'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने

नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे अस्वीकरण (डिस्क्लेमर) दाखविले त्यात हिंदी भाषांतराच्या अनेक चुका आढळल्याने पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले. चित्रपटाचा एकंदर कालावधी अंदाजे २ तास ५० मिनिटाचा आहे. मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला. कलाकारांबद्द्ल बोलायचे तर चिन्मय मांडलेकर आणि पल्लवी जोशींचे काम छान झाले आहे. पल्लवी जोशींनी डाव्या विचारसरणीची प्राध्यापिका सुरेख चितारली आहे मात्र याचा मुळ प्रश्नाशी थेट संबंध नाही. मात्र कशा पद्धतीने विचारपध्दती बदलायचे काम होते याचा धडा घेण्यासाठी याचा उपयोग होतो.
दर्शन कुमारचा 'कृष्णा पंडीत' अनुपम खेर आणि मिथून चक्रवर्ती, पुनीत इस्सर यांचे काम ठीकठाक वाटले. का कोण जाणे पण अनुपम खेर ला आयुष्यभर विनोदी भुमिकांमधे बघीतल्यामुळे अशा प्रकारच्या भुमिकेत बघणे मला अवघड गेले.

चित्रपटाच्या निमित्ताने जो गदारोळ उठत आहे त्याचे काहिही परिणाम मला चित्रपट गृहात आढळले नाहीत. दोन चार प्रेक्षक भ्रमणध्वनीवर संभाषण करण्यात मग्न होते. (चित्रपट गृहात जॅमर लावले पाहिजेत असे मला मनापासून वाटते. जर आपल्याकडे चित्रपट शांतपणे पाहण्यासाठी दोन तीन तास नसतील तर तिथे जाणेच अयोग्य.)
तिथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहित, कोणीही रडताना दिसले नाही. चित्रपटात एका दृष्यात पुनित इस्सर त्याच्या पत्रकार मित्राला ढकलून देतो तिथे तर पब्लिक चक्क हसलं. चित्रपटात एका ठिकाणी अनुपम खेर ३७० कलम हटवावे अशा मागणीचा फलक घेऊन उभा आहे त्या दृष्याला टाळ्या पडल्या. यास्मिन मलिक आणि फारुख अहमद दार (बिट्टा कराटे) यांच्या प्रसंगांची सरमिसळ झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात भारतीय वायुसेनेच्या चार जणांची हत्या केल्याच्या प्रकरणात यास्मिन मलिक कारागृहात आहे मात्र चित्रपटात बिट्टा त्यांच्यावर गोळ्या चालवताना दाखवतोय असे दाखविले आहे. माझी माहिती चुकीची असल्यास आणि ती दुरुस्त केल्यास मला आवडेल.

चित्रपट राजकीय भुमिका, दहशतवाद्यांची मानसिकता उलगडून दाखविण्यात कमी पडतो. काश्मिरी पंडीत गपगुमान गोळ्या खातात पण अजिबात विरोध करत नाही हे मला काही केल्या गळी उतरत नाही. इथे मुंबईत १९९२ सालचे दंगे झाले होते तेव्हा भितीपोटी अगदी मच्छर न मारणार्‍या माणसांच्या हातात लाठ्या काठ्या पाहिलेल्या आहेत. भले समोरच्याला मारता येणार नाही पण आपण कोणताही मार्ग चोखाळला तरी मृत्यु अटळ आहे अशा परिस्थितीत माणूस कमीतकमी समोरच्या दोन चार शिव्या घालतो तो भितीपोटीचा आवेश देखील कोणत्याही प्रसंगात दिसत नाही.

मी ज्या परिसरात चित्रपट पाहिला तो बर्‍यापैकी सुखवस्तू असल्यामुळे इथल्या प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतील. चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍यांत वयोवृद्धांचा टक्का लक्षणीय होता. टोपी, बुरखा अशा वेशातील व्यक्ती चित्रपट पाहायला आलेले दिसले नाही. कदाचित असा वेश धारण न केलेले मुस्लिम दर्शक चित्रपट पाहायला आलेले असूही शकतील मात्र बहुतांश माध्यमांतील गदारोळ पाहता त्यांनी हा चित्रपट पाहणे टाळले असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र येथे जर कोणी मुस्लिम वाचक असतील तर त्यांनी हा चित्रपट अवश्य पहावा. मुस्लिम विरोधी असे काहीही नाही.

भारतातील बर्‍याच लोकांना कश्मिरी पंडीतांच्या १९९० मधील या प्रसंगाबद्दल माहिती नाही असे एकंदरीत मिडियात येणार्‍या वार्तांकनातून जाणवते. कदाचित अशा लोकांना चित्रपट पाहिल्यावर जास्त धक्का बसला असावा असा माझा अंदाज आहे.
अवांतर वाचनाची नावड, व्हाटसअ‍ॅप, फेसबुकीय लेखांच्या व्यतिरिक्त कोठूनही माहिती मिळविण्याचा कंटाळा किंवा एकंदरीतच हिंदूच्या प्रश्नाला तेव्हाच्या माध्यमांमधे मिळालेले गौण अशी अनेक कारणे यामागे असू शकतील.

मला चित्रपट फारसा भावला नाही याची काही कारणे देता येतील.
१. सरहद संस्थेचे काश्मिरी विस्थापितांबद्द्लचे काम , त्या त्या वेळी वर्तमान पत्रांमधे येणार्‍या बातम्या यातून प्रश्नाची थोडीफार माहिती होती. पण माझ्या लहानपणी बातम्या मिळविण्याचा प्रमु़ख स्त्रोत नवाकाळ हे वर्तमानपत्र होते कारण त्यावेळच्या परिस्थीतीत तेच परवडायचे. लोकसत्ता, म.टा., नवभारत टाईम्स वाचायचा तर मोफत वाचनालयांचा आसरा घ्यावा लागायचा. त्यामुळे एकच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात कशा पद्धतीने छापून येते त्याचे विश्लेषण करणे यावर मर्यादा होत्या. त्या वयात ती कुवत देखील नव्हती. मात्र बर्‍याचशा बातम्या मुस्लिमांवर किती अत्याचार होताहेत, निरागस लहान मुले कशी रस्त्यावर आलीत हे सांगणार्‍या असत. त्यामुळे दुसरी बाजू माहित नव्हती.
२. कामानिमित्त काही दिवस दिल्लीत राहणे झाले असता तिथे दोन कश्मिरी पंडित युवक भेटले होते. मिठ्ठास वाणी, सफरचंदांसारखे गोबरे गाल हे माझे त्यांच्याविषयीचे प्राथमिक मत झाले. मात्र काश्मिरबद्द्ल ते बोलायला जास्त उत्सुक नसायचे असे त्यांच्याशी बोलताना जाणवले. माझ्या आयुष्यात मी काश्मिरी माणूस तेव्हा प्रथम पाहिला.
३. या घटनांच्या दुसर्‍या बाजूबद्दल सुशील पंडीत, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या युट्युबवरील चित्रफिती पाहून साधारण ३-४ वर्षांपुर्वी माहिती झाली होती. त्यांच्या चित्रफिती माहितीपुर्ण आहेत. कदाचित तिथे जे मिळाले ते चित्रपट पाहताना गवसले नाही यामुळे चित्रपट जास्त भावला नसावा.

मिसळपाव वरील 'द काश्मिर फाईल्स' या चर्चाप्रस्तावात श्री. तर्कवादी यांनी चित्रपट प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असते याचे काही पर्याय दिले होते. ते खालीलप्रमाणे आहेत. खरे तर तिथेच उत्तर दिले असते तर जास्त योग्य ठरले असते पण असो.

१) काश्मीरमध्ये १९९० साली काश्मीरपंडितांवर झालेले अत्याचार मला व्यथित करत आहेत
२) क्र १ + त्यामुळे काश्मिरी अ तिरेक्यांबद्दल माझ्या मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
३) क्र १ + क्र २ + असे घडण्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कारणीभूत सर्व राजकारण्यांबद्दल मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
४) क्र १+ क्र२ + क्र ३ + सर्वच मुस्लिम व्यक्तिंबद्दल माझ्या मनात राग व संशय निर्माण झाला आहे
५) क्र १+ क्र२ + क्र ३ + क्र ४ + या घटनेबद्दल मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते.

पर्याय क्र. ४ - चित्रपट पाहताना कोणत्याही मुस्लिमांविरोधात राग निर्माण झाला नाही. चित्रपटाचा तो उद्देश नसावा. त्यामुळे पर्याय क्रमांक ५ बाद ठरतो.
पर्याय क्रमांक २ चा विचार करण्यास हरकत नाही. एकंदरीत चुकीच्या पद्धतीचे राजकारण केल्यामुळे काट्याचा नायटा झाला हे मानण्यास वाव आहे.
यात मी एक ६ वा पर्याय डकवू इच्छितो.

कश्मिरी पंडित आणि जगभरातील ज्यू हे एकाच प्रकारच्या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र ज्यूंवरील अन्यायाला ज्या प्रकारे वाचा फुटली / फोडली गेली ते भाग्य कश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाच्या वाट्याला आले नाही. बहुतांश कश्मिरी पंडित समाज शिकलेला सवरलेला होता, सरकारी नोकर्‍यांमधे, क्षिक्षण क्ष्रेत्रात स्थिरस्थावर होता मात्र त्यांनी आपल्यावर होणारा अन्याय तेवढ्या तीव्रतेने जगासमोर आणला नाही असे वाटते.

याउलट जगभरातील पिडीत मुस्लीम आणि ज्यूं नी आपल्या भळभळत्या जखमांच्या जाणिवा तेवत ठेवल्या आणि त्यायोगे आपले नंतरच्या आयुष्याला कलाटणी कशी देता येईल याचा विचार केल्याचे जाणवते. अर्थात ज्युंनी कितीही सवलती मिळविल्या, स्वतःचा देश मिळविला तरी युरोपियनांनी त्यांना फसवले आहे या मुद्यावर माझे मत ठाम आहे. युरोपियनांना ज्युंवरील अत्याचारांविषयी पापमार्जन करायचेच होते तर आपल्या देशातला एखादा हिस्सा तोडून देऊन तिथे त्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करु द्यायचे होते. याउलट देवाची भुमी या गोंडस नावाखाली त्यांना एक नापिक जमिन देऊन आणि अरब / मुसलमान नावाचा नविन आणि कायमस्वरुपी शत्रू देऊन आपली परस्पर सुटका करुन घेतली. आज आपल्या परिश्रमांच्या जोरावर इस्त्रायलने कितीही चांगली प्रगती केली असली तरी कायम युद्धाच्या छायेत राहून जगणे अवघड आहे. ज्यूंच्या संहार झालेल्या पिढीने आणि कश्मिरी पंडीतांनी देखील अत्याचारांचा पुरेसा प्रतिकार केलेला दिसत नाही. काही तुरळक अपवाद असतील देखील पण ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच.

इथे मराठी, बंगाली, उत्तर भारतीय पंडीतांचे तेज उठून दिसते. गरज पडली तेव्हा त्यांनी शस्त्र हाती धरले, क्षत्रीयांच्या बरोबरीने क्षात्रतेज दाखविले, माध्यमे, राजकारण अशा अनेक ठिकाणी आपला प्रभाव दाखवला. कश्मिरी पंडीत या सगळ्यात कमी पडला हे सत्य नाकारुन चालणार नाही. आपल्या वाईट परिस्थितीला इतर बाह्य कारणे असतील हे नाकारण्याचा प्रश्न नाही पण आपण देखील कोठेतरी कमी पडत असू हे स्वीकारायला हवे. ५ लाख लोकांनी पळून जाण्याचा पर्याय निवडला त्यापैकी ५०० जणांनी जरी प्रतिकार केला असता तर या प्रश्नाला माध्यमांमधे वाचा फुटण्यास जास्त मदत झाली असती.

चित्रपट १९०० साली झालेल्या प्रसंगांवर भाष्य करतो मात्र त्यांनतर देखील
१९९८ मधे गंदरबाल, छपनारी,प्राणकोट मधे पंडितांची हत्याकांडे घडली.
सन २००० साली छत्तीससिंगपुरा येथे शिखांचे हत्याकांड
सन २००१ साली अमरनाथे यात्रेकरुंवरील हल्ला, किश्तवार हल्ला
सन २००२ साली कासिम नगर हत्याकांड
सन २००३ साली नदीमर्ग मधील हत्याकांड
सन २००६ साली डोडा येथील हत्याकांड
अशी अनेक प्रकरणे कश्मिर मधे सतत झालेली आहे. त्या विषयावरील लेख, चित्रफिती आंतरजालावर उपलब्ध आहेत मात्र आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक देखील नसते.

आज माध्यमांमधे चर्चा होते की कश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा कॉंग्रेसचे सरकार नव्हते. मग विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार, भाजपाचा पाठींबा वगैरे गोष्टींवर चर्चा होतात. मात्र भाजपा ने ३७० वे कलम रद्द करुन त्यांच्या चु़कीचे / पापाचे काही प्रमाणात परिमार्जन केले आहे. बाकी पक्षांनी पण आपापला वाटा उचलावा.

एका ठिकाणी कश्मिर मधे हिंदूंपेक्षा मुस्लिम जास्त मरण पावले असे माहितीच्य अधिकारात मिळालेले पत्र पाहिले. पण हे पत्र डकविणार्‍याने यात हिंदू पंडीतांचा यात काय दोष यावर काय भाष्य केलेले दिसत नाही. केवळ पिल्लू सोडून गंमत बघायची अशीच मानसिकता असावी.

आता ३०-३२ वर्षांनंतर कश्मिरी पंडीतांची एक विस्थापित पिढी जवळपास संपत आलेली आहे. उरलेल्यांना जर आपल्या घरी परतायचे असेल तर त्यासाठी सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय विस्थापितांच्या पुढच्या पिढीला परत आपल्या मातृभुमीत परतायचे काही सबळ कारण मिळावयास हवे. तिथे जाऊन पुढील जीवनात प्रगतीचे मार्ग दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रयत्न सरकार आणि जनता दोघांकडून व्हायला हवे. तरच ही जखम काही प्रमाणात भरली जाईल.

नाहितर चित्रपट सिनेमागृहातून पायउतार होईल, जनता उद्या नव्या प्रश्नाची चर्चा करेल आणि मुळ प्रश्न आहे तिथेच राहिल. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी जास्त सजग आणि सक्रिय होण्याची गरज आहे. आज तुमच्या दिमतीस विविध समाजमाध्यमे आहेत, देशातील बहुसंख्य जनतेत तुमच्याबद्ल कणव आहे, सरकारचा दृष्टीकोण तुम्हाला अनुकूल आहे. हीच ती योग्य वेळ आहे.

तळटीप : चित्रपट आवडला नाही याचा अर्थ ज्यांनी हे भोगले आहे त्यांच्याबद्द्ल सहवेदना नाही असा अर्थ कोणी काढत असेल तर नाईलाज आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संयत प्रतिक्रिया: आवडली.

लेख आवडला. याला प्रतिक्रिया म्हणणार नाही, प्रतिसाद म्हणेन. मला सदर विषयातलं काहीही माहीत नाही हे मान्य करूनही म्हणेन की मला लेख आवडला. राजकीय पक्षासाठी भूमिका न घेता, जेवढी जमेल तेवढी माहिती मिळवून मगच बोलायचं, लिहायचं ही राजकीय भूमिका कुठल्याही संदर्भात मला पटतेच. म्हणून लेख आवडला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काश्मिरी पंडीत गपगुमान गोळ्या खातात पण अजिबात विरोध करत नाही हे मला काही केल्या गळी उतरत नाही.

मुळातच जर ठरवून शोधून पंडितांवर अत्याचार करायचे ठरवले होते. रलीव, सलीव, गलीव चे नारे देणारे समुह धावून येत असतील तर प्रतिकार करायचा की जीव अन् अब्रू वाचवण्यासाठी निघून जायचे हे दोनच पर्याय समोर असतात. मुळात हिंदू सहिष्णू असल्याने लागलीच शस्त्रे हातात घेत नाही प्रतिकार करण्यासाठी. जर राजकीय पाठबळ असेल तर हिंदू पेटून उठतो. त्यावेळी काश्मिरी पंडितांना कोणाचेही राजकीय पाठबळ नव्हते. आम्हाला धर्मावर आधारित स्वतंत्र राष्ट्र पाहिजे हीच भूमिका त्यावेळी अतिरेक्यांनी घेतली होती. जे भारताच्या बाजूने त्यांना मारून टाकले होते. मग ते हिंदू असो वा मुस्लिम हे पण अतिरेक्यांनी बघितले नव्हते. जो भारताच्या बाजूने तो आमचा शत्रू. अशा अवस्थेत काश्मिरी पंडित हे दुबळे होते. त्यांच्यावर अत्याचार केले तर जरब बसेल आणि काफिरांना मारल्यावर बहात्तर हूर मिळतील वगैरे डोक्यात भरले असेल अतिरेकी लोकांच्या. भिंतीवर पोस्टर लावून, मशिदीतून लाउड स्पीकरवर घोषणा देऊन हिंसक पद्धतीने हुसकावून लावले. प्रतिकार करण्यापेक्षा जीव वाचवणं महत्त्वाचे.

एका ठिकाणी कश्मिर मधे हिंदूंपेक्षा मुस्लिम जास्त मरण पावले असे माहितीच्य अधिकारात मिळालेले पत्र पाहिले.

याचं कारण सिनेमात जे दाखवलंय ते काल्पनिक आहे असे ठामपणे सांगू शकत नाही ही उपरती आली पण सरकार दरबारी दिली जाणारी आकडेवारी काही लोकांकडून प्रसारित करण्यात येतेय. असे करताना सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न चालूय की बघा मुस्लिमांना पण अतिरेक्यांनी मारले फक्त पंडितांवर हल्ले नाही केले. ही अशी मंडळी वेगळ्या ग्रहावर राहत असतात.

या प्रश्नाला माध्यमांमधे वाचा फुटण्यास जास्त मदत झाली असती.

इन्फो वॉर मध्ये खऱ्याखुऱ्या गोष्टी दाबल्या जातात. त्याकाळी आजसारखा फ्री मेडिया नव्हता. काश्मीर प्रश्न हिंदुत्ववादी लोकांच्या जिव्हाळ्याचा. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला. अभाविप ने निषेधार्थ मोर्चा काढल्याचे वाचले होते. नंतर अनेक पुस्तके, लेखांतून या जेनोसाईडवर भाष्य केले होते.
सिनेमात मेनन चा एक संवाद आहे. "सरकार उनकी है लेकीन सिस्टिम्स हमारी है।" यावरून कोणी कोणते कसे डीप नँरेटिव्ह सेट केले होते ते समजते. सिनेमाने क्रांती होत नाही. सिनेमा हा सिनेमा असतो. मात्र एका सिनेमामुळे त्याकाळी काय काय घडलं होतं हे सर्वसामान्य लोकांना समजतं. पुस्तके जेवढी मोठ्या प्रमाणात वाचली जातील तेवढे आतले बाहेरचे वेगवेगळे कंगोरे लोकांच्या लक्षात येतील.

सर्वात शेवटी एवढंच म्हणेन धर्माच्या आधारे जेव्हा राष्ट्र निर्माण होते किंवा करायचे असते तेव्हा रॅडिकल रिलिजिअस व्हॉयलन्स सर्वस्वी वापरला जातो. 'डायरेक्ट एक्शन डे' हे सर्वश्रुत आहे. बांग्लादेश संदर्भात दि ब्लड टेलिग्राम आणि ब्लड आईसलँड ही दोन पुस्तके पुरेशी आहेत मोडस ऑपरेंडी समजून घ्यायला.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

इन्फो वॉर मध्ये खऱ्याखुऱ्या गोष्टी दाबल्या जातात. त्याकाळी आजसारखा फ्री मेडिया नव्हता.>>>हे वाक्य फार आवडले.त्यामुळे प्रतिसादाला रंग चढला.

सिनेमात मेनन चा एक संवाद आहे. "सरकार उनकी है लेकीन सिस्टिम्स हमारी है।" यावरून कोणी कोणते कसे डीप नँरेटिव्ह सेट केले होते ते समजते.

मला हे वाक्य आवडलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

> मिसळपाव वरील 'द काश्मिर फाईल्स' या चर्चाप्रस्तावात श्री. तर्कवादी यांनी चित्रपट प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असते याचे काही पर्याय दिले होते.

ह्या निमित्ताने ‘मिसळपाव’ वर जाऊन आलो. ते फार वेगळं विश्व आहे असं दिसलं. त्यांच्या मानाने (काही सन्माननीय अपवाद वगळता) इथे लोक फारच संयत प्रतिक्रिया देतात. माझ्या प्रतिक्रिया तर अनेकदा इतक्या संयत असतात की मनातच राहतात. पण असो. पिक्चर अजून बघितलेला नाही. बघितल्यावर संयत प्रतिक्रिया देईन.

> दोन चार प्रेक्षक भ्रमणध्वनीवर संभाषण करण्यात मग्न होते. 

ह्यांचा मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते. आमच्या आग्नेयेला फ्लॉरिडामध्ये झालेली घटना: सिनेमा थेटरात सेलफोन वापरणाऱ्या एका नराधमाला एका माजी पोलीसाने गोळी घातली होती. इतके ‘अच्छे दिन’ भारतात अजून आलेले नाहीत.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सिनेमा थेटरात सेलफोन वापरणाऱ्या एका नराधमाला एका माजी पोलीसाने गोळी घातली होती. इतके ‘अच्छे दिन’ भारतात अजून आलेले नाहीत

हे फारच थोर होते. भारतात गोळी झाडणारा कोण आणि मरणारा कोण यावर दोन उभे गट पडतील. Wink

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

तुमच्या दक्षिणेला टेक्सास राज्यात 'अलामो' नावाची चित्रपटगृहांची साखळी आहे. तिथे सिनेमा सुरू असताना फोनची स्क्रीन चकाकली तर चित्रपटगृहाबाहेर काढतात. इतपत 'अच्छे दिन' तुमच्या भागात आलेत का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा जिवंत राहिला तर च भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशातील राजकीय पक्षांना बहुसंख्य लोकांची मत मिळतील आणि सत्ता मिळेल.

भारतात हिंदू प्रेम किंवा मुस्लिम लोकांची ची भीती दाखवून आणि पाकिस्तान मध्ये मुस्लिम प्रेम आणि भारताची भीती दाखवू.
बस ह्या व्यतिरिक्त भारत ,पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना ना काश्मीर विषयी प्रेम आहे ना काश्मीर चे वेगळे महत्व आहे.
...तिथे हिंदू मरू नाही तर मुस्लिम ..फायदा दोन्ही देशातील राजकीय पक्षांना आहे

काश्मीर चे हित मनापासून कोणत्याच देशाच्या एजेंडा मध्ये नाही.
दोन्ही देशात कायदा सुव्यवस्था,अतिशय उत्तम दर्जा ची .
न्याय व्यवस्था उत्तम दर्जा ची असेल
,आणि कार्यक्षम सरकार असेल तर हिंदू मुस्लिम हा भेद राहणार च नाही संघर्ष तर होवू च शकत नाही
उत्तर हेच आहे .उच्च दर्जा चे राज्य करते .अतिशय संवेदनशील आणि वेगवान न्याय व्यवस्था,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन..अशी आदर्श व्यवस्था दोन्ही देशात
असेल तर काश्मीर प्रश्न काय कोणताच प्रश्न ह्या दोन्ही देशात नसेल.
पण हे काम खूप कठीण आहे.

Kashmir is not a problem, it is a solution.
हे आठवले.

देशातील जाती चे पुढार पण करणारे,देशातील धर्माचे पुढारी.देशातील प्रांताचे पुढारी .देशातील उद्योगपती चे पुढारी,देशातील गरीब लोकांचे पुढारी.
ह्या सर्व जमाती जळवा आहेत देशाला लागलेल्या.
त्यांचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे तो प्रश्न सुटून देत नाहीत..
देशाला देव दूत ची गरज आहे जो सर्व प्रश्न सोडवेलं आणि ही सर्व पुढारी जमात नष्ट होईल.
तेव्हा भारत सुजलाम,सुफलाम होईल.

आज संध्याकाळी बघितला. थिएटर हाऊसफुल्ल होतं. सगळा भरणा भारतीय उपखंडातून आलेल्या लोकांचाच होता, पण नुकत्याच बोटीवरून उतरलेल्या एका इसमाचा काही सेकंदांपुरताचा किरकोळ अपवाद वगळता सगळेजण कॅनेडियन मवाळपणा पत्करून सेलफोन बंद करून शांतपणे सिनेमा बघत होते. मातृभूमी सोडली की आपण आपली संस्कृतीही विसरतो हे एक कटू सत्य आहे.

सिनेमातल्या मला खटकलेल्या काही गोष्टी:

(१) एका शाळेच्या शॉटमध्ये बॅकग्राउंडला एक गोजिरवाणा कुत्रा होता. मला कुत्रे खूप आवडत असल्यामुळे हा शॉट आणखी रेंगाळावा अशी इच्छा होती, पण तो फार लवकर फ्रेमबाहेर गेला.
(२) सुरवातीला मिथुन चक्रवर्तीच्या लाकडी टेबलावर अथर्ववेदाचे दोन खंड दिसले. त्यानंतर निर्वासितांच्या कँपमध्ये अनुपम खेर मिचमिच्या डोळ्यांनी ऋग्वेदाचा भलाथोरला ठोकळा चाळताना दिसला. यापुढे पल्लवी जोशीच्या घरी (अर्थात लाल) कातडी बांधणीतला सामवेद दिसणार आणि शेवटी भगव्या बांधणीतल्या कृष्ण यजुर्वेदात क्ल्यू सापडून खुनी कोण ते कळणार असं मला वाटलं. पण तसं झालं नाही. असं lectio interruptus केलं की फार रसभंग होतो.
(३) कृष्ण पंडित-प्रोफेसर राधिका मेनन सबप्लॉट निदान मला तरी नीट समजला नाही. एकतर त्यांच्यात थोडंफार ‘इरॉटिक टेन्शन’ दाखवतील ही आशा फोल ठरली, पण ते एक जाऊ दे. ANU (आंग्लदेशमूल्यानुसारक नेहरू युनिव्हर्सिटी) मध्ये शिकवणारी ही प्रोफेसरबाई ‘स्वतंत्र काश्मीर’ च्या बाजूने असते इतपत मी कथानकाच्या सोयीसाठी मान्य करायला तयार आहे. पण Student Union President च्या निवडणुकीत हा एकमेव मुद्दा ऐरणीवर का येतो आणि कृष्ण पंडितला ह्या किंवा कुठल्याच राजकीय विषयावर तशी काही ठाम मतं नसूनही ती त्याला का भरीला घालते आणि हे प्रकरण तो अंगावर का घेतो ते कळलं नाही. (दोघांना एकमेकांबद्दल सुप्त आकर्षण वगैरे असेल तर ठीक आहे, पण निदान तसं तरी दाखवा.) आणखी एक वैताग म्हणजे कृष्ण पंडितचा ह्या निवडणुकीतला प्रतिस्पर्धी कुठेच दिसत नाही, त्याची भूमिकाही समजत नाही आणि ह्या अदृश्य प्रतिस्पर्ध्याचे पाठीराखेही कुठे दिसत नाहीत. म्हणजे ही एकतर्फी निवडणूक आहे. मग असं असताना विनाकारण त्यात काश्मीर कशाला आणायचं? भरलं वांगं करताना डेख काढावं की नाही या मुद्द्यावर त्याने भाषण ठोकलं असतं तरी मिळायची ती मतं त्याला मिळालीच असती.

बाकी सिनेमा एकूण सोप्पासोप्पा आणि बाळबोध आहे. तो ‘फॉग’ असल्याचं आमच्या एका मित्रवर्यांनी म्हटलेलं आहे. हे वर्णन अत्यंत चपखल असल्याचा निर्वाळा मी इथे देऊ इच्छितो. ह्या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ ठाऊक असणारे लोक आता संख्येने विरळ होऊ लागले आहेत. तेव्हा निदान ह्या सिनेमाच्या निमित्ताने का होईना तो पुन्हा एकदा जगासमोर यावा ही गोष्ट माझ्या मते फार चांगली झाली.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

>> भरलं वांगं करताना डेख काढावं की नाही या मुद्द्यावर त्याने भाषण ठोकलं असतं तरी मिळायची ती मतं त्याला मिळालीच असती. <<

किमान ह्या वाक्यामुळे का होईना, त्या निवडणुकीत काश्मीर आणणं सार्थ आहे.

सिनेमा बघितला तर बाकी प्रतिक्रियेबद्दल मत देईन.

अवांतर - कुत्रा किंवा मांजरी असणारे सीन्स आणखी जास्त काळ चालावेत असं मलाही वाटतं. 'गॉडफादर'मध्येही मांजरीचा सीन लवकर संपतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.