मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग २

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग २

१९) क्लब रोड - जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), आनंदराव नायर मार्ग (लॅमिंग्टन रोड), मोहम्मद शहीद मार्ग (मोरलॅंड रोड) आणि मराठा मंदिर मार्ग (क्लब रोड) अशा चौकोनामध्ये सध्या मराठा मंदिर सिनेमा, रिजर्व बॅंक कॉलनी, एसटी आणि बेस्टचे बसडेपो आहेत तो चौकोन १९४७ सालापर्यंत भायखळा क्लबाने व्यापलेला होता.  १८३३ साली सुरू झालेला आणि केवळ युरोपीयनांसाठीचा हा क्लब मुंबईतील तशा सर्व अन्य क्लबांमध्ये सर्वांत exclusive मानला जाई आणि त्याचे सदस्यत्व मिळवणे सर्वसामान्य युरोपीयनांनाहि अवघड होते.  त्याच्या नावावरून क्लब रोड हे नाव पडलेले आहे.  हे apertheid स्वातन्त्र्यानंतर टिकवणे अवघड जाईल ह्या विचाराने १९४७ साली तो विसर्जित करण्यात येऊन त्याची मालमत्ता विकण्यात आली.  १८८३ मध्ये टर्फ क्लब ची स्थापना होईपर्यंत घोडयांच्या शर्यती भायखळा क्लबच्या विस्तीर्ण मैदानावर होत असत.  ’भायखळा क्लब कप’ मुळे टर्फ क्लबमध्ये ह्याची आठवण अजून जागी आहे.  क्लब रोड आणि भायखळा क्लबची खालील चित्रे पहा:

२०) चिरा बझार - एके काळी गिरगाव रस्त्याचा हा भाग दगडी चिरे वापरून झाकलेला असल्याने हे नाव त्याला मिळाले.

२१) चर्नी रोड - शेपर्ड ह्यांनी ह्या रस्त्याच्या नावाचे स्पेलिंग Charni Road असे दाखविले आहे.  त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की हे कोणा साहेबाचे नाव नसून ह्याचा उगम देशीच दिसतो.  ह्या उगमाबाबत सार्वत्रिक समजूत अशी दिसते की गुरेचारणीची जागा म्हणून हे नाव जागेला पडले. हे सहज शक्य वाटले तरी ह्यास आधार कोठेच दिसत नाही.  मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब.पु.बा.जोशी हे म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले.  चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.

२२) कुलाबा, Old Woman's Island, कुलाबा कॉजवे, अफगाण चर्च - खाली दाखविलेल्या मुंबईखालील मूळच्या सात बेटांच्या नकाशात अगदी खाली कुलाबा आणि Old Woman's Island अशी दोन बेटे आहेत.  पैकी Old Woman's Island हे छोटे बेट आता उरलेलेच नाही कारण कुलाब्याला मुख्य मुंबईशी जोडणार्‍या कुलाबा कॉजवेने त्याला गिळून टाकलेले आहे.

Old Woman's Island ह्या नावाचा उगम कोठेच सापडत नाही पण कुलाबा ह्याचा उगम ’कोळ-भाट’ (कोळी लोकांची जागा) असा असावा असा तर्क गर्सन दा कुन्हा आणि एडवर्ड्स् ह्यांनी केला आहे.  मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये ह्या शब्दाचे मूळ अरबी असल्याचे दर्शवून त्याचा अरबी अर्थ ’समुद्रात शिरलेला जमिनीचा लांब तुकडा’ असा दाखविला आहे.  (कोकण किनार्‍यावरील कुलाबा गाव आणि मुंबईतील बेट ह्या दोहोंचा हा अर्थ मोल्सवर्थमध्ये दाखविला आहे.) एडवर्ड्स ह्यांच्या मते Old Woman's Island हे नावहि Island of Al-Omanis - Island of Deep-sea Fishermen अशा अर्थाच्या अरबी शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश आहे.

१७९६ सालामध्ये कुलाब्याचे बेट हा कॅंटोन्मेंट म्हणून जाहीर करण्यात आला.  (अजूनहि कुलाब्याचा मोठा भाग सैन्यदलाच्या ताब्यात आहे त्याचा हा उगम.) मात्र तेथे जायला होडीचा वापर करावा लागत असे.  १८३८ मध्ये मधल्या Old Woman's Island चा पायरीसारखा उपयोग करून कॉजवेच्या मार्गाने कुलाबा मुख्य मुंबईशी जोडले गेले.

कुलाब्यात असलेले आणि १८४६ साली बांधलेले the Church of St John the Evangelist' हे ’अफगाण चर्च’ ह्या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. चर्चमधील एका स्मृतिलेखाप्रमाणे हे चर्च १८३८ च्या पहिल्या अफगाण युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृतीला वाहिलेले आहे.

(संगमरवरी लेख)

२३) कॉटन ग्रीन - १९व्या शतकाच्या प्रारंभापासून पूर्वेला चीनकडे आणि पश्चिमेला इंग्लंड आणि युरोपकडे कपाशीची निर्यात हा मुंबईतील एक प्रमुख व्यवसाय झाला होता.  दक्षिण हिंदुस्तानात उत्पादन झालेली कपात निर्यातीसाठी मुंबईत जमा होई आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत तिला टाउन हॉलसमोरच्या मोकळ्या जागेत साठवत असत. हे पहिले ’कॉटन ग्रीन’. कॉजवेमुळे कुलाबा मुंबईस जोडला गेल्यानंतर आणि १८६७ साली बीबीसीआय रेल्वेने कुलाबा स्टेशन बांधल्यावर मुंबईत येणारी कपास साठवणीची नवे ’कॉटन ग्रीन’ ह्या स्टेशनाजवळ आणण्यात आले.  तेथे ते १९३० सालाच्या पुढेमागेपर्यंत होते.  रेल्वेने कुलाबा स्टेशन १९३० सालात बंद केले.  तदनंतर कापसाचा व्यापार तेथून हलून उत्तरेस हार्बर लाईनवरील ’कॉटन ग्रीन’ नावाच्या नव्या स्टेशनाच्या परिसरात आणि ’कॉटन ए़क्स्चेंज’ ह्या नव्या इमारतीजवळ गेला.  आता काळ अजून पुढे सरकला आहे आणि ह्या अलीकडच्या ’कॉटन ग्रीन’मध्ये आयातनिर्यात मुख्यत्वेकरून लोखंड आणि पोलादाची होत असते.  कुलाब्याचे कॉटन ग्रीन असे दिसत असे:

२४) कूपरेज - ’कूपर’ हे एका व्यवसायाचे इंग्रजी भाषेतील नाव आहे.  कूपर हा व्यावसायिक लाकडापासून वस्तु आणि द्रव ठेवण्याची भांडी - बॅरल, बादली इत्यादि तयार करतो.  सैन्यासाठी लागणारे मासे, मांस ह्यासारखे खाद्यपदार्थ, बीअरसारखी पेये टिकून राहण्य़ासाठी ते मिठात खारवणे, वाळवणे आणि नंतर योग्य प्रकारच्या लाकडाच्या भांडयात साठवणे ही कामे कूपर्स करीत आणि ह्यासाठीची जागा किल्ल्याच्या आत होती.  कालान्तराने नाना प्रकारचे वास आणि दुर्गन्धि निर्माण करणारे हे काम किल्ल्याबाहेर करण्यासाठी बेटाच्या दक्षिण बाजूस अपोलो बंदराजवळ एक शेड बांधून कूपर व्यावसायिकांची तिकडे रवानगी झाली.  १७८१ साली बांधलेली ही शेड १८८६ पर्यंत त्या कामासाठी वापरात होती.  त्या शेडच्या मोकळ्या जागेला कूपरेज हे नाव लागले आहे.  शेजारच्या रस्त्यासहि तेच नाव मिळाले आहे.

२५) सी.पी.टँक रोड - फॉकलंड रोड (पठ्ठे बापूराव मार्ग), अर्स्किन रोड (ब्रि.उस्मान मार्ग) आणि किका स्ट्रीट हे जेथे मिळतात तेथून सुरू होणार्‍या ह्या रस्त्याला कावसजी पटेल ह्यांनी बांधलेल्या तलावावरून हे नाव पडले आहे.  पारशी समजुतीनुसार मुंबईत येणारी पहिली पारशी व्यक्ति इंग्रजांपूर्वी पोर्तुगीज काळातच १६४० साली आली होती.  त्या व्यक्तीचे नाव दोराबजी नानाभाई.  पोर्तुगीज अधिकारी आणि स्थानिक कोळी वस्ती ह्यांच्यामधील दुवा असे काम ते करीत असत आणि मुंबई इंग्रज अमलाखाली गेल्यावरहि त्यांची ती जागा चालू राहिली.  दोराबजीचा मुलगा रुस्तुम ह्याने १६९२ मध्ये सिद्दीचे मुंबईवरील आक्रमण स्थानिक कोळी लोकांची सेना उभारून परतवून लावले आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईचे पाटिलकीचे वतन वंशपरंपरा देण्यात आले.  रुस्तुमचा मुलगा कावसजी पटेल ह्याने धर्मार्थ हेतूने जो तलाव १७८० साली बांधला त्यावरून कावसजी पटेल टॅंक रोड तेव्हापासून ओळखला जातो.  विहार आणि तुळशी तलावांचे पाणी मुंबईत पोहोचल्यावर आरोग्याच्या कारणासाठी मुंबईतील इतर बहुतेक तलावांप्रमाणे हाहि बुजवला गेला.  बुजवण्याचे निश्चित वर्ष उपलब्ध नाही.  खाली दर्शविलेल्या जुन्या नकाशात कावसजी पटेल टॅंक रस्ता आणि त्याच्या पश्चिम टोकाला त्याच नावाचा तलाव दिसत आहे.

२६) क्रॉस आणि एस्प्लनेड मैदाने - मुंबईची बेटे कंपनीच्या ताब्यात १६६८ साली आली तेव्हा सध्याची दक्षिण मुंबई स्थानिक लोकांच्या शेतांनी आणि नारळाच्या वाडयांनी भरलेली होती.  हे लोक बहुसंख्येने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले होते.  सध्याचे मरीन लाइन्स, मेट्रो सिनेमा, एल्फिन्स्टन कॉलेजसारखे भाग ’कवेल’ नावाच्या वस्तीने व्यापलेले होते.  (कवेल हा शब्द कोळीवाडा ह्याचे पोर्तुगीज रूप आहे.)  कंपनीच्या ताब्यात ही बेटे आल्यावर परकी आक्रमणापासून त्यांचा बचाव करण्यासाठी इंग्रजांनी तेथे समुद्राकडे तोंड करून असलेला किल्ला बांधला आणि त्याच्या पश्चिम बाजूस मजबूत भिंत, बुरूज, तोफा ठेवण्याच्या जागा इत्यादि बांधून ती बाजू बळकट केली.  ह्यातूनच १७६० च्या सुमारास इंग्रज वरिष्ठांना असे वाटले पश्चिमेकडील कवेल, त्यातील घरे आणि वाडया, त्यातील मजबूत दगडविटांच्या बांधणीचे चर्च (Nossa Senhora da Esperança, Our Lady of Hope) आणि त्याला संलग्न दफनभूमि ह्यांपासून किल्ल्याला धोका संभवू शकतो कारण कोणी शत्रूने त्या बाजूने बेटावर सैन्य उतरविले तर ते सैन्य ह्या सर्व वाडया आणि बांधकामांच्या आडोशाने किल्ल्यावर हल्ला करू शकेल.  परिणामत: कवेल गाव उठवून चर्च जमीनदोस्त करण्यात आले.  (ह्याच कारणासाठी तेथेच जवळ असलेले मुंबादेवीचे देऊळ उठवून त्याच्या सध्याच्या जागी बदलण्यात आले. चर्चला भुलेश्वरकडे नवीन जागा देण्यात आली.) अशा रीतीने किल्ल्याच्या पश्चिमेस एक मोठे मैदान निर्माण झाले.  नदी, समुद्र, तलाव अशांना लागून असलेल्या जागेस ’एस्प्लनेड’ म्हणतात म्हणून हे मैदान त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.  कालान्तराने एस्प्लनेड मैदानामधून उत्तर-दक्षिण असा रस्ता निघून त्याला ’एस्प्लनेड रोड’ असे नाव मिळाले.  पुढील काळात हा भाग श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांचा संध्याकाळी फेरफटका मारण्याचा भाग झाला, तसेच त्याच्या उत्तर बाजूकडे सैन्याच्या कवायतींची जागा होती.  ह्या सर्वाचे  सुंदर वर्णन दिनशा वाच्छा ह्यांनी केले आहे.  त्यांच्याच सांगण्यानुसार १८५७ मध्ये मुंबईत नेटिव सैन्यात धनत्रयोदशीच्या रात्री काही बंडाची हालचाल आहे असे कानावर येताच पोलिस कमिशनर फोर्जेट ह्यांनी तातडीने तपास करून कारस्थानाच्या दोन पुढार्‍यांना  ताब्यात घेतले आणि झटपट कोर्ट मार्शल भरवून त्यांना मृत्युदंड सुनावला.  नोवेंबरच्या एका दुपारी दोघा पुढार्‍यांना सैन्याच्या आणि रहिवाशांच्या उपस्थितीत तोफांच्या तोंडी बांधून उडवून देण्यात आले.  वाच्छा तेव्हा जवळच्याच एल्फिन्स्टन स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी शाळेतून घरी परतत असतांना हा प्रसंग पाहिला.

१७६०च्या आगेमागे निर्माण झालेले हे मैदान अजूनहि गजबजलेल्या दक्षिण मुंबईत आपले मोकळेपण टिकवून धरण्यात पुष्कळ प्रमाणात यशस्वी झाले आहे.  त्याच्या मध्यातून जाणार्‍या दक्षिणोत्तर अशा एस्प्लनेड रोडमुळे ह्या मैदानाचे दोन भाग झाले आहेत.  पैकी पूर्वेकडील भागास आझाद मैदान असे नाव अलीकडे मिळाले आहे.  पश्चिमेकडील भागास ’क्रॉस मैदान’ म्हणतात कारण जुन्या पोर्तुगीज चर्च आणि दफनभूमीचा अवशेष असा एक क्रॉस तेथे टिकून होता. दिनशा वाच्छा आणि दा कुन्हा ह्या दोघांनीहि हा मूळचा क्रॉस पाहिल्याची नोंद ते करतात.  १९४०-४५ पर्यंत तो तेथे असावा कारण दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी मुंबईत उतरून युद्धाकडे रवाना होणार्‍या इंग्लिश-अमेरिकन सैनिकांना मुंबईची तोंडओळख करून देण्यासाठी छापलेल्या एका पुस्तिकेत त्याचा उल्लेख मला आढळला.  सध्याहि ह्या मैदानात एक क्रॉस दिसतो पण तो अलीकडेच बांधण्यात आला आहे.

एस्प्लनेड रोडचे नाव नंतर बदलून ’महात्मा गांधी रोड’ असे झाले.  हे नामान्तर स्वातन्त्र्यापूर्वीच केव्हातरी झालेले दिसते कारण वर उल्लेखिलेल्या पुस्तकात त्याचा तसा उल्लेख आहे आणि त्यातील नकाशातहि हे नाव दाखविले आहे.  ब्रिटिशांनी देश सोडण्यापूर्वीच हा बदल कसा घडून येऊ शकला आणि तोहि ’महात्मा’ ह्या उपाधिसकट हे मला एक गूढ वाटत आहे!  हा नकाशा खाली दर्शवीत आहे.

२७) करी रोड स्टेशन - हे उपनगरी गाडयांच्या स्टेशनचे नाव म्हणून अजून टिकून आहे पण ज्या रस्त्यावरून हे नाव पडले त्या करी रोडला आता महादेव पालव मार्ग असे नाव मिळाले आहे.  सध्याच्या वेस्टर्न रेल्वेचा पूर्वावतार बॉंबे बरोडा ऍंड सेंट्रल इंडिया (बीबीसीआय) रेल्वे हिचे १८६५ पासून १८७५ पर्यंतचे एजंट सी.करी ह्यांचे नाव स्टेशन आणि रस्त्यास दिले होते.  जीआयपी, बीबीसीआय अशा रेल्वे कंपन्यांची लंडनमध्ये उभारलेल्या होत्या आणि त्यांची प्रमुख कार्यालये तेथेच होती.  हिंदुस्तानात कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख करणार्‍या प्रमुख अधिकार्‍यास ’एजंट’ अशी उपाधि असे.  ह्या दोन रेल्वे कंपन्यांची बोधचिह्ने मला wiki.fibis.org ह्या संस्थळावर सापडली ती खाली दर्शवीत आहे.

२८) चौपाटी - जुन्या किल्ल्याच्या पश्चिमेस भराव घालून रेक्लमेशनची नवी जमीन तयार करण्यापूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी जवळजवळ सध्याच्या चर्चगेट स्टेशनपर्यंत पोहोचत असे आणि ह्या पाण्याचे चार वेगवेगळे भाग (channels) दिसत.  त्यावरून त्या भागाला चौपाटी हे नाव पडले.  ठाणे जिल्ह्याच्या किनार्‍यावर असेच सातपाटी नावाचे मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे त्याची येथे आठवण होते.

२९) चर्चगेट आणि चर्चगेट स्ट्रीट - मुंबईच्या फोर्ट जॉर्ज किल्ल्याला उत्तरेकडे बझार गेट, दक्षिणेकडे अपोलो गेट आणि पश्चिमेस चर्च गेट असे तीन दरवाजे होते.  पैकी चर्चगेट हे साधारणपणे सध्याच्या हुतात्मा स्मारकापाशी (फ्लोरा फाउंटन) होते आणि जवळच्याच सेंट थॉमस कॅथीड्रलवरून त्याला हे नाव पडले होते.  चर्चगेटमधून येणार्‍याजाणार्‍या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे नाव होते.  गेट १८६० च्या सुमारास आवश्यकता न उरल्यामुळे पाडून टकण्यात आले.  रस्त्याला सध्या वीर नरिमन मार्ग असे नाव आहे.  चर्चगेटचे नाव आता उपनगरी गाडयांच्या स्टेशनच्या रूपाने उरले.  चर्चगेट स्ट्रीट आणि जुने चर्चगेट स्टेशन खाली दाखवत आहे. आहे.

३०) दादर, दादर बीबी आणि टीटी - ’दादर’ ह्या नावाचा उद्भव कसा झाला ह्याबाबत निश्चित अशी माहिती कोणाजवळच उपलब्ध नाही. अशी एक समजूत बरीच रूढ असल्याचे मी ऐकले आहे की दादरमधून जाणार्‍या  रेल्वे रुळांमुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी आणि पादचारी लोकांच्यासाठी तेथे एक पूल आणि जिना - दादर - बांधण्यात आला आणि त्यावरून ह्या उपनगराचे नाव ’दादर’ असे पडले.  ही उपपत्ति स्वीकारार्ह वाटत नाही कारण मुंबईशी संबंधित म्हणून ’दादर’ हा शब्द १८३१ सालात छापलेल्या मोल्सवर्थ मराठी-इंग्लिश शब्दकोषात सापडतो.  तेथे दिलेल्या त्याच्या चार अर्थांपैकी दोन असे आहेत: '3. A bridge.  4. A Bombay word.  A ladder-like and moveable stair-case.'

दादरमधून जुनी बीबीसीआय रेल्वे (पश्चिम रेल्वे) आणि जुनी जीआयपी रेल्वे ह्या दोघींचे मार्ग जातात.  त्यापैकी पश्चिम रेल्वेच्या पलीकडील भागाचे दादर बीबीसीआय ऊर्फ दादर बीबी हे नाव अजून लोकांच्या तोंडात टिकून आहे.  मुंबईमध्ये ट्रॅम होती तेव्हा दादर टीटी (ट्रॅम टर्मिनस) ते म्यूजिअम (परळ-भायखळा-वीटीमार्गे) हा ट्रॅमचा प्रवास दीड आण्यामध्ये होत असे.  ३१ मार्च १९६४ ह्या दिवशी ह्याच मार्गाने मुंबईची शेवटची ट्रॅम धावली.  दादर टीटी म्हणजे सध्याचे खोदादाद सर्कल.

शेपर्ड ह्यांच्या मतानुसार ’मुंबईकडे जाणार्‍या रस्त्याची एक पायरी’ अशा अर्थी हे नाव रूढ झाले असावे.  ठाणे जिल्ह्यातील केळवे गावाच्या बाहेर असलेल्या कोळी वस्तीसहि ’दादर’ असेच कोळी बोलीमधे नाव आहे असा उल्लेख त्यांनी केला आहे.

३१) धोबी तलाव - मुंबईची बेटे पोर्तुगीजांकडे असण्याच्या दिवसांत एका धोबी व्यक्तीने तेव्हाच्या ’कवेल’ नावाच्या कोळी वस्तीमध्ये आपल्या जमातीच्या लोकांसाठी एक तलाव खोदला होता आणि बांधणार्‍याच्या नावावरून त्याला धोबी तलाव असे नाव पडले होते. धोबी त्या तलावावर आपले कपडे धुण्याचे काम करीत असत.  १८३९ सालापर्यंत तलाव जुना होऊन गाळाने भरला होता आणि त्यावर्षीच्या पाण्याच्या दुष्काळामुळे तो जवळजवळ आटला होता  फ्रामजी कावसजी नावाच्या दानशूर पारसी व्यक्तीने रु ४०,००० खर्च करून तलाव स्वच्छ करून पुन: बांधून घेतला आणि सार्वजनिक उपयोगासाठी तो सरकारच्या हवाली केला. कालान्तराने विहारचे पाणी दक्षिण मुंबईत पोहोचू लागल्यावर अन्य तलावांप्रमाणे ह्याचीहि तितकीशी आवश्यकता उरली नाही आणि नंतर केव्हातरीच्या वर्षात तो बुजविण्यात आला. १८६२ साली ह्या तलावाच्या दक्षिण-पश्चिम कोपर्‍यावर फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूट उभारण्यात आली.  तिची इमारत ह्या तलावाचा काही भाग वापरून बांधली गेली आहे.  तलावाची आठवण आता पुढील मजकुराच्या संगमरवरी लेखातून उरली आहे.  हा लेख फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूटच्या रस्त्यावरील भिंतीवर पाहायला मिळतो:

Framji Cowasji Tank
That tank was so called by the order of Government to commemorate the late Framji Cowasji's liberality
in expending a large sum of money on its reconstruction in the year 1839.

पूर्वीच्या तलावाची जागा आता वासुदेव बळवंत चौकाने व्यापली आहे पण धोबी तलाव हे ह्या भागाचे जुने नावहि वापरात आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

करी रोड स्टेशन - हे उपनगरी गाडयांच्या स्टेशनचे नाव म्हणून अजून टिकून आहे पण ज्या रस्त्यावरून हे नाव पडले त्या करी रोडला आता महादेव पालव मार्ग असे नाव मिळाले आहे. सध्याच्या वेस्टर्न रेल्वेचा पूर्वावतार बॉंबे बरोडा ऍंड सेंट्रल इंडिया (बीबीसीआय) रेल्वे हिचे १८६५ पासून १८७५ पर्यंतचे एजंट सी.करी ह्यांचे नाव स्टेशन आणि रस्त्यास दिले होते.

बीबीसीआयच्या एजंटाचे नाव जीआयपीवरील स्टेशनास का दिले असावे, कळत नाही.

चौपाटी - जुन्या किल्ल्याच्या पश्चिमेस भराव घालून रेक्लमेशनची नवी जमीन तयार करण्यापूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी जवळजवळ सध्याच्या चर्चगेट स्टेशनपर्यंत पोहोचत असे आणि ह्या पाण्याचे चार वेगवेगळे भाग (channels) दिसत. त्यावरून त्या भागाला चौपाटी हे नाव पडले. ठाणे जिल्ह्याच्या किनार्‍यावर असेच सातपाटी नावाचे मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे त्याची येथे आठवण होते.

आणि आता? मुंबईत 'चौपाटी' हा शब्द 'बीच' अशा अर्थी प्रचलित झाल आहे. (दादरचौपाटी, जुहूचौपाटी वगैरे.)

मुंबईमध्ये ट्रॅम होती तेव्हा दादर टीटी (ट्रॅम टर्मिनस) ...

यावरून आठवले. कॉलेजच्या दिवसांत एकदा आमच्या एका (टोट्टली बिगरमुंबईकर) मित्राने, ऑफ ऑल द पीपल आम्हांस, '(दादर) टीटी म्हणजे ट्राम-टर्मिनस (कारण पूर्वी तेथे ट्रामचे टर्मिनस होते, त्या स्टेशनासमोर ट्राम उभ्या राहात, म्हणून), त्याचप्रमाणे मुंबई व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस, कारण पूर्वी त्या स्टेशनासमोर व्हिक्टोरिया (बोले तो भाड्याच्या घोडागाड्या) उभ्या राहत, म्हणून, असे 'पटवून देण्या'चा प्रयत्न केला होता.

मुंबईशी संबंधित म्हणून ’दादर’ हा शब्द १८३१ सालात छापलेल्या मोल्सवर्थ मराठी-इंग्लिश शब्दकोषात सापडतो. तेथे दिलेल्या त्याच्या चार अर्थांपैकी दोन असे आहेत: '3. A bridge. 4. A Bombay word. A ladder-like and moveable stair-case.'

अतिअवांतर: यावरून आठवलेले एक निरीक्षण. (अर्थात, 'दादर' या नावाची व्युत्पत्ती म्हणून नव्हे - तसा दावा अजिबात करू इच्छीत नाही. हे आपले सहज लक्षात आले म्हणून, एक निरुपयोगी निरीक्षण.)

कोठल्याही रेल्वेस्टेशनात, स्टेशनाच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्यांवरील पादचार्‍यांना (१) पलीकडील बाजूस (मुंबईतील स्टेशनांच्या बाबतीत ईष्टकडून वेष्टकडे किंवा उलट, किंवा दादरच्या बाबतीत टीटी ते बीबी किंवा उलट) किंवा (२) कोणत्याही फलाटावर जाता यावे, म्हणून किमान एक पूल असतो, आणि त्या पुलाच्या दोन्ही बाजूंस आणि प्रत्येक फलाटांपाशी जिने असतात. आता, मुंबईतील (किमानपक्षी वेष्टर्नवरील) बहुतांश उपनगरीय स्टेशनांवर जे जिने आहेत, त्यांच्या सर्वसाधारण उंचीच्या मानाने दादर स्टेशनावरील जिने हे खूपच जास्त उंच आहेत. (वेष्टर्न लाइनवर इतरत्र इतके उंच जिने थेट गोरेगावच्या स्टेशनावर पाहिल्याचे आठवते; अध्येमध्ये कोठेही नाही.)

========================================================================================================================
अवांतर: पुणे क्याम्पातही एक 'चौपाटी' असल्याचे केवळ ऐकून आहे - पुण्यात वाढूनही क्याम्पाशी संबंध फारसा आला नाही१अ - त्याला हे नाव कशावरून पडले असावे, हे कळत नाही. असो.

१अ 'कारण शेवटी आम्हीं भटेंच - त्याला काय करणार?' - पु.ल.

बाँबे२अ-बॉर्न म्हणून जन्माने, आणि मुंबईत वाढलो किंवा फारसे राहिलो नसलो तरीही आईच्या बाजूने म्हणून [अर्धे का होईना] वंशाने, नाममात्र मुंबईकर; म्हणजे, तुलनेने वासरासमोर लंगडी का होईना, पण गाय क्याटेगरीतले.

२अ, असे मोठ्याने म्हणावयाची तूर्तास चोरी आहे. या ना त्या 'सेना'वाले बदडून काढतात नाहीतर. असो चालायचेच.

वैयक्तिक निरीक्षण; तपशिलाबाबत चूभूद्याघ्या. तसेच, खूप जुने निरीक्षण. १९९०च्या दशकापासून पुढे यात बदल झाला असल्यास कल्पना नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईत 'चौपाटी' हा शब्द 'बीच' अशा अर्थी प्रचलित झाल आहे

वनस्पती तूप म्हणजेच डालडा हे समीकरण इतके घट्ट बसले होते की, दुसर्‍या कुठल्याही कंपनीच्या वनस्पती तुपास *चा डालडा असे संबोधीत, असे ऐकून आहे!

(भारतात वातानुकुलीत, आरामदायी बस ह्या वॉल्वो कंपनीने प्रथम आणल्या. तेव्हा पासून अशा बसेसना वॉल्वो म्हणायची प्रथा पडली आहे. उदा. मर्सिडीजची वॉल्वो Wink )

असो.

तिसरीत (किंवा चौथीत असेल), शाळांतून स्थानिक भुगोल शिकवला जाई. म्हणजे, मुंबईतील शाळांत आमची मुंबई, अन्य ठिकाणी आमचा * जिल्हा इ. त्यात, चौपाटीबद्दल वाचताना, तिचा आकार चारही बाजूने पाटीसारखा दिसतो म्हणून त्यास चौपाटी म्हणतात, असे वाचल्याचे आठवते!

(जन्माने चौपाटीकर) सुनील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यामध्ये चांदणी* चौकाजवळ एका गार्डन रेस्स्टॉरण्टचे नाव "बावधन चौपाटी**" आहे.
.
डालडा ही जशी सर्व वनस्पती तुपाला एक अम्ब्रेला टर्म झाली तशीच इंडोनेशिया का कोणत्यातरी पूर्व आशियायी देशात "बजाज" हा रिक्षाला समानार्थी शब्द बनला आहे.
"चल बजाज ने जाउ" असे ते त्यांच्या स्थानिक भाषेत मह्णतात म्हणे.
.

*हो मराठीतला "चांदणी" चौकच. हिंदीतला "चाँदनी" चॉक नाही; ते तर साला लिहिताना चाँदनी चौक लिहितात उच्चारताना त्या शब्दातील "द" हे व्यंजन कुणीच उच्चारत नाही.
"चान्नी चॉक जाना हे बिय्या" हेच सर्वत्र हिंदीभाषकांकडून; विशेषत: मारवाडी-अगरवाल ललनांकडून ऐकण्यात येते. उच्चार एक; लिहिणार भलतेच. दुटप्पी कुठले. असो.
.
** ही पुण्याच्या दृष्टीने हिंदीभाषिक मंडळी "चौपाटी" ह्याचा उच्चरही "चॉपाटी" असाच करतात "चॉपाटी जाना हे बिय्या" ह्या सारख्या वाक्यात ते रिक्षावाल्या दादांना*** सांगतात.
एकदा हिंदी भाषिकांच्या गचांडीला धरुन त्यांना हिंदीचे योग्य(त्यांनी जे लिहिले आहे तसेच) उच्चारण शिकवावे असे कैकदा मर्द मावळ्या मराठी मनात येते.
पण कारकुनी मोनमोडी पराक्रमातून फुरसत न मिळाल्याने ती मोहिम दरवेळी आम्हांस पुढे ढकलावी लागते. म ग पुढील वाक्य ऐकून घ्यावी लाग्तातः-
"पूना में चान्नी चॉक के पास बावधन चॉपाटी के पास रिक्षा लो बिय्या"

.
.
"रिक्षावाले दादा " हा शब्द अत्यंत आदरयुक्त आपुलकीने वापरलेला आहे; प्रचलित "रिक्षावाले भय्या" ह्यास पर्यायी म्हणून.
रिक्षावाले "दादागिरी" करीतात असे आम्हांस म्हणावयाचे नाही. म्हणायचे असले, तरी तसे म्हणण्याइतक्या सुरक्षित अंतरावर आम्ही नाही; म्हणून आम्ही तसे म्हणत नाही.
.
.
संपूर्ण प्रतिसादांत न वी बाजू ह्यांचे कॉपी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एकदा हिंदी भाषिकांच्या गचांडीला धरुन त्यांना हिंदीचे योग्य(त्यांनी जे लिहिले आहे तसेच) उच्चारण शिकवावे असे कैकदा मर्द मावळ्या मराठी मनात येते.
.............हे पाहून तुमचे काही समाधान होते का ते पाहा बरे !
झालेच तर संवादलेखक 'संदीप श्रीवास्तव'ना धन्यवाद द्यायला विसरू नका.
---

हिंदीत - 'अ' वर दोन मात्रांचा उच्चार = अ‍ॅ. ऐ नव्हे. उदा. 'बैंक' असे हिंदीत लिहीले असेल तर उच्चार 'बँक' असाच होतो.

'चौपाटी' हा मूळ मराठी असेल तर 'चॉपाटी'बद्दल त्यांची गचांडी अवश्य धरा.
पण मग 'इराण', 'इटली' या शब्दांतले ण, ट, त्या त्या भाषांत नाहीत मग तुमची गचांडी धरायला कुणास पाचारण करावे ?

पण त्रास होतो याच्याशी सहमत. कालच एका माहितीपटात 'वायप्फॅसना' असा अमेरिकी उच्चार 'विपासना (विपश्यना)' शब्दासाठी ऐकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच एका माहितीपटात 'वायप्फॅसना' असा अमेरिकी उच्चार 'विपासना (विपश्यना)' शब्दासाठी ऐकला.

माझे एक मराठी परिचित तर हा शब्द कोणत्याही लिपीत लिहिला तरी त्याचा उच्चार 'वायझेडपणा' असाच करतात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<बीबीसीआयच्या एजंटाचे नाव जीआयपीवरील स्टेशनास का दिले असावे, कळत नाही.>

'न'वी बाजू ह्यांची ही शंका रास्त आहे आणि माझ्याहि ध्यानात हा मुद्दा त्यांचा प्रतिसाद वाचूनच आला. मात्र, मला उत्तर सुचत नाही.

शेपर्ड ह्यांचे पुस्तक पुनः काढून पाहिले, अशासाठी की लिहितांना माझ्या हातूनच काही गल्लत झाली आहे किंवा कसे. पण नाही, शेपर्डहि तेच म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४ वैयक्तिक निरीक्षण; तपशिलाबाबत चूभूद्याघ्या. तसेच, खूप जुने निरीक्षण. १९९०च्या दशकापासून पुढे यात बदल झाला असल्यास कल्पना नाही. असो.

आता तर दादर स्टेशनवर (पश्चिम रेल्वेच्या) सरकते स्वयंचलित जिने (एस्कलेटर्स) आले आहेत. याबाबत दादर स्टेशनने अमेरिकेतल्या वायोमिंग राज्याला मागे टाकलेले आहे. तरी जालीय सदस्यांनी याबाबत चेनींना पत्र लिहून तातडीने लक्ष घालण्याची विनंती करण्याचे मनावर घ्यावे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैच मागे आहेत की राव.

कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकात पण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुंबईतील स्टेशनांच्या बाबतीत ईष्टकडून वेष्टकडे किंवा उलट

रेल्वेमार्गामुळे मुंबईच्या उपनगरांचे दोन भाग झाले हे खरेच. त्यांना पूर्व्/पश्चिम असे म्हणायची प्रथा आहे, हेदेखिल खरेच.

पश्चिम रेल्वे ही मुंबईच्या दक्षिणोत्तर जाते. तेव्हा तिच्यामुळे होणार्‍या उपनगरांच्या भागांस पूर्व्/पश्चिम म्हणणे ठीकच.

परंतु, मध्य रेल्वे ही मुंबईच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. तेव्हा उपनगरांचे उत्तर आणि दक्षिण असे भाग होतात. पूर्व-पश्चिम असे नव्हेत!

एकंदरीतच दिग्दर्शन करताना पृथ्वीसापेक्ष अशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा दिशांचा वापर करण्याऐवजी व्यक्तीसापेक्ष अशा उजवा, डावा असा वापर करण्यास आम्हाला (पक्षी भारतीयांना) आवडते. पृथ्वीसापेक्ष दिशांबाबत आम्ही फारच उदासीन असतो. म्हणूनच ठाण्याच्या उत्तरेकडे राहणारी व्यक्तीदेखिल आपण ठाण्याच्या पश्चिमेकडे राहते असे बिनदिक्कत म्हणते. आणि ते ऐकूनही घेतले जाते!

(कुठल्याशा नगरीच्या तिसाव्या उपनगरात राहणार्‍या एकाला कुण्या दुसर्‍याने दिग्दर्शन करताना पृथ्वीसापेक्ष दिशांचा वापर केला तेव्हा त्याने, आम्ही काय होकायंत्र घेऊन फिरतो काय, अशी पृच्छा केल्याचे ऐकीवात आहे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मध्य रेल्वे ही मुंबईच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते.

इंटरेस्टिंग, ही माहिती नवीनच कळली.

>>एकंदरीतच दिग्दर्शन करताना पृथ्वीसापेक्ष अशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा दिशांचा वापर करण्याऐवजी व्यक्तीसापेक्ष अशा उजवा, डावा असा वापर करण्यास आम्हाला (पक्षी भारतीयांना) आवडते. पृथ्वीसापेक्ष दिशांबाबत आम्ही फारच उदासीन असतो. म्हणूनच ठाण्याच्या उत्तरेकडे राहणारी व्यक्तीदेखिल आपण ठाण्याच्या पश्चिमेकडे राहते असे बिनदिक्कत म्हणते.

म्हणजे त्या व्यक्तीने 'डाव्या' ठाण्यात राहातो/ते, असे म्हटले पाहिजे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु, मध्य रेल्वे ही मुंबईच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. तेव्हा उपनगरांचे उत्तर आणि दक्षिण असे भाग होतात. पूर्व-पश्चिम असे नव्हेत!

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय सेवेचा बृहन्मुंबईच्या हद्दीतला जो भाग आहे, त्याच्या एकंदर दिशेस बर्‍यापैकी दक्षिणोत्तर काँपोनंट आहे. त्यामुळे, मुंबईपुरतेच बोलायचे, तर त्याही सेवेवरील उपनगरांच्या भागांस पूर्व-पश्चिम नावांनी संबोधणे तरीही काहीसे सयुक्तिक असू शकते. (ठाण्यापासून पुढे मात्र हा मार्ग बर्‍यापैकी पूर्व-पश्चिम जातो, याबद्दल सहमत.)

एकंदरीतच दिग्दर्शन करताना पृथ्वीसापेक्ष अशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा दिशांचा वापर करण्याऐवजी व्यक्तीसापेक्ष अशा उजवा, डावा असा वापर करण्यास आम्हाला (पक्षी भारतीयांना) आवडते. पृथ्वीसापेक्ष दिशांबाबत आम्ही फारच उदासीन असतो.

मुंबईच्या विशिष्ट भूगोलामुळे तेथील उपनगरांच्या संदर्भात पूर्व-पश्चिमभेद सहज करणे शक्य होते. इतर शहरांत ही पद्धत अर्थातच शक्य नाही. आणि त्याचमुळे...

(कुठल्याशा नगरीच्या तिसाव्या उपनगरात राहणार्‍या एकाला कुण्या दुसर्‍याने दिग्दर्शन करताना पृथ्वीसापेक्ष दिशांचा वापर केला तेव्हा त्याने, आम्ही काय होकायंत्र घेऊन फिरतो काय, अशी पृच्छा केल्याचे ऐकीवात आहे!)

...ही प्रतिपृच्छा त्या (किंवा बहुतांशी इतर कोणत्याही) नगरीच्या रहिवाश्याच्या संदर्भात रास्त आहे, असे सुचवावेसे वाटते.

(बाकी, प्रतिपृच्छा रास्त असली, तरी या विशिष्ट शब्दांत प्रतिपृच्छा ऐकावयास मिळणे हे बहुधा त्या विशिष्ट नगरीच्या दुसर्‍या आणि तिसाव्या - आणि आता, ल्याटरल पॉप्युलेशन शिफ्टमुळे, एकोणतिसाव्या आणि अडतिसाव्याही - उपनगरांतच शक्य व्हावे. चूभूद्याघ्या.)

म्हणूनच ठाण्याच्या उत्तरेकडे राहणारी व्यक्तीदेखिल आपण ठाण्याच्या पश्चिमेकडे राहते असे बिनदिक्कत म्हणते. आणि ते ऐकूनही घेतले जाते!

अहो ठाण्याच्या लोकांचे काय घेऊन बसलात? ते तर बाहेरील (बोले तो, बृहन्मुंबई+ठाणे+डोंबिवली+कल्याण परिसराबाहेरील) त्रयस्थ व्यक्तीस सांगताना 'आपण मुंबईत राहतो', असेही बिनदिक्कतपणे सांगतात. आणि ते ऐकूनही घेतले जाते. (आणि ठाण्याचेच कशाला? डोंबिवली-कल्याणचेपण.)

पूर्वी (म्हणजे ज्या काळी त्याबद्दल मार खावा लागत नसे, अशा काळी) आपण 'बाँबे'त राहतो, म्हणून सांगत असत; आता 'मुंबई'त राहतो म्हणून सांगतात, इतकाच काय तो फरक. असो.

(अवांतर: हे ठाणे-स्पेसिफिक आहे, असा दावा नाही. आम्हीही बाहेरच्या लोकांना सांगताना आम्ही 'अटलांटा'त राहतो, म्हणूनच सांगतो. आम्ही राहतो तो भाग (सामान्यतः 'मेट्रो अटलांटा' या लोकप्रचलित नावाने संबोधल्या जाणार्‍या क्षेत्रात असला, तरी) (१) तत्त्वतः अटलांटा शहराच्या हद्दीत येत नसला, (२) त्यास स्वतःची नगरपालिका असली, आणि (३) अन्य एका कौंटीचे (पक्षी: जिल्ह्याचे) ते मुख्यालयाचे ठिकाण असले, तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्यापलिकडेही हा मार्ग बराच काळ पूर्व-पश्चिम दिशेने धावत नाही. कल्याणनंतर एक मार्गे बर्‍यापैकी दक्षिणेला वळतो तर दुसरा इशान्येला. (पण दादर ते ठाणे हे ही इशान्य-नैऋत्य दिशेनेच धावतात जर त्याला दक्षिण-उत्तर म्हणायचे तर कसारा लाईनलाही म्हणावे लागेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठाणे ते कल्याण मार्ग बराचसा पूर्व पश्चिम जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दरवेळी काय वेगळे लिहायचे असे वाटते. आपल्या मनातील शंका टिपण्या आधीच कोणी लिहिल्या असल्या की इतक्या माहितीपूर्ण लेखाला नुसते चान चान काय म्हणायचे असे वाटते.
तेव्हा श्री कोल्हटकर यांना सांगणे आहे की प्रत्येक वेळी प्रतिसाद देण्याइतकी शब्दसंपदा माझ्याकडे नाही मात्र याचा अर्थ असा नाही की आम्हाला लेखन आवडले नाही किंवा आम्ही ते वाचले नाही.

तुम्ही लिहित रहा.. आम्ही वाचतो आहोतच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. ही लेखमाला आवडते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश म्हणतात ताला +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुलाब्याची दांडी, भाऊचा धक्का वगैरे स्थलविशेषांबद्दल जे ऐकतो, ती नेमकी कोणती? त्यांचा (/ त्यांच्या नावांचा) इतिहास काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे 'टी. टी'. म्हणजे ट्राम टर्मिनस ह्याबद्दल शंका नाही. पण हे टर्मिनस तेथून किंग्ज सर्कलपर्यंत उत्तरेकडे कधी सरकले ह्याविषयी काही माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0