मेहरबानी कसली, हे तर दरवानाचे कामच आहे

----------------------------------------------------------------
मेहरबानी कसली, हे तर दरवानाचे कामच आहे
----------------------------------------------------------------

"काय झालं, मेहता मॅडम? काही मदत करू का मी?" बिल्डिंगचा दरवान आपली जागा सोडून धावत आला आणि नुकत्याच बाहेर पडलेल्या पोक्त बाईला म्हणाला.

लखनवी चिकनचे भरतकाम केलेला कडक इस्त्रीचा शुभ्र सफेद सलवार सूट घातलेली इंदू मेहता धुळकट फुटपाथवर फतकन बसली होती. तिने ओठांना लावलेली वाईनची बाटली तिच्या हातात त्याला आधी दिसलेलीच होती. इमारतीच्या सामायिक भागांतून दारूची उघडी बाटली न्यायला मनाई आहे, हे तिला ठाऊक असणारच : दहा वर्षे ती सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची सदस्य होती. पण लिफ्टमधून खाली येताना सोसायटीची शिस्त पाळण्यासाठी तिचे डोके ठिकाणावर नव्हते.

घरात इंदूच्या डोक्यात इतके भणभणत होते, की तिला राहावले नव्हते. आणि टेबलावरची वाईनची बाटली खसकन हातात धरून ती फ्लॅटबाहेर पडली होती. त्याआधी अर्धा तास ती आंगठ्यांनी निष्फळपणे कानशिले दाबत बसली होती. एक हळूहळू प्यालेला आणि एक घटाघटा प्यालेला वाईनचा ग्लास तिला शांत करू शकला नव्हता. प्यालेल्या दोन ग्लासांपैकी तिने एकच स्वतःकरिता भरलेला होता, दुसरा मुळात कौमुदीकरिता भरला होता. पण तिची मुलगी कौमुदी वाईनचा ग्लास तोंडालाही लावण्यापूर्वी दार आपटून घराबाहेर पडली होती.

"मम्मीजी, तुमच्या या घरात एक क्षणभरही मी थांबणार नाही," ओरडून ती सोफ्यावरून उठली होती. "या घरात, या ठिकाणी बसून तुम्ही माझ्या संसाराची नासधूस करायचे कारस्थान रचलेत." चढत-चढत टिपेला जाण्यापूर्वी तिचा आवाज सुरुवातीला अगदी कुजबुजल्यासारखा होता. "या-या-याचा अर्थ म्हणजे आधी हर्षलला माझा संशय आला तो तुम्ही सांगितल्यामुळे. हर्षलने माझ्यामागे प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर लावला, ते खरे की खोटे तुम्हीच मला सांगितले होते : माझी दिवसाची चैन आणि रात्रीची झोप खराब केलीत. माझे आणि हर्षलचे तणाव वाढायला लागले, तेव्हा मी तुमच्याशी पुन्हा समेट करायला नकोच होती. तुम्ही हर्षलशी भांडल्यानंतर आमच्या दोघांशी आधी अबोला धरला होता तेच बरं होतं. त्याआधी आमच्या घरी येऊन तुमचे रुसवे-फुगवे, पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह टोमणे नकोसे व्हायचे आम्हाला. अगदी आमच्या लग्नाच्या शुभेच्छासुद्धा तुम्ही इतक्या विचित्र दिल्या होत्या : तुम्ही म्हणालात, खरं वाटणार नाही, पण कौमुदी-हर्षलनी हा अशक्य अपोझिट्स्-अट्रॅक्ट गाडा लग्नापर्यंत यशस्वीपणे आणला, अ-भि-नं-द-न!"

ही कडवट निर्भर्त्सना सुरू होण्यापूर्वी आईच्या हातातून तिने वाईनचा ग्लास स्वीकारला तेव्हा कौमुदी ठीकच होती. पण कौमुदी सोफ्याशेजारच्या टोपलीतली मासिके उगीच चाळून बघत होती, ते इंदूच्या नजरेला दिसले नव्हते. कारण स्वयंपाकघरातून डिशेस बाहेर आणण्याची इंदूची लगबग चालू होती. कौमुदीचे चित्त आज म्लान असणार हे तिला माहीत होते. तिला बरे वाटावे म्हणून जेवणानंतर डेझर्ट म्हणून इंदूने फ्रेंच बेकरीतून तिची आवडती स्ट्रॉबेरी चीझकेक खास आणली होती. अगदी लहानपणापासून रडवेल्या कौमुदीची कळी या चीझकेकच्या एका चमच्याने खुलत असे. बेकरीतून परत येत असताना इंदूने मनातल्या मनात कागदपत्रे नीट आवरण्याचे ठरवलेले होते. पण एका हातात किल्ली, एका हातात चीझकेकच्या खोक्याचा तोल सांभाळत इंदू घरात आली, तेव्हा तिने कौमुदीला आधीच आत आलेली पाहिली. वाईनची बाटली उघडायच्या आणि जेवणाची तयारी करायच्या नादात ती आवराआवरीचे साफ विसरून गेली होती. बेकरीला जाता-येताना कौमुदीच्या हर्षलपर्वाचा सगळा इतिहास इंदूच्या मनात घोळत होता. हर्षलपर्व, नव्हे हर्षलकांड, आता संपुष्टात येणार होते. कौमुदीच्या मानगुटीवरचे हर्षलचे पिशाच्च उतरल्यावर कदाचित ती अजय वर्माकडे लक्ष द्यायला लागेल, अशी इंदूची आशा पालवली होती. अजय डिव्होर्सी असला तरी मुलाबाळांशिवाय स्वतंत्र होता, त्याचे वय कौमुदीपेक्षा दोन-एक वर्षे कमीच होते. सालस अजयच्या तुलनेने हर्षल कौमुदीकरिता कुठल्याही निकषानुसार वाईट होता. त्याने कौमुदीवरती हात उगारला असता, तर इंदू तडक पोलिसांकडेच गेली असती. पण हर्षलनी कौमुदीचा छळ केला तो वेगळाच मानसिक प्रकारे. कौमुदीचे वागणे, बोलणे, खाणे, आणि मुख्य म्हणजे कौमुदीचा आईशी असलेला हृद्य संबंध, या सगळ्या गोष्टींबद्दल तो तुच्छतेने बोलायचा. हे आठवताच काहीतरी घाणेरडी चव जिभेवर आल्यासारखे इंदूचे तोंड वाकडे झाले होते. हर्षलनेच कौमुदीच्या मनात विष कालवून तिला दोन वर्षे आईपासून तोडले होते. हर्षलच्या स्वार्थी प्रेमाच्या आणि विखारी टीकेच्या मिश्रणाला कावूनच कौमुदी पुन्हा आपल्याजवळ आली अशी इंदूची खात्री होती. हर्षल-कौमुदीचा मध्ये एक-दोन महिने ब्रेक-अप झाला होता, तेव्हा इंदूने कौमुदीला अजय वर्माजवळ आणायची योजना जमवली होती. इंदूने आग्रह केल्यामुळे कौमुदीने अजयला एकदोन मैत्रीपूर्ण पत्रोत्तरेही लिहिली होती. पण इंदूने जुळवलेला तो हितकर संबंध वाढण्याऐवजी कौमुदी-हर्षल ताणलेल्या रबरबँडच्या रिबाउंडसारखे पुन्हा एकत्र झाले होते.

पण हर्षलचे हे कृतक प्रेम टिकणार नव्हते ते इंदूला चांगले ठाऊक होते. कौमुदी याबाबत आंधळी असली तरी इंदूला स्पष्ट दिसते होते की हर्षल खरोखर प्रेमळ नव्हता – हाडाचा संशयी आणि मत्सरी होता. आज नाही तर उद्या निश्चितच त्याच्या संशयाचा किडा वाढून अजगर होणार होता. कौमुदीचा श्वास वर्षानुवर्षे गुदमरण्यापेक्षा एका घावात दोन तुकडे झाले तर बरे होईल, असे इंदूला राहूनराहून वाटायचे. काल रात्री व्हायचे ते शेवटी झाले. कौमुदी रडत-रडत फोनवर म्हणाली, की हर्षलने घटस्फोटाची कागदपत्रे तयार केली आहेत. आणि कारण म्हणून कौमुदीचे विवाहबाह्य संबंध असे दिले होते. त्याला म्हणे अजयच्या आणि कौमुदीच्या प्रेमपत्रांच्या प्रती मिळाल्या होत्या. इंदूने कौमुदीला लगेच उद्या यायला सांगितले : आईच्या घरट्यात ये ग पुन्हा चिमणे!

हर्षलच्या हाती ज्याच्या झेरॉक्स पडल्यामुळे कौमुदी मुक्त होणार होती, ती पत्रे अजयने मूळ या पत्त्यावर पाठवलेली होती. बेकरीला जाण्यापूर्वी सकाळी इंदूने ती पत्रे पुन्हा-पुन्हा कुरवाळून वाचली होती. अजयने लिहिलेली ही उघड प्रेमपत्रे होती, आणि त्यांत कौमुदीच्या पत्रांचा उल्लेख होता. अजयपाशी असलेली कौमुदीची उत्तरे गुळमुळीत, मोघम होती, हे इंदूला माहीत होते – पाठवण्यापूर्वी कौमुदीने ती इंदूला दाखवलेली होती. अशा या अर्ध्या लेखाजोख्यावरून हर्षलसारखा संशयराक्षसच कौमुदीला दोष देऊ शकला असता, ही इंदूची अटकळ खरी ठरली होती. पण बेकरीत जायच्या घाईत इंदू कुलूप लावून कपाटात पत्रे ठेवायला विसरली होती – पत्रे सोफ्याजवळच्या मासिकांच्या टोपलीतच राहिली होती.

बेकरीला जाताना दाराबाहेर पडता-पडता तिने दरवानाला म्हटले, “आज कौमुदी बेबी येणार आहे, तोवर मी परत आले नसले, तर तिला माझ्या फ्लॅटचा दरवाजा उघडून द्याल का? मेहरबानी होईल!" दरवान म्हणाला, "मेहरबानी कसली, मॅडम! हे माझे कामच आहे."

----------------------------------------------------------------

(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या "मैत्र" नियतकालिकात जानेवारी २०२०च्या अंकात पूर्वप्रकाशित)
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या कथेत काहीतरी ‘भानगड’ आहे (म्हणजे कसलातरी अनवट साहित्यिक प्रयोग केलेला आहे) अशी वाचताना शंका येते, पण अजून त्यावर नेमकं बोट ठेवता आलेलं नाही. विचार करत राहावं लागेल. At first blush, it reads like a pastiche or parody of ‘something’.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

हा प्रयोग आहे, हे खरे आहे. "कालक्रम आणि घटनांचा क्रम विपरीत असू शकतो" हे एका व्याख्यानात नुकतेच ऐकले होते.

पण नुकत्या वाचनात नेमकी ही चौकट असलेली कथा नाही -- एखादा जुना संस्कार असेल तर माहीत नाही. मेमेंटो चित्रपट मी सलग बघितलेला नाही (काही सीन बघितलेले आहेत), आणि ग़जनी/घजिनी तितकेही बघितलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ही मराठी भाषा काहीतरी वेगळी वाटते आहे, पण त्यात नेमकं काय वेगळेपण आहे त्यावर बोट ठेवता येणार नाही.

"इमारतीच्या सामायिक भागांतून दारूची उघडी बाटली न्यायला मनाई आहे, हे तिला ठाऊक असणारच" हे इंग्रजी वाक्यासारखं वाटतं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शैलीबद्दल तुमचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. शैली बदलेनच असे नाही, पण असा भास होत असल्यास मला चालण्यासारखे आहे का? हा निर्णय मनःपूर्वक, हेतुपुरस्सर करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घटनाक्रम आणि लेखनक्रम याच्या रोचक संरचनेचा प्रयोग वाटला. (काही पॉप शो मधील एपिसोड्सची आठवण आली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बरोबर आहे. घटनांचा कालक्रम आणि लिखित क्रम उलटसुलट आहेत. परिच्छेद तरी घड्याळाच्या विपरीत क्रमाने आहेत. हा विपरीत क्रम जमेल तेव्हा परिच्छेदातील वाक्यांसाठी पाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येक वाक्यासाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घटनांचा कालक्रम आणि लिखित क्रम उलटसुलट आहेत.

वाचताना हे लक्षात आलं होतं. 'मेमेंटो'पेक्षाही मला 'इररिव्हर्सिबल'ची आठवण झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदी हेच म्हणायला आलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ॲमॅझॉन प्राइमवर आहे वाटते. बघायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कौमुदीला बऱ्याचदा दरवानाने घर उघडून दिले आहे. नवीन काय नाही असे त्याला म्हणायचंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'घंटा काहीही कळलं नाही' असे म्हटल्यास तो स्वजाणिवांच्या सीमारेषेच्या संकुचित परिघाचा प्रच्छन्न नि निलाजरा कबुलीजबाब ठरेल की काय अशी भीती वाटली तरीही म्हणतो. कुणीतरी या लेखाचे समीक्षण-कम-रसग्रहण करून दाखवल्यास बरे होईल.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मार्मिक' दिली आहे.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पण मार्मिक दिली न बा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0