ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ३

प्रकरण ३ – आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

 • आयुर्वेदाचा उगम
 • आयुर्वेदाच्या मूलभूत कल्पना
 • अग्नी, आम, धातू
 • समालोचन

***

आयुर्वेदाचा उगम

धन्वंतरी हे देव समुद्र मंथनात वर आले असा भागवत पुराणात उल्लेख येतो. या देवतेला आयुर्वेदाचे पिता असे समजले जाते. परंतु धन्वंतरी यांनी रचलेल्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख येत नाही. त्यामुळे त्यांनी कोणते ज्ञान कोणास दिले हे समजत नाही.

साधारणपणे गुप्त साम्राज्याच्या काळात चरक आणि सुश्रुत हे दोन वैद्य होऊन गेले असावेत असा अंदाज आहे. या दोन वैद्यांनी हे ज्ञान समाजापर्यंत पोचविण्यासाठी चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ लिहिले.

या नंतरचे या क्षेत्रातील नाव पतंजली. या नावाच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असाव्यात असा अंदाज आहे. पतंजलि योगसूत्रे लिहिणारे आणि व्याकरण महाभाष्य लिहिणारे आणि चरक संहिता लिहिणारे अशा तीन व्यक्ती असाव्यात. त्यांचा काल इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पाचव्या शतकापर्यंत असावा. एका प्रचलित श्लोकानुसार पतंजली आणि चरक एकच. पतंजलींची वेगळी संहिता नाही. आयुर्वेदाच्या तीन प्रमुख संहिता आहेत - चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि काश्यप संहिता.

यानंतरच्या निरनिराळ्या संहितांमधील माहिती एकत्र करून वाग्भट यांनी अष्टांग संग्रह लिहिला.

शारंगधर बाराव्या शतकात होऊन गेले. त्यांनी लिहिलेली शारंगधर संहिता तीन खंडात आहे. नाडी परीक्षा आणि पंचकर्म या विषयात त्यांनी लिखाण केले आहे.

(वरील माहिती आयुर्वेदाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर विष्णू जोगळेकर यांच्या सौजन्याने)


आयुर्वेद

आयुर्वेदाच्या मूलभूत कल्पना - अग्नी, आम, धातू आणि त्रिदोष

त्रिदोष कल्पनेचा आपण पुढच्या प्रकरणात विचार करू.

आम

माहिती या लेखातून - Critical review and validation of the concept of Āma, P. Ram Manohar, Ancient Science of Life, 2012 Oct-Dec

Āma denotes the abnormal or impaired process of digestion and metabolism that leads to build up of toxic by-products, which cannot be neutralized or eliminated by the body.

 • Āma is the by-product of impaired digestion
 • Āma is the accumulation of unexpelled wastes in the body
 • Āma is the first expression of aberrations in the physiological processes

न शिजवलेल्या अन्नाला आम म्हणतात यासाठीच जठर (stomach) अवयवाला संस्कृतात आमाशय म्हणतात. (याचा अर्थ आम आमाशयातच बनते असा नाही.) शरीरात साठत चाललेले आम वेळीच नष्ट केले तर आजार होत नाहीत. वातदोष आणि पित्तदोष यांच्या बरोबर आम संयुक्ते बनविते. आम धातूंच्या बरोबर पण संयुक्ते बनवू शकते. यानंतर रोगांची लक्षणे दिसू लागतात. आजार नष्ट करणे म्हणजे ही संयुक्ते शरीराबाहेर करणे. लंघन आणि पंचकर्म या सारख्या क्रियांनी आम शरीराबाहेर काढता येते.

धातू

शरीरातील प्रमुख द्रवपदार्थ आणि घनपदार्थ यांना धातू असे संबोधिले जाते. धातू सात प्रकारचे असतात. धातूंमुळे शरीर बनते. धातूंमध्ये दोष उत्पन्न होतात आणि आजार होतो.

रसधातूमध्ये शरीरातील निरनिराळे द्रव पदार्थ येतात. रसधातूशिवाय रक्तधातूचाही उल्लेख येतो. याचा अर्थ रक्ताचा समावेश रसधातूत होत नाही. रसधातूत कफदोष निर्माण होतात.

रसधातूपासून रक्तधातू बनतो. रक्तधातू शरीरात ऊर्जा इकडून तिकडे नेतो. रक्तधातूपासून पित्तदोष होतो.

मांसधातू म्हणजे शरीरातील स्नायू. रस आणि रक्तधातूपासून मांसधातू बनतो. मांसधातूपासून पित्त आणि कफ दोष होतात.

मेदधातू म्हणजे शरीरातील चरबी. मेदधातू मांसधातूचा भाग असतो. मेदधातू वंगणाचे काम करतो.

मेदधातूपासून अस्थिधातू बनतो. अस्थिधातूपासून वात आणि कफ दोष होतात.

मज्जाधातू अस्थिधातूत बनतो इंग्रजीत त्याला बोन मॅरो म्हणतात. हाच धातू मेंदू आणि मज्जारज्जूत असतो.

शुक्रधातू (Reproductive fluid or Semen), हा धातू मज्जा धातू बोन मॅरोपासून बनतो. सात धातूंचे सार या धातूत असते.

या विषयावर बनारस हिंदू युनिवर्सिटीत आयुर्वेदातील शरीरविज्ञान शिकविणारे प्राध्यापक, किशोर पटवर्धन काय लिहितात ते पाहू.

I take two examples to illustrate the difference between two systems.

The problem of shukra (semen)

Though testicles have been identified as the roots of the channels that carry shukra, Ayurveda proposes the formation of the same in majja (bone marrow), for whatever reason. Ancient scholars also felt that shukra existed in the entire body.

Formation of blood

This is another example which shows that the ancient scholars did not know in which organ blood was formed, because they did not know what blood cells were. Their observations were limited by the tools and other means to which they had access. They thought that the liver and spleen were the organs that imparted the red colour to blood.

Now I realise that simply because the verses are amenable to interpretation, it is not in the true scientific spirit to superimpose modern science over classical references.

The fact is that many of these topics are no longer relevant, and need not be in the curriculum in the first place. Why should obsolete physiology be taught to our students at all? If I argue that most of the theories and concepts of Ayurveda physiology are irrelevant, why should I be part of the system? How can I even say that the subject which I was appointed to teach is mostly obsolete?

Confessions of an Ayurvedaa Professor हा निबंध इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स या मासिकात पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. नंतर हा निबंध Science, The Wire या प्रकाशनांनी प्रकाशित केला.

वैद्य विजया लेले यांनी प्रकृतीचे अंतरंग, भाग २ हे पुस्तक लिहिले आहे. (आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, १९९१) या पुस्तकात प्रत्येक धातू प्रधान झाला तर कसे व्यक्तित्व असते याविषयी लिहिले आहे.

 • रसधातूप्रधान व्यक्ती – स्निग्ध त्वचा, सुखी व्यक्ति, चांगली रोग प्रतिकार शक्ति, समतोल बुद्धी,
 • रक्तधातूप्रधान व्यक्ती – बुद्धीच्या कामाची आवड, शारीरिक कामे नकोत, अभिमानी, धनसंपत्ती उपभोगायला मिळते, नीट नेटके राहणे.
 • मांसधातूप्रधान व्यक्ती – सुदृढ शरीर, मोठे डोळे, निरोगी, दीर्घायुषी, व्यायामाची आवड, धीट, दयाळू, हव्यास नाही.
 • मेदधातूप्रधान व्यक्ती – मोठ्या शरीराची, शारीरिक श्रम नकोत, सुखोपभोग आस्थेने घेतात.
 • अस्थिधातूप्रधान व्यक्ती – उत्साही, हाडे, दात, मजबूत, क्लेश सहन करतात, चिकाटी, भरपूर आहार.
 • मज्जाधातूप्रधान व्यक्ती – मृदू आवाज, मोठे सांधे, प्रेमळ, विज्ञानाची आवड.
 • शुक्रधातूप्रधान व्यक्ती – प्रसन्न, कामुक नजर, सुडौल बांधा, पुष्ट नितंब, ऐटबाज कपडे, अत्तराची आवड, विषयोपभोगाची आवड.

अति वाढलेला मेद म्हणजे कोलेस्टेरोल. कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण –

 • वय २० ते २९ – १४४ – २७५ मिलीग्रॅम
 • वय ३० ते ३९ – १६५ – २९५ मिलीग्रॅम
 • वय ४० ते ४९ – १७० – ३१५ मिलीग्रॅम
 • वय ५० च्या पुढे – १७७ – ३५० मिलीग्रॅम

ही आकडेवारी किती अयोग्य आहे याचा विचार करू. शरीरातील कोलेस्टेरॉलचे असे मिलिग्राममध्ये मोजमाप शक्य नाही. कोलेस्टेरॉल रक्तात असते, रक्तवाहिन्यांत असते, पेशींत असते, यकृतात असते – आपण आता कोलेस्टेरॉल मोजतो, ते रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजले जाते. त्यानुसार व्यक्तीला हृदयविकाराचा अथवा पक्षाघाताचा किती धोका आहे याचा अंदाज बांधला जातो. परंतु शरीरात किती कोलेस्टेरॉल आहे हे ग्रॅममध्ये मोजण्याचे साधन आज उपलब्ध नाही. याशिवाय वाढत्या वयाबरोबर कोलेस्टेरॉल वाढत जाते याला काही प्रमाण नाही. कोलेस्टेरॉल आपला आहार आणि (शरीराचा) व्यायाम यावर अवलंबून असते.

अग्नी कल्पना

ही आयुर्वेदातील मध्यवर्ती कल्पना आहे. शरीरातील अग्नीपित्त या माध्यमातून प्रगट होतो. साधक पित्त, पाचक पित्त, राजक पित्त आणि भ्रजक पित्त असे पित्ताचे प्रकार असतात जे शरीरातील निरनिराळ्या क्रिया घडवून आणतात.

खालील माहिती Physiological aspects of Agni, Akash Kumar Agrawal, C. R. Yadav, and M. S. Meena, Ayu. 2010 Jul-Sep; 31(3): 395–398 या लेखातून घेतली आहे.

आयुर्वेदात अग्नी हा शब्द अन्नाचे पचन आणि पचनातून बनलेले शरीरोपयोगी पदार्थ यासाठी वापरला जातो. अग्नीमुळे शरीराला ऊर्जा मिळते. काही तज्ज्ञ अग्नी आणि पित्त समानार्थी समजतात; तर काही तज्ज्ञांच्या मते पित्त आणि अग्नी निरनिराळे आहेत. अग्नीचे तेरा प्रकार आहेत.

जठराग्नी पोटात असतो. चार प्रकारचे जठराग्नी असतात. समाग्नीपचन क्रिया व्यवस्थित करून धातूंना ऊर्जा देते. ज्या व्यक्तीत समाग्नी असतो त्या व्यक्ती सुदृढ असतात. विषमाग्नी असलेल्या व्यक्ती वात दोषाने पीडित असतात. तीक्ष्णाग्नी असलेल्या व्यक्तींत पचन भरभर होते त्यामुळे अशा व्यक्तींना सतत भूक लागते. याला भस्मक रोग असे म्हणतात. मंदाग्नी असलेल्या व्यक्तींत पचन सावकाश होते. अशा व्यक्ती कमी खातात.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या मूलतत्त्वांतील अग्नीला भूताग्नी म्हणतात.

सात धातूंतील अग्नीला धत्वाग्नी म्हणतात – रसाग्नी, रक्ताग्नी, मांसाग्नी, मेदाग्नी, अस्थ्याग्नी, मज्जाग्नी, शुक्राग्नी.

समालोचन

ॲलोपथीच्या आधी युरोपात वापरात असलेले वैद्यक, आयुर्वेद आणि युनानी तीन प्रणालींत एक समान गोष्ट म्हणजे प्रयोगांचा पूर्ण अभाव. अमक्या धातूत अमका दोष होतो एवढे विधान करून पुरेसे होत नाही. काय प्रयोग करून हे विधान सिद्ध होईल हेही सांगावे लागते. प्रयोगाचा अभाव हा प्रश्न येणाऱ्या भागातून वारंवार येत राहील.

धातू

रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे एकातून एक बनतात अशी समज आहे. म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस आणि मेद, मांस आणि मेदापासून अस्थी, अस्थिच्या पोकळीतून मज्जा आणि मज्जेतून शुक्र बनतात. हे कसे सिद्ध होते? मांसापासून हाडे बनतात हे कोणत्या प्रयोगाने पाहता येते?

मानवी शरीरातल्या निरनिराळ्या पेशींत ५५ ते ६० टक्के द्रव पदार्थ असतो. याशिवाय पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणावर द्रव असतो. उरलेला द्रव - intercellular space – वेगवेगळ्या पेशींमधल्या जागेत असतो. अर्थातच या सर्व द्रवांचे रासायनिक स्वरूप अगदी निराळे असते. त्या सर्वांना एक रस असे संबोधणे अयोग्य आहे. अस्थिच्या पोकळीत बोन मॅरो असतो. तेथे तांबड्या रक्तपेशी बनतात. हा धातू मेंदू आणि मज्जातंतूत असतो असे म्हणणे चुकीचे आहे. मेद वंगणाचे काम करतो याला काही अर्थ नाही. मेदाचे शरीराला घातक आणि उपयोगी असे दोन्ही परिणाम असतात.

रसधातूत पित्तदोष होतो म्हणजे काय होते? रसाचे रासायनिक स्वरूप कसे बदलते? हे सर्व कोणत्या प्रकारच्या प्रयोगाने पहाता येते?

धातू आणि व्यक्तित्व याचा संबंध जोडला आहे. पुढच्या भागात आपण पाहू की त्रिदोष आणि व्यक्तित्व याचा संबंध जोडला आहे. आयुर्वेदात व्यक्ती पाहून औषध देणे ही कल्पना असल्याने व्यक्तित्व कसे ठरवायचे हा महत्त्वाचा भाग होऊन बसला. त्यामुळे एखाद वेळेस प्रत्येक मूलतत्त्वाचा व्यक्तित्वाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला असावा. ॲलोपथीत औषध देताना व्यक्तित्वाचा फारसा विचार केला जात नाही. व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर आयुर्वेदातही औषध देताना व्यक्तित्वाचा विचार होत नाही, या विषयी पुढल्या भागातून विवेचन येईलच.

अग्नी – आपण जे अन्न खातो त्याचे पचन झाल्यावर शरीराला पोषक द्रव्ये आणि ऊर्जा मिळते. अग्नीकल्पनेचा हा सिद्धान्त समजण्यासारखा आहे. पण पंचमहाभूतांमधल्या अग्नीशी या अग्नीचा नक्की काय संबंध?. ओढूनताणून भूताग्नीशी जठराग्नीचा संबंध जोडला जातो. एखाद्या विधानाचा असा ओढूनताणून अर्थ लावायला लागतो ही गोष्ट चुकीची आहे.

आम – आपण जे अन्न खातो त्याचे पचन होऊन शरीराला आ‌वश्यक असे घटक बनविले जातात. आवश्यकता नसलेले पदार्थ शरीराच्या बाहेर ढकलले जातात. या सर्व प्रक्रियेत कुठे, काही बिघाड झाला तर शरीरात टॉक्सिन्स साठू लागतात ज्यातून आजार सुरू होतात. आम शरीरातून बाहेर काढण्यासाठी लंघन किंवा पंचकर्म सांगितले जाते.

या विषयावर आपण एक विधान पाहू – 'शरीराला जडणाऱ्या व्याधी शरीरातील विषारी पदार्थांमुळे होतात. ते पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले की आरोग्य सुधारते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे मार्ग म्हणजे वांत्या आणि जुलाब.' हे विधान आम आणि पंचकर्माविषयी बोलत आहे, खरे ना?

हे विधान मध्ययुगीन पाश्चात्य वैद्यकाविषयी सांगत आहे. (फॉरेन्सिक विज्ञानातील घटना, पंकज कालूवाला, परम मित्र पब्लिकेशन, २०१४) त्या काळात युरोपमध्ये आणि भारतात वैद्यकाच्या कल्पना सारख्याच होत्या.

(क्रमशः)

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक

field_vote: 
0
No votes yet

बरेचसे मुद्दे पटले. सहसा पाश्चात्य प्रयोग वा आकडेवारीची वा एक एक भाग सुट्टा करून विश्लेषण करण्याची पध्दती म्हणजेच आधुनिक विज्ञानाची कसोटी लावून आयुर्वेदाचे मूल्यमापन करू नये असे आयुर्वेद वैद्यांचे मत असते. त्याचा प्रतिवाद कसा करणार हा प्रश्न पडतो.
नुकतेच एका वैद्यांचे भाषण ऐकले. त्यात फ़ऴे व दूध एकत्र खाऊ नये असे सांगितले होते. त्यासाठी अर्थातच अनेक प्राचीन श्लोकांचा आधार घेतला होता. पण त्यामुळे शरिरात नक्की कोणती द्रव्ये स्त्रवतात किंवा कोणत्या अभिक्रिया होतात, त्याचा वेगवेगळ्या इंद्रियांवर कसा परिणाम होतों, इ. माहिती देण्यात आली नाही. बरेचसे हे करा व ते करू नका प्रकारचे ज्ञान (?) वाटण्यात आले. कदाचित भाषण वैद्यांसाठी नसून सर्वसामान्य लोकांसाठी असल्याने असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0