आई-बाबांच्या आठवणी (भाग २)

आई-बाबांच्या आठवणी

बालमोहन लिमये

(पहिला भाग इथे)
भाग २

आदि शंकराचार्यांनी विशद केलेले अद्वैत तत्त्वज्ञान बाबा मानत. त्यांचा कर्मकांडावर, मूर्तिपूजेवर बिलकुल भर नव्हता. पर्वतीच्या पायथ्याशी रामकृष्ण परमहंस मिशनचा एक छोटा आश्रम होता. बाबा कधी कधी तिथे जाऊन स्वस्थ बसत असत. आई मात्र दररोज देवपूजा करायची. पण त्यांत धार्मिक अवडंबर नव्हते, सोवळे-ओवळे नव्हते. इतके की जर पूजा करत असताना एखादी बाळंतपणाची केस आली तर आई पूजा अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये जायची, बाळंतपण करून वर घरी येऊन फक्त हात पाय धुवून उरलेली पूजा पुरी करायची. तिची रास्ता पेठेतल्या एका मंदिरातील रामावर अतिशय श्रद्धा होती. जर एखादी बाळंतपणाची अवघड केस दवाखान्यात आली असली तर आई तिथे जाऊन अधिक मनोबल मिळवत असे. तिच्याबरोबर एका ठरावीक टांग्यात बसून रास्ता पेठेत जायला मला खूप आवडे. इतके की मोठेपणी कोण होणार असे कुणी विचारले तर ‘टांगेवाला’ असे उत्तर मी देत असे. आमच्या घरी धार्मिक सण जुजबी स्वरूपात पाळले जात, कारण राष्टीय सण जास्त महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर दरवर्षी १५ ऑगस्टला कित्येक सामाजिक ठिकाणी आणि घरोघरीही झेंडावंदन होत असे. गोखले हॉलसमोरील आमच्या घरी ते नियमाने होई. त्याची तयारी करायचे काम आम्हा मुलांचे असे. सुरुवातीला 'जनगणमन' आणि शेवटी 'वंदेमातरम्' म्हणत असू. आई-बाबा उपस्थित असायचेच. या घरगुती छोट्या समारंभाला एक विशेष अर्थ प्राप्त झाला होता तो १९४२ साली याच ठिकाणी आईने एका ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबर केलेल्या सामन्यामुळे.

लग्न-मुंजीसारख्या सामाजिक रूढीतील बडेजाव बाबांना आणि आईला बिलकुल आवडत नसत. लग्नसमारंभात ते फक्त उपचार म्हणून दोन पाकिटांत एक-एक रुपया घालून वधूवरांना देत असत. हा रिवाज त्यांनी जयंत नारळीकर आणि मंगला राजवाडे यांच्या लग्नाला मी बाबांबरोबर गेलो होतो तेव्हा पण पाळलेला मी पाहिला. माझी आणि माझ्या सांगलीच्या दोन चुलतभावांची मुंज मात्र त्यांनी मोठ्या पण वेगळ्या पद्धतीने साजरी केली, १९५४च्या मार्च महिन्यात. त्यांत समाजशिक्षणाची दृष्टि होती. मुंजीला संस्कृतमध्ये उपनयन असा शब्द आहे. त्याचा अर्थ (शिष्याला गुरुच्या) जवळ नेणे. छांदोग्योपनिषदात जबाला नावाच्या स्त्रीचा मुलगा सत्यकाम याची कथा आहे. आपले गोत्रही माहीत नसलेला सत्यकाम आचार्य गौतम यांच्याकडे जाऊन म्हणतो, ‘भगवान्, मला आपल्याकडे ब्रह्मचारी म्हणून राहायचे आहे. (शिष्य होऊन) मी आपल्याजवळ येऊ का?’ त्यावर गौतम उद्गारतात ‘बाळा, समिधा घेऊन ये. मी तुझे उपनयन करेन’. माझ्या मुंजीच्या आमंत्रणपत्रिकेवर शिष्य सत्यकाम जाबाल व गुरु हारिद्रुमत गौतम यांच्यामधील हे संभाषण, तसेच ज्ञानदेवांनी आपले गुरूस्वरुपी मोठे बंधू निवृत्तिनाथ यांना उद्देशून लिहिलेली एक ओवी छापली होती. आतल्या बाजूस ‘अहेरासारख्या रुढींना फाटा देण्याचे ठरवले आहे’ असा मजकूर होता. मुंजीच्या आदल्या दिवशी रात्री हरि-भक्त-परायण सोनोपंत दांडेकर यांचे कीर्तन झाले. मुंजीला आलेल्या सर्वांना विनोबांच्या गीताप्रवचने या पुस्तकाची एक प्रत, तसेच खादीचा एक रुमाल भेट दिला. रुमालाच्या एका कोपऱ्यावर आमंत्रणपत्रिकेच्या दर्शनीभागाचे ब्लॉक-प्रिंट होते. हा रुमाल कित्येक जणांनी बरीच वर्षे जपून ठेवला होता.

Balmohan Limaye Upanayan

मुंजीनंतर मी दररोज सकाळी व सायंकाळी संध्या करावी म्हणून बाबाही संध्या करू लागले. थोडे दिवसांनी ते थांबले आणि आणखी काही दिवसांनी मीही थांबलो! मुंज हा दुसरा जन्म मानला जातो. म्हणूनच तर ज्याची मुंज होते त्याला ‘द्विज’ असे म्हणतात. दुसऱ्या जन्मानंतर दुसरे नावही ठेवायचे असते. कोणते नाव निवडायचे ते पुरोहित ठरवतात, आणि बटुचे वडील त्याच्या कानात गुप्तपणे सांगतात. त्या नावाचा उच्चार कधीही करायचा नसतो. संध्या करतानाही ‘अमुक अमुक शर्मा अहम्’ असे म्हणताना आपले नाव मनातल्या मनात घ्यायचे असते. माझे मुंजीतले नाव ज्ञानदेव असे होते. ते निवडण्यात बाबांचा निश्चितच हात असला पाहिजे.

आमचे एक आजोळ होते सांगलीला आणि एक होते पुण्यातच. सांगलीत बाबांचे मोठे चुलतबंधू बापू, चुलतबहीण गंगूबाई व धाकटे बंधू तात्या त्यांच्या कुटुंबीयांसह ‘वासुदेव निवास’ या घरात राहायचे. हे घर होते कृष्णा नदीच्या अगदी जवळ, मढेघाटावर. मी व माझी बहीण मीरा अधूनमधून उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीला जात असू. आपापल्या उद्योगांतील व्यापामुळे आई-बाबा मात्र तिकडे फारसे गेले नाहीत. तिथल्या घरात त्या काळी पाटीचे संडास असत, त्यामुळे आम्हालाही जायचा फार उत्साह नसायचा. आमचे पुण्यातले आजोळ मॉडर्न हायस्कूलच्या जवळ, जंगली महाराज रस्त्याच्या बाजूला होते. तेव्हा तो रस्ता पुण्यातला सर्वात रुंद होता आणि त्याची रुंदी होती ८० फूट, म्हणून बोलताना त्याचा उल्लेख ‘एटी फीट रोड’ असा करत. बापूरावांनी म्हणजे आईच्या वडिलांनी १९३७ साली तेथे एक मोठा बंगला बांधला होता, त्याचे नाव होते ‘आराम’. आजोबा, आजी आणि आमचा माधवमामा तिथे राहायचे. बापूरावांनी आईच्या लग्नाला विरोध केला असला तरी आम्ही मुले मामाकडे बऱ्याच वेळा जायचो. तो आणि मालतीमामी आमचे खूप लाड करायचे. कुठल्याही अडीअडचणीच्या प्रसंगी आणि एरवीसुद्धा ती दोघे आईकडे येत असत. आईला माहेरचा सहवास एवढाच होता.

सर्वोदय आंदोलनात भाग घेत असतानाच बाबांची मुंबई विधानपरिषदेवर १९५५ साली नेमणूक झाली. परंतु संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील मुंबई येथील गोळीबाराविरुद्ध त्यांनी विधान परिषदेत भाषण केले आणि लगोलग विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याच कालावधीत बाबा उपनिषदांचा सखोल अभ्यास करत होते. या अभ्यासाला भाषाशास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. ‘अष्टादश-उपनिषदः (Eighteen Principal Upnishads)’ हे बाबांनी आणि माझे आजोबा रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर यांनी १९५८ साली लिहिलेले पुस्तक खरोखर विद्वत्ताप्रचुर आहे. या पुस्तकांत उपनिषदातील मंत्रांशी साधर्म्य असणारी वैदिक वाङ्मयातील स्थळे दर्शवली आहेत. तसेच विवरणात्मक आणि व्याकरणविषयक टीपा दिल्या आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका सातव्या-आठव्या शतकातील प्रोटो-बल्गेरियन शिल्पाचा फोटो आहे. त्यात एकाच झाडावर बसलेल्या दोन पक्षांपैकी एक पक्षी पिंपळाचे फळ खाण्यांत मग्न आहे आणि दुसरा काही न खाता लांबून नुसता बघत आहे असे दाखवले आहे. त्याच्या खाली याच अर्थाचा मुंडक आणि श्वेताश्वतर उपनिषदातील समर्पक मंत्र उद्धृत केला आहे, आणि तोच मंत्र ऋग्वेदात जिथे आहे त्या स्थळाचा संदर्भ दिला आहे. या मंत्राचा भावार्थ असा की समाजात काही जण आपले चोचले पुरवण्यात गढून गेलेले असतात, तर इतर काही जण जगरहाटीकडे तटस्थ राहून बघत असतात. लेखकांना हे बल्गेरियन चित्र कुठे मिळाले कोण जाणे, पण भिन्न संस्कृतींमध्ये समान विचारधारा कशी सापडते याचे हे चांगले उदाहरण आहे.

Proto Bulgarian image

हे पुस्तक पुण्यातील भारतीय धर्म तत्त्वज्ञान संस्कृतिमंडळाच्या एका उपक्रमाचा पहिला भाग होता. त्याला गांधी स्मारक निधीने आर्थिक मदत केली होती. त्यामुळे या साडेसातशे पानी ग्रंथाची किंमत फक्त वीस रुपये ठेवता आली. प्रस्तावनेनंतर महात्मा गांधींच्या १९३७ सालच्या भाषणातले एक वाक्य उद्धृत केले आहे: ‘समजा उपनिषदे आणि तत्सम सर्व धर्मग्रंथांची जळून राख झाली, आणि फक्त ईशावास्योपनिषदातील पहिला मंत्र हिंदुस्तानांतील लोकांच्या स्मृतीत राहिला, तरी हिंदुत्व कायमचे टिकेल.’ बाबांच्या पुस्तकात हा मंत्र असा दिला आहे :

Upanishad Shlok

शब्दांवरील a, b, c, d, e या इंग्लिश अक्षरांनुसार मंत्राखाली त्या त्या शब्दांबद्दल टिपा आहेत. या मंत्राचा मराठी अनुवाद विनोबांनी असा केला आहे. ‘जगात जे काही जीवन आहे, ते हे सर्व ईश्वराने वसवलेले आहे. म्हणून त्याच्या नावाने त्यागून, तू यथाप्राप्त भोगीत जा. कोणाच्याही धनाविषयी वासना राखू नकोस.’ अर्थात् महात्मा गांधींच्या मनातले हिंदुत्व सध्या ज्याचा बोलबाला आहे त्या हिंदुत्वापेक्षा अगदीच वेगळे होते. उपक्रमाच्या दुसऱ्या भागात उपनिषदातील सूक्तांचे इंग्लिश भाषांतर, त्यावर टीपा आणि त्यातील संस्कृत शब्दांचा व्युत्पतिकोश यांचा समावेश होणार होता. पण दोन लेखकातील मतभेदांमुळे तो पुरा होऊ शकला नाही.

बाबा आपल्या खोलीत पुस्तके, शब्दकोश अशा ग्रंथसमूहाने वेढून बसलेले असत तर आई खालच्या मजल्यावरील बाळंतिणींच्या हॉस्पिटलमधील (maternity home) कामांत मग्न असे. आई जशी सुरुवातीला कामाचा अनुभव घ्यायला डॉक्टर दातारांकडे जात असे, तशीच अण्णा लागूंची कन्या शकुंतला १९५० साली डॉक्टर झाल्यावर आईच्या दवाखान्यात येत असे. एकदा आईचा हात मोडला असता तिनेच दवाखाना सांभाळला. लवकरच तिचे लग्न होऊन ती भारतीय लोकसभेचे पहिले सभापति दादासाहेब मावळंकर यांची सून झाली आणि अहमदाबादला राहायला गेली. नंतरच्या काळांत आईच्या दवाखान्यात श्रीराम लागूची पहिली पत्नी डॉक्टर मालती कामाचा अनुभव घ्यायला येत असे. पुढे मालतीवहिनी परदेशी गेली असता १९६१च्या जुलै महिन्यात तिचा अपघाती मृत्यु झाल्याचे कळले. जाण्याच्या आधी तिने आपल्या मुलांना मागे सोडून परदेशी जावे का असा आईचा सल्ला विचारला होता, आणि आईने जरुर जा असे सांगितले होते. त्यामुळे तिच्या निधनाचा आईला खूपच धक्का बसला. आपण मालतीला तिच्या मरणाकडे जणू पाठवले असे आईला वाटत राहिले. १९६०नंतर सर्जन दातारांची मुलगी डॉक्टर मंदासुद्धा आईच्या दवाखान्यात प्रत्यक्ष काम शिकायला यायची. आई सकाळ-संध्याकाळ बाह्यरुग्ण विभागात काम करीत असे. शिवाय प्रत्येक स्त्रीच्या बाळंतपणाला ती जातीने हजर असे, मग ते कुठल्याही वेळेला होवो. बाळंतपणानंतर स्त्रिया दहा दिवस आईच्या रुग्णालयांत रहायच्या. त्यांना गरम, सकस आणि साजूक अन्न पुरवायची व्यवस्था आईने घरीच केलेली होती. पुरवले जाणारे सगळे पदार्थ आईने चाखून पसंत केल्याशिवाय बाळंतिणींना वाढले जात नसत. हाच स्वयंपाक घरच्यांसाठीही होता. तो नेहमीच बिनतिखट असल्याने आम्हाला तिखट पदार्थ खाण्याची बिलकुल सवय नव्हती. त्यामुळे बाहेर कुठे जेवायला गेले की आमची पंचाईत व्हायची.

दररोज सकाळ-संध्याकाळ आई दवाखान्यांचा फेरफटका (round) घेऊन प्रत्येक पेशंटची जातीने चौकशी करत असे. पांढरा डगला घालून आणि गळ्यात स्टेथास्कोप लटकवून खालच्या मजल्यावर जायला निघालेल्या आईची कृश मूर्ति आजही माझ्या डोळ्यासमोर येते. अशी वैयक्तिक काळजी घेतल्याने बाळाला घरी घेऊन जातांना स्त्रियांना गहिवरून येई. बाळंतीण घरी जाताना बाळाच्या पाळण्यात नारळ आणि मिठाई ठेवून जायची, तिला मुलगा झाला असला तर पेढे आणि मुलगी झाली असली तर बर्फी. खूपशा स्त्रियांना मुलगाच हवा असे, पण एकाच प्रकारचे पेढे खाऊन मला कंटाळा यायचा आणि वेगवेगळ्या प्रकारची बर्फी खायला मिळावी म्हणून आईच्या दवाखान्यात सगळ्यांना मुलीच व्हाव्यात असे मला वाटे! आई मात्र एखाद्या स्त्रीला ओळीने दोनदा किंवा तीनदा मुलगी झाल्यावर एकतरी मुलगा व्हायलाच पाहिजे असा आग्रह धरू नको, असा सल्ला त्या स्त्रीच्या प्रकृतिनुसार देत असे.

आईने जशी सर्वोदय आंदोलनाला आर्थिक मदत केली, तशी अनेक संस्थांनाही केली. त्यांत ताराचंद रामनाथ रुग्णालय, हिंगणे शिक्षण संस्था, विद्यार्थी साहाय्यक समिती, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय या संस्था प्रमुख आहेत. शिवाय कित्येक व्यक्तींना आईने उभे केले, आपलेसे केले. या संदर्भात चंद्राताई दामले यांची कहाणी उल्लेखनीय आहे. त्या आईच्या दवाखान्यात अगदी सुरुवातीपासून नर्स म्हणून कामाला लागल्या होत्या. ऑगस्ट १९४२मध्ये राष्ट्रीय निशाणावरून ब्रिटिश अधिकाऱ्याचा जो सामना आईने केला त्यांत चंद्राताई आईच्या पाठीशी होत्या. नंतरच्या काळात त्या आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनल्या. आम्ही त्यांना आत्या म्हणत असू. बाबा आणि आई आपल्या व्यापात गुंतून राहिल्यामुळे खूप वेळा आमची आत्याच आमचा सांभाळ करायची, हवे-नको ते लाड पुरवायची. ती कायम घरी असल्यानेच आईला नि:शंकपणे दवाखान्यात सगळ्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देता यायचे. पुण्यालाच रहाणारी एक धाकटी बहीण सोडली तर आत्याला दुसरा काहीच पाश नव्हता. आमचे घरच तिचे सर्वस्व होते. ती आमची तिसरी पालकच बनली होती. आम्ही मुले तिला इतकी चिकटून असू की ‘आई ग’ ऐवजी ‘आत्या ग’ अशीच हाक कधी कधी तोंडातून बाहेर पडायची. आई गमतीने आत्याला ‘गृहमंत्री’ म्हणायची. तशाच आईच्या एक ‘परराष्ट्रमंत्री’ही होत्या. त्यांचे नाव सोनुताई फाटक. घराबाहेर जाऊन करावी लागणारी सगळी कामे त्या निपटायच्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे मात्र तिचे घर सांभाळणाऱ्या स्त्रियाच उभ्या असतात.

वेळप्रसंगी अवघड केस असली तर आत्या आईच्या मदतीला दवाखान्यातही जायची. पण तिचे मुख्य कार्यक्षेत्र होते आमचे घर. आईचा आत्यावर पूर्ण विश्वास होता. आत्याला आम्ही एकही वाकडा शब्द उच्चारला तर आईला ते खपत नसे. दोघींचे इतके सूत होते की दुसऱ्या कोणालाही न सांगाव्याशा वाटणाऱ्या मनातील गोष्टी त्या दोघी एकमेकींजवळ बोलत. माझ्या शाळेच्या शेवटच्या वर्षापासून आत्या पोटदुखीने आजारी पडू लागली. तिचे पोटाचे ऑपरेशन केले, तेव्हा आतड्यांत इतक्या असंख्य लहानलहान गाठी आढळून आल्या की सर्जननी त्या न काढताच पोट परत शिवून टाकले. आईला कळून चुकले असावे की आत्या याच्यातून बरी होणार नाही. जसजसा आत्याचा थकवा वाढत गेला आणि ती काही खाईनाशी झाली तसतसे तिला शिरेतून सलाइन व ग्लूकोज वारंवार द्यावे लागले. पुढे पुढे इंजक्शन द्यायला शीर सापडायचीही पंचाईत होऊ लागली. आत्याला उठून बसता येईना. आपला घराला उपयोग तर नाहीच, पण आपणच भारभूत ठरत आहोत हे पाहून आत्या आईला म्हणायची की तिला ताराचंद हॉस्पिटलमध्ये भरती करून टाकावे. अर्थात आईने अशा विनवण्यांकडे लक्षही दिले नाही. आत्याला आराम वाटावा म्हणून आई शर्थीचे प्रयत्न करत असे. आत्याचे मन शांत करण्यासाठी मी कधीकधी तिला मनाचे श्लोक किंवा दासबोध वाचून दाखवत असे. दोन अडीच वर्षांच्या आजारानंतर आत्या निरवानिरव करू लागली. आपल्या बहिणीला बोलावून आत्याने तिला पाचशे रुपये दिले. मला आणि मीराला जवळ बसवून ‘नीट वागा. आईला कष्ट कमी पडतील असे करा’ एवढेच बोलली. त्या आधी दोन वर्षे आत्याच्याच पठडीतल्या कमलाबाई प्रभुणे दवाखान्यात नर्स म्हणून यायला लागल्या होत्या. त्यांना बोलवून आत्याने त्यांच्याकडून वचन घेतले की त्या सर्व जमवून घेतील आणि आईचे घर सोडणार नाहीत. कमलाबाईंनी तसे केलेही. पुढची जवळजवळ सतरा-अठरा वर्षे त्यांनी आत्याची उणीव भासू न देण्याचा कसोशीने प्रयत्न केला, तो आपल्या मृत्युपर्यंत. एप्रिल १९६२मध्ये आत्याला तिचा त्रास कमी करण्यासाठी झोपेची इंजक्शने देत राहणे भाग पडले. तिचे कण्हणेही मंदावत गेले आणि एके दिवशी भल्या पहाटे तिचे देहावसान झाले. आत्या घरचीच झाली होती तरी तिला नर्स म्हणून मिळणारा पगार तिच्या बॅंकेत जमा होत असे. आत्या गेल्यावर तिच्या इच्छेनुसार तिची साठलेली पूर्ण रक्कम आईने ताराचंद हॉस्पिटलला आत्याच्या नावाने दान केली. आजही ‘स्व. चंद्राताई दामले’ या नावे एक खोली त्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिथे आत्याचा फोटोही लटकावला आहे. आपल्याकडे कामाला लागलेल्या एका व्यक्तीला दिलेला असा सन्मान विरळाच म्हटला पाहिजे. आई म्हणायची की सुमारे वीस वर्षे आत्या आपल्याला लाभली हेच सुदैव; तिचे आणि आमचे काय ऋणानुबंध होते कोणास ठाऊक!

आईने मानसिक व आर्थिक आधार देऊन ज्यांच्या आयुष्याला नवीन दिशा दिली, त्यांपैकी एक होती सुमन दाते. काही वेळा अशी मदत वरपांगी किरकोळ वाटत असली तरी ती मूलभूत असल्याने लांब पल्ल्याची ठरे. १९६१ सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आमची सकाळची प्रार्थना संपत आली असताना साधारण माझ्याच वयाच्या एका मुलीला कुणीतरी आमच्या घरी पोचवले. आईला ती येणार असल्याची कल्पना होती. आईने मला आणि मीराला सांगितले की हिचे नाव सुमन, ती तुमची मामेबहीण आहे आणि बेळगावहून आली आहे. मी आश्चर्यचकितच झालो, कारण बेळगावला माझा कोणी मामा आहे हे मी कधी ऐकलेसुद्धा नव्हते. सुमन मॅट्रिकची परीक्षा पास झाली होती आणि तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा साडेतीन वर्षांचा कोर्स (बी. पी. एन्. ए. नावाचा) करायचा होता. तो कोर्स सप्टेंबरमध्येच सुरू झाला असल्याने तिचा दीड महिना आधीच फुकट गेला होता. आईने तिला लगेच अंघोळ, न्याहारी वगैरे करायला सांगून तिच्या कोर्ससाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत याची विचारपूस केली. तिच्यासाठी नर्सेस घालतात तसे सहा ड्रेस करणे जरुर होते. असे ड्रेस शिवणारा पुण्यात एकच शिंपी होता आणि त्याचे दुकान बरेच दूर कॅम्प भागात होते. आईने मला तिकडे पिटाळले, कारण सुमनला दुसऱ्याच दिवशी कोर्ससाठी ससून हॉस्पिटलमध्ये हजर व्हायचे होते. बेळगावहून सुमनने फक्त दररोजचे कपडे, टूथब्रश आणि कंगवा बरोबर आणला होता. त्या दिवशी रात्रीपर्यंत आईने सुमनसाठी जरूर त्या सर्व गोष्टी जमा केल्या. टूथपेस्ट, खोबरेल तेलाची बाटली, काही बंद नोटा व काही सुटे पैसे, नोटस् काढायला १-२ वह्या, आणि एक नर्सचा ड्रेस असे सगळे एका पिशवीत भरले आणि त्यासोबत दोन तीन कोऱ्या पोस्टकार्डांवरती आपला पत्ता लिहून ती कार्डेपण त्या पिशवीत घातली. त्या काळी एकमेकांना टेलिफोन करणे कठीण होते, म्हणून अडीअडचणीच्या वेळी पोस्टकार्डेच उपयोगात येतील असा पुढचा विचार आईने बारकाईने केला होता. अशा जय्यत तयारीनिशी दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. मला हे सगळे गौडबंगाल वाटत होते. काल बेळगावहून आली काय, आज लगेच गेली काय आणि कोण ही सुमन? तिची पाठवणी केल्यावर आईने समजावले की सुमनचे वडील नारायण जोगळेकर, ते तुमचे चुलतमामा लागतात, कारण त्यांचे वडील आणि माझे वडील सावत्रभाऊ. त्यांचे कुटुंब बेळगावला रहात असल्याने तुमची कधीच भेट झालेली नाही. तिला तुम्ही सुमनताई म्हणायचे.

सुमनताई प्रथमच बेळगावच्या बाहेर येत होती, तिला पुण्यात दुसरे कोणी माहीत नव्हते, नर्सिंग कोर्ससाठी लागणारी इंग्रजी भाषा अवगत नव्हती. मग anatomyसारखे विषय ती पहिल्याच महिन्यात कसे शिकणार? पण सुमनताईने धीर सोडला नाही. तिने चिकाटीने नर्सिंगचे शिक्षण चालू ठेवले आणि ती चांगल्या प्रकारे पास होत गेली. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी ती आमच्याकडे बसने यायची. एकदा चुकीची बस घेतल्यामुळे तिचा फारच गोंधळ झाला. तेव्हा पासून तिला आणायला आणि पोहचवायला आई कुणाला तरी पाठवत असे. आमच्या घरून निघताना ती त्या काळच्या पद्धतीप्रमाणे आई-बाबांना वाकून नमस्कार करायची. त्या वेळी आई तिला मुद्दाम आतल्या खोलीत जाऊन चंद्राताईंना, म्हणजे आमच्या आत्याला, नमस्कार करायला सांगायची. आमच्या घरात चंद्राताईंबद्दल जी आदरभावना होती त्याचेच हे लक्षण. साडेतीन वर्षानंतर सुमनताई पूर्णतः शिक्षित नर्स (Full Trained Nurse) झाली. या सगळ्या काळात सुमनताईला तिच्या वडिलांकडून मदत तर मिळाली नाहीच पण तिला मिळणाऱ्या चाळीस रुपयांच्या स्टायपेंडपैकी तीस रुपये ते काढून घेत असत. त्यामुळे माझी आई तिचा एक प्रकारचा भोज्या होती. यथाकाल तिचे लग्न होऊन सुमन जोगळेकरची ती सौ. वृंदा दाते झाली. कित्येक वर्षांनंतर सुमनताईने आपला स्वत:चा नर्सिंग ब्यूरो सुरू केला. त्याचे उद्घाटन करून ‘सेवा नर्सेस ब्यूरो’ अशा पाटीला हार घालण्यासाठी सुमनताईने आईला आवर्जून बोलावले. आज हा ब्यूरो कुशल व खात्रीलायक नर्सेस आणि आया उपलब्ध करून देणारा पुण्यातील एक उत्कृष्ट ब्यूरो म्हणून नावाजला जातो. त्याची पायाभरणी करण्याचे सर्व श्रेय सुमनताई आईला देते. ही गोष्ट जशी माझी बेळगावची मामेबहीण सुमनताई जोगळेकर हिची, तशीच गोष्ट आहे माझी सांगलीची चुलतबहीण कुसुमताई लिमये हिची. तिनेही आमच्या घराचा तळ करून नर्सिंगचे शिक्षण पुरे केले. नंतर तिने आईच्या दवाखान्यात काही दिवस उमेदवारीही केली.

आई-बाबांची राहणी अगदी साधी होती. घरातले सर्व जण फक्त खादीचेच कपडे घालायचे. आम्ही सगळे चरख्यावर सूतही कातत असू. मी कातलेल्या सुताचे कापड विणून त्याचा शर्ट घातलेला मला आठवतो. बाबा आपल्या कपड्यांबाबत अगदी बेफिकीर असत. बाहेर जायचे असले तर खुंटीला लावलेला एक ठराविक कोट घालून आणि डोक्यावर पांढरी टोपी चढवून ते चालू पडत. त्यांचा कोट फाटला असला तरी त्यांच्या ते लक्षात येत नसे. आईला हे कळले की मग ती गुपचूप तसेच कापड खादी भांडारातून आणून त्याचा कोट शिवून घेत असे. तो खुंटीला टांगून फाटलेला कोट काढून घेई. पण बाबांना आपण नवीन कोट घालत आहोत हे कधी लक्षांत पण येत नसे. मग आईला त्याची दाद देणे दूरच.

बाबांनी सांसारिक गोष्टींत अत्यल्प लक्ष दिले. आईनेही त्यांना व्यावहारिक समस्यांपासून जाणूनबुजून दूर ठेवले. माझ्यापुरते बोलायचे तर लहानपणी माझी नखे कापायचे काम सोडून बाबांच्या वाट्याला दुसरे काहीच काम आले नाही. सगळ्या लहान मुलांप्रमाणे ‘कुठली तरी गोष्ट सांगा ना’ असा तगादा मी लावल्यावर बाबा मला वारंवार एकच गोष्ट सांगायचे, अन्ड्रोक्लिस आणि सिंह यांची. अन्ड्रोक्लिस हा एका रोमन राजाचा गुलाम होता. काही कारणाने राजा त्याला सिंहाच्या भक्ष्यस्थानी देतो. एकदा याच सिंहाच्या पायातला काटा अन्ड्रोक्लिसने काढला असल्याने पूर्वीचे उपकार स्मरून सिंह त्याला खात तर नाहीच, पण त्याचे पाय चाटायला लागतो, अशी ही गोष्ट. आम्हा लहान मुलांना आवडणाऱ्या खाऊमध्ये किंवा खेळांमध्ये बाबांनी कधी लक्ष घातले नाही. याला फक्त एकच अपवाद होता. त्या वेळच्या भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विजय हजारे मूळचा सांगलीचा, म्हणजे बाबांच्या मूळच्या गावचा होता. बाबांना या खेळाचे काही घेणे-देणे नसले तरी विजय हजारेने कसोटी सामन्यात शतक काढले की ते मला एक तांबडी पेन्सिल बक्षिस द्यायचे!

माझ्या वाढीमध्ये बाबांचा सहभाग वेगळ्या प्रकारचा होता. शाळेच्या शेवटच्या वर्षी माझा संस्कृत, गणित आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास बाबांनी घेतला. सकाळपासून शाळेची तयारी केल्यावर आणि जेवण आटपल्यावर बाबांच्या कॉटवर मी पंधरा-वीस मिनिटे झोपत असे, त्यांच्या शेजारी, ते वर्तमानपत्र वाचत असताना. या प्रकारे ताजातवाना होऊन मी शाळेकडे कूच करे. कुठल्याही प्रश्नाचे चटकन् उत्तर न सांगता ते खोलांत जाऊन त्या प्रश्नाचा अर्थ काय, त्याची काय काय उत्तरे असू शकतात व त्यांतले योग्य उत्तर कसे शोधायचे असे मार्मिक विश्लेषण करत. त्यामुळे पूर्ण समाधान होत असे. पण परीक्षा जवळ आली की हे सर्व ऐकायला पुरेसा वेळ नसे. अशा वेळी मी बाबांना प्रश्न विचारायचे टाळी. आईला तोच प्रश्न विचारला की सारासार विचार करून ती जे सांगे ते मला पुरत असे. याबाबत फार नंतरचा एक प्रसंग मला आठवतो. माझी मोठी मुलगी कल्याणी हिला शाळेत संस्कृत विषय शिकवायला सुरुवात झाली होती. आम्ही सगळे शनिवार-रविवार पुण्याला आई-बाबांना भेटायला गेलो होतो. कल्याणीने संस्कृतचे पुस्तकही बरोबर आणले होते. तिने मला त्यांतली काही शंका विचारली. बाबा त्यांच्या खोलीत दोन चार जाडजूड पुस्तके उघडी ठेवून विचार करत बसले होते. मी कल्याणीला म्हटले की तू आजोबांनाच शंका विचार. आजोबांनी तिला तिचे संस्कृतचे पुस्तक आणायला सांगितले. पुस्तकाचे नाव होते स्वस्ति. ते पुस्तक न उघडताच बाबांनी कल्याणीला ‘स्वस्ति’ या शब्दाबद्दल अर्धा तास काय काय सांगितले. कल्याणीची चुळबुळ पाहून मग मीच तिला कुठे बाहेर न्यायचे आहे असे सांगून पळ काढला.

कोणत्याही नव्या शब्दाचा अर्थ डिक्शनरी उघडून शोधून काढला पाहिजे असा बाबांचा आग्रह असायचा. तसे केल्याने त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ कळतात असे ते म्हणत. एकदा काहीतरी गृहपाठ गडबडीने संपवताना मी बाबांना एका इंग्लिश शब्दाचा अर्थ विचारला तर ते रागावून बोलले ‘डिक्शनरीत शब्द काढत जा. मी पन्नास वेळा तुला सांगतोय.’ मला गप्प राहण्याशिवाय मार्गच नव्हता. दुसऱ्या एका वेळी काहीतरी वाचताना ‘सेफालिक पेन (cephalic pain)’ या शब्दाचा अर्थ मला कळेना. बाबांना विचारले तर त्यांनी आपल्याच कपाळावर हात मारत म्हटले ‘कपाळ तुझे!’ मला वाटले शब्दाचा अर्थ डिक्शनरीत न पाहता विचारला ते त्यांना रुचले नाही. पण या वेळी तसे नव्हते. ‘cephalic’ या शब्दाचा अर्थ ‘कपाळासंबंधीचे’, आणि हे मला कसे माहीत नाही म्हणून त्यांनी कपाळावर हात मारून घेतला होता! नंतर बाबांनी नीट समजावले की ‘कपाल’ या मूळ शब्दापासून संस्कृत भाषेमध्ये कापालिक हा शब्द बनला आहे; या शब्दाशी इंग्लिशमधील cephalic, फ्रेंचमधील céphalique, लॅटिनमधील cephalicus आणि ग्रीकमधील kephalikos ह्या सगळ्या एकाच अर्थाच्या शब्दांचे किती साधर्म्य आहे. त्याचे कारण म्हणजे ह्या भाषा एका प्राचीन इंडो-युरोपियन भाषेतून उगम पावल्या आहेत. मला इतके छान वाटले की त्या दिवशी मी माझ्या पाठ्यपुस्तकांना हातही लावला नाही.

दिवसभरात बाबा आपल्या अध्ययनात वा संशोधनात कितीही गढून गेले असले तरी मी त्यांना कित्येक प्रश्न, शंका, कुशंका विचारत असे. एकदा भारताच्या सामाजिक इतिहासातील वर्णाश्रमधर्माचा विषय निघाला. बाबा म्हणाले ‘वर्णव्यवस्था आता कालबाह्य आहे, पण आश्रमव्यवस्था राबवता येईल. सर्वसामान्यांसाठी चार आश्रम कल्पले आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. यापैकी पहिल्या दोनातून बहुतेक सगळेच जातात. मुद्दा असा आहे की आपली वानप्रस्थ आश्रम सुरू करायची वेळ झाली आहे हे सध्या कुणाच्या लक्षातही येत नाही, मग संन्यासाश्रम लांबच राहिला. काही अपवादात्मक व्यक्ति मात्र ब्रह्मचर्यातूनच एकदम् संन्यासाकडे जाऊ शकतात. याच अर्थाचे ‘ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेत्।’ हे वचन जाबाल उपनिषदात आहे, याज्ञवल्क्य ऋषींनी जनक राजाला सांगितलेले’.

कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना मी बाबांना विचारले की जीवनाचे ध्येय काय असावे. बाबा म्हणाले ‘तू फार महान् प्रश्न विचारला आहेस. तूच सांग तुला काय वाटते ते.’ मी बाबांच्या दररोज सकाळी होणाऱ्या प्रवचनानुसार ‘ब्रह्मप्राप्ति’ असे उत्तर दिले. बाबानी सांगितले ‘तू म्हणतोस ते काही सोपे नाही. त्या ध्येयाच्या दृष्टीने सध्याच्या तुझ्या जीवनात जे चालले आहे त्याचा काहीच उपयोग दिसत नाही.’ माझ्या मनांत दररोज प्रार्थनेच्या वेळी चर्चा होत असलेल्या विचारांचा आणि पौगंडावस्थेतून बाहेर येत असलेल्या सोळा वर्षाच्या मुलाच्या मनांत दाटणाऱ्या भावनांचा संघर्ष चालू होता. आत्मा अमर कसा, माझ्यासाठी ‘स्वधर्म’ कोणता अशा प्रश्नांची उत्तरे मला मिळत नव्हती. त्या काळांत बाबा इसबाच्या दुखण्याने बेजार झाले होते. एस्. पी. कॉलेजचे प्रोफेसर एम्. के. परांजपे आमच्या घरी येऊन सुचवत असलेले निसर्गोपचार फारसे उपयोगी पडत नव्हते. शेवटी बाबा म्हणाले ‘मी या व्याधीतून बरा झालो की आपण दररोज अर्धा तास वेगळे वाचन करू, चर्चा करू’. काही महिन्यांनी पहाटे बाबांबरोबर मी उपनिषदांतील वेचे वाचू लागलो. मला काही पटले नाही की मी लगेच नापसंती दाखवायचो. बाबा म्हणायचे ‘हे बरोबर, ते चूक अशी घाई करू नकोस. आधी सगळे नीट समजून घे.’ आमचे असे संवाद खूप वेळा व्हायचे.

बाबांबरोबर मी बोलत असताना आई जवळपास असली तर ती लक्षपूर्वक ऐकत असे. माझ्याकडून एक शब्दही जोराने उच्चारला गेला तर ती मला खुणावून नम्रतेने वागायला सांगे. माझे हितगूज मात्र फक्त आईबरोबर चाले. दिवसभरात कुणाचे वागणे मला खटकले असले तर ते आईजवळ बोलून दाखवल्याशिवाय मला चैन पडत नसे, अगदी बाबांचे वागणेसुद्धा. आई ऐकून घ्यायची आणि सारासार विचार कसा करावा याचे बाळबोध धडे द्यायची. एकदा आईने मला विचारले की बाबांची एखादी गोष्ट तुला आवडली नाही तर तू मला येऊन सांगतोस, मग माझी एखादी गोष्ट तुला भावली नाही, तर तू ते कुणाला सांगतोस. या प्रश्नाचे उत्तर सोपे होते कारण मला आईची वागणूक नेहमी बरोबरच वाटायची. अशी अंधभक्ति कधी ना कधी ओसरू शकते याची मला तेव्हा कल्पना कशी असणार? कॉलेजमध्ये असताना कुठल्याही मुलीबद्दल आकर्षण वाटणे चुकीचे आहे असे मी मानत होतो. पण तसे व्हायचे काही थांबत नसे. एक प्रसंग अजून आठवतोय. मी कालिदासाचे अभिज्ञानशाकुंतल हे संस्कृत नाटक पहायला गेलो होतो. दुष्यंताचे काम दाजी भाटवडेकर यांनी आणि शकुंतलेचे काम रेखा सबनीसने केले होते. शकुंतलेचे स्वरूप, तिची कांति, तिची कोमल देहयष्टि, तिचे हावभाव बघून मी इतका प्रभावित झालो की तो विषय मनात घर करून बसला. मी अस्वस्थ, व्याकूळ झालो. अशा वेळी ‘अनात्मश्रीविगर्हणम्’ म्हणजे आत्मिक सौंदर्य नसलेली कुठलीही गोष्ट निंदास्पदच असते हे मी स्वतःला बजावत असे. तरीही रात्री झोपायला जाताना माझ्या मनातील अपराधी भावना मला त्रास द्यायची. तोच प्रकार मी दिवसभरात जराही कधी खोटेपणा केला असला तर व्हायचा. मग आईने सांगितले की मनातली मळमळ तिला सांगून टाकल्याने मला बरे वाटणार असेल, तर तसे कर. सुरुवातीला मी ते पाळले, पण पुढे पुढे अशी एखादी गोष्ट आईला सांगायची राहून गेली तर तेच डाचत रहायचे. शेवटी मी आईला सांगून टाकले की तुझा माझ्या सत्यतेवर, सद्भावावर विश्वास आहे ना, तर मग माझ्या मनातले सगळेच विचार मी तुला बोलून दाखवणार नाही. अशा प्रकारे मी माझी माझ्याच जाचापासून सुटका करून घेतली!

माझी धाकटी बहीण मला दादा म्हणायची. बाबा मला दादो असे पुकारायचे, तर आई प्रेमाने दादूमिया असे संबोधायची. आईच्या बाबतीत मी खूप हळवा होतो. काही वेळा आईचे डोके खूप दुखायचे. नेहमीचे इलाज निकामी ठरले तर तिला कानाच्या वर शिरेत इंजेक्शन द्यावे लागे. ते मला मुळीच बघवायचे नाही. मग मी जिन्यावरून खाली उतरून लांब पळून जायचो. हे पाहिल्यावर आईच्या मनातली मी डॉक्टर व्हावे ही इच्छा पार नाहीशी झाली असावी. आई कधी कधी माझी गंमतही करायची. शाळा-कॉलेजात असताना मला दररोज संध्याकाळी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाऊन थोडा वेळ तरी खोखो किंवा आट्यापाट्या खेळल्याशिवाय राहवायचे नाही. खेळताना खाली पडून खरचटणे हे ओघानेच आले. इतर वेळीही खूप वेळा धडपडून मला लहान मोठ्या जखमा होत. आई डॉक्टर असल्याने घरी प्रथमोपचाराची सगळी साधने होती. चिकटपट्यांची तर अनेक वेटोळी होती. एक तरी चिकटपट्टी माझ्या अंगावर जवळजवळ नेहमीच असे. एके दिवशी आमच्या पत्रपेटीत मला माझ्या नावचे एक पाकीट मिळाले. आपल्याला पहिल्यांदाच स्वतंत्र पत्र आल्याचा अचंबा वाटला, पण आनंदही झाला. पाकीट उघडून बघतो तर ते पत्र आईने लिहिले होते. त्यांत एकच वाक्य होते. ‘चि. बालमोहन याला ‘चिकटपट्टीविभूषण’ अशी पदवी मी बहाल करत आहे.’

आई आणि बाबा यांच्यातील संबंधांचा गाभा परस्परांविषयीचा प्रेमादर हा तर होताच, पण दोघांचे स्वभाव अगदी वेगळे होते. मी शाळेच्या शेवटच्या आणि कॉलेजच्या पहिल्या तीन वर्षांत असताना रोजनिशी लिहीत असे आणि ती अजूनही माझ्याकडे आहे. त्या वेळी मी आई-बाबांबद्दल केलेल्या नोंदी आता वाचताना माझे मलाच आश्चर्य वाटते. बाबांच्या आग्रही स्वभावाचा आईने चांगलाच अनुभव घेतला असला पाहिजे. एकदा ती माझ्या माधवमामाला म्हणजे तिच्या धाकट्या भावाला सांगत होती ‘काय माझे आयुष्य! जबाबदारी अंगावर घ्यायची, पैसा मिळवायचा, खस्ता खायच्या आणि शेवटी माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही.’ बाबा नेहमी अधिकारवाणीने वागत, त्यामुळे हे उद्गार आईच्या तोंडून निघाले होते. माझे लग्न झाल्यावर ती एकदा माझ्या पत्नीला म्हणाली ‘लक्षात ठेव, माणसाने नेहमी खूप कमी बोलावे.’ बाबांपुढे होणारी आपली कुचंबणाच जणू तिने व्यक्त केली होती. बाहेर सभा-समारंभाला गेल्यावरसुद्धा आपण कोणी बडी असामी आहोत असे बाबा वागायचे. मी त्यांच्याबरोबर असलो तर मला संकोचल्यासारखे व्हायचे. एके दिवशी एका सभेला जायला आम्हाला थोडा उशीर झाला होता, तरी बाबा मला थेट पहिल्या रांगेत घेऊन गेले. घरी आल्यावर मी जरा धीर करून बाबांना याबद्दल विचारले, तर बाबा एकदम् चिडले आणि म्हणाले ‘मला काही अक्कल नाही असे समजतोस काय?’ माझ्या रागाचा पाराही कधी कधी चटकन् वर चढायचा. एकदा आईने मला म्हटले की बाबा रागीट आहेत आणि तुझा रागीटपणा आनुवंशिक आहे, पण आताच प्रयत्नपूर्वक तुला त्याच्यावर काबू मिळवता येईल, कालांतराने मात्र हे अशक्य होईल. बाबा आपल्या वैयक्तिक जीवनात दुसऱ्यांनी, विशेषतः आईने, त्यांच्याकरता अनेक गोष्टी कराव्यात असे गृहीत धरून चालत. आई त्यांची पाठ चेपून देण्यापासून अशा सगळ्या गोष्टी करायची. त्यांचे आवडते खाणेपिणे, औषधपाणी नीट होईल असा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आईचीच होती. त्यांना दुपारच्या वेळी फळे खायला आवडायचे. ‘चला फलाहार करू या’ असे ते म्हणायचे. पण फळे बाजारातून आणवून, ती नीट कापून आईच बाबांच्या पुढे करायची. बाबांना गोड खाद्यपदार्थ खूप आवडत. वैदिक काळात ‘घृतकुल्या मधुकुल्या’ म्हणजे तुपाचे व मधाचे पाट (वहात असत) असे ते सांगत. त्यांची चुलतबहीण म्हणजे सांगलीच्या गंगूआत्याबाई बाबांच्या लहानपणातला एक किस्सा सांगायच्या. लाडू कितीही गोड केले तरी बाबांना ते सपकच लागायचे. म्हणून आत्याबाईंनी एकदा निव्वळ साखरेचे लाडू तुपाच्या हाताने वळले आणि बाबांना ते कसे झाले आहेत असे विचारले. तर बाबा म्हणाले की ठीक झाले आहेत पण जरा अगोड आहेत! बाबांची ही गोडाची आवड माझ्यातही पुरेपूर उतरली आहे. आमच्या अशा आवडीनिवडी पुऱ्या करायचा आई कसोशीने प्रयत्न करायची, तिची प्रकृति नाजूक असूनही. आपल्याकडून काम करवत नसतानाही ती घरातल्या बारीकसारीक गोष्टी करण्यात गुंतलेली असे. मी आजूबाजूला असलो तर मला हे पहावायचे नाही. आईला परोपरीने सांगूनही ती थांबायची नाही. कधीकधी मला वाटून जायचे की असे वागून आई मला माझ्या निष्क्रियतेबद्दल लाजवत आहे.

कॉलेजमधील शेवटच्या वर्षात असताना गणिताच्या उच्च शिक्षणाकरता अमेरिकेतील काही विश्वविद्यालयांकडे मी अर्ज केले. मला न्यूयॉर्क राज्यातील रॉचेस्टर विश्वविद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्यांनी आर्थिक मदतही देऊ केली. आपल्यापासून आपल्या मुलाने फार काळ दूर राहू नये असे वाटत असूनही आई-बाबांनी माझ्या प्रवासाची पूर्ण तयारी करून दिली. फक्त विमानप्रवासात अपघाताचा धोका जास्त असतो म्हणून मी बोटीनेच जावे असा आग्रह धरला. बोटीत बसायच्या आधी आईने मला एक चिठ्ठी दिली. त्यांत लिहिले होते :

जा पाडसा जा, येई परतुनी त्या विद्वत्जनी चमकुनी

परदेशगमनी हेतु तुझा जो मायभूमिची उज्ज्वल सेवा

स्मरण असू दे त्या हेतूचे, जा पाडसा जा।।

आजवरी जे बीज पेरिले सत्य अहिंसा सदाचार हे

पल्लवू दे तव सत्कृतींनी, जा पाडसा जा।।

होवोत साहाय्यी तुझ्या प्रवासी सर्व पंचमहाभूते

आशीर्वाद तुला दुसरा कुठला न कळे माते, जा पाडसा जा।।

बसते मी आता येथे, मम प्राणांचे मम मायेचे,

दोर लावुनी तुला ऐलतीरी खेचण्याते, जा पाडसा जा।।

जा पाडसा जा, जा बाळा जा, जा जा जा, ये ... ये ... ये।।

बोट सुटल्यावर मी जेव्हा हे वाचले, तेव्हा मला रडूच कोसळले. आजही ते वाचताना माझे डोळे पाणावतात. बोटीवरून पाठवलेल्या पत्रात मी लिहिले ‘आई, तू काळजी करू नकोस, भारतीय किनाऱ्यापासूनच निघालेले दोर खूप मजबूत व घट्ट आहेत.’ अमेरिकेत असताना मला आई-बाबांच्या तब्येतीची, खुशालीची खूप काळजी वाटे, कारण वयोपरत्वे ते दोघे माझे जणू आजी-आजोबाच होते. मी दर शनिवारी लाँड्रोमॅटमध्ये कपडे धुवायला टाकून आई-बाबांना पत्र लिहायला बसत असे. मी आई-बाबांना पाठवलेली पत्रे त्यांनी जपून ठेवली आणि मी परतल्यावर मला दिली. ती पत्रे बघताना लक्षात आले की लिहिताना माझी एखादी चूक झाली असली तर बाबांनी ती तिथेच सुधारली होती, त्यांना एखादा ‘folk-dancing’ किंवा ‘kidding’ यासारखा शब्दप्रयोग नीट माहीत नसला तर त्याचा अर्थ American College Dictionaryमध्ये बघून त्या पत्राच्या मागे त्यांनी लिहून ठेवला होता. अमेरिकेत असताना मलाही घरून दर आठवड्याला पत्र यायचे; बाबा, आई आणि मीरा असे तिघे मिळून एक हवाई पत्र पाठवायचे. मी पण ती सगळी पत्रे जमवून ठेवली होती. परवापरवाच हा जवळजवळ पाचशे पत्रांचा पत्रव्यवहार मी कालानुक्रमाने लावून ठेवला. एका पत्रात बाबांनी लिहिले होते ‘सध्या तुझी पत्रे त्रोटक असतात, तू दोन ओळीत जास्त अंतर ठेवून लिहितोस. असे पत्र वाचून आमचे समाधान होत नाही. तेव्हा सर्व गोष्टी इत्थंभूत लिहाव्यात.’

माझ्या अमेरिकेतील वास्तव्याच्या सुरुवातीलाच फर्ग्युसन कॉलेजमधीलच फिलॉसॉफीचे प्राध्यापक श्रीनिवास व्यंकटेश बोकिल यांच्याबरोबर माझी भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल बरीच चर्चा झाली. डॅन्फोर्ड इन्डियन फेलोशिप (Danford Indian Fellowship) मिळवून तेही उच्च शिक्षणाकरता रॉचेस्टरला आले होते. त्यांच्या संशोधनाचा विषय होता अत्याधुनिक तत्त्वज्ञान. काही महिने आम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये रहात होतो. त्यांच्या आधुनिक युक्तिवादापुढे मला माहीत असलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा मी बचाव करू शकलो नाही. आल्बर्ट कामूच्या अस्तित्ववादाचाही माझ्यावर प्रभाव पडत होता. गणिती दृष्टिकोनातून पहाता मला आत्म्याचे अमरत्व, ‘ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या’ ह्या सगळ्या मानीव गोष्टी वाटू लागल्या होत्या; एक प्रकारची गृहितकेच (hypotheses) म्हणाना. त्या तशाच्या तशा का आणि कशासाठी स्वीकारायच्या असा प्रश्न भेडसावत होता.

अशा परिस्थितीत अमेरिकेला पोचून सुमारे दहा महिने झाले असताना, मी बाबांना एक गंभीर स्वरूपाचे पत्र पाठवले. मी लिहिले, ‘मी इकडे येण्यापूर्वी घरातल्या सगळ्यांप्रमाणे मलाही अद्वैत तत्त्वज्ञान पटत होते. इतकेच नव्हे तर मी त्याचा घडोघडी उपयोगही करत होतो. क्षुल्लक गोष्टींना या विचारसरणीचा कस लावून मी माझे सांत्वन करीत असे. उदाहरणार्थ, मला स्टेजवर जाऊन बोलायचे असेल, किंवा संध्याकाळी खोखोचा सामना असेल, किंवा दुसऱ्या दिवशी एखादी परीक्षा असेल, तर मला धाकधुक वाटत असे. अशा वेळी ‘तू तर आत्मा आहेस, या देहसंबद्ध गोष्टींना कसले महत्त्व देतोस, कर्म निष्काम हवे’ वगैरे स्वतःला सांगून स्वतःचीच समजूत घालत असे. आता मला असे वाटते की समोरच्या परिस्थितीला तोंड द्यायला मी घाबरत होतो आणि म्हणून मला सहजी प्राप्त झालेल्या तत्त्वज्ञानाचे उबदार कवच मी धारण करत होतो. दुसरे असे की आपण चर्चा करीत असताना आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तित्व वस्तुनिष्ठपणे स्थापित करायची पाळी आली की कुणालाच काही उत्तर सापडत नसे. मी त्या पुढचा विचारही करीत नसे. आता मला असे वाटू लागले आहे की ज्या गोष्टी सिद्ध करता येत नाहीत त्या गृहीतकृत्य म्हणून का मानाव्या? आत्म्याचे अस्तित्व मानलेच पाहिजे असे कुठे आहे? मी म्हणजे हा देहच असे का मानू नये? यातूनच पुढचा मुद्दा निघतो तो म्हणजे सुख उपभोगण्याचा. जरी आपले तत्त्वज्ञान सुखविन्मुख असले तरी मी इकडे यायच्या सुमारास सुख उपभोगायला काही हरकत नसावी असे माझे मत झाले होते. पण मी त्याला ‘अलिप्त राहून’ अशी पुष्टी जोडत असे. पण ही पुष्टी तरी कशाला? अलिप्त राहून सुख उपभोगण्यात किंवा दुःख सहन करण्यात एक वेगळाच आनंद असतो असे मी खूप वेळा वाचले, ऐकले, लिहिले व स्वतःला सांगितले आहे. पण हा ‘वेगळाच आनंद’ अनुभवल्याचे स्मरत तर कधी नाही. मला वाटते बऱ्याच गोष्टी संसारामध्ये ‘पर्वताएवढे दुःख आहे’ याला भिऊन रचल्या गेल्या आहेत. पण सतत सुखच पाहिजे असे कुठे आहे? दुःखही असावे की. हे सगळे विचार कितपत बरोबर आहेत याची मला खात्री नाहीये, पण येणाऱ्या प्रसंगांपुढे कचरायचे नाही असे ठरवत आहे. तुमचे आणि आईचे काय मत आहे?’ हे पत्र मी जपून, शक्य तितक्या अदबीने लिहिले होते.

उत्तरात बाबांनी लिहिले ‘तू आपले विचार, मग ते बदललेले का असेनात, धीटपणे प्रगट करत आहेस ही चांगली गोष्ट आहे. तुला नव्याने सांगायचे प्रयोजन नाही की आमच्या इथे पूर्ण विचारस्वातंत्र्य होते व आहे. ‘लालयेत् पंच वर्षाणि’ (म्हणजे पहिली पाच वर्षे लाड करावेत) हे तर केलेच, ‘दश वर्षाणि ताडयेत्’ (म्हणजे नंतरची दहा वर्षे मार द्यावा) याचा मात्र एखाद्याच विशिष्ट प्रसंगी अवलंब केलेला तुला आठवेल. ‘प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत् आचरेत्’ (म्हणजे सोळाव्या वर्षी मुलाला मित्राप्रमाणे वागवावे) या न्यायाने तुझ्याशी मी मनापासून वागत आलो आहे. आता तर हे पत्र पोचेल त्यावेळी तू आधुनिक कायद्याप्रमाणे व रीतीरिवाजाप्रमाणे पूर्ण सज्ञान, मुखत्यार व major होणार. भोग वा त्याग, संयम वा स्वच्छंद, हित वा अहित यामधील विवेक व त्याप्रमाणे प्रसंगोपात्त वर्तन कसे ठेवायचे हे सर्वस्वी अंतरात्म्याला, स्वतःलाच कौल लावून ठरवायचे आहेस, तुझे तूच. काळ बदलला असला व विसाव्या शतकात आम्ही इथे व तू तिथे राहिलो असलो तरी जीवनाची काही नित्य व शाश्वत मूल्ये आहेत ती लक्षात घेऊन जपून वागावे एवढेच मोघम सांगतो.’ हे वाचून मी सावध झालो, पण मला हुरूपही आला.

बाबांच्यापेक्षा आईला माझी जास्त काळजी वाटली. तिने लिहिले, ‘तू भारतापेक्षा अगदी निराळ्या संस्कृतीच्या वातावरणात एकदम् जाऊन पडलास त्यामुळे विचारांचे हेलकावे, काहूर तुझ्या मनात उठणे अगदी स्वाभाविक आहे व म्हणूनच लहान वयात विचार परिपक्व झाल्याशिवाय परदेशगमन इष्ट नाही असे म्हणतात. मुलांचे विचार कोणत्या दिशेने वहात आहेत ते त्यांनी आपल्या आई-वडलांजवळ सांगत रहाणे म्हणजेच त्यांचे सख्यत्वाचे, मायेचे, निर्भयत्वाचे संबंध आहेत असे आम्ही दोघे जणही मानतो, व याप्रमाणेच तू आजपर्यंत माझ्याशी वागत आला आहेस हे मी कबूल करते. त्याला अनुसरूनच तुझे आजचे पत्र आहे. परमेश्वर असो किंवा नसो परंतु त्याचे अस्तित्व मान्य करण्यापासून तोटा काहीच नाही, उलट आपल्याला समाजधारणेला योग्य असे वर्तन करण्याकरिता प्रेरणा मात्र मिळू शकते. सुख कितीही उपभोगले तरी शांति मिळत नाही. दुःखाचे प्रसंग आले की कशी घाबरगुंडी होऊन असहाय वाटते हे मी अनुभवले आहे.’ आईची ही व्यथा मी समजू शकलो. बाबा व आई दोघांनीही मी वेगळे विचार करत आहे याचे स्वागत केले असले तरी मी उपस्थित केलेल्या मुद्यांचा काहीच परामर्श घेतला नव्हता. बाबांनी बाळकडू म्हणून पाजलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानाची कास सोडून मी अज्ञेयवादी (agnostic) बनलो. यानंतरच्या कुठल्याही पत्रात किंवा मी परतल्यावरच्या आई-बाबांबरोबरच्या संभाषणात हा विषय पुन्हा निघाल्याचे मला आठवत नाही.

(क्रमशः)

---

बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर निवृत्त. पवईलाच रहिवास. मराठीत ललित लेखन करण्याचे धाडस प्रथमच करत आहे.


(मौज, दिवाळी २०२०, या अंकात ‘आई-बाबांची स्मृतिचित्रे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही सुधारून वाढवलेली आवृत्ति आहे. शुद्धलेखन मुळाबरहुकूम आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाही भाग आवडला. धन्यवाद.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय अतिशय सुंदर आहे हा भाग. आपले आई-वडीलांबरोबरचे भावनिक संबंध, आडनिड्या वयात मनात उसळणारा कल्लोळ, आपल्यावरचे संस्कार सर्वच छान रेखाटले आहे. इथे ऐसीवरती, लिहीत जा सर. ललित, कथा, अनुभव, प्रवासवर्णने सारे काही येउ द्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पण ती सगळी पत्रे जमवून ठेवली होती. परवापरवाच हा जवळजवळ पाचशे पत्रांचा पत्रव्यवहार मी कालानुक्रमाने लावून ठेवला.

रोचक!

हा पत्रव्यवहार जसाच्या तसा प्रकाशित करावा असं म्हणणं लई मागणं होईल, पण कमीतकमी संपादित स्वरूपात तरी प्रकाशित करावा ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खूपशी पत्रे घरगुती स्वरूपाची आहेत, पण काही निवडक पत्रे वाचनीय ठरू शकतील. केव्हातरी ते करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरगुती स्वरूपाची असणार हे आलंच, पण त्यातही :
१) कौटुंबिकदृष्ट्या खाजगी ठेवावीशी वाटतील अशी पत्रं
२) कौटुंबिक जीवनाचं वर्णन करणारी, पण खाजगी/गोपनीय नसणारी पत्रं
असे दोन भाग करता येतील.

खाजगी असणारी पत्रं / पत्रांतले उल्लेख अर्थातच प्रसिद्ध करू नयेत. पण काही खाजगी नसेल तर केवळ 'कौटुंबिक विषयांना वाहिलेलं' म्हणून ते बाजूला सारू नये. सामाजिक इतिहासासाठी तो एक महत्त्वाचा दस्तावेज असू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकदम मान्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0