Skip to main content

आदिमाय

माझ्या पुस्तकांच्या कपाटात
मूळाक्षरांशी ओळख झाल्यापासून कुणीकुणी घेऊन दिलेली,
मग असोशीने विकत घेतलेली,
देहभान विसरून वाचलेली,
पुन्हापुन्हा पारायणं केलेली,
बहुतांश मुखोद्गत झालेली,
वाचून मिटल्याला युगं उलटून गेलेली
हारीने मांडलेली
जिवापाड जपलेली
पुस्तकं

आजकाल बघतोय एकेक गायब होतंय
अन् कपाटात त्यांच्याजागी...
दुसरंच काहीतरी प्रगटतंय
कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी
भयाण पोकळी
चरित्रग्रंथांजागी मुखवटे
वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी
विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती
इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी

आज तरीही नेटानं कपाटापाशी गेलो
थबकलो
भांबावलो
ऐकून पानांची फडफड
नव्या पुस्तकपानांचा भारून टाकणारा गंध श्वासात भरून घेतानाच दिसली
कपाटात शाबूत-
-अमरतेचा शाप मिरवणारी,
जड-चेतन-सूक्ष्म-विराट सगळ्याला
आपल्या कवेत घेऊन
निर्लेप नि:संग निरागस उरणारी,
सार्‍या सार्‍या अ-क्षर अभिव्यक्तीची आदिमाय-
-अंकलिपी