माझं सोशल मीडियाशी लव्ह-हेट रिलेशनशिप आहे.
शी! ही किती भिकार सुरुवात आहे. पण मग काय म्हणावं? समाजमाध्यमं मला एकाच वेळी आकर्षितही करतात आणि त्यांचा मला वीटही येतो. इथे ‘simultaneously’साठी वापरण्यात येणारा फेसबुकीय लेखकांचा आवडता मराठी शब्द मला लिहायचा होता. पण तो मला कधीच आठवत नाही. माझ्या आयुष्यात काही व्यक्ती आहेत ज्या सोशल मीडियावर नाहीत. किंवा असूनही त्यांना तिथं जाऊन काही लिहावं-वाचावं वाटत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या दिनचर्येबद्दल प्रश्न विचारायला मला फार आवडतं. पण 'तू सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय करतेस?’ हा प्रश्न विचारला, की लोक माझ्या असण्यात थोडी वेडाची झाक आहे का असं निरखून बघायला लागतात.
मला सोशल मीडिया वापरायची सवय कशानं लागली याबद्दल मी लिहिणार नाही. कारण मग मला 'आमची पिढी', 'आंतरजालाची बाल्यावस्था', 'मिलेनियल' अशा संकल्पना वापराव्या लागतील आणि वाचकांना आलाच असेल, पण मलाही त्या सगळ्याचा भयानक कंटाळा आला आहे. माझी आत्ताची स्थिती अशी आहे, की मला हे हवंही आहे आणि नकोही. मी आजच्या काळातली एक स्वतंत्र स्त्री आहे. मला हवं असेल, तर मी ९ ते ५ असा सतत आठ तास सोशल मीडिया वापरू शकते. सकाळी दोनेक तास व्हात्साप्प ग्रुपांमध्ये गप्पा मारायच्या, मग दोन-तीन तास फेसबुकवर राजकीय, किंवा स्त्री-पुरुष विषयांवर भांडायचं. मग दुपारनंतर इंस्टाग्रामवर सारा अली खान, अनन्या पांडे; आणि माझी समवयस्क आहे, मला विशेष आवडते म्हणून करीना कपूर यांच्या व्यायामलीला बघून हळहळायचं. आणि रात्री आपण आज काहीच 'प्रॉडक्टिव्ह' केलं नाही याचं दुःख वाटून घेऊन झोपी जायचं. किंवा न वापरायची निवड केल्यावर, दिवसभर तो न वापरण्यासाठी मानसिक यातायात करायची!
आमच्या ओळखीत एक काका होते. त्यांना गुटखा खायचं व्यसन लागलं होतं. त्यांच्या आजूबाजूचे सगळे त्यांना खूप लेक्चरं द्यायचे. त्यांच्या बायकोला त्यांच्या गुटखा खाण्याचा विशेष त्रास व्हायचा कारण ती कॉलेजमध्ये शिकवायची (या दोन गोष्टींचा एकमेकींशी काय संबंध आहे हे मला अजूनही उमगलेलं नाही). काका मुळात अतिशय कुटुंबवत्सल आणि प्रेमळ होते. त्यांनाही लोक सांगायचे ते पटायचं आणि मुख्य म्हणजे ते कुणाहीकडून लेक्चर ऐकून घ्यायचे आणि त्यांना 'हो बरोबर आहे तुमचं’ असं अगदी मनापासून सांगायचे. मग त्यांनी असं ठरवलं, की आता गुटखा विकतच घ्यायचा नाही. दोन दिवस असे गेल्यावर त्यांना चहाच्या टपरीसमोरच्या पानाच्या टपरीवर गुटख्याच्या पाकिटांची ती चकचकीत पताका दिसली. मग त्यांनी मोहाला बळी पडून दहा पाकिटं घेतली. त्यातलं एक त्यांनी तिथेच खाल्लं. दोन दिवसांच्या विरहानंतर मिळालेल्या गुटख्यामुळे काकांची एकदम ब्रह्मानंदी टाळी लागली. पण उरलेली नऊ पाकिटं घरी कुठे ठेवायची असा त्यांनी विचार केला. त्यांनी एक शिडी घेतली आणि बाथरूमवरच्या माळ्यावर सिंटेक्सच्या टाकीशेजारी काठीनं सरकवून आतल्या बाजूला ती पाकिटं लोटली. शिडीवरून खाली उतरले. काठी जागच्या जागी ठेवली. माळ्यावरच्या धुळीमुळे शर्ट मळला होता तो झटकला.
दोन तासांनी त्यांनी पुन्हा शिडी माळ्याखाली लावली. काठी घेऊन वर चढले, काठीच्या आधारानं पाकिटं पुढे ओढून घेतली. त्यातलं एक घेतलं. बाकीची पाकिटं पुन्हा होती तशी पण यावेळी थोडी पुढच्या बाजूला लोटली. शिडीवरून खाली उतरले. काठी जागच्या जागी ठेवली. माळ्यावरच्या धुळीमुळे शर्ट मळला होता तो झटकला.
दोन तासांनी त्यांनी पुन्हा शिडी माळ्याखाली लावली. काठी घेऊन वर चढले, काठीच्या आधारानं पाकिटं पुढे ओढून घेतली; आणि यावेळी त्यांतली दोन घेतली. बाकीची पाकिटं पुन्हा होती तशी पण यावेळी हाताला लागतील अशी ठेवली. शिडीवरून खाली उतरले. काठी जागच्या जागी ठेवली. माळ्यावरच्या धुळीमुळे शर्ट मळला होता तो झटकला.
नंतर तीन तासांनी ते काठीशिवाय शिडीवर चढले. यावेळी शर्ट झटकावा लागला नाही कारण आता माळाच स्वच्छ झाला होता. यावेळी मात्र त्यांनी उरलीसुरली सगळीच पाकिटं खाली आणली. ही सगळी कथा त्यांनीच आम्हांला सांगितली. आणि म्हणाले, "उगाच गुटख्यापायी गुडघे खराब नकोत व्हायला!"
हा किस्सा आठवायचं कारण म्हणजे माझ्या फोनला एक फोकस मोड आहे. ते बटण दाबलं, की आपलं चित्त विचलित करणारी सगळी ॲपं बंद होतात. मी ते बटण दाबून ठरवायचे, की आता आपण दोन तास फोन बघायचा नाही. पण मध्येच पटकन काही नवीन घडलं आहे का अशी उत्सुकता वाटून ते बटण पुन्हा दाबून माझी ॲपं मुक्त केली जायची. असं सतत चार वेळा झालं, की 'काय छळ आहे साला!' म्हणून पुढचा पाऊण तास फेसबुकवर उंडारण्यात जायचा. मग मला त्या गुटखा-काकांसारखं वाटायचं.
तरीही, स्वतःला मोकाट सोडून देण्यापेक्षा हे बरं असं वाटून मी तो आत्मछळ चालू ठेवला होता. मध्येच माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न यायचे. उदाहरणार्थ : आपण आजवर दिवसातून काही वेळा आपसूक सोशल मीडिया बघायचो. तसं करणं आपल्या जीवनशैलीचा भाग होता. मग आता आपण तसं न करता, वाचलेल्या वेळात नेमके काय आणि कसे दिवे लावणार आहोत? यावर उत्तरं खूपच होती आणि ती एकदम उफाळून यायची. स्वतःचं आणि मुलाचं वाचन, त्याचा अभ्यास (फोन सोडून त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागल्यावर काहीच दिवसांत त्यानं मला त्या पदावरून राजीनामा द्यायला लावला), आपले शेजारी कोण आहेत? (हा प्रकल्पही फारसा उत्साहवर्धक नव्हता) मैत्रिणींना फोन करून गप्पा मारणे इत्यादी, इत्यादी. आंतरजाल आपल्यात आणि माणसांत येण्याआधी आपण जे जे करायचो ते सगळं.
पण मग का जायचं असं मागे? काय गरज आहे?
याला मात्र काही स्पष्ट उत्तर नव्हतं. पण याला वैयक्तिक म्हणता येईल असं कारण म्हणजे मला सतत जीवघेणा नॉस्टॅलजिया होत असतो. परवा आंतरजालावर कुठेतरी एका रोटरी फोनच्या फोटोखाली ’जेव्हा फोन वायरनं बांधलेले असायचे तेव्हा माणसं मुक्त होती’ असं दवणीय वाक्य लिहून कुणीतरी मीम केलं होतं. ते वाचून मी एखाद्या भाबड्या मध्यमवर्गीय काकूसारखी, "अगदी अगदी. खरं आहे!" अशी स्वतःशीच मान डोलावली. त्या एका क्षणात, मला स्वतःची लाज आणि काळजी दोन्ही वाटून गेल्या.
कुठल्याही सुपरमार्केटमध्ये 'नूडल्स आणि पास्ता' सेक्शनमध्ये हल्ली मॅगी सोडून अनेक ब्रँड आलेले दिसतात. ते बघून मला लगेच माझ्या बालपणीचा मुक्त बाजारपेठेआधीचा भारत आठवतो. भारतीय लायसन राज मान्य करून, नेस्ले इंडिया म्हणून स्थापन झालेली नेस्ले, आणि पार्लेची शीतपेयं (गोल्डस्पॉट, लिमका, थम्सअप, मँगोला), नूडल्समध्ये फक्त मॅगी आणि बिस्का, चपला-बुटांमध्ये बाटा, वाहनांमध्ये कायनेटिक - बजाज - लुना - अँबॅसिडर - फियाट - मारुती ८०० (मारुती असं नाव असलेली गाडी नव-श्रीमंतांची इतकी लाडकी होती यावर आता विश्वास बसत नाही!) असे सगळे एकदम मर्यादित पर्याय असायचे त्यामुळे मी आणि माझ्या आजूबाजूचे प्रौढ लोक जास्त आनंदी होतो असं माझं अगदीच ठाम मत आहे. तेव्हा दुपारी शाळेतून घरी आल्यावर कंटाळा आला - आणि मुख्य म्हणजे तेव्हा रोज निदान एकदातरी कंटाळा येत असे - आणि टीव्ही लावला तर त्यावर कूऽ असा आवाज आणि रंगीबेरंगी पट्ट्या असायच्या. मग नाईलाजानं बाहेर खेळायला जावं लागायचं किंवा मग पुस्तक वाचावं लागायचं. तेव्हा यायचा तसा कंटाळाही हल्ली येत नाही.
पण माझ्या स्मरणरंजनाला जगाच्या लेखी काय किंमत आहे? आणि असं स्मरणरंजन करून मला हवे ते दिवस पुन्हा माझ्या आयुष्यात येणार आहेत का? किंबहुना या सगळ्या लेखनालाच कुणाच्या लेखी का किंमत असावी? माझा सोशल मीडियाचा वापर कमी झाला तर त्याचा इतरांना काय फायदा? कारण एखाद्याचं विषारी ट्रोलिंग करावं इतकं उपद्रवमूल्यही माझ्याकडे नाही (हे सगळे प्रश्न rhetorical आहेत. कृपया त्यांची उत्तरं देऊ नयेत).
आपल्या समरणरंजनाला आपणही किंमत द्यायची नाही असं ठरवल्यावर माझ्या असं लक्षात आलं, की खरं तर हा सगळा ताण निवड-स्वातंत्र्याचा आहे. जर भारतात फेसबुक, व्हात्साप्प, इंस्टाग्रामवर बंदी असती आणि या गोष्टी वाममार्गानं वापराव्या लागत असत्या, तर त्या मी नक्कीच बेछूटपणे वापरल्या असत्या. त्यांतून येणाऱ्या लाइक्सचा माझ्या डोपामिन-रिसेप्टरांवर परिणाम होतो; कालांतरानं तितकंच डोपामिन तयार करायला मला जास्त वेळ फेसबुक वापरावं लागतं; आणि या सगळ्याचं रूपांतर उत्तरोत्तर आनंदात न होता खिन्नतेत होत जातं - हा असा सगळा विचार मी अजिबात केला नसता. पण आता माझ्याकडे वापर करण्याचा किंवा न करण्याचा - असे दोन्ही पर्याय असल्यामुळे - काय म्हणतात त्याला - मला 'डिझीनेस ऑफ फ्रीडम' झाला आहे (बिचारा किर्कगार्ड*! एक मराठी काकू स्मार्टफोनपासून लांब राहायचा प्रयत्न करण्यासाठी त्याचा असा वापर करेल याची त्यानं कल्पनाही केली नसेल). पण इन माय डिफेन्स, निवड करायचं स्वातंत्र्य असल्यानं येणाऱ्या व्याकुळतेचा सामना मी धोक्याच्या सोळाव्या वर्षापासून सतत करते आहे. ही अशी व्याकुळता वरचेवर जाणवते हा जिवंत अनुभव मी किर्कगार्डबद्दल वाचायच्या आधीच घेतला होता. पण अशी व्याकुळता इतरही अनुभवतात हे समजल्यानं, आपण एकटे नसल्याचा दिलासादायी भास निर्माण होतो.
इथवर आल्यावर साहजिकच पुढचा प्रश्न असा उद्भवला, की आपलं फोन वापरायचं स्वातंत्र्य कुणी काढून घेऊ शकेल का?
हा प्रश्न वरवर विनोदी वाटला, तरी असं करणारे काही लोक मला माहिती आहेत. माझ्या ओळखीतल्या काही लोकांनी त्यांचे फेसबुक पासवर्ड त्यांच्या मित्र-मैत्रिणींना तयार करायला लावले. तसे त्यांनी केल्यावर, ठरावीक महिन्यानंतर मित्र/मैत्रीण त्यांना तो पासवर्ड सांगेल असा तह त्यांनी केला. यातल्या काही लोकांनी असं केल्यामुळे, 'आपला पासवर्ड परस्पर बदलला जाऊन आपल्याच खात्यातून आपण तडीपार होऊ शकतो' या भावनेचा आधार वाटल्याची कबुली दिली. पण मग मी असं केलं, तर 'काहीच दिवसांत मी फेसबुकचा पासवर्ड रिसेट करणार नाही कशावरून?' असा प्रश्न मला पडला. आणि मुळात मला तीन महिने सलग किंवा एक वर्षं सलग अशा प्रकारे हे करायचं नव्हतं. मला फक्त माझ्या मनाला फोनचा वापर कमी करूनही आनंदी राहायची शिकवण द्यायची होती. किंवा सोशल मीडियाव्यतिरिक्त मला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आनंद मला कुठल्याही व्यत्ययाविना घ्यायचा होता.आणि सततच्या वापरानं खरंतर आनंदी वाटत नाही हेही सिद्ध करून दाखवायचं होतं (आता इथे सिद्ध करणारी मी कोण आणि सिद्धता तपासणारी मी कोण? असा एक उपप्रश्न उगवू शकतो. पण तो तूर्तास बाजूला ठेवू).
अशा वेळी आईची खूप आठवण येते. म्हणजे माझी आई अजून धडधाकट आहे. पण समजा मी उद्या 'मला फोन वापरू देऊ नकोस' असं तिला सांगितलं, तर ती अर्थातच अत्यानंदानं ती जबाबदारी स्वीकारेल. लहानपणी मला शक्य तितक्या प्रलोभनांना बळी पडू दिल्यानं मी अशी निपजले असा तिचाही ठाम गैरसमज आहे. जरी निवड-स्वातंत्र्याचा ताण येत असला, तरी कुठल्या मॅटरमध्ये आईला एंट्री देऊ नये आणि कुठल्या मॅटरमध्ये द्यावी इतकी अक्कल मला नक्कीच आली आहे. पण अशी व्याकुळता जाणवू लागली, की आईची आठवण येते हेही तितकंच खरं आहे. इथे लगेच पुढचा प्रश्न असा पडला, की माझ्याबरोबर रोज एकाच घरात राहणाऱ्या नवऱ्याची आठवण का येत नाही? यावर मला सुचलेलं उत्तर असं, की कदाचित माझी जोडीदाराची निवड पुरेशी फ्रॉइडियन नसावी. आणि एखाद्या पुरुषाच्या हाती (तोही लग्नाचा नवरा!) माझं निर्णय स्वातंत्र्य सोपवण्यापेक्षा ते आईकडे सोपवलेलं मला अधिक सोयीचं वाटतं.
पण माणसानं मुक्त, स्वच्छंद, सतत वापर करावा म्हणून काही ॲपं झटत असतात, तशीच त्याला या स्वातंत्र्याचाही वीट येऊ शकतो हे हेरून, स्वेच्छेनं स्वातंत्र्यावर अंकुश बसवून देणारी ॲपंही बाजारात आहेत. फेसबुकसारख्या माध्यमांवर वापरकर्त्यांना विचार मांडायचं स्वातंत्र्य आहे असा भास निर्माण करून त्यांचा डेटा विकला जातो. इथे तर माझं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य माझ्याच परवानगीनं काढून घेऊन माझा डेटा विकला जाणार होता! तरीही मी ते फोनवर बसवलं. तंत्रज्ञानानं मला अगतिकतेच्या टोकावर आणून उभं केलं आहे आणि आता एकतर आपल्या मनाचा ताबा परत मिळवून मागे फिरायचं आहे किंवा या कड्यावरून स्वतःला निरर्थकतेच्या आणि कोलाहलाच्या खाईत लोटून द्यायचं आहे - असे दोन पर्याय माझ्या समोर असताना, मी मागे फिरण्याचा पर्याय निवडत होते (असं मला तेव्हा वाटत होतं).
त्या ॲपला परवानगी दिली, की ते आपल्या फोनचा पूर्ण ताबा घेतं. फक्त फोन करायची आणि तो वाजला, तर उचलायची मुभा असते. असं करत असताना त्यावर असलेलं पॉझ बटण आपण लपवू शकतो. मी अर्थातच तो पर्याय निवडते. मग सांगितलेल्या वेळेपर्यंत आपल्याला फोनवर काहीही उघडता येत नाही. उघडायला गेलं तर 'डोन्ट वेस्ट युअर टाइम ऑन एनिथिंग दॅट डझन्ट काँट्रीब्युट टू युअर ग्रोथ' असा संदेश फोनच्या स्क्रीनवर झळकतो. आपण जितक्या वेळा असं करून यशस्वी होऊ तितक्या वेळा आपल्याला शाबासकी मिळते. मार्कं मिळतात. आठवड्याच्या शेवटी आपण दर दिवशी किती वेळ फोनवर घालवला याचे तक्ते येतात. आलेख येतात. शाबासकीयुक्त संदेश येतात. चार आठवडे झाले, दोन महिने झाले - माझं त्या ॲपवरचं प्रगतीपुस्तक उत्तरोत्तर चमकू लागलं. एक दिवस तर मी सलग चोवीस तास फोन उघडला नाही. त्यातले फक्त चारच तास मी तो सक्तीनं बंद ठेवला होता. त्या दिवशी त्या ॲपनं मला एक मेडल दिलं!
मग मला छंदच जडला. कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा! आज, कालच्या तुलनेत वीस टक्के कमी - सोशल मीडिया कमी कमी वापरत जाण्याचा. मी फेसबुक, व्हात्साप्प, इन्स्टावर नसायचे तेव्हा मला एकदम 'शुद्ध' वाटायचं. सतत या तीन जागांपैकी कुठेनाकुठे घसरून पडायच्या सवयीवर आपण विजय मिळवला आहे. आणि या काटछाटीतून मला सोशल मीडियासाठी जो वेळ मिळायचा तो मी इतर लोक किती पोस्ट करतात आणि कुठे कुठे कमेंट करतात ते मोजण्यात घालवू लागले. आजवर, माझं शील इतर कुणापेक्षा अधिक शुद्ध/श्रेष्ठ आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण तसं वाटून घेण्यासाठी करतात ते कुठलंच वर्तन मला जमलं नव्हतं. माझ्यावर तसे संस्कार करायची तसदीही कुणी घेतली नव्हती. ना मी भारतातली शाकाहारी, ना मी पाश्चातत्त्य व्हीगन, ना मी निर्व्यसनी, ना मी उच्चविद्याविभूषित, ना माझा एखाद्या पुरातन भाषेचा अभ्यास, ना मी धार्मिक, ना मी नीट परंपरावादी, ना मी धड आधुनिक, ना मी ट्रायअथलॉन/हाफ-फुल मॅरेथॉनपटू, ना माझा कशाचा दांडगा व्यासंग (त्यात मी मूळची इंजिनियर!), ना मी आदर्श माता आणि/किंवा गृहिणी; मी खरंतर कुणीच नव्हते.
पण सोशल मीडियापासून सुटका करून घेतल्यामुळे मला आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत असं वाटायला लागलं होतं. कदाचित मी इतर प्रवाहपतित लोकांना मार्ग दाखवू शकेन या हेतूनं मी मग एक लेख लिहायला घेतला. त्या लेखात सोशल मीडिया न वापरल्यानं माझ्या मनःस्थितीत कसा कसा फरक पडला याचं सविस्तर वर्णन मी करणार होते. पण तो लिहायला घेतल्यावर मला तसे काही सकारात्मक बदल आठवेनात कारण मी त्या आधीचे बरेच आठवडे फक्त जीव खाऊन त्या स्वातंत्र्य काढून घेणाऱ्या अंकुश-ॲपची शाबासकी मिळवण्यात गुंगून गेले होते. पण आपण हे ॲप वापरत होतो हे जगाला माहिती असायची काहीच गरज नाही, असा विचार करून मी माझ्या मनावर त्या ॲपची मायावी पकड नसती तर कशी कशी सुधारले असते त्याची कल्पना करून, ती सत्यघटना म्हणून लिहून काढली. लेख छानच झाला होता. तो मी फेसबुकवर टाकणारच होते इतक्यात 'माणसामाणसांत आंतरजाल नसताना ती काय करीत असत' या प्रयोगातून जोडल्या गेलेल्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिनं मला माझ्याचसारख्या एका सोशल मीडियातून संन्यास घेतलेल्या माणसाचा किस्सा सांगितला. त्यानं नुसताच सोशल मीडिया सोडला नव्हता; तो पुष्करमध्ये एका विपश्यना केंद्रातही जाऊन राहिला होता. नंतर त्यानं राजस्थानात जाऊन एका मिरच्या कुटायच्या फॅक्टरीत मजुरीही केली होती. आणि मग सोशल मीडियावर परत येऊन एक मोठा लेख लिहिला होता. हे सगळं ऐकून मला अगदी प्रसन्न वाटू लागलं होतं तेवढ्यात मैत्रीण म्हणाली, "मला ती पोस्ट वाचून असं वाटलं, की केलास ना मेल्या डीटॉक्स? मग आता पुन्हा इथेच येऊन आम्हाला का पकवतो आहेस तुझ्या आत्मसंतुष्टीच्या निरर्थक कथा सांगून?”
फोन झाल्यावर मी चुपचाप माझा लेख कचऱ्यात सारला आणि अंकुश-ॲप अनइन्स्टॉल केलं.
-------
*या डेनिश तत्त्वज्ञाच्या नावाचा उच्चार 'किअकिगौ'च्या जवळ जाणारा आहे हे मला माहीत आहे. पण मी लोकांना pretentious, अतिशहाणी वाटू नये म्हणून मी तो तसा लिहिला आहे. मग पुढचा प्रश्न असा उद्भवतो की ही तळटीप तरी कशाला? ती, अतिशहाण्यांना मी मूर्ख आहे असं वाटू नये म्हणून.