बागकामप्रेमी ऐसीकर - २०२१
घरच्या बागेची चर्चा खरडफळ्यावर करण्या ऐवजी एक धागाच काढावा अशी चर्चा तिकडे झाल्याने इकडे धागा सुरू करतो आहे.
तुमच्या यावर्षीच्या योजना, सल्ले जरूर लिहावेत!
तर सुरुवात अशी झाली की माझ्या मुलाला गेल्या वर्षी शाळेत ॲक्टिविटी करण्यासाठी एक यादी दिली होती. त्यात ओला कचरा व्यवस्थापन हा एक विषय होता.
हाच मी पटकन निवडायचा सल्ला दिला. माझ्या आवडीचा विषय, त्याचा दहावीचा वेळ काही प्रमाणात वाचवायचा आणि बागकाम करायची माझी हौस भागवून घ्यायची असे उद्देश ठेवून काम सुरू केले.
अपार्टमेंट मधली फणस, चिकू आणि चाफा वगैरे झाडांची सतत पाने गळत असतात. ती चार पोत्यात भरून टेरेसवर आणली. एक जाड प्लास्टिक कागद दुहेरी अंथरूण घेतला.
आधी झाडांची पाने पसरली आणि त्यावर हलका मातीचा थर देऊन घरचा ओला कचरा बारीक तुकडे करून टाकायला सुरुवात केली. मित्राच्या शेतावरून गोमूत्र आणि गो शेण आणलं. त्यात बेसन, गूळ मिसळून दहा दिवस ठेवलं.
हे मिश्रण टाकून दोन महिन्यात बरीच चांगली माती सदृश जमीन तयार केली.
बालपणी गावात शेण माती अन् गोमूत्र हाताळण्याचा अनुभव असल्याने हे सगळे हताळणे सोपे गेले.
चिमणराव यांचे काही धागे वाचले असल्याने त्यांना थेट फोन करून थोडी माहिती घेतली. आणि पावसाळा सुरू झाला!
आधी टाकलेल्या केर, आंब्याच्या कोयी यातून भरपूर रोपे उगवली. अनावश्यक काढून टाकली आणि काही बियाणे आणून बिया पेरल्या.
पहिल्या वर्षी मुलाचा प्रकल्प अहवाल इतकाच मर्यादित हेतू होता पण अपेक्षेपेक्षा जास्त निसर्ग देत होता.
यावर्षी मात्र आधी ठरवून भाजी आणि फळे ही थीम घेऊन सुरुवात केली.
भेंडी, कारली, राजगिरा घेवडा भरपूर आले. टोमॅटो जरा उशीराने सुरू झाले पण जेव्हा आले तेव्हा अनपेक्षित पणे दोन रोपांना मिळून ९६ आले...!
त्याच्या वजनाने झाडे टेकू लागली म्हणून बांबूचे तुकडे आणून आधार दिला. या मधल्या काळात दहाबारा टोमॅटो खराब झाले असतील.
आता रोज साताठ टोमॅटो तयार होत आहेत. म्हणजे जवळजवळ एक किलो! घरी खाऊन, शेजाऱ्यांना देऊन वर उरले. टोमॅटो फेस्ट साजरा झाला. आता सहा रोपे वाढत आहेत, म्हणजे मार्चला परत एक महोत्सव!
साठ ते नव्वद दिवस ही सायकल आहे, त्यामुळे वर्षभर मिळण्याचे नियोजन करत आहे.
सध्या भोपळ्याचे आणि काकडीचे वेल वाढलेत, त्यात भोपळ्याला खूप फुले येत आहेत पण बुरशी वाढते आणि फुले गळून पडतात.
मिरची आणि फ्लॉवर रोपे आणून लावली आहेत. पपईचं रोप आपोआप आलं आहे, पण एक वर्ष जाईल फळे यायला. आपोआप वाढलेले वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ ही रोपे देऊन टाकणार आहे. ती गच्चीत वाढवून उपयोग नाही.
सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळेल तसे मी बराच वेळ इथे देतो. सोबतीला आवडती गाणी वाजत असतात. टेरेस वर उंच टाकी आहे, तिथे एक घार फॅमिली राहते. ते कधीतरी हल्ला करायचा प्रयत्न करतात. पण हे सकाळी साडेसात पर्यंतच. नंतर रात्री पर्यंत घारी आमच्याकडे दुर्लक्ष करतात.
हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने आता या पावसाळ्यात बागेचे क्षेत्र दुप्पट करणार आहे. जागा भरपूर आहे..यंदा फुलांचा समावेश होईल.
मधमाशी पालनाचा विचारही फक्त मनात आहे..बहुतेक पुढील वर्षी करेन.
काही चित्रं चिकटवत आहे. प्रतिसादात अजून काही टाकेन. चित्रे टाकायला मदत करणारे श्री चिमणराव, सामो आणि चिं. ज़ं. यांचे आभार!
टोमॅटो रोपे आणि फळे
भोपळ्याचा वेल आजारी आहे...
मक्याला आलेले दमदार स्वीट कोर्न:
मोहरीच्या फुलंवर फुलपाखरू...
अशी पालेभाजी मधे मधे मिळत असते.
पहिल्या वर्षाच्या मानाने बटाट्याचं पीकही बरं आलंय..
कलिंगडची सुरुवात बरी झाली, पण नंतर फळे गळून पडली.
आमच्या अनुपस्थितीत हे पाहुणे हजेरी लावून जातात!
परवा धागा काढेपर्यंत घार सकाळी हल्ला का करते हे कळत नव्हते.. दोनदा डोक्यावर झडप घालून मला घाबरवायचा प्रयत्न करत होती.आमचे चिरंजीव निरीक्षण करत होते, त्यावेळी घारीची दोन क्युट पिल्ले नारळाच्या झाडावर घरट्यात दिसली. त्यांच्या काळजीने घार आम्हाला तिकडे फिरकू देत नाही! खरं म्हणजे हे झाड थोडे दूर, आमच्या शेजारच्या इमारतीत आहे. मग डोक्यात उजेड पडला.. दसऱ्याच्या वेळी घार दोरे, काड्या जमवत होती!
आता पिल्ले उडून जाई पर्यंत दोन महिने त्यांचे निरीक्षण करणे हा आणखी एक विरंगुळा मिळाला..:)
घारीचे पिल्लू कधीच पाहिले नव्हते!
एक नंबर
भाऊ, बाग एक नंबर आहे. संपूर्ण बागेचाही एखादा फोटो दाखवा ना.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संपूर्ण बागेचाही एखादा फोटो
+१०० डोळे निवतील.
कमाल!
कमाल! धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मस्त बाग आहे. टोमॅटो बघून जळजळ होतेय.
काही शंका: राजगिरा म्हणजे जो बाजारात राजगिरा (amaranth) मिळतो तो पेरला की वेगळं बियाणं आणलं ? घेवडा - वाल - पावटे ह्यांत काही फरक असतो का ? मी ४ महिन्यापूर्वी लावलेल्या वालांना आताशी एखादी शेंग दिसू लागलीये.
बटाट्याचं काय तंत्र ? माझा बटाट्याचा पार फियास्को झाला - झाड खुप मस्त भारंभार वाढलं, मग सुकलं - म्हणून आता खाली बटाटे आले असतील अशा अपेक्षेने उपटलं तर खाली काहीच नाही
मका कसा लावला आणि वाढवला ह्याबद्दलही उत्सुकता आहे.
-सिद्धि
@सिद्धी,
@सिद्धी,
अमरनाथ म्हणजेच राजगिरा, त्याच्या दोन जाती आहेत इथे, लाल आणि हिरवे. पुढे गोंडे असलेली कणसे येतात, त्याचा वााळवून राजगिरा होतो. तोपर्यंत तीनदा भाजी मिळते. भाजी म्हणून पाने कमी आल्यास थालीपीठ, पराठा यात सप्लिमेंट म्हणून उपयोग होतो.
वाल, श्रावण घेवडा, पावटे यात थोडा फरक असतो. हे वेल पुन्हा पुन्हा फुलत राहतात. एका वेलाला साधारण पाव किलो शेंगा एकदा येतात, मग पुन्हा पाने गळून नवी येतात. कीचनचा ओला कचरा म्हणजेच खाऊ सर्व रोपांना वाटून देत असतो. घरी आलेला विघटन होणारा सर्व कचरा इथे वापरतो.
बटाटे लावावे लागले नाहीत, खराब होते ते टाकले त्या मोडतून उगवले. हे कळल्यावर आता मोडाचे भाग दोनतीन मुद्दाम मातीत खोचतो, मोड वर ठेवून. साधारण नव्वद दिवस लागतातच. पाने वाळून गेली तरी लक्ष देऊ नये. आत वाढत राहतात.
मका सुद्धा आपोआप आला. कणीस खाऊन टाकले त्यात उरलेल्या मक्यातून रोपं आलं.
बाजारातल्या सगळ्याच गोष्टींचे हल्ली बियाणे बनवतो. सगळे उगवून येते आहे. :).नर्सरी झालीय नुसती बाग म्हणजे!!
बागेचा फोटो विकांतला काढतो.
फोटो दिसत नाहीत..
फोटो दिसत नाहीत..
आता फोटो दिसतायत. खूप छान आहे की बाग. खारुताई व फुलपाखरु मस्त.
मला ऑफिसच्या संगणकावरुन फोटो दिसत नाहीयेत पण घरच्या संगणका वरुन दिसतायत. समथिंग टु डु विथ इंटरनेट ऑप्शन्स.
आदर्श झाली आहे गच्चीवरील बाग.
फारच आवडली. खत आणि गच्चीवरच्या झाडांना मिळणारे वरचे ऊन आणि तुमची निगा यांस चांगली फळे धरली आहेत. बाल्कनीतल्या झाडांना फक्त तिरपे ऊन मिळते.
- सिद्धि.
राजगिरा भाजीचा आणि लाह्यांचा राजगिरा एकाच वर्गातील झाडं आहेत. गवतवर्गात नसलेलं धान्य. पण भाजीचं काळं बी वेगळं असतं. लाल किंवा हिरवा राजगिरा भाजी आणल्यावर त्यांचे पाच सहा इंचांंचे काही शेंडे लावले की काम होतं. किंवा मुळं असलेली पेंडी मिळाल्यासही ते लावायचे. दोन चार झाडं उंच(६फुटांपर्यत वाढतात) वाढवायची. वरती तुरे येऊन बी खाली पडून अगणित झाडे उगवत राहातात. झाडांच्या दंडातील गाभ्याची भाजी चांगली होते.
घेवडा - वाल - पावटे यांत फरक आहेच. भाजीच्या शेंगा जरा जून निघालेल्या वाळवून हवे ते बी मिळते आणि वेल वाढवता येतात. वाल मात्र ओक्टोबरला लावून फेब्रवारीत हंगाम संपतो. नंतर येत नाहीत. वाल - कडवे वाल आणि पावटे गोडसर असतात. उकडलेले पावटे 'चीज मकरोनीमध्ये' वापरता येतात. वालाचं चविष्ट बिरडं होतं तसं पावटे घेवड्याचं होत नाही. घेवड्याचे वेगवेगळ्या हंगामात येणारे बरेच प्रकार असतात आणि दाण्यांपेक्षा ओल्या शेंगाच भाजीसाठी खाल्ल्या जातात.
-------------
भाऊ, बागेत मोहरी लावलीत हे बरं केलं. (फुलपाखरूचा फोटो) 😀
(अवांतर)
माफ करा, परंतु, नक्की कोठून वेचलात हा ज्ञानकण? (मला व्यक्तिशः चीज़ मॅकरोनी हा प्रकार - आमच्या भाषेत 'मॅक-अँड-चीज़' - मुळीच आवडत नाही, परंतु तरीही,) चीज़ मॅकरोनीमध्ये पावटेच काय, परंतु बहुधा कोठलीही भाजी किंवा एक्स्ट्रेनियस घटक घालणे हे (निदान प्यूरिस्टांच्या नजरेतून तरी) बहुधा सॅक्रिलिज ठरावे.१ (चूभूद्याघ्या.) आणि त्यात पुन्हा मॅक-अँड-चीज़मध्ये उकडलेले पावटे घालणे म्हणजे... रामारामारामा! एक म्हणजे अगोदरच बेचव/काहीतरीच लागणाऱ्या एका पदार्थात दुसरा त्याहूनही बेचव पदार्थ घालण्यातला प्रकार, आणि दुसरे म्हणजे, 'कशातही काहीही' कॅटेगरीतला नोबेल पारितोषिकाच्या तोडीचा जो काही पुरस्कार अस्तित्वात असेल, तो या काँबिनेशनला द्यायला हरकत नसावी. या रेटने उद्या केळ्याच्या शिकरणीत उकडलेले बटाटे घालाल!
की ही मॅक-अँड-चीज़ची काही हिंदुस्थानी बास्टर्डाइज़्ड आवृत्ती आहे? 'फ्रेंच टोस्ट'सारखी?२
----------
तळटीपा:
१ नाही म्हणायला, क्वचित्प्रसंगी मॅक-अँड-चीज़मध्ये बेकन, हॅम, खिमा, मिरच्यांचे तुकडे, कांदे, कांद्याची पात, टोमॅटो इत्यादि संकीर्ण पदार्थांपैकी एक अथवा अधिक घटक घालणारे काही तुरळक लोक अस्तित्वात आहेत, असे विकी सुचवितो खरा१अ, परंतु असे लोक (होपफुली) विरळा असावेत. यातून फक्त There's no accounting for taste एवढेच सिद्ध होते, आणि तसेही एकंदरीत तो lipstick on a pigमधला प्रकार आहे. इन एनी केस, मॅक-अँड-चीज़मध्ये उकडलेले पावटे घालण्याची काही प्रथा असण्याबद्दल ऐकिवात नाही. असो चालायचेच.
१अ
(स्रोत.)
२ 'खरा' फ्रेंच टोस्ट हा वस्तुतः एक किंचित गोडसर असा पदार्थ आहे. त्यात तिखटमीठ/कांदे/हळद वगैरे असले काही अजिबात घालत नाहीत. (किंबहुना, त्यात फेटलेल्या अंड्यात बहुधा काहीही घालत नसावेत, अशी शंका आहे. (चूभूद्याघ्या.) आणि मग त्या नुसत्याच फेटलेल्या अंड्यात पावाचा स्लाइस बुचकळून तो तव्यावर परतत असावेत.) उलटपक्षी, तयार झालेल्या फ्रेंच टोस्टवर पिठीसाखर भुरभुरवितात नि सोबत (हवे असल्यास बुचकळून खाण्यासाठी किंवा वरून ओतून खाण्यासाठी) सिरप (काकवी) देतात. तिखटमीठवाला फ्रेंच टोस्ट ही फ्रेंच टोस्टची भारतीय बास्टर्डाइज़्ड व्हर्जन असावी. वस्तुतः, त्यास 'इंडियन फ्रेंच टोस्ट', 'फ्रेंच इंडियन टोस्ट', किंवा (सुटसुटीतपणाकरिता) 'पाँडिचेरी टोस्ट' अशा काही(बाही) नामाभिधानाने संबोधले पाहिजे! पण लक्षात कोण घेतो?
पदार्थ खाल्ला आहे.
चीज मकरोनी विद बीन्स असं नाव असलेला पदार्थ ओफिस क्यान्टिनात जर्मन एंजिनिअर्ससाठी( हेक्सटशी कलाबरेशनमुळे) बनवल्यानंतर {उरलेला,गेस्ट गेल्यावर} दोन चार मुखांत म्यानेजर घालत असे. त्यात एक मी होतो. बीन्स म्हणजे फरसबी/फ्रेंच बीन्स दाणे अपेक्षित असावेत पण आमच्याकडे पावटे/घेवडा घालत.
(कंपनीच्याच काही आचाऱ्यांना हॉटेल प्रेसिडेंट किचनमधून कोर्स करवून आणले होते ते कामास असत त्यादिवशी)
मकरोनी कमी आणि चीज सॉस अधिक यामुळेही आवडत असेल. पण एकूण तो पदार्थ परदेशी ओथेंटिकच असावा असा माझा समज झालेला होता. मला आवडायचा.
रश्यन सलाड नावाचा कोबी, बेदाणे, ओलिव ओइल ड्रेसिंगवालेही खात असू. इतर मेन्यू माहीत नाही.
उलटपक्षी, तयार झालेल्या
फार फार आवडतो. आतमध्ये लुसलुशीत व बाहेरुन क्रिस्पी. मात्र व्हाईटच ब्रेड हवा. व्हीट ब्रेड म्हणजे ब्रेडच्या नावावरती धब्बा आहे.
घालणे म्हणजे... रामारामारामा!
पावट्यांची बदनामी थांबवा... !!!.
बाकीचा नबापीडीया ठीक.
अन्नच ते.
भुकेवर अवलंबून असते. आवडणे वगैरे.
उकडलेले वाल ,घेवडा,पावटे,तूर हे चांगलेच असते. कोकणातल्या (अलिबाग) पोपटीत असतातच. पण ते मकरोनीच्या पांढऱ्या सॉसमध्ये पटत नसेल. असो.
गवि आले रे आले.
वेलकम गवि.
पुनरागमनाप्रीत्यर्थे स्वागत. गेलेला नव्हताच मूळात पण काही दिवस दिसला नाहीत. कोव्हिड की काय अशी शंकाही मनास चाटून गेलेली
बरं पादऱ्याला पावट्याचे
बरं पादऱ्याला पावट्याचे निमित्त असे म्हणत नाही बास!!!
सेलोसिया
सिद्धी, मला हल्लीच भावाशी गप्पा आणि फेसबुक फोटो बघून शोध असा लागला की अमेरिकेत celosia नावाची फुलझाडं, आणि त्यांच्या बिया मिळतात. बियांपासून ते लावणंही सोपं असतं. त्याचा पाला कुर्डू नावानं ओळखला जातो. तेही राजगिऱ्याच्याच कुटुंबातलं. त्या कुर्डूचा पाला खातात.
मी बरेचदा सेलोसिया लावते; पण ते फुलांसाठी. ऑक्टोबरच्या शेवटी झाडाची सगळी पानं जातात, आणि फक्त लाल किंवा पिवळी खोडं आणि त्या रंगांची फुलं तेवढी राहतात. झाड फारच छान दिसतं. पण पाला खायचा असेल तर बहुतेक फुलं धरण्याच्या आधीच खुडलेला बरा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आणि फक्त लाल किंवा पिवळी खोडं
वाह!! फोटो टाक पुढल्या वेळी.
नंतर उरलेल्या झाडाचाही दाखवेन
नंतर उरलेल्या झाडाचाही दाखवेन फोटो.
त्याच्या बिया आपसूक पसरतात आणि झाडं येतात. इथे तापमान शून्य सेल्सियसपर्यंत जातं त्यामुळे ते फार फोफावत नाही, भारतात ते invasive समजतात. सध्या असंच एक रोपटं सिमेंट आणि विटांमधल्या भेगेत वाढत आहे. रविवार-सोमवारी फ्रीज होईल बहुतेक, त्यात टिकतंय का बघू. मोठी झाडं टिकली तरी जरा विरूप होतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
त्याच्या बिया आपसूक पसरतात
म्हणुनच फोफावत असेल व इतर झाडांवरती अतिक्रमण करत असेल. म्हणजे भारतात तण म्हणतात ते त्यामुळे असेल.
टाक टाक फोटो.
व्यायामाचे व्हिडीओज पाहूनच व्यायाम केल्याचे फीलींग येते तद्वत बागकामाचे वाचूनच ताजेतवाने वाटते.
फारच अवांतरचं वीड
वाढू लागलं बागेत तर भाऊ बागकाम आवरतं घेतील का?
नाही दुपटीने काम करतील. तणाचा
नाही दुपटीने काम करतील. तणाचा नायनाट करतील.
भाऊ, चिमणराव( अचरटकाका?) आणि
भाऊ, चिमणराव( अचरटकाका?) आणि अदिती, थॅंक्यु. मी पावटे आणि वाल एकच समजत होते. तर,आख्खे वाल पेरून आलेल्या वेलाला सध्या एकुलती एक शेंग आलीये. (अदितीचा एका भेंडीचा प्रश्न आठवला.)
सध्या आमच्या बागेत दाखवण्यासाठी फक्त लिंबू आणि मोसंबी आहेत.


बागेतून ताटात आता चार प्रकारची लोणचीच येतील.
मका लावावा वाटतोय पण बाग छोटी, झाडं फार झालंय सध्या.
भारतीय दुकानात (खीरीसाठी ) मिळणारा राजगिरा पेरला होता पण उगवला नाही. ३-४ वर्षं माझ्या फ्रिजमध्ये पडुन होता. म्हणुन पण असेल कदाचित.
कुर्डु - बघते. पण कुर्डु नावाची भाजी खायला ( घरातल्या दुसर्या माणसाला ) जरा जास्त कन्व्हिन्स करावं लागेल. आधीच मी बागेतून उगवलेलं काहीही पानात वाढते असा आरोप आहे.
-सिद्धि
वाह!!! मस्त मस्त.
वाह!!! मस्त मस्त.
वाह!
आहा, काय सुंदर दिसतंय हे झाड.
मी ते सेलोसिया/कुर्डूचं झाड लावलं तरी सवयीच्या भाज्या-फळांपलीकडे फार काही खात नाही. मी ते सगळं शोभेसाठीच लावते. येत्या शनिवारी बिया पेरणारे.
राजगिऱ्याचाही बिया फारच थंड झाल्यामुळे उगवल्या नसणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
व्यवस्थापक : हा धागा
व्यवस्थापक : हा धागा बागकामप्रेमी ऐसीकर मध्ये हलवणार का? नंतर शोधायला सोप्पं पडतं. ( मी तीनचार वर्षांपूर्वीचे बागकामाचे धागे धुंडाळत असते बऱ्याचदा. )
-सिद्धि
बागकामप्रेमी ऐसीकर
केले आहे.
ऑटोबान, बर्डस & ब्लुम्स च्या
ऑटोबान, बर्डस & ब्लुम्स च्या फेसबुक पोस्टस फार आवडतात. वेड्यासारख्या आवडतात मला. पक्ष्यांची ओळख होते, व कितीतरी टिप्स मिळतात. पैकी - ते सांगतत, नेटिव्ह रोपे, झुडुपे लावा. आणि वैविध्य ठेवा. तण काढून टाका व मोठाले वृक्षही लावा. ज्यायोगे खूप फुलपाखरे, पक्षी पाहुणेरावळे येतील. बर्फात झुडुपांचा आडोसा या पक्ष्यांकरता निर्माण होतो. तेव्हा हिवाळी झाडे लावाच.
खरंय. आमच्या घराजवळच
खरंय. आमच्या घराजवळच फुलपाखरांसाठीची बाग आहे. कॉलनीतले काही जण तिची निगराणी करतात. (अळ्यांसाठी लागणारी झुडपं लावणे, फुलपाखरांची पैदास वगैरे). नक्की डिटेल्स माहिती नाहीत पण तिथली बरीच फुलपाखरं उडत उडत आमच्या बागेतपण येतात.
पक्षांचे ढोबळ सोडले तर बाकीचे प्रकार फार माहिती नाहीत पण हमिंगबर्ड, किमान दोन ते तीन प्रकारचे चिमणीच्या आकाराचे पक्षी येऊन जाऊन असतात. सध्या घरून काम करत असल्याने दुपारचे जेवण बागेत करतो. पक्ष्यांशी बोलत, त्यांना बोलावत जेवताना आमचा छोटा माणूस मजेत असतो.
-सिद्धि
जेवण बागेत !
हे शक्य नसल्याने जेवणाच्या टेबलावर दोन चार झाडे ठेवून हौस भागवतो.
फुलपाखरांसाठी घाणेरी ( lantana) weed आहेच. इतरही आहेतच. पण करोना आणि डासांसाठी सतत फवारे मारले जात असल्याने हे दोन सोडून सर्व कीटक नष्ट झाले आहेत. असो.
'Garden up' channel छान आहे.
हे दोन सोडून सर्व कीटक नष्ट
हाहाहा
फुलपाखरांना आवडतात अशी
फुलपाखरांना आवडतात अशी तुमच्या भागातली स्थानिक झाडं कुठली ते शोध. साधारणतः छोट्या नर्सऱ्या, वाईल्डफ्लावर सेंटर वगैरेंकडे अशी माहिती, बिया, रोपटी मिळतात. आमच्या इथे एका स्थानिक केबलचॅनलच्या संस्थळावरही अशी बातमी मिळते.
आणि एक उपाय म्हणजे स्थानिक रानफुलांच्या बिया मिळतात. मी हे सगळे प्रकार तिर्रीसाठी करते. फुलांमुळे फुलपाखरं, पतंग, इतर कीटक, मग पक्षी येतात. ती ह्या सगळ्यांच्या मागे लागते. मग माझी करमणूक होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वाह!! खूप मस्त. तिर्री चा
वाह!! खूप मस्त. तिर्री चा हातभार आहे कीटक संवर्धनात तर

टेक्सास, सॅन अँटॉनिओमध्ये भर दुपारी रस्त्यावर फुलपाखरे मरुन पडलेली पाहीलेली आहेत. भोवळ येउन वगैरे मरतात की काय कोण जाणे. काय राक्षसी ऊन असे कधी कधी १०४-११० डिग. फॅरनहाईट वगैरे