Skip to main content

सदाफुली वरचे पाहुणे

सदाफुलीचं एक रोप बाल्कनी समोर आपोआप रुजलं आणि आपोआप वाढलं काही पाणी वगैरे तसं त्यानं मागितलं नाही आणि आम्हीही फारसं काही लक्ष दिलं नाही. सदाफुली तशी विदेशी त्यामुळं मला आपलं वाटायचं की या फुलांवर काही येणार नाही. पण जशी फुलं आली तशी हळूहळू गर्दी व्हायला लागली. पहिल्यांदा मावा (अफिड) नी रस शोषून घ्यायला सुरुवात केली आणि मी म्हटलं झालं गेलं आता रोप. पण मग वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्यादेखील दिसायला लागल्या. या मुंग्यांचं आणि या मावा कीटकांचे वेगळे नाते असते. हे किडे एक प्रकारचं गोड मिश्रण मधुरस (honeydew) स्वतःच्या शरीरातून स्त्रवतात आणि मुंग्यांना ते खूप आवडतं या बदल्यात मुंग्या त्यांचं रक्षण करतात.
तर हे चालू असताना आणखी एक गोष्ट सुरू झाली ती म्हणजे एक प्रकारचे काळया रंगाचे वॉस्प (एक प्रकारच्या गांधीलमाशा) यायला सुरुवात झाली आता हे नेमके कोणते वास्प हे काही मला माहित नव्हतं. बर हे काही आकाराने ही फार मोठे नाहीत अगदी मुंग्यांएवढेच, लक्ष ठेवायला थोडे अवघडच.
पण मग निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की हे वॉस्प तर मावा कीटकांना ना उचलून नेत होते. म्हणजे हे बहुधा मावा किड्यांना भक्ष्य बनवणारे वॉस्प असावेत. मग त्यानंतर थोडा अभ्यास केला आणि कळलं की हे क्राब्रोनिडी गणातील पेमफ्रेडोन कुलातील वॉस्प (Pemphredon, family Crabronidae)असावेत. ह्या वॉस्पची मादी झाडाच्या फांद्या किंवा खोड किंवा तत्सम ठिकाणी एखाद्या छिद्रात घर करते आणि या मावा किड्यांना दंश करून त्यांना अधू करून या घरात नेऊन ठेवते अन त्यावर स्वतःची अंडी घालते. म्हणजे या अंड्यांमधून जेव्हा तिची पिल्लं बाहेर पडतील त्यांच्यासाठी अन्न आधीच तयार असेल. हे म्हणजे माणसांसारखे झालं, भविष्याची तरतुद आत्ताच करून ठेवायची.
यामुळं एक मात्र झालं की अफिड ची संख्या नियंत्रणात राहिली आणि रोपटे मात्र जगले.
बर हे सगळं नाट्य एकाबाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं, कोळी आणि माशा सुद्धा फुलांना भेटी द्यायला लागले. आणि आता जवळजवळ दोन की तीन वर्षे झालीत हे सगळं चक्र अव्याहत सुरू आहे कधी मावा जास्त झाले की वॉस्प जास्त वाढतात आणि मुंग्या वाढल्या की कोळी वगैरे वाढतात. फुलं फुलत राहतात,फुलपाखरं येत राहतात. आजकाल तर शिंजिर सुध्दा येतो या फुलांवर.
निरीक्षण करण्याची आवड वाढवली की अशा अनेक गोष्टी,अशी अनेक चक्र आजूबाजूला दिसू शकतात. तुम्हाला वेळ असला तर फक्त खिडकीतून बाहेर पाहिलं तरी पुरेसे आहे.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

सुधीर Sat, 01/07/2023 - 11:59

सदाफुली आमच्या कुंडीतही आपोआप रुजली. बहुदा विकत आणलेल्या मातीत त्याचे बीज असावे. कुंड्यांवर शिंजिर येतात पण पावसाळ्यात. पावसाळा गेल्यावर ते गायब होतात. छोटी मधमाशी (घरमाशीच्या आकाराइतपत) सदृश कीटकही पाहिलेत.

अशा निरिक्षणाला थोडीफार का होईना गोडी लावाली ती बीबीसी अर्थ या यूट्यूब चॅनलवरच्या डेव्हिड अटेनबरोच्या ३-१० मि. च्या क्लिप्सने. फार मोठ्या नाहीत त्यामुळे फारसावेळ खात नाहीत. अगदी छोट्या छोट्या किड्या-मुंग्यांपासून, परागीकरणापासून ते अगदी हिंस्त्र श्वापदापर्यंतच्या क्लिप्स मधून निसर्गाविषयी बरेच कळते. लक्षात राहिलेल्या या दोन क्लिप्स कदाचित इतर वाचकांना आवडतील.

कीटकांवरची ही खूपच आवडलेली क्लिप.
https://www.youtube.com/watch?v=uppwVyUd5S0

डोळे नसलेल्या या सजीवांबद्धल रिचर्ड डॉकिन्सच्या इव्हॉल्यूशनवरच्या पुस्तकात वाचले होते पण प्रत्यक्षात ती जागा आणि तसले सजीव पाहण्याचा अनुभव  (टिव्हीवर का होईना) थक्क करणारा होता.
https://www.youtube.com/watch?v=NGtzSd3wFY4

हर्षदा Mon, 03/07/2023 - 12:48

In reply to by सुधीर

अटेनबरो च्या डॉक्युमेंटरीज मलाही फार आवडतात वरची क्लिप छानच. सदाफुली तशी फारच चिवट असल्याने कुठेही पटकन रुजते. हो या सदाफुलीवरही अगदी छोट्या मधमाशा येतात त्या स्टिंगलेस बी असाव्यात.

हर्षदा Mon, 03/07/2023 - 12:55

In reply to by अबापट

लिहिले की जरा वाचायला बरे पडते. या अशा विषयांवरचे मोठे लेख रटाळ वाटू शकतात. बाकी प्रतिसादा बद्दल धन्यवाद. निसर्ग, त्यातल्यात्यात किटकसृष्टी हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने नक्कीच अजून असे लेख येतीलच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/07/2023 - 06:14

मलाही गेली ५-६ वर्षं बागकामाची आवड लागली आहे; त्यामुळे वाचताना मजा आली.

मला फुलं लावायची आणखी गोडी लागली कारण फुलांवर फुलपाखरं, भुंगे, कधी हमिंगबर्ड येतात. तिर्री मांजर त्या लोकांचा पाठलाग करते. मजा येते.

बाकी अबापटांना +१. छोटंच लिहिलंत. आणखी लिहा.

गवि Sun, 02/07/2023 - 09:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण फुलांवर फुलपाखरं

याखेरीज पानं हा देखील फुलपाखरे येण्याचा एक मुख्य फॅक्टर असतो हे नोंदवू इच्छितो. त्यांना अंडी घालायला विशिष्ट वनस्पतींची पानेच लागतात. (प्रत्येक जातीची आपापली ठरलेली). त्यांचे सुरवंट बाहेर आले की त्याच झाडाच्या पानांनी त्याचं पोषण होणं आवश्यक असतं. त्या झाडाचे एखादे एलिमेंट त्या सुरवंटात आणि पुढे बनणाऱ्या फुलपाखरात देखील कॅरी होते.

अशोक (सीतेचा अशोक नव्हे, उंच सरळसोट असतो तो) किंवा सीताफळ यावर टेल्ड जे फुलपाखरू येतं.

TJ

बदक वेलीवर (Aristolochia गटातले काही वेल) लाल स्वालोटेल फुलपाखरू येते. अमेरिकेत याच्याशी समांतर असतील.

RST

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/07/2023 - 08:01

In reply to by गवि

आमच्याकडे, टेक्सासात, कृष्णकमळाची वेल जगते. आमच्या शेजारच्या घरात आहे. ती वेल जमिनीत लावली तर मुळं पसरतात आणि जागोजागी कृष्णकमळाचे वेल येतात. मी शेजारच्या आवारात जाऊन दर वसंतात ते नकोसे ठरणारे वेल आणते, आणि कुणाला हवे असतील त्यांना वाटून टाकते. त्या वेलींवर कुठली तरी फुलपाखरं (त्यांच्या अळ्या) जगतात. अळीची फुलपाखरं झाली की पानं पुन्हा उगवतात आणि वेल वाढते.

तसंच एक भूमीसुता झाड येतं, त्याचं नावच आहे बटरफ्लाय वीड. यातही काही पोटजाती, किंवा उपप्रकार आहेत. आमच्या हवेत लाल, पिवळी, केशरी फुलं असणारं झाड पूर्ण उन्हातही टिकतं. त्याच्या फुलापानांवर मोनार्क नावाचं फुलपाखरू पोसलं जातं. ते तणासारखं आवारात फोफावण्याची मी वाट बघत आहे. हे दुसरंच वर्ष आहे.

घरी आता मायर लेमनचं झाड कुंडीत लावलं आहे. त्याचं एक खोड जरा जाड दिसलं म्हणून काय बघायला गेले, तर हाताला मांसल स्पर्श जाणवला. किळस येऊन, काडीनंच ती कीड हुसकून लावली, आणि कीड कुठली आहे म्हणून प्रतिमा जालावर शोधली तर ती स्वॉलोटेलची अळी निघाली. हे समजल्यावर त्या अळीला पुन्हा झाडावर सोडायला गेले तर ती आजूबाजूच्या झाडोऱ्यात गायब झाली होती.

स्वॉलोटेलची अळी

'न'वी बाजू Sun, 02/07/2023 - 10:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला फुलं लावायची आणखी गोडी लागली कारण फुलांवर फुलपाखरं, भुंगे, कधी हमिंगबर्ड येतात. तिर्री मांजर त्या लोकांचा पाठलाग करते. मजा येते.

फुलांवर फक्त फुलपाखरे, भुंगे, झालेच तर कधी हमिंगबर्ड एवढीच मंडळी येतात, तोवर मजाच असते. त्याबद्दल वाद नाही. तुम्ही टेक्सासात राहता, जॉर्जियात (अथवा आग्नेय किंवा पूर्व संयुक्त संस्थानांत अन्यत्र) राहात नाही, याबद्दल तुमचा जो कोणी खुदा असेल (असलाच, तर), त्याचे लाख लाख शुकर माना, कां की तुमचा जोरो (आमच्या बोलीभाषेत: मा***द!!!!!) या प्रकरणाशी पाला पडत नाही.

ही कोळ्यांची म्हटले तर निरुपद्रवी, म्हटले तर आत्यंतिक इरिटेटिंग अशी आगंतुक (घुसखोर) जात आहे. ही जात संयुक्त संस्थानांतील भूमिपुत्र जात नव्हे. किंबहुना, २०१३पूर्वी यांचे नावदेखील या भागांत कोणी ऐकलेले नव्हते. यांची मायभूमी खरे तर जपान, कोरिया वगैरे. परंतु, २०१३च्या सुमारास ही मंडळी ग्रामीण जॉर्जियात नक्की कशी उगवली, याची फारशी कल्पना कोणालाच नाही; मात्र, तेथून पुढे ती संपूर्ण आग्नेय/पूर्व संयुक्त संस्थानांत फोफावत गेली, आणि आता जाता जात नाहीत.

यांची वैशिष्ट्ये:

- घराबाहेर जेथेजेथे म्हणून कल्पना करणे शक्य आहे, तेथेतेथे भलीमोठी, लांबलचक जाळी विणून ठेवतात. मग ते झाडाच्या दोन फांद्यांमध्ये असो, दोन झाडांमध्ये असो, झाड आणि घर यांच्यामध्ये असो, झाड आणि मोटार यांच्यामध्ये असो, घराच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या जिन्याच्या प्लंब मध्यभागी असो… यू नेम इट! किंबहुना, आपल्याच घराच्या आजूबाजूस हिंडताना अनवधानाने आपले थोबाड एखाद्या जाळ्यावर न आदळणे हे निव्वळ अशक्य होऊन बसते. (रात्रीच्या वेळेस तर विचारू नका.)

- यांची मादी रंगीबेरंगी, पायांवर आलटूनपालटून निळेपिवळे पट्टे असलेली, भलीमोठी तथा आकर्षक असते. (म्हणजे, कोळ्यांकरिता आकर्षक. किंवा, सौंदर्यदृष्टी शाबूत असलेल्या एखाद्या मनुष्यास ती कदाचित आकर्षक वाटू शकेलही; दुर्दैवाने, त्या कॅटेगरीत मी मोडत नाही.) नर त्या मानाने छोटा तथा ब्राउन रंगाचा असतो, तथा कोठल्याही अँगलने अजिबात आकर्षक वगैरे दिसत नाही.

- गिरगावातल्या चाळींतून कशी एका खबदाडीतल्या (एकाच) खोलीत असंख्य मंडळी राहतात, तद्वत, यांच्यातसुद्धा एकाच जाळ्यात आख्खी (बहुधा) जॉइंट्ट फॅमिली राहाते. एका जाळ्यात सातआठ लहानमोठे कोळी एकसमयावच्छेदेकरून गुण्यागोविंदाने नांदत असलेले दिसणे ही अत्यंत सामान्य गोष्ट!

- ही मंडळी एखादा धागा विणून, त्याच्या आधाराने हवेच्या प्रवाहावर तरंगत दूरवर जाऊ शकतात. (Ballooning.)

- जाळी बनविण्याचा प्रचंड वेग. आज जर तुम्ही झाडू मारून तुमच्या घराच्या आजूबाजूची सर्व जाळी नष्ट केलीत (यात बायदवे प्रचंड वेळ जातो.), तर उद्यापर्यंत (किंवा कदाचित त्याहीअगोदर) किमान तितकीच नवी जाळी (त्यांतील प्रत्येकी असंख्य कोळ्यांसह) निर्माण झालेली असतात. एकंदरीत, बाकी सर्व कामधंदे सोडून देऊन, (मा***द!!!!! म्हणून त्यांच्या नावाने मोठमोठ्याने शिव्या घालीत) झाडांवरून तथा घराभोवती झाशीच्या राणीच्या (किंवा, मुंडके तुटलेल्या मुरारबाजीच्या) गतीने झाडू फिरवीत हिंडणे (आणि, उंचावरच्या ठिकाणी किंवा उंचावरच्या फांदीवर वगैरे जाळे आढळल्यास, पुनरेकवार कचकावून शिवी हासडून झाडू भिरकावून मारणे) हा नित्याचा उद्योग होऊन बसतो.

- हिवाळ्यात ही मंडळी गायब होतात. (बहुधा अंडी घालून मरत असावीत.) मात्र, वसंतसमये प्राप्ते यांचे हळूहळू पुनरागमन होऊ लागते, नि उन्हाळ्याअखेरीकडे यांचा पूर्ण प्रादुर्भाव सुरू होतो.

- माणसाच्या दृष्टीने ही मंडळी तुलनेने निरुपद्रवी म्हणवली जातात. एक तर ती सहसा आपण होऊन माणसाच्या वाटेला जात नाहीत. (तितका त्यांचा पार्श्वभागात दम नसतो. माणसाला घाबरत असावीत. माणसाने मात्र अनवधानाने त्यांच्या वाटेला जाण्याचे टाळणे हे जवळपास अशक्य असते.) आणि, (स्वसंरक्षणार्थ) चुकून जर मनुष्यास त्यांनी दंश केलाच, तर (१) त्यांच्या नांग्यांत मानवी त्वचेला भेदण्याइतपत ताकद सहसा नसते, आणि (२) त्यांचे विष हे छोट्यामोठ्या किड्यांकरिता जरी प्राणघातक असले, तरी मनुष्यास ठार मारण्याइतपत सक्षम नसते. (ऐकीव माहितीनुसार, दंश हा फार फार तर एखाद्या दिवसापुरता वेदनादायी ठरू शकतो, परंतु त्याने मृत्यू ओढवत नाही.)

सांगण्याचा मतलब, टेक्सासात असण्याचा असा मामूली फायदा असू शकतो. टेक्सासात आहात, सुखी आहात. सुखी राहा.

तथास्तु!

हर्षदा Mon, 03/07/2023 - 14:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काही फारसे करत नाही मी पण घराच्या आसपास फुलांची,फळांची झाड आहेत आणि मला पक्षी, कीटक वगैरेंच निरीक्षण करण्याची आवड आहे.
तुमचा हमिंगबर्ड तसाच इकडला शिंजिर (सनबर्ड) दोघेही फुलांचे चाहते.

'न'वी बाजू Sun, 02/07/2023 - 22:43

निरीक्षणे छान आहेत.

हं, कोणाला ती संक्षिप्त, त्रोटक वगैरे वाटू शकतात खरी, परंतु त्याला नाइलाज आहे. काय आणि किती लिहायचे, हे ठरविणे हा तुमचा अधिकार आहे. ते कोणाला संक्षिप्त वाटले, तर तो तसे वाटणाऱ्याचा अधिकार. इट्स फेअर.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/07/2023 - 08:04

In reply to by 'न'वी बाजू

कधी असा विचार करून पाहा, की हर्षदा यांचं लेखन आवडलं. म्हणून ते आणखी हवंसं वाटलं. एका माणसाला लांबड लावायची सवय आहे, त्यामुळे कधी कंटाळा येतो. त्याच्या बरोब्बर उलट झालं.

'न'वी बाजू Mon, 03/07/2023 - 10:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Good for you! ¯\_(ツ)_/¯

'न'वी बाजू Sun, 02/07/2023 - 23:01

शिंजिर म्हणजे नक्की काय?

'न'वी बाजू Mon, 03/07/2023 - 07:07

In reply to by गवि

(आता ‘सन बर्ड म्हणजे नक्की काय?’ असे विचारीत नाही. (गुगलून पाहातो.))

हर्षदा Mon, 03/07/2023 - 14:25

In reply to by 'न'वी बाजू

मराठीत शिंजिर किंवा सूर्यपक्षी. याच्या तशा बऱ्याच प्रजाती आहेत. मी म्हणतेय तो जांभळा शिंजिर (पर्पल सनबर्ड).