कन्या सासुरासी जाये - अरुण खोपकर

कन्या सासुरासी जाये
अरुण खोपकर
लहानपणी जेवताना पुस्तक वाचल्याबद्दल आणि उशाशी पुस्तक ठेवून झोपी गेल्याबद्दल ओरडा खाल्ल्यापासून माझी पुस्तकांशी मैत्री आहे. लहानपणी घरच्या दारिद्र्यामुळे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसल्याने, पहिला पुस्तकसंग्रह हा स्पर्धांत किंवा वाढदिवसाला भेट म्हणून मिळालेल्या पुस्तकांचा होता. तोही त्या वेळी मोठा वाटून त्याचा अभिमान वाटायचा. तो सतत आयुष्यभर वाढत राहवा अशी मी तेव्हा प्रार्थना करीत असे.
वर्षनिशीचे ऐंशीवे पान ओलांडायच्या आधीच, सुमारे दहा हजार पुस्तकांचा माझा संग्रह रोज डोळ्यांसमोर दत्त म्हणून उभा राहून, मला चिंताग्रस्त करू लागेल, हे मला तेव्हा खरेही वाटले नसते. सुमारे पंधरा भाषांतला हा संग्रह – या सर्व मला अवगत आहेत असेही नाही. काही शिकण्याची जबर इच्छा होती म्हणून पूर्वतयारीत होतो एवढेच – संख्येमुळे म्हणा किंवा बोलींच्या आडवळणांनी म्हणा, मला एका पर्वताएवढे ओझे होऊन राहिला आहे.
माझ्यामागे या पुस्तकांचे काय होणार? माझा मुलगा तर स्कॉटलंडमध्ये किल्ट परिधान करून तिथे कायम राहण्याच्या तयारीत आहे. माझी पत्नी गीता आता सुटसुटीत जगण्याचा विचार करू लागली आहे. हा संग्रह घरातून गेला – निदान लहानगा आणि सुटसुटीत झाला – तर त्याला जागा द्यायला ती तयार आहे. पण भिंती या जितक्या पुस्तकांच्या कपाटांकरता असतात तितक्याच, किंवा त्याहून अधिक प्रमाणात, सुंदर चित्रे टांगण्याकरता असतात असे तिचे मतही रास्तच आहे. आमच्या जोड आयुष्यात या भिंतींच्या पृष्ठभागावर कधी चित्रांनी अतिक्रमण केले, तर कधी पुस्तकांनी. अशा बदलत्या सीमारेषांचा अस्थिर भूगोल आता गीताला नको आहे.
माझा मार्जारपुत्र, मोगा उर्फ मोगी, याला पुस्तके बसण्याकरता आवडतात. कारण ती त्याला थंडीत उब देतात. ती पंजाने शेल्फमधून जमिनीवर काढण्याचा खेळही त्याला आवडतो. रात्री तो त्यातली चित्रकलेवरची पुस्तके वाचत असावा याची मला खात्री आहे. विशेषत: मांजरांच्या चित्रांनी, रेखाटनांनी, सूक्ष्मचित्रांनी, जलतरंगांतल्या व तैलरंगांतल्या आणि प्रत्यक्ष मांजरांच्या छायाचित्रांनी भरलेली डझनावारी पुस्तके रात्री नक्कीच जमिनीवर येतात, गालिचांवर पांघरली जातात आणि सोफ्यांवर लोळतात, स्वयंपाकघरात जातात व रातोरात आपापल्या जागांवर परततात याची मला खात्री आहे. पण या पलीकडे बिचारा मोगा पुस्तकांचे काय करणार काय?
माझे ग्रंथसंग्रह, किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचे हे मित्र, मला आयुष्यभर सोबत करणार नाहीत याची मला फार आधीपासूनच कल्पना होती. माझ्या लहानपणातल्या शब्दाविण सचित्र पुस्तकाची संख्या वाढता वाढता, आम्हा सहा भावंडांच्या घराला डोईजड होऊ लागली होती. हट्ट करून, रडारड करून, आरडाओरडा करून मी ती सुमारे इयत्ता आठवीपर्यंत घरात टिकवली. मग एक दिवस मी शाळेत असताना लीलाने – माझ्या आईने – ती देऊन टाकली, तेव्हा मी सुमारे अकरा वर्षांचा होतो. तरीही ते दु:ख मला सहन होत नव्हते. मी किती तरी दिवस त्यांच्या मोकळ्या जागी आलेल्या कपड्यांकडे व इतर वस्तूंकडे रागाने पाहत होतो. अनेक मित्र एकाच वेळी सोडून जाण्याची ही माझ्या आयुष्यातली पहिली वेळ.
या रितेपणाबरोबरच एक अद्भुत अनुभव मला आला. तो म्हणजे सच्चे मित्र तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. या उक्तीचे खरेपण मला ऐंशीव्या वर्षी तीव्रतेने जाणवते आहे. कारण पुस्तकातल्या कागदी घरात लपलेल्या कुत्र्याच्या पिलाला शोधण्याकरता, विविध वस्तूंच्या हलवता येणाऱ्या चित्रांना लावलेले रेशमी धागे आणि ते अलगद ओढल्यावर हळूच बाहेर पडणारे प्राणी, वस्तू, खेळणी हे सारे माझ्या डोळ्यासमोर अजून उभे आहेत. मी या मित्रांना सोडले त्याला पंचाहत्तर वर्षे झाली, पण ते पुस्तक, त्यातली चित्रे आणि त्या रेशमी धाग्यांचे रंग आणि स्पर्शही मला सोडत नाहीत.
शालेय आयुष्यातील एक नैमित्तिक विधी म्हणजे जुनी पाठ्यपुस्तके काढून टाकून त्यांच्या जागी नवी पाठ्यपुस्तके ठेवणे. माझे या वर्षभर बरोबर राहणाऱ्या मित्रांवर तितकेच प्रेम असे जितके माझ्या वर्गातल्या मित्रांवर असे. पाठ्यपुस्तकांच्या समासात काही शब्दांचे अर्थ लिहिलेले असत. काही शिक्षकांची, त्यांनाच काय पण मलाही ओळखू न येणारी, व्यंगचित्रे असत, कधी शाईचे डाग असत. कधी त्यात ठेवलेल्या पण सुकल्यावर टाकून दिलेल्या फुलांच्या अस्पष्ट आकृती आणि तितकेच अस्फुट गंध असत. या सर्व खुणांनी ते पुस्तक त्याच्या इतर प्रत्येक प्रतीपासून वेगळे ठरत असे.
शाळा संपल्यावर कॉलेजात नोकरी लागेपर्यंत काही पुस्तकसंग्रह वाढला नाही. मग तो अचानक वाढला. अनियतकालिकांच्या किंवा लघुनियतकालिकांच्या चळवळीत अरुण कोलटकर, अशोक शहाणे, पद्मनाभ बांदोडकर (सिनेदिग्दर्शक), बाळ उर्फ जयंत धर्माधिकारी, सुधाकर प्रभुदेसाई, कुमार शहानी आणि संस्कृतभाषाप्रभू शाममनोहर गोस्वामी इ.च्या सहवासात जगभरच्या कोनाकोपऱ्यांत प्रसिद्ध झालेली पुस्तके ग्रंथालयात वेगाने येऊ लागली. घरे बदलली तरी हे विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर होतेच ते कालपरवापर्यंत. यातली बरीचशी पुस्तके मी अत्यंत दु:खाने हल्लीच देऊन टाकली. डोळ्यांनी छापील पुस्तके वाचणे आता कठीण झाले आहे. विशेषत: लहान टाईपातली.
पुस्तके देऊन टाकणे हे सोपे नसते. एक तर आज बरीचशी वाचनालये पुस्तके घेत नाहीत किंवा घेतलेली मूळ मालकांना परत करतात. मी युरोपातून आणलेला नाटक, सिनेमा व साहित्य याचा सुमारे पाचसहाशे पुस्तकांचा संच हा रंगकर्मी कलांकरता खास निर्माण केलेल्या संस्थेला दिला होता. त्यात संपूर्ण स्तानिस्लाव्ह्स्की, सुमारे पंधरा खंड, संपूर्ण मेयरहोल्ड, सुमारे सहा खंड, संपूर्ण तल्स्तॉय, सुमारे वीस खंड इ. पुस्तकांबरोबर वेशभूषा आणि रंगभूषांच्या स्लाईड्सचाही समावेश होता. अर्थात अनेक पुस्तके ही रशियन, फ्रेंच, जर्मन व स्पॅनिश या मूळ भाषांत होती. या संस्थेने तीन वर्षानंतर मला एका आभाराच्या पत्रासकट हा संच स्वखर्चाने परत नेण्याची विनंती केली. हेदेखील सोबती कमालीच्या प्रेमाचे होते आणि त्यांना देताना मला जितके दु:ख झाले होते, त्यापेक्षा त्यांना एका राष्ट्रीय संस्थेने नाकारल्याचे अधिक दु:ख झाले. आजच्या ग्रंथसंस्कृतीचा इतका कडू अनुभव गिळून टाकला.
मुंबई विद्यापीठालाही मी राजकीय व ऐतिहासिक विषयांवरच्या सुमारे तीनशे पुस्तकांचा संग्रह भेट दिला होता. दोन वर्षांनी काही कारणांनी मी तिथे गेलो होतो, तेव्हा तो संग्रह मी ज्या आवरणांत बांधून दिला होता त्या आवरणांसकट तिथेच पडलेला मला आढळला. त्यातील पुस्तकांची नोंदही झाली नव्हती. मुलीचे लग्न होत नाही म्हणून आईला होणारे दु:ख, मुलीला सासरच्यांनी परत पाठवली म्हणून मातापित्यांना होणारे दु:ख आणि मुलीकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही यातले कोणते अधिक दु:सह्य असते ते सांगणे कठीण.
या दोन राष्ट्रीय किर्तीच्या संस्थांचे हे अनुभव पाहून मन विटले. त्यापेक्षा ज्या विषयात ज्याला रस आहे अशा वाचकाला ती पुस्तके द्यावी असे ठरवले. एका उत्साही तरुण पुस्तकविक्रेत्याकडे दोनेकशे पुस्तके पाठवली आणि योग्य वाचकाला ती विनामूल्य देण्यास अनुमती दिली. एक दिवस एका सामाजिक माध्यमात श्री. अरुण खोपकर यांची पुस्तके आमच्याकडे स्वस्त किमतीत मिळतील अशी बातमी पाहिली. त्या सद्गृहस्थाला फोन केला तर तो म्हणाला, फुकट मिळाल्यावर कोणीही नेतात म्हणून किंमत ठेवली! अर्थात त्याचे हे म्हणणे काही साफ चुकीचे नव्हते, याचा मला अनेक वेगळ्या संदर्भात अनुभव आलेला आहे.
आता सुमारे पाच हजार पुस्तके काळजीपूर्वक बांधून खास गोदामात ठेवली आहेत. ही गोदामे किमती वस्तूंची योग्य प्रकारे काळजी घेतात. किडेकीटकांपासून बचाव करतात. त्यांच्या पेटार्यांच्या क्रमांकाबरोबर जुळणाऱ्या याद्याही कम्प्युटरमधे आहेत. पुस्तके सुरक्षित राहतात, पण डोळ्यासमोर नसतात. परदेशी असलेल्या मुलांसारखी, ती सुखरूप असल्याचे समाधान असते, पण भेटीगाठी होत नाहीत आणि त्यांना व्हिडीओफोनही करता येत नाही.
जसजशी त्या त्या विषयांत रस असणारी आणि पुस्तकांवर प्रेम करणारी सुयोग्य माणसे मिळत आहेत तसतशी पुस्तके वाटून टाकतो आहे. कुणाला फ्रेंचमधली पुस्तके दिली. त्यात प्लेयाद नावाच्या एका सुप्रसिद्ध प्रकाशनगृहाची पुस्तके होती. ती उत्तम दर्जाच्या चामड्याची बांधणी असलेली, तांदळापासून बनवलेल्या कागदावर छापलेली आणि काळजी घेतल्यास शंभराहून अधिक वर्षे टिकणारी असतात. प्लेयाद हे एका तारापुंजाचे नाव आहे. साहित्यात ताऱ्यांसारखे जगणाऱ्या स्वयंप्रकाशी लेखकांचीच पुस्तके या आवृत्तीत प्रसिद्ध होतात. त्यातले हजार पानांचे पुस्तकही वजनाने इतके हलके असते की वाचताना त्याचे वजन जाणवत नाही. त्याला पुस्तकातील पानाच्या खुणांकरता वापरलेल्या अस्सल रेशमी फितांचा रंग दशकानुदशके कायम रहातो. संपादकांनी दिलेल्या टिपात अनेकदा त्या पुस्तकाच्या कल्पनाबीजापासून पूर्ण ग्रंथाच्या विकासाचे अनेक टप्पे दाखवणारा दस्तावेज असतो.
रशियन पुस्तकांची कहाणी वेगळी आहे. ज्या काळात मी रशियन शिकलो व ‘सोविएत युनियन’मध्ये राहिलो, त्या काळात प्रचारकी पुस्तके सहजासहजी मिळत असत आणि चांगली पुस्तके तितकीच दुर्मीळ असत. त्यांची कहाणी मी इतरत्र लिहिली आहे. पण माझ्या संग्रहातली इतकी दुर्मीळ पुस्तके मी विकत घेतलेली नसून, ती त्या पुस्तकांपेक्षा दुर्मीळ मित्रमैत्रिणींनी अत्यंत प्रेमाने भेट दिलेली आहेत. त्यातली बरीचशी कुणी पात्र व्यक्ती न मिळाल्यामुळे माझ्याकडे पडून आहेत, तर अनेक पुस्तके, मी आंधळा झालो तरी कुणाला देणार नाही, इतकी प्रिय आहेत. त्यांच्या संग्रहाबद्दल वाटणाऱ्या भावना या त्यातल्या लिखाणामुळे आहेत, त्यांच्या सौंदर्यामुळे नाहीत. रशियात लहान मुलांची किंवा लोककथांची सचित्र पुस्तके सोडली तर पुस्तकांकडे पाहण्याचा एकूण दृष्टीकोन उपयुक्ततावादी होता. आजची परिस्थिती मला ठाऊक नाही.
माझ्याकडच्या अत्यंत कष्टाने मिळवलेल्या उर्दू पुस्तकांचा जवळजवळ संपूर्ण संच मी देऊन टाकण्यात यशस्वी झालो आहे. त्यातली काही पुस्तके मराठीतून हिंदीत व हिंदीतून मराठीत सुंदर भाषांतर करणाऱ्या एका गुणी व्यक्तीला दिलेली आहेत. बाकीची बहुतेक पुस्तके, कष्टाने फार्सी शिकणाऱ्या आणि उर्दूवर प्रेम करणाऱ्या एका अभिनेत्याला दिली. तरीही अजून दोन-तीनशे पुस्तके घरातच आहेत.
भारतात एके काळी बहरलेल्या या अद्वितीय भारतीय भाषेचा, हलाल पद्धतीने मृत्यू व्हावा, अशी योजना राजकारणी खाटकांनी केली आहे. त्यामुळे समकालीन प्रकाशनात, पाकिस्तानच्या ‘संग ए मील’ = मैलाचा दगड, या प्रकाशनसंस्थेने केलेल्या पुस्तकांसारखी दर्जेदार पुस्तके भारतात कुठेही मिळत नाहीत. मजकूर कमीत कमी पानात कोंबून कमी दर्जाच्या कागदावर आणि पहिल्या वाचनातच पतझड सुरू होणाऱ्या प्रकाशनांचे गुण काय वर्णावे! पण याला जबाबदार फक्त बिचारे प्रकाशक नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे.
या उर्दू पुस्तकांनी मला काय दिले नाही! माझ्या मुंबईच्या, इतर भाषिकांनी स्पर्श न केलेल्या, मंटो साहेब, इस्मत चुगताई इ.नी रंगवलेल्या पैलूंच्या चित्रांपासून, आधुनिक भारताच्या ग्रामीण जीवनाचे असामान्य चित्रण करणाऱ्या प्रेमचंद, राजिंदर सिंग बेदी आणि इंतज़ार हुसेनपर्यंत कथा-कादंबऱ्या वाचून मला साहित्याचे व जीवनाचे समृद्ध अनुभव मिळाले. ग़ालिब, मीर तकी मीर सारख्या तत्त्ववेत्या आणि जीवनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कवींपर्यंत, जे काही मिळाले, ते देणारी पुस्तके जरी आज जवळ नसली, तरी त्यांच्या स्मृती, शब्द आणि ओळी, जोपर्यंत स्मृती शाबूत आहे तोपर्यंत कुणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही.
भारतीय भाषांत उर्दूसारखीच प्रिय असणारी दुसरी भाषा म्हणजे बांगला किंवा बंगाली. या भाषेत लिपीवर पुष्कळ विचार आणि मोलाचे काम झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण पुस्तक वाचतानाही डोळे धडपडत नाहीत. पण प्रकाशकांना आपल्या अस्सल साहित्याची विक्री करण्यात कणभरही रस नाही. कलकत्त्याचा पुस्तक मेळा सोडला तर ते विक्रीला कायम नाखूष असतात. कितीही पत्रे लिहा, ईमेल्स लिहा, फोन करा. उत्तर नाही. त्यामुळे माझ्याकडच्या पाचेकशे पुस्तकांतली तीनेकशे पुस्तके मला स्वत:ला कलकत्त्याहून आणायला लागली आहेत. मात्र आलमगीर कबीर स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने ढाका शहरात एक जास्तीची सुटकेस खरेदी करून, ती भरून पुस्तके आणली. त्यात ऐतिहासिक तत्त्वावर आधारलेला आणि उत्तम छपाईचा त्रिखंडी बांगला ते बांगला कोश आहे. बाकी संपूर्ण शरदचंद्र, बंकिमचंद्र, बिभूतिभूषण आणि ताराशंकर बंदोपाध्याय, महाश्वेतादेवी, रबींद्रनाथ, सुकुमार सेन, अबनींद्रनाथ इ.ची अजून चारेकशे पुस्तके योग्य पात्राची वाट पहात आहेत.
स्पॅनिश पुस्तकांतली भाषाविषयक पुस्तके, मी ज्या संस्थेत स्पॅनिश शिकलो त्या संस्थेला देताना मला फार आनंद झाला. तसेच मारिआ मोलिनेर यांचे गाब्रिएल गार्सिया मार्केझ यांना अतिप्रिय असणारे शब्दकोश मी मला स्पॅनिश शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला देणार आहे. तिनेच ते माझ्याकडे मागितले होते. तिने मला ज्या जपणुकीने त्यातले काही शब्द आणि वाक्-प्रयोग शिकवले होते, त्यांचे हे कृतज्ञ मोल आहे. दिवसेंदिवस अधू होणाऱ्या दृष्टीने मला वाचायला जड जात असले तरी, पाब्लो नेरूदा, ओक्ताबियो पाझ, मिग्युएल सर्बान्तेस, आस्तुरिया व लोर्का इ.चे संग्रह द्यायला मन परवानगी देत नाही, हात मना करतात आणि डोळे पाहू असे कृत्य पाहायला तयार होत नाहीत.
जर्मनी हा माझा प्रत्यक्ष परिचय झालेला पहिला युरोपीय देश. वॉल्टर बेंयामीन यांचे समग्र वाङ्मय असलेला वीस खंडांचा जर्मन संग्रह हा योग्य घरी गेला. ब्रेख्टसाहेबांचे विविध खंड अजून बाहेर जायला तयार नाहीत, पण त्यांना कित्येक आमंत्रणे येऊन गेली आहेत. ग्योअट यांचे ‘रंग’ या विषयावरचे चार खंड मात्र मला रंग दिसेनासे झाले तरी मी कुणालाही देणार नाही. जर्मनचा माझा संग्रह कधीच विशेष मोठा नव्हता. काफ्का यांची पत्रे व इतर लेखन यातले काही खंड कुणाकुणाला दिले आहेत. काही कधीच देणार नाही.
माझ्या भाषिक जीवनातले वॉटर्लू म्हणजे जपानी भाषा. मी दोन वर्षे हिच्याशी प्रणयाराधन करण्याचा प्रयत्न केला. व्याकरण सोपे म्हणून रोजच्या व्यवहारापुरते जपानी जेमतेम शिकलो. पण कांजी लिपी वाचायची व लिहायची वेळ आल्यानंतर तो नाद सोडून दिला. त्याकरता जे सातत्य आणि रियाज़ लागतो, ते मला माझ्या चित्रनिर्मितीच्या काळात कधी जमले नाही. आता वेळ टळून गेली आहे. हात वळत नाही. डोळे मदत करत नाहीत. स्मृतीही दगाबाज झाली आहे.
माझ्या शिक्षणकालात जपानी पुस्तके मिळणे महाकठीण होते. येनचे मूल्य भरमसाठ होते. तरीही सुमारे तीस वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश आज एका मागच्या खणात पडून आहेत. जपानी भाषेच्या लिपी आणि उच्चारात प्रत्यक्ष संबंध नाही कारण ती चित्रलिपी आहे. त्यामुळे हौसेने विविध प्रकारचे कोश घेतले. तेव्हा त्यातल्या प्रत्येकाची सुमारे दहा हजार रुपये किंमत ही खिशाबाहेरची रक्कम होती. कधी हातऊसने घेऊन, कधी उधारी ठेवून, कधी हप्त्याहप्त्याने पैसे फेडून कशीबशी ही पुस्तके जमवली आणि आज ती जशीच्या तशी आहेत. इलेक्ट्रॉनिक शब्दकोशांच्या काळात पारंपरिक कोशांचे महत्त्व कमी झाले आहे. उपयुक्ततावादी कोश हे सहज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मग भाषेचे एवढे चोचले कशाला? ठोक अर्थ कळला की काम झाले. परंतु जपानी पुस्तकसंस्कृतीची सौंदर्यदृष्टी इतकी वाखाणण्याजोगी आहे, की पुस्तके नुसती चाळण्यातही आनंद मिळतो. त्यामुळे ही पुस्तके अजून पडून असल्याचे मला फार दु:ख नाही.
मराठी पुस्तकांतली संतवाङ्मयाची व महानुभावांची पुस्तके सोडून बहुतेक सर्व वाटून टाकली आहेत. अरुण कोलटकरच्या सर्व पुस्तकांच्या प्रती, दुर्मीळ झाल्याने आणि अमूल्य असल्याने, जपून ठेवलेल्या आहेत, तशीच त्याची फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषांतरे व त्यावरील लेखनही जपून ठेवले आहे. माझ्या हयातीत मी ती कुणालाही देणार नाही हे मात्र नक्की. तसेच महाभारत व रामायणाचे सर्व खंडही मूळ संस्कृत व विविध भाषांतरांत जपून ठेवायचे ठरवले आहे. माझ्या मागे काय होईल कुणी सांगावे.
सुदैवाने सिनेमात रस असणारे आणि सत्पात्री दान करावे असे, मोजके का होईना, मित्र मात्र फार न शोधता मिळाले. त्यांना तावून सुलाखून घेतल्याने ती शेकडो पुस्तके आनंदाने नांदतील अशी आशा करतो.
पुस्तके दुरावताना ज्या शहरात ती प्राप्त झालेली असतात, त्यातल्या पुस्तकालयांच्या प्रिय स्मृती, त्या पुस्तकांवर चर्चा करणारे स्नेही व पुस्तकांना झालेले इतर मित्रमैत्रिणींचे स्पर्शही ती बरोबर घेऊन जातात. विक्रेत्यांचे प्रेमही घेऊन जातात. आपल्या आयुष्यातला त्यांना दिलेला काळ घेऊन जातात. उपाशी पोटी ती विकत घेतल्याचे भरल्या पोटाचे समाधान घेऊन जातात. उरतात ती रिकामी कपाटे. तीही लौकरच जातील किंवा डोळे गेल्याने दिसेनाशी होतील.
– – –
सौजन्य : अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन
पूर्वप्रकाशन : ‘ललित’ जानेवारी २०२६
.
https://aisiakshare.com/index.php/node/8399