IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (अंतिम भाग)

(भाग १)

आता उरलेले चित्रपट.
Roland Reber's Cabaret of Death

रोलां रेबेर्स कॅबरे ऑफ डेथ हा चित्रपटसुद्धा पक्का फेस्टिवलवाला. हे माँटाज नाही, एकच कथानक आहे; पण त्यात अनेक धागे आहेत. प्रेतागारातले मुडदे आहेत; एक ऑनलाइन गेम आहे ज्यात भाग घेणाऱ्यांचा यथेच्छ पाणउतारा केला जातो; शरीराला तंदुरुस्त आणि सुडौल ठेवण्यासाठी घड्याळात गजर लावून वेळच्या वेळी गोळ्या खात बसलेली बाई आहे; खूप म्हातारे रुग्ण आहेत; तारुण्य पांघरून नाच करणाऱ्या बायका आहेत; एक कवी आहे,त्याची बायको आहे, ... चित्रपटाला एक फ्रेंच, बोहेमियन लुक आहे. प्रेक्षकांशी थेट बोलणारा एक विदूषकाच्या रूपातला निवेदक आहे. खूप काही होत रहातं आणि लक्षात येतं, तारुण्याचा सोस आणि सोशल मीडियावर मिरवण्याची हौस यांची ही टिंगल आहे. प्रेक्षक यात आनंदाने सामील होतो; पण खूप कमी जागेत, कमी वेळेत खूप जास्त मसाला कोंबल्यासारखं वाटतं. या गर्दीमुळे आस्वादाला बाधा येते. आणि एकदा चित्रपटाची दिशा कळली की पुढे काही होत नाही, हे जाणवत रहातं.

रशियातल्या दक्षिण भागात रहाणाऱ्या एका वयस्क पुरुषाच्या लक्षात येतं की त्याची तरुण मुलगी पळून जाऊन सीरियातल्या दहशतवाद्यांना सामील झाली आहे. तो विचार करतो आणि ठरवतो की हे आपण गप्प राहून स्वीकारू शकत नाही. तो तिच्या मागे निघतो, जे अर्थातच सोपं नसतं. रशियातून अगोदर तुर्कस्तान आणि तिथून छुप्या मार्गाने, जीव धोक्यात घालून सीरिया, असा तो जातो. तो डॉक्टर असतो आणि सीरियातल्या यादवीमध्ये डॉक्टरांची नितांत गरज असते. तो तिला शोधूनही काढतो; पण पुढे घटना वेगळं वळण घेतात.

Palmyra Ivan Bolotnikov

युद्ध, यादवी युद्धात होणारी सामान्य नागरिकांची ससेहोलपट, त्या वातावरणात नातेसंबंधांचा आणि मानवी भावभावनांचा लागणारा कस, अशा विषयांवर फेस्टिवलमध्ये चित्रपट असतातच. जगभर कुठे कुठे हिंसक संघर्ष चालू असतो आणि तो जेवढा तात्त्विक, तेवढा सामान्यजनांसाठी क्लेशदायक असतो. अशा पार्श्वभूमीवर व्यक्ती तावून-सुलाखून निघतात आणि कलेला मूल्यविधान करण्यासाठी चांगला वाव मिळतो. पण पामिरा हा चित्रपट या अपेक्षांना पूर्ण करत नाही. लोकेशन्स आणि घटना जरी वास्तवदर्शी भासल्या, तरी त्यात दिग्दर्शन किंवा पटकथा यांची जाणती दृष्टी प्रतीत होत नाही. उदाहरणार्थ, बापाचा सीरियात प्रवेश होतो आणि प्रवासात एके ठिकाणी एका स्त्रीला दगडांनी ठेचून मारत असतात. आणखी पुढे कुठल्याशा गुन्ह्याची सजा म्हणून एकाला उंच टाकीवरून ढकलून ठार करण्यात येतं, वगैरे. ‘आपण नंदनवनात रहात आहोत आणि बाहेर सगळीकडे अतिशय भयंकर स्थिती आहे,’ असं मोठ्यांपासून मुलांपर्यंत सगळ्यांवर कसं बिंबवलं जातं, हे मात्र ठसतं. बॉम्बस्फोट होत असताना सर्वसामान्य जीवन कसं चालू असतं, त्या वातावरणातही मुलं कशी बागडत असतात, हे लक्षात येतं. त्या मुलांची मनं कशी घडत असतील, हा विचार मग आपोआप सुचतोच.

पण मुख्य कथानकाच्या आजूबाजूला घडणारं लक्षणीय असलं तरी पामिरा ह्या चित्रपटाची कथा स्वत:च्या गतीने सहज सरकत नाही; ठरवून रचलेली वाटते. अगदी शेवटपर्यंत. (भारतातल्या मुख्य धारेत जर हा चित्रपट बनवला, तर त्याचं नाव ‘फादर इंडिया’ ठेवता येईल!)

फरगॉटन वी विल बी (किंवा 'मेमरीज ऑफ माय फादर') हा चित्रपट कोलंबिया या देशात खरोखर होऊन गेलेल्या एका व्यक्तीवर आहे. एक सत्शील, सद्‌वर्तनी डॉक्टर. त्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. तो कॉलेजात शिकवतो आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. तो घरात जसा वागतो, तसाच बाहेरही वागतो. परोपकारी डॉक्टर. एक आदर्श बाप, आदर्श शिक्षक, आदर्श सामाजिक मूल्यांचा पुरस्कर्ता. पण याचमुळे भ्रष्ट हितसंबंधियांना तो आवडत नाही. त्याच्या घरावर, कॉलेजातल्या त्याच्या दालनावर त्याला ‘कम्युनिस्ट’, ‘फॅसिस्ट’ म्हणत त्याचा निषेध करणाऱ्या घोषणा लिहिल्या जातात. पण तो चांगुलपणा सोडत नाही. लॅटिन अमेरिकेतल्या कोलंबियासारख्या देशात याचा शेवट जो व्हायचा, तसाच होतो: त्याचा खून होतो.

Memories of My Father - Fernando Trueba

या कथेचे दोन उभे भाग पडतात: एक त्याचं कौटुंबिक जीवन आणि दुसरं सार्वजनिक जीवन. बाप म्हणून तो मुलांशी कसा वागतो, घरातलं वातावरण त्याच्यामुळे कसं घडतं, मुलगा कसा होत जातो, हे जेवढ्या सहजतेने, सुरळीतपणे मांडलं जातं; तसं त्याच्या सार्वजनिक जीवनाचं होत नाही. त्याला विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असं सांगितलं जातं पण ते दिसत नाहीत. एक जण दिसत नाही की जमाव दिसत नाही की समाज जाणवत नाही; त्यांचं म्हणणं काय हे कळणं दूर. परिणामी हा अंतर्बाह्य चांगला मनुष्य स्वत:च्या तत्त्वांसाठी सामर्थ्यवान विरोधकांशी मोठ्या हिंमतीने टक्कर घेतो आहे, हे नीटपणे प्रस्थापित होत नाही. त्याचं कौटुंबिक वर्तन मात्र तपशिलांमधून लख्ख दिसतं. ज्यू घरावर दगड मारणाऱ्या स्वत:च्या मुलाला नाझींचा दाखला देणे, हस्तमैथुन या विषयावर त्याच्याशी मोकळेपणाने (आणि सहज) बोलणे अशा कृतींमधून त्याच्यातला कुटुंबवत्सल आणि कर्तव्यदक्ष पुरुष नीट समोर येतो.

आणि हा मनुष्य जरी चित्रपटात ‘खरा’ दिसला; तरी इतका चांगला, निर्दोष, चारित्र्यवान माणूस ‘पुतळा’ वाटतो, वास्तवातला वाटत नाही, याचं काय करायचं? वास्तवात होऊन गेलेल्या माणसावर असली म्हणून कलाकृती श्रेष्ठ ठरत नाही!

ओन्ली ह्यूमन हा सहा निरनिराळ्या कथांचा गुच्छ आहे. त्या एकमेकांशी सैलपणे बांधलेल्या आहेत. त्यांच्यात सामायिक सूत्र म्हणजे समाजातल्या खालच्या स्तरावरच्या सहा लोकांची नशिबं. मॅसिडोनिया नामक देशातली ही कहाणी. एका पदवीधराला कमाईसाठी कबरी खोदण्याचं काम करावं लागतं. एक नुकतीच विधवा झालेली बाई जोगीण होण्यापूर्वी प्रीस्टला इस्टेटीची लालूच दाखवून स्वत:शी सेक्स करायला लावते आणि मग त्याला कळतं की इस्टेटीवर भरपूर कर्ज आहे. एक जुगारडी बाई अवाच्या सवा व्याजाने कर्ज घेऊन बसलेली असते, तिचा बस ड्रायव्हर नवरा ते कर्ज फेडण्याच्या विवंचनेने त्रस्त असतो. एक स्टँडअप कॉमेडियन पोलीसप्रमुखाची टिंगल करतो आणि मग स्त्रीवेशातल्या गुंडांकडून बेदम मार खातो आणि त्याच्यावर बायकांवर हात टाकला, पोलिसांना कर्तव्य पार पाडण्यात अटकाव केला, असल्या आरोपांखाली तुरुंगात जाण्याची वेळ येते. एका रस्त्यावर उभी राहून धंदा करणारीला लहान मुलीसाठी काहीही करून पैसे हवे असतात पण मिळत नाहीत. एक मंदबुद्धी तरुण मुलगा त्याचे सगळे पैसे तिला शांतपणे देऊन टाकतो.

Only Human - Igor Ivanov Izi

एकेका नमुन्याला काहीतरी विशेषण आहे, जे कळत नाही; शेवटचा मंगोल ‘केवळ मनुष्य’ – ओन्ली ह्यूमन. सगळ्या कथा भराभर समोर येतात, सगळी पात्रं चिरडीला आलेली दिसतात आणि एकालाही सुटकेचा रस्ता दिसत नसतो. जे सुटतात ते केवळ नशिबाने. यातून शहर ही व्यवस्था किती अमानुष आहे, हे समोर येतं; परिस्थितीने चेपत नेल्यावर माणसाची स्वाभिमानाची भावना नष्ट होऊन त्याचं कसं चिपाड होतं, हे कळतं; भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनलेलं कुणी त्या व्यवस्थेवर उपाय काढू शकत नाही, हे ज्ञान होतं.

ही ब्लॅक कॉमेडी आहे, असं म्हणता येईल. कारण व्यवस्थेकडून, भ्रष्ट दांडगटांकडून चिरडल्या जाणाऱ्या कोणाचंही चित्रण करूण, सहानुभूतीपूर्वक केलेलं नाही. एखाद्याच्या (वा एखादीच्या) संपूर्ण वाताहतीमुळे प्रेक्षक हेलावून जाऊ शकेल; पण दिग्दर्शन तटस्थ आहे. दिग्दर्शकाची कॉमेंट एवढीच आहे की अशा प्रकारच्या सामाजिक चौकटीत बुद्धीने मंद असलेला तेवढा ‘ओन्ली ह्यूमन’ या नामाभिधानाला पात्र होऊ शकतो.
एक विचार डोक्यात आला: कितीही चिरडलेले लोक झाले तरी शेवटी तो युरोप आहे. आशिया-आफ्रिका इथली स्थिती त्यापेक्षा दारुण आहे. तर असा, म्हणजे सहानुभूतीचे कढ न काढता व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आपल्या इथे होऊ शकेल का? की आपल्या सामाजिक स्वभावातल्या कणव, दया या भावनांमुळे तो बोथट होऊन जाईल?

दर वर्षी एक तरी चित्रपट अर्धवट सोडला, असं होतं. या वर्षी रेड मून टाइड सोडला. मी चित्रपटकलेचा आस्वादक असलो तरी सखोल अभ्यासक नाही. रेड मून टाइडमध्ये चित्रपट या कलामाध्यमाच्या मर्यादांची कसोटी बघण्यात आली आहे. पडद्यावर संधिप्रकाश असतो. कॅमेरा हलत नाही. एखादी मानवाकृती दिसते पण तीही हलत नाही. मागे शब्द ऐकू येतात; पण तेही सावकाश आणि अगम्य. मध्ये एकदा पांढरे घोडे इकडून तिकडे दौडत जातात. असा अनुभव दीडेक तास घेतल्यावर कदाचित या माध्यमाविषयी काही साक्षात्कार होऊ शकेल. ओळखीच्या प्रतिमांमधून अमूर्त कला निर्माण केल्याची खूण पटू शकेल. पण माझ्यात तेवढी चिकाटी नाही.

तर फेस्टिवलचे तेवीस चित्रपट पाहिल्यावर एकंदर संचित काय?

एक म्हणजे चित्रपट जरी (अजून) थिएटरात जाऊन अनेकांच्या सोबतीने बघण्याची कला असली, तरी व्यक्तिचित्रणावर जास्त भर दिलेला जाणवला. समाजाविषयी जरी काही निरीक्षण नोंदवायचं असलं, तरी ते व्यक्तीच्या द्वारेच केलेलं आहे. कॅमेरा पात्रांच्या खूप निकट वावरतो. भारतात याची मुळीच सवय नसते. याबरोबर कॅमेरा हलतोही खूप. म्हणजे, कॅमेऱ्याने चित्र, दृश्य, घटना आपल्या चौकटीत पकडावी आणि ती पाहून प्रेक्षकाने आपलं मत बनवावं, अशी प्रोसेस न होता कॅमेरा अधिकाराने काय बघा, कसं बघा, या सूचना देतो.

अनेकदा मुख्य कथनाच्या पार्श्वभूमीवर बातम्या, संभाषणं, संगीताचे-ध्वनीचे तुकडे ऐकू येतात. त्यातून स्थळकाळाची चौकट सुचवली जाते. म्हणजे, कथा जरी व्यक्तीची / व्यक्तींची असली, तरी ती समाजचौकटीत घडते आहे, हे लक्षात आणून दिलं जातं. यातून चित्रपटाला एक परिमाण जादा लाभतं आणि त्यावर वेगळा वेळ द्यावा लागत नाही. (‘एलिझाबेथ एकादशी’ या मराठी चित्रपटात हे जाणवलं होतं.)

भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मोजक्या चित्रपटांची निवड करणे, हे महाकठीण काम आहे आणि ती निवड कशीही केली तरी सगळ्याचं समाधान होणार नाही. पण चित्रपटकलेकडे गंभीरपणे पहाणाऱ्यांच्या निर्मितीमधून जगातलं जमेल तसं वैविध्य आणण्याचा प्रयत्न जाणवतो. ‘मागच्या फेस्टिवलनंतरच्या काळातले उत्तमोत्तम चित्रपट सादर करण्या’पेक्षा सांस्कृतिक, भौगोलिक वैविध्य समोर येणं मला जास्त समाधानकारक वाटतं. (पुन्हा मी चित्रपट अभ्यासक नाही, हे विसरू नये!)

यात दोन चित्रपट सत्य घटना/अनुभव यांवर आधारित होते. असं कळल्याने आस्वादावर, आकलनावर आणि चित्रपटाच्या मूल्यमापनावर शून्य परिणाम होतो, हे नक्की. यापेक्षा जास्त महत्त्वाचं निरीक्षण असं की एखादा अपवाद सोडला, तर चित्रपट माध्यमातून स्वत:चा, स्वत:च्या समाजाचा, कलेचा, मानवी मूल्यांचा, मानवी अस्तित्वाचा, असा कसला तरी शोध घेणाऱ्या कलाकृती समोर आल्या. कुठेही आत्मगौरवाची, तृप्तीची, वर्चस्वाची भावना जाणवली नाही! तसलं काही असलं तर ते कटाक्षाने टाळायचं असतं, हे किमान फेस्टिवलच्या प्रेक्षकांना कळतंच!

(समाप्त)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चित्रपट कथा आणि ज्या देशाचं समाजचित्रण आहे तिकडे तशा घटना तीस टक्केतरी घडत असाव्यात असे मानायला हरकत नाही. भारताबद्दल बोलाल तर समाजात घटनांचे नाविन्य नसणार किंवा ठराविक प्रकरणांनी कोडगेपणा आलेला. मग चित्रपट कसा काढणार.

पण नेटाने एवढे चित्रपट पाहिलेत, वर्णन ,मतं मांडलीत याबद्दल कौतुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही सगळी लेखमाला आवर्जून वाचली. फार आवडली. पुन्हा रवंथ करणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0