छोड दो ऑंचल... 

Blue Saree

"व्हाय डू फॅट इंडियन विमेन वेअर सारीज? देअर बेलीज लुक टेरिबल! अँड वी आर अड्वाइज्ड टु कव्हर अप?"
 "व्हाय डू सम  इंडियन मेन होल्ड हॅन्ड्स विथ ईच अदर? दे डोन्ट लुक लाईक दे आर ए कपल!" 

२००८ साली मी माझ्या काही परदेशी मित्र-मैत्रिणींबरोबर भारतवारी केली होती. तेव्हा रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्याकडून आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी या दोन प्रतिक्रिया मला आजही लक्ष्यात आहेत. यांतली पहिली प्रतिक्रिया ऐकून मनातल्या मनात माझा प्रचंड संताप झाला होता. पण माझ्याबरोबर आलेले लोक आठवड्यातून चार वेळा उदबत्त्या लावून 'योगा' करणारे, माझ्याकडून पालक पनीरची पाककृती घेऊन घरी करून बघणारे, भारतात जायचं म्हणून सहा-आठ महिने प्रचंड उत्साहात असणारे होते. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया खरंच निरागस कुतूहलातून आली असेल का? पण तशी जरी ती आली असली, तरी त्यांनी ती व्यक्त केली नसती तरी चाललं असतं. किंवा मी नसताना केली असती तर बरं झालं असतं, असं मला सतत वाटत राहिलं. भारताबाहेर राहताना उघड-उघड वंशवादाला तोंड देण्यापेक्षा पूर्वग्रहांना सामोरं जाणं जास्त कठीण वाटायचं. कारण तो ग्रह इतर वेळी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या कुणाकडूनतरी यायचा. याची काही उदाहरणं म्हणजे: 
 "बट युअर इंग्लिश इज सो गुड!"
 "यू आर नॉट लाईक अदर इंडियन पीपल आय हॅव्ह मेट." 
अशा वरवर स्तुतिपर वाक्यांमधूनही हे ग्रह दिसायचे. इंग्रजी मातृभाषा नसलेले अनेक युरोपियनसुद्धा माझं इंग्रजी चांगलं असण्याबद्दल मला असं बोलून दाखवायचे. आपला इंग्रजीचा लहेजा कसा आहे यावरूनही आपली पारख होत असते. माझ्या इंग्रजी बोलण्याला मराठी वळण किंवा भारतीय वळण कमी होतं. तसंच लहानपणीपासून इंग्रजी शिकल्यामुळे व्यासंगदेखील जास्त होता. पण मला हे वाक्य बोलून दाखवणारे मात्र स्वतः स्पॅनिश, ग्रीक नाहीतर फ्रेंच वळणाने इंग्रजी बोलायचे. आणि त्याच भाषेत पूर्ण शिक्षण घेतलेले असायचे. आमच्या प्रयोगशाळेमध्ये आयव्हरी कोस्टचे  (एक आफ्रिकन फ्रेंच वसाहत) एक नवरा-बायको होते. त्यांनी जेव्हा मुलं होऊ द्यायचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना आपली मुलं ऑस्ट्रेलियन वळणाचं इंग्रजी बोलणारी होणार याचं अगदी मनापासून दुःख व्हायचं. खरंतर ते दोघे नीट फ्रेंचदेखील नव्हते. पण त्यांना नुसता त्यांच्या भाषेचाच नाही पण त्या भाषेच्या वळणाने इंग्रजी बोलण्याचाही प्रचंड अभिमान होता. काही भाषांची छाप असलेल्या इंग्रजीला प्रतिष्ठा असते.   भारतीय लोकांना मात्र त्यांच्या बोलण्याचं भारतीय वळण असं मिरवता येत नाही. भारतीय लोकांच्या बोली इंग्रजीचा वापर विनोदनिर्मितीसाठी अनेक मालिकांमधून, अगदी पीटर सेलर्सच्या काळापासून,  झाला आहे. रसेल पीटर्स नावाच्या भारतीय वंशाच्याच स्टॅन्ड अप कमीडियननं भारतीय लोकांच्या इंग्रजीबद्दल अनेक यशस्वी प्रयोग केले होते. आणि गंमत म्हणजे त्याच्या चाहत्यांमध्ये भारतीय लोकच जास्त होते. आजकालचं जग या बाबतीत थोडं संवेदनशील झालं असलं तरी एखाद्या गटाच्या विशिष्ट लकबींचं, वागण्याचं असं सरसकटीकरण करून विनोद निर्मिती लोकच नाकारतील अशी परिस्थिती अजून आली नाही.  

सुरुवातीला अशा वेगवेळ्या देशांतल्या लोकांबरोबर मैत्री झाली तेव्हा ती मैत्री किती उदात्त आहे, आपली क्षितिजं किती विस्तारली जात आहेत याबद्दल आनंद आणि अभिमान असं सगळं वाटलं. पण सहवास वाढत गेला तश्या काही बोचणाऱ्या गोष्टीही समोर येऊ लागल्या. अर्थात, त्यानं काही मैत्री कमी झाली नाही. उलट खरा क्षितिजविस्तार या अशा टोचणाऱ्या गोष्टींनीच साधला. आम्ही सगळेच पंचविशीच्या आतले किंवा आसपासचे होतो. त्यामुळे आपापले देश सोडून एका नवीन देशात एकत्र येताना, आपल्या देशातल्या, इतरांच्या देशांतल्या आणि आपण जिथे आलोय त्या देशातल्या पद्धती असं तिहेरी शिक्षण चालू असायचं. तसं होत असताना नेहमीच दुसऱ्याच्या संस्कृतीबद्दल टाळायचे असंवेदनशील प्रश्न कुठले असतात याचं भान राहायचं नाही. अनेक वेळा, एखाद्या पार्टीमध्ये काही विनोद करून झाल्यावर, रात्री एखाद्या मित्राचा माफी मागणारा मेसेज यायचा. बऱ्याचदा मला त्या विनोदाचं काही वाटलेलं नसायचं किंवा मला तो लक्षातही नसायचा. पण तरीही त्यावरचा हशा संपल्यावर पुन्हा विचार होतो आहे, आणि तोही आपल्यासाठी, यामुळे मैत्री घट्टच व्हायची.  

लठ्ठ असणाऱ्या भारतीय बायका त्यांचं सुटलेलं पोट दाखवणारा पेहराव का करतात? या प्रश्नापाशी मी अडखळले. त्या वेळी त्या प्रश्नाला द्यायला माझ्याकडे कानउघाडणी करणारं ठाम उत्तर नव्हतं. कारण अनेक वर्षं गुलामगिरीत राहिलेल्या संस्कृतीतून आलेली आणि इंग्रजी भाषा, इंग्रजी रॉक बँड, पाश्चात्त्य कपडे-खाद्य-मद्य वगैरे गोष्टींबद्दल प्रेम असणारी मी अशावेळी पटकन विरोध करू शकायचे नाही. मला जाज्वल्य देशाभिमान कधीच नव्हता, पण मला कधी आपला देश आणि देशातले लोक पाश्चात्त्यांपेक्षा कमी दर्जाचे आहेत असंही वाटलं नव्हतं. तसंच तो प्रश्न कुतूहलातून आलाय की असंवेदनशीलतेतून हे त्या वेळी पटकन ठरवता आलं नाही. पण मला एकदम राग आला, म्हणजे तो प्रश्न कुठल्यातरी एका पातळीवर खटकणारा होता एवढं मात्र लक्षात आलं. आणि शालीनतेचं द्योतक असलेल्या साडी या पेहरावाबद्दल कुणी असं कसं काय बोलतं याचाही थोडा धक्का बसला. खरंतर जीन्स आणि टीशर्ट साडीपेक्षा जास्त अंगभर असतात. तरीही आपल्याकडे स्त्रीत्वाचं, स्त्रीच्या सौंदर्याला खुलवणारं असं 'नंबर एक' वस्त्र जर शोधायचं असेल तर ती निर्विवाद साडीच असेल. 
या  प्रश्नावर निरुत्तर होण्याचं अजून एक कारण होतं. साडीत पोट दाखवायचं नाही ही शिकवण मला अगदी लहानपणीपासून घरूनच मिळाली होती. 
Blue Saree

माझ्या आजीची खऱ्या लावण्यवतीची व्याख्या म्हणजे, "इतकी शेलाटी, गोरी, सुंदर आहे; पण साडीत कधी इंचभर पोट दाखवणार नाही!" अशी होती. मी आणि माझी मामेबहीण पाच-सहा वर्षांच्या असल्यापासून साडी नेसून भातुकली खेळायचो. पण अगदी बालवयातल्या तयार साड्यादेखील आजी चोळी 'इन' करून नेसवून द्यायची. आजी अनेक वर्षं कोल्हापूरच्या एमएलजी मुलींच्या शाळेची मुख्याध्यापिका होती. त्यामुळे असेल की काय न कळे, पण  ती स्वतः मागून कडेकोट बंद असलेलं, पाठ आणि कंबर पूर्ण झाकणारं, लांब ब्लाउज घालायची आणि त्याखाली लगेच सुरू होईल अशी साडी नेसायची. कधीकधी तिची साडी खालून टांगेवाल्यासारखी दिसायची. तरीही ती तश्शीच नेसायची. आईनं कदाचित  तिच्या आईविरोधातलं बंड म्हणून ही प्रथा मोडून काढली असावी. पण माझ्यावर माझ्या आजीचा प्रभाव जास्त असल्यानं मी अजूनही हा नियम पाळते. ब्लाउजच्या बाह्या उडवून बिनबाह्यांचंच काय, पण एकदा एका कॉस्च्युम पार्टीला मी ब्लाऊजच्या जागी कॉर्सेटही घालून गेले होते. पण साडीतून पोट न दाखवण्याचा नियम अगदी स्वतःच्या लग्नातल्या साड्या नेसतानाही मी पाळला. त्यामुळे हे वाक्य ऐकून मला ते म्हणणाऱ्या व्यक्तीचा आला, तितकाच स्वतःचाही राग आला होता. 

आपणही अशी साडी नेसणाऱ्या बायकांबद्दल असा विचार करतो का? फक्त या समोरच्या मुलीनं तो सहज व्यक्त केला म्हणून आपण दांभिकपणे, "त्यांच्या शरीरावर त्यांनी कसे कपडे घालायचे हे तू कोण ठरवणार?" असं उत्तर द्यावं, की आपल्यालाही तेच योग्य वाटतंय असं म्हणावं यात मी अडकले. शेवटी साडी हा भारताचा पारंपरिक पेहराव आहे. आणि या बायका पूर्ण अंग झाकणारे असले म्हणून लगेच सलवार कुडता किंवा जीन्स टीशर्ट असे कपडे घालायला लागणार नाहीत असं सपक उत्तर दिलं. पण फक्त 'साडी कशी नेसतात' या एका गोष्टीवरून मी माझ्या घरातल्या बायकांना इतर बायकांची मापं काढताना अनेकदा बघितलं होतं. 

"केवढे ते गळे मागून! शोभत नाही. एखादी शेलाटी मुलगी असती तर खपूनही गेलं असतं..." 
"आमच्या सुलभाची ऑफीसमधली मैत्रीण, रोज ऑफीसला अगदी आखूड पट्ट्याचं स्लिव्हलेस ब्लाउज घालून येते. नवऱ्याला कसं चालतं काय माहीत!"
"वरून ब्लाउज इतकं आखूड, आणि साडी पार बेंबीच्या खाली! नटमोगरी आहे झालं!" 
"तिनी खरंतर तिच्या रंगाला शोभतील अशा फिक्कट रंगाच्या साड्या नेसाव्यात. परवा गडद पिवळी नेसून आली होती. टॅक्सीच जणू!"
"हल्लीच्या नवऱ्या, लग्नात पहिल्यांदा नऊवारी नेसतात आणि ढमाढमा ढांगा टाकत येतात बोहल्यावर! नऊवारी नेसायची सवय लागते. या नवऱ्या तलवारी घेऊन आल्या तरी नवल वाटणार नाही कुणाला!" 

या शेवटच्या वाक्यामुळे मी माझ्या लग्नात अजिबात नऊवारी नेसायची नाही हा निर्णय वीस वर्षांची व्हायच्या आधीच घेऊन टाकला होता. हा निर्णय इतक्या लहान वयात घेतला याचं नवल वाटून घ्यावं, की आपण लग्न करणार आहोत हा निर्णय मी वीस वर्षांची होण्याआधीच घेतला होता याचं नवल वाटून घ्यावं हादेखील एक अवघड निर्णय आहे. 

भारतात साड्यांचे जितके प्रकार आहेत, तितकेच साड्यांवरून आर्थिक, सामाजिक, नैतिक लायकी ठरवायचे प्रकार आहेत. एका गुजराती मित्रानं नऊवारी साडीचं वर्णन 'बम डिव्हायडर' असं केलं तेव्हा मी आणि माझी मैत्रीण त्याच्याशी तासभर भांडलो होतो. ती तेव्हा त्याची होणारी बायको होती. तेव्हा तिनं लग्नात नऊवारीच नसणार असा पण केला होता. पण शेवटी ती गुजरात्यांची 'उलटी' साडी नेसूनच लग्नाला उभी राहिली. समाजकार्य करणाऱ्या बायकांच्या सुती हॅन्डलूम; उच्चभ्रू बायकांच्या शिफॉन-जॉर्जेट; गर्भश्रीमंत बायकांच्या गर्भरेशमी बनारसी - पटोला; शिक्षिकांच्या सगळं अंग झाकलेल्या; दिल्लीतल्या खासदारांच्या, कोटावर चापूनचोपून नेसलेल्या राजकारणी साड्या; वय झाल्यावर आणि नवरा गेल्यावर वापरायच्या फिक्कट रंगांच्या 'साध्या' साड्या; स्वतःच्या घरच्या कार्यात नेसायच्या साड्या; दुसऱ्यांच्या कार्यात नेसायच्या साड्या (या जरी यजमानांच्या कुटुंबाच्या बरोबरीच्या नसल्या तरी सगळ्यांना त्यांची किंमत सहज लक्षात येईल अशा असायला हव्यात) अशा अनेक निरीक्षणांतून आपण समोरच्या बाईला कुठल्यातरी एका कप्प्यात बसवत असतो. 
असं असलं, तरी भारतात साडी या पोशाखाने जितके सामाजिक उंबरे ओलांडले आहेत तितके इतर कुठल्या पोशाखाने ओलांडले नसावेत. कोल्हापुरात आमच्या गल्लीतल्या हिंदू आणि मुस्लीम बायका अगदी सारख्या साड्या नेसायच्या. कोण हिंदू आणि कोण मुस्लीम हे फक्त कपाळावरच्या कुंकवावरून आणि  खास कोल्हापुरी मुस्लीम मराठीवरून (की हिंदीवरून?) ओळखता यायचं. केरळमधल्या कम्युनिस्ट ख्रिश्चन असोत, महाराष्ट्रातल्या ऍक्टिवावरुन ऑफीसला जाणाऱ्या हिंदू असोत, किंवा अगदी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या नन्स असोत, साडी सगळ्यांनी आपलीशी केली आहे. 

साडीसारख्या ऐतिहासिक पोशाखात नायलॉनसारखं आधुनिक कापडही अगदी सुखानं नांदू लागलं आहे. मी लहान होते तेव्हा नायलॉनच्या साड्यांचं पेव फुटलं होतं. 'छोटीसी बात'सारख्या सिनेमांमध्ये नायिकांच्या अंगावर बटबटीत फुलं असलेल्या नायलॉनच्या साड्या बघून माझ्या आईच्या पिढीनं त्या साड्यांचा ध्यास घेतला होता. तेव्हा गार्डनचा सेल लागला की आई एका टोकाला धरून जी साडी ओढत असायची, त्या साडीचं दुसरं टोक कुणी दुसरीच बाई पलीकडून ओढत असायची. अत्रे सभागृहातली ती खेचाखेची माझ्या डोळ्यासमोर आजही जशीच्या तशी आहे. नायलॉनची साडी, त्यावर स्लिव्हलेस ब्लाउज, थोडासा उंच बांधलेला अंबाडा, डोळ्यात काजळ आणि 'शिल्पा'ची टिकली - हा १९८०-१९९०मध्ये नोकरी करणाऱ्या बायकांचा आवडता पोशाख होता. स्वरूप संपत, प्रिया तेंडुलकर, दीप्ती नवल यांसारख्या बायकांनी साडीला आधुनिक केलं. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुली मोठी होऊन आईसारखी साडी नेसून, हातात नाजूक पट्ट्याचं सोनेरी घड्याळ घालून ऑफीसला जायची स्वप्न बघू लागल्या. आम्ही मोठ्या होईपर्यंत मात्र नायलॉनच्या साड्यांचं फारच लोकशाहीकरण झालं आणि मग माझ्या आईसारख्या बायकांना त्या साड्या तुच्छ वाटू लागल्या. 
पण त्या ज्या कष्टकरी वर्गानं आपल्याशा केल्या, तो वर्ग अजूनही त्यांना घट्ट धरून आहे. रस्ते झाडणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, भाजी-मासे विकणाऱ्या लाखो कष्टकरी बायकांनी दोनशे रुपयाला मिळणारी आणि कधीही जुनी न होणारी, पटकन वाळणारी, रंग न जाणारी, तऱ्हेतऱ्हेच्या गडद, लक्ष्यवेधी रंगांमध्ये मिळणारी नायलॉन साडी आपलीशी केली. एका घरातून दुसऱ्या घरात गेलं की साडी निरीच्या बाजूने उचलून वर खोचायची आणि धोधो पाण्यात भांडी घासायची, असं दिवसभर करणाऱ्या बायका सतत आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांच्या साड्या चकचकीत हिरव्या, शेंदुरी, पिवळ्या अशा कुठल्याही रंगांच्या असतात आणि ब्लाउज कमीत कमी कापडात आणि घट्ट अंगाबरोबर शिवलेली असतात. बाकी पायात झुपकेदार पैंजण, गळ्यात डोरलं, काम करायला सोपा असा अंबाडा आणि त्यात एखादं फूलही हौशीनं घातलेलं असतं. आपण कसे दिसतो, आपलं साडीतून दिसणारं पोट वाईट दिसतं का, वगैरे प्रश्नांपेक्षा जास्त महत्त्वाचे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. हे आपलं शरीर आहे आणि हा त्यावर घालायचा पोशाख आहे, एवढंच त्यांच्यासाठी पुरे असतं. किंवा आपण जसे आहोत तसे छानच दिसतो असा निरागस आत्मविश्वासही असतो. लिफ्ट बंद असली तर धापा टाकत येणाऱ्या आणि खुर्चीवर बसून पदराने वारा घेणाऱ्या अश्या पोटं बिनधास्त उघडी ठेवणाऱ्या अनेक गुबगुबीत बायका मी बघितल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीच लग्नकार्यात इतर बायकांना नावं ठेवताना यायचे तसे विचार आले नाहीत. हाही एक प्रकारचा पूर्वग्रहच होता. तुलना करताना, नावं ठेवतानाही आपण आपल्या बरोबरीच्या बायका शोधत असतो. त्यामुळे आम्हांला रस्त्यावर ज्या लठ्ठ भाजीवाल्या, चहा विकणाऱ्या बायका दिसल्या होत्या, त्यांच्या दिसण्याबद्दल मी विचारही केला नव्हता हेही धक्कादायक होतं. 

Blue Saree

आम्ही परत गेल्यावर अनेक दिवस मी या गोष्टीवर विचार केला. आणि आपला अंगभर साडी नेसायचा अट्टहास फक्त आपल्याला सवयीचा आहे, आपल्या गंडांमधून तयार झालेला आहे आणि आपल्या जडणघडणीचा भाग होता  म्हणूनच फक्त करायला हवा या निष्कर्षापर्यंत मी आले. आपल्याबद्दल समोरच्याचा एखादा चुकीचा समज आपल्या लवकर लक्षात येतो. पण आपल्या जडणघडणीतून येणारे असे अनेक पूर्वग्रह तपासून बघायची वेळ आपल्यावर कधीतरीच येते. तशीच ती वेळ होती. नंतर मला त्या मुलीला फटकळपणे उत्तर न दिल्याचं फार समाधान वाटलं. 
पुरुषांनी एकमेकांचे हात धरण्याबद्दल माझ्या मित्रांनी नोंदवलेलं निरीक्षणही माझ्या डोळ्यांत आधी कधीच भरलं नव्हतं. रस्त्याच्या कडेने चालत जाणारे, एखाद्या कोपऱ्यावर नाहीतर पुलावर गप्पा मारणारे पुरुष कधीकधी हात धरतात, गळ्यात हात टाकतात हे कदाचित माझ्याही सवयीचं झालं असावं. पण त्या निरीक्षणाचा सोक्षमोक्ष तिथेच लागला. ज्या दोघांनी हे निरीक्षण नोंदवलं त्यांच्यातलाच एक लगेच म्हणाला, की खरंच पुरुष एकमेकांचा हात धरून चालतील अश्या मैत्र्यांची जगाला जास्त गरज आहे. असं म्हणून ते दोघं  उरलेला संबध रस्ता एकमेकांचे हात धरून चालले. आणि नंतर तसं केल्यानं त्यांची क्षितिजं किती विस्तारली याबद्दल वर्षभर आम्हां सगळ्यांना प्रवचन देत होते!

चित्र: निकिता वैद्य (@vodkabai)
**निकिताची वरील रेखाटनं पाहून हा अनुभव लिहून काढायची कल्पना सुचली. ही रेखाटनं इथे वापरायची परवानगी दिल्याबद्दल तिचे अनेक आभार!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

हे वाचून आलेले विचार:
१. कुणाला काय शोभतं, कुणी काय घालू नये अशी मापं काढणारे एक परिचीत आहेत. २०-२५ वर्षांपूर्वी उत्तर भारत फिरून आले. त्यांची मुख्य टिप्पणी होती, "काय त्या लठ्ठ बायका, पंजाबी ड्रेस शोभतो का, आपल्या साड्या कशा अंगभर!" सध्या मात्र त्या पंजाबी ड्रेस च घालतात, अंगकाठी बारीक नसूनही. कारण...अंगभर आणि सुटसुटीत!!

२. साडीतून दिसणारे पोट, पाठ, दंड कधी खटकले नाहीत पण बर्मुडा शॉर्ट्स मधून दिसणारे पाय चटकन नजरेत यायचे. आता त्याची पण सवय झाली. कॅप्री, बर्मुडा, शॉर्ट्स घालायची टप्प्याटप्प्याने सवय व्हायला चाळिशी उजाडली! अंगभर कपड्याचे सामाजिक संस्कार फार खोल.

३. एक सुंदर, confident मैत्रीण स्वतःच्या लग्नात नऊवारी नेसून भिगी बिल्ली झालेली आठवली.

४. संन्यास घेणे, साधू होणे हे gay पुरुषांसाठी outlet होते अशी एक theory वाचली होती. लहान मुलांना दीक्षा देऊन मुनी करतात तिथे आतल्या वर्तुळात pedophilia असल्याच्या दबक्या चर्चा होत असतात.

५. झिरझिरीत कापडाची सलवार, मोठ्ठा कट असलेला कुर्ता घालून जर कोणाच्या चड्डीची outline दिसत असेल तर मी मनातल्या मनात भरपूर judge करते Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

लॉक डाऊनमुळे मापं वाढली असली तरी आता ती काढणारे लोक सहज भेटत नाहीत हे फार चांगले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाणात मज्जा आहे हो तुमच्या!
निकिता वैद्यांची रेखाटनेपण भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निकिताची इतरही चित्र खूप सुंदर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडी नेसण्यातल्या खाचाखोचांकडे मी विशेष लक्ष दिलेलं नाही, पण इतर काही आनुषंगिक बाबींविषयी लिहितो.

मीही भारताबाहेर बरीच वर्षं राहतो आहे, आणि बोली इंग्रजीबद्दल तुम्हाला आले तशासारखे अनुभव थोड्याफार फरकाने मलाही आलेले आहेत. आता होतं काय की पाश्चात्य देशांत वावरताना किंवा प्रवासात वगैरे असताना अठरापगड देशांतून आलेले, वेगवेगळ्या वयांचे आणि वंशांचे लोक भेटतातच. त्यांच्याशी वागताबोलताना मनात थोडासुद्धा पूर्वग्रह न ठेवता दर वेळेला कोरी पाटी घेऊन सुरुवात करायची हे शक्य नाही. म्हणजे समजा मी अमेरिकेत कुठेतरी मला अपरिचित असलेल्या शहरात आहे. तिथे समजा एखाद्या इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये मी गेलो आणि काउंटरवर एक वयस्क पंजाबी बाई दिसली. तर तिचं इंग्रजी आपल्याला थोडं सांभाळून घ्यावं लागणार ही धारणा माझ्या मनात सेकंदभरात तयार होते, कारण तशासारख्या प्रसंगातून मी पूर्वी खूपदा गेलेलो असतो. It is an unconscious statistical generalisation formed automatically by the human mind. याला तसे खूप पदर असतात. म्हणजे लॉन्ड्रोमॅटमध्ये गेलो तर तिथल्या व्हिएतनामीज बाईचं इंग्रजी कसं असेल, इंग्लंडमध्ये गेलो तर मुळात पाकिस्तानातून आलेल्या तिथल्या टॅक्सीवाल्याचं इंग्रजी कसं असेल (त्यातसुद्धा तो तरणाताठा असेल तर फरक), अॅमस्टरडॅममधल्या सुटाबुटातल्या डच माणसाचं इंग्रजी कसं असेल, या आणि अशासारख्या अनेक गोष्टींचे ठोकताळे मनात तयार झालेले असतात. ते अनेकदा बरोबर निघतात, तर काही वेळा नाही निघत. पूर्वग्रह हा मनात फिकट पेन्सिलने लिहिलेल्या मजकुरासारखा असतो. सुरवातीला तो तसाच्या तसा वाचला जातो, पण चुकीचा निघाला तर खोडून सहज दुसरा लिहिता येतो. अर्थात आपले पूर्वग्रह आपण अधूनमधून तपासून पाहावेत हे ठीकच, पण सतत भिंग लावून तुसं काढत बसून आत्मक्लेश वाढवण्यातही अर्थ नसतो. तेव्हा तुमच्या मित्रमंडळींना बेताचं इंग्रजी असणारी भारतीय मंडळी भेटली असतील तर तसा त्यांचा पूर्वग्रह व्हावा यात आश्चर्य नाही, आणि त्याचं फार वाईट वाटून घेतलं पाहिजे असं नाही.

आणि भारतीय वळणाच्या इंग्रजीचं म्हणाल तर निदान माझ्या बाबतीत कानाला ते बरं वाटतं की वाईट हे बोलणाऱ्याची शैली, शब्दसंपत्ती, वाक्यरचना अशा अनेक घटकांची मनात गोळाबेरीज होऊन ठरतं. उदाहरणार्थ, नमोंचं इंग्रजी मला अर्धा मिनिटसुद्धा ऐकवत नाही. पण ते आवडून घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं काही मी समजत नाही.

बाकी, फार छान लिहिलं आहेत. दुसरं म्हणजे, माझी आई डॉक्टर होती आणि कोल्हापूरला तिचा दवाखाना एमएलजीपासून दोन मिनिटांवर होता. याचा अर्थ तुमची आजी आणि माझी आई यांची कार्यक्षेत्रं जवळजवळच होती.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अतिशय मस्त प्रतिसाद. मला वाटले होते - पूर्वग्रह एक प्रकारे मेंदूचे 'एनर्जी स्टोअरींग' मेकॅनिझम असावे. दर वेळेला नव्याने 'इन्व्हेन्ट द व्हील' करत बसण्यापेक्षा, स्मृतीमध्ये माहीती साठवुन ठेवणे' की ज्या माहीतीचा परत उपयोग होउ शकेल, किंवा आश्चर्याचा नव्याने धक्का बसणार नाही. निसर्गाने केलेला एक कॉस्ट बेनेफिट ॲनॅलिसिस म्हणता येइल्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>तेव्हा तुमच्या मित्रमंडळींना बेताचं इंग्रजी असणारी भारतीय मंडळी भेटली असतील तर तसा त्यांचा पूर्वग्रह व्हावा यात आश्चर्य नाही, आणि त्याचं फार वाईट वाटून घेतलं पाहिजे असं नाही.

काल रात्री फक्त यातल्या एकाच मुद्द्याला उत्तर दिलंय असं वाटलं.
कदाचित लेखनातून नीट स्पष्ट झालं नाही, पण मला असं म्हणायचं आहे की सगळ्याच लोकांच्या इंग्रजीला काही ना काही वळण असतं. पण त्यात थोडी वर्गवारी असते. उदाहरणार्थ: ब्रिटिश/फ्रेंच वळणाने इंग्रजी बोलणारे पुरुष मुलींमध्ये जास्त पॉप्युलर असायचे (आमच्या काळी! आता माहिती नाही). पण ग्रीक/भारतीय/रशियन/अरबी वळणाने बोलणारे विशेष नसायचे. या वळणांच्या इंग्रजीची निदान ऑस्ट्रेलियात तरी खूप टवाळी व्हायची. स्पॅनिश/पोलिश/जर्मन/आयरिश (पण आयरिश स्कॉटिश वळणाची वेगळ्या पद्धतीने टवाळी व्हायची. जशी अमेरिकन कॅनेडियन लोकांची करतात) हे न्यूट्रल असायचे.
मला तेव्हा प्रश्न पडायचा की फ्रेंच वळण हॉट हे कोण ठरवतं? त्याचप्रमाणे बाकीचे कोल्ड हे कसं ठरतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वग्रहाबद्दल अगदीच सहमत आहे.
हे प्रसंग मी १३ वर्षांनीं लिहिले आहेत. माझं मलाच जाणवतं आहे की आता मागे वळून बघताना माझ्या भावना तेवढ्या धारदार नाहीत. इथे न लिहिलेले असेही अनेक आहेत. कदाचित अजून ५-६ वर्षांत त्यांचीही धार कमी होईल. पण पूर्वग्रह बाळगणाऱ्या लोकांच्याही कॅटेगरी असतात. अमेरिकेत माझी जवळची मैत्रीण आणि फ्लॅटमेट फ्रेंच होती. पण ती तिच्या बोलण्यातला फ्रेंचपणा कमी करायचा आटोकाट प्रयत्न करायची. मला खूप आश्चर्य वाटायचं.
आणि फ्रान्समध्ये तिच्या खेड्यात गेलो तिथे लोक जसे वागले आणि पॅरिसच्या लोकल मध्ये जसे वागले त्यातही भयंकर फरक होता. पण मीही पुण्याची असल्याने काही फार बिघडलं नाही.
तुम्ही व्होकल फ्रायबद्दल ऐकलं आहे का?
वाक्यातील शेवटचा शब्द ओढून थोडा खरजात न्यायची बोलायची पद्धत आहे. I used to have a phase when I also talked like that due to peer pressure. बायका तशा प्रकारे जास्त बोलतात पण नमोनी त्या.पद्धतीचे मेक इन इंडिया करून एक भयानक हेल काढून रेकायची पद्धत विकसित केली आहे. I think his vocal fry is the key element, apart from the useless content, in his speeches which annoys people.
Happy to know about your Kolhapur roots!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत असताना “छोड दो आंचल” चं मराठी भाषांतर, “सोडा हो आचळ, समाज काय ह्मणेल?” होतं असं वर्गातली द्वाड मुलं ह्मणत असत त्याची आठवण झाली.

इतरांची मतं इतक्या गांभीर्याने न घेतलेली बरी:

ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतित पावना देवराया ॥
संसार करिता म्हणती हा दोषी । टाकिता आळसी पोटपोसा ॥
आचार करिता म्हणती हा पसारा । न करिता नरा निंदिताती ॥
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासी ज्ञान नाही ॥
धन नाही त्यासी ठायिचा करंटा । समर्थासी ताठा लावितासी ॥
बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ । न म्हणता सकळ म्हणती गर्वी ॥
भेटीसी न वजता म्हणती हा निष्ठुर । येता जाता घर बुडविले ॥
लग्न करू जाता म्हणती हा मातला । न करिता झाला नपुंसक ॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचे मूळ पोरवडा ॥
लोक जैसा ओक धरिता धरवेना । अभक्ता जिरेना संतसंग ॥
तुका म्हणे आता ऐकावे वचन । त्यजुनिया जन भक्ती करा ॥

बाकी चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

सत्य आहे. अभंग आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत असताना “छोड दो आंचल” चं मराठी भाषांतर, “सोडा हो आचळ, समाज काय ह्मणेल?” होतं असं वर्गातली द्वाड मुलं ह्मणत असत त्याची आठवण झाली.

नशीब, 'कांटों से खींच के ये आंचल' - किंवा, त्याहीपेक्षा, 'आंचल में क्या जी, अजबसी हलचल' - या गानपंक्तींच्या मराठी भाषांतरापर्यंत तुमच्या वर्गातल्या (द्वाड!!!) मुलांची मजल गेली नाही, ते.

('सुर्ख़ आंचल को दबा कर जो निचोड़ा उस ने' हादेखील होतकरूंसाठी चांगला उमेदवार आहे. ('सुर्ख़' बोले तो लाल, नव्हे काय?))

(भाषांतरस्वरूपात अतिशय चित्रदर्शी गाणी आहेत, ही सर्व. इतकी, की वोडकाबाईंच्या चित्रांची वेगळी गरजच नाही!)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांढरा झेंडा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मला साडी अतिशय आवडते. परंतु बुटकी व जाडी असल्याने अजिबात शोभत नाही. अमेरीकेत राहून स्कर्टस, पँटस व स्लॅक्स, टाइटस यांचीच सवय झालेली आहे. पण पुढील जन्मी उंची देण्याकरता देवाला वशीला लावणे सुरु आहे Smile

हाही एक प्रकारचा पूर्वग्रहच होता. तुलना करताना, नावं ठेवतानाही आपण आपल्या बरोबरीच्या बायका शोधत असतो.

हा प्रामाणिकपणा मस्त आहे.

मला स्वत:ला टाईट शॉर्टस घातलेल म्हणजे एक साईझ कमी पडणारी शॉर्ट घातलेले पुरुष अजिबात आवडत नाहीत. तसेच कळकट टीशर्टस, भडक शॉर्टस घालणारेही. स्त्रियांविषयी मते नाहीत परंतु पुरुषांविषयी स्ट्राँग मते आहेत. क्लीन शेव्हन, क्रिस्प पुरुष आवडतात. कळकट लोकांची ओ येते. कळकट म्हणजे काळे अजिबात नाही. काही आफ्रिकन अमेरीकन लोक किती देखणे असतात बाप रे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडीत पोट न दाखवता येण्याचं मेकॅनिकल कारण माझी बुटकी आहे!
अनेक उंच बायका साड्या पुरत नाहीत म्हणून वरूनही फॉल लावून घेतात. त्यांचीही दुःख असतात!
घेराला साडी पुरत नाही असं सहसा होत नाही. आणि बऱ्याच दिवसांच्या ब्रेक नंतर आपल्याला हे वस्त्र बसेल का? असा ताण साडी बद्दल येत नाही म्हणूनही मला साडी आवडते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडी हा स्त्रियांचा सर्वात डौलदार पोषाख आहे. आणि भारतीय, किंवा फॉर्द्ट्मट्र्र्र, दक्षिण आशियाई स्त्रिया साडी जितक्या छान कॅरी करतात, तशा जगातल्या इतर कुठल्याही स्त्रियांना जमत नै असे माझे वै. निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गार्डन वरेली ला साडी लोकप्रिय करण्याचे बरेचसे श्रेय जाते. त्यांची एक मस्त जाहिरात होती . त्यात साडी चं वर्णन " Five Meters that will cut him down to SIGHs " जर साडी योग्य तऱ्हेने नेसली आणि ती अंगावर नीट वागवता आली तर त्या सारखे दुसरे वस्त्र नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> पण मला असं म्हणायचं आहे की सगळ्याच लोकांच्या इंग्रजीला काही ना काही वळण असतं. पण त्यात थोडी वर्गवारी असते.

प्रश्नच नाही. उदाहरणार्थ, माझ्या क्षेत्रातली (म्हणजे गणितातली) ढोबळ वर्णव्यवस्था काहीशी अशी आहे: अख्खं आयुष्य रशियात घालवलेले जे प्राध्यापक असतात त्यांना खतरनाक रशियन अॅक्सेंट असतो, पण त्यांची बोली इंग्रजीवरची पकड जबरदस्त असते. शिवाय त्यांचं अवांतर इंग्रजी वाचन खूप असतं. ह्या सगळ्याचं वजन त्यांच्या बोलण्यात सहज जाणवतं, त्यामुळे (निदान मला तरी) ते ऐकायला फार छान वाटतं. दक्षिण भारतीय प्राध्यापकांचंही काहीसं असं आहे. हेल प्रकर्षाने जाणवतो, पण भाषेवर पकड उत्तम असते. याउलट अख्खं आयुष्य चीनमध्ये घालवलेले प्राध्यापक असतात त्यांना खतरनाक चिनी अॅक्सेंट असतो, आणि बोली इंग्रजीवरची पकड बेतासबात असते. त्यांचं अवांतर इंग्रजी वाचन जवळपास नसतंच. परिणामी खुद्द गणिती आशय इंटरेस्टिंग असला तरी त्यांच्या आवाजातून ते ऐकायला त्रासाचं वाटतं. अशा कित्येक डेटा पॉइंट्समधून मनातली वर्गवारी ठरत जाते. (इथे हे सरसकटीकरण आहे, मला भेटलेले प्राध्यापक झांग तसे नव्हते बरं का वगैरे डिसक्लेमर्स गरजूंनी आपापले समजून घ्यावेत.)

शिवाय या बाबतीतली वेगवेगळ्या माणसांची संवेदनाशीलता वेगवेगळी असते. काहींना स्प्लिट-इनफिनिटिव्ह पटकन दाताखाली लागतो, तर काहींना गोळाबेरीज अर्थ कळतो आहे तोवर कसंही बोललेलं खपून जातं. All of this has some similarities to one’s taste in music. काहींजणांच्या आवडीनिवडी अतिशय तीव्र असतात, तर काहींच्या नसतात. हे दोन्ही गट एकमेकांना अनाकलनीय वाटत असणार.

इंग्रजी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्यातही अर्थात एमा थॉम्पसन-अॅन्थनी हॉपकिन्स प्रभृति मंडळींचा इंग्लिश अॅक्सेंट हा प्रतिष्ठित, न्यू-कासलवगैरेकडचा त्यामानाने कमी ही वर्गवारी असतेच. याला त्या त्या उपसमाजांचा पूर्वेतिहास, सत्ताकेंद्रं कुठे होती वगैरे सगळंच काही अंशी कारणीभूत असणार. मला वाटतं, अॉस्ट्रेलिया ही पूर्वी पीनल कॉलनी असल्यामुळे इंग्लंडमधून हाकललेल्या दरवडेखोरांचा तो अॅक्सेंट असा काहीतरी वास त्याला चिकटला होताच. पण जसजसा काळ जातो तसे अशाप्रकारचे न्यूनगंड बोथटही होत असतील. सिडनीतले पैसेवाले बिझिनेसमेन अॉपेरा हाऊसमध्ये चॅरिटी डिनरला जमले तर त्यांना स्वत:च्या अॅक्सेंटबद्दल काही अोशाळं वगैरे वाटत नसणार.

एकूण जगड्व्याळ विषय आहे. But I think that the analogy with music can be pushed further. बहुतेक लोकांना आपापल्या सांगीतिक आवडीनिवडीचं समर्थन करण्याची गरज वाटत नाही. तसंच याही क्षेत्रातल्या आवडीनिवडीचं समर्थन करण्याची मला विशेष गरज दिसत नाही. अर्थात आता सामाजिक-राजकीय प्रभाव या क्षेत्रात असतातच, पण तसे ते सगळीकडेच असतात.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सरसकटीकरण करायचं तर भरपूर अवांतर वाचन करणाऱ्या लोकांशी बोलायला मजा येते. त्यांचे हेल कसे आहेत, यापेक्षा ते काय बोलत आहेत हे महत्त्वाचं वाटतं?

किमान माझ्या बाबतीत हे खरं आहे. बहुतेक चिनी, फ्रेंच लोकांचे उच्चार मला सहज समजत नाहीत. पैकी फ्रेंच लोकांचे बोलण्याचे विषय मला जवळचे वाटतात. दोन वर्षांपूर्वी एका पायथन परिषदेत एक फ्रेंच प्राध्यापक भेटला होता. त्याला मारीन ला पेनबद्दल प्रश्न विचारला, आणि तो बराच वेळ ग्रामीण आणि शहरी फ्रेंच लोकांच्या मतांमधल्या ढोबळ फरकांबद्दल सांगत होता. मला ते ऐकायला मजा आली. त्यामुळे आजूबाजूला गोंगाट होता, त्याचा ॲक्सेंट समजायला त्रास होत होता, तरी मजा आली.

माझ्या बघण्यात, भारताबाहेर भेटणारे बरेच आशियाई लोक बऱ्यापैकी कंटाळवाणे असतात. मी भारतीय असल्यामुळे मला भारतीय जास्त भेटतात. त्यांना टाळणं कठीण जातं. त्या हिशोबात पाश्चात्त्य लोक सुरुवातीला जरा अंतर बाळगूनच राहतात आणि ते लोक फार आवडले नाहीत तर लांब ठेवणंही सोपं जातं. माझ्या बाबतीत हा सगळाच सिलेक्शन इफेक्ट आहे.

दुसऱ्या बाजूला साडीचं म्हणाल तर आजूबाजूला साड्या बघतच मी मोठी झाले. आईसकट आजूबाजूच्या कुठल्याही स्त्रिया आकाराला कमनीय वगैरे नव्हत्या. 'बॉडी शेमिंग' वगैरे प्रकार मी लहानपणी ऐकले नाहीत; आणि "साडीच काय ती खरी" वगैरे भोंगळपणाही माझ्या लहानपणी नव्हता. अगदी लहान असल्यापासून कष्टकरी बायकांच्या गुडघ्यापर्यंत येणाऱ्या नौवाऱ्या, किंवा कामं करताना गुडघ्यापर्यंत येणाऱ्या पाचवाऱ्यांपासून ते लग्न-समारंभांना नटामुरडायच्या साड्या असं सगळंच लहानपणातहोतं. त्यामुळे 'बॉडी शेमिंग' किंवा साडीच्या थोरवीचा भोंगळपणा कदाचित मराठी इंटरनेटवर येईस्तोवर मला दिसला नव्हता. दहाएक वर्षांपूर्वी एका चिनी वंशाच्या ऑस्ट्रेलियन मुलीला साडी नेसायला मदत केली, तेव्हा साडीसाठी काही विशिष्ट आकार असला तर बरं दिसतं, असं लक्षात आलं. मग वाटलं, मला एवढ्या बारीक स्त्रिया बघायची सवयच नाही. म्हणजे यातही व्यक्तिनिष्ठता असण्याची शक्यताच जास्त.

पीएचडी करत असताना मी एकदा साडी नेसले होते. तेव्हा एका फ्रेंच मित्राची प्रतिक्रिया बघून मला गंमतच वाटली होती. भारतीय पुरुषांच्या तोंडून "साडीच काय ती खरी हो", हे ऐकलेलं नसताना फ्रेंच मनुष्याची अशी प्रतिक्रिया बघणं मोठंच शिक्षण होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<माझ्या बघण्यात, भारताबाहेर भेटणारे बरेच आशियाई लोक बऱ्यापैकी कंटाळवाणे असतात>>

अहो, माझ्या बघण्यात बरेचसे लोकच बऱ्यापैकी कंटाळवाणे असतात, त्याला, तुम्हाला भारताबाहेर भेटणारे बरेच आशियाई काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

भारतात ते भारतीय म्हणून वाढीव चिकटपणा करत नाहीत! अर्थात तो चिकटपणा जात, वंश, धर्म, मूळ जन्मगाव वगैरेंवरून होऊ शकतोच.

बरेचसे लोक कंटाळवाणे असतात, मीही त्यांतलीच हे अगदीच मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरेचसे लोकच बऱ्यापैकी कंटाळवाणे असतात

इट डिपेन्डस तुम्ही कसे कितपत कनेक्ट होता त्यावर आहे ते. माझ्या मित्रमैत्रिणींचा मला कंटाळाच येत नाही. आणि जे लोक मैत्र नाहीत ते किती का आकर्षक (इन्टेलेक्च्युअली) किंवा रसाळ असेना, त्यांच्याशी काही देणे घेणे नसते . कनेक्शन फार म्हणजे प्रचंड महत्वाचे.
हंटर- गॅदरर पैकी स्त्रिया गॅदरर असतात असे वाचल्याचे स्मरते. पुरुष शिकार करत, काही स्त्रियाही करतच असणार पण बऱ्याच जणी बिया, फुले, जमवून, वाळवुन, ठेवत. बेसिकली त्या कनेक्टिंग व नर्चरींग असत. याचे कारण उत्क्रांतीतच आहे. पोरं, लेकरं वाढवायची तर आसपासच्या मैत्रिणींचे सहकार्य लागत असणार, कुठे धोका आहे त्याचा मागमूस लागणे, खाणेपीणे कुठे सापडेल वगैरे बित्तंबातमी नेटवर्कनेच लागत असावी. तेव्हा कनेक्टिंग हा स्त्रियांच्या स्वभावाचा भाग असावा. को-ऑपरेशन ओव्हर काँपिटिशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन….

सही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथेही दर २० मैलांवर उच्चार बदलतात. काही तर इतके भन्नाट असतात की ती व्यक्ती काय म्हणते आहे ते मला ठार कळत नाही. इथेच लहानाचे मोठे झालेल्या लोकांना एकमेकांचे accents काहीसे ज्यास्त समजतात. एकेकाळी वेगवेगळ्या accents शी संबंधित श्रेष्ठ-कनिष्ठ कल्पना रूढ होत्या. आता त्या बऱ्याच कमी झाल्या आहेत. त्यासाठी ठरवून प्रयत्न करण्यात आले. त्या कथा मनोरंजक आणि उद्बोधक आहेत.

माझा इंग्रजी accent मी कुणाशी बोलतोय त्यानुसार पुष्कळ बदलतो ह्मणे. भारतीय लोकांशी बोलताना वेगळा आणि इथल्या लोकांशी बोलताना वेगळा. पुन्हा इतर देशातील लोकांशी बोलताना जरा हळू आणि ज्यास्त स्पष्ट बोलावे लागते आणि Vocabulary सुद्धा मर्यादित ठेवावी हे शिकावे लागले. माझ्या सर्वात ज्यास्त पसंतीचा मात्र निर्विवादपणे स्कॉटिश accent. व्हेरी कूल! तद्नंतर Scouser (लिव्हरपूल / विरल) accent मध्ये बोलणाऱ्या स्त्रियांचे बोलणे. विशिष्ट उच्चारांसोबत त्या आवाजाची पट्टी सुद्धा दोन-तीन सप्तकात खेळवतात. फारच मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

माझा इंग्रजी accent मी कुणाशी बोलतोय त्यानुसार पुष्कळ बदलतो ह्मणे. भारतीय लोकांशी बोलताना वेगळा आणि इथल्या लोकांशी बोलताना वेगळा.

हे अनेकांच्या बाबतीत होत असावे, नि बहुधा नैसर्गिक असावे. माझ्याही बाबतीत मला हे अनेकदा जाणवले आहे. फार कशाला, माझ्या (अमेरिकेतच जन्माला आलेल्या नि अमेरिकेतच वाढलेल्या, आणि भारतीयांशी/भारतवंशीयांशी अतिशय मर्यादित संबंध आलेल्या) मुलाच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. बोले तो, घरात आणि इतर भारतवंशीयांशी (इंग्रजीतून) बोलताना तो एका आघाताने बोलतो, तर बिगरभारतवंशीयांशी (इंग्रजीतून) बोलताना पूर्णपणे वेगळ्या आघाताने. (त्या मानाने आम्हां फर्स्ट-जनरेशन-इमिग्रंटांच्या/इमिग्रंट-टर्न्ड-नॅचरलाइझ्ड-सिटिझनांच्या 'खायच्या आणि दाखवायच्या' आघातांतला फरक तितका जास्त नसतो.)

आधी म्हटल्याप्रमाणे, हे पूर्णत: नैसर्गिक असावे; प्रयत्नपूर्वक होत नसावे.

==========

तळटीपा:

--
थेट/समोरासमोर संबंध:
१. घरात, त्याचे आईबाप (बोले तो, आम्ही.)
२. घराबाहेर, त्याच्या आईबापांचे अमेरिकास्थित देशी (फर्स्ट जनरेशन इमिग्रंट/नॅचरलाइझ्ड सिटिझन) मित्र (आणि त्यांची कुटुंबे). (एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कुटुंबे. संपर्क रोजचा जरी नसला, तरी अधूनमधून, बऱ्यापैकी.)

अप्रत्यक्ष संबंध (फोनवरून वगैरे):
१. (भारतात राहणारे) आजी-आजोबा, मामा. (बऱ्यापैकी नियमित संपर्क.)
२. आईबापांचे पूर्वी अमेरिकेत राहणारे (आणि म्हणून त्याच्या परिचयातले), परंतु नंतर भारतात कायमस्वरूपी परत गेलेले मित्र (आणि त्यांची कुटुंबे). (पुन्हा, एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कुटुंबे. संपर्क अतिशय क्वचित.)

अतिअप्रत्यक्ष संबंध:
१. कधीतरी तीनचार वर्षांतून भारतभेट झाल्यास ज्यांना (त्याचे) तोंड दाखवावे लागते, असे मूठभर नातेवाईक, झालेच तर शेजारी, सोसायटीतले, तथा अन्य संकीर्ण रँडम स्ट्रेंजर्स. (आकडा अनिश्चित; संपर्क अतिक्वचित तथा तेवढ्यापुरताच.)
--

--
संपर्काची भाषा बव्हंशी (निदान एकतरफी तरी - बोले तो, त्याच्या बाजूने) इंग्रजीच आहे. हिंदीचा गंध नाही. मराठी बोललेले समजते, परंतु मराठीतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बहुतकरून इंग्रजीतून मिळतात. (क्वचित मराठीतूनही मिळतात - किंबहुना, आईबापांशी सार्वजनिक ठिकाणी जर खाजगीत बोलायचे असेल, नि आजूबाजूच्या आम जनतेला आपले संभाषण समजू नये, अशी जर इच्छा असेल, तर - कूटभाषा म्हणून - आवर्जून मराठीतून बोलतो. मात्र, त्याचे ते मराठी ऐकून ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत तमाम दिग्गजांनी जीव द्यावा; एवढेच नव्हे, तर आजकालच्या मराठी छापील तथा दृक्श्राव्य माध्यमांतील 'त्याने माझी मदत केली'-छाप मराठी फाडणाऱ्यांनासुद्धा चक्कर यावी. अर्थात, हा त्याचा दोष नव्हे, नि, निदान प्रयत्न तरी करतो, हेही नसे थोडके. असो चालायचेच.) तर, सांगण्याचा मतलब, त्याची मातृभाषा काय वाटेल ती असो२अ, परंतु संपर्काची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे.
--

--
२अ ही अचूक ओळखणे बहुधा नाना फडणविसालादेखील अशक्य झाले असते. (सर्वप्रथम, गाढ झोपेत असताना तोंडावर थंड पाणी फेकल्याने (बीन देअर, डन दॅट.) एक तर ढिम्म परिणाम झाला नसता; किंवा, तोंडातून शिव्या बाहेर आल्या असत्याच, तर त्या इंग्रजीतून आल्या असत्या. (मात्र, इंग्रजी ही त्याची मातृभाषा नव्हे.))
--

--
बिगरभारतवंशीयांशी इंग्रजीतून बोलतानाचा त्याचा आघात मात्र ज्याच्याशी बोलायचे, त्याच्या वर्ण-समाजानुसार किंवा आघातानुसार बदलताना आढळलेला नाही. (त्यांचे आघात अर्थातच विभिन्न असू शकतात.)
--

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इमिग्रंट पालकांची मुलं ज्या प्रकारे द्वैभाषिक होतात (they are almost compelled to adjust once they start school) त्याने त्यांच्या मेंदूच्या रचनेत बदल होतात असं वाचलं होतं. आणि ते बदल मोठेपणी महत्त्वाचे ठरू शकतात. मुलं भाषा कशी शिकतात हे बघणं फार रोचक आहे.
आपण इतरांशी बोलताना त्यांचा accent घेतो नकळत तसच समोरचा इंग्रजी मातृभाषा नसलेला असेल तर तो/ती मातृभाषेतून जसं भाषांतर करून बोलतात तसंही बोलायला होतं. माझी फ्लॅटमेट फ्रेंच - इंग्रजी अशा अतिशय चमत्कारिक पण गोड रचना करायची. I miss him ऐवजी he is missing from me म्हणायची. I am tired मधला tired ती टीऱ्हेड असं म्हणायची. मला सुरुवातीला काहीच कळलं नाही. पण नंतर आम्ही तसच म्हणायला लागलो आणि मी अजून मनातल्या मनात तोच शब्द वापरते. Detroit ला ती देत्वा म्हणायची (इथे त्वा नंतर थोडा श्वास सोडायचा). Detroit एरवी किती बकाल शहर आहे पण त्याला देत्वा म्हणाल्यामुळे एकदम भारी काहीतरी वाटायचं. म्हणून त्यालाही तेच नाव कायम केलं होतं. काहीही unbelievable असलं तर ती नो!! से पा व्रे! म्हणायची. तेही मी अजूनही म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील प्रतिसादातील उदाहरण त्याच तळटीपांसहित आधी कुठेतरी वाचल्याचे स्मरते. पण असो. वाचायला तसेही रोचकच आहे.

बाकी धागा हा सत्तरच्या दशकातील बिनधास्त नायिकेच्या उडत्या पदरासारखा 'साडी' या विषयावरून 'शब्दोच्चार' या विषयावर सारखा घसरत आहे. पण तसेही आम्हांला 'विषया'चे वावडे नसल्याने आम्ही आवडीने वाचत आहोत, हे इथे नमूद करायला आम्हांला अजिबात वावगे वाटत नाहीये.

नॉर दॅट एनिबडी वुड केअर अबाउट इट! पण तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही या प्रतिसादाबद्दल बोलताय का?

त्या प्रतिसादातले उदाहरण बव्हंशी येथेही लागू पडले, म्हणून वापरले. टेम्प्लेटबिम्प्लेट काहीही नाही.

(आणि, त्या प्रतिसादात तर तळटीपासुद्धा नाहीत. उगाच काहीही काय?)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेट! असो. रोचक आहे हे महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा साड्यांची आहे, की ॲक्सेंटांची आहे?

(गेस हू'ज़ आस्किंग!)

(नॉट दॅट आय माइंड ऑर केअर, वन वे ऑर द अदर...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चेला अनेक पदर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

साडीची चर्चा म्हटल्यावर पदर आलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी इथे भारतीय accent ला तुच्छ लेखल्याबद्दल गळे काढले असले तरी,
मला ऑस्ट्रेलियन accent फार आवडतो. तव्यावर अंडं फोडलं आहे आणि ते आपलं काहीही न ऐकता कुठेही पळून जात आहे असं त्यांचे A's आणि O's ऐकून वाटतं.
त्यानंतर मला propah ब्रिटिश आवडतो.
These accents in a proper baritone voice.
अर्थात माझी मतंदेखील अजिबात objective नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाडाची चार पान कमरेवर बांधण्या पासूनच सर्वांची अंग झाकायला सुरुवात झाली.
त्या मुळे कपड्यावर जास्त काही बोलण्यात काही अर्थ नाही.
विनोदी लेखन म्हणून लेख वाचायला ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख कोणत्या अंगाने विनोदी वाटला तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

तेव्हढ्या अंगाने विनोदी वाटला असेल त्यांना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाईच्या मापानुसार साडी असा फंडा काढला तर प्रॉब्लेम सुटतोय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मग एकमेकींच्या साड्या कशा नेसता येतील? साड्यांमध्ये पण साईझ बिईझ निघाली तर प्रॉब्लेम अजूनच वाढेल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रकार फक्त भारतात च आहे.साडी नेसण्या च्या खूप पद्धती आहेत.प्रतेक प्रांतानुसार साडी नसण्याचे वेगळे प्रकार आहेत.
महाराष्ट्र चा विचार केला तर नवं वरी साडी विशिष्ट पद्धती नी नेसली जाते.
जेव्हा रोज युद्धाचा प्रसंग असायचा त्या काळात स्त्रिया नी युद्धात सहभाग घेतला आहे.घोड्यावर स्वार होण्यासाठी नवं वारी साडी नेसण्याची पद्धत योग्य होती.
घोडे स्वारी करून स्त्रिया नी रणसंग्रामात भाग घेतलेला आहे .चेहरा झाकणे हा प्रकार नवं वारित नाही.
उत्तर भारतात साडी नसताना चेहरा झाकला जातो .
मुस्लिम घुंगट आणि हिंदू स्त्रिया वैश एकसारखाच आहे.
स्त्री सौंदर्य सर्वात जास्त साडी मध्ये च उठून दिसते.
साडी ज्या स्त्रिया वापरतात त्या बेडफ असतात हे लेखिकेचा विचार चुकीचा आहे.
अत्यंत सुडौल ,प्रमाणबध्द,अतिशय सुंदर स्त्रिया साडी नेसून त्यांचे सौंदर्य अजून वाढवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेडफ म्हणजे काय रे भाऊ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

.... अगदी छायाचित्रे वाटतायत .
एक कुतुहल ... की तुम्हाला प्रश्नं विचारणारी कोण देशीची होती?

मला काही देशांची वारी करायची संधी प्राप्तं झाली ... लट्ठं, बारीक, उंच, बुटकी अशी माणसे तर सर्वत्रच आढळतात. कोण्याएका देशीच्या लोकांना हिणवायचे काही कारण नाही. आणि त्यांच्या पोषाखा बाबत तर उगीच कुणाला बोलायचे कारणच नाही...

साडी नेसायला मला देखिल आवडते. भारतात असताना बऱ्याच वेळेला अनेक कारणांनी, निमित्तानी साडी चा योग यायचा. माझ्या घरी माझी आई, सासुबाई, नातेवाईक आणि ओळखी-पाळखीच्या स्त्रिया अशा पद्धतीने साडी नेसतात, मी पण ...
अर्थात अशा पद्धतीने साडी नेसण्याची प्रथा आता बाद होत चालली आहे.
तसेही भारतात विविध प्रकारे साडी नेसली जाते आणि कुठल्याही स्वरूपात ती सुंदर दिसतेच.
आजकाल मात्रं साडी अशा पद्धतीने नेसायची असते म्हणे किंवा निदान अशीतरी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

साडीद्वेष्ट्या स्त्रिया असतात का हो? एक उत्सुकता म्हणून विचारतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी गेली दहा वर्षं आहे साडीद्वेष्टी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आणि रेखाटनं आवडली. काही स्वैर नोंदी:

१. काही काळापूर्वी 'Funny in Farsi' नावाचं पुस्तक वाचनात आलं होतं - इस्लामिक क्रांतीनंतर, वयाच्या सातव्या वर्षी इराणहून कॅलिफोर्नियात आलेल्या मुलीचं आत्मकथन. तिच्या इंग्रजी ॲक्सेंटला हसणारे शाळेतले इतर विद्यार्थी आणि पुढे कॉलेजात, तिच्या नवऱ्याच्या फ्रेंच ॲक्सेंटवर एक्झॉटिक म्हणून फिदा होणारे अन्य विद्यार्थी - यातली तफावत तिनेही मांडली होती. आता प्रतिक्रिया लिहिताना शोधल्यावर त्या पुस्तकाच्या Teacher’s Guide मध्येही हा प्रश्न सापडला (दुवा)

Firoozeh’s French husband, Francois, had a very different experience as in immigrant in America. Do you make assumptions about people based on their names or countries of origin?

२. ॲक्सेंट हा एक भाग झाला. अन्य लकबींतही हे आढळून येतं - उदा. इटालियनांचे हँड जेश्चर्स वि. भारतीयांची होकारासाठी डोकं वर-खाली हलवण्याऐवजी* दोन्ही बाजूंना डोलावण्याची सवय.

(* अमेरिकेत राजकारण्यांच्या भाषणांच्या वेळी हजर असणारं पब्लिक - विशेषत: म्हाताऱ्या स्त्रिया - एखादा मुद्दा पटला की अगदी emphatically/ठामपणे वर-खाली करतात; हे पाहणं अंमळ विनोदी असतं.
उदा. 'ओबामा आणि हिलरीने मिळून आयसिसची स्थापना केली' असं ट्रम्पतात्या बोंबाटून सांगताना आणि स्टेजवर आणून केलेली बुजगावणी त्यावर हॉयहॉयहॉय म्हणून मान वर-खाली करताना पाहणं!)

३. भारतीय इंग्रजीचा व लकबींचा पाश्चिमात्य जगात विनोदनिर्मितीसाठी केलेला वापर यावर एक
'पीटर सेलर्स टू रसेल पीटर्स: रिपे, रिसेल, रिपीट' असा प-स-र-ट प्रबंध लिहिता येईल! Smile
अजून एक चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे, 'Death on the Nile' हा चित्रपट. ॲगथा ख्रिस्तीच्या कादंबरीत नसलेलं, भयंकर भारतीय ॲक्सेंटमध्ये आणि हावभाव करून इंग्रजी बोलणारं एका बोटीवरील कर्मचाऱ्याचं पात्र (मि. चौधरी - आय. एस. जोहर) 'कॉमिक रिलिफ' म्हणून चित्रपटात घुसडलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>तिच्या नवऱ्याच्या फ्रेंच ॲक्सेंटवर एक्झॉटिक म्हणून फिदा होणारे अन्य विद्यार्थी - यातली तफावत तिनेही मांडली होती.
मला हे अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो यांच्या मुलाखती बघतानाही जाणवलं.
अभिजित जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतात, तेव्हा मधूनच त्यांना फ्रेंच ॲकसेन्ट येतो. पण एस्थर नीट फ्रेंच ॲकसेन्टमध्ये बोलतात.
एकूणच फ्रेंचांना त्यांचा ॲकसेन्ट जपायची फार हौस. आणि भारतीयांना तो घालवायची.

>>>>अजून एक चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे, 'Death on the Nile' हा चित्रपट. ॲगथा ख्रिस्तीच्या कादंबरीत नसलेलं, भयंकर भारतीय ॲक्सेंटमध्ये आणि हावभाव करून इंग्रजी बोलणारं एका बोटीवरील कर्मचाऱ्याचं पात्र (मि. चौधरी - आय. एस. जोहर) 'कॉमिक रिलिफ' म्हणून चित्रपटात घुसडलेलं आहे.

साइनफेल्डमधला "बाबू" पाकिस्तानी आणि नंतरचा एक भारतातला एपिसोड, दोन्ही मला भयानक रेसिस्ट वाटले होते.
साइनफेल्डमध्ये हे इतर देशाच्या लोकांबद्दलही केलेलं आहे, तसंच "नॉट दॅट एनिथिंग इज रॉंग विथ दॅट" हा एपिसोड अत्यंत होमोफोबिक आहे असं मला अजूनही वाटतं. पण साइनफेल्डचे सगळे महत्वाचे लोक ज्यू असूनही त्यांनी ज्युईश लोकांचीही तेवढीच टिंगल केली आहे. गॉसिप करणारा राबाय फारच भारी आहे.

पण नंदन, you got my point अँड व्यथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सई खुप छान लिहिल आहेस. मी पण पूर्वीच्या दिवसांत गेले. आईच्या काही साड्या डोळ्यासमोर आल्या. खास करुन तेव्हा गोळ्याच्या साड्यांची म्हणजे साडीवर मोठ्या टिकल्यांची प्रिंटची फॅशन होती. ती आईच्या बोलण्यात यायची व आईने घेतलीही होती. मला चायना सिल्कचा पंजाबी ड्रेस घेतलेला आठवतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल छोटीसी बात पहात होते. त्यात विद्या सिन्हाच्या सगळ्या साड्यांवरती मोठ्ठी मोठ्ठी फुले वगैरे डिझाईन आहे. तेव्हा खरच फॅशन असावी ती.

मला, बरेचदा उंच सँडल्स घालून साडी नेसावीशी वाटते पण ते ब्लाउZ व परकर कसा व कोठे शिवुन घ्यायचा, फॉल वगैरे भानगडी नको वाटतात. हौस वाटते पण इतकीही नाही की आऊट ऑफ वे जाउन सर्व शोधाशोध करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0