नवीन बिझनेस

दिवाळीच्या जरा आधीची गोष्ट. यंदाची दिवाळी नाही, गेल्या वर्षीची.

मह्या संडेला सकाळीसकाळी आमच्या घरी आला. "काकू, हा सगळा फराळ खाऊन कसा वाटतो ते सांगा," असं बोलत त्यानी अॅल्युमिनियमचा मोठ्ठा डबा आईकडे दिला, आणि सोफ्यावर फतकल मारून बसला.

"अरे हे काय महेश, दिवाळीला अजून चिकार वेळ आहे. आणि एवढा सगळा फराळ मी एकटी कशी खाणार?" आईने फराळ दोन प्लेटमधे वाढून आम्हाला आणून दिला, आणि ती भाजी आणायला गेली.

"खा भेंजो, आणि कसा वाटतोय सांग" मह्या बोलला. मग मी आणि तो दहा मिनटं न बोलता शिस्तीत खात होतो.

"चकली ९/१०, रवा लाडू १०/१०, शंकरपाळी ९/१०, करंजी ८/१०, चिवडा ९/१०" मी बोललो.

"मला करंजी ९/१० वाटली पण बाकी ठीक आहे," मह्या बोलला. "आता मुद्द्याचं बोलतो."

"भेंजो मी फराळ विकणार नाहीये," मी ताबडतोब बोललो. म्हणजे मह्या आपला जिगरी दोस्त, पण कधीकधी कायपण अपेक्षा करतो.

"थांब, नीट सांगतो," मह्या लोडला टेकला आणि संथ आवाजात बोलू लागला.

"पब्लिकला आनंद कशानी मिळतो? चांगलंचुंगलं खाऊन. समाजासाठी काहीतरी करतोय असं वाटून. आपण काहीतरी अॅक्टिविटी करतोय असं वाटून. आणि पैसे मिळवून. तर या सगळ्या आनंदांचा चौबल धमाका करता आला तर काय मजा येईल ना?"

"डायरेक्ट काय ते सांग भेंजो. उगाच फिलाॅसाॅफी नको झाडू," मी बोललो.

"हा फराळ आणला होता तो आदिवासी पाड्यातल्या भगिनींनी आॅरगॅनिक पदार्थांपासून सौरचुलीवर बनवला असता तर? करेक्ट, तुला समाजासाठी आणि पर्यावरणासाठी कायतरी केलं असा फील आला असता. आता फराळाचा डबा सातशे रूपयांना घेतलास तर तुला आपल्या सोसायटीची मेंबरशिप मिळणार. मग तू तुझ्या दोस्तांनापण मेंबर बनवू शकतोस. तुझा कोणी दोस्त मेंबर झाला तर तो फराळाचा डबा घेईल त्यातले शंभर रूपये तुला. आणि तुला मेंबर मी बनवला म्हणून पन्नास रुपये मला. असंच पुढच्या लेव्हला पंचवीस, मग पंधरा आणि मग दहा रूपये. तुला फराळपण मिळणार, आत्मिक समाधानपण मिळणार, आणि बिझनेस करून तू पैसेपण कमावणार!"

मह्या पेटला होता. त्याला कंट्रोल करायला लागणार भेंजो, मला विचार आला.

"पण टोटल दोनशे रुपये कमिशन झालं ना? म्हणजे जो कोण शेवटच्या लेव्हलला असेल तो पाचशेच्या फराळाला सातशे रूपये देणार ना भेंजो!"

"अरे पण तो बिझनेस करून कमावेल ना?"

"मह्या, तो बिझनेस करेल तेव्हा पुढचा कोणतरी खड्ड्यात जाणार ना? शेवटच्या लेव्हलला चुत्या बनवून पैसे कमवायचा बिझनेस आहे हा! एमएलएम म्हणतात याला. भेंजो तू एवढा विकिपिडिया वाचतो, जरा वाच याच्याबद्दल." माझा आवाज जरा चढला होता.

मह्या काही न बोलता बाहेर गेला. मलाच जरा वाईट वाटलं पण काय करणार भेंजो.

दोन दिवसानी मह्याचा फोन आला, "ऑफिस सुटलं की सद्गुरूला ये. नंतर बिर्याणी खिलवतो."

"पार्टी कसली भेंजो? बाॅसिणीनी प्रमोशन दिलं काय? का काही नवीन बिझनेस?"

"नाय रे. नवीन बिझनेस तर चिकार केले आपण. पण परवा तू फालतू बिझनेसमधे जाण्यापासनं वाचवलंस त्याची पार्टी."

मग संध्याकाळी भेटलो, चेतन पंजाबमधे गेलो, तंगडी कबाब आणि बिर्याणी चापली. मग घरी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुमार विषयावरची सुमार ष्टोरी. काहीही नावीन्यपूर्ण नाही, चमत्कारिक नाही, कहानी में ट्विस्ट नाही काही नाही. त्यामुळे, या खेपेस मजा नाही आली. ('ॲम्वे' संकल्पना तशी पुरातन आहे. तिच्या आहारी न जाणाऱ्यांतले असतात, नि जाणारेही असतात. नि न जाणाऱ्यांनी जाणाऱ्यांचे कितीही प्रबोधन केले, तरी उपयोग नसतो.)

या रेटने, उद्या मी 'मी शिंकलो' एवढ्या दोन शब्दांत एखादी लघुकथा आटोपेन. नशीब, लोकांची माझ्याकडून धमाल विनोदी कथांची अपेक्षा नसते.

देवदत्तसारख्या लेखकांकडून इतके रनऑफदमिल, व्हॅनिला फ्लेवरच नव्हे, तर अटरली फ्लेवरलेस असे काही येईल, असे वाटले नव्हते. असो, काही दिवस असेही असतात. चालायचेच. हेही दिवस जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0