जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव
दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात. समस्या जैसे थे राहतात आणि बिनकामी चर्चा, आरोप, प्रत्यारोप, तर्क, वितर्क आणि राजकीय लबाड आश्वासने निरंतर चालूच राहतात. समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा इतर गोष्टी व्यवस्थेत रेंगाळत राहतात. जय भीम मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळनाडूतील तत्कालीन दुर्लक्षित आदिवासींच्या होणाऱ्या छळाची गोष्ट सांगितली आहे. चित्रपट बघितल्यावर मन सुन्न होते. निष्पाप लोकांचा झालेला हिंसक छळ कोणालाही सुन्न करतोच. मात्र तेच निष्पाप लोक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले की व्यवस्थेचे खरे स्वरूप उघडकीस येते. या चित्रपटात दाखवला गेलेला मानवाधिकाराचा लढा फारच प्रामाणिकपणे दाखवलाय. जो आजच्या सोकॉल्ड सोशलमेडियाच्या जमान्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणे गरजेचा आहे. ढोंगी मानवतावादी लोकांमुळे जनसामान्यांना अस्सल खराखुरा मानवतावाद काय आहे कशासाठी हे समजणे गरजेचे आहे. कित्येक उच्चभ्रू लोकांना मुळात शोषितांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न कसे आहेत हे समजत नाहीत. अशा लोकांच्या हातात जेव्हा सत्तेची आणि प्रशासनाची सुत्रे जातात तेव्हा हीच मंडळी व्यवस्थेला स्वार्थापोटी हवे तसे वाकवतात. कारण बहुतांश सुखवस्तू उच्चभ्रू लोकांमध्ये शोषित वंचित लोकांबद्दल एक वेगळाच तिटकारा असतो. हा चित्रपट व्यवस्था कशी मोडून तोडून राबवली जाते याच्यावर फार तीव्रतेने भाष्य करतो. मानवी पातळीवर रुक्ष करणारा अनुभव आहे.
मानवाधिकाराचा लढा हा नेहमीच राग-लोभ-रोषाच्या खाचखळग्यातून जातो. सध्याच्या काळात मानवाधिकाराचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना एका बाधित नजरेने बघीतले जाते. कारण एकांगी पद्धतीने मानवधिकार प्रोजेक्ट केला जातो. वंचित, शोषित समुहाला व्यवस्था ही नेहमीच दुय्यम नजरेने बघत आली आहे. त्यांच्यासाठी लढणारे आणि धडपडणारे पारदर्शकपणे समाजात नेहमी चुकीच्या पद्धतीने पोट्रेट केले जातात. उदाहरणार्थ अतिरेक्यांना फाशी नको म्हणून लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते दाखवले जातात. कैक चित्रपटात मानवाधिकार कार्यकर्ते लोकांना सराईत गुन्हेगार वगैरेंचा पुळका असतो हे दाखवले जाते. चकमकीत जखमी होणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत त्यांची भूमिका ही नेहमीच कुचकामी दाखवली गेली. निष्पाप लोकांच्या होणाऱ्या छळाला कैक मानवाधिकार चळवळींमुळे वाचा फोडली आहे. कितीतरी अमानुष छळाची प्रकरणे अशा कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आली. निरपराध लोकांना न्याय मिळाला. मात्र अशी प्रकरणे ही खूप कमी लोकांना माहिती असतात. मेडिया, चित्रपट वगैरे माध्यामातून एखाद्याच्या प्रतिमेचे रेखाटन बरबटलेले झाले की झाले. त्याची शहानिशा सहसा कोणी करत नाही. वा तशी एक नवी व्यवस्था उदयास आली जी कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था वगैरेंच्या आधीच एखाद्या वर शिक्कामोर्तब करते. आजकाल अशा ठशीव भूमिका घेणे अगदी व्यक्तीगत पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. जय भीम मधला मानवी हक्काचा लढा फार अप्रतिम दाखवलाय. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केलाय. सिनेमातील काही दृश्ये हिंसक जरी असली तरी ते एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. तसंही दक्षिणेत तमिळनाडूतील चित्रपटात जातिव्यवस्था विरुद्धच्या लढ्याची तीव्रता भडकपणे रंगवली जाते. त्या त्या दिग्दर्शकाची आणि सिनेमाची ती भाषा असते. धनुषच्या असूरन या तमिळ आणि व्यंकटेशच्या नारप्पा या तेलगु चित्रपटात पण अशीच लढाई रक्तरंजित दाखवली गेलीय. तिकडच्या पब्लिकला अशा सिनेमांचे टेकिंग अपील करत असावे. जसा कोरियन सिनेमात रक्तपात दाखवून एखाद्या व्यवस्थेविरुद्ध असलेली चीड सिंबॉलिक पद्धतीने दाखवलेली असते. तशीच ही एक सिनेमाची भाषा आहे. बेधडकपणे दाखवलेली हिंसा ह्यूमन लेवल वरच्या इमोशन्स जास्त रिक्रियेट करते वगैरे नव्या सिनेमाची नवी भाषा असावी. हृदयद्रावक, मन पिळवटून टाकणारे वगैरे दृश्ये ही अशा सिनेमाची परमोच्च बिंदू असतात. त्यात जय भीम अव्वल आहे. एखादा सिनेमा पाहून वा पुस्तक वाचून जर तुमचे मन खूप आनंदी होत असेल वा दुःखी होत असेल तर ते त्या दिग्दर्शकाचे वा लेखकाचे खरेखुरे कौशल्य आहे. त्याचा विचार, आशय आणि विषय लोकांपर्यंत पोचवण्याचे मोटिव्ह सिध्द झाले असे आपण म्हणू शकतो. अर्थातच संवेदनशील विषय हाताळताना फार बारकाईने मांडणी करावी लागते. कोणाच्यातरी प्रभावाखाली येउन केवळ अतिरंजित मेलोड्रामा करून काहीही उपयोग नसतो.
जय भीम वर कौतुकाचा वर्षाव करणारे पण आहेत आणि आक्षेप घेणारे पण. मुळात चित्रपटाच्या नायकाला कम्युनिस्ट चळवळींशी निगडित दाखवलेय. मग आंबेडकर, पेरियार, मार्क्सच्या प्रतिमा कर्मधर्मसंयोगाने चित्रपटात डोकावतात. विळ्या-कोयत्याचा लाल झेंडा दिसला की उगाचंच काही लोकांना कसनुसं होतं. मग आक्षेप घेतले जातात. कारण लाल झेंडा हा नक्सली लोकांना सहानुभूती वगैरेसाठी आहे असा भलताच नवा प्रवाह सुरु झालाय. मग अर्बन नक्सल वगैरे बिरूदावली रुढ व्हायला लागली. मुळात आजचे साम्यवादी कार्यकर्ते आणि खरेखुरे साम्यवादी कार्यकर्ते यात बराच फरक आहे. तसंही लाल, निळा, हिरवा आणि भगव्या रंगाच्या झेंड्याखाली ज्याची त्याची मतपेढी बांधून ठेवलेली आहे. मुळात शोषित, वंचित आणि दलितांच्या चळवळी ह्या लाखो असंघटित लोकांच्या मूलभूत गरजा, हक्कासाठी उभ्या राहिल्या त्या त्या वेळी. जय भीम म्हणजे आंबेडकरी चळवळीचा आवाज असा काहीसा समज काही दशके चालू आहे. तसे खरे पाहता, अस्सल आंबेडकरी विचारधारा ही नेहमीच डाव्यांच्या, उजव्यांच्या आणि वर्चस्वतावादी विचारांच्या विरोधात असते. ज्यांनी आंबेडकरांचे साहित्य वाचलेय त्यांना नक्कीच माहिती आहे आंबेडकर यांचे कम्युनिस्ट लोकांबाबतचे प्रामाणिक मत काय आहे ते. हे कम्युनिस्ट फार चाणाक्ष दक्षिणेकडे पेरियार यांना जवळ करतात आति इतरत्र आंबेडकरांना अंतर देतात. आंबेडकर आणि पेरियार तसे समकालीन सुधारणावादी. शोषितांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. मात्र व्यवस्थेतील धुरणींनी सगळे महापुरुष आणि समाजसुधारक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले. दलित चळवळींशी निगडीत कार्यकर्ते कमी आणि गट-तट जास्त असतात. अशा गटातटातील नेत्यांची इच्छाधारी तऱ्हा निराळ्या. कम्युनिस्ट पक्षात जमिनीवर उतरून लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलने करणारे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. मात्र व्यवस्था बदलण्यासाठी लढतात आणि व्यवस्थेचाच भाग होऊन जातात. जय भीम चित्रपटाच्या नायकाची पार्श्वभूमी ही अशीच लढवय्याची आहे. जो प्रतिभावान, स्वाभिमानी आणि प्रामाणिक दाखवलाय. जय भीम चित्रपटातून लोकांच्या जगण्या, मरण्याचा प्रश्न कीती दाहक असू शकतो याची जाणीव प्रेक्षकांना होते. अशा चित्रपटातून व्यवस्थेवर एखादे स्टेटमेंट करण्यासाठी किंवा त्रुटी दाखवण्यासाठी फार समतोल राखावा लागतो. तकलादू भूमिका घेऊन चालत नाही. भेदक सत्य आणि दाहक वास्तव लोकांपर्यंत कसे पोहोचते त्यावर अशा चित्रपटाचे यशापयश अवलंबून असते. संवेदनशील मनाला नक्कीच प्रक्षुब्ध करणारा आणि व्यवस्थेबद्दल डोक्यात तिडिक जाणारा हा चित्रपट आहे.
जय भीम वर आक्षेप घेऊन किंवा कौतुक करुन अमुक-तमुक वर ओरखाडे काढणारे किंवा गोडवे गाणारे हे काही राजकीय पक्षाशी निगडीत खऱ्या अर्थाने चमकोगिरी टाईप लोक आहेत. भूतकाळातील मानवी हिंसक घटना धुंडाळून आणि जी घटना सेलेबल वाटेल तिला उचलून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडून जर कोणी करत असेल तर हे इथल्या दुभंगलेल्या समाजव्यवस्थेत फार घातक ठरेल. उदाहरणार्थ तीन दशकांपूर्वी घडलेल्या काश्मीरमधील पंडीत लोकांवर झालेल्या अन्यायावर किंवा गांधीहत्येनंतर ब्राह्मणांनी भोगलेल्या छळावर जर अशा प्रकारचा चित्रपट दाखवला गेला तर लागलीच आक्षेप घेणारे आणि कौतुक करणारे आपापल्या भुमिका बदलतील. वर उल्लेखलेल्या घटना सध्याच्या सत्ताधारी समर्थकांना आपल्याश्या वाटतात. तसाच प्रकार २००२ साली झालेल्या गुजरात दंगली किंवा गोध्रा हत्याकांड यांच्यावरही अशा पद्धतीने सिनेमे बनवले जाऊ शकतात. कारण निष्पाप लोकांच्या जगण्या मरण्याच्या घटना आपल्या देशात कैक वेळा घडलेल्या आहेत. वरील उदाहरणे केवळ प्रातिनिधिक म्हणून घेतलेली आहेत. कारण प्रत्येक हिंसक घटनेतील पिडित समाजाच्या मागे एक नवी अप्पलपोटी व्यवस्था उभी राहिली आहे. महाराष्ट्रात तर दलितांच्या छळाच्या घटना बघितल्या तर कीतीतरी आहेत. यावर महाराष्ट्रातले स्वयंघोषित नवसंविधानवादी ब्रिगेडी काही बोलत नाहीत. कारण पोटजिविकेसाठी त्यांना ब्राह्मणांनी बहुजणांवर खूप शतके अत्याचार केला वगैरे शिकवलेले असते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी लोक जे कोणी आक्षेप वा कौतुक करणारे आहेत ते ढोंगी आहेत. भविष्यात जो तो ज्याला हवी ती घटना घेऊन कोणी प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा वगैरे सिनेमा करेल. तेव्हा आताचे कौतुक करणारे आणि आक्षेप घेणारे बुजगावणे काय करतील? एक देश एक संविधान म्हणायचे आणि सरंजामशाही अबाधित ठेवायची असा परिपाठ कित्येक दशके देशात चालत आलेला आहे. जय भीम हा चित्रपट ज्या घटनेवर बेतलेला आहे ती केवळ प्रातिनिधिक गोष्ट आहे. बिघडलेली आणि सोयीनुसार वाकवलेल्या व्यवस्थेबद्दल हा सिनेमा आहे. आजवर भारतात कैक समाजसुधारकांनी शोषितांसाठी जे जे केले ते अत्यंत अडचणींना तोंड देऊन. व्यवस्था बदलणे साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचा. केवळ प्रतिमापुजन व प्रतिमाहनन करून समस्या सुटत नाहीत. त्यासाठी तडीस नेण्याची समर्पित प्रवृत्ती गरजेची. अशी प्रवृत्ती असलेले कार्यकर्ते आपल्या देशात नेहमीच दुर्लक्षित राहतात. कोणी कोणाला मोठे करावे कोणाला लहान ठरवावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या विषय. मात्र जय भीम सारखे संवेदनशील चित्रपट जेव्हा येतात तेव्हा व्यवस्थेतील त्रुटी कायमच वाकुल्या दाखवत राहतात.
आजच्या काळात अनेक वेळा एखाद्या जातीतील लोकांना हॅबिच्युअल चोरी करणारे असतात असे बोलले जाते. किंवा अमुक तमुक जातीतल्या लोकांचा जन्मच तमुक अमुक कारणांसाठी झालाय अशी ठशीव समजुत कित्येक पढतमुर्खांची असते. सोशलमेडियाच्या माध्यमातून जे राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक जेव्हा जय भीम सिनेमाबद्दल कौतुक करताना संविधानाच्या बाता मारतात तेव्हा हसू येते. कारण आजपर्यंत आपल्या देशात प्रत्येक विरोधकांना सत्ताधारी हे संविधानाचा खूण करणारेच दिसतात. प्रत्यक्षात वेळोवेळी ज्याने त्याने सत्तेत येऊन संविधानाची मोडतोड केलेली आहे. कारण अशी गळचेपी केल्याशिवाय सत्ता राबवता येत नाही. मग ही प्रवृत्ती देशातल्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेत मुरलेली आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन ही दोन प्रमुख टार्गेट जय भीमच्या निमित्ताने लोकांसमोर येतात. प्रत्येकाला आपापली प्रतिमा, पत जपण्यासाठी काय काय करावे लागते मग ते कसे जस्टीफायेबल आहे हे दाखवायचे असते असे सगळे या सिनेमात चित्रित केलेले आहे. असा एखाददुसरा सिनेमा सामाजिक क्रांती करू शकत नाही मात्र लोकांपर्यंत प्रामाणिक विषय पोचवू शकतो. असे सिनेमे करताना तोल ढासळू नये हे दिग्दर्शकाने पहिल्यापासूनच ठरवलेले आहे असे समजते. कारण सिनेमात व्यवस्था कशी कचकड्यासारखी वापरता येते हे स्पष्ट पणे कसलीही भीडभाड न बाळगता दाखवले आहे. सिनेमाची स्टोरी टेलिंग मेथड अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. यासाठी पात्रांचा अभिनय मेलोड्रामा न होता संयत वगैरे आपसूकच झाला. बरेचसे संवाद बोल्ड आणि विचार करायला लावणारे आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅकग्राऊंड स्कोअर चा प्रभावी वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवायला सिनेमा यशस्वी ठरलाय.
या सिनेमाच्या निमित्ताने हल्ली समाजमाध्यमांच्या वॉलवर बरेच चांगले वाईट सिनेमाबद्दल लिहिले गेलेय. काहींना जय भीम हा ट्रेडमार्क आहे अमुकतमुक चळवळींचा वगैरे असा साक्षात्कार झालाय. एक दोन महाभागांनी तर असे चित्रपट सहानुभूती दाखवण्यासाठी केलेले खटाटोप असतात असे अप्रत्यक्षपणे जाहिर केलेय. मुळात जे लोक असे विषय रिलेट करू शकतात अशांनाच हा सिनेमा थेट भिडतो. कित्येकांचे आयुष्य बोरातल्या आळीसारखे असते. बाहेरच्या जगाची कसलीही जाणीव नसते. अशा दिवट्यांनी जय भीम सिनेमा अवश्य बघावा. त्यामुळे शोषित, वंचितांच्या सामाजिक समस्यांचे गांभीर्य समजेल.
- भूषण वर्धेकर, पुणे
नोव्हेंबर २०२१
प्रतिक्रिया
इतक्या महत्वाच्या विषयावर
ऐका पण व्यक्ती नी मतप्रदर्शन केले नाही.
समाजाला काय झाले आहे.
अत्यंत खेदाने माझे मत व्यक्त करतो.
सर्व सामान्य लोक,दीन ,गरीब लोक,जाती वादाचे बळी ठरणारी लोक,धार्मिक हिंसेचे बळी ठरणारे .
हे फक्त आकडे आहेत.
सर्वांस प्रतेक घडणेतून स्वतः चा फायदा पाहिजे.
गेले ते तळमळीचे नेते .
आता फक्त त्यांच्या नावावर स्व फायदा हेच सूत्र आहे.
का?
आपल्याला ज्या विषयातलं काही समजत नाही त्यावर मतप्रदर्शन न करणं, हे सुजाणपणाचं एक लक्षण आहे. मतप्रदर्शन केलं नसेल तर त्यावरून फार निष्कर्ष काढता येत नाहीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
का बुवा?
It is better to keep your mouth closed and let people think you are a fool than to open it and remove all doubt वगैरेबद्दल म्हणताय काय?
नाही म्हणजे, ते बरोबरच आहे; परंतु, ते तुम्हाला, आम्हाला (होय, Yours truly is not an exception.), सर्वांनाच कधी ना कधी लागू आहे. So, why single out Rajesh188?
ते सगळं बरोबर आहे तुमचं...
पण मी राजेश१८८ यांना वेगळं काढून काही म्हणतच नाहीये.
ठरावीक विषयाबद्दल फक्त ऐसीवर कुणी काही बोलत नाही, यावरून फार काही समजत नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. दुसऱ्या बाजूनं, कधी सिनेमा, कादंबरी, कथा आवडते, पण त्याबद्दल म्हणण्यासारखं फारसं नसतं, असंही होतं. त्यावरूनही फार काही निष्कर्ष काढता येत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ओह!
ठीक.
मला काही वेगळाच (इन रेट्रोस्पेक्ट, चुकीचा) अर्थ प्रतीत झाला.
माय बॅड.
हा धागा समीक्षा म्हणून पोस्ट केलाय.
चर्चाविषयक धागा असेल तर अपेक्षित आहे की चर्चा व्हावी. मतप्रदर्शन करावे. मात्र आसक्ती नसावी.
मी चित्रपट पाहिल्यावर जे जे मला सुचले तसे व्यक्त झालो. मी लहानपणी अशा दुर्लक्षित लोकांचे राहणे, जगणे जवळून बघितलं आहे. त्यामुळे काही गोष्टी रिलेट करू शकलो. सिनेमात काही सिनेमॅटिक लिबर्टी सोडल्यास बहुतेक गोष्टीत तथ्य आणि वास्तव मांडलेले आहे. ते आजच्या काळात प्रामाणिकपणे लोकांसमोर येतंय हे महत्त्वाचे. त्यासाठी लिखाणाचा केलेला हा खटाटोप. जो चर्चाविषयक धाग्यात पोस्ट करण्यापेक्षा समीक्षा अंतर्गत अपलोड केला.
बाकी संवेदनशील घटनांवर व्यक्त झालेच पाहिजे असा काही दंडक नाही. कोणी व्यक्त होतो कोणी होत नाही. प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. ती असावीच.
सिलेक्टिव्ह असण्यापेक्षा प्रामाणिक असणं महत्त्वाचं.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
बघितला सिनेमा
फक्त मसाला आहे सिनेमाच्या नावाशी आणि सिनेमा ची कथा काही संबंध नाही.आंबेडकर च नाव मोजून दोन वेळा च असेल आणि फोटो पण एकदोन वेळच.
मार्केटिंग साठी jai bhim nav आहे.
मला तरी नाही आवडला सिनेमा.
बॉलिवूड सारखा साधारण मसाला असलेली कथा आहे.
मी काय म्हणतो . . .
समाजाचे गुण दाखवणारा, दुटप्पीपणावर ओरखडे काढणारा विषय असेल तर स्पॉइलर वगैरेची चिंता न करता सर्व घटना द्या. खूप सिनेमे येतात आणि पाहणे शक्य नाही. शिवाय शेवट लपवणे इत्यादी इतर सिनेमांत ठीक आहे.
( कोसला'मध्ये पांडुरंग सांगवीकरावर कोणते प्रसंग ओढवतात,मग तो आत्महत्या करायला प्रवृत्त होतो/करतो/किंवा करत नाही हे गौण राहते. समाज वर्तन आणि कोणावर काय परिणाम हे एक उदाहरण)
तर थोड्याफार घटना काय आहेत?
बाकी बोरं आणि सफरचंदं ही पोषणमुल्य दृष्टीने समान आहेत असं वाचलंय. पण प्रतिष्ठेच्या दृष्टीने बोरं आणि सफरचंदांंत फरक आहे. पुन्हा त्यातली अळी, तिचे विचार आणि तिची प्रतिक्रिया आणि बंड यातही हायरार्की ( मागच्या वेळी स्पेलिंग चुकलेलं होतं) आलीच.
लेखात एके४७पेक्षा वेगात गोळ्या सुटल्या आहेत.
निर्दोषांना खोट्या गुन्ह्यात अडकवून शिक्षा केली जाते.
पोलिस एका चोरीच्या गुन्ह्यात तामिळनाडूतील इरुलर या जमातीतील निर्दोष लोकांना अटक करतात. ज्यांनी चोरी केली असते त्यांना पैसे घेऊन सोडून देतात. चोरीचा गुन्हा कबुल करण्यासाठी थर्ड डिग्री चा वापर करतात. त्यात नायकाचा मृत्यू होतो. तो लपवण्यासाठी ते कैदी पळून गेले अशी खोटी कोर्टात केस उभी करतात. नायिका वकिलाच्या मदतीने न्यायालयात लढा देते. खराखुरा घटनाक्रम उघडकीस येतो. पोलिसांना शिक्षा होते.
अशा घटना आपल्या देशात नेहमीच्याच. ही घटना नव्वदीनंतर घडली. के. चंद्रू या वकिलाने हेबिअस कॉर्पस चा आधार घेऊन कोर्टात केस उभी केली.
सिनेमात ज्या पद्धतीने ह्या घटना दाखवल्यात त्यात नेहमीप्रमाणे लार्जर दँन लाईफ वगैरे काहीही दाखवलं नाही. सिनेमँटिक लिबर्टी घेतलीय काही सीन्स मध्ये. मला विशेष आवडला सिनेमा.
एके४७ च्या वेगानं गोळ्या सुटण्याचं कारण म्हणजे हा लेख लिहित असताना काही लोकांच्या पोस्टी, अभिप्राय आणि शोषितांविषयीची खोटी कणव असलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या, पाहिल्या. त्यासाठी शेवटच्या काही परिच्छेदात बडवलंय.
राहिला प्रश्न बोराच्या आळीतला तर पुण्यात काही लोक सोशल रिस्पॉन्सीबिलीटी कॉन्ट्रीब्युशन वगैरेसाठी वेगवेगळे इव्हेंट करत असतात आपापले प्रोफाइल बिल्ड करण्यासाठी. अशा मंडळींना वाडवडीलांच्या कृपेने कमी वयात कसलीही तोशीस पडलेली नसते. मग कमी वयात बरंच चांगलं वाचायला, बघायला आणि फिरायला मिळतं. सर्वसामान्य लोकांना अशा गोष्टी मिळण्यासाठी जी खर्डेघाशी करावी लागते. ती सहसा अशा लोकांनी अनुभवलेली नसते. अशा मंडळींसाठी ते आळीचे लिखाण केलेय. कारण मी सपम आणि फर्गसन मध्ये शिकत असताना अशी मंडळी आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमांनी मिरवलेले इव्हेंट खूप पाहिलेत.
असो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
धन्यवाद.
एकूण सिनेमा समजला.
पूर्वी एका दिवाळी अंकात नक्षलवादी कसे होतात याबद्दल वाचले होते. शिवाय प्रेमचंद यानेही कथांमधून बिहार वगैरे प्रांतांतून कसे समांतर सरकार चालवतात, पोलीस कसे मुठीत असतात हे लिहिलं आहे. नको असलेल्यांना कसे गुन्ह्यांंत अडकवले जाते इत्यादी.
अजुन पण ही समस्या आहे
अजुन पण ही समस्या आहे उलट आता जास्त तीव्र आहे.
जातीवरून लोकांचा छळ झाला हे सत्य च आहे भारताच्या समाज व्यवस्थेला लागलेला हा सर्वात मोठा कलंक आहे.
खालच्या जाती मधील लोकांना माणूस समजलेच नाही त्यांच्या वर अनंत अत्याचार समाजाच्या ठेकेदारांनी केले.
सिनेमा मध्ये फक्त सरकारी अत्याचार दाखवले आहेत.
पण ठेकेदारांनी खूप अत्याचार केले.
Dr. बाबासाहेब सारखा युग पुरुष जन्माला आला आणि त्यांनी बदल घडवून आणला..
बदल घडवण्यासाठी सत्ताधारी,लोकांची साथ लागते.
त्यांनी बुध्दी चातुर्य वर छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या पासून त्या वेळच्या सत्ताधारी नेत्याची साथ मिळवली हे चूक म्हणता येणार नाही..
आज पण तीच अवस्था आहे ,जाती भेद थोडा कमी झाला आहे पण गरीब लोकांवर अत्याचार आज पण भारतात होतों
किती तरी निरपराध लोक काहीच गुन्हा नसताना शासकीय यंत्रणेने त्यांना कोणत्या कोणत्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकले आहे.
पैसे नाहीत म्हणून वकील नाही.
पैसे नाहीत म्हणून जमीन नाही.
लाखो लोक आज पण कोणताच गुन्हा नसताना तुरुंगात असतील.
पाकिस्तान आणि अमेरिकेतही आहे.
पाकिस्तान तुरुंगातला एक कैदी वीस ते एक्केचाळीस तुरुंगात होता त्याचा विडिओ ( डॉक्यु.) हल्लीच पाहिला.
अमेरिका गॉट टलेंटमधला एक स्पर्धक वय ६० असाच उगाचच तुरुंगात होता एकवीसपासून. गुन्हा झाला तेव्हा तो तिथून जात होता त्याला धरून नेले होते व शिक्षा झाली.
ही आशी प्रकरण बघितली की
सरकार नामक शेठ माणसाने का निर्माण केला असेल असा प्रश्न पडतो.
कोणताच अपराध नसताना किंवा किरकोळ अपराध असताना वीस वीस वर्ष तुरुंगात व्यक्ती ला बंद करणे.
हे महाभयंकर आहे.
दर वर्षी तुरुंगात असणाऱ्या लोकांची समीक्षा झालीच पाहिजे .
गरज नसेल तर सरळ सर्वांना सोडून द्यावे
कोर्ट पेक्षा सर्व पक्षीय,सर्व क्षेत्रातील अती हुशार लोकांची समिती त्या साठी असावी.
ठेकेदार, सावकार, सरंजामी लोकांचे अत्याचार दाखवणे कठिण आहे आजकाल.
कारण त्या त्या काळी हे सगळे ठेकेदार, सावकार आणि सरंजामी लोक खूप मोठ्या संघटित जातीतील असतात. यांचे गावपातळीवर राजकारणात आणि अर्थकारणात प्रचंड वर्चस्व असते. सत्तेत कोणीही आले तरी ही मंडळी स्थानिक पातळीवर गलेलठ्ठ असतात. ह्यांचे जर चित्रण खलनायक म्हणून चित्रपटात केले तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या त्या जातीचे उपटसुंभ मसीहा लागलीच पुढे सरसावतील. जय भीम मध्ये पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था हीचे दोष दाखवलेत म्हणून खूप लोकांना अपील झालाय सिनेमा.
उदाहरणार्थ:
१) सैराट सिनेमावर महाराष्ट्रातील कधीकाळी तद्दन गावपाटिलकी मिरवणाऱ्या लोकांनी उगाचंच विरोध केला होता. कारण हिरॉईन त्या समाजाची होती. सिनेमा राहिला बाजूला बाकीच्या कुटाळक्या सुरू होत्या सोशलमेडियावर.
२) कोर्ट सारख्या सिनेमावर पण एका वर्गाने उगाचंच नाराजी दर्शवून सोशलमेडियावर अकलेचे तारे तोडले होते.
त्यामुळे धार्मिक किंवा जातीपातीच्या समुहाला किंवा खलनायक न दाखवता व्यवस्थेला, यंत्रणेला खलनायक दाखवले की खपले जाते असा नवा ट्रेंड सुरू होईल जयभीम च्या निमित्ताने.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू