ही माझी लता!

ही माझी लता!

हेमंत कर्णिक

Lata Mangeshkar

एखादं गाणं आपलं आवडतं गाणं ठरण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यात मुख्य प्रकार दोन. एक, गाण्याशी संबंधित असलेलं कारण. आता हे गाणं जर सिनेमातलं असेल, तर ‘गाण्याशी संबंधित’चे विविध अर्थ होतात. प्रत्यक्ष गाण्याच्या कुठल्याशा अंगाशी संबंधित, सिनेमातल्या दृश्याशी संबंधित, वगैरे. दुसरा प्रकार म्हणजे त्या गाण्याचं असोसिएशन एखाद्या प्रसंगाशी, व्यक्तीशी, जागेशी लागून कुठली तरी आठवण जागी होते, म्हणून ते गाणं आवडीचं होऊन जातं. या दोन्ही प्रकारांमध्ये गाणं श्रेष्ठ ठरवण्याचा भाग नसतो, हे मात्र आवर्जून लक्षात ठेवायला हवं. ‘आवड’ व्यक्तिनिष्ठ - सब्जेक्टिव – असते, आवडीच्या बाबतीत उत्तरदायित्व नसतं. ‘श्रेष्ठ’ या शब्दाचा प्रयोगच व्यक्तिनिष्ठतेला ओलांडणारा असतो. मग तिथे उत्तरदायित्व येतं. इतरांनीसुद्धा त्या गाण्याला थोर म्हणण्याची कारणं समोर मांडावी लागतात. मग स्वत:सकट इतर अनेकांना मान्य असलेले निकष आवश्यक ठरतात. तरच त्या ‘श्रेष्ठ’ म्हणण्याला अर्थ रहातो. आवडीच्या बाबतीत असलं काही नसतं. तरी आपली आवड आपल्यापुरती न ठेवता तिची जाहिरात करायची असेल, तर काहीतरी खुलासा गरजेचा असतोच.

तर मी आता माझ्या आवडीची काही गाणी इथे देणार आहे. त्यांना सर्वांनी श्रेष्ठ म्हणावं, असा माझा मुळीच आग्रह नाही. पण माझ्या आवडीच्या गाण्यांची निव्वळ यादी देऊन हात झटकणे मला प्रशस्त वाटत नाही. माझी कारणं मला तुम्हाला किमान रीझनेबल वाटतील, अशा रितीने त्यांची मांडणी करावीच लागेल.

ठीक.

१. तेरे बचपनको - जयदेव
तेरे बचपनको जवानी की दुवा देती हूँ और दुवा दे के परेशानसी हो जाती हूँ. एका डाकूची पत्नी तिच्या तान्ह्या बाळाला उद्देशून हे म्हणते आहे. चित्रपट, मुझे जीने दो. सन १९६३. हिंदी सिनेमाच्या पठडीतलाच असला, तरी एकंदर डाकूला रोमँटिक रूपात अजिबात सादर न करणारा चित्रपट. मागे पोलीस लागल्यावर सतत पळत रहावं लागलेल्या डाकूच्या पत्नीला आपल्या बाळाच्या भवितव्याचं चित्र कसं दिसत असेल? हा या गाण्याचा आशय. गाणं सिनेमातलं आहे म्हणजे त्याचं प्राथमिक कार्य प्रसंगाला उठाव देणं आहे. पण हे गाणं संपूर्ण सिनेमाच्या आशयालाच उठाव देतं. प्रसंगापेक्षा, अभिनयापेक्षा, चित्रीकरणापेक्षा मोठं ठरतं. साहिर, जयदेव आणि लता यांच्यात डावं उजवं करता येत नाही. गाण्याची चाल फार मेलोडियस नाही. साहिरच्या एकेका शब्दाला व्यवस्थित वजन मिळेल, ही काळजी जयदेवने घेतली आहे. लताचा आवाज गोड आहे, ती सुरेल गाते, चालीला वर उचलते, या सगळ्याला ‘असो’ म्हणून सोडून द्यावं आणि गाण्यात बुडून जावं. थोड्या वेळाने नुसता आशय ऐकू येऊ लागतो. रडू आवरणं कठीण होतं.

ते रडू कसलं असतं? समोर चित्रपटातलं दृश्य नसलं तरी फरक पडत नाही. ते अधून मधून येणारे आघात, जरी आघात असले तरी त्यांत आवेश नाही. आक्रोश तर आहे; पण बंड नाही. दारुण जगण्याचं वर्णन आहे पण कुठेच शौर्य, हिंसा नाही. एक भयंकर अन्याय आहे जो मुकाट सहन करणं भाग आहे. आणि गाण्याचं नायकत्व आहे एका तान्ह्या बाळाकडे. ज्याला अजून बऱ्यावाइटाची, न्यायअन्यायाची अक्कलच आलेली नाही. मग त्या बाळाला आपण आपल्या संवेदनशीलतेला साजेशा कशाचंही प्रतीक मानू शकतो.
यातला टाहो सहनशीलतेच्या पलीकडचा आहे. गाणं माझं आवडतं जरूर आहे; पण वारंवार ऐकण्याची माझी टाप नाही.

२. मेरी आँखों में बस गया - शंकर जयकिशन
लताचा आवाज अशरीरी आहे. हे दोन बाजूंनी सांगता येईल. एक म्हणजे, नर्गिस, नूतन, हेमा मालिनी अशा कोणाच्या शरीराशी तो जोडता येत नाही. तसंच तो आवाज जिथून येतो, त्या शरीराचं व्यक्तिमत्व सापडत नाही. भाव सापडतो; पण रूप नाही. याला गुण म्हणायचं की अवगुण हा वाद बाजूला ठेवू; पण होतं काय, की शरीर नसलेला भाव समंध बनून बाई-बुवा कोणाच्याही मानगुटीवर बसू शकतो. कानावाटे आपल्या शरीरात प्रवेश करून झपाटून टाकू शकतो.

मेरी आँखो में बस गया कोई रे, मोहे नींद न आये मैं का करूँ. गाण्याची चाल म्हणजे भावावरचा लगाम होय, असं हे गाणं सांगतं. इतक्या वेळा लताचा आवाज सगळे बंध तोडून पूर्ण भावमय होऊन आकाशी उड्डाण करेल, असं होत रहातं. मग मनात येतं, चाल आहे म्हणून बरं, हे प्रकरण राहिलंय काबूत! नाहीतर आपल्या मनात शरीरात शिरून आपल्याला घेऊन जाईल कुठेतरी जादूच्या सतरंजीवरून परप्रदेशात.

३. मुझे मिल गया बहाना - रोशन
रोशन हा नेमस्त माणूस. लताच्या आवाजाचा पल्ला, त्याची पट्टी, मुरक्या घेण्याची तिची क्षमता या सगळ्याने वेडे झालेले संगीतकार स्वत:च्या कलाविष्काराचे हिमालयामागून हिमालय उभे करत राहिले असताना हा मनुष्य शक्यतो जमिनीवर वावरला. लताला खालच्या पट्टीत सगळ्यात जास्त चाली रोशनने दिल्या आहेत. हे गाणं ऐका. एकदाही लताचा सूर वर जाऊन थक्क करतोय, पलटे-ताना घेत सुरांवरची घट्ट पकड दाखवून देतोय, असं होत नाही. शेवटच्या कडव्यात अँटिक्लायमॅक्स आल्यासारखं ती ‘आतेही तेरे सजती हैं कलियाँ’ म्हटल्यानंतर ‘आहाहा हा’ असं म्हणते. नाजूकपणे म्हणते. जणू संकोच ओलांडणं कठीण होत असल्यासारखं म्हणते. लताच्या आवाजाला हे करायला लावणं हासुद्धा एक चमत्कारच आहे.

आणि तो पॉज. ‘कैसी खुशी लेके आया चाँद’. मग एक मोकळी जागा. आणि मग ‘ईदका’. अय्यो! अशीसुद्धा असते एक शांतरसातली लता.

४. तबियत ठीक थी - शार्दूल क्वात्रा
हे गाणं पर्सनल. हे मला सर्वात अलीकडे सापडलेलं गाणं. हेसुद्धा नाजूक, नेमस्त गाणं. तबियत ठीक थी और दिल भी बेकरार न था, ये तबकी बात है के जब किसीसे प्यार न था. मग कडव्यात येतं, ‘न थी बेचैनियाँ बेताबियाँ और गम नही था, कोई मेहबूब न था कोई भी हमदम नही था, किसी की याद न थी और इंतजार न था, ये तब की बात है के जब किसीसे प्यार न था.’ ही काय तक्रार आहे! मुळात ही तक्रार आहे का? एक मजबुरी आहे, एक उसासा आहे, एक चटका आहे; गाण्याचे शब्द आणि सूर यांचे सांधे मस्त जुळलेले आहेत आणि एक बावळट रुसवा गाणंभर ऐकू येत रहातो. मन मोहून टाकतो. ज्याने हा तबियत ठीक न रहाण्याचा अनुभव घेतला आहे, त्याला आख्खं आख्खं नॉस्टाल्जिक व्हायला होईल.

५. जादूगर सैंया - हेमंत कुमार
हेमंत कुमारच्या चालींना प्रासादिकतेचा स्पर्श आहे. या गाण्यालाही आहे. शब्दांमध्ये शृंगारिकता आहे, चालीत यायला हरकत नव्हती! या गाण्याला अगदी सुरुवातीपासून वेगवान लय आहे. शेवटपर्यंत त्याच लयीत गाणं वाहात रहातं. लता-हेमंतकुमार या कॉम्बिनेशनऐवजी दुसरं काहीही असतं तरी इथे ‘उडती चाल’ असा शब्दप्रयोग करता आला असता. पण यात जरी वाहत्या वाऱ्याचा फील असला, तरी गाण्याच्या ‘चालचलनात’ उडतेपणा नाही. आणि ते ‘तेरी नगरिया रुक न सकू मैं प्यार मेरा मजबूर है’ रिपीट करताना लता काय करते? त्याला आलाप म्हणायचं का? जे काही करते ते कानात प्राण आणून ऐकावंसं वाटतं. काय तो बुलबुलतरंग, काय ती बासरी आणि खालच्या पट्टीतून सहजसोपेपणाने वरच्या पट्टीत जाणारा लताचा आवाज. कसं आहे, ‘नागिन’ या नावाचा आणि चित्रपटातल्या एकूण गाण्यांमधल्या आशयाचा काही एक संबंध नाही; पण नाग जसा वेगाने आणि तरीही लयदार गती पक्की पकडून पुढे सरकतो, तसं हे गाणं मला वाटतं.

६. चलते चलते - गुलाम महम्मद
कलासंग्रहालयाच्या भल्या मोठ्या दालनात ऐन मध्यभागी एक भव्य शिल्प असावं आणि संपूर्ण दालनात दुसरं काहीही नसावं, तसं हे गाणं बाकी सर्व ग्रहणसंवेदना, देहभान विसरून ऐकावं. या गाण्याला मी ‘सर्वश्रेष्ठ’ म्हणणार नाही; पण कधीही दुसऱ्या कुठल्या गाण्याशी याची तुलना करणार नाही. समस्त गाण्यांचे दोन भाग करावेत आणि एका भागात हे एकच गाणं ठेवून दुसऱ्या भागात बाकी सगळीच्या सगळी, असं काहीतरी.

म्हणजे काय? तर याची चाल फारच ठाय लयीतली आहे. मधे पुष्कळ वेळ नुसता तबला वाजत रहातो. एक धृपद आहे आणि दोन तीन कडवी आहेत, अशी परिचयाची रचना नाही. गाणं आवाज नाही, शांतता प्रक्षेपित करतं. मूक करतं. गाण्यात फार ताना पलटे आहेत, असं मुळीच नाही. गाणं आनंदी नाही. मग दु:खी आहे का? तर तसंही नाही. उदास आहे काहीसं. ‘यूँही कोई मिल गया था’ पण त्याची आठवण जन्मभरासाठी सोबत झाली आहे. असाच भेटला आणि विसरणं अशक्य झालं आहे. हा भाव धड विरहभावही नाही. पण यात एक गंभीरता आहे.

सालं आध्यात्मिक वाटतं! या गाण्याचं काहीही नीट सांगता येत नाही. याची रचनाच धड नाही. गुलाम महम्मदला कुर्निसात!

७. कैसे दिन बीते - रवी शंकर
या गाण्यात लताने बंगाली आवाज काढला आहे, हे लक्षात येतं का? त्याला ‘बंगाली’ नको म्हणूया; पण ‘कैसे बीती रतियाँ’ यातल्या ‘रतियाँ’ला ती ज्या प्रकारे लांबवते, ते काहीतरी वेगळं आहे. गाणं मनात साचलेलं दु:ख आडून व्यक्त करणारं आहे. पण खूप रडू येतंय आणि ते दाखवायचं नाही आहे. गाणं म्हणायला सांगितलंय तेव्हा म्हणायचं आहे, पण त्यात कुठे बेसूरपणा येता कामा नये; असं स्वत:ला बजावून गाणारणीने तोंड उघडलं आहे. हा संयम ‘बरखा ना भाये बदरा ना सोहे’ वर जवळ जवळ मोडतो. लीला नायडूने कमाल केली आहे. दाबलेलं दु:ख दाखवणे सोपं नाही.

दु:खाचे अनेक प्रकार असतात. इतकंच नाही, एकच प्रकार एकेकाच्या संवेदनशीलतेनुसार छळवादी होण्याच्या तऱ्हा वेगळ्या असतात. हा छळ अप्रतिम आहे! अतिसुंदर आहे!

८. जो तुम तोडो पिया - वसंत देसाई
ही मीरेची रचना. संपूर्ण समर्पण. आणि ज्याला समर्पण केलंय त्याला काही पर्वाच नाही. ‘जो तुम तोडो पिया, मैं नाही तोडू रे; तोरी प्रीत तोडी कृष्णा, कौन संग जोडू’ यात एक हताश भाव आहे. जणू आत्महत्येच्या अगोदरचा क्षण आहे.

आणि या गाण्यात लताचा जो सूर लागला आहे, त्यात याची दाहक जाणीव होत रहाते. हे दु:ख तर आहेच; यात आर्जव, याचना आहे पण अगदी अखेरची पायरी गाठल्यागत झालं आहे. यानंतर एकच पर्याय उरला आहे: मृत्यू.

शब्दांना काय लागलंय! शब्दांची आतषबाजी जे व्यक्त करू पहाते; ते सोपे, थेट शब्द जास्त प्रखरपणे सागून जातात. आणि त्यांना योग्य सूर मिळाले आणि त्या सुरांमधला भाजून टाकणारा भाव पेलणारा आवाज मिळाला की जी अभिव्यक्ती घडते, तिचं वर्णन करता येत नाही. ती अनुभवावी लागते. हे गाणं ऐकायलाच हवं. शेवट हवं तर सोडून द्या!

९. दो नैनों में - आर डी बर्मन
या गाण्याला ठेका नाही. लयवाद्य नाही. असलं तरी किमान आपल्याला ऐकू येत नाही. नुसती लता. आणि अगदी बारीक आवाजात मागे वाजणारे हळवे टोल. लताचा आवाज कधी नाही तो हस्की येतो, ही आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा असावी. रात्र तर झाली आहे पण डोळ्यांत पाणी असताना झोप कशी यावी? सर्वत्र शांतता आहे. एका मानी स्त्रीने एकांत मिळाल्यावर काढून टाकलेली अधिक्षेपाची भावना. राहुल देव बर्मन झिंदाबाद! कसल्याही साथसंगतीविना लता ऐकायला मिळणे विरळा.

१०. छोड दे सारी दुनिया - कल्याणजी आनंदजी
या गाण्यात एक मोठा दोष आहे, तो म्हणजे ‘छोड दे सारी दुनिया किसीके लिये’ हे या गाण्याचं धृपद आहे आणि गाण्याचा आशय याच्या नेमका उलट आहे. पुढची ओळ ‘ये मुनासिब नही आदमीके लिये’ अशी आहे. तिच्याविना पहिली ओळ घेत राहण्यातून गाण्यावर फारच अन्याय होतो.

तेवढं बाजूला केलं तर काय गाणं आहे! जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारं गाणं. हिंदी सिनेमातली सगळीच गाणी काही प्रेम आणि विरह यांच्या भोवतीच फिरतात आणि प्रेम किंवा विरह याच भावनांचा पुरस्कार करतात, असं नाही. ‘प्यारसे भी जरूरी कईं काम हैं, प्यार सबकुछ नही जिंदगीके लिये,’ असंही एखादं गाणं सांगून जातं. अशी गाणी अगदी दुर्मिळ आहेत, असं नाही; पण ‘संसारसे भागे फिरते हो, भगवानको तुम क्या पाओगे’ अशी मोजकी गाणी सोडली तर बहुतेक गाणी पुरुषाच्या आवाजात आहेत.
या गाण्याला सरोद वा तत्सम वाद्याची साथ आहे. लताचा आवाज घुमल्यासारखा येतो. गाण्याच्या शब्दांचा आब नीट राखला जातो. गाणं समजूत काढणारं आहे, दूषणं देणारं नाही. गाण्याच्या गंभीर प्रकृतीला धक्का न लावता तो समजुतीचा सूर व्यवस्थित व्यक्त होतो. गाणं आर्जव न करता दोन शहाणे शब्द सांगतं. असा आशय हिंदी चित्रपटांत क्वचित. तो पेलणारं गाणं म्हणून मला हे फार आवडतं.

११. आ मुहबतकी बसती - अनिल विश्वास
परिपूर्णता म्हणजे काय, हे समजून घ्यायचं असेल, तर अनिल विश्वास ऐकावा. एकेका गाण्याचं एकूण स्वरूप असं की आहे त्यापेक्षा त्याच्या दर्जात एक कणभरही भर घालणं अशक्य. उदाहरणार्थ हे गाणं. सुरू होताना जो ठेका लागतो, तो शेवटपर्यंत रहातो. गाण्याचा टेम्पो त्यात सेट होतो. वाद्यांचे सूर अनिल विश्वासच्या पद्धतीला साजेसे वरखाली होत रहातात. त्यात जेवढा सुरेलपणा तेवढाच त्यांचा सीक्वेन्स अनपेक्षित. सगळं गाणं पूर्णपणे आस्वादण्यासाठी अनेक वेळा ऐकणं भाग. गाण्याच्या सुरुवातीला लता नाहीच. पुरुषाचा आवाज. मग वाद्यमेळ. मग कडवं. ते लताच्या आवाजात. उंच. वाद्यांपेक्षा, पुरुषाच्या आवाजापेक्षा पुष्कळ उंच. ‘मैं हूँ धरती तू आकाश है ओ सनम, देख धरतीसे आकाश है कितनी दूर’ यातल्या दुसऱ्या ‘है’चा उच्चार लताचा खास कॉपीराइट. गाणंभर या ठिकाणी प्रत्येक वेळी तसाच. काय काय ऐकायचं! पुढे. ‘देख, धरतीसे ...’ म्हणताना तो ‘देख’ पुन्हा अनिल विश्वासी. गाणंभर एकेका अक्षरावर फिरत्या सुरांची लाट. न चुकता दर वेळी.

पुरुषाचं कडवं पुन्हा खालच्या पट्टीत. मग वाद्यंच वर जातात. पुढच्या सनसनाटी सुरांची वर्दी देतात. खाली येतात आणि लताच्या सोनेरी आवाजाचा धारदार तीर काळजात घुसतो: तेरे दामनतलक हम तो क्या आयेंगे. त्या ‘आयेंगे’ नंतर अनिल विश्वासच करू जाणे असा प्रकार. कड्यावरून कोसळल्यासारखा लताचा सूर खाली येतो, बेसूर होता होता पुन्हा वर चढतो, पुन्हा तशाच फिरत्या लाटा. अरे बापरे! गाणं संपतं ते खालून वर जाणाऱ्या सुरांवर. हेसुद्धा आगळंच.

माझ्या दृष्टीने हे गाणं लताचं एकटीचं आहे. सोबतच्या पुरुषी आवाजाचा मालक किशोर कुमार याने मात्र रेडिओवरच्या एका मुलाखतीत ‘थोर संगीतकारांच्या रचना गायला मिळाल्या,’ असं सांगताना चक्क या गाण्याचा उल्लेख केला!

गाणी काढता काढता माझ्या लक्षात आलं की नुसत्या सुरांची; चालीच्या, लताच्या गायकीच्या बळावर थोर ठरणारी गाणी यात जवळपास नाहीत. म्हणजे मी गाणं ऐकताना केवळ सूर-चाल ऐकत नाही. म्हणजे शब्द ऐकतो, असं नाही. ‘भाव’ ऐकतो. भावपरिपोषाला महत्त्व देतो. दर वेळी शब्दांना मान देतोच असं नसलं तरी आशय मला महत्त्वाचा वाटतो. म्हणून शेवटी मी ‘आ मुहबतकी बसती’ घेतलं. त्यात लता एकटी नसूनही. कारण हे गाणं पूर्णपणे सुरांचं, लताच्या गायकीचं, अनिल विश्वासने लताला किती उंच नेलंय याचं आहे. ते तसं आहे, याचंच मला आकर्षण आहे.

असो. तर ही माझी आत्ताची आवडती अकरा गाणी. उद्या वेगळी असू शकतील. कारण आता ही माझ्या डोक्यात वाजत रहाणार. मला आतमध्ये गुंग करत रहाणार. मग एखादं वेगळं गाणं येऊन माझी समाधी भंग करणार; की मी वेगळी यादी बनवायला मोकळा!

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. पण 'साधना' मधे तुम्ही जो लेख लिहिला आहे तो जास्त आवडला होता.
माझ्यापुरतं सांगायचं तर माझी लता सर्वव्यापी आहे. तिला ४५-५०, ५०-६०,६०-७० अशा कालखंडात बंदिस्त करणं मला कधीच पटलं नाही. आवाज उताराला लागल्यावरची गाणी मात्र आवडली नाहीत. पण तरीही त्यातलं एखादंच आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जायचं. तिला कुठल्या संगीतकारात बंदिस्त करुन, अनिल विश्वास, सज्जाद, अण्णा, मदनमोहन, बर्मन अशा कप्प्यांत बसवून उसासे टाकत रहाणं, हे ही कधी मला पटलं नाही. 'काली काली रात ' सारखं सज्जादचं गाणं लोकांना माहीत देखील नव्हतं. पण ती गेल्यावर आता बऱ्याच लोकांना त्याचा शोध लागला आहे. तिची अनवट, व्हिंटाज गाणी जेवढी मला आवडतात तेवढीच नंतरच्या काळातली सायरा आणि तत्सम नट्यांच्या तोंडी असलेली हलकी-फुलकी अवखळ गाणीही आनंद देऊन जातात. पडोसन मधली धमाल गाणी ऐकताना मधेच, ते 'शर्म आती है मगर ' हे गाणं सुरु झाल्यावर मी अवाक होतो. काही लोकं लताच्या आणि इतर गायिकांच्या आवाजाची आणि गायकीची तुलना करु लागतात तेंव्हा त्यातला फरक ओळखू शकणारे कान देवाने मला दिले यासाठी मी देवाचे आभार मानतो. मूळ गाणं रेकॉर्ड झाल्यावर चित्रपटातल्या दृश्याला ते जोडताना त्याची पट्टी आपोआप वाढते हे टेक्निकल ग्यान, बरीच व्हिडिओ गाणी जमवल्यावर मला प्राप्त झालं. त्यामुळे संगीतकाराने आधीच वरच्या पट्टीत बांधलेली चाल तिच्या आवाजात आणखी वरच्या पट्टीत जाते. व्यक्तिश: मला तिची खालच्या पट्टीतली गाणी जास्त आवडतात. १००% परफेक्ट सुरांबरोबरच गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला आणि त्यातल्या भावनेला इतका अचूक न्याय देणाऱ्या गायिका फार कमी.
लता गेल्यावर आमचं काय हरवलं हे, 'तिची गाणी तर आहेतच की, मग कशाला दु:खी होतोस' असे म्हणणाऱ्यांना कधीच कळणार नाही,

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0