माहिती शिणवटा
मागील महिन्यात http://www.4hourlife.com/2012/03/17/the-5-foods-of-a-low-information-di… हा दुवा वाचनात आला होता.
तेव्हापासून - सुमारे १५ दिवसांपूर्वी - बातम्या वगैरे वाचणे-ऐकणे-पाहणे बंद करायचे असे ठरवले होते.
१. एकही वर्तमानपत्र/ किंवा त्याचे संकेतस्थळ उघडायचे नाही
२. एनपीआर वगैरे इन्फोटेनमेंट व बातम्या देणारे रेडिओ ऐकायचे नाहीत
३. सीएनएन-फॉक्स-एनबीसी-लोकल बातम्या वगैरे टीवीवर पाहायच्या नाहीत.
काही अपवाद
१. हवामानसंबंधी माहिती आवश्यक आहे. (पार्किंगपासून ऑफिसपर्यंत चालत येताना भिजू नये यासाठी छत्री ठेवावी की नको). फक्त त्या संदर्भातील बातम्या मिळतील अशी सोय फोन व कॉम्प्युटरवर करुन ठेवली आहेत.
२. मित्रांबरोबर किंवा इतरत्र (ऐसीवगैरे) खेळकर गप्पांमधून ज्या काही बातम्या कळतील तेवढ्या पुरे.
काय झाले
१. एकदोनदा सवयीने गूगल न्यूज व बिझनेस लाईन उघडले गेले. लगेच बंद करुन टाकले.
२. मी बातम्या न वाचूनसुद्धा जग व्यवस्थित चालू आहे याची जाणीव झाली.
३. बातम्यांसंदर्भातील विविध विषयांवरील माझा बहुमोल सल्ला कुणालाही न सांगूनही कोणाचेही काहीही बिघडलेले नाही
४. तरीही महत्त्वाच्या बातम्या कळल्याच. उदा. मराठा आरक्षण, आयसीसचे काय चालले आहे. भारतीय नर्सेसची सुटका, बजेट या आठवड्यात आहे, शेअर बाजार चढला व आज आपटला.
५. बराच वेळ वाचला व शिणवटा कमी झाला.
आणखी १५ दिवस ही पॉलिसी सुरु ठेवून मग माफक फेरफार (आठवड्यातून एकदा बातम्या ऐकणे वगैरे) करुन कायम अंमलात आणावी की काय असा विचार करतो आहे.
आँ?
तुम्ही हे केलत ह्यात इतकं वेगळं वाटण्यासारखं नेमकं काय आहे?
बहुतांश बातम्या मी तरी मथळे पाहून सोडून देतो (किंवा मित्रांच्या गप्पांतून समजतं तेवढच जवळ ठेवतो).
राजकारणी लोक जे काही बोलतात त्यावर तातडीने प्रतिक्रिया वगैरे नोंदवत बसलं तर अवघड आहे.
भारताची लोकसंख्या , आकारमान लक्षात घेतलं तर सतत इतकी सारी माणसं, विविध राजयतले सत्ताधारी वा विरोधक काही ना काही बोलत असणारच. प्रत्येकाचीच दखल घेउन त्याला फैलावर घेण्याचा क्षीण प्रयत्न वगैरे कशाला करायला जायचं?
अशा बर्याच गोष्टी आहेत. हां, काही लेख,वृत्तपत्रातील एखादे सदर/कॉलम (वासलेकर, मुक्तपीठ पासून ते सय - तिरकी रेघ -स्वामिनॉमिक्स्,जुग सुरैय्या, नरसिंहन , पनीरसेल्वन वगैरे) मात्र मी आवर्जून वाचतो.
माहिती शिणवटा - काही प्रश्न
>> ५. बराच वेळ वाचला व शिणवटा कमी झाला.
- माहितीचे स्रोत आणि प्राधान्य बदललं तर वेळ/शिणवटा कमी होऊ शकतो का? उदा : भारतापुरतं बोलायचं झालं, तर हिंदू आणि लोकसत्ताच्या मथळ्यांवरून आणि संपादकीयावरून नजर टाकली तर १०-१५ मिनिटांत पुष्कळशा गरजा भागू शकतात. आंतरराष्ट्रीय बातम्यांबद्दल - बीबीसी रेडिओवरच्या 'न्यूजडे'सारख्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमाचा असाच उपयोग होतो. शिवाय, घरातली कामं उरकता उरकता रेडिओ ऐकता येतो.
- शेअर मार्केट आणि एकंदर जागतिक बाजारपेठा वगैरेंमध्ये (म्हणजे सारख्या बदलत्या गोष्टींमधून मोठा फायदा/तोटा होऊ शकतो अशा गोष्टींमध्ये) ज्यांना रस असतो त्यांना हा माहिती शिणवटा विशेष जाणवतो का?
- पाश्चात्य देशांत असा माहिती शिणवटा अधिक प्रमाणात जाणवतो का?
- इतर कोणती कारणं त्यामागे आहेत का?
- जग व्यवस्थित चालण्याविषयी किंवा आपल्या सल्ल्याविना कुणाचं काही न बिघडण्याविषयी - असा प्रश्न पडला की हे लक्षात येण्यासाठी असा माहितीउपास करण्याची गरज का भासली असावी?
उत्तरं
अतिरिक्त माहितीचा 'त्रास' होतो आहे. (उदा. कामात लक्ष कमी लागणे, व्यसन लागल्याप्रमाणे दर दहा-ते-तीस मिनिटांनी बातम्या तपासणे, सकाळी व संध्याकाळी नेमाने वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे असे कृत्रिम बंधन घातल्यासारखे वागणे, बातम्या/माहिती मिळाली नाही तर चिडचिड होणे वगैरे लक्षणे दिसू लागली होती. ) फेसबुक वगैरे बंद करुन वर्षे झाली. त्यामुळे फेसबुक नसले तरी इतर ठिकाणच्या 'न्यूजफीड' वगैरेंचे व्यसन नाही हा माझा गैरसमज होता हे लक्षात आले. सुरुवातीला माहितीचे स्रोत आणि प्राधान्य बदलून पाहिले होते. टाईम्स ऑफ इंडिया व तत्सम प्रकारांचे वाचन बंद करुन काही वर्षे होऊन गेली. मटा-सकाळ वगैरेही क्वचित उघडत होतो. हिंदू, बिझनेस लाईन, लोकसत्ता वगैरेंपुरते वाचन मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एकंदरीत या बातम्या वाचून आपल्याला काहीच फरक पडत नाही त्याचबरोबर बातम्या न वाचूनही फरक पडत नाही. मग हे कष्ट कशासाठी घ्यायचे असा एक प्रश्न पडला होता. वर्तमानपत्रे/बातम्यांमध्ये ज्या काही गोष्टी घडताहेत असे कळवले जाते त्यावर आपले ० टक्के नियंत्रण असते. निव्वळ प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त आपण काहीच करु शकत नाही. या प्रतिक्रियांचाही काही उपयोग नसतोच. शिवाय क्वचित/कमी घडणाऱ्या घटना (बलात्कार वगैरे) इतक्या हायलाईट करुन सांगतात की आपला सगळा दृष्टिकोणच बदलून जातो.
मग मनोरंजनाचे इतर - अधिक रिलॅक्सिंग किंवा क्रिएटिव असे - काही स्रोत आहेत काय हे तपासून पाहावे असे वाटले.
शेअर मार्केटमधील माहितीचा शिणवटा जाणवतो हे खरे आहे. पण अॅक्टिव ट्रेडिंग वगैरे न करणाऱ्यांना त्याचा फारसा फरक पडत नसावा. पाश्चात्य देशात शिणवटा अधिक जाणवतो की काय हे नक्की सांगता येणार नाही. पण मला भारतात हे कधी जाणवले नाही. इथे माझे कंफर्ट सर्कल बरेच मर्यादित होत आहे हे लक्षात येते आहे.. अमुकतमुकच तापमान हवे, सनस्क्रीन लोशन हवे वगैरेंचा विचार मी भारतात कधी केला नव्हता. अतिरिक्त माहिती/बातम्यांमधून माझे नकळत कंडिशनिंग होत आहे की काय असा एक प्रश्न पडलाय.
यप्स
मेरकु भि यैच लग्ता.
वृत्तपत्र मी का वाचतो?
सगळ्या बातम्या तपशील्वार वाचून शिरेसली घेणे तसेही परवडत नाही. तरी नियमित वृत्तपत्र वाचतो.
ते का ?
स्थानिक घडामोडिंची चांगली माहिती मिळते.
उदा :- आषाढी - कार्तिकीच्या निमित्तनं कोणते रस्ते बंद राहतील, म्हातोबाची यात्रा कधी आहे वगरिए.
कधी आसपासचा एखादा पूल धोकादायक बनलेला असतो, तेही बातम्यातूनच समजते (कालच घराजवलच्या फ्लायओव्हरची भन्नाट बातमी समजली. त्याचा कठडा बोंबललाय.)
"आधे-अधुरे" हे मोहन राकेशच्या नाटकाचं मराठी सादरीकरण परवा एका गटानं इकडे केलं होतं.
ह्याचे नियमित प्रयोग काही व्यावसायिक नाटकांसारखे होत नाहित.
वृत्तपत्र वाचलं नसतं तर त्याचा पत्ता लागण्याचे कमी चान्सेस होते.
आसपास कधी कधी मोफत मेडिकल क्याम्प वगैरे होतात; त्याचाही पत्ता पेप्रातून लागतो.
मतदार याद्या बनवल्या जात होत्या तेव्हा जवळच्या केंद्राची माहितीही तिथून मिळते.
(आंतरजालावरही मिळते. पण तिथे जाउन मुद्दम कशाला पहायचे, स्वतःहून पेपरवाले हा ट्रिगर उपलब्ध करुन देताहेत तर वापरावा.)
बाकी "मोदी आता विकास करणारेत. बोला मोदिंचा ..." असल्या अर्थाच्या बातम्या नि गप्पांच्या वेळी मीही "विजय असो" असे ठोकून देतो.
त्यासाठी प्रत्येक बातमी आख्खी वाचत बसणं परवडत नाही.
नको तितक्या अपेक्षा?
व्यसन वगैरे लागत असेल तर गोष्ट वेगळी, पण -
>> मात्र एकंदरीत या बातम्या वाचून आपल्याला काहीच फरक पडत नाही त्याचबरोबर बातम्या न वाचूनही फरक पडत नाही. मग हे कष्ट कशासाठी घ्यायचे असा एक प्रश्न पडला होता. वर्तमानपत्रे/बातम्यांमध्ये ज्या काही गोष्टी घडताहेत असे कळवले जाते त्यावर आपले ० टक्के नियंत्रण असते. निव्वळ प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त आपण काहीच करु शकत नाही. या प्रतिक्रियांचाही काही उपयोग नसतोच.
इतका उपयुक्ततावादी दृष्टिकोण ठेवण्याची गरज असते का? एके काळी आपल्या गावात काय घडतंय इतपत माहिती पुरेशी असे, पण जगाची व्याप्ती आणि त्याचे आपल्यावर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम जसजसे वाढू लागले तसतसा माणसाचा परिघ विस्तारला आणि त्या परिघाविषयी किमान जाण असणं गरजेचं ठरू लागलं असं वाटतं. 'किमान' म्हणजे किती ते व्यक्तिसापेक्ष असू शकेल, आणि 'अजिबात नको' हेदेखील त्या वैविध्यात बसू शकेल, पण 'फरक पडत नाही', 'नियंत्रण नाही' असं वाटल्यामुळे ते नकोसं वाटणं ह्यात एका व्यक्तीकडून (किंबहुना स्वतःकडूनच) नको तितक्या अपेक्षा ठेवल्यासारखं वाटतंय.
स्पष्टीकरणाचा प्रयत्न
इतका उपयुक्ततावादी दृष्टिकोण ठेवण्याची गरज असते का?
ह्या उपयुक्ततावादी दृष्टिकोणामागची भूमिका आणि माझं स्वतःचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. ह्याला वैज्ञानिक आधार नाही त्यामुळे अत्यंत हलकेच घेतले तरी चालेल. :)
असं आहे की एखादी बातमी वाचल्यानंतर त्या बातमीचे विदाबिंदू साठवणे, बातमीचे विश्लेषण करणे, त्यातून आपल्याला स्पर्श करु शकणाऱ्या मुद्दयांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार प्रतिक्रिया तयार करणे. (येथे प्रतिक्रिया म्हणजे संकेतस्थळावरील प्रतिसाद असे नसून एकंदर रोजच्या जगण्यात या विशिष्ट मुद्द्याला आपण कसे सामोरे जाऊ हे ठरवणे असे आहे.) यातील बहुतेक गोष्टी माझ्या बाबतीत नकळतच होतात. उदा. आजची बातमी - उत्तरप्रदेशात अमुकतमुक गावात बलात्कार झाला. (बातमी वाचलेली नाही पण कुठेतरी झालाच असेल). ह्या बातमीची माहिती साठवणे, प्रोसेसिंग करणे, बातमीसंदर्भातील माझी नकारात्मक भूमिका तयार करणे, एकंदरीत जग कसं रसातळाला चाललं आहे या निष्कर्षाला पुन्हा एकदा अधोरेखित करणे असा साधारण प्रवास असतो. या सर्व गोष्टीमध्ये मेंदूची माहिती साठवण्याची आणि विश्लेषणाची मर्यादित क्षमता यावर विनाकारण ताण पडतो आहे. आणि हा सर्व भार निरुपयोगी आहे. ही क्षमता मी खरोखरीच्या उपयुक्त गोष्टींमध्ये वापरली (एखादा चांगला छंद जोपासणे, नवीन गोष्ट - भाषा, कला - शिकणे) तर उत्तम आनंद मिळू शकेल.
दुसरा मुद्दा असा की खरोखरची माहिती देणारे स्रोत अत्यंत मर्यादित आहेत. बहुतेक माहितीस्रोतांमध्ये वेगवेगळ्या उत्पादनांचे मार्केटिंगच चालू आहे हे थोडे पाहिले तरी लक्षात येते. या तथाकथित माहितीपासून अलिप्त झालो की मार्केटिंगपासूनही अलिप्त होता येईल असा एक फुटकळ प्रयत्न करुन पाहायचा आहे.
तिसरा मुद्दा असा की या माहितीस्रोतांमध्ये अत्यंत विचित्र बातम्या देण्याची चढाओढ लागलेली आहे. नेहमीच्या आयुष्यात घडणाऱ्या मिळमिळीत बातम्या कोण वाचणार? त्यामुळे ज्या गोष्टी घडण्याची शक्यता अत्यंत कमी असते अशा क्वचित घडणाऱ्या गोष्टी हेडलाईन्समध्ये दिल्या तर बातम्यांचे ग्राहक वाढण्याची शक्यता जास्त असते.
परिप्रेक्ष्य
बातमीचे विश्लेषण करणे, त्यातून आपल्याला स्पर्श करु शकणाऱ्या मुद्दयांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार प्रतिक्रिया तयार करणे. (येथे प्रतिक्रिया म्हणजे संकेतस्थळावरील प्रतिसाद असे नसून एकंदर रोजच्या जगण्यात या विशिष्ट मुद्द्याला आपण कसे सामोरे जाऊ हे ठरवणे असे आहे.)
विचित्र बातम्या आणि अनेक विषयांशी संबंधीत विश्लेषणयुक्त लेख + माहितीपर लेख एकाच वृत्तपत्रात आढळणे शक्य आहे, पण ते वृत्तपत्र आपल्याला 'सहज' उपलब्ध होणे हि महत्त्वाची बाब आहे. त्यापैकी विचित्र बातम्या गाळणारे किंवा त्याला कमी महत्त्व देण्याचे तंत्र अवलंबणे प्रयत्नाने शक्य व्हावे, पण विश्लेषणयुक्त लेख + माहितीपर लेख आपली भुमिका(बिलीफ)/विचार घडवण्यात मदत करतात, अनेक परिप्रेक्ष्य लक्षात घेण्याची सवय विकसीत करण्यास त्यायोगे मदत होते, आणि हे सगळे आपण आपल्याच आनंदासाठी करत असलेल्या कृतीमधे(छंद, नाती, रोजचे जीवन) आपल्याला अधिक परिणामकारकरित्या वापरता येते. अनेक परिप्रेक्ष्यांबद्दल विचार करण्याची सवय हि वाचनाने, चर्चेने, चिंतनाने आत्मसात करता येऊ शकते असे माझे मत आहे.
छापील वृत्तपत्र
इंटरनेटवर वृत्तपत्र वाचण्याचे फायदे अनेक असले तरी नकळत केवळ आपल्यालाच रस असलेल्या क्षेत्रातल्या बातम्या वाचणे (उदा. राजकारण/क्रीडा) किंवा केवळ ठळक/मोस्ट व्ह्यूड बातम्या वरवर वाचून पुढे सरकणे किंवा निरनिराळ्या संकेतस्थळांवर तीच बातमी परत वाचत बसणे इ. प्रकार बळावतात, असा माझाही वैयक्तिक अनुभव आहे.
मात्र भारतातल्या सवयीप्रमाणे येथेही छापील वृत्तपत्र घरपोच घेणे सुरू केल्यावर काही बदल जाणवले. एक म्हणजे, ज्या क्षेत्रात विशेष रस नाही किंवा आवड/नावड असं काहीच ठाम मत नाही - त्या विषयांतल्या बातम्या अथवा लेखही नजरेसमोर असल्याने वाचले गेले. ['लोकसत्ता' येथे येणे शक्य नाही, पण साईटवरील बातम्या वाचण्यापेक्षा इ-पेपर उघडून वाचायला अधिक आवडतो.] अजून एक टॅब उघडून किंवा लिंकवर क्लिक करून इतरत्र जाण्याची सोय नसल्याने दीर्घ लेख वाचताना "लिंक" तुटण्याचे प्रमाण कमी झाले. सप्ताहांताच्या वाचनीय पुरवण्यांतले लेख वाचले गेले - जे अन्यथा बहुधा इंटरनेट आवृत्तीच्या तळाशी पडून राहिले असते. स्थानिक कार्यक्रमांची आणि प्रदर्शनांची माहिती मिळाली (येणारे वृत्तपत्र राष्ट्रीय पातळीवरचे असले तरी). परिणामी, एकंदरीतच निरनिराळ्या न्यूज सायटींवर भटकण्याचे प्रमाणही आपसूक (मुद्दाम प्रयत्न न करता किंवा तसा उद्देश नसूनही) बरेच कमी झाल्याचे जाणवले.
माहितीचे स्रोत
>> दुसरा मुद्दा असा की खरोखरची माहिती देणारे स्रोत अत्यंत मर्यादित आहेत.
>> तिसरा मुद्दा असा की या माहितीस्रोतांमध्ये अत्यंत विचित्र बातम्या देण्याची चढाओढ लागलेली आहे.
ह्या दोन कारणांसाठी बातम्या अजिबात न वाचणं असा उपाय करण्यापेक्षा गंभीर प्रवृत्तीच्या बातम्या आणि विश्लेषणं देणारी माध्यमं निवडता येणार नाहीत का? अन्यथा, हे अंघोळीच्या पाण्याबरोबर बाळाला फेकून देण्यासारखं वाटतंय.
चांगला प्रयोग आहे. करायला
चांगला प्रयोग आहे.
करायला आवडले असते पण...
पण हाफिसातून न्यूज साईट्स नी ऐसी तेवढेच उघडते. हे नै केले तर काम करावे लागेल ;) :P