झुंड

झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागराजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते. मला व्यक्तीगत सिनेमा पाहताना नामदेव ढसाळ आणि जयंत पवार यांच लिखाण वाचल्यावर जे दृश्यं उभे राहिले होते तसा भास झाला. झोपडपट्टी मधल्या तरुणांना एकत्र घेऊन फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं लोकांना अपील होईल असं वाटत नाही. कारण स्पोर्ट्स फिल्म्स बनवण्यासाठी जे तंत्र लागते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे ते तंत्र इथे नाही. केवळ फुटबॉल खेळात गुंतून राहिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार का? नाही सुटणार. कारण ते दुर्लक्षित राहिले म्हणून मुख्य प्रवाहात आले नाहीत. बच्चन साहेबांच्या खांद्यावर मुख्य पात्र देऊन सगळा स्ट्रगल इतर लोकांचा दाखवलाय. मग बच्चन नसते तर तीच झोपडपट्टी गँग हिरो म्हणून स्ट्रगल करताना दाखवली असती तर वेगळाच इम्पॅक्ट तयार करता आला असता. आजवरचे सगळे हिंदी सिनेमे संवादातून व्यथा मांडतात. मग झुंडमध्ये शेवटच्या सीनमध्ये कोर्टात अमिताभ बच्चन चे भारदस्त आवाजातील संवाद त्याच पठडीतील वाटतो. फँड्री आणि सैराट मध्ये संवादापेक्षा पात्रांनी केलेली कृती लोकांवर प्रभाव टाकत होती. संवादातून टाकलेला प्रभाव हा कृतीतून टाकलेल्या प्रभावासमोर तकलादू असतो. झोपडपट्टीत राहतात म्हटल्यावर दाखवण्यात आलेले सगळे कॅरॅक्टर्स हे लोकांपर्यंत आजवर सगळ्याच माध्यमातून बरेचदा आलेले आहेत. मग नागराज कडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्याने टिपिकल छापखान्यातील टेकनिक्स वापरून झुंड बनवला आहे असं जाणवत राहतं. ह्या विषयावर सगळं एकाच सिनेमात बसवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतं. कित्येक आजूबाजूचे कॅरॅक्टर्स तेवढ्यापुरते येतात जातात. ही सगळी कॅरॅक्टर्स वेगवेगळ्या कॅनव्हासवर आणून किमान एक सिजन होईल अशी ओटीटी सिरिज सहज होऊ शकेल. त्यात प्रत्येक एपिसोड मध्ये एक एक प्रश्न हाताळता येतील आणि वेगवेगळ्या सिच्युएशन वर भाष्य करता येईल.

हिंदी सिनेमाच्या एक ठरलेल्या चौकटीत नागराज मंजुळेचा सिनेमा पाहणं अवघड जातं. अपेक्षा उंचावल्या होत्या फँड्री आणि सैराट ने त्यामुळे झुंड तशा अपेक्षा पुर्ण करत नाही. मध्यंतरापर्यंत जे जे हॅपनिंग आहे ते ते चांगलं खिळवून ठेवतं. नंतर फुटबॉलच्या संदर्भातील सामने, टुर्नामेंट्स, होमलेस सॉकर साठी प्रत्येक खेळाडूचा चाललेला संघर्ष एकाच सिनेमात पचनी पडत नाही. फक्त अमिताभ बच्चन लक्षात राहतो नागराज मंजुळे कुठेतरी हरवतो सिनेमा संपल्यानंतर. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची कामे ज्यांनी केली ते लक्षात राहतात. सिनेमात जे सामाजिक भाष्य केले आहे ते पण लक्षात राहते मात्र मंजुळे काय वेगळं दाखवणार ह्या अपेक्षेने गेलेला प्रेक्षक हिरमुसतो. नागराजचे सिनेमे सामाजिक भाष्य करतात. राजकीय भाष्य आणि सामाजिक भाष्य यात पुसटशी रेषा आहे. समाजाच्या व्यथा, प्रश्न, समस्या भेदकपणे मांडणे हे सामाजिक भाष्य आणि त्याचे खापर कोण्या एका वर्गावर तरी फोडणे हे झाले राजकीय भाष्य. सगळ्याच समाजात दाहक, ज्वलंत वगैरे भेडसावणाऱ्या समस्या असतात. काहींना त्या जाणीवेतून तर काहींना नेणिवेतून समजतात. ते जगणं ज्या माध्यामातून लोकांसमोर येते ते महत्त्वाचे. ते माध्यम किती लोकांना अपील होते किंवा तुमची जगण्यासाठी चालणारी धडपड किती लोकांपर्यंत जाते हे त्या माध्यमाच्या लोकप्रियतेवर ठरते. साहित्य, नाटक, चित्रपट ही महत्त्वाची माध्यमे ज्याने त्याने वापरली. एखाद्यावर झालेला अत्याचार जर साधन म्हणून बाजारात मांडला तर तो राजकीय किंवा सामाजिक बस्तान पक्कं करण्याचा खटाटोप असतो. असा खटाटोप सगळ्या माध्यमातून ज्या त्या सामाजिक आणि राजकीय आस्थांनी बरेचदा केला. काहींना यश आलं तर काही अपयशी ठरले. अशा सगळ्या बाबींवर जर मंजुळे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर ते फँड्री किंवा सैराट सारखे असेल अशी अपेक्षा उंचावणे सहाजिकच आहे. कारण नागराज ज्या भेदकपणे प्रश्न मांडतो ते लाजवाब. मग ती चीड झुंड मध्ये मध्यंतरानंतर दिसत नाही. विस्कटले आहे काहीतरी असं मनोमन जाणवतं. कॉलेजमध्ये खेळणाऱ्या पोरांना फुटबॉलमध्ये गड्डी गोदामची पोरं हरवतात हे सिनेमॅटिक वाटतं. मात्र नंतरचा होमलेस सॉकरचा प्रत्येकाचा लढा मनाला रुचत नाही. मग चावून चोथा झालेले घिसेपिटे डायलॉग इनकी दुनिया उनकी दुनिया यात अडकल्यासारखा वाटतो सिनेमा.

जब्याचा मारलेला दगड जेवढा जोरात लागला किंवा आर्ची परश्याच्या रक्तात माखलेली लहानग्याची पावले जेवढी मनात रुतली तेवढे वार डॉनच्या कटर ने झाले नाहीत. तरीही आपल्या मराठी माणसाने केलाय सिनेमा एकदा अवश्य बघा. आवडो न आवडो.

© भूषण वर्धेकर
५ मार्च २०२२, पुणे

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही 'स्टोरी टेलींग' नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

सिनेमाची लांबी खूप आहे, त्यात असलेल्या पात्रांच्या संख्येमुळे तसं असणं साहजिक असेल असं वाटलं होतं. पण, सिनेमात प्रत्येक पात्राची बैठक ठसवण्याचा प्रयत्न अपुरा पडला आहे. डॉक्युमेंट्री पद्धतीने पात्रांची ओळख करून देण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. तो मनाला भिडतो पण काळजाचा ठाव घेत नाही. अंकुशची मुख्य व्यक्तिरेखा बऱ्यापैकी आकार घेत साकार होते पण त्याप्रमाणे बाकीच्या व्यक्तिरेखा आकार न घेता साकार होत राहतात. कलाकारांच्या भाऊगर्दीत पटकथा रेंगाळत राहते आणि बऱ्याच वेळा संथ होते. पात्रांची संख्या मर्यादित ठेवूनही झोपडपट्टीतल्या आयुष्याची विदारकता परिणामकारक करता येऊ शकली असती पण ह्यावेळी काहीतरी गडबड झाली आहे. पटकथा विस्कळीत झाली आहे. सगळी उपकथानकं एकसंध, घट्ट आणि ठाशीव न वाटता तुकड्या-तुकड्याने जोडल्यासारखी येत राहतात.

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

अजय-अतुल यांचं संगीत ठीक आहे. फार काही स्कोप नाहीयेय पण आंबेडकर जयंतीचे गाणे झिंगाटच्या सावलीत असल्यासारखे झाले आहे.

सिनेमात दखल घेण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे हा सिनेमा भारतीय सिमेनातले प्रस्थापित स्टीरिओटाइप्स मोडतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीचं सेलीब्रेशन, त्यासाठीची वर्गणी वसुली आणि 'जय भीम' कथानकात ठळक आणि ठाशीव रूपात येतात. अमिताभने अतिशय लो प्रोफाइल आणि टोन्ड डाउन होऊन व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर अमिताभ नागपूरमधला एक सामान्य शिक्षकच वाटतो, फक्त कोर्टातल्या सीनमध्ये त्याच्यातला 'अमिताभ' बाहेर आला आहे. सर्व कलाकार जीव तोडून काम करतात. अर्थात तसे कलाकार शोधून त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या नागराजचा हातखंडा आहे. त्याच्या टीममधले सगळे जुने कलाकार ह्या सिनेमातही आहेत आणि आपापली कामं चोख करतात.

देशभरातला निम्न स्तरावरचा समाज, त्या समाजाचं विस्थापित असणं, उच्च स्तरावर त्या समाजाच्या अस्तित्वाची दखलही नसणं आणि जर ती दखल घेणं भाग पडलं तर अवहेलना करणं, हे आजच्या काळातही कसं चालू आहे ह्यावर संवेदनशीलपणे परिणामकारक भाष्य करणं ही नागराजची खासियत आणि ताकद आहे. ह्या सिनेमातही तो ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकं अंगावर येत नाही. उच्चभ्रूंचं कॉलेज व प्रस्थापित समाज आणि झोपडपट्टी ह्यांच्यामध्ये एक भिंत दाखवली आहे. ते ह्या दोन समाजातल्या संबंधांचं प्रतीक आहे. झोपडपट्टीमधली मुलं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे, क्षमतांमुळे ही भिंत ओलांडू बघतात आणि एक भला माणूस त्यांना भिंतीच्या ह्या पलीकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. फ़ॅन्ड्रीमधेही ही भिंत आहे, शाळेची भिंत. पण ती भिंत ज्या परखडपणे अंगावर येऊन काळजाचा जसा ठाव घेते तितकी ह्या सिनेमातली भिंत उंची गाठत नाही. कदाचित, हिंदी सिनेमाचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे नागराज त्याच्या होम ग्राउंड मराठी सिनेमात जितका परखड होतो तितका ह्या सिनेमात तो होतोय असं जाणवतं नाही.

प्रस्थापित आणि विस्थापित ह्यांच्यामधल्या प्रचंड मोठ्या भिंतीला ही 'झुंड' टक्कर देते पण भिंतीला ह्यावेळी भगदाड पडत नाही!

जरी सिनेमा अपेक्षीत उंची न गाठल्याने निराश करतो तरीही स्टिरीयोटाइप्स तोडणारा प्रयोग चुकवून चालणार नाही, एकदा दखल घेण्याजोगा नक्कीच आहे!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनेमा बघण्यासारखा आहेच. त्यात वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने एकत्र आणलेय ते भारीय. नागराज मंजुळे कडून खूप अपेक्षा आहेत. मराठीत जो ट्रेंड सेट केलाय तसा हिंदीत पण करणं गरजेचं आहे मराठी दिग्दर्शकाने. कारण आपण सिनेमा दिग्दर्शकाच्या नजरेने पाहतो. फँड्री आणि सैराट ने स्टार्ट टू एंड फ्रेम्स, फॉरमॅट, प्लॉट सगळं पकडून ठेवले होते. झुंडमध्ये मध्यंतरापर्यंत पकड राहते. कारण नागराजचे स्टोरी टेलिंग फारच भारी आहे. मात्र मध्यंतरानंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटलं. ज्याच्या सिनेमाने मनावर गारूड केले होते त्याच्या हिंदी सिनेमात काहीतरी राहिलंय असं वाटतं. काम सगळ्यांनी चोखपणे केलीत. त्याचं कौतुक आहेच. हिंदीमध्ये मराठी माणसाची छाप पडणं गरजेचं आहे. हिंदी सिनेमा नागराजचा सिनेमा म्हणून ओळखला पाहिजे त्यासाठी झुंडकडून अपेक्षा होत्या.

तसंही झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर बरेचसे सिनेमे येऊन गेले आहेत. काहींनी ट्रेंड सेट केले. काही स्टिरिओटाईप होऊन गेले.
आपल्या मराठी माणसाचा हिंदी सिनेमा आहे. पकड घेत नाही कुठेतरी निसटतोय असं जाणवल्यास हूरहूर वाटणारच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

इतरत्र म्हटल्याप्रमाणे, "झुंड" पाहिलेला नाही, पाहण्याची शक्यताही - for reasons unrelated to the movie itself - बरीच कमी आहे, त्यामुळे, उर्वरित प्रतिसादाबाबत (किंवा मूळ लेखाबाबतसुद्धा) काहीही म्हणत नाही. परंतु,

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

ही काय भानगड आहे? ((भानगडीपुरतेच) कुतूहल चाळवले.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0