आई-बाबांच्या आठवणी

आई-बाबांच्या आठवणी

बालमोहन लिमये

माझे बाबा आचार्य विष्णु प्रभाकर लिमये स्वातंत्र्यसैनिक होते, संस्कृतचे गाढे पंडित होते, आणि माझी आई डॉ. ताराबाई जोगळेकरसुद्धा स्वातंत्र्यसैनिक होती, उत्कृष्ट स्त्रीरोगतज्ज्ञ होती. खूपच उशीराने विवाह होऊनही त्यांनी उणापुरा ४०-४२ वर्षांचा संसार केला. बाबा स्पष्टवक्ते, तडफदार होते, तर आई सौम्य पण खंबीर होती. ते दोघे अतिशय वेगळ्या प्रकारच्या कुटुंबात जन्मले, वाढले. पण राष्ट्रप्रेम हा दोघांना एकत्र बांधणारा दुवा होता. सामाजिक बांधिलकीवर दोघांची पुरेपूर निष्ठा होती. दोघेही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या निकट संबंधात आले होते. त्या दोघांबद्दलच्या माझ्या आठवणी, आणि त्यांनी स्वतःबद्दल मला सांगितलेल्या गोष्टी मला आजही भूतकाळात घेऊन जातात.

भाग १

बाबांचा जन्म सांगलीला २८ एप्रिल १९०० रोजी झाला. त्यांचे वडील प्रभाकरपंत सांगली संस्थानात पोलिस खात्यात जमादार होते. बाबांचे दोन बंधू, एक बहीण, दोन चुलतबंधू, आणि बालविधवा होऊन घरी परतलेली चुलतबहीण असा परिवार होता. बाबांपेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला त्यांचा भाऊ श्रीपाद खूप तरतरीत व गोरागोमटा होता. बाबांची सर्वांत धाकटी बहीण सखू आत्याबाई हसत हसत म्हणत असे की रूप आणि बुद्धी या बाबतीत आम्हा भावंडांत उतरती भाजणी होती. श्रीपाद अकरा वर्षाचा असताना एक दिवस प्रभाकरपंत बाबांना म्हणाले ‘विष्णु, तुझा दादा गेला.’ प्लेगने त्याचा बळी घेतला होता. बस्स, एवढीच आठवण राहिली होती बाबांना आपल्या मोठ्या भावाची. सांगली हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना बाबांना सांगलीचे ज्येष्ठ पंडित श्रीपादशास्त्री देवधर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेत एखादा विद्यार्थी कितीही अभ्यासू, हुशार व तल्लख असला तरी जेव्हा मॅट्रिक परीक्षेची वेळ येते, तेव्हा ठिकठिकाणच्या अशाच उत्तम विद्यार्थ्यांच्या तुलनेत तो कुठे बसेल याची कुणालाच कल्पना नसते. बाबा जेव्हा १९१७ साली मॅट्रिक परीक्षेला बसले तेव्हा मुंबई इलाख्यात (बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये) सिंध, गुजराथ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक असे सगळे भाग होते. या सबंध इलाख्यात बाबा एकुणात तिसरे आले आणि त्यांनी संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवले. पूर्वीच्या काळी संस्कृत हा खास विषय मानला जाई. म्हणूनच कदाचित् १८८६ सालापासून मॅट्रिक परीक्षेला संस्कृतात गुणानुक्रमे पहिल्या दोन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या, मुंबईचे प्रसिद्ध शिक्षणप्रेमी व्यापारी जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या स्मरणार्थ. पहिली शिष्यवृत्ति महिना १८ रुपयांची आणि दुसरी १२ रुपयांची असे. साहजिकच बाबांना पहिल्या क्रमांकाची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ति मिळाली. त्या काळी १८ आणि १२ ह्या काही छोट्या रकमा नव्हत्या. शिवाय अशी शिष्यवृत्ति मिळालेले अनेक विद्यार्थी नंतर मोठे विद्वान् झाले किंवा मोठ्या पदांवर पोचले. ‘काळ’ या वृत्तपत्राचे जनक आणि निबंधकार शिवराम महादेव परांजपे यांना १८९० साली, तर भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना १९१२ साली पहिली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे ह्या शिष्यवृत्त्यांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. सांगलीसारख्या लहान गावी बाबांच्या या यशाने आनंदाचे उधाणच आले असणार! त्याकाळी
सांगली हे एक संस्थान होते आणि चिंतामणराव धुंडीराव पटवर्धन तिथले राजे होते. वदंता अशी होती की राजेसाहेबांच्या मनात बाबांना आय्. सी. एस्. होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे आहे आणि नंतर त्यांचे आपल्या मुलीशी लग्न करून द्यायचे आहे. पण बाबांचा मानस काही वेगळाच होता. ते कुणाकडून विकत घेतले जाणारे नव्हते.

तब्बल ४३ वर्षांनी १९६०मध्ये मी जेव्हा मॅट्रिक परीक्षेला बसलो, तेव्हासुध्दा या जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्त्यांच्या दरमहा रकमा तेवढ्याच होत्या, सुरुवातीच्या देणगीची नीट गुंतवणूक न केल्यामुळे. मुंबई बोर्डामधून आता सिंध आणि उत्तर कर्नाटक वगळले गेले होते. पश्चिम महाराष्ट्राबरोबर गुजराथ या बोर्डात असण्याचे हे शेवटचे वर्ष. मी एकुणात दुसरा आलो, आणि संस्कृतात दुसरा आल्याबद्दल मला दुसरी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ति मिळाली. या निकालाची स्वतःच्या मॅट्रिकच्या निकालाशी तुलना करताना बाबांनी एका कागदावर ‘३+१ > २+२’ असे लिहिले, आणि म्हणाले ‘३+१ पेक्षा २+२ बरे, कारण कुठल्या तरी एका विषयांत पहिला नंबर येण्यापेक्षा सर्व विषयांत मिळून वरचा नंबर येणे जास्त चांगले’. असे केले माझे अभिनंदन बाबांनी.

सांगलीला १९१७ साली कुठलेच महाविद्यालय नव्हते. (सांगलीचे विलिंग्डन महाविद्यालय जून 1919मध्ये सुरू झाले.) त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाबा विद्येच्या तत्कालीन माहेरघरी म्हणजे पुण्याला आले. तेव्हा पुण्यात तीन कॉलेजे होती. सर्वात जुने पण जरा गावाबाहेर असलेले डेक्कन कॉलेज, गावातले फर्ग्युसन कॉलेज आणि नुकतेच सुरू झालेले न्यू पूना कॉलेज (म्हणजे सध्याचे सर परशुरामभाऊ कॉलेज). बाबांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी. ए.साठी प्रवेश घेतला. ते कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहू लागले आणि विद्यार्थ्यांच्या क्लबमध्ये जेवू लागले. कॉलेजचा आणि रहाण्याखाण्याचा खर्च भागवून शिष्यवृत्तीची उरलेली रक्कम बाबा कौटुंबिक खर्चाकरता सांगलीला पाठवत असत. बाबांची आई त्यांच्या लहानपणीच वारली होती आणि वडील पन्नाशीला आले होते. थोरले चुलतबंधू सांगलीच्या संस्थानात नोकरीला होते, पण त्या दोघांचेही पगार पुरेसे नव्हते. बाबांच्या शिष्यवृत्तीमुळे त्यांचे स्वतःचे शिक्षण तर सुरू राहिलेच, पण कुटुंबाला हातभारही लागला.

कॉलेजच्या पहिल्या वर्षात रँग्लर परांजपे बाबांच्या वर्गाला गणित शिकवायला आले. ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्यही होते. १८९९ मध्ये केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या बी. ए. परीक्षेत गणितात त्यांचा पहिला क्रमांक आल्यामुळे त्यांना ‘सिनियर रँग्लर’ असा किताब मिळाला होता. ही उपाधी मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते. त्यामुळे त्यांचा खूपच नावलौकिक होता. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस गणिताचा कॅल्क्युलस् हा भाग शिकतांना बाबा त्यांत इतके रममाण झाले की परीक्षेच्या आधीचे कित्येक दिवस ते फक्त त्याच भागातील गणिते सोडवत राहिले. तरीही बी. ए.ला मुख्य विषय म्हणून गणिताची निवड करणे बाबांना चालणार नव्हते, कारण जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीच्या नियमाप्रमाणे संस्कृत हा विषय निवडणे अनिवार्य होते. जर शिष्यवृत्ति मिळाली नसती तर बाबांचे शिक्षण तर थांबले असतेच, पण कुटुंबाला होणारी आर्थिक मदतही बंद पडली असती. अशा परिस्थितीत बाबांना गणितापासून दूर रहावे लागले. नाहीतर कदाचित् एक उत्तम दर्जाचा गणिती निर्माण झाला असता. खूप वर्षांनी जेव्हा मी बी. ए. चा अभ्यासक्रम सुरू केला तेव्हा माझ्यापुढेही गणित का संस्कृत हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा बाबांनी मला निक्षून सांगितले ‘बघ, मला कुठला पर्यायच नव्हता, पण तुला मात्र आहे. तू खुशाल पाहिजे ते निवडू शकतोस.’ मी गणित निवडले.

१९१९ साली इंटर आर्ट्सच्या परीक्षेत बाबांना अपेक्षेप्रमाणे संस्कृत विषयाचे ‘विनायक जगन्नाथ पारितोषिक’ मिळाले, जगन्नाथ शंकरशेठ यांच्या चिरंजिवांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेले. कॉलेजमध्ये शिकत असताना बाबांना प्रोफेसर पांडुरंग दामोदर गुणे या प्रसिद्ध भाषापंडिताचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी जर्मनीमधील लैप्झिग् येथील विश्वविद्यालयातून पी. एच्. डी. पदवी मिळवली होती. कॉलेजमधील शेवटच्या तीन वर्षांत बाबांवर लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचारांचा आणि सडेतोड शैलीचा प्रचंड प्रभाव पडला. केसरी वाड्यातील टिळकांची घणाघाती व्याख्याने, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि ते मी मिळवणारच’ असे उद्गार, आणि ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे केसरीतील अग्रलेख वाचून बाबा राष्ट्रीय वृत्तीने भारले गेले. पण १ ऑगस्ट १९२०ला, म्हणजे बरोबर शंभर वर्षांपूर्वी, लोकमान्य टिळकांचे निधन झाले. लगेचच महात्मा गांधींनी राजकीय सूत्रे हाती घेतली, आणि असहकार चळवळीस सुरुवात झाली. नागपूर येथील काँग्रेस पार्टीच्या अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय निश्चित झाले, आणि काँग्रेसने विद्यार्थ्यांना ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली चाललेल्या कॉलेजांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यांचे शिक्षण पुरे करण्याची जबाबदारी चळवळीच्या नेत्यांनी पत्करली. पुण्यात ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’ची स्थापना झाली. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणावर दिलेला खास भर लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ पुण्यांत ‘टिळक महाविद्यालय’ नावाचे कॉलेज ८ डिसेंबर १९२० रोजी ‘टिळक स्मारक समिती’ने सुरू केले होते. बाबांच्या बी. ए.च्या अंतिम परीक्षेला काहीच महिने उरले असताना ते फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांकडे - रँग्लर परांजपे यांच्याकडे - गेले व आपला कॉलेज सोडण्याचा मानस त्यांच्या कानी घातला. परांजपे उद्गारले ‘अरे विष्णु, बी. ए.ची परीक्षा तोंडावर आली आहे. माझ्या मते, तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होशील. तुझी परीक्षा झाल्यावर तू असहकार वगैरे काय म्हणतो आहेस त्यांत भाग घे.’ पण बाबा आपल्या निर्णयापासून जराही डगमगले नाहीत. बाबा त्यांना म्हणाले ‘पदवी मिळाल्यावर सगळेच कॉलेज सोडून जातात. त्याआधी कॉलेज सोडणे हाच तर मुख्य मुद्दा आहे.’ बाबांनी फर्ग्य़ुसन कॉलेजला रामराम ठोकला. त्याबरोबर त्यांची शिष्यवृत्तीही थांबली. या गोष्टीचा बाबांच्या कुटुंबावर आर्थिक परिणाम झालाच. तशात बाबांचे सर्वात मोठे चुलतबंधू वासुदेवराव नुकतेच वयाच्या तिसाव्या वर्षीच निवर्तले होते. तरीही बाबांनी वडिलांशी बोलून आपला निर्णय कायम ठेवला. नंतर चार-एक वर्षात १९२५ साली बाबांचे वडीलही निधन पावले.

एप्रिल १९२१मध्ये टिळक महाविद्यालयाने घेतलेल्या वाङ्मयविशारद (वा. वि.) म्हणजे बी. ए. (टिळक) या परीक्षेत बाबा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ४३ वर्षांनी म्हणजे १९६४ साली मी फर्ग्युसन कॉलेजमधूनच जेव्हा बी. ए. ची परीक्षा गणित हा विषय घेऊन पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो तेव्हा बाबा मला रँग्लर परांजप्यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. गणित विषयात पहिला क्रमांक आला म्हणून मला ‘रँग्लर र. पु. परांजपे पारितोषिक’ मिळाले होते. एव्हाना रँग्लर परांजपे खूप वृद्ध झाले होते. तीनच वर्षापूर्वी त्यांचे ‘84 Not Out’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. मी वाकून नमस्कार केल्यावर ते म्हणाले ‘तुझ्या वडिलांबाबतची माझी इच्छा तू पुरी केलीस’. कदाचित् मी बाबांची गणिताचा अभ्यास करण्याची सुप्त इच्छाही पुरी केली असावी.

लगेच जून १९२१पासून बाबांनी टिळक महाविद्यालयात संस्कृत आणि इंग्रजी विषयांचे अध्यापन सुरू केले, अगदी अल्प वेतनावर. त्यावेळी टिळक महाविद्यालयात शिवराम महादेव परांजपे, नरहर चिंतामण केळकर अशी दिग्गज मंडळी विनावेतन अध्यापनाचे काम करत होती. या सर्वांनी १९२४ साली एका होतकरू तरुणाला पुढे घातले आणि माझे बाबा टिळक महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झाले. तेव्हापासून बाबांना आचार्य लिमये असेच सर्व जण संबोधू लागले. किती वेगळा काळ होता तो! आजकाल आपल्या पदाला चिकटून रहाण्याची आणि आणखी वरचे पद मिळवण्याची धडपड करण्यातच मोठमोठ्यांचे आयुष्य जात असते. असो. याच वर्षी पुण्यात ‘राष्ट्रीय शिक्षण मंडळ’ या संस्थेची स्थापना झाली. तिच्या वाङ्मय, आयुर्वेद, वाणिज्य व स्थापत्य अशा चार शाखा होत्या. सुरुवातीच्या दहा आजीव सेवकांमध्ये बाबा होते. त्यापैकी प्रत्येकाने निदान १५ वर्षे संस्थेच्या कामास वाहून घेण्याची हमी दिली होती. याच संस्थेकडे टिळक महाविद्यालयाचा कारभार सुपूर्द करण्यात आला.

बाबा विद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीहून पुण्याला आले त्या आधी २-३ वर्षे त्यांचे सांगलीचे दोन खास मित्रही पुण्याला पोचले होते. पहिले बाळकृष्ण चिंतामण उर्फ अण्णा लागू, म्हणजे सुप्रसिद्ध नटसम्राट् श्रीराम लागू यांचे वडील, आणि दुसरे रामचंद्र नारायण उर्फ रामभाऊ दातार. नंतर दोघेही एम्. बी. बी. एस्. करण्यासाठी मुंबईला गेले. कॉलेजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन काँग्रेसने केले तेव्हा अण्णा लागूंच्या एम्. बी. बी. एस्.च्या अंतिम परीक्षेला थोडे महिनेच बाकी होते. त्यांनीही राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन असहकार चळवळीत भाग घेतला आणि आपला अभ्यासक्रम सोडून ते पुण्याला परतले. टिळक महाविद्यालयाने योजलेली आयुर्वेदविशारद (आ. वि.) ही परीक्षा अण्णा लागूंनी पास केली. त्या काळचे सगळेच विद्यार्थी काही राष्ट्रीय शिक्षणाकडे वळले नव्हते. बरेच जण बाबा आणि अण्णा अशांची ‘टि. म. वि. चे वा. वि. आणि आ. वि.’ अशी टिंगल करायचे. पण बाबांनी आणि अण्णांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. थोड्याच दिवसात अण्णांनी पुण्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. दरम्यान रामभाऊ दातारांनी एम्. बी. बी. एस्. पदवी मिळवल्यावर मुंबईलाच एम्. एस्. च्या टर्मस् भरल्या आणि काही वर्षे शल्यक्रियेची (सर्जरीची) प्रॅक्टिस केली. त्यांनाही लगेच असहकार चळवळीत भाग घ्यायचा होता, पण त्यांच्या वडील बंधूंनी तसे करू दिले नाही. बऱ्याच वर्षांनंतर पुण्याला शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय हॉस्पिटल सुरू झाल्यावर अण्णांनी रामभाऊंना बोलावून घेतले, आणि तेथे ते शल्यक्रियेचे काम पाहू लागले. असे दातार-लागू-लिमये हे सांगलीचे त्रिकूट परत पुण्यात एकत्र जमले, आणि तिघेही एकदिलाने देशासाठी झटू लागले.

टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य झाल्यावर बाबांना महाविद्यालयातीलच एक खोली रहायला मिळाली. डॉक्टर अण्णा लागूंनी त्यांना आपल्या घरी येऊन रहायची विनंति केली. प्रथम ते येईनात. पण पुढे काही दिवसांनी बाबा मलेरियाने आजारी पडल्यावर अण्णांनी सरळ त्यांना आपल्या कुमठेकर रस्त्यावरील ताई रास्ते राम मंदिराजवळच्या घरी आणून ठेवले. मग बाबा बरे झाल्यावरही अण्णांनी त्यांना जाऊ दिले नाही. पुढील दहा वर्षे म्हणजे १९३४ पर्यंत बाबा एका कुटुंबियाप्रमाणे अण्णांच्या घरीच रहात होते. आज एखाद्या मित्राने मला आवर्जून बोलावले तरी मी फार तर १-२ दिवस त्याच्याकडे जाऊन राहीन. त्यानंतर त्यालाही वाटेल की मी त्याच्याकडून पाय काढता घेतला तर बरे. पण बाबा अण्णांकडे १-२ दिवस नाही, १-२ वर्षे नाही तर तब्बल १० वर्षे राहिले. इतकेच नाही तर कित्येक वेळा अण्णांनी सह्या केलेले पण कुणाचेही नाव वा कुठलीही रक्कम न घातलेले चेक्स बाबांजवळ असत. असे चेक्स बाबा फक्त राष्ट्रकार्यासाठीच वापरतील असा पूर्ण विश्वास अण्णांना होता. या मित्रप्रेमाची तुलना कशाशीही होणार नाही. डॉक्टर अण्णा लागू तर विलक्षणच होते. त्यांनी फक्त बाबांचीच काळजी घेतली असे नाही, तर आपल्या धाकट्या पाच भावंडांचे शिक्षण केले, त्यांचे विवाह योजून दिले आणि इतरही कित्येक जणांना आसरा दिला. प्रदीर्घ काळानंतर बाबांनी आपले बस्तान एका खास मित्राकडून दुसऱ्या खास मित्राकडे - अण्णा लागूंकडून रामभाऊ दातारांकडे - हलवले. १९३४ मध्ये दातारांच्या वाड्यात मागच्या जिन्यावरील एका खोलीत बाबा राहू लागले.

बाबांच्या कुटुंबाच्या अगदी उलट परिस्थिति आईच्या कुटुंबाची होती. तिचे वडील बापूराव जोगळेकर पुणे मुक्कामी ब्रिटिशांच्या शिक्षणखात्यांत अधिकारी होते. तिची आई अहमदाबादच्या पंडित घराण्यातली. तिथेच माझ्या आईचा जन्म १३ फेब्रुवारी १९०५ रोजी झाला. आई सांगे की तिला एक मोठा भाऊ होता. तो इतका गुंजेसारखा लालबुंद दिसायचा की त्याला गुंजा म्हणत असत. पण कुठल्याशा विकाराने तो लहानपणीच मृत्यु पावला. त्या काळी सुखवस्तू घरातही बालमृत्यु विरळा नव्हते. पुण्याला आईच्या लहानपणी घरी संपन्नता होती. आईसह चार भावंडांचे शिक्षण निर्विघ्न पार पडत होते. घरांत वातावरण मात्र कडक शिस्तीचे होते. आईने हुजुरपागा या मुलींच्या शाळेत शिक्षण घेतले. शालान्त परीक्षेत मुंबई बोर्डातील सर्व मुलींमध्ये संस्कृत विषयात सर्वाधिक मार्क मिळवून आईने यमुनाबाई दळवी पारितोषिक पटकावले. इंटर सायन्स परीक्षेतही चांगले मार्क मिळाल्यावर तिने मुंबईच्या ग्रँट मेडीकल कॉलेजमधे प्रवेश घेतला. त्यावेळी पुण्याला एकही वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने मुंबईला जाणे क्रमप्राप्तच होते. घरच्या सुबत्तेमुळे ते शक्य झाले. १९३१ मध्ये एम्. बी. बी. एस् ही पदवी मिळवल्यावर जिद्दीने अभ्यास करून तिने एम्. डी.च्या टर्म्सही भरल्या. ग्रँट मेडीकल कॉलेजशी संलग्न असलेल्या जे. जे. हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर मिसेस् जिराड यांची ती पट्टशिष्या होती. अंतिम परीक्षेच्या वेळी डॉ. जिराड यांच्या एका सहकाऱ्याने एक पेच निर्माण केला. तो डॉक्टर जिराडना म्हणाला ‘प्रॅक्टिकल्समध्ये माझ्या विद्यार्थ्याला तुम्ही पास केले तरच तुमच्या विद्यार्थिनीला मीही पास करेन.’ ही अट डॉ. जिराडना बिलकुल मान्य नव्हती. परिणामी आईच्या वाट्याला अपयश आले. हे शल्य वर्षानुवर्षे आईच्या मनांत सलत होते. मी लहान असतांना एका रात्री आई बेचैन होऊन जागी झाली. मी विचारले तर म्हणाली की आपण एम्. डी. च्या परीक्षेला पुनः पुनः बसत आहोत असे स्वप्न तिला पडत होते.

आई १९३४ साली एम्. डी. ही पदवी न मिळवताच मुंबईहून पुण्याला परतली. तेव्हा भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन जोरात फोफावत होते. एकीकडे देशभक्तीच्या विचारांनी ती भारावून जात होती, तर दुसरीकडे आपली वैद्यकीय पेशातली उमेदवारी कुठे करावी असा तिच्यापुढे प्रश्न होता. काही महिन्यातच पुण्यातील डॉ. रामभाऊ दातार यांच्या हॉस्पिटलमध्ये तिला ही संधी मिळाली. डॉ. दातार हे त्या काळातील पुण्यातील सर्वोत्तम सर्जन तर होतेच पण स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मोठे पुरस्कर्ते होते. आईदेखील या वातावरणाशी इतकी समरस झाली की ती खादीचे कपडे वापरू लागली आणि काँग्रेसने आयोजित केलेल्या सभांना जाऊ लागली. जे देशकार्याला वाहून घेणारे बाबांसारखे कार्यकर्ते होते त्यांच्या अधिकाधिक संपर्कात येऊ लागली. आता याच सुमारास बाबांचे दातारवाड्यात राहायला लागणे हा कर्मधर्मसंयोगच म्हटला पाहिजे. दातार-लागू-लिमये-जोगळेकर अशी चौकड आता बनली होती. हळूहळू आई व बाबा यांच्यातला संवाद सुरू झाला. दोघेही राष्ट्रभक्तीने भारावलेले, दोघांनाही देशासाठी जितके काही करता येईल तितके करण्याची तळमळ. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी दोघांनीही कायमचे अविवाहित राहायचे ठरवले. त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदरभावना होतीच, पण त्याबरोबर एक प्रकारची ओढ व अव्यक्त प्रेमही.

१९२९च्या डिसेंबर महिन्यात लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज्या’ची घोषणा करण्यात आली आणि १९३०मध्ये वैयक्तिक कायदेभंगाची देशव्यापी चळवळ सुरू झाली. १९३२च्या मार्च महिन्यामध्ये मुंबई प्रांताच्या सरकारने टिळक महाविद्यालय बेकायदेशीर ठरवले. त्यामुळे बाबा काँग्रेसचे पूर्ण वेळाचे कार्यकर्ते बनले. १९३४मध्ये त्यांनी कायदेभंगाबद्दल तीन महिने कारावासाची शिक्षा भोगली. तशातच १९३५मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने हिंदुस्थानातील प्रांतांना काही प्रमाणात स्वायत्तता देण्यासंबंधीचा ठराव हिंदुस्तानातील लोकांच्या विरोधाला न जुमानता पास केला, आणि या कायद्याच्या प्रांतिक घटनेचा भाग १ एप्रिल १९३७पासून अमलात आणला. कायद्यातील अपुऱ्या व चुकीच्या तरतुदींमुळे बाबांसारख्या कार्यकर्त्यांनी या घडामोडीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण नंतर जेव्हा काँग्रेसने या कायद्याचा विशिष्ट दृष्टीने, एक पवित्रा म्हणून, उपयोग करण्याचे व आपले बहुमत असलेल्या प्रांतात अधिकार स्वीकारण्याचे ठरवले, तेव्हा बाबांना तितका हुरूप नसला तरी तिकडे लक्ष देणे भाग पडले. शिवाय इतक्या वर्षांनी काँग्रेस कायदेमंडळात व मंत्रिमंडळातही शिरली या गोष्टीचा साहजिकच आपलेपणा वाटून त्यांना अधिक स्फुरण चढले. पूर्ण अभ्यास करून प्रांतिक स्वराज्य? हे ५४८ पानी पुस्तक बाबांनी लिहिले. पुस्तकाच्या शीर्षकातील प्रश्नचिह्नाने अद्याप पूर्ण प्रांतिक स्वराज्य मिळालेले नाही, पण लौकरच ते मिळणार ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. टिळक पुण्यतिथी १ ऑगस्ट १९३८ रोजी डॉ. रा. ना. दातार यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. किंमत होती ३ रुपये! पुस्तकाच्या निवेदनात बाबांनी आपला उद्देश असा लिहिला होता: ‘१९३५चा कायदा ‘अधर्मरूप’ असून तो ‘धर्मरूपाने’ वावरत आहे. तेव्हा या अधर्माचा नाश करून आपणास ‘धर्माची’ संस्थापना करायची आहे. ही गोष्ट सिद्ध होण्यास ‘अधर्माचे’ आपणास संपूर्ण ज्ञान असले पाहिजे. हे ज्ञान चार-दोन लोकांपुरतेच न राहता त्याचा प्रसार सर्वसाधारण जनतेत झाला पाहिजे, निदान राष्ट्राच्या अभ्युदयार्थ झटणाऱ्या व खेड्यापाड्यातून पसरलेल्या असंख्य लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना तर या कायद्याचे सांगोपांग मर्म समजले पाहिजे, हे कोणीही कबूल करेल. मुख्यत: या वर्गासाठी प्रस्तुत ग्रंथ लिहिला आहे. अनुषंगाने त्याचा उपयोग शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, कायदेमंडळाचे सभासद व सर्वसामान्य राजकारणजिज्ञासु वाचक इत्यादि लोकांना होईल हा भाग वेगळा.’

पुस्तकात १९३५च्या कायद्यातील प्रांतिक विभागाच्या सर्व कलमांचे शब्दशः मराठीत भाषांतर आणि महत्त्वाच्या सगळ्या विषयांचे विस्तृत विवरण दिले आहे. घटनाकायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतःच्या सूचना केल्या आहेत. भाषांतरामध्ये बॅरिस्टर सावरकरांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सुचवल्याप्रमाणे मराठीतील नव्या नामधातूंचा (जसे आरंभिणे, शिफारसणे) उपयोग केला आहे. उलटपक्षी, ‘सावरकरांनी प्रोत्साहन दिलेल्या भाषाशुद्धीची (म्हणजे इंग्रजी शब्द कटाक्षाने टाळण्याची) चळवळ मला योग्य मर्यादेपर्यंत मान्य आहे, परंतु तिचा अतिरेक मान्य नाही व भाषेलाही तो शेवटी खपणार नाही’ असे स्पष्टपणे व दूरदृष्टीने लिहिले आहे. निवेदनाच्या शेवटी ‘आता ग्रंथाच्या बाह्यांगाबद्दल मुद्रकाला व अंतरंगाबद्दल लेखकाला नावे ठेवणे अगर त्यांची पाठ थोपटणे हे सर्वस्वी वाचकांच्या हाती आहे’ असे म्हणून निरोप घेतला आहे.

पुस्तकातील विषम अंकी पानांवर बाबांनी मार्मिक मथळे दिले आहेत, जसे ‘सुसरीने गिळलेले माणिक काही लपून रहात नाही’, ‘मासा गळाला अडकला’, ‘फौज निजामाची हुकमत इंग्रजांची’, ‘हिंदुस्तानची चिरफाड’, ‘ऊस व भोपळे यांची गाठ?’, ‘गव्हर्नरचे कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं अधिकार’, ‘दुसऱ्यांची सत्ता असेपर्यंत आपले राज्य कसले?’ इत्यादि. पुस्तकाच्या उपसंहारात बाबांनी काही परखड विचार मांडले आहेत. ‘इंग्रज गेले तर आमचे कसे होईल या काळजीतच आमच्या पारतंत्र्याचे मूळ आहे’, असे बजावून जेव्हा ‘सत्याग्रही राष्ट्राची भूमिका ‘अलमेव शमायास्मि तथा युद्धाय भारत’ म्हणजे शांतीची तयारी आहे आणि जरूर पडल्यास लढायचीही’ असे बाबा लिहितात, तेव्हा त्यांच्यात भिनलेल्या लोकमान्यांची साक्ष पटते. स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध असल्याचा जो ‘मंत्र’ टिळकांनी दिला त्याचे ‘तंत्र’ गांधींच्या अहिंसक मार्गातच आहे, आणि त्याच्या आचरणाने हिंदी राष्ट्र लवकरच स्वतंत्र होणार असा विश्वास बाबांनी व्यक्त केला आहे. बाबांच्या या पुस्तकाची सूचि त्यांचे फर्ग्युसन कॉलेजपासूनचे मित्र प्रा. रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर यांनी मोठ्या कौशल्याने तयार केली. सूचीतील ‘प्रांतिक स्वराज्य?’ या नोंदीखाली ग्रंथकर्त्याची स्वतंत्र मते आणि टीका संकलित करून ग्रंथाची उपयुक्तता वाढवली आहे.

बाबांच्या या पुस्तकाचा, किंबहुना त्या काळी लिहिलेल्या यासारख्या पुस्तकांचा, कितपत राजकीय प्रभाव पडला हे त्या परिस्थितीतून गेलेल्या माणसांनीच ठरवायचे आहे. मात्र बाबांची अभ्यासू वृत्ति आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा या पुस्तकाच्या पानापानात दिसून येतो.

माझी आई एकीकडे वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवून राष्ट्रीय आंदोलनाला होईल तितकी मदत करत होती. तसेच सत्याग्रह, कायदेभंग इत्यादी कार्यक्रमात स्वतः भाग घेत होती. घरोघरी जाऊन लोकांना कॉंग्रेस पक्षाची तत्त्वे पटवून द्यायची, त्यांना पक्षाचे सभासद बनवायचे, देणग्या मिळवायच्या ही कामे ती हिरिरीने करत होती. या कुठल्याच गोष्टी बापूरावांना म्हणजे आईच्या वडिलांना बिलकुल पसंत नव्हत्या. कायदेभंग केल्याबद्दल आईला शिक्षा झाली की बापूराव जामिनाची रक्कम भरून तिला सोडवून आणत. आईला याचे खूप वाईट वाटायचे, दंड भरून अशी सुटका होणे तिच्या जिवावर यायचे. मग एके दिवशी पहाटे उठून आई अण्णा लागूंबरोबर गांधीजींना भेटायला वर्ध्याजवळच्या सेवाग्राम आश्रमात गेली. होत असलेला प्रकार त्यांच्या कानी घातला. गांधींनी आईला एवढेच सांगितले की स्वीकारलेल्या कार्यापासून बिलकुल परावृत्त होऊ नकोस, बघू या किती वेळा तुझे वडील तुझी सुटका करून घेतात ते! शेवटी बापूरावांनी आईला निर्वाणीचा इशारा दिला की काँग्रेसच्या कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल तर तिला घर सोडावे लागेल. मला आईने सांगितलेले चांगले आठवते की बापूरावांचे हे शब्द ऐकताच ती नेसत्या कपड्यांनिशी घराबाहेर पडली, फक्त दोन-चार गोष्टी एका छोट्या पिशवीत घेऊन. तिच्याकडे एम्. बी. बी. एस्. ही वैद्यकीय पदवी होती हे खरे, पण त्याहीपेक्षा तिच्याकडे प्रासंगिक धैर्य आणि आपल्या विचारांवरची अपार निष्ठा होती. या प्रसंगानंतर घरच्यांपैकी फक्त तिच्या पाठचा भाऊ माधव जोगळेकर तिच्या संपर्कात असे. अन्य मार्गाने का होईना, पण त्याचा स्वातंत्रयुद्धाला पाठिंबा होता.

याआधीच आई डॉक्टर दातारांच्या ओळखीने पुण्याच्या शेट ताराचंद रामनाथ रुग्णालयांत शल्य शाखेतील काम पाहू लागली होती. यासाठी कुठलेही मानधन तिला मिळत नसे. फक्त टांगाभाडे देऊ करत, पण ते तिने कधीच घेतले नाही. १९३६मध्ये तिने लक्ष्मी रोडवर कॉमनवेल्थ बिल्डींगच्या शेजारच्या नेने वाड्यांत दोन खोल्या भाड्याने घेऊन आपला दवाखाना सुरू केला. दवाखान्याच्या झाडलोटापासून सर्व कामे तीच करत होती. पुढे वर्षभराने तिने लक्ष्मी रोडवरच गोखले हॉलसमोर दवाखान्यासाठी आणि रहाण्यासाठी भाड्याने जागा घेतली. पुण्यातल्या अगदी सुरुवातीच्या मोजक्या स्त्री-वैद्यकांपैकी ती एक होती. रस्त्यावरून दिसणाऱ्या ‘डॉ. ताराबाई जोगळेकर दवाखाना’ या माडीवरच्या पाटीवर राष्ट्रीय निशाण तिने जाणीवपूर्वक लावले.

राष्ट्रभक्ति हेच व्रत मानल्यावर तिच्यामध्ये एक प्रकारचा हजरजबाबीपणा, बाणेदारपणा आला. त्याच बरोबर सौम्य पण ठाम बोलणे हा तिच्या स्वभावाचा एक भागच बनून गेला. त्याचा एक नमुना असा. १९४२ साली ‘चले जाव’ची चळवळ सुरू होती. तो १२ ऑगस्टचा दिवस होता. बुधवार पेठेतील जमाव पांगवण्यासाठी अप्पा बळवंत चौकात आणि नगरकर तालीम चौकात ब्रिटिश शिपायांनी गोळीबार केला. तेथून रणगाडे लक्ष्मी रोडने लकडी पुलाकडे जात होते. पुढे पोलिसांच्या मोटारीत बसून एक ब्रिटिश अधिकारी देखरेख करत होता. आईच्या दवाखान्याच्या पाटीवरील झेंडा त्याच्या दृष्टीस पडला, तशी त्याने आपली मोटार थांबवली. त्याबरोबर सगळे रणगाडे पण थांबले. ब्रिटिश अधिकारी हातात रिव्हॉल्वर घेऊन खाली उतरला. वाड्याच्या तळमजल्यावरील ‘पैसा फंड वस्तुभांडार’ या दुकानाचे मॅनेजर सातपुते वाड्याच्या लोखंडी दारापाशी उभे होते. त्यांना या अधिकाऱ्याने माडीवर लावलेले निशाण काढायला सांगितले. त्यांनी नकार दिल्यावर तो चिडला. त्यांची गचांडी पकडून तो अधिकारी जिना चढून वर आला. ही गडबड ऐकून आई दवाखान्यांत काम करणाऱ्या स्त्रियांसह त्याला सामोरी गेली. आपल्याला काय पाहिजे आहे असे विचारता तो अधिकारी ‘मला तुमचे हे निशाण पाहिजे आहे’ असे म्हणाला. तेव्हा दोघांच्यात असे बोलणे झाले.

ताराबाई : राष्ट्रीय निशाण बाळगणे हा काही गुन्हा आहे का?

ब्रिटिश अधिकारी : या निशाणामुळे गावात रक्तपात होत आहे.

ताराबाई : या निशाणाखाली रक्तपात होणार नाही असे मी तुम्हाला आश्वासन देते.

ब्रिटिश अधिकारी : मला ते निशाण द्या, नाहीतर मी तुम्हाला गोळी घालीन.

ताराबाई : तुम्हाला हवी तर घाला गोळी. पण मी जसा तुमच्या निशाणाला मान देते तसा तुम्हीही माझ्या निशाणाला मान द्यावा अशी मी तुम्हाला विनंति करते.

या संभाषणानंतर तणतणत तो अधिकारी निघून गेला. त्याची मोटार आणि रणगाडे चालते झाले, पण दवाखान्याच्या पाटीवरचा राष्ट्रीय झेंडा तसाच दिमाखात फडफडत राहिला. श्रीयुत ना. भि. परुळेकर चालवत असलेल्या पुण्याच्या दैनिक 'सकाळ'मध्ये ह्या प्रसंगाची इत्थंभूत हकिकत १५ ऑगस्ट १९४२ रोजी छापून आली. राष्ट्रीय निशाणाचे रक्षण केल्याबद्दल हिंदुमहासभेचे पुण्यातील एक कार्यकर्ते गणपत महादेव नलावडे आईचे अभिनंदन करायला आले, मग ते निशाण भलेही कॉंग्रस पक्षाचे असो! बापूरावांचे - आईच्या वडिलांचे - तिला पत्र आले, निशाण उतरव म्हणून. मात्र आईने ठरवले की आता तर ते निशाण मुळीच काढायचे नाही. हा प्रसंग घडत असताना दवाखान्यातील बाळंतिणींपैकी एक होती सुशीला वर्तक. तिला मुलगी झाली असती तर तिचे नाव तारा असे ठेवले असते, ताराबाईंनी ज्या धीरोदात्तपणे आपल्या निशाणाचे आणि जवळपासच्या सर्वांचे रक्षण केले त्याची स्मृति म्हणून. पण त्यांना झाला होता मुलगा! मग त्याचे नाव ताराप्रकाश असे ठेवले, महाराष्ट्रात कुठेही न आढळणारे. हे सगळे मला ताराप्रकाश प्रभाकर वर्तक याने स्वतः नुकतेच सांगितले, माझ्या प्राथमिक शाळेतल्या विजय धडफळे या वर्गमित्राचा तो दोस्त निघाला!

१९४० साली वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल एक वर्षाचा तुरुंगवास भोगल्यानंतर बाबा पुन्हा आपल्या ब्रिटिशविरोधी कार्यक्रमात गढून गेले होते. आई ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबरच्या खडतर प्रसंगातून गेली होती. तशात गांधीजींनी ‘चले जाव’ची चळवळ पुकारली. या चळवळीत भाग घेतलेल्यांना अनिश्चितकालीन स्थानबद्धतेची (Indefinite Detention) शिक्षा होत असे. बाबांना पुण्याजवळ येरवड्याच्या तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आले. तर आईची रवानगी बेळगावजवळ हिंडलग्याच्या तुरूंगात झाली. त्या तुरूंगात कॉलऱ्यासारख्या अतिसाराची साथ सुरू झाली आणि काही कैदी मृत्युमुखी पडले. आईला पण त्या साथीने पछाडले. कित्येक वर्षापासून आईला पोटाची व्यथा होतीच. त्यात हा विकार खूप बळावला आणि आई थकत गेली. हिंडलग्याहून पुण्याला तार आली की ताराबाईंची काही शाश्वती नाही. एक बातमीही आली होती की ताराबाई गेल्या, पण त्या ताराबाई वेगळ्याच होत्या असे निष्पन्न झाले. बाबांप्रमाणे त्यांचे राजकीय सहकारी डॉक्टर अण्णा लागू येरवड्याच्या तुरुंगातच बंदिवान होते. पण त्यांनी आपल्या नुकत्याच बाळंत झालेल्या पत्नीला आपले एक डॉक्टर मित्र माधवराव जोशी यांच्यासोबत ताराबाईंची विचारपूस करायला स्वतःच्या मोटारीतून हिंडलग्याला पाठवले. आतासारखी ‘antibiotics’ तेव्हा मिळत नसत. अतिसाराचा रोग संसर्गजन्य असतो. एका ओल्या बाळंतीणीला तेथे पाठवणे किती धोक्याचे होते! आपल्या सुहृदांना मदत करतांना अण्णा लागू मागे पुढे पहात नसत.

बाबा आणि आई एकाच ध्येयाने गेली सात-आठ वर्षे एकत्र काम करत होते. दोघांनीही देशकार्य पूर्णतः करता यावे म्हणून जन्मभर विवाह न करण्याचा निश्चय केला होता. तरीही येरवड्याच्या तुरुंगात बाबांच्या मनांत कालवाकालव सुरू झाली. हा प्रसंग बाका होता. बाबांनी कित्येक वर्षांनंतर मला सांगितले की ताराबाईंचा देहान्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यावर त्यांनी मनोमन ठरवले की या व्याधीतून ताराबाई जगल्या वाचल्या तर त्यांना आपण विवाहाचा प्रस्ताव करावा. आणि तसेच झाले. येरवड्याच्या तुरूंगातून हिंडलग्याच्या तुरूंगाकडे एका पोस्टकार्डावर हा निरोप गेला. कार्डावर तुरुंगाधिकाऱ्याचा शिक्काही होता, काही आक्षेपार्ह मजकूर नसल्याची निशाणी म्हणून. प्रकृति सुधारल्यावर आईने अनुमति दर्शवली, तीही एका पोस्टकार्डावरच. पण दोघे लांबवरच्या तुरुंगात, आणि त्यात दोघांनाही ठराविक मुदतीची शिक्षा झालेली नसल्याने सरकार कितीही काळपर्यंत डांबून ठेवू शकत होते. म्हणून दोघांनी ठरवले की आपापल्या जेलरकडे १५ दिवसांनी परतण्याच्या हमीवर बाहेर जाण्याचा (पॅरोलचा) अर्ज करायचा. आश्चर्य असे की दोघांचेही अर्ज मान्य झाले. बाबा आणि आई दोघे पुण्याला येऊन दाखल झाले.

बाबांचे आई-वडील फार पूर्वीच मृत्यु पावले होते. आईचे आई-वडील पुण्यालाच होते. पण तिच्या वडिलांचा ह्या लग्नाला कडाडून विरोध झाला. ते अपेक्षितच होते. ब्रिटिशांच्या नोकरीतील एक शिक्षणाधिकारी आपल्या मुलीचे लग्न कोणतीही नोकरी नसलेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाबरोबर लावून देण्यास कसा तयार होईल? तेव्हा बाबांचे समवयस्क मित्र रंगनाथ दत्तात्रय वाडेकर यांनी कन्यादान करायचे ठरले. तेब्हा ते संस्कृत आणि पाली या भाषांचे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. रविवार १३ जून १९४३ रोजी विष्णुपंत लिमये आणि ताराबाई जोगळेकर यांचा विवाह डॉक्टर अण्णा लागू यांच्या ‘रमा निवास’ या लक्ष्मी रोडवरील निवासस्थानी वैदिक पद्धतीने साजरा झाला. स्वतः तुरुंगात असल्याने अण्णा लागू मात्र या समारंभास हजर नव्हते. या प्रसंगी सेनापति बापट यांचे वधूवरांना आशीर्वाद देणारे भाषण झाले. वधूवरांच्या वतीने डॉक्टर रामभाऊ दातार यांनी लोकोपयोगी काम करणाऱ्या दहा संस्थांना प्रत्येकी शंभर रुपयांची देणगी जाहीर केली. ही सगळी बातमी दुसऱ्या दिवशीच्या 'दैनिक सकाळ'मध्ये छापून आली. बातमीच्या शेवटी ‘वधूवरांची नुकतीच तुरुंगातून पॅरोलवर सुटका झाली असून त्यांची वये अदमासे ३८ आणि ४३ अशी आहेत’ असे पुणेरी पद्धतीचे खवचट वाक्यही होते. विवाहाच्या दिवसानंतर बाबा आईच्या घरी लक्ष्मी रोडवर गोखले हॉलसमोर राहायला आले. पण पंधरा दिवसांचा पॅरोल संपण्याच्या आधीच गाशा गुंडाळून दोघे आपापल्या तुरुंगात रवाना झाले. अशी आहे माझ्या आई-बाबांच्या लग्नाची अलौकिक गोष्ट!

काही महिन्यानंतर बाबांची येरवड्याच्या तुरुंगातून व आईची हिंडलग्याच्या तुरुंगातून सुटका झाली. तेव्हापासून बाबांचा मुक्काम ‘९२५ सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड, गोखले हॉल समोर, पुणे २’ या पत्त्यावरच असायचा. मात्र आईच्या दवाखान्यावरील पाटी ‘डॉ. ताराबाई जोगळेकर’ अशी होती ती आता ‘डॉ. ताराबाई लिमये (जोगळेकर)’ अशी झाली. सुरुवातीला आईने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या आठ खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. स्वतः राहायची जागा, बाह्यरुग्णविभाग, प्रसूतिकक्ष, बाळंतिणींच्या राहायच्या खोल्या आणि स्वयंपाकघर सगळे जवळपास. नंतर पसारा वाढल्यावर तिने दुसऱ्या मजल्यावरच्या आणखी चार खोल्या भाड्याने घेतल्या. आपली राहायची जागा आणि सगळ्यांचे स्वयंपाकघर वर हलवले. आता दवाखान्यात एका वेळी चौदा बाळंतिणी राहू शकत. या सगळ्यावर तिची बारीक नजर असे, आणि आता तर तिचे यजमानही राहायला आलेले होते.

बाबा विनोदाने मला म्हणत ‘प्रथम अण्णा लागूंच्याकडे दहा वर्षे, नंतर रामभाऊ दातारांच्याकडे आठ वर्षे, आणि आता मी तुझ्या आईकडे राहत आलो आहे.’ ते खरेच होते. काही महिन्यांची एक संपादकीय नोकरी सोडली तर बाबांनी उभ्या आयुष्यात कधीच पैसे कमावले नाहीत. त्यांच्या राजकीय, सामाजिक, तसेच अध्ययन-अध्यापनविषयक अशा सर्व व्यवहारांसाठी लागणारे आर्थिक बळ आईनेच पुरवले.

सुमारे एक वर्षाने माझा जन्म झाला. त्या आधी महात्मा गांधी पुण्याला आले असताना त्यांनी बाबांना लिहिलेले एक छोटेखानी पत्र अजूनही माझ्याकडे आहे. त्याची फोटो-कॉपी अशी :

Gandhiji Letter

गांधीजींनी आपल्या हस्ताक्षरात गुजराथी लिपीच्या धर्तीवर पण हिंदीत लिहिले होते,

‘पुना १९४४. भाई लिमये, कल तो मै मिल नही सकुंगा. यहां से मुक्त होनेपर अवश्य सेवाग्राम आना. ताराबाईकी प्रसूति निर्विघ्न होगी ऐसी आशा है. मेरे आशीर्वाद तो है ही. बापूके आशीर्वाद.’

गांधीजींनी सुचवल्याप्रमाणे मी तान्हा असताना खरोखरीच आई-बाबा मला गांधीजींकडे घेऊन गेले. गांधीजींनी मला त्यांच्या मांडीवर घेतले. त्या काळी आजच्यासारखे उठसूट फोटो काढण्याची पद्धत नव्हती हे खरे आहे, पण या प्रसंगाचा कोणी फोटो काढला असता तर तो आई-बाबांनी आणि नंतर मी अभिमानाने संग्रही ठेवला असता. माझ्या गळ्यात कोणीतरी दिलेली सोन्याची साखळी होती. बापूंनी ती काढून टाकायला सांगितले.

Balmohan Limaye with parents, 1945

बाबा, आई आणि मी (१९४५)

बारशाच्या आधी माझ्या नामकरणाचा मुद्दा निघाला. बाळ गंगाधर टिळक हयात असेपर्यंत म्हणजे १९२० सालापर्यंत बाबा त्यांना आदर्श मानीत. त्यानंतर बाबा व आई दोघेही मोहनदास करमचंद गांधी यांचे अनुयायी होते. या दोन नेत्यांच्या नावाचा मिलाप माझ्या नावात व्हावा अशी आई-बाबांची इच्छा होती. म्हणून प्रचलित नावांपैकी एखादे नाव न निवडता त्यांनी माझे नाव बालमोहन असे ठेवले. त्यांना दादर येथे शिवराम दत्तात्रय रेगे यांनी १९४० मध्ये सुरू केलेल्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेची माहिती होती किंवा नाही याची कल्पना नाही. परंतु इतर कुठेही बालमोहन हे नांव माझ्या ऐकिवात आले नाही. मला बाबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. मी सहा वर्षांचा असताना त्यांनी मुंबईच्या 'नवभारत' दैनिकाचे संपादक म्हणून काही महिने काम केले. बाबा दर सोमवारी सकाळी पुण्याहून मुंबईला जायचे व शनिवारी परतायचे. आपल्या पहिल्या संपादकीयामध्ये त्यांनी ‘मी बालमोहनाची मूर्ती डोळयासमोर ठेवून कामगिरी बजावणार आहे’ असा उल्लेख केला होता. याचे दोन अर्थ किती जणांच्या लक्षांत आले असतील कोण जाणे.

माझ्या जन्मानंतर आईच्या शरीरातील खूपशी हाडे दुखू लागली. आई डॉक्टर आणि त्यातही प्रसूतितज्ज्ञ असल्याने तिच्या लगेच लक्षात आले की आपल्या शरीरातले बरेचसे कॅलशियम आपल्या मुलाला घडवण्यात खर्ची पडले आहे. त्यामुळे बाबा मला ‘कॅलशियम चोर’ म्हणत असत. खूप नंतर आईने मला एक गुपित सांगितले. लग्नाच्या आधीपासूनच आईची प्रकृति खालावलेली होती. मी झालो तेव्हा ती चाळिशीच्या जवळ आली होती. माझ्या जन्मानंतर तर तिची तब्येत अगदीच तोळा-मासा झाली. अशा परिस्थितीत आई-बाबांना आणखी संतति नको होती. बाबांना वाटत होते की दुसऱ्या गरोदरपणाचा आईला खूप त्रास होईल. पण आईच म्हणाली की मोठेपणी बालमोहनला जगात कोण असणार, आपण तर लवकरच जाणार; शिवाय एकट्या वाढलेल्या मुलाचा स्वभाव समतोल नसतो. विचारांती दुसरे मूल होऊ द्यायचे ठरले. दोन वर्षांनी माझी बहीण मीरा जन्माला आली. त्यानंतर आईच्या शरीरातली हाडे इतकी कमजोर झाली की तिला उभे रहाणे पण कठीण जाऊ लागले. पण तरीही बाळंतपणासाठी कोणी महिला आली की एकदोन परिचारिका दुसऱ्या मजल्यावरील घरातून आईला उचलून पहिल्या मजल्यावर हॉस्पिटलमध्ये घेऊन जात, आणि तिने बाळंतपण केले की परत उचलून वर घेऊन येत. त्या दिव्यातूनही आई बाहेर पडली.

दातार, लिमये आणि लागू या जिवलग मित्रांची घरे एकमेकांपासून जवळच होती. सदाशिव पेठेच्या हौदापलिकडे बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीटवर दातारवाडा, लक्ष्मी रोडवर गोखले हॉलसमोर लिमयांचे घर, तर लकडी पुलाच्या अलीकडे लक्ष्मी रोडवरच लागूंचा 'रमा निवास' हा बंगला. अण्णा लागूंची इच्छा होती की आपल्या धाकट्या बहिणीचे लग्न सर्जन रामभाऊ दातार यांच्याशी व्हावे. पण तसे स्वतः सुचवायला त्यांना अवघड वाटले. तेव्हा अण्णांनी माझ्या बाबांकरवी ही सूचना केली. रामभाऊंनी होकारही दिला. तीन मित्रांची घरे वेगवेगळी असली तरी घरोबा सगळीकडे सारखाच होता. तिन्ही घरांतील मुले मोकळेपणे एकदुसऱ्यांकडे जायची. आमच्या सगळ्यांच्यात सर्वात मोठा श्रीराम लागू. त्याला आम्ही श्रीरामदादा म्हणायचो. त्याची धाकटी बहीण शकुंतला. तिला आम्ही शकुताई म्हणायचो. दातारांची मुले माझ्या बाबांना मामा म्हणायची तर माझ्या आईला मावशी. त्यांची मोठी मुलगी मंदा हिने एकदा माझ्य़ा बाबांना विचारले की मामा आणि मावशी यांचे लग्न कसे होऊ शकते? त्यावर बाबा तिला म्हणाले ‘तथाकथित मामाचे तथाकथित मावशीशी लग्न होऊ शकते’. कदाचित् मंदाला तथाकथित (so called) या शब्दाचा अर्थ उमगला नाही. तेव्हा बाबा तिला म्हणाले ‘बालमोहन तुझ्या वडिलांना काका म्हणतो आणि तुझ्या आईला आत्या म्हणतो; म्हणजे काका आणि आत्या यांचे जसे लग्न होऊ शकते, तसेच.’ याने मंदाचे समाधान झाले असावे. काही काळाने मंदाला पडला तसाच पण जरा वेगळा प्रश्न मला पडला. वाडेकर आजोबा मला अगदी बाबांच्या वयाचे दिसत होते, आणि त्यांचे लग्नही झाले नव्हते. मग त्यांना काका न म्हणता आजोबा का म्हणायचे? तेव्हा मला आई-बाबांच्या लग्नाची पुरी गोष्ट माहीत नव्हती. ती सगळी सांगून आई म्हणाली ‘आता सांग, माझे कन्यादान ज्यांनी केले, ते तुझे आजोबाच लागतात ना!’

प्रथम वाडेकर आजोबा फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरांतील एका बंगल्यात रहात. त्यांच्याकडे सदाशिव पेठेतून लकडी पूल ओलांडून जाणे जरा लांबच होते. निवृत्तीनंतर ते एस्. पी. कॉलेजमागच्या एका गल्लीत गोपाळ गायन समाजाच्या इमारतीजवळ राहू लागले. घरात ते एकटेच रहात असत व स्वत:चे अन्न स्वत:च बनवत. म्हणजे त्यांच्या घरी खराखुरा ‘स्वयंपाक’ होत असे. त्यांनी मिरची, कोथिंबीर व भरपूर आले घालून केलेली बटाट्याची भाजी मला फारच आवडे. आमच्या घरी केलेली बटाट्याची भाजी कशी झालीय असे कुणी विचारल्यावर ‘चांगली झालीय्, पण वाडेकर आजोबा करतात तशी नाही’ असे माझे उत्तर असे. आजोबांची रोजची झोपायची खाट एका वेगळ्याच आकाराची होती. रुंदीला नेहमीसारखी तीन फूट असली तरी लांबीला खूपच जास्त, पण उंचीला बुटकी होती, फक्त एक फुटाची. ती पाहून मी प्रश्नार्थक नजरेने बघितले, तर आजोबानी मलाच विचारले ‘तुला तुझ्या बाबांनी ‘सर्वं खलु इदं ब्रह्म्’ हे संस्कृतमधील महावाक्य शिकवले आहे का?’ मी होकारार्थी मान डोलावली आणि ‘हे सगळे खरोखर ब्रह्मच आहे’ असा त्याचा अर्थही सांगितला. आजोबा म्हणाले की हे महावाक्य छांदोग्य उपनिषदाच्या तिसऱ्या अध्यायात येते म्हणून माझी खाट तीन फूट रुंदीची आणि ते कुठल्याशा खण्डातल्या पहिल्या मंत्रात येते म्हणून ती एक फूट उंचीची करून घेतली आहे. एकेकाचे डोके कसे चालते याची मला गंमत वाटली.

१९४३ मध्ये लग्न झाल्यावर आणि दोन मुले झाल्यावरही बाबा आणि आई दोघांनी स्वातंत्र्ययुद्धातला आपला सहभाग कायम ठेवला. बाबा काही काळ ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सभासदही होते. मात्र १९४६ सालच्या प्रांतिक निवडणुकातील राजकीय डावपेचांना कंटाळून ते काँग्रेस पार्टीपासून अलिप्त झाले. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तास्पर्धेच्या राजकारणातून बाबांनी पूर्णपणे अंग काढून घेतले कारण असे डावपेच त्यांच्या सरळ सडेतोड स्वभावाला बिलकुल पचत नव्हते. पण आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे दृश्य फळ वेगळ्याच प्रकारच्या लोकांच्या हाती जाताना पाहून त्यांना वाईट वाटले. ते भारताच्या भविष्याबद्दल साशंक झाले असणार. १९४८ मध्ये गांधींची हत्या झाली आणि एक युग संपले. त्या वेळच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांच्यातील तिरस्काराची झळ आमच्या घराला लागली नाही, पण या घटनेचा आई-बाबांवर खोल परिणाम झाला. अहिंसेच्या पुजाऱ्याचा असा अंत व्हावा हे पाहून त्यांना तीव्र वेदना झाल्या. पण दोघांचीही अहिंसात्मक विधायक कार्यावरील निष्ठा ढळली नाही.

गांधीजींचे आध्यात्मिक आणि सामाजिक उत्तराधिकारी विनोबा भावे यांनी १९५१ मध्ये भूदान आंदोलन सुरू केले. भारतातील शेतकऱ्यांपैकी एक षष्ठांश जण तेव्हा भूमिहीन होते. म्हणून सधन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा किमान सहावा भाग आपखुषीने दान करावा असे विनोबांनी आवाहन केले. ही जमीन नंतर भूमिहीनांना वाटण्यात येई. यासाठी विनोबांनी भारतभर पदयात्रा आरंभली. स्वातंत्र्याच्या आंदोलनाप्रमाणेच आई आणि बाबा भूदानाच्या आंदोलनात मनापासून सामील झाले. विनोबांच्या पश्चिम महाराष्टातील पदयात्रेची प्राथमिक आखणी करण्यात बाबांनी यवतमाळचे गोविंदराव देशपांडे यांना सहकार्य केले. शिवाय भोर ते पुणे अशा सात दिवसांच्या पदयात्रेत भाग घेऊन बाबांनी गावोगावी सभा घेतल्या, व्याख्याने दिली. या आंदोलनासाठी जीवनदान केलेल्या बाबुलाल गांधी ह्या तरुणाने ही पदयात्रा आयोजित केली होती. आईने संपत्तिदानाच्या योजनेखाली दहा हजार रुपये देऊ केले व त्यांचा विनियोग जीवनदान केलेल्या दहा कार्यकर्त्यांसाठी करावा असे सुचवले. हे काम तिने तिचा पूर्ण विश्वास असणाऱ्या बाबुलालवरच सोपवले. बाबुलाल माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे असले तरी माझे जवळचे मित्र झाले, आणि अजूनही आहेत. आज वयाची नव्वदी उलटल्यावरही ते सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागात फलटण या गावी शेती करतात; पाझर तलाव बांधून, पर्यावरणाला पोषक पिके आणि झाडे लावून त्यांनी तो परिसर हिरवागार केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूदान आंदोलनाची पार्श्वभूमि असलेल्या सर्वोदय विचारसरणीचा आई-बाबांनी पुरस्कार केला. पुण्यात आचार्य धर्माधिकारी यांची व्याख्यानमाला आयोजित केली. त्या व्याख्यानांवर आधारलेले सर्वोदयदर्शन हे पुस्तक संपादित करून त्याची प्रस्तावना बाबांनी लिहिली. या पुस्तकामध्ये सर्वोदयाची तात्त्विक बैठक विशद केली असल्याने ते कितीतरी कार्यकर्त्यांचे बायबलच बनले. सर्वोदयाशी संबंधित वाङ्मयाचा प्रसार आणि विक्री करण्याची मोठी कामगिरी डॉक्टर रामभाऊ दातारांनी अंगावर घेतली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी जोरात चाललेली सर्जनची प्रॅक्टिस बंद करून त्यांनी सर्वोदय आंदोलनाला सर्वस्वी वाहून घेतले.

वेदवाङ्मयाबाबत विनोबा अनेक वेळा बाबांचा सल्ला घेत असत. जशी लोकमान्य टिळकांच्या मते गीता कर्मयोग शिकवते, तशी विनोबांच्या मते गीता साम्ययोग शिकवते. तो सूत्रबद्ध करण्यासाठी ते १०८ ‘साम्यसूत्रे’ रचत होते. त्यासंबंधात विनोबांनी बाबांशी विचारविनिमय केला होता. विनोबांना ‘यन्ति प्रमादमतन्द्राः’ या ऋग्वेदातील वचनाचा साम्यसूत्रांत समावेश करायचा होता. आपल्या लोकनागरी लिपीत (जी नेहमीच्या देवनागरी लिपीपेक्षा थोडी वेगळी आहे) ऑक्टोबर १९५५ मध्ये विनोबांनी बाबांना लिहिलेले एक चार पानी पत्र मजकडे आहे. त्या पत्रातील शेवटचे पान असे आहे,

‘.... पाहून तुम्ही काय ते सुचवा. वेदवचनाचा अर्थ वादास्पदच होईल. ‘यंति’चा अर्थ परित्याग असा मी समजलो आहे. माझ्यापाशी वेदाचे पुस्तक नाही. तुम्ही पाहून घ्या. ‘यंति’चा अर्थ प्राप्त करणे, तसाच घालवणे, होऊ शकेल ना? ‘प्रमाद’चा अर्थ आनंद करून ‘यंति’चा अर्थ प्राप्त करणे असा सायणांनी घेतला असेल कदाचित्.

– विनोबाचे प्रणाम’

बाबांनी विनोबांना सविस्तर उत्तर पाठवलेच असणार. पण स्वतःच्या संदर्भासाठी त्या उत्तराची कार्बन कॉपी ठेवण्याऐवजी विनोबांच्या पत्रावरच ‘यन्ति’ याचा अर्थ ‘परित्याग’ किंवा ‘घालवणे’ असा होणार नाही, आणि म्हणून ते ‘वेदवचन (साम्यसूत्रांतून) गाळावे लागेल’असा आपला निष्कर्ष लिहिला आहे. शिवाय ‘सायण बरोबर’ असे लिहून सायणाचार्यांच्या भाष्यातले ‘प्रमादं प्रकर्षेण मदकरं तदीयं सोमं यन्ति प्राप्नुवन्ति’ हे नेमके उद्धरण दिले आहे.

Vi Pra Limaye Vinoba Letter

मी शाळा-कॉलेजमध्ये असेपर्यंत आमच्या घरचा शिरस्ता असा होता : सर्व जण पहाटे साडेचार-पाचला उठून, प्रातर्विधि आटपून हॉलमध्ये प्रार्थनेसाठी जमत. काही वेळा पुण्याला आलेले नातेवाईक, वाड्यातली मुले, विनोबांच्या पठडीतील रामभाऊ म्हसकर, शास्त्रीजी, कृष्णराज मेहता, बाबुलाल गांधी यासारखे कार्यकर्ते पण यायचे. प्रार्थनेची सुरुवात

अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन ।

सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्शभावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये ।।

या विनोबांनी रचलेल्या श्लोकाने व्हायची. त्यांत अहिंसा, सत्य इत्यादि अकरा गोष्टींचे पालन करण्याचे सुचवले आहे. त्यानंतर गीतेचा एखादा अध्याय, कधी ईशावास्योपनिषद्, कधी शंकराचार्यांची स्तोत्रे यांचे पठण व्हायचे. शेवटी बाबा कुठल्यातरी आध्यात्मिक किंवा सामाजिक विषयावर प्रवचन करायचे. या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी आईने अथवा आमच्या मानलेल्या आत्याने बनवलेली न्याहारी व्हायची आणि सर्वजण आपापल्या उद्योगाला लागायचे.

(क्रमशः)

---
बालमोहन लिमये
(balmohan.limaye@gmail.com)
लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर निवृत्त. पवईलाच रहिवास. मराठीत ललित लेखन करण्याचे धाडस प्रथमच करत आहे.

(मौज, दिवाळी २०२०, या अंकात ‘आई-बाबांची स्मृतिचित्रे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही सुधारून वाढवलेली आवृत्ति आहे. शुद्धलेखन मुळाबरहुकूम आहे.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मुद्द्यांना धरुन, अतिशय व्यवस्थित मांडणी केलेली आहे. आठवणी वाचता वाचता त्या काळातच पोचले. संग्राह्य लेख आहे. आय आय टी चे माजी हेड ऑफ मॅथ्स डिपार्टमेन्ट असलेल्या, आपल्याला,आई वडीलांकडुन बुद्धीमत्तेचा वारसा मिळालेला आहे, हे या लेखातून स्पष्टच आहे. ऐसीवरती नेहमी उत्तम वाचायला मिळते.

लेख वाचून फार छान वाटले. आचार्य लिमये तसे ठाऊक होते, पण त्यांच्याबद्दल इतकी माहिती प्रथमच मिळाली. या दंपतीस प्रणाम!

उच्च नितीमुल्ये जपणारे आई वडील आणि त्यांचे सहकारी ह्यांचा परिचय आवडला. फोटोवरून आईंचा आत्मविश्वास आणि करारीपणा दिसून येतो.

ओघवत्या भाषेमुळे लेख उत्तम वठला आहे. ऐसीवर स्वागत. असेच उत्तमोत्तम लेख येत राहोत. महात्मा गांधीं आणि विनोबा ह्यांच्या हस्ताक्षरांमुळे लेख संग्राह्य आहे.

अतिशय आवडला लेख. धन्यवाद.
तो काळ उत्तम वर्णनातून जसाच्या तसा उभा केलाय.

माझे वडील ताराचंद रामनाथ महाविद्यालय इथून 1954 साली डॉकटर झाले असल्याने त्यांच्याकडून अश्या मोठ्या, ध्येयाने भारलेल्या व्यक्तींबद्दल, तसच लक्ष्मी रस्त्यावरील या दवाखान्या विषयी सुद्धा ऐकलं होतं. (पुढे त्यांनीं आणि अजून तीन मित्रांनी पुण्यात न राहता वेगवेगळया दुर्गम खेड्यात जाऊन पुढे साठ वर्षे वैद्यकीय सेवा दिली. त्याचा रूढ अर्थाने व्यवसाय केला नाही)

दिनविशेष मध्ये आज डॉ. ताराबाई लिमये यांचा स्मृतिदिन आहे असे समजले. त्यांना विनम्र अभिवादन!

लेख फार आवडला. अनेक गोष्टी कळाल्या.

बालमोहन लिमये यांचा बालमित्र असल्याने आचार्य लिमये व डॉक्टर ताराबाई यांच्या आपुलकीने वागण्याच्या बर्याच आठवणी आहेत.लेखातील त्यांची माहिती वाचताना अधिकच आदरभावना येतात.साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे ते प्रतिकच होते.लेखातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आठवणी व हस्ताक्षरातील पत्रे ह्यामुळे लेख ऐतिहासिक ठेवा झाला आहे.ऐसी अक्षरेच्या संयोजकांचे आभार.