते. त्यांना फक्त लक्षणे - वेदना होणे, जुलाब-वांत्या होणे, ताप चढणे, त्वचेचा रंग किंवा स्वरूप (पुरळ, पुटकुळ्या किंवा क्षते निर्माण होऊन) बदलणे म्हणजेच 'रोग' होणे; आणि त्या लक्षणांपासून मुक्तता होणे म्हणजेच 'बरे वाटणे' इतकीच रोगांच्या बाबतीत प्राथमिक समज होती. साहजिकच ही लक्षणे कशी आणि का उत्पन्न होतात, त्यांच्यामागे काय कारणे असू शकतात याचा विचार करण्यापेक्षा त्यांचा उपशम कसा होईल हे बघणे म्हणजेच त्यांच्यावर इलाज करणे अशी सर्वसामान्य समजूत होती. लक्षणे निर्माण होणे, म्हणजे आरोग्यापासून अनारोग्याकडे वाटचाल होणे, याला कारणीभूत ज्या काही गोष्टी समजल्या जात, त्यात देवता आणि त्यांचे प्रकोप हे एक महत्त्वाचे कारण होते. या कारणाद्वारे एकंदरीतच आरोग्यकल्पनेची सांगड 'धर्मा'शी, आणि पर्यायाने धर्माच्या समाजशास्त्राशी घातली जात असते, आणि म्हणूनच आधुनिक मानववंशशास्त्राच्या अंगाने धर्माचा, आरोग्यकल्पनांचा, आणि एकंदरीतच समाजाचा इतिहास अभ्यासणाऱ्या संशोधकांना या बाबी विशेष अभ्यासण्यासारख्या वाटतात. या लेखात अशाच काही दैवतांचा आपण आढावा घेणार आहोत.

रोगराईवर उपाययोजना म्हणजे औषधे, आणि जगभरातल्या संस्कृतींत पूर्वकालिक मानवसमूहांना या बाबतीत परंपराजन्य सांस्कृतिक ज्ञान होते. भारतात तर याबाबत आयुर्वेदासारखे 'शास्त्र'ही विकसित झाले होते. पण या लेखात औषधांचा थेट विचार करायचा हेतू नाही. म्हणजे 'वैद्यक' या दृष्टिकोनातून इतिहासकालीन मानव या रोगांकडे कसे पाहात हा आपल्या चर्चेचा विषय नाही. त्या ऐवजी, एकंदरीत सांस्कृतिक बाबी, आणि विशेषतः धर्म-दैवतकल्पना आणि संसर्गजन्य रोग, यांचे एकमेकांशी कसे धागेदोरे जुळतात ते आपण पाहू. हे धागेदोरे उलगडताना आपण लेखी साधनांपेक्षाही भौतिक साधनांकडे अधिक लक्ष पुरवणार आहोत आणि अर्थातच भारतीय संस्कृती आणि परंपरा हे आपल्या चर्चेचे मुख्य प्रेक्ष्य राहणार आहे.

आजारी पडलेल्या माणसांचे आरोग्य पुन्हा पूर्ववत व्हावे म्हणून जे काही सांस्कृतिक उपाय केले जात त्यांपैकी दोन 'उपचार-कल्पना' महत्त्वाच्या होत्या; आणि त्यांमागे हे रोग मुळात होतातच का, त्याबद्दलच्या काही सांस्कृतिक समजुती किंवा कल्पना कारणीभूत होत्या. सर्वसाधारणपणे माणसाचे आरोग्य बिघडण्याला देवतांचा प्रकोप कारणीभूत मानला जाई, पण हा प्रकोप या देवता कुठल्या प्रकारे दर्शवतात याबद्दलच्या समजुतीही त्यांच्या उपशमनाशी निगडित असत. तसेच, हा प्रकोप होण्याची कारणेही उपशमनाशी जोडलेली असत कारण प्रकोप आणि लक्षणे यांच्यात अर्थातच कार्यकारणभाव कल्पिला जाई. काही देवता या त्यांच्या प्रकृतीमुळे प्रकोपकारक मानल्या जात. उदाहरणार्थ, काही देवतांना माणसांची 'भूक' लागे आणि त्याचा परिणाम म्हणून त्या एखाद्या व्यक्तीला ग्रासत. काही देवता 'अपमानग्रस्त' झाल्यास प्रकोपित होत आणि त्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य धोक्यात आणत. अपमान होण्यामागे देवतेची अमर्यादा - मग ती त्या देवतेचे 'अधिक्षेत्र' अनवधानानाने किंवा जाणीवपूर्वक आक्रमल्यामुळे झालेली असो, किंवा त्या देवतेच्या श्रद्धासंभारातला एखादा नियम न पाळला गेल्याने झालेली असो - हा एक मोठा भाग असे. अशा प्रकारांतून उत्पन्न झालेल्या रोगांसाठी अर्थातच त्या देवतेची प्रार्थना-अर्चना करून तिचा प्रकोप 'शांत' करणे हा उपाय योजला जाई.

अशा उपशमनाच्या उपायात 'सहभावात्मक यातुकल्पना' म्हणजेच इंग्रजीत ज्याला 'सिम्पथेटिक मॅजिक' म्हणतात, त्या कल्पनेच्या आधारे रचलेल्या विधींचा मोठा सहभाग होता. या कल्पनेच्या मागचे मानसिक आकलन तसे सोपे आहे - एखादा परिणाम आपल्याला इष्ट वाटत असेल तर त्या परिणामाची सिद्धता ज्याच्यापासून होते अशा गोष्टींनी युक्त विधी करणे ही मूलभूत कल्पना. याचे अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे प्रागैतिहासिक मानवांच्या कलेमध्ये आणि अस्तित्त्व-आकलनामध्ये वारंवार दिसणारे शिकारींशी संबंधित विधी. शिकार मानवांच्या अस्तित्वासाठी अनिवार्य अशी गोष्ट होती, पण त्याचबरोबर ती खात्रीलायक रीत्या यशस्वी होईलच याची कुठलीही शाश्वती मानवांना त्या शिकारीवर निघण्यापूर्वी नसे. मग ती यशस्वी व्हावी, यासाठी ती तशी झालीच आहे असे सूचित करणारे विधी शिकारीवर निघण्यापूर्वी केले जात. या विधींची सिद्धता जरी वर्तमानात केली जात असली, तरी त्यांचा इच्छित परिणाम हा भविष्यकालीन आणि म्हणूनच अज्ञात असे, सबब या विधीतले वास्तव हे 'जादुई' असे. अशा विधींच्या सिद्धतेत एक 'कारक' देवता - जिच्यात तो इच्छित परिणाम आणण्याची शक्ती कल्पिली जाई - आणि तिच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे 'पोचण्याचे' मार्ग या दोन बाबींचा मुख्य सहभाग असे. कारक देवता मानवी हस्तक्षेपाच्या आधीन करण्यासाठी तिची प्रार्थना, अर्चना, तुष्टी आणि / किंवा मंत्रासारख्या एखाद्या शाब्दिक माध्यमातून तिच्या अनारोग्यकारक प्रभावाचे निराकरण या मुख्य बाबींचा आधार विधींच्या रचनेत केलेला आपल्याला दिसतो.

या सिद्धसाधक मार्गांपैकी मंत्रांचा मार्ग आपल्याला पार वैदिक काळापर्यंत मागे घेऊन जातो. अथर्ववेद हे अशा मंत्रांचे भांडारच आहे. इथे आपल्याला असेही अनेक मंत्र आढळतात की, जे रोगाच्या कारक देवतांना कल्पिण्याऐवजी त्या रोगालाच उद्देशून म्हटलेले आहेत. अथर्ववेदाच्या पहिल्या कांडात बारावा मंत्र पावसाबरोबर येणाऱ्या साथीच्या तापाला उद्देशून म्हटलेला आहे. त्यात या तापाला रक्तवर्णी, माजलेल्या बैलाची उपमा दिली आहे. तो त्रिधा प्रकारे पीडा उत्पन्न करतो - त्याने सांधेदुखी, डोकेदुखी आणि तापलेल्या अंगामुळे उत्पन्न होणारा शोष असे परिणाम होतात. परंतु या तापाच्या शमनार्थ त्याला हविर्भाग देण्यापलीकडे आणि या ऋचेच्या शेवटी “माझे उत्तरांग शमन पावो, माझे अधरांग शमन पावो; माझे चारही अवयव/अंगे शमन पावोत आणि माझे पूर्ण शरीर शमन पावो” अशी प्रार्थना करण्याव्यतिरिक्त इथे कुठलाही विशिष्ट देवतासूचक विधी सांगितलेला नाही. याच कांडाच्या पंचविसाव्या ऋचेत 'तक्मा' अथवा शीतज्वराचे निवारण करण्याच्या मंत्र येतो. तिथे मात्र अग्नी हा देव आप म्हणजे पाणी-तत्त्व आक्रमतो हे या रोगाचे कारण दर्शवले आहे. अंगाचा दाह करणारा, पिवळा ज्वलंत रंग असणारा हा अग्नी तशीच लक्षणे तापातही दाखवतो हे या मंत्रात नोंदले आहे. अशी लक्षणे असलेल्या हे शीतज्वरा, तू आम्हांला सोडून तुझ्या मार्गाने जा अशी तक्म्याची प्रार्थना इथे केलेली दिसते, तसेच ऋचेच्या शेवटी एक दिवसाआड ज्वराची प्रवृत्ती होणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण असल्याचेही म्हटले आहे. या लक्षणांवरून इथे शीतज्वर उर्फ तक्मा म्हणजे मलेरिया असावा असे वाटते. पाचव्या कांडातल्या चौथ्या ऋचेत या तक्मा रोगावर उपयुक्त औषध म्हणून 'कुष्ठ' नावाच्या वनस्पतीचा उल्लेख आला आहे. कुष्ठ हा देवांचा आवडता, 'सोम' या वैदिकांच्या आवडत्या द्रव्याचा सखा आणि तक्मनाशक आहे. 'माझ्या श्वासाचाही तू सखा हो आणि माझ्या डोळ्यांवाटे रोगहारक वायू माझ्या शरीरात सोड' अशी कुष्ठाची प्रार्थना या ऋचेत केलेली आहे. पुढे एकोणिसाव्या कांडातल्या एकोणचाळिसाव्या ऋचेत कुष्ठाची आणखीही बरीच स्तुती केलेली आढळते - कुष्ठ हा आदित्य, भृगु, अंगिरस आणि विश्वेदेव यांच्यायोगे प्रत्येकी तीनदा जन्माला आला; त्याच्या आईवडिलांची नावे, अनुक्रमे, जीवल आणि जीवला अशी होती; त्याचे जन्मस्थान दैवी अश्वत्थ वृक्ष आहे; तो सगळ्या रोगांना दूर करतो; तो तापाला आळा घालतो वगैरे तपशील इथे आलेले आहेत. पाचव्या कांडातल्या बाविसाव्या ऋचेत तक्म्याच्या विनाशासाठी एका विधीची रचना येते. इथे आपल्याला अग्नी, सोम, वरुण, हे देव तसेच बर्हि नावाचे गवत, वनस्पतींचा खल करण्यासाठी आवश्यक असणारी सामुग्री आणि वेदिका यांचा उल्लेख आढळतो. या विधीतल्या मंत्रांत आपल्याला रोग्याच्या शरीराचे निस्तेज पिवळेपण आणि त्याच्या अंगावर उठणाऱ्या लालसर पुरळाचाही निर्देश आढळतो. तक्मा कधी शीत, कधी दाहक, कधी खोकल्यासह येतो, आणि त्याच्यामुळे रोग्याला थरकाप भरतो. ही लक्षणे म्हणजे तक्म्याचे 'बाण' आहेत आणि त्यांच्या योगे तो रोग्याला विद्ध करतो, अशी कल्पना या ऋचेत केलेली आहे. तक्मा मूजवत पर्वत आणि बाल्हिक देशांतून येतो आणि त्याने तिथेच परत जावे अशी त्याची प्रार्थना इथे येते. तिथे राहणाऱ्या मूजवन आणि महावृष लोकांना तू ग्रास पण आमच्या वाटेला जाऊ नकोस अशीही तक्म्याची प्रार्थना या ऋचेत केलेली आहे.

वैदिक वाङ्‌मयात ताप किंवा तत्सम संसर्गजन्य रोगांचे उल्लेख येतात, ते प्रत्यक्ष कारक देवतांच्या उल्लेखाशिवाय हे आपण पाहिलेच. मग कारक देवता आणि रोगांचा संबंध नक्की कधीपासून लावण्यात येऊ लागला हा प्रश्न साहजिकरीत्या आपल्या मनात उभा राहतो. पुष्कळशा कारक देवता या आजही 'लोक'देवता म्हणूनच वावरत आहेत हे लक्षात घेता या संबंधांच्या अभ्यासासाठी आपल्याला 'मार्गी' म्हणजे स्पष्टपणे उल्लेख असणाऱ्या ग्रंथांकडे न वळता 'देशी' अथवा 'लोकतत्त्वा'त्मक अभ्यासाकडे वळले पाहिजे हे उघड आहे. हा अभ्यास अतिशय गुंतागुंतीचा असतो, कारण यात दैवतविश्व, श्रद्धासंभार (म्हणजेच, 'श्रद्धा' हा विषय केंद्रस्थानी ठेवून सामाजिकतेत होत जाणारे गुणात्मक बदल), विधियोजना इत्यादी गोष्टी या सामाजिक जडणघडण, उलथापालथी, अभिसरण इत्यादी बाबींशी जोडलेल्या असतात. सामाजिक घटकांची वर्णचौकटीतली गतिशीलता, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांना फुटणारे सामाजिक धुमारे अशा सगळ्या बाबींचा परिणाम या दैवतशास्त्रीय अभ्यासात उद्भवत असतो. देवतांचे उन्नयन, किंवा अवनयन म्हणजे एका परीने त्यांचे ठराविक काळात 'फॅशनेबल' होणे, किंवा न होणे, आणि त्यातून त्यांच्या श्रद्धाविश्वात होणारे महत्त्वपूर्ण बदल हेही आपल्याला इथे तपासावे लागतात. लोकतत्त्वातल्या देवतांचे सामाजिक महत्त्व वाढीस लागले की, त्यांचे उन्नयन होते. एखाद्या लोकदेवतेचे मग शिव, शक्ती किंवा विष्णू यांच्यासारख्या श्रद्धासंभारात्मक दृष्ट्या 'उच्च' किंवा परंपरेशी अधिक घट्टपणे जुळलेल्या दैवताचा 'अवतार' म्हणून नव्याने रूपांतरण होते. अर्थातच, अशा सामाजिक प्रक्रिया काही अचानक होत नसतात - त्यांच्यामागे अनेकदा शतकानुशतकांच्या संथ सामाजिक अभिसरणाची पार्श्वभूमी असते. या सगळ्या प्रक्रियांचा आढावा इथे पूर्णपणे घेणे (अर्थातच) विस्तारभयामुळे करता येणार नाही, पण आपण विवक्षित दैवतांकडे, विशेषतः त्यांची दैवत-वैशिष्ट्ये, उपासना आणि रोगलक्षणे किंवा प्रसार, यांच्या भिंगातून दृष्टिक्षेप टाकू. अशा दैवतांची आराधना आणि उपासना भारतभर वेगवेगळ्या रूपांत चालत आलेली आहे, आणि त्यामुळे त्यातही प्रचंड वैविध्य आहे. सगळ्याचाच आढावा घेणे इथे आपल्याला शक्य होणार नाही, पण काही विवक्षित रूपे आणि त्यांचे भौतिकी संबंध यावर आपण आपली नजर ठेवायची आहे.

संसर्गजन्य रोगांपैकी आता मानवजातीच्या (कर्तबगारीने आणि) सुदैवाने इतिहासजमा झालेला भयानक रोग म्हणजे 'देवी' - या रोगाच्या नावातच दैवताचा आभास आहे! ताप, अंगावर उठणाऱ्या लक्षावधी पुटकुळ्या, त्यांच्या फैलावामुळे उत्पन्न होणारा कमालीचा विद्रूपपणा आणि सुटका न झाल्यास वेदनादायी प्रकारे येणारा मृत्यू ही या रोगाची प्रमुख लक्षणे होती. महाराष्ट्रात या रोगाला 'मोठ्या बाया' या नावाने संबोधले जात असे. (कांजिण्या या सर्वसाधारणपणे अशीच लक्षणे असलेल्या पण देवीच्या मानाने पुष्कळच निरुपद्रवी असलेल्या रोगाला 'लहान अथवा धाकट्या बाया' म्हणत.) अंगाचा तापामुळे होणारा शोष किंवा दाह हे या रोगाचे मुख्य लक्षण असल्याने ते दूर करणारी देवता म्हणजे 'शीतला' ही या रोगाची अधिष्ठात्री मानली जाई. या नावात आपल्याला रोग आणि लक्षणातला परस्पर-संबंध, तसेच त्याच्या उपशमनाचा मार्ग यांची सांधण घातलेली दिसते. देवीचा रोग झालेल्या रोग्याला शीतला अक्षरशः कवेत घेते किंवा झपाटते असा समज असे. त्यामुळे रोगी म्हणजेच खुद्द ही देवी असे समजले जात असे. (रोगाच्या नावात याच समजुतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते.) सबब, उपशमनाचे विधी अनेकदा रोग्याच्या सान्निध्यात केले जात, जे दुर्दैवाने या रोगाचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरे. शीतलेला प्रसन्न करायचे मार्ग म्हणजे थंडावा देणारे सर्व उपाय. यात अर्थातच पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. कलशात पाणी भरून ते रोग्याच्या डोक्यावरून ओवाळून घेऊन मग त्याची विधिवत स्थापना करायची आणि त्याचे पूजन करायचे असा हा विधी असे. देवी हा विषाणूंनी निर्माण होणार आजार असल्याने ठराविक काळाने त्याची लक्षणे उतरणीला लागत. ही उतरण लागली, रोग्याचा ताप गेला आणि त्याच्या पुटकुळ्यांवर खपल्या धरू लागल्या म्हणजे शीतलेच्या 'निर्गमना'चे विधी केले जात. यात रोग्याला (म्हणजेच पर्यायाने देवीला) आंघोळ घातली जाई. तो पुजलेला पाण्याचा कलश मिरवणुकीने नेऊन विसर्जित केला जात असे - म्हणजेच शीतला किंवा 'मोठ्या बाया' कायमच्या 'थंड' केल्या जात. मिरवणुकीत कोणाच्या तरी अंगात इतर शक्तीरुपी देवी येणे आणि तिने मिरवणुकीला 'दिशा' दाखवणे यासारखे प्रकारही होत.

देवीच्या रोगाच्या संबंधात मृत्यू तसेच विटाळ म्हणजेच अस्वच्छता यांचा मोठा वाटा असल्याने शीतलेच्या मुख्य लक्षणांत कुंचा किंवा झाडू आणि कचरा गोळा करायची सुपली यांचा समावेश झाला.
बंगाली 'कालीघाट' शैलीतले गाढवावर बसलेल्या आणि हातात झाडू, सुपली घेतलेल्या शीतला देवीचे पटचित्र
बंगाली 'कालीघाट' शैलीतले गाढवावर बसलेल्या आणि हातात झाडू, सुपली घेतलेल्या शीतला देवीचे पटचित्र, १९वे शतक (विकिमीडिया कॉमन्स)

नेमक्या याच लक्षणांनी मंडित अशी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी किंवा 'ज्येष्ठा' असल्याने महाराष्ट्रात शीतला हीसुद्धा लक्ष्मीशी संबंधित देवी गणली जाते. देवीच्या रोगात अंगावर उठणाऱ्या पुळ्यांचे रूप अर्धवर्तुळाकृती डाळीच्या बिरड्याप्रमाणे असल्याने, तशीच दिसणाऱ्या खरोखरच्या डाळीचाही अंगीकार शीतलेने केलेला असतो. डाळीने भरलेला कुंभ हेही तिचे एक लक्षण आहे. तिचे मृत्यूशी असणारे जवळचे नाते हे तिच्या वाहनावरून दिसते - ती गाढवावर आरूढ झालेली असते, आणि गाढव हे अष्टदिक्पालांपैकी, निर्ऋती या मृत्यूच्या दिशेशी संबंधित असलेल्या दिक्पालाचेही वाहन आहे. एकंदरीत, रोग, त्याची लक्षणे तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या सामाजिक बाबी आणि समजुती यांचा सर्वंकष समावेश कारक दैवताची दैवतशास्त्रीय रूपात कल्पना करण्यात कसा होतो त्याचे मनोज्ञ दर्शन आपल्याला शीतलेच्या रूपात झालेले दिसते. आज देवीच्या रोगाचे निर्मूलन झाले असले तरी मुंबईसारख्या शहरातही आपल्याला 'मोठ्या बायां'ची मंदिरे दिसतात आणि तिथे या देवींचे उन्नयन आणखी 'उच्च' प्रकारच्या शक्तीरूपी देवींत झालेले दिसते. मुंबईतले कोळीवाडे किंवा जुनी गावठाणे यांच्या सीमांवर ही देवळे आहेत. कोळीवाड्यांमध्ये पुजल्या जाणाऱ्या देवी आता 'एकवीरा' देवीत संमिलीत झाल्या आहेत, तर माहिमसारख्या मध्यमवर्गीय ठिकाणातले 'शीतलादेवी मंदिर' हे बहुशः सारस्वत ब्राह्मण ज्ञातीच्या दुर्गारूपात बदललेले आहे.

संसर्गजन्य रोगांचे मुख्य बळी म्हणजे बालके, कारण त्यांची शारीरिक स्थिती बऱ्यापैकी नाजूक, आणि रोगप्रतिकारशक्तीही तशी मर्यादितच असते. मातेच्या दुधातून प्राप्त होणाऱ्या प्रथिनांतून काही प्रमाणात त्यांना 'किक स्टार्ट' मिळू शकतो पण तरीही बालमृत्यूंचे प्रमाण पूर्वाधुनिक समाजांत पुष्कळच जास्त होते. देवीसारख्या भयानक रोगांचे मुख्य बळी बालकेच असत. बालकांना ग्रस्त करणाऱ्या रोगांसाठी त्यामुळे विशिष्ट दैवत-प्रणालीची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. या दैवतांना 'बालग्रह' म्हणजे 'बालकांना ग्रासणारे' असे म्हटले जाते. सुप्रसिद्ध सामाजिक संशोधक आणि संशोधन-तथ्ये तितक्याच तन्मय आणि वेल्हाळ भाषेत मांडणारे लेखक कै. रा. चिं. ढेरे यांनी बालग्रह दैवतांच्या बाबतीत मूलगामी मांडणी केली आहे, जी आपल्याला त्यांच्या 'लोकदैवतांचे विश्व' या पुस्तकातल्या काही प्रकरणात वाचायला मिळते. ज्या रोगांचे कारक म्हणून हे बालग्रह ओळखले जातात, त्यांपैकी अनेक रोग संसर्गजन्य रोग आहेत. वर आपण शीतलेच्या उदाहरणात पाहिले, त्याप्रमाणेच इथेही रोगांची लक्षणे आणि या दैवतांचे स्वरूप यात अन्योन्यसंबंध आपल्याला दिसतो. किंबहुना, ढेरे यांचे विवेचन आणि विश्लेषण या बाबतीत काहीसे कमी पडले आहे. त्यांच्या संशोधनातून 'भाष्यकारांते वाट पुसैतु” या दृष्टीने बालग्रहांचा मागोवा इथे आपण घेऊ, पण त्याचबरोबर काही गोष्टी त्यांच्या निरीक्षणातून सुटल्या आहेत त्याही बघू, म्हणजे एकंदरीतच बालग्रह आणि त्यांना अनुषंगित काही दैवतशास्त्रीय तथ्ये यांचा पूर्णत्वाने आढावा आपल्याला घेता येईल.

बालकांचे आरोग्य हा प्राचीन आरोग्यविषयक वाङ्मयाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. आयुर्वेदाच्या विविध संहितांपैकी 'काश्यप संहिता' ग्रंथात 'कौमारभृत्य' म्हणजेच बालकांच्या आरोग्याविषयी तपशीलवार चर्चा आपल्याला आढळते. अर्थात ही चर्चा आपल्या आजच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे 'शास्त्रीय' म्हणता येईल अशी नाही, कारण रोगांच्या लक्षणांचा उपशम म्हणजेच रोगापासून मुक्ती अशी कल्पना जिथे बद्धमूल असते तिथे आधुनिक 'शास्त्रार्था'चे उपयोजन करणे चूकच ठरेल. या विचारसरणीमुळेच नाना प्रकारच्या औषधांबरोबरच रोगांच्या कारक देवता अस्तित्वात आहेत आणि त्यांची प्रार्थना-अर्चना केल्यामुळेही रोगांची लक्षणे दूर होतात, अशासारख्या कल्पनांचे प्रतिबिंब या 'शास्त्रीय' म्हणवणाऱ्या ग्रंथांत आपल्याला दिसू शकते. त्यामुळेच वरकरणी 'शास्त्रीय' म्हणवणाऱ्या प्राचीन भारतीय वैद्यक ग्रंथातही अशा देवता, त्यांची वर्णने आणि त्यांनी रोग्याला 'झपाटल्या'ची लक्षणे इत्यादी बाबींचे विवरण आपल्याला अशा ग्रंथांत दिसते. ढेरे यांनी त्यांच्या नेहमीच्या 'साक्षेपी' पद्धतीने याला एका परीने प्राचीन वैद्यकशास्त्राच्या तत्कालीन मर्यादाच संबोधले आहे.

बालग्रहांची नीट ओळख आपल्याला सुश्रुत संहितेच्या सहाव्या 'स्थाना'तल्या म्हणजे 'उत्तर तंत्र' या भागातल्या २६ ते ३७ या अध्यायांत मिळते. 'कौमारभृत्यतंत्र' हे या भागाचे नाव आहे. इथे नऊ प्रकारचे बालग्रह उल्लेखले आहेत ('नवग्रह' या परिचित कल्पनेचा पगडा बहुधा यात पडला असावा). यांची नावे स्कंदग्रह, स्कंदापस्मार, शकुनी, रेवती, पूतना, अंधपूतना, शीतपूतना, मुखमंडिका आणि नैगमेष अशी आहेत. माता किंवा दाई (धात्री) यांची वागणूक बालके स्तन्यपुष्ट असताना 'नीट' राहिली नाही तर यांची अवकृपा बालकांवर होते असे सुश्रुत सांगतात. हे ग्रह बालकांना पछाडतात कारण त्यांची शांती झालेली नसते, आणि त्यांचा प्रभाव दूर करायला त्यांना विविध प्रकारे संतुष्ट करणे हाच एक मार्ग असतो. बालके घाबरणे, दचकणे, सतत रडणे, त्यांना उचकी लागणे वगैरे बाबींनी यांची लक्षणे दिसू लागतात आणि पुढे मग त्यांचे विवक्षित ग्रहांच्या पछाडण्यावरून वर्गीकरण करता येते. उदा. शकुनीने बाधित लहान मुलांचे अवयव निश्चेष्ट पडतात आणि त्यांना 'पक्ष्या'सारखा वास येऊ लागतो. त्यांच्या अंगावर क्षते पडतात, त्यातून लस वाहते. रेवती ग्रहाने बाधित मुलांना हिरवट रंगाची शी होते, त्यांचे अंग पिवळसर दिसू लागते, त्यांना तोंडात छाले होतात आणि ताप चढतो. पूतना ग्रहाने बाधलेली मुले अंगावर पिईनाशी होतात, त्यांना 'कावळ्या'सारखा वास येतो, त्यांची त्वचा तकतकीत होते. शीतपूतनेच्या बाधेमुळे मुलांची झोप पुष्कळ वाढते, ती अत्यंत गाढ होते आणि त्यांना जुलाब होतात. अशा विविध प्रकारच्या ग्रहांच्या बाधेसाठी काय उपाय करावेत यांचे वर्णन 'कौमारभृत्य तंत्रा'च्या पुढच्या अध्यायात आले आहे. त्यांचे निरीक्षण केल्यास त्यातले बहुतांश उपाय हे 'सहभावात्मक यातुकल्पने'तून पुढे आलेले दिसतात. उदा. स्कंदग्रहाने बाधित बालकाला मोहरी, सापाची कात, उंट/गाय/मेंढी यांचे केस, काही पाले, आणि तूप यांची धुरी द्यावी. त्या बालकाच्या गळ्यात गुडूची, इंद्रवल्ली, शमी आणि बिल्वाचे काटे यांची जुडी करून बांधावी आणि वैद्याने स्वतः स्कंदाची उपासना आरंभावी, ती तीन दिवस चालवावी, त्यात बाधित बालकाच्या घरातल्या चौकात किंवा बाहेर एखाद्या चव्हाट्यावर लाल फुले, लाल कुंकू, लाल पताका आदींनी युक्त असे भाताचे बळी द्यावेत, कोंबडे कापावे आणि घंटानाद करावा. स्कंद आणि गुह यांच्या शांतीसाठी मंत्रपाठ करावा. नैगमेष ग्रहाच्या शांतीसाठी वटवृक्षाच्या तळी षष्ठी तिथीला भाताचे बळी काढावेत. मुखमंडिकेच्या तुष्टीकरता पायस आणि पुरोडाश यांचे बळी काढावेत.
'कौमारभृत्यतंत्रा'त अखेरीस या ग्रहांच्या उत्पत्तीची कथा येते. त्यात बाल स्कंदाच्या संरक्षणार्थ खुद्द शिवाने या ग्रहांची उत्पत्ती केली आणि स्कंदाला त्यांचा मुख्य नेमले असे सांगितले आहे. या ग्रहांत 'कुमार' आणि 'विशाख' या स्कंदाच्या गणमित्रांचाही समावेश होता (या तिघांचेही कार्त्तिकेयाच्या दैवतरूपात विलीनीकरण झाले). पुढे स्कंद मोठा झाला आणि सर्व देवांचा सेनापती झाला, तेव्हा या ग्रहांनी शिवाची प्रार्थना केली आणि “आता आमचे कार्य संपले तर आम्ही काय करावे?” असा त्याला प्रश्न केला. त्यावर शिवाने त्यांना सांगितले की, तुम्ही पृथ्वीतळी जा आणि ज्या कुटुंबात पितरे (पूर्वज), ब्राह्मण, धार्मिक लोक, ज्येष्ठ लोक इत्यादींचा मान राखला जात नसेल, जिथे अस्वच्छता असेल, जिथे नित्य नीतिनियमांना काट मिळाली असेल अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलांना यथास्थित छळा! म्हणजे तुम्हाला तुमचा पूजा-उपहार वसूल करता येईल!” म्हणून हे ग्रह माणसांच्या आणि मुलांच्या बोकांडी बसायची संधी शोधत असतात, आणि अशी काही परिस्थिती दिसली की तिथे प्रादुर्भाव माजवून आपली 'खंडणी' वाजवून घेतात! थोडक्यात ही मुळात 'मारक' दैवते आहेत पण त्याचमुळे त्यांना अग्रपूजेचा मान मिळून ती 'तारक' दैवते म्हणूनही ओळखली जातात.

बालग्रहांच्या बाधेचे वर्णन करताना त्यांच्या शमनार्थ 'कौमारभृत्य तंत्रा'त जे मंत्र सांगितले त्यात अनेकदा या ग्रहांच्या दैवतरूपाचे तपशील आपल्याला उपलब्ध होता. उदाहरणार्थ, शकुनी ग्रह हा स्त्रीलिंगी आणि पक्षीरूपी आहे. शकुनी पक्षिणी सतत खाली पाहात उडत असते. तिची चोंच तीक्ष्ण असते, डोळे तपकिरी असतात, पोट मोठे असते आणि कान टोकदार असतात. नैगमेष ग्रह मेषरूपी असतो - त्याला बोकडाचे किंवा एडक्याचे डोके असते. रेवती उंच असते, तर पूतना कुरूप आणि अंगाला घाण वास येणारी असते. पण सगळेच ग्रह असे नसतात - मुखमंडिका आणि खुद्द स्कंद हे ग्रह दिसायला सुंदर असतात आणि त्यांची विवक्षित आयुधे असतात. स्कंदाचे शूल हे आयुध प्रसिद्धच आहे. प्राचीन भारतीय पुरातत्त्वात आपल्याला या ग्रहांची काही रूपे उपलब्ध झालेली आहेत. 'नैगमेष' ग्रहाच्या वालुकाश्माच्या मूर्ती मथुरेच्या आसपास इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे साधारणपणे कुशाण घराण्याच्या राजवटीत प्रचलित होत्या. यातले एक रूप विशेष महत्त्वाचे आहे कारण ते मथुरेच्या आसमंतातील 'कंकाली टीला' या प्राचीन स्थानी मिळाले आहे. हे एक जैन स्थान होते, आणि या रुपाखाली 'भगवानेमेसो” (भगवान नैमेषो) असा ब्राह्मी लिपीत उत्कीर्ण लेख आहे.
कंकाली टीला येथे सापडलेला शिल्पपट्ट
कंकाली टीला येथे सापडलेला शिल्पपट्ट, इ. स. चे पहिले शतक - यात अजमुखी नैगमेष दाखवला आहे (मे. ज. अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी आर्किओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडियासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या रिपोर्टमध्ये छापलेले चित्र. सध्या हा शिल्पपट्ट मथुरा संग्रहालयात आहे.)

यावरून प्राचीन जैन धर्मातही या ग्रहांची उपासना होत असे हे सिद्ध होते. पुढे जैन मिथ्यकथा जशा बहरल्या तसे नैगमेषाला शेवटचे तीर्थंकर महावीर यांच्या जन्माचेही कारक मानले गेले. महावीर गर्भावस्थेत मूळ ब्राह्मण स्त्रीच्या उदरी होते, त्यांचा गर्भ नैगमेषाने त्रिशला या क्षत्रिय स्त्रीच्या उदरी प्रतिरोपित केला, अशी कथा निर्माण केली गेली. इथेही आपल्याला नैगमेषाचे जन्म आणि संगोपन यांच्याविषयीचे कारकत्व अधोरेखित केलेले दिसते. मथुरेच्या शिल्पपटातल्या नैगमेषाच्या आसनाजवळही एक लहान बालक दाखवले आहे, ते याच कारणासाठी. मथुरा संग्रहालयात अजमुखी नैगमेषाच्या इतरही काही मूर्ती आहेत आणि त्यांतही त्याच्या आजूबाजूला लहान मुले दाखवली आहेत. इंदिरा संतांच्या कुटुंब-वत्सल फणसाप्रमाणे 'कटिखांद्यावर घेऊनि बाळे' उभा असलेला नैगमेष यात फारच उल्लेखनीय म्हणावा लागेल!
अजमुखी नैगमेषाची वालुकाश्मात घडवलेली प्रतिमा
अजमुखी नैगमेषाची वालुकाश्मात घडवलेली प्रतिमा, इ.स.चे दुसरे शतक (मथुरा संग्रहालय)

मथुरेच्या आसमंतात इतरही अनेक मूर्ती सापडल्या आहेत, ज्यांची संगती आपल्याला बालग्रहांशी लावता येते. एका बहुव्यक्तिय शिल्पपटात आपल्याला स्कंद आणि त्याच्यासोबत प्राणीशीर्षे असलेल्या मातृका दिसतात (चित्र ४). त्यापैकी एका मातृकेला चोच असलेले पक्ष्याचे डोके आहे. हे बहुधा शकुनी ग्रहाचे रूप असावे. प्राचीन भारतीय मृण्मय मूर्तिकलेत पक्षीरूपी देवतेची काही पटशिल्पे उपलब्ध झाली आहेत (चित्र ५).

मांडीवर बालके घेऊन बसलेल्या प्राणीमुखी मातृका भाजक्या मातीची पंखधारी स्त्री-देवता,

डावीकडे, मांडीवर बालके घेऊन बसलेल्या प्राणीमुखी मातृका, वालुकाश्म-शिल्प (मथुरा संग्रहालय); उजवीकडे भाजक्या मातीची पंखधारी स्त्री-देवता, उत्तर भारत, शुंग काल (एथ्नोलोजिकल म्युझियम, बर्लिन / विकिमीडिया कॉमन्स)

ढेरे यांनी वासुदेवशरण अग्रवाल यांचा दाखला देऊन ही चित्रे सुद्धा बहुधा शकुनी ग्रहाची असावीत असे प्रतिपादन केले आहे, पण ते तितकेसे पटत नाही. शकुनी ग्रहाच्या मुख्य लक्षणांपैकी मोठे पोट, तीक्ष्ण चोच, उग्र आणि कुरूप असे रूप अशी कोणतीच लक्षणे या पटशिल्पात नाहीत (मथुरेच्या वालुकाश्मी शिल्पांत मात्र ती आहेत). केवळ पंख असलेली देवता हे एकच आनुषंगिक कारण यात आपल्याला दिसते. या पटचित्रातली देवी पुष्कळच देखणी आहे आणि तिच्या आजूबाजूला समृद्धीची लक्षणे आहेत. अशा दैवतचित्राचे मूळ शकुनीसारख्या अति-उग्र आणि मारक-तारक दैवतात असावे असे वाटत नाही. पण मृण्मय पटशिल्पे आणि बालग्रहांची शमनात्मक उपासना यात एक महत्त्वाचा सांधा आढळतो तो म्हणजे या विधींची 'पार्थिवता'. बऱ्याच बालग्रहांच्या शमनार्थ केलेले यात्वात्मक विधी हे तात्कालिक असतात, चिरकालिक नसतात. रोगाच्या संसर्गाची लक्षणे दिसू लागली की उपशमाचे विधी सुरु करायचे आणि इच्छित परिणाम दिसला (म्हणजेच रोग उताराला लागला) की उत्तरपूजेसारखे विधी करून आधी केलेल्या विधींची यातुक्षमता संपुष्टात आणायची आणि एका परीने सगळ्याच उपशमाचे उद्यापन करायचे अशा स्वरूपाची संरचना इथे केलेली दिसते. अशा विधींसाठी अनेकदा पार्थिव दैवतरूपे तयार केली जातात. हरतालिका किंवा बैलपोळा यांच्यासारख्या सणांमधले विधीही अशाच प्रकारचे आहेत. विधी संपले की ते दैवतरूपही बोळवले जाते आणि त्यामुळेच त्याचे वैयक्तिक आयुष्मान मर्यादित असते. अर्थात वालुकाश्मासारख्या टिकाऊ सामुग्रीतून निर्माण केलेली शिल्पे किंवा शिल्पपट हे असे 'पार्थिव' नाहीत हे उघड आहे. यांची प्रतिष्ठापना बहुधा 'आयतन' म्हणजे sanctuariesमध्ये केली जाई. रोगी आणि रुग्णांचे नातेवाईक उपशमाचे विधी करायला, विशेषतः चव्हाट्यावर ओवाळून टाकण्यापूर्वी बळींची सिद्धता करायला या आयतनांना भेट देत असे मानायला जागा आहे. उपशमनाच्या काही विधींची संरचना पाहिली तर एक गोष्ट जाणवते ती ही की जंतुनाश आणि विलगीकरण यांचा समावेश त्यात केलेला आहे. सूक्ष्म जिवाणू किंवा विषाणूंचे शास्त्रीय ज्ञान नसतानाही संपर्क हेच संसर्गाचे मुख्य वाहन आहे याची कल्पना पूर्वकालिक जनांना निश्चित होती हे आपल्याला यातून समजते. शकुनीने पछाडलेल्या बालकाला करंज वृक्षाच्या लाकडांनी बनवलेल्या कोटरात ठेवावे, आणि तिथेच शकुनीच्या शांतवनाचे विधी करावेत अशासारख्या प्रघातांतून रोग्याचे विलगीकरण केले जाण्याचा कल आपल्याला दिसून येतो. सगळ्या बालग्रहांच्या शमनात धुरी देण्याचा भाग महत्त्वाचा आहे. ही धुरी वेगवेगळ्या (आणि अनेकदा चमत्कारिक) वस्तू जाळून त्यांच्या धुराने दिली जाई. या वस्तूंचा कार्यकारणभाव बाजूला ठेवला तरी धुरी देणे हे निर्जंतुकीकरणाचे महत्त्वाचे साधन होते यात संशय नाही.

पार्थिव रूपाने अशा दैवतांची विधित्मक प्रार्थना करायची प्रथा ही निःसंशय अतिप्राचीन धार्मिक विधींपैकी एक आहे आणि याचे पुरातत्त्वीय प्रमाण आपल्याला महाराष्ट्रात इनामगाव या प्रागैतिहासिक स्थळी झालेल्या उत्खननातून उपलब्ध झालेल्या पुराव्यात दिसते. इनामगाव येथे सापडलेले अवशेष ख्रि. पू. सुमारे ३००० ते १२०० या काळातले आहेत. यांचा परामर्श रा. चिं. ढेऱ्यांनी अगदी उत्तम घेतला आहे; किंबहुना या पुरावशेषांचा थेट संबंध बालग्रहांच्या उपासनेशी आहे हेही त्यांनीच सर्वप्रथम दाखवून दिले आहे. या उत्खननात सापडलेल्या एका घराच्या कोपऱ्यात एक मातीची पेटी पुरलेली आढळली आणि त्या पेटीमध्ये कच्च्या मातीने बनवलेली दोन लहान शिल्पे गाडली होती. या शिल्पांपैकी एक शिल्प हे शीर्षरहित आणि मोठे, उभाराचे स्तन असलेल्या मातृदेवतेचे आहे. या शिल्पाची ही वैशिष्ट्ये आणि उत्तरकालीन परंपरेत येणारी 'विशिरा' आणि 'लंबपयोधरा' ही बालग्रहरूपी दैवतांची लक्षणे यांची अचूक सांगड ढेऱ्यांनी घातली आहे, आणि इनामगाव इथे सापडलेला हा पुरावा निःसंशयरीत्या अशा उपासनेच्या प्राचीनत्वाचा सूचक आहे हे महत्त्वपूर्ण तथ्य मांडले आहे. पण ढेरे यांच्या विवेचनात एक गोष्ट राहून गेली आहे ती म्हणजे या लक्षणांची आणि खुद्द रोगांच्या लक्षणांची सांगड 'दृश्य' प्रकारे घालायची जनप्रवृत्ती. 'विशिरा' म्हणजे जिला शीर्ष नाही अशी देवी; शीर्ष नसण्याचे कारण म्हणजे अर्थातच तिची मान मोडलेली आहे हे आहे. अशी 'मान मोडणे' हे मेनिन्जायटिस किंवा मस्तिष्कावरण-क्षोभ या अत्यंत संसर्गजन्य असलेल्या बालरोगाचे एक प्रमुख लक्षण आहे. या रोगांत बालकांच्या मानेचे स्नायू आखडतात आणि त्यामुळे त्यांचे डोके मागच्या बाजूला झुकलेले राहते. हे लक्षण उत्पन्न करण्याची क्षमता ज्या दैवतांत कल्पिली आहे, तिचीही मन मोडलेलीच असावी हा तर्कसंगत न्याय झाला. या निरीक्षणावरून आपल्याला असे उमगते की, इनामगावची ही 'मानमोडी' देवी केवळ बालग्रहरूपी मातृकाच नव्हे, तर एका विवक्षित लक्षणाची म्हणजे त्या रोगाची अधिष्ठात्री देवता आहे.

सुश्रुत संहितेतल्या बालग्रह प्रणालीत न येणाऱ्या पण रोगराई आणि अनारोग्य यांच्यापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या इतरही काही देवता आपल्याला मथुरेच्या शिल्पसंभारात दिसतात. त्यापैकी काही शकुनी किंवा नैगमेष यांच्यासारख्या प्राणीमुखी आहेत. मांजराचे शीर्ष असलेलया एका देवतेचे शिल्प.
ओटीत बाल घेतलेली मार्जारमुखी मातृका
ओटीत बाल घेतलेली मार्जारमुखी मातृका, वालुकाश्म शिल्प, इ. स. चे पहिले शतक (मथुरा संग्रहालय)

हे इथे उल्लेखण्याजोगे आहे. महाराष्ट्रीय परंपरेत मांजर हे 'जिवंतिका' उर्फ 'जिवती' या दैवताचे वाहन मानले गेलेले आहे (मांजर आपल्या पिल्लांना कधीकधी खाते हे या मागचे निरीक्षण असावे). सुश्रुताने त्याच्या 'नवग्रहां'त समाविष्ट केली नसली, तरी जिवती ही बालग्रह श्रेणीतलीच देवता आहे. श्रावणात तिची आणि 'जरा' नावाच्या आणखी एका देवतेची एकत्र पूजा केली जाते. इथे 'जरा' म्हणजे 'म्हातारपण' असा अर्थ घेतला जातो, पण वस्तुतः ही 'ज्वरा' म्हणजे सांसर्गिक तापाची देवता असावी असे म्हणायला वाव आहे. मथुरेत जिवतीचे जे शिल्प उपलब्ध झाले आहे, त्यात तिचे स्तन पुष्कळच मोठे दाखवले आहेत. अंगावर पिणाऱ्या बाळांना बालग्रहांपासून सर्वाधिक धोका असल्याने स्तन्य ज्यातून निर्माण होते त्या अवयवांचे 'आतिशायन' सूचित करण्याकडे इथे शिल्पकाराची प्रवृत्ती झालेली दिसते. या शिल्पात दिसणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे या दैवताच्या मांडीवर एक बालक दाखवले आहे. त्याचा एकंदरीत आविर्भाव पाहता हे बालक आजारी असावे असे स्पष्ट दिसते. त्या आजारातून त्याची मुक्तता व्हावी या हेतूने त्याला मार्जारमुखी जिवतीच्या ओटीत घातले आहे असे या शिल्पातून सूचित केले आहे. इथे जिवती त्याच्याकडे जरी कराल नजरेने बघत असली तरी ती अंतिमतः त्याचे रक्षण करणार आहे कारण त्यासाठी तिची तुष्टी करायचे विधी हे बालक ज्यांनी तिच्याकडे सुपूर्द केले आहे तो तिचा भक्तगण करणार आहे. बालकांना ओटीत घालण्याचे अन्य अनेक विधी आजही समाजात केले जातात त्याची प्राचीन झलकच आपल्याला इथे पाहायला मिळते. केवळ याच नव्हे तर अन्य अनेक शिल्पपट्टात आपल्याला ओटीत घेतलेली बालके दिसतात. वर उल्लेखिलेल्या शकुनीचे मूर्तिरूप असलेल्या शिल्पपट्टातही मातृकांच्या ओटीत बाळे घातलेली आहेत.

प्राणिमुखी नसलेल्या पण बालकांच्या आरोग्याशी संबंधित अशा आणखी एका मातृदेवतेबद्दल विवेचन करून या लेखाचा उपसंहार करू. नैगमेषाप्रमाणेच ही देवीही भारतीय धार्मिक परंपरांचे काठ ओलांडणारी आहे - तथाकथित 'ब्राह्मणी' किंवा “हिंदू”, तसेच बौद्ध आणि जैन या सगळ्या परंपरांत आपल्याला तिचे दृश्य आणि लेखी पुरावे आढळतात. ही देवी म्हणजे 'हारिती'. इतर मातृकारूपी देवींच्या नावाप्रमाणेच याही देवीच्या नावातच 'हरण करणे' अनुस्यूत आहे. ती काय हरण करते, तर बालकांचे प्राण हेही उघडच म्हणायला हवे. देवी आणि तत्सम संसर्गजन्य रोगांची कारक म्हणून तिचा उल्लेख केला जातो. बौद्ध परंपरेत तिची कथा मुलांना खाणारी एक राक्षसी म्हणून येतो. तिची ही घातक सवय मोडायला बुद्धाने तिचा पिंगल नावाचा सगळ्यात धाकटा मुलगा आपल्या भिक्षापात्राखाली दडवला आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाल्यावर तिला इतरांना ती जी पीडा देत असे तिची आठवण करून दिली, अशी कथा बौद्ध वाङ्‌मयात येते. उपरती झालेली हारिती मग बालरक्षक देवता झाली. म्हणजेच मूळची 'मारक' प्रकृती असलेल्या इतर अनेक दैवतांप्रमाणेच हारितीसुद्धा 'तारक' म्हणून पूजली जाऊ लागली. तिची उपासना गांधारापासून आंध्र प्रदेशापर्यंत सर्वत्र पसरलेली दिसते. मथुरेच्या कलाशैलीत आणि लाल वालुकाश्मात घडवलेली हारितीची एक मूर्ती ऑक्सफर्डच्या ॲशमोलियन संग्रहालयात आहे.

हारिती, मथुरा शैली, लाल वालुकाश्म शिल्प
हारिती, मथुरा शैली, लाल वालुकाश्म शिल्प, इ.स.चे पहिले-दुसरे शतक (ॲशमोलियन म्युझियम, ऑक्सफर्ड)

इथे तिचे रूप हे मंचकावर बसलेल्या दाईचे आहे आणि हा मंचक एका आयतनात ठेवलेला आहे. आयतनाच्या खांबांच्या पायाशी तसेच कमानीच्या वर बालकांची रूपे आहेत. हारितीने कडेवर एक बालक घेतले आहे आणि तिच्या दुसऱ्या हातात उंच धरलेला एक कप आहे. या कपात बहुधा औषधी द्रव्य असावे आणि ते देऊन आजारी बालकांची ही दैवी दाई आजारांतून सुटका करत आहे असे दाखवण्याचा शिल्पकाराचा हेतू असावा. पण हा शिल्पात सगळ्यात महत्त्वाचे रूप आहे ते हारितीच्या दोन्ही पायांमध्ये, मंचकाला टेकून बसलेल्या एका आकृतीचे. नीट पाहिले असता असे दिसते की आकृती गजवदन अशा बुटक्या माणसाची आहे. याचा थेट संबंध अर्थातच गजाननाशी लावता येतो पण आपल्या नेहमीचा परिचित गणपती मात्र हा नाही. या रूपाचा अन्वय रा. चिं. ढेरे यांनी विवरण केलेल्या 'दुःसह' नावाच्या गजरूपी बालग्रहाशी असावा हे जास्त सयुक्तिक आहे. ढेरे यांनी 'विनायक' नावाच्या आणखी एका विघ्नकारक देवतांचा उल्लेखही या संदर्भात केला आहे आणि 'विनायक' तसेच 'दुःसह' यांच्या मूळच्या विघ्नकारी प्रवृत्तीचा आणि 'गणपती' या लोकप्रिय दैवताच्या विघ्नहारी प्रकृतीचा संबंध उलगडून दाखवला आहे. ढेरे यांच्या विवेचनानुसार बालग्रहांप्रमाणेच विनायक हेही मानवांना पछाडतात आणि त्यांच्या संसर्गाचे एक लक्षण म्हणजे अपत्यप्राप्तीमध्ये उद्भवणाऱ्या बाधा हे आहे. या संदर्भात हारिती या बालरक्षक देवतेच्या बरोबर असलेले हे गजवदन देवतेचे चित्रण ढेरे यांच्या विवेचन-विश्लेषणाशी पूर्णतः अनुरूप आहे, पण अर्थातच ढेऱ्यांना ऑक्सफर्डमध्ये असलेली ही मूर्ती माहीत नव्हती त्यामुळे त्यांच्या लेखनात हिचा थेट उल्लेख आलेला नाही.

ऑक्सफर्डमध्येच असलेली हारितीची आणखी एक प्रतिमा आपण इथे पाहू.
हारिती, चांदीचे उत्थित शिल्प / पदक, गांधार,
हारिती, चांदीचे उत्थित शिल्प / पदक, गांधार, इ.स.चे चौथे-पाचवे शतक (ॲशमोलियन म्युझियम, ऑक्सफर्ड)

ही प्रतिमा उठावदार असून चांदीच्या एका शिल्पपट्टाचा भाग आहे आणि ती बहुधा एखाद्या भांड्यावरच्या सुशोभनाचे अंग असावी. आपण नुकत्याच पाहिलेल्या जिवंतिकेच्या रूपाप्रमाणेच इथेही हारितीच्या ओटीत एक (बहुधा आजारी) बालक घातलेले दाखवले आहे. हारिती इथे एका खुर्चीसदृश आसनावर बसलेली आहे आणि तिची वेष/केशभूषा गांधार शैलीतल्या इतर अनेक रूपांशी अगदी सुसंगत आहे. पश्चिमोत्तर सीमावर्ती प्रांतातल्या कलेत नेहमीच दाखवले जाते तसे तिने अंगभर कपडे घातले आहेत आणि त्यांच्यावर चुण्या पडल्या आहेत. ओटीत घातलेल्या बालकाला ती बहुधा स्तनपान देते आहे असे तिच्या उजव्या हाताच्या ठेवणीवरून वाटते. पण या आंगिक लक्षणांबरोबरच हा शिल्पात आणखीही एकदोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे या देवीच्या आसनाला दोन पक्षीरूपी खुंट्या आहेत आणि हे पक्षी बहुधा कावळे असावेत असे वाटते. कावळा हे लक्ष्मीच्या ज्येष्ठ बहिणीचे म्हणजेच अलक्ष्मी अथवा ज्येष्ठेचे लक्षण होते आणि ज्येष्ठा व शीतला यांच्यातला संबंध आपण सुरुवातीला पाहिला आहेच. इथे हारितीच्या दोन्ही बाजूला कमळेही दाखवली आहेत (त्यातली एक कळी आहे आणि दुसरे उत्फुल्ल कमळ आहे), तसेच या शिल्पपट्टाला कमळाच्याच नक्षीचे कोंदणही आहे. म्हणजेच इथे या हारिती देवीचा लक्ष्मीच्या श्रद्धाविश्वाशी असलेला संबंध एकापेक्षा अधिक प्रकारे सूचित केला आहे. हारितीच्या बालहारक/तारक रूपातून तिची एक संतानदात्री देवता म्हणूनही उपासना होत असे आणि संतानप्राप्तीचा व सुफलनाचा अन्योन्य संबंध असल्यानेच हारितीच्या रूपाचे हळूहळू 'लक्ष्मी'करण होत गेले असे दिसते. हारिती आणि सुफलन तसेच बहुप्रसवन यांच्या संबंधाचा आणखी एक धागा आपल्याला बौद्ध परंपरेतून आलेला दिसतो. इथे हारिती अवतरते ती बौद्ध यक्षश्रेणीतला देव पंचिक याची सहचारिणी म्हणून, आणि पंचिक हा कुबेराप्रमाणेच धन-संपत्तीचा अधिष्ठाता देव आहे. पंचिकाबरोबर दाखवलेल्या हारितीच्या मूर्तिरूपात तिच्या हातात धन-धान्याच्या समृद्धीचे लक्षण म्हणून शृंग दाखवलेले असते. गांधारातल्या शक राज्यकर्त्यांच्या नाण्यांवर आपल्याला अशा हारितीचे दर्शन होते.

शक राजा ॲझेस याच्या नाण्यावर आसनाधिष्ठीत शृंग घेतलेली हारिती
शक राजा ॲझेस याच्या नाण्यावर आसनाधिष्ठीत शृंग घेतलेली हारिती, इ. स. पू. पहिले शतक (ॲशमोलियन म्युझियम, ऑक्सफर्ड)

बौद्ध परंपरेतल्या गांधारी हारितीचे एक अगदी रंजक रूप आपल्याला ब्रिटिश म्युझियममधल्या एका हारिती शिल्पात दिसते. हे शिल्प पश्चिमोत्तर पाकिस्तानातल्या युसूफझाई इथे सापडले होते आणि याचा काळ इसवी सनाचे सुमारे दुसरे-तिसरे शतक म्हणजेच कुशाण कलेच्या उच्चबिंदूचा आहे. इथे हारिती सन्मुख रूपात मंचकावर बसलेली दाखवली आहे. तिच्या ओटीत एक मूल आहे, आणि ते अल्लडपणे तिच्या गळ्यातल्या आभूषणाशी खेळू पाहत आहे. हे मूल म्हणजेच बुद्धाने लपवलेला तिचा मुलगा पिंगल. तिच्या मंचकाच्या पायाशी आणखी मुले आहेत - उजवीकडे तीन, डावीकडे तीन आणि मंचकाच्या पदासनावर एक. ही मुले सर्वसाधारण मुले नाहीत असे या शिल्पाचे अभ्यासक व्लादिमिर झ्वाल्फ यांनी फार साक्षेपाने दाखवून दिले आहे. नीट निरीक्षण करून पाहिले असता असे दिसते की हारितीच्या उजव्या पायाकडे असलेले बालक हे स्कंद आहे, कारण त्याने हातात कोंबडा घेतला आहे. स्कंदाच्या पुढे जी दोन बालके आहेत त्यांची लक्षणे इराणी परंपरेतले जुळे भाऊ अमरदाद आणि खोरदाद (होरदाद) यांच्याशी जुळतात. डाव्या पायाजवळच्या एका बालकाने त्याच्या हाताची बोटे तोंडात घातली आहेत. या लक्षणावरून हे मूल म्हणजे इजिप्शियन परंपरेतून ग्रीको-रोमन परंपरेत आलेला 'हारपोक्रॅटीस' नावाचा बालदेव आहे हे सिद्ध होते. त्याच्या पुढेच जी दोन मुले आहेत त्यांनी लंगोट कसलेले दाखवले आहेत आणि ती एकमेकांशी कुस्ती खेळत आहेत. हे चित्रण आहे ग्रीक परंपरेतल्या कॅस्टर आणि पोलक्स या दोन नक्षत्री जुळ्यांचे. म्हणजे इथे हारिती ही केवळ बालरक्षक देवताच नाही तर गांधारातल्या मिश्र संस्कृतीचीही एका प्रकारे रक्षक असल्याचे सूचित केले गेले आहे. असे सूचन भारतीयच काय पण जगातल्या इतर कुठल्याही कला-परंपरेत अतुलनीयच म्हणावे लागेल.

युसुफझाई इथे सापडलेली हारिती प्रतिमा
युसुफझाई इथे सापडलेली हारिती प्रतिमा, करडा शिस्ट दगड, गांधार शैली, इ. स. चे पहिले-दुसरे शतक (ब्रिटिश म्युझियम. लंडन)

संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी ज्या काही धार्मिक आणि कार्मिक परंपरा होत्या त्याचा आढावा आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे घेतला. हतबलता आली की माणूस आपसूकच दैवी मदतीकडे वळतो; ही मानवाची सहजप्रेरणाच म्हणायला हवी. पण या प्रेरणेतून दैवतशास्त्र, तसेच सांस्कृतिक उलाढालीचे एक अतिशय मनोरम्य दर्शन आपल्याला आपल्या भूतकाळातून दिसते. या सांस्कृतिक प्रक्रिया पाण्याच्या प्रवाहांप्रमाणे एकमेकांत पूर्णपणे मिसळून जाणाऱ्या आहेत, एखाद्या कंदाप्रमाणे एका सालाच्या आत एक, अशा म्हणजे एक साल काढल्याशिवाय दुसरे न दिसू शकणाऱ्या आहेत, तसेच माशांच्या खवल्यांसारख्या किंवा घरावरच्या कौलांसारख्या एकमेकांच्या आड रुतलेल्या आणि एकमेकांना एकजुटीने आधार देणाऱ्याही आहेत. अशा तिन्ही प्रकारच्या सामाजिक प्रक्रियांच्या अभ्यासाचा मार्ग चोखाळायचे कारण आपल्याला एका परीने या महासाथीच्या निमित्ताने मिळालेले आहे. मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे 'अम्हांस आम्ही पुन्हा पहावे काढुनी चष्मा डोळ्यांवरचा' अशा रूपाने भूतकाळाकडे बघण्याची संधी अशी महासंकटे आपल्याला देत असतात त्यासाठी का होईना, पण अशा संकटांचेही आभारच मानावेत असे वाटायला लागते!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम लेख भांडारे सर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवढी ती माहिती!
लेख ज्याम आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख आधाशासारखा वाचून काढला. अतिशय आवडला. ललित नसून रंजक व माहीतीपर असे स्वरुप असल्याने, टीपांमध्ये संदर्भ दिले असते तर बरे झाले असते असे वाटुन गेले.
आता लेखाबद्दल - चिकीत्सक आणि अभ्यासू दृष्टीने केलेला दैवतांचा, त्यांच्या रुप-गुणांचा उहापोह खूप आवडला. किंबहुना, दैवतांच्या रुपाचा उगम असा काही बुद्धीनिष्ठ, व्यावहारीक असेल असे कधी वाटलेच नव्हते.
___________
कोणाला आवड असल्यास - https://arjuna-vallabha.tumblr.com/archive

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप माहिती, नावे वैगेरे वाचल्यावाचल्या लगेच विसरली.
शितला देवीच्या मंदीराचा इथे उल्लेख आला होता, तो आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही तोच लेख आधी आठवला. त्या एका मुद्द्यावरच स‌‌विस्तर लेख वाचून मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.