डॅफोडिल्स

काल सकाळी लातूरला आलो. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात असल्यामुळे लातूरला येणं होत नाही. जॉबमुळे तर पुण्यातल्या पुण्यात पण फिरायला वेळ मिळत नाही. इथं राहायला लागून सात वर्ष होतात. कितीतरी गोष्टी बघायच्या राहिल्यात पुण्यातल्या. महादजी शिंदेंची छत्री, राजा दिनकर केळकर संग्रहालय. एकदा फक्त पर्वतीवर गेलो होतो. पुण्यात पहिल्यांदाच आलो तेव्हा. तीन-चार वेळेस सिंहगड. बाकी फारसं फिरणच होत नाही. काम, काम, काम आणि नुसतं काम.

घर बांधायला काढलंय. दोन महिन्यांपूर्वी सुरू केलंय. महिन्यातून किमान दोन-तीन वेळेस शनिवार-रविवारी यावं लागतंय. त्यामुळं लातूरचं दर्शन नेहमीच व्हायला लागलंय. लवकरच स्लॅब पडेल. स्लॅब व्यवस्थित पडला, की पुढची कामे सुरळीत होतात म्हणे. पूर्वी फक्त दोनच खोल्या बांधलेल्या होत्या. राहिलेलं बांधकाम पूर्ण करावं म्हटलं तर पैसे नव्हते. आता थोडा पैसा मागे पडलाय तर चटकन घर बांधायला काढलं. पूर्वीच्या खोल्या स्पंज गिलाव्याच्या होत्या. हात फिरवताना खडबडीत लागायचं. त्यांना सिमेंट कलर मारलेला. तेव्हा जे परवडत होतं ते केलं वडिलांनी पण यावेळी सनला करायचाय. तसंच पेंट करताना लस्टर पेंट करायचंय निदान हॉलला तरी आणि पीओपी पण. व्हीट्रीफाईड टाईल्स बसवायच्यात. आधीच्या दोन्ही खोल्यात मोझ्यॅक टाईल्स होत्या. आता काळ्या पडल्यात. त्यामुळं घर एकदम पॉश करायचा इरादा आहे.

एवढा आटापिटा करून घर बांधण्याचं दुसरं कारण म्हणजे आमचा समाज. आमच्या समाजात मुलाचं घर बघून मुलगी देतात. त्यामुळे त्याला कमी पगार असला तरी चालतो मात्र घर असणं गरजेचं आहे. आमच्या नातेवाईकात बऱ्याच जणांना याचा अनुभव आलाय म्हणून वडिलांनी लगेच घर बांधायला घेतलं. मला एमए झाल्या झाल्या नोकरी लागली म्हणून बरं झालं नाही तर वडिलांच्या एकट्याच्या जीवावर ते शक्य नव्हतं. लहान भावाचं शिक्षण चालूय. पुढे शिकणारे म्हणला. त्यामुळे निदान माझं लग्न लवकर व्हावं म्हणून घर बांधायला घेतलंय.

कालचा सगळा दिवस काम बघण्यात गेला. काही ना काही छोटी कामं निघाल्यामुळे सतत गाडीवर फिरावं लागत होतं. हे राहिलं, ते राहिलं. एक ना धड वस्तू राहतातच. आता संध्याकाळी मिस्त्री आणि लेबरचं पेमेंट केलं. फ्रेश होऊन आलोय इथे यादगारवर.

आमचे परममित्र, जीवश्च कंठश्च, जाने जिगर, जिगर का छल्ला, लख्ते जिगर, कलेजे का टुकडा, मेरा यार, मेरा प्यार, एक लंगोटी दो यार, हमरी दोस्ती का चश्मोचिराग डीएम येणार आहे. डीएम म्हणजे ज्ञानेश्वर म्हेत्रे. माझा बीएपासूनचा मित्र. फर्स्ट ईयरला भेट झाली ती अजून कायम आहे. तो डीएम तर मी सीएम म्हणजे चैतन्य मुदेनुर. आमची जोडी डीएम-सीएमची जोडी म्हणून फेमस होती कॉलेजात. त्यामुळं लातुरात आलं की डीएमला न भेटता परत जाणं शान के खिलाफ.

आम्ही गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहिलोय ते मी पुण्याला एमए करायला गेल्यामुळे. मला लातूरचा कंटाळा आला होता. लातूरच्या बाहेरचं जग बघायचं होतं. त्यासाठी लातुरातून बाहेर पडणं गरजेचं होतं. एकच पर्याय होता एक तर पुण्याला नाही तर मुंबईला जाणे. जिवाची मुंबई लैच दूर. त्यापेक्षा पुणे तिथे काय उणे जवळ असल्यामुळे तिकडच जायचं ठरलं. डीएमला म्हणलो होतो चल, तिकडच ऐश करू तर फक्त एंट्रन्ससाठी आला. वाडिया, मॉडर्न, पुणे युनिव्हर्सिटी, फर्गसनच्या एंट्रन्स दिल्या. त्याचा मॉडर्नला नंबर लागला तर माझा फर्गसनला. काय झालं, काय माहिती! मॉडर्नला अॅडमिशन न घेता उदगीरला उदयगिरीला अॅडमिशन घेतला. मी सांगून पण त्याच्यात फरक पडला नाही. मी एमए करून पुण्यातच राहिलो. जॉब शोधला. कामाला लागलो. डीएम लातुरलाच राहिला.

“सतश्री अकाल पाजी. कैसा है तू मेरे यार. भाभीजी कैसी है? बच्चे वगैरा सब ठीकठाक है की नहीं.,” तो बाईक साईड स्टॅन्डला लावत असतानाच त्याच्या पाठीवर मारत मी म्हटलं.

आमचं हे नेहमीचंच. मी नाही बोललो तर तो बोलायचा.

“बोल, काय म्हणतोस?,” त्याचा अतिशय थंड रिप्लाय आला. बाईकला तसाच खेटून थांबत म्हणाला. मला एकदम कुणीतरी फटकन कानफटात मारलीय असं झालं. त्याला कधीच असा रूक्ष रिप्लाय देताना बघितला नाही. बदललेला वाटला डीएम.

“चल, चहा घेऊ.,” उगाच त्याच्या रिप्लायला रिप्लाय देण्यापेक्षा चहा बरा वाटला मला.

यादगारच्या बाहेर दोन्ही बाजूला ओळीने प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवलेल्या असतात. आम्ही अगदी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दोन खुर्च्यांवर बसलो. दुकानात आत ओरडून दोन चहा सांगितला.

“मग काय चाललंय अजून?,” मीच सुरूवात केली. त्याचा मूड दिसत नव्हता बोलण्याचा.

“काही नाही. एका कॉलेजला जॉईन झालोय यावर्षी. तिथंच सगळा दिवस जातो. थकून जातो.”

“कोणतं कॉलेज?”

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज. वासनगाव साईडला आहे.” त्याचं बोलणं खूपच तुटक वाटत होतं.

“पगार किती?,” औपचारिक प्रश्न मला विचारावे वाटत नाहीत पण राहवलं नाही.

“देतात पोटापाण्यापुरतं. दोन वेळच्या जेवणाची सोय होते त्यात.,” साधी दोन वाक्येच बोलला पण त्या पाठीमागचा एका अॅटमबॉम्ब एवढा राग लपून राहिला नव्हता. मला ते जड गेलं. परिस्थितीमुळे हतबल, हताश, निराश झालेला डीएम मी बघितला नव्हता कधी. यादगारच्या प्रकाशात तर तो अजून रागीट दिसत होता.

“काय झालं? इतने मायूस क्यूँ हो मेरे लख्ते जिगर. चीअर अप. डू समथिंग.” त्याला बरं वाटावं म्हणून म्हणत होतो.

“काय करू?,” त्याच्या टोनचा राग येत होता.

“चल, बसू. आपल्या नेहमीच्या ठिकाणी.”

“चल. लै डोकं पकलंय. खूप दिवस झाले बसलोच नाही.”

त्यानं म्हणायचं उशीर चहाचं बिल देऊन माझ्या गाडीवर निघालो आम्ही. आमचा ठरलेला बार होता. अंबाजोगाई रोडवर नवीन रेणापूर नाक्याकडून सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर फ्रेंडली रेस्टो बार नावाचा बार आहे. नाव जरी रेस्टो बार असलं तरी रेस्टॉरंट कमी बारच जास्त होता. अतिशय फिकट लाईटमध्ये विटांच्या भिंतीत छोट्या छोट्या केबिन्स केलेल्या. शहरापासून बाहेर असल्यामुळे आजूबाजूला शेताशिवाय काहीच नाही.

आम्हाला असाच बीएला असताना हा बार सापडला. कॉलेजचा एक पेपर तर सकाळी बसून दुपारी द्यायला गेलो होतो इतका आवडता बार झाला होता. विशेष म्हणजे कॉलेजातल्या एकाला पण कळलं नाही की आम्ही पिऊन पेपरला बसलो होतो म्हणून. तेव्हा असं काही करताना लै भारी वाटायचं. बंडखोरी वाटायची. आता च्युत्याप्पा वाटतो.

पोचलो तेव्हा सहजच आजूबाजूला नजर टाकली तर लांबवर बरीच घरं दिसली. लातूर वाढत होतं कासवाच्या गतीने.

आत कोपऱ्यातल्या एका केबिनमध्ये बसलो. त्याच्यासाठी किंगफिशर व मला फ्युअल मागवलं.
बिअर दिसली की मूड खुलतो त्याचा. इतकी वर्ष झाली पितोय आम्ही पण दोघांचा ब्रँड तोच.

पेग बनवून घ्यायला सुरूवात केली तसा डीएम बोलायला लागला.

“यावर्षी लग्न करतोय.”

“काऽऽऽय? आत्ता सांगायला का? वॉव. भारीच. हार्टीएस्ट काँग्रॅच्युलेशन. कुठली मुलगी आहे?”

“थँक्स. इथलीच बर्दापुरची. आमच्याच कास्टमधली आहे. वडील महसूल खात्यात अधिकारी आहेत परभणीला. एकुलती एक आहे.”

“शिक्षण काय झालंय?”

“बारावी. पुढे शिकली नाही. पण घरकामात एक नंबर आहे.”

“काऽऽऽय?,” सगळी उतरली माझी. “आबे, फक्त बारावी पास. काही कळतंय का तुला? तू एमए इंग्लिश अन् बायको फक्त बारावी पास. चुत्या झालास का? निदान ग्रॅज्युएट तरी बघायची ना! लोकं काय म्हणतील?”

“कोण काय म्हणणारे! लग्न करतोय हे ऐकूनच खुशैत सगळे. आमच्या समाजात शिक्षणाला एवढं महत्त्व देत नाहीत. त्यामुळं स्थळ चांगलं वाटलं म्हणून होकार दिला.”

“मला पटत नाही तू लगेच तयार झालास म्हणून. पीएचडी केलेल्या मुलीशीच लग्न करीन म्हणाला होतास. काय झालं त्याचं?”

“नाही करणार. साधी गोष्टय. बोललो म्हणजे करायलाच पाहिजे असं थोडीच आहे.”

त्याचा रूडपणा वाढत चाललाय वाटलं मला. माझे पेग नेहमीप्रमाणे चटचट वाढत जातील वाटत होतं पण तसं होताना दिसत नव्हतं.

“एवढं तडकाफडकी लग्न करण्याची काय गरजय! अजून दोन-तीन वर्ष केला नाहीस तर बिघडणार नाही काही.,” मला राहवत नव्हतं. आम्ही कॉलेजला होतो तेव्हा लग्न करताना दोघांनी एकदमच घरी सांगून मुली बघायला सुरूवात करायची असं ठरलं होतं. मी पुण्याला गेल्यावर बऱ्याच गोष्टी बदलल्यात.

“हे स्थळ सांगून आलं होतं. तुझ्या वहिनीचे वडील महसूल खात्यात अधिकारी आहे. मध्यस्थानं माझा जॉब सांगितला त्यांना. आमची अडचण सांगितली. सासरे म्हणाले मी पैसे भरतो पण एका अटीवर माझ्या मुलीशी लग्न करावं लागेल. एकुलती एक मुलगी त्यांना. त्यामुळं त्यांना काही वेगळं वाटलं नाही पैसे द्यायला. आम्ही खूप विचार केला यावर. असंही संस्थाचालक म्हणतच होते वीस लाख द्या पर्मनंट करतो म्हणून. अनायासे स्थळ चालून आल्यावर मी होकार दिला. तुला माहितीचय आधीच ओबीसींच्या जागा निघत नाहीत. त्या आयघाल्या फडणवीसनं बामनांच्याच जागा निघाव्यात म्हणून आमची खुट्टी मारून ठेवलीय. एकतर बामनांच्या जागा निघतात नाही तर एस्सीच्या. आम्ही असेच मधे लटकलेले. त्यामुळं स्थळ आलं तरी आम्ही विचार करूनच निर्णय घेतलाय.”

त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. पर्मनंट होणारे याचं समाधान दिसत होतं. मी ऐकून स्तब्ध झालो होतो. हे वाईटातल्या वाईट स्वप्नात सुद्धा मी इमॅजिन केलं नव्हतं. काही सेकंद काय बोलावं सुचलं नाही मला. जिभेची चवच गेली माझ्या.

“वहिनी दिसायला कश्या आहेत? फोटो बघू.”

त्यानं उत्साहानं फोटो दाखवला.

“यापेक्षा कित्येक चांगल्या मुली सांगून आल्या असत्या तुला. कशाला करायलास उगाच.” मुलगी ठार काळी आणि जाड होती. काळी असली तरी देखणी नव्हती.

“काय फरक पडणारे. कुठं चोवीस तास सोबत असणारे. रात्री तेवढं लाईट बंद करून कार्यक्रम उरकायचा. अजून काय!” स्मितहास्य करत बोलला.

“दिवसा करायचं असल्यास?,”

“त्यात काय. तोंडावर टावेल टाकायचं. झालं. देवानं जे गरजेचं आहे ते भरभरून दिलेलं असतंयच की.”

“हं...,”

सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं डार्विन म्हणायचा. त्याचाच प्रत्यय आला मला. त्यानं गलापगस बेटांना भेट न देता डीएमला भेट द्यायला पाहिजे होती. जगण्यासाठी माणूस वाट्टेल त्या थराला जातो असं आपण नेहमी म्हणतो. पण उदाहरण म्हणून याची स्टोरी कशी सांगायची लोकांना!

“एवढी झवझव करायची काय गरजय! तेच पैसे एखाद्या बिझनेसमध्ये घाल नाही तर अॅकॅडमी उघड. जेसीबीनं पैसे कमवशील. तुझ्यासारख्या हुशार माणसाने फक्त मेहनत करायची खोटी. आपलं वय आहेच किती असं! सत्तावीस फक्त. पन्नाशीपर्यंत काम केलास तरी खूपय. नंतर नुसतं बसून खायचं. अजून काय!”

“माझं बंद बसलंय का? इथले क्लासेसवाले नवीन क्लासवाल्यांना एस्टॅब्लिश होऊ देत नाहीत. मी एक दोन ठिकाणी जॉब केलाय. खतरनाक कटथ्रोट कॉम्पिटीशन आहे. धंदा करणं होणार नाही माझ्याकडून. झवझव नुसती. कुठं उठून दररोजच लफडे अंगावर घ्या. त्यापेक्षा संस्थाचालकाला पैसे दिले की झालं. सकाळी कॉलेजला जायचं. संध्याकाळी घरी यायचं. बायकोच्या हातचं जेवायचं. रात्री तिला जवळ घ्यायचं. पोरांचं शिक्षण बघायचं. अजून राहतयच काय आयुष्यात. जमल्यास पीएचडी करणारे.”

“...म्हणजे आयुष्यभर संस्थाचालकाची गुलामी करणार म्हण की. मला वाटलं कर्तृत्ववादी माणूस असशील तू. एकदम भिकुरडा निघालास.,” मला राग कंट्रोल होत नव्हता. मी पुढे बोलणं चालूच ठेवलं. “पुण्यात लोकं इतके पैसे इन्व्हेस्ट करायला मिळाले तर नोकरी सोडून बिझनेस करतो म्हणतात. तुला आयतं मिळतायत तर बिझनेस नको वाटतो. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत असं झालंय. मायला, जमीन-अस्मानाचा फरक आहे लातूर आणि पुण्यात.”

“आयघाल्या, गुलामी कसली आलीय त्यात. इथं जगण्याचे वांदे झालेत. कुठं आयुष्यभराची रिस्क घ्यायची. जेवढं सोपं होतंय तेवढं करायचं आपण. आपल्या हातातल्या गोष्टी आहेत का ह्या?,” पिणं वाढलं असलं तरी काय बोलायचं नेमकं ठाऊक होतं त्याला.

“मग फडणवीसला शिव्या का घालायलास! फडणवीसने घेतलेला निर्णय इतर ओपनवाल्यांना पण लागू होत असेल ना! का फक्त बामनांचाच उद्धार करायचा एवढाच उद्देश आहे. जर त्यानं त्यांच्याच जातीपुरता विचार केला तर तुम्ही पण तसंच करा. ओबीसींचा नेता मुख्यमंत्री करा. त्याच्याकडून तुमच्या पिढ्या बसून खातील अशी नियमांची तजवीज करून ठेवा. जशाच तसे. आणि हे असले धंदे केल्यापेक्षा एवढा पैसा आहे तर तूच का संस्था काढत नाहीस. सगळ्या ओबीसीवाल्यांनाच जॉब दे. बाकीचे मरू देत. संस्थाचालक म्हणून ऐटीत कॉलेज चालव. नोकरापेक्षा मालक हो. नाक वर करून शान के साथ आयुष्य जग.”

त्याचं पिणं अर्ध्याच्या वर संपलं होता. मी अजून अर्ध्याला पण आलो नव्हतो.

“माझं बंद बसलंय का संस्था काढायला.,” ग्लासातली उरलेली बिअर संपवत म्हणाला.

लातूरच्या लोकांचं एक बरं असतं. त्यांना त्यांच्या फायद्याची गोष्ट सांगितली, की राग येतो. मग ठरलेलं वाक्य म्हणायचं माझं बंद बसलंय का. पूर्वी मी पण म्हणायचो पण आता मलाच त्याचा कंटाळा आलाय.

“राह्यलं. मी तुझ्या फायद्याची गोष्ट सांगितली. पण एका गोष्टीची खंत वाटते. बोलल्या शिवाय राहवत नाही म्हणून बोलतोय. तुझा हा निर्णय नाही पटला मला. तू सहा महिने होतास पुण्याला. तुझ्या स्वभावाचा एक वेगळाच पैलू दिसून आला तेव्हा. तुला मोठी जबाबदारी पार पाडायची म्हटली, की पळवाट शोधायची सवय आहे. कॉलेजपासून बघत आलो होतो. पुण्यात जवळून अनुभव घेतला. तिथं सुद्धा तुझ्या अॅटीट्युडमध्ये काडीचा बदल केला नाहीस. सहा महिन्यात परत आलास. तुझ्या टर्म्सवर जगानं वागावं असं वाटतं तुला पण त्यासाठी आधी आपलं कर्तृत्व मोठं असायला हवं हे मान्य नाही तुला. लातूरला परत आलास तेव्हा वाटलं तुझ्यात बदल झाला असेल तर आहे तसाच आहेस. काहीच फरक पडला नाही. आता वाटतंय तू डॅफोडिल्स कसा शिकवशील ते. निदान विद्यार्थी तरी चांगले घडव.”

माझं बोलणं संपलं. आमच्यात विचित्र वाटणारी, सहन न होणारी लंबी खामोशी अनुभवली मी. माझा पिण्यातला इंटरेस्ट संपला होता. त्याची बिअर संपली होती.

“तुला आठवतंय आपण तुझ्या काकाच्या यामाहा आरएक्स १०० वर नागझरीला गेलो होतो. येताना एका शेताच्या बाजूला थांबून मोठ्याने डॅफोडिल्सचा पहिला स्टॅन्झा म्हणालो होतो.”

माझ्यामुळे गेलेला मूड परत आणण्यासाठी मी म्हणायला सुरूवात केली. तो जॉईन होईल वाटलं होतं पण झाला नाही.

आय वाँडर्ड लोनली अॅज अ क्लाऊड
दॅट फ्लोटस ऑन हाय ओ’र वेअल्स अँड हिल्स,
व्हेन ऑल अॅट वन्स आय सॉ अ क्राऊड,
अ होस्ट ऑफ गोल्डन डॅफोडिल्स;
बिसाईड द लेक, बीनीथ द ट्रीज,
फ्लटरिंग अँड डान्सिंग इन द ब्रीझ

पिलो असलो तरी आवाज खणखणीत होता. माझा मलाच जाणवला.

“कसला अविस्मरणीय सुंदर अनुभव होता तो. आठवतंय का! खुल्या आकाशाखाली मनसोक्तपणे वर्ड्सवर्थची कविता म्हणणारे आपण दोघेच असू लातुरात बहुतेक. कुणालाच आपण हे सांगितलं नाही. कवितेसारखंच मनात जपून ठेवलंय.”

मी काय म्हणालो ते कळलं नाही त्याला. त्यानं काहीच रिप्लाय दिला नाही. बहुदा बिअर चढली होती. मला मात्र सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. पण त्याचा अवतार बघून मी स्वतःला आवरतं घेतलं. या निमित्ताने लातूरच्या एका बारने वर्ड्सवर्थच्या कवितेचा पहिला स्टॅन्झा ऐकला हे पहिल्यांदाच घडलं असणार.

बिल देऊन गाडीजवळ आलो तेव्हा दहा वाजून गेले होते. पिल्यावर ढाब्यावर जाऊन जेवायची सवय होती आम्हाला. पण आज जेवण्याचा मुड नव्हता. डीएम पार गेला होता. गाडीजवळ येईपर्यंत त्याला पाय नीट ठेवता येत नव्हते. तसाच त्याला गाडीवर बसवून यादगारपर्यंत आणलं. त्याच्या मावस भावाला कॉल केला त्याला घेऊन जा म्हणून सांगण्यासाठी.

त्यांची गाडी जात होती तेव्हा अधनंमधनं चमकणाऱ्या रस्त्यावरील लाईट्समध्ये तो हळूहळू माझ्यापासून कायमचा दूर जात अंधारात लुप्त होतोय असं वाटत होतं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कथा आणि भाषा दोन्ही आवडली. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0