छान सुट्टं सुट्टं

छान सुट्टं सुट्टं

लेखक - वंकू कुमार

ह्या घराचा उंबरठा ओलांडताना तू शांतपणे एक्झिट घेणार नाहीस आणि तुला सांभाळता सांभाळता मी किती नाजूक होऊ शकते ते तुला कळेल अशी माझी अपेक्षा होती. तुला सर्वप्रथम दुखावताना मला डोळ्यांसमोर हा क्षण दिसला होता. इतके दिवस ह्या दिवसासाठी जय्यत तयारी करून मी अजेय बनले होते. पण शेवटी तू एक पोकळ पवित्रा घेतलास. प्रेमाने मला असहाय करून सोडलंस.

ह्या घराच्या गार्डनमध्ये तू येण्याआधी खड्यांचं राज्य होतं. तू त्यात फुलं लावली होतीस आणि सगळ्या घराच्या छातीत एकदम श्वास उगवल्यासारखं झालं होतं. तू गुडबाय म्हणालीस, गार्डनमध्ये शिरलीस. तिथल्या रंगीबेरंगी फुलांचे निरोपापूर्वीचे लाड केलेस. फूटभर उंचीच्या त्या फुलांचे गंध दंगल माजल्यासारखे सैरभैर पांगले. तुला माझ्याकडे बघायचं असताना तुला माझ्याकडे बघायचं नव्हतं. किती शांत, तरल हातांनी तू चपला पायावेगळ्या केल्यास आणि हिरवळीवर तुझे शुभ्र तळवे मांडलेस. सोन्याच्या लगडीसारखे ते तळवे हिरवळीवर फिरताना मला अचाट नाजूकपणाचा अटॅक येणार होता. वाटत होतं तू जशी असशील तशी असशील; तुला नजरबंद करून टाकावं, तुला गुप्त करून टाकावं. वशिलेबाजी करून, हातापाया पडून त्या कोणत्या शक्तीचा पाठपुरावा करावा जी तुला मला अमर करून टाकेल. मग तू उभी आडवी फिरलीस. खाली पडलेला पेरू उचललास आणि दुरून माझ्यापाशी फेकलास. गार्डनमध्येच नळाखाली पायांवरचा विटकरी चिखल धुतलास. मी फेकलेला टॉव्हेल पकडलास आणि बाळाचं अंग पुसावं तसे ते सुंदर तळवे कोरडे केलेस. मी पोर्चमध्ये उभी राहून तू फेकलेला पेरू न्याहाळत होते. त्याला राघूंनी छिद्र पाडलं होतं आणि त्या छिद्रात मुंग्यांचं एक पथक निर्नायकी अवस्थेत खिळून राहिलं होतं. मी त्या पक्व फळाचा पिवळा गंध घेतला आणि पोर्चबाहेर तो पेरू भिरकावून दिला. कदाचित माझ्या हाताची ती निर्भय लकेर, ती उद्दाम बेफिकीर केवळ तुझ्यासाठीच होती असं तुला वाटलं असेल. पण तूच मला एकदा सांगितलं होतंस - माझ्या प्रत्येक कृतीचा अर्थ लावण्याची इच्छा आणि कुवत तुझ्यात असेलच असं नाही. त्यामुळे मी तुझ्यावर एवढी रिस्क घेऊ शकते असं मी ठरवून टाकलं.

तू आता निघशील असं तुझ्या हालचालीवरून कळलं की मी मुद्दाम नजर तोडत होते, आत जाऊन येत होते, पोर्चमध्ये खुर्च्या-टेबल टापटिपीने ठेवत होते. मला ठाऊक होतं तू शेवटच्या क्षणासाठी एक निश्चित स्पेशल इफेक्ट ठरवून ठेवला असशील. आणि म्हणूनच मी तो क्षण थोडा आणखी लांबवू पाहत होते. नितळ पाण्यासारखी तू माझ्या समोर उभी राहून माझ्या डोळ्यांत पाहिलंस आणि नजरेतही वेदना न बाळगता तू कोमल पावलं टाकत निघून गेलीस. मग मी गार्डनमध्ये जाऊन टापटिपीच्या चारदोन गोष्टी केल्या. बराच वेळ अनाहूतासारखी इकडे तिकडे वावरले. गेट लावून घेतलं आणि शर्टची बटन्स काढत काढत शॉवर घ्यायला बंगल्यात शिरले.

त्याच्या दुसर्‍याच दिवशी ह्या घरात सुधींद्र एन्टर झाला. शिळोप्याच्या गप्पा मारता मारता लखलखीत तत्त्व बाहेर पडावं तसा त्याचा माझा दोस्ताना सुरू झाला होता. तो घरात आला तरीही त्याचं बाहेरच्या पेरूंबद्दलचं नवल संपलं नव्हतं. त्यानं नंतर खास बाहेर जाऊन गार्डनमध्ये अगदी प्रेमानं वेळ घालवला होता. तिथल्या रोपांशी त्याची त्याची जवळीक साधली होती. हातांनी गुलाबांवर माया करत बंगाली स्टाईलचं एक गाणं तो गुणगुणत होता. त्या गाण्याचे बोल त्याला आठवत नव्हते . सुधीला कोणत्याच गाण्याचे सर्व शब्द आठवत नसत. त्यामुळे त्याची गाणी नुसती फळकुटं एकमेकांवर ठोकलेल्या आंब्याच्या पेटीसारखी रिकामी वाटायची. तो गायला लागला आणि मला घर धडधडतंय की काय असं वाटायला लागलं. मी कटाक्षाने पोर्चमध्ये जायचं टाळलं. आता सांगायला फारच सुपरस्टीशयस वगैरे वाटतं. पण तेव्हा तुझी गाणी भुतं होऊन माझ्याभोवती फेर धरतील की काय असं वाटलं होतं. सुधीनं चहा केला, देताना सांडला, पोतेर्‍यानं साफसफाई करण्याच्या निमित्ताने तो घरभर पसरला आणि मनसोक्त मुक्ताफळं स्वत:च्या नावे उधळून घेतली. शिव्या किती गोड चेहर्‍यानं खाता येतात ह्याचा आदर्श म्हणून नोबेल प्राईझ मिळवू शकेल असा सुधी हा एकमेव हुशार विद्यार्थी असावा. माझ्या धारदार वैतागाने त्याच्या उत्साहावर एकही चरा पडला नव्हता. उलट तो एकामागून एक न सुटणार्‍या कोड्यांसारखा न येणारी गाणी गात सुटला. जिथे जिथे त्याला शब्द अडायचा तिथे तिथे तो माझ्याकडे बघून डोळ्यांनी विचारणा करायचा. बहुतेक गाण्यांचे मुखडे त्याने संपवले की नंतर अंतर्‍याचं राज्य माझ्यावर यायचं. इतका उच्छाद मांडला त्यानं की मी त्याला घराची डेअरी केल्याबद्दल झापतेय की गाणी न येण्याबद्दल तेच मला कळेना. तू इथे आली होतीस तेव्हा म्हणाली होतीस, “माझ्या जगायच्या गणितात असा एक अपूर्णांक आहे जो ह्या घरात आल्यावर पूर्ण झाला, त्याला नि:शेष भाग जाऊ लागला” . सुधीच्या बाबतीत ते कोणतं अपूर्णांग आहे, जे तो इथे राहायला लागल्यापासून भरून निघतंय त्याचा शोध मी घेतेय. नाहीतर फक्त महिन्याभराच्या ओळखीवर त्याला ह्या घरात जागाच काय, अपमानही मिळाला नसता.

सुधीनं त्याची भीषण गाणी थांबवली, कारण मी त्याच्या पुढ्यात पेरूंची फुल् भरलेली परडी ठेवली. नंतर त्या पेरूंत तिखटमीठ ठासून सूंकसूंक करत नाक ओढत तो जो टेबलाशी बसला, तो नंतर काही इथून जायचं नावच घेईना. मी कितीदा बोलले, पाणउतारा केला. पण त्याच्या निष्ठेत जराही कसूर झाली नाही. घराचं माळरान आणि ऑक्सिजनची चंगळ झाल्यासारखे आम्ही भिरभिर सुटलो होतो. अख्खा दिवस संपून रात्र होईपर्यंत पिक्चरच काय बघितले, गाणीच काय ऐकली, बियरच काय ढोसली! आणि पुन्हा रात्र झाल्यावर आवराआवर न करता गेमच काय खेळत बसलो! जेवलोच काय स्फोटक आणि ढेकरच काय देत बसलो करवतीच्या आवाजासारखे!

मग झोप यायला लागली तसे उठलो. सुधीनं मला विचारलं, मी कुठे झोपू? मी त्याला त्याच्यापेक्षा बालीशपणे म्हटलं, जिथे जागा मिळेल तिकडे झोप, एवढा मोठ्ठा बंगला आहे. त्याने जीभ बाहेर काढून विद्रूप तोंड केलं आणि पाठीत पोक काढून गळा आवळावा तसे हात माझ्या समोर करून मला घाबरवलं. मग त्याला काय वाटलं कोण जाणे, त्याने एकदम स्वत:चा विदुषकी रंग पुसला आणि चेहरा ताणून तो इतिहास पाहावा तसं अख्ख्या घराचं अवलोकन करू लागला. माझा तोल जात होता म्हणून मी गुटगुटीत झोपून घेतलं, पण सुधी तुझ्या खोलीत शिरला आणि रात्रभर काही न काही गुणगुणत होता. सकाळी उठून मी त्याच्या खोलीत गेले. मला हृदय एकदम डावीकडून उजवीकडे आलं की काय असं वाटण्याइतका ताण आला. तू तुझी कपाटं, शेल्व्ज आणि तसबिरी काढून घेऊन गेलीस पण त्यांच्यामागचा तू इथे येण्याआधीचा रंग भिंतीवर ताजा कर्कश्श दिसत होता. रात्रभर त्या खोलीत काढून सुधीनं काय स्टोरी जुळवली होती माहीत नाही, पण तो मला चहा घेता घेता म्हणाला मला इथेच राहायचंय, ही खोली माझी वाटते, ही स्पेस माझी वाटते. तुला अमाप पैशाची अपेक्षा असेल तर मी आजन्म तुझ्याकडे धुण्याभांड्यांचा व्यवसाय करायला तयार आहे. काय शब्द वापरले पठ्ठ्याने पहिल्याच दिवशी! त्याला अपेक्षित होतं मी काहीतरी सांगून निभावून नेईन, मजेमजेत त्याने त्याची मर्यादा सांभाळून कसं राहायला पाहिजे ते सुचवेन. पण त्याला कसं कळावं मी का गप्प बसले ते? मी रंगार्‍याला फोन लावून त्या खोलीला नवा रंग देण्यासाठी का सांगितलं ते? छातीत अचाट उलथापालथ होत असताना मी काहीच न झाल्यासारखी रुटीन का वागत होते ते?

जेव्हा केव्हा तू येशील, तेव्हा तुझ्या खोलीत जाऊन पाहा. तुला अजिबात आवडणार नाही अशा रंगात खोलीला नवं रूप दिलंय. तू जाताना मला अजिबात नाजूक होऊ दिलं नाहीस त्याची तुला माझ्याकडून शिक्षा. तुला फोन करणार होते, पण नंतर मी किती फोल आहे हे समजून गप्प बसले हा ता. क.

§§§

मशिदीतून महिरपी बांग ऐकू आली की सुधीला जाग येते. तो माझ्या खोलीच्या आसपासही न भटकता बाहेर फेरफटका मारायला जातो. ब्रून मस्का आणि सुलेमानी चहा पार्सल घेऊन येतो. ह्या घरानं आजवर जेवढा पाहुणचार पाहिलेला नाही तेवढा माझ्याकडून वसूल करून घेतो. त्याला राहायला येऊन दोन आठवडे झाले असतील नसतील, त्याने त्याचा बेड आणि एक गोल आयवरी रंगाचं डायनिंग टेबल आणून टाकलं. मी अवाक् झाले. ह्या माणसाच्या गळेपडूपणाला काही सीमाच नव्हती. महिनाभर मी ह्याला काही बोलले नाही, तर भलतंच काय काय गृहीत धरून बसला होता. मी त्याला इग्नोअर करायला लागले. काही बोलला तर हं हं करायला लागले. शेवटी सरळसोट बरसले, तू कधी जाणार आहेस इथून? त्याने कसलंच प्रदर्शन केलं नाही. शांतपणे टेबलवर फिकट जांभळ्या रंगाची चादर टाकली आणि अॅश ट्रे ठेवून सिगरेट फुंकायला लागला. मला काय बोलावं ते सुचलंच नाही. मी त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि अचानक मला मूकबधीर व्हावंसं वाटलं. त्याने मला सांगितलं की त्याच्या घरापेक्षा त्या सगळ्या गोष्टींची त्याला ह्या घरात गरज होती. मग मी त्याला त्या वस्तू कुठे कशा मांडायच्या त्याविषयी सूचना केल्या. त्या त्याने अजिबात मस्करी न करता मनोभावे ऐकल्या. मग आम्ही गार्डनमध्ये क्रिकेट खेळलो. पेरू खाल्ले. एकमेकांच्या घामाचे वास टाळले. त्याने काहीतरी लिहायला बसण्याचा हट्ट केला. मी त्याला गाडीत कोंबून फिरायला घेऊन गेले. तो गावातून नुकत्याच शहरात प्रकट झालेल्या मावशी किंवा आज्जीसारखा नवलाईनं शहराचे धारदार कोपरे बघू लागला. हरवून गेला. त्याला त्याचं नवल कुठे मांडावं ते कळत नव्हतं, म्हणून तो सगळ्या प्रेक्षणीय गोष्टींविषयी भरभरून बोलत होता. त्याला सांभाळून घेण्याची गरज नव्हती. आणि सारखं टोचून बोलता बोलता माझी मजा करायची इच्छा मरून गेली होती.

रात्री झोपल्यावर त्याला अचानक एकाकी वाटू लागलं, म्हणून तो उठून गेम खेळू लागला. त्याने डबे उघडून खाणं शोधलं. काही तरी चरून अस्वस्थ, पिसासारख्या गटांगळ्या खात खाली आला. गार्डनमध्ये अर्धा तास हिंडला. कुंपणाला लागून ज्या झोपड्या होत्या, तिथे राहणार्‍यांपैकी कोणी तरी गेटसमोर कचरा टाकला होता म्हणून त्यांच्याशी हुज्जत घातली आणि काही न सांगता पहाटेच्या आधी गायब झाला. त्यानंतर डायरेक्ट आला तो चार दिवसांनी. मला वाटलं तो सामान घ्यायला आला, तर त्याने येताना काळ्या नाकाचं एक मांजर सोबत आणलं होतं. शाईचं पेन झटकल्यावर शाईचे शिंतोडे उडावेत तसे काळेशार ठिपके त्या मांजराच्या चेहर्‍यावर सांडले होते. दोन दिवस तुम्ही दोघे असे निघून गेलात त्याचा विचार करत मी बसले होते. ह्या मांजराच्या कोडकौतुकात मग मला तुम्हां दोघांचाही विचार बाजूला ठेवता आला. तू असतीस तर सगळ्या घराचा ताशा करून टाकला असतास. आणि तुझ्या शिव्या खाता खाता सुधी कशी तोंडं वेंगाडतो ते मला पाहता आलं असतं.

त्या मांजराला घेऊन सुधी आयवरी टेबलाशी खेळत बसला होता, तेव्हा मी तिथे जाऊन बसले. मला त्याने त्या मांजराचं नाव मॅग्नोलिया ठेवल्याचं सांगितलं. मी लाडानं त्याला पहिल्याच फटक्यात मॅगी करून टाकलं. जांभळ्या चादरीच्या ओघळावर मॅगी नखं मारत होता. पंजे फाकवून, डोळे रोखून, डाव्या पायाचा हात करून नाचत होता. सुधीनं त्याला पोटाखाली धरलं तसा मागच्या पायांनी तो सुधीला नखं मारू लागला. आमचा चांगला दीड तास उडनछू झाला. गेले दोन दिवस मी सुधी परत येणार का नाही, आला तर का, नाही तर का, असले नाजूक तर्ककुतर्क दिवसभरात सवड मिळेल तसे करत होते. मॅगी आला आणि माझ्या कानांना दडा बसल्यासारखं झालं. कोण कुठची तू अन् सुधी. तुमच्यात गुंतावं आणि मनावरचा पापुद्रा चिमटीनं ओढून काढावा असं कोणतं कनेक्शन फिट्ट व्हावं आपल्यात, ते कळायला मार्ग नाही. तुला कदाचित वाटेल की मी गोष्टी परफेक्ट जुळवून आणणारी आदिमाया आहे. तुला ते तेव्हाही वाटत होतं, जेव्हा तुझ्यावर इम्प्रेशन्स पडण्याचा तुझा शेवटचा स्पेल चालू होता आणि मी इम्प्रेशन्स पाडण्याची विद्या नव्यानंच रिचार्ज केली होती. पण तू काय अन सुधी काय, उंच झरोक्यातून पहाटे अंगावर उन्हाची तिरीप पडावी, तसे माझ्या आयुष्यात येऊन पडलात. तुम्ही नसतात तरी माझं फार काही अडलं नसतं. पण तुम्ही आलात आणि आपण तिघांनी मजा घेतली. तिघांनी म्हणजे तू, मी आणि मी आणि सुधीनी. का कोणास ठाऊक, पण माझी खात्री आहे की तू इथे असतीस तर तुलाही सुधीला प्रेमच द्यावंसं वाटलं असतं.

§§§

सुधीला तुझ्याबद्दल कळायला जास्त वेळ लागला नाही. आम्ही युनिव्हर्सिटीतून घरी परत येत असताना अनेकदा मी तुझा विषय काढायचे. तो मला तुझ्या बाबतीतले सगळे दुनियादारीचे तपशील विचारताना मध्येमध्ये तात्त्विक काहीतरी बोलायचा. म्हणजे तू काय करतेस ह्या त्याच्या प्रश्नावर मी म्हणाले की तू एक चांगली नटी आहेस, तर म्हणायचा, खोटं वागण्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे लोक असावेत सान्निध्यात. त्यांच्याशी प्लॅटॉनिक प्रेम करण्यात काही हशील नाही. आमनेसामने की टक्कर व्हायला पाहिजे. मग मी तुझं कौतुक केलं तर मला म्हणायचा, तू जिचं एवढं कौतुक करतेयस ती वास्तविक ती नसून तिची एक आयडिया आहे. तिच्या आयडियेत रमण्यापेक्षा तिला इथे बोलाव. मग आपण बघू काय ते. मला डिवचण्यात त्याला कोण आनंद व्हायचा. खरंतर मला कोणी तरी डिवचतंय ह्याचा तुला सर्वात जास्त आनंद झाला असता. पण तू इथे असतीस तर त्याला हा आनंद मिळू शकला नसता हे ध्यानात घे. मी त्याला सांगितलं की फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. महिन्याभरात ती भेटायला येईलच. तेव्हा तुम्ही दोघं मिळून आयडिया आयडिया खेळत बसा. आणि मी तुमची पंच होईन. पुढचा अर्धा तास आम्ही तू इथे आलीस की तुम्ही माझी कशी केस घ्याल, हा सीन इम्प्रोव्हाईज केला. सुधीनं तुझी हूबेहूब नक्कल करून त्याचे आणि तुझे दोघांचेही संवाद म्हटले. मी त्याला विचारलं, तू क्षितिजाला बघितलं नाहीस तरी तिची नक्कल परफेक्ट कशी जमली तुला? त्याने मला उत्तर दिलं आणि माझं तोंड बंद केलं. पुढचा बराच वेळ मला जिकिरीने काढावा लागला. वेगवेगळे विषय काढून हवा खेळती ठेवावी लागली. दुपारची वेळ होती आणि खूप उष्मा होता घरात. म्हणून मग मी उठले, त्याच्याकडे हसून बघितलं आणि माझ्या रूममध्ये जाऊन ए.सी. लावून झोपून गेले.

पाण्यात गर्द हिरव्या रंगाच्या वेली आणि त्यांच्यावरची पानं दिसली मला झोपेत. स्वप्नात. मी पाण्यातून हळुवारपणे माझा डावा हात फिरवत होते. मागे-पुढे, वर-खाली डुंबवत होते. माझ्या तळव्यावर गर्द पिवळा रंग होता आणि बोटांत हिरवी फ़ुलं अडकत होती. सुधीच्या विचारांनी मला झोपेत एक अस्वस्थ तिरीमिरी आली होती. कधी कधी हा मुलगा अतोनात सेन्सिटिव्ह वागायचा. मला अगदी नाजूक करून सोडायचा. दाढी केस करायचा नाही. दिवसभर आंघोळ करत बसायचा. बकासुरासारखा भीषण खात सुटायचा. लेखकांचा, कवींचा आणि त्याच्या शिक्षकांचा राग राग करायचा. आमच्यात कधी तसे प्रेमाचे संवाद झाले नाहीत. पण आम्ही ज्या खुबीने एकमेकांपासून आपआपलं अंतर राखून होतो त्यात आम्हांला ठाऊक होतं, की खूप प्रेम आहे. नितांत लोभस प्रेम. पण त्याच्या सेन्सिटिव्ह होण्याच्या स्पेलमध्ये तो कधीच संवादासाठी उपलब्ध नसायचा. त्याचं असणं अगदी फॅक्च्युअल ठेवायचा. मीही मग त्याच्या वाटेला जायचे नाही. तुला ठाऊक आहेच मी कशी आहे ते. त्याला त्याच्या भरवशावर ठेवून मी माझ्या माझ्या कामाला निघायचे आणि दिवसभर मला या मुलाची आयडिया छळत राहायची. मी घरी आले, स्टुडिओत गेले, म्युझिक लावलं तरी त्याला मला येऊन भेटावंसं, माझ्याशी बोलावंसं वाटायचं नाही. मला कायम त्याच्या भोवती माझं लक्ष गुंतून राहिल्याचं फार अप्रूप वाटायचं. हे सगळं कळलं तर तुला किती दु:ख होईल याची मला हळहळ वाटायची आणि मग आनंदाने तुला हे सगळं सांगायचंच असंही वाटायचंच. त्या दुपारच्या स्वप्नात बाकीच्या अनेक इररेलवंट गोष्टी होत्या ज्या मला आठवत नाहीत. पण बाबा आणि सुधीचा त्या स्वप्नात एक फनी सीन झाला होता. मी त्या फनी फीलींगसोबतच जागी झाले होते. आयदर सुधी गात होता आणि बाबा करेक्ट करत होते ऑर तो खात होता आणि ते त्याला माल्कम एक्सच्या ’लेटर फ़्रॉम मक्का’वरून पिळत होते. मला आठवत नाही हे त्याच स्वप्नात होतं की दुसर्‍या कोणत्या तरी. स्वप्नं रेकॉर्ड करून ठेवता आली असती तर आपण कित्ती हसलो असतो नाही का? तुझ्याहीपेक्षा जास्त मीच हसले असते. आणि तू माझ्यासमोर तुझा शो ठेवला असतास.

मी उठले, ए. सी. बंद केला. संध्याकाळ झाली होती. राघूंचे आवाज ट्रॅफिकच्या अधनंमधनं समेसारखे येत होते. मी आळसावले होते. जाग आल्यावर संध्याकाळच्या या माहौलाला मी कंटाळले. एकदम गळून पडल्यासारखं झालं. मी कूलरचा नळ उघडला. काचेच्या ग्लासात पाणी खळखळून पडू लागलं. त्यात खिडकीच्या व्हेनेशियन ब्लाईंड्समधून येणारे सूर्यकिरण मिसळले. मी पाणी घटघट प्यायले. टीशर्ट बदलला. शर्ट आणि शॉर्ट्स घालून जिन्याजवळ आले. तिथून एक एक पायरी उतरत खाली आले. आणि अवाक झाले.

हॉलमधलं सगळं फर्निचर सुधीनं बाहेर काढलं होतं. खुर्च्या, सोफे, टेबल्स. स्टँड्स. त्या मॅजिक लाईटमुळे घराचं मार्बल फ्लोअरिंग भोवर्‍यासारखं दिसत होतं आणि त्याच्या डोळ्याशी हा सुधी हातात गुडघे अडकवून बसला होता. त्याच्या मरुन कलरच्या टीशर्टवर गळ्याशी असलेल्या काळ्या किनारीवर त्याचे राखाडी रंगाचे केस पारंब्यांसारखे पडले होते. त्याच्या टीशर्टमधून वार्‍याची हळुवार झुळूक खेळत होती. पिवळ्या रंगाच्या कॉर्ड्रॉय शॉर्ट्समधून त्याचे केसाळ पाय ओंडक्यांसारखे बाहेर आले होते. मी वळून त्याच्या समोर येऊन उभी राहिले. त्याने डोळे मिटलेले असल्याने त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. माझ्या गंधानं कदाचित त्याला जाग आल्यासारखं झालं आणि त्याने डोळे मिटूनच मान मागे कलंडवली. त्याच्या कोपराचे स्नायू झळकले. त्याच्या हाताचा ताण मला जाणवला. आणि माझं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं. मी बघितलं, त्याच्या केसाळ पायावर एका ठिकाणी एका मोठ्या जखमेचा व्रण ब्रशच्या उभ्या फटकार्‍यासारखा दिसत होता.

मी भराभरा दरवाज्यामधला पडदा बाजूला सारला, खिडक्यांची झापं उघडली. जेवढा शक्य तेवढा प्रकाश गोळा केला. माझा डीएसएलआर काढून झाकण प्रेस केलं. कॅमेरा डोळ्याला लावला आणि त्याचे फोटो क्लिक करू लागले. त्याच्या भारदस्त डोक्याचे, ते तोलणार्‍या सावळ्या मानेचे, त्याच्या टीशर्टच्या बाहीतून दिसणार्‍या छातीचे, मागे दोरीवर अडकवल्यासारखे ताठ झालेल्या मणक्याचे आणि शिल्पाप्रमाणे उठून दिसणार्‍या त्याच्या तळव्यांचे. मी फोटो काढत असल्यामुळे सुधीने लगेच स्वत:ची हौस पुरवून घेतली. त्याला त्याच्या थोबाडाचे फोटो काढायचे होते आणि मला त्याची खोड काढायची होती. म्हणून मी मुद्दामहून तो मस्त प्रकाश फोटोत वाया घालवला. त्याच्या चेहर्‍याच्या सगळ्या फोटोंना क्लिक करताना हलकासा शेक दिला. त्याच्या चेहर्‍याचा एकही फोटो क्लियर आला नाही. तो रागावला आणि रुसून बसला. मी दुर्लक्ष केलं तरी त्याने मला त्याच्याकडे लक्ष द्यायला भाग पाडलं. बोल बोल असं म्हणून माझ्या डोक्याला मुंग्या आणल्या. मी विषय बदलायचा म्हणून त्याला खेचत नेत हॉलमध्ये बसवला आणि त्याच्या जखमेवरून हात फिरवत शांत बसून राहिले. तो गप्प झाला. आम्ही दोघंही त्या जखमेकडे बघत होतो. ती जखम हुळहुळत असेल असं वाटून मी हात हळुवारपणे फिरवत होते. त्यामुळे माझ्या हाताला बारीकसा कंप आला होता. त्याने शांतपणे मला हात फिरवू दिला. त्याच्या त्वचेवर काटा आला. मी एक गुडघा मुडपून त्याचा कॅमेरा माझ्या पोटाशी धरून बसले होते. त्याने माझा हात मी जमिनीवर टेकवल्याचं शांतपणे बघितलं आणि माझ्या पोटाजवळचा कॅमेरा हातात घेऊन तो काढलेले फोटो पुन्हा एकदा पाहू लागला. इतके दिवसात पहिल्यांदाच आम्ही इतक्या जवळ असूनही इतके आरामात होतो. फोटो बघण्यात गुंग झालो होतो. तेवढ्यात दारात एक ब्राऊन-ब्लॅक कलरचा चौकड्यांचा शर्ट आणि कॉंक्रिट व्हाईट रंगाची पँट घातलेला मनुष्य उभा राहिला. त्याचे केस सोललेल्या नारळाच्या केसांसारखे दिसत होते आणि ओठांवर पेनाने खरडल्यासारखी एक धारदार मिशी होती. त्याने शांतपणे माझ्याकडे बघून बाहेर नजर फ़िरवली आणि सामानाकडे बघून तो म्हणाला, “सामान निकालना है क्या?”. मी सुधीकडे बघितलं आणि झटक्यात उठून दरवाजापाशी आले. त्या माणसाच्या अंगावर जात त्याला बाहेर काढला आणि खूप झापला. गेटवर ’नो एन्ट्री’ लिहिलेलं असताना तो आत का आला, असं विचारलं. त्याने नाही-होय करत करत माघार घेतली आणि जाता जाता कधीही सामान काढायचं असेल तर त्याला सांगण्याची विनंती केली. तो आजूबाजूच्याच इलाक्यात राहत असल्याचंही सांगितलं. मी बाहेर बघितलं तर दोन तीन हातगाड्या घेऊन तीन चार भंगारवाले रस्त्यावर उभे होते. मच्छीमार्केटच्या बाहेर कुत्रीमांजरं जशी माशांच्या अभिलाषेनी ताटकळत उभी असतात तसे ते लोक बाहेर माझ्या नजर रोखून उभे होते. कुणी दीड पायांवर रेलून तर कोणी उकिडवे बसून. मी त्यांना अत्यंत बेफिकीरीनं तिथून जायला सांगितलं. “कोई बात नही मैडम, जाते हैं. जब कभी सामान निकालना हो तब बतायेगा जरूर.” असं म्हणत म्हणत माझ्या रागाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत तो मिशीवाला काटकुळ्या पुढे चालू लागला. मी कुंपणालगत चालून एक चक्कर मारली आणि सुधी आत काय करतोय ते बघायला वळले. माझा तो हिंस्रावतार पाहून सुधी चकित झाला होता आणि त्यानं तेवढ्यात माझे काही इडियॉटिक फोटो काढले होते.

त्यानंतर बरेच दिवसांनी, एके दिवशी सुधीकडून मला कळलं की त्याच्या एका पायात रॉड आहे आणि वडलांचं सांगलीत ऑप्टिक्सचं दुकान आहे.

§§§

ज्यादिवशी माझी एका दिवसाची फिल्म बनवली सुधीनं, त्याच्या दुसर्‍या दिवशी बाबा आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी सुधीची आई आले होते इथे. तो सगळा आठवडाच धामधुमीचा आणि भांडणांचा गेला. तुझ्या भाषेत सांगायचं तर “full of hurry and worry, signifying nothing” असे प्रवेश चालले होते. मला वाटलं मी तुझ्या रिहर्सलला आले होते तेव्हा तुम्ही माझ्यासमोर कशा नटला होतात, संवाद पाठ म्हणत होतात, तसे हे लोक जिवंत नाटक घडवत होते माझ्यासमोर. आणि मी इथे सदैव प्रेक्षक म्हणून तुझ्या नाटकांना साक्ष असणारी, नट बनले होते. नटी.

बाबांना तसं माझ्याबाबतीत एवढं टेंशन घेऊन काही करण्याचे प्रसंग फार कमी पार पाडावे लागले असतील. पण आता एकतर त्यांची साठी उलटली होती. आणि अर्जुनचं लग्न झाल्यापासून ते माझ्याबाबतीत जरा जास्त हळवे झाले होते. त्यात मी त्यांना सुधीचा विषय काढून चांगल्या गप्पा मारताना दिसले असं दोन तीनदा झालं. अर्जुनला मी त्यांच्याकडे जाऊन राहायला भाग पाडलं असल्यानं मला त्याची काय गोची होत असेल याची कल्पना होती. मी त्याला साफ बजावलं होतं, बाबांनी जास्त कटकट केली तर सरळ त्यांना गाडीत घालून इथे घेऊन ये. दहा-पंधरा दिवस माझ्यासोबत राहिले की मग त्यांना तू आणि तुझी बायको म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र आणि सीतामैयाच भासू लागाल. अर्जुननं त्यांच्यासोबत तुला एक गिफ्ट पाठवलं होतं. मी जेव्हा पहिल्यांदा तुझी माझ्या भावासोबत ओळख करून देणार असं म्हणाले, तेव्हा तू त्याचं एक इमॅजिनरी चित्र काढलं होतंस. आणि आश्चर्य म्हणजे ते अगदी हूबेहूब त्याच्यासारखं दिसत होतं. मग मी तुला त्याच्याविषयी थोडीबहुत माहिती दिली होती. ते चित्र मी त्याला तू इथून गेल्यानंतर पोस्ट केलं आणि त्यासोबत एक कॅप्शन दिली . ’फ्ल्यूक - बाय क्षितिजा’. त्यामागची स्टोरी ऐकल्यावर अर्जुन लाजला होता. त्यावर इतके महिने आणि एक लग्न उलटून गेल्यावर रिटर्न गिफ्ट म्हणून ते गिफ्ट त्याने बाबांबरोबर धाडलं होतं. त्याला बहुतेक ठाऊक नसावं की तू कदाचित परत येणार नाहीस. आणि आलीस तरी तुला ते देण्यात काही पॉईंट नाही.

बाबांनी आल्या आल्या घराचं इन्स्पेक्शन सुरू केलं. जणू काही त्यांना मापं घ्यायला बोलावलंय अशा थाटात त्यांनी प्रत्येक कोपर्‍याचं निरीक्षण केलं. तू नाहीयस हे त्यांना फारसं सहन झालं नसावं, कारण ते तुझ्या खोलीत जाऊन आल्यावर प्रश्नार्थक चेहर्‍यानं सगळ्या घराकडे पाहू लागले. तुझ्या रूममध्ये सुधी शिफ्ट झाल्यामुळे त्यांचा सुधीला कसं वागवावं ह्याबाबतीत बारीकसा गोंधळ उडाला. पण सुधीनं यथायोग्य विचारपूस आणि नंतर दुर्लक्ष केल्यामुळे तुझ्या जाण्याचा आणि त्याच्या येण्याचा काही संबंध नसावा असा अंदाज त्यांनी बांधला असावा. तो एका वेगळ्या रूममध्ये झोपतो आणि त्याच्या रूममध्ये त्याच्या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या असतात हे पाहून त्यांना थोडासा धक्का बसला. मागच्या वेळी तू इथे असताना ते आले होते तेव्हा तुला आणि इन जनरल त्यांना आणि अर्जुनला मी त्यांच्या त्यांच्या खोल्या स्वच्छ राखण्यावरुन जेवढा त्रास दिलाय त्याच्या तुलनेत इथे मी चोराच्या डोक्यावर राजमुकुट ठेवतेय असं त्यांना वाटलं असणार. एकंदरीत सुधीच्या बाबतीत नक्की काय भूमिका घ्यायची हे त्यांना कळलं नव्हतं.

त्यांनी त्यांचा हॅरिस ट्वीड जिथे काढून ठेवला होता त्याला मॅगी लोंबकळत होता. मध्येच त्याच्या पॉकेट्समध्ये लपून बसण्याचा खेळ त्याला सापडला होता. त्यामुळे तो खूश होता. त्याला पाहताना बाबांच्या चेहर्‍यावर प्रसन्न लकाकी आली होती. सुरुवातीला जेव्हा ते आले तेव्हा सुधीच्या हातात कॅमेरा होता आणि ते आले तरीही त्याने तो बंद केला नव्हता म्हणून ते जरा कॉन्शस झाले होते. पण आता सुधीच्या सफाईदार शूटिंगमध्ये फार काही लक्ष देण्यासारखं महत्त्वाचं चाललंय असं त्यांना वाटलं नाही. कारण सुधी नेमका जेव्हा ते काही करत असतील तेव्हा कॅमेरा त्यांच्यावरुन वळवून डायनिंग टेबलकडेच ने, किंवा जमिनीपासून छताकडे स्विवल करत फिरव असे उद्योग करत होता. बाबा ज्या गोष्टी सांगायला आले होते त्या त्यांनी विस्ताराने सांगितल्या. त्यावर आमची विस्तारानं चर्चा झाली. चर्चा म्हणजे भांडण. त्यानंतर त्यांनी मला सुधीविषयी काही लग्नाळ प्रश्न विचारले. आधीच माझं त्यांच्याशी भांडण झालं होतं त्यामुळे मला वाट्टेल ते बोलत होते मी. मला म्हणाले, सुधी चांगला आहे का? किती दिवस राहणारेय अजून असा? तुला प्रेम वाटत असेल तर का नाही लग्न करत? जर इतके दिवस तुम्हांला मिळालेयत तर घ्या आणखी काही दिवस, आणि क्रॅक करा लग्न.

माझी तळपायाची आग मस्तकाला गेली होती. हे एकदम ’तू’वरून ’तुम्ही’वर गाडी शिफ्ट केली नं त्यांनी, तेव्हा मला वाटलं की इथे अजून एकीचं सुटत नाही आणि त्यात दुसरं काय घेऊन बसू. सुधी एक हट्टाकट्टा नौजवान आहे, चार पुरुषांसारखा एक पुरुष आहे म्हणून तो माझ्यासोबत राहू लागला, तर त्याचं-माझं लग्न लावून देणे हेच का बाबांना लॉजिकल वाटत असावं? इतकी वर्ष मी इकडे मुंबईत एकटी राहतेय. आजपर्यंत बाबांनी कधी असा पवित्रा घेतला नव्हता. इतकी वर्ष ते एकट्यानं जगतायत. तेव्हा ते कधी असे नाजूक, असहाय झाले नाहीत. पण सुधीच्या अस्तित्वानं असं काय झालं त्यांना? त्याच्याविषयी एवढा विश्वास त्यांना का वाटला असावा? सुधी एवढा डिपेंडेबल तर अजिबातच नाहीये. त्याची लक्षणंही काही आर्च प्रोटेक्टर, अल्फा मेलची नाहीत. त्याचं आयुष्य, त्याचं म्हणणं ह्यांना माहिती होतं का? मग हे पुरुष असे एकमेकांना गृहीत का धरतात? पुरुष सगळ्यांनाच गृहीत का धरतात?

Thank god, अर्जुन असा नाहीये. लहानपणापासून अजिबात भाऊचा धक्का न देता अगदी शांतपणे वाढलाय तो माझ्यासोबत. जेव्हा मी आर्टस्कूलला गेले तिथून आमची एकत्र वाढ थांबली. पण आमच्या स्वभावाची मूस अजून तशीच आहे. त्या मुशीत एका घटनेवर एकाच प्रकारची फीलिंग आकार घेते. सुधीची आणि माझी मूसही एकाच प्रकारची आहे अशी फक्त कुणकुण लागली होती मला. इथे हा खूप मोट्ठा धक्का होता माझ्यासाठी. तो धक्का पचवताना मी पहिल्यांदा एवढी गोंधळले होते. मी चाचपडत असताना असं काहीतरी बोलून माझ्या निर्णयात ढवळाढवळ करत होते बाबा. त्यांना न कळणारा असा हा प्रॉब्लेम होता. आणि त्यांना वाटत असणार की मी त्याच्याबाबतीत लग्नाचा विचार करत असेन तर त्यांच्या बोलण्याने मला पुश मिळेल. मी त्याच्या आधारावर स्वत:ला झोकून देईन. आता माझ्या वयाला झोकून देणे ह्या क्रियेचे फायदे असण्यापेक्षा तोटे अधिक आहेत हे त्यांना सांगायला हवं एकदा. कदाचित तूच ते त्यांना जास्त चांगलं सांगू शकशील. आणि ते सांगता सांगता माझ्या कोल्डपणावर तिरकस ताशेरे ओढशील.

लोंबणारा हात आणि खिसा यांच्यात खेळून झाल्यावर मॅगीला कंटाळा आला होता, तेव्हा बाबांनी त्याला उचलून मांडीवर घेतला आणि ते ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायला आले होते, त्या सांगू लागले. एक गोष्ट अर्जुन आणि त्याच्या बायकोविषयी होती. पण ती काही तेवढी महत्त्वाची नसल्यानं नंतर सांगीन, म्हणाले. माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे बाबा पुण्यातलं घर सोडून कोकणात जाणार होते, कायमचे. तेही एका भन्नाट स्टोरीचा पार्ट म्हणून. अर्थात ह्या गोष्टीचा उपयोग त्यांनी नंतर मला एक वेगळीच गोष्ट पटवण्यासाठी केला आणि मी नाराज झाले. पण त्यांची स्टोरी ऐकून मला आनंद झाला. मजा वाटली. आणि बाबांचं कौतुकही वाटलं. त्यांनी शांतपणे मॅगीला आपादमस्तक कुरवाळला. त्याचं डोकं खाजवलं. गळ्याजवळ बोट फिरवलं. शेपटी चेपली. त्यांची गोल गुलाबी बोटं त्याला चावायला दिली आणि संध्याकाळच्या गंभीर प्रकाशात त्यांचा ठराव सांगू लागले. डस्की वातावरणात, हस्की स्वरात.

बाबांना एक मैत्रीण सापडली होती. त्यांच्याहून दहा वर्षांनी लहान. व्यवसायानं डॉक्टर. तिने लग्न केलं नव्हतं, त्यामुळे तिच्या म्हातार्‍या वडलांचं सगळं काही तीच करायची. बाबांच्या वर्णनावरून ती फार मिशनरी स्वभावाची शिस्तशीर मावशी असावी असं वाटत होतं. कारण स्वत:च्या वडलांच्या अल्झायमर्सच्या कंडिशनवरून प्रेरणा घेऊन तिनं कोकणात एक मोठा प्लॉट घेतला होता आणि तिथे म्हातारेकोतारे, अनाथ आणि मनोरुग्णांसाठी राहायची सोय केली होती. त्यांचे उपचार ती मोफत करायची आणि खर्चासाठी श्रीमंत लोकांकडे देणग्या मागायची. मला कुतूहल होतं, ही बाई ह्यांना भेटली कुठे. हे तर दिवसभर कुठे जाणार नाहीत. स्वत:च्या खोलीत बसून पुस्तकं खिळखिळी करत बसतील किंवा नेट उघडून फेसबुकवर चाळे करतील. नंतर अर्जुनच्या बायकोनं मला सांगितलं की त्या बाईकडे ते एकदा चेक अपसाठी गेले होते. एसपीत कोणती तरी व्याख्यानमाला झाली होती, तिथे मॅडमनी स्वत:च्या कार्याबद्दल एक भाषण दिलं होतं. तेव्हा त्यांना तिच्याविषयी अनेक प्रश्न पडले होते. बुद्धी नाठी व्हायच्या वयात हे असं व्हायचंच अशी मी स्वत:ची समजूत काढली. आणि मला लोकांच्या आयुष्यातल्या गोष्टींचं इतकं कुतूहल का असतं, ते शमवण्यासाठी मी किती बालीश वागू शकते ह्या कारणांसाठी थोडी आत्मपीडा सहन केली. पण काहीही झालं तरी बापाच्या सेक्शुअल सर्कलमध्ये काय चढउतार होतायत हे मुलीनं पाहणं अगदी स्वाभाविक असल्यामुळे मला त्याविषयी वैचारिक क्लेश नको होता. मला कोणतीच भूमिका नको होती. आणि भूमिका नाहीये इतकंही ह्या विषयाला महत्त्व द्यायचं नव्हतं. बाप कौमार्याकडे झुकलाय, त्याला त्याचं त्याचं जगू दे, पडू दे. धडपडू दे, अगदीच हाताबाहेर जायला लागला तर त्याच्या भल्यासाठी त्याला सांभाळायला आपण आहोतच असा एक पोकळ दिलासा मी स्वत:ला दिला. पण बाप माझा बाप निघाला.

त्यानं जी काही लाईन पकडली त्यावरून मला खूप एकटं एकटं वाटू लागलं. स्वत:ला जपण्यात आपण स्वत:वर किती अन्याय करतोय असं वाटू लागलं. किती ओढ होती मला बाबांविषयी, अर्जुनविषयी. आणि किती अलिप्त होते मी त्यांच्या प्रेमापासून. कसं शांतपणे मी दूर ठेवलं होतं त्यांना माझ्या जगण्यापासून. माझ्या अनुभवापासून. खरं तर तुझ्यासकट माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रेमाच्या व्यक्तीला मी किती कटाक्षानं लांब केलं. तुमच्यावर मी अन्याय करत होते हे मला तेव्हाही कळत होतं आणि ते फार मनावर घेण्यासारखं नाहीये हे मी तेव्हाच स्वत:शी क्लियर केलं होतं. पण बाबांचं सगळं ऐकून घेतल्यावर मला अचानक रिअलाईझ व्हायला लागलं की मी स्वत:वर किती अन्याय केलाय.

माझ्या प्रॉब्लेम्सविषयी कोणाकडेही तक्रार करायला मी अशी कोणती व्यक्ती जवळ राहूच दिली नाही. मी तुम्हां सर्वांना तुमची इच्छा असतानाही जास्त गुंतू न देणं ही माझी गरज होती. पण तक्रार करावीशी वाटते आणि ती ऐकून घ्यायला स्वत:चं शहाणपण पुरेसं ठरत नाही.

§§§

शरीरात सर्वात जास्त अड्रेनलिन तयार करायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे दु:ख. इजा. साहसात अड्रेनलिनच आपल्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया डिक्टेट करत असतं. मला अड्रेनलिनची गरज असेल तर मी दु:ख दु:ख नाही करणार, तर काय करणार?

§§§

सुधीच्या आईइतकी प्रेमळ बाई कोणत्याही मुलीला सासू म्हणून आवडली असती. तिला तुमच्या प्रेम न करण्याविषयी काही प्रॉब्लेम नव्हताच. पण तुम्ही तिला झिडकारलंत, तरी ती निर्विकार असायची. सुधीच्या जशी मी दिसताक्षणीच प्रेमात पडले तशी ह्या बाईचा दिसता क्षणीच द्वेष करू लागले. पण सुधीविषयीचं प्रेम जसं मी आजतागायत त्याला शब्दात व्यक्त केलेलं नाही, त्याच्या नेमकं उलट, मी माझा राग तिला पहिल्या फटक्यातच कळू दिला. त्यावर ज्या पद्धतीनं ती बाई रिऍक्ट झाली त्यामुळे मला तिच्याविषयी थोडी जवळीक वाटू लागली. आणि आता ती बाई माझी चांगली मैत्रीण झाली आहे. माझी कुणाला काही न सांगण्याची गरज ही बाई पुरवते. त्यामुळे आमचे संवाद फारच विलोभनीय होतात. दोन वेगवेगळ्या माणसांनी एकत्र एकच पियानो तालासुरात वाजवल्यासारखे. कधी कधी सुधीला डावलून आम्ही आमच्या बेसिक विषयांवर दिवस आखतो. शॉपिंग करतो, हॉटेलिंग करतो, पिक्चर्स बघतो. तिचं म्हणणं अगदी साधं आहे. मी कॉलेजात माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते. त्यापुढे मला त्या ज्ञानाचं ओझं नको असतं. म्हणून मी मिळेल ते शिकत जाते. मला नाही म्हणेल असा गुरू मला अजून सापडलेला नाही. माझा प्रामाणिकपणा मला दाखवता येत नाही. पण मी वाट बघू शकते. कारण इव्हेन्च्युअली आपण सगळे तेच तर करत असतो.

पहिल्या दिवशी ती आली तेव्हा मी बाबांच्या भेटीतून रिकव्हर होत होते. सुधीनं एक दिवसाची फिल्म बनवली होती ती पाहायची होती. आणि बाबा जे काय बोलले होते त्याच्यावर विचार चालला होता. कदाचित त्याचमुळे मी थोडी प्रतिक्रियात्मक झाले होते. संवादाचा बॉल तिच्याकडून माझ्याकडे फेकला जायचा आणि मी तो परतवायचे फक्त. सुधीसुद्धा असला नाठाळ की तिला माझ्यावर टाकून तो नसते उद्योग करायला लागला. मी त्याला त्याच्या खोलीत जाऊन स्पष्ट सांगितलं की तुझं ते एडिटिंग फिडिटिंग बंद कर. मला तुझ्या आईशी काही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. माझ्याकडून अपमान होईल तिचा. तो म्हणाला, तू तिच्याशी बोलावंस अशी माझी इच्छाच नाहीये. तिला इथे मी नाही घेऊन आलेलो. ती स्वत:च आलीये, कंटाळली की जाईल. उगाच आडनिड्या वयातल्या मुलांसारखी वागू नकोस. ह्या वाक्यावरून मी चेकाळले. लगेच मला काहीतरी प्रूव्ह करावंसं वाटू लागलं. तिला माझ्या बोलण्यावागण्यावरून मला तिचं येणं आवडलं नाहीये हे कळलंच होतं. म्हणून मग ती बंगला कसा चांगलाय, मुंबई कशी बदलतेय, आर्द्रता कशी वाढलीये यासारख्या नॉर्मल गोष्टी बोलण्याच्या फंदात पडली नाही. तिने खाकरा, केक, बिस्किटं ह्यासारखं सुधीला सूट होईल असं खायचं काय काय आणलं होतं ते तिनं स्वत:च्या बुद्धीनं किचनमध्ये डबे शोधून ठेवून दिलं. आम्हा सर्वांसाठी चहा केला. त्याचा आल्याचा गंध इकडेतिकडे पसरला. आम्हाला एकदम तरतरी आली. सुधीला माझं काहीतरी बिनसलंय हे कळलं होतं त्यामुळे तो त्याच्या आईशी त्या क्षणाला महत्त्वाचं असं काहीतरी बोलत बसला. मी परत बाबांकडे वळले.

त्याची आई निघून गेली तेव्हा आकाशात करड्या निळ्या आणि तांबूस गुलाबी रंगांचं सॅण्डविच झालं होतं. दूर मशिदीच्या सिल्युएटचे गोलाकार शाईने रंगवल्यासारखे डार्क दिसत होते. कालच्या भांडणानंतर मी नेटवर बाबांच्या मैत्रिणीला गुगल सर्च केलं होतं. गेली सहा ते सात वर्ष तिची संस्था सोशल वर्क करत होती. बाबा आयुष्यात कधीच कोणाविषयी पोटातून प्रेम बाळगून बोलले नव्हते. ते सगळं सरळ माझ्यात उतरलं होतं. पण ह्याच बाईविषयी पहिल्यांदा ते इतक्या आत्मीयतेनं बोलले. तेव्हा मला वाटलं की गर्लफ़्रेंडचं कौतुक करतायत एवढंच. पण खरंच त्यांना जाऊन समाजसेवा करावीशी वाटणं काही स्युडो असू शकत नाही. निदान बाबांच्या बाबतीत तरी. मला खात्री होती की अफेअरपायी हा माणूस जर त्या ठिकाणी जायच्या कामाला लागला असेल तर नक्कीच तो लवकरात लवकर परत येईल. आणि म्हणूनच त्यांनी विल करून टाकलं आणि त्याचे तीन हिस्से करून मला, अर्जुनला आणि उरलेला हिस्सा त्या संस्थेला देऊन टाकला हे मला पटलं नाही. बाबांचं म्हणणं की मागेपुढे मी तुमच्या कामात अडथळा नको व्हायला. माणूस चालता बोलता राहिलेलाच चांगला असतो. त्याच्या आणि इतरांच्याही मानाला धक्का पोहचत नाही त्यानं. उगाच अशी परिस्थितीच निर्माण कशाला करायची, जिथे एकमेकांविषयी विषाद वाटावा? परस्परांचे अडथळे बाजूला सारून आपण कामाला सुविहितपणे बांधलेलं असावं. जेव्हा मी थकेन, तेव्हा नाहीतरी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहायला मला आवडेल. मग मी आत्ताच जातो ना. माझ्या वाटणीची जबाबदारी मी उचलेन आणि मग जेव्हा थकेन तेव्हा एखादी खाट पकडून तिथेच पडून राहीन. घरात असलो तरी तुम्ही काय तुमची कामं सोडून माझी नर्सरी सुरू करणार आहात का? मलाच तुम्ही तुमच्या कामाला गेलेला जास्त आवडाल.

बाबांचं हे म्हणणं मला तंतोतंत पटलं. पण ते स्वीकारता येईना. ते प्रोसेस करून आपल्या जगण्याची व्यवस्था आपण अगदी आरामात उभी करू शकू असं डोकं सांगत होतं. पण मनात कालवाकालव होत होती. आजारावर इंजेक्शन गुणकारी असलं तरी ते बोचताना शरीरावर शहारा येतोच. तसं काहीसं वाटत होतं. मला एकदम आपली भांडणं आठवली. तुझ्यावर इम्प्रेशन्स पडण्याच्या स्पेलमध्ये मी कशी तुला गुंडाळून ठेवायचे. तुझे इमोशनल गुंते सोडवून कशी तुला माझ्या शरण आणायचे आणि नंतर असं करू नकोस असा सल्ला तुला द्यायचे ते आठवलं. कसली गेमाडपंथी होते मी. बाबांनी मला जसं गप्प करून टाकलं तसं मी तुला गप्प करून टाकायचे. पण मग मीसुद्धा माझ्यात बदल करायचं ठरवलं. तू जशी उसळून मला उलट उत्तरं करायचीस तशी मीही उसळून बोलायला लागले. अजिबात सुसंगती राखायची नाही असं ठरवूनसुद्धा मला असंबद्ध भांडता आलं नाही. तेवढी एक गोष्ट सोडली तर बाकी तुझ्या भांडणातला आवेश मात्र मी मस्त उचलला होता. बाबांना सांगितलं की तुम्हांला जायचं तर जाऊन राहा तिथे. पण रक्कम आमच्या नावावर कशाला करता? आम्ही तुमचा अगदीच किंग लियर करणार नाही, पण आम्हांला दोघांनाही जास्तीचा पैसा मिळाला तर आम्ही तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार. त्यापेक्षा तुम्हीच तो पैसा त्या संस्थेला देऊन टाका. जर तुम्हांला ती त्या योग्य वाटत असेल तर.

मग बराच वेळ वाद घातल्यानंतर बाबांनी सुधीचा विषय काढला. आणि मला एक स्ट्रायकिंग सिमिलॅरिटी जाणवली त्यांच्यात आणि सुधीत. बाबा, सुधीची आई आणि तुझी सासू ह्या तिघांची वयं कमी झाली असती आणि ते आपल्याएवढेच झाले असते ना, तर आपला त्यांच्याशी होणारा संवाद तडकाफडकी बदलला असता असं मला वाटलं.

§§§

आयुष्य साठवून ठेवणं हे किती महाभयंकर काम आहे. स्वत:चं जगणं त्यातल्या बारकाव्यांसकट एखाद्या तत्त्वाला बांधून मांडणं, स्वत:च्या आणि इतरांच्या समक्ष ठेवणं क्रूर आहे, ब्रूटल आहे. अर्जुनची बायको गाते, अर्जुन चित्रं काढतो, मी चित्र काढते. सुधीची आई लेख लिहिते. सुधी लेख लिहितो. बाबा लिहितात. तुझ्या कामांत तर तुझा अखंड देह दिसतो. तुझं मन कळतं. तुम्ही तुमचं आयुष्य असं नागवं करून इतके नितळ कसे राहू शकता? तुम्हांला मी चित्र काढताना मला येते तशी संभ्रमावस्था का येत नाही? माझं मन तर अशांततेच्या गर्तेत प्रवाहाने घुसळल्यासारखं वरखाली होतं. त्यावर माझ्या अस्वस्थतेमुळे खोलवर ओरखडे पडतात. लाल रंगावर काळ्या जखमा उमटतात. आश्चर्य हे की माझी चित्रं तुला आणि अर्जुनला धसमुसळी, आगाऊ आणि निष्प्रेम वाटतात. आणि मला तुमचं काहीही तुमच्या जगण्याचं प्रतिबिंब वाटत नाही. तुम्हां सर्वाना बाजूला ठेवून मी माझी तुलना करते. तुमची आयुष्य किती अस्ताव्यस्त आणि कोलाहलाची आहेत, तरी तुमचं काम किती शांत, बांधेसूद आणि काहीतरी तडीस नेणारं आहे. मला माझ्या चित्रात माझ्या दृश्यांची बांधबंदिस्ती करता येत नाही हा मला माझा एक प्रॉब्लेम वाटायचा आणि मी त्याला इग्नोअर करून पुढे जायचे. तुला तो माझा आर्टी माज वाटायचा आणि ह्याच कारणामुळे मी माझी चित्रं कुणालाही दाखवत नाही असं तू म्हणायचीस. पण ज्यांना चित्रातलं कळत नाही त्यांना मी माझी चित्रं दाखवून काय एक्स्प्लेन करणार ह्या कारणाने आणि ज्यांना कळतं त्यांना ती पाहून माझं मीपण मी खुलं करेन ह्या कारणाने मी ती चित्रं दाखवत नसे. सुधीची एक दिवसाची फिल्म बघितल्यावर मात्र मी ठरवून टाकलं की कितीही क्रूर असलं तरी हे ‘आपलं जगणं आपल्या चित्रात येऊ देणं’ थांबवायचं नाही.

अर्जुनच्या बायकोविषयी माझ्या मनात पहिल्यापासूनच अढी आहे. त्या मुलीनं अत्यंत सुमार दर्जाच्या सातत्याने आयुष्यभर गाणं चालू ठेवलंय एवढं एकच माझं तिच्याविषयीचं मत आहे. मी तिच्या चांगल्यावाइटात पडू इच्छित नाही. कारण तिचा माझा कधीच संबंध आलेला नाही. पुढे तो कधी आलाच तरी मी तिच्याविषयी फारसा जिव्हाळ्यातून विचार करत नसल्यामुळे तो माझ्या अंगाला लागणार नाही. माझा सगळा जिव्हाळा अर्जुनपुरता मर्यादित आहे. उद्या त्या दोघांना मुलं झाली तरी माझी काळजी अर्जुनच्या अंगानेच त्यांच्याकडे जाईल. ती बाबांचं चांगल्या मनानं सगळं काही करत असायची. अर्जुनच्या आणि तिच्या भांडणांमध्ये बाबांचा विषय क्षुल्लक गोष्टींपुरताच असायचा असं मला अर्जुननं सांगितलं होतं. म्हणजे कोणी काही बोलत असेल तर बाबा लक्षच न देता स्वत:चा तिसरा विषय सुरू करायचे. ऐकायचेच नाहीत. आणि त्यांना ह्याची जाणीव करून दिली की रागावून बसायचे. अशा क्षुल्लक गोष्टी तर मीही उडवून लावायचे बाबांच्या, त्यामुळे मला ती कधी थ्रेट वाटली नाही. पण तिला बाबांची टुकार पुस्तकं आवडायची आणि त्यांच्या हातून असंच लेखन व्हावं ह्यासाठी त्यांना ती प्रोत्साहन द्यायची हे मला पचणं अवघड गेलं. कोणत्या तरी शीळसम्राज्ञीचं चरित्र, किंवा पुण्यातल्या जुन्या मंदिरांच्या माहितीची यादी यासारखी नॉस्टॅल्जिक रद्दी वाढवण्याच्या कामाला ते डॉक्युमेंटेशन समजत आणि त्यांना वेळ का फुकट घालवताय असं म्हटलं तर आक्रस्ताळेपणा करत. त्यामुळे भांडकुदळ सासरा आणि वचवची सून अशा नात्यानं पुढे जाण्याचा त्यांचा इरादा असता तर ते फारच कॉम्प्लिमेंटरी झाले असते एकमेकांना. सुदैवाने तसं व्हायचं नव्हतं. बाबांच्या घराबाहेर जाण्यानं निदान अर्जुनचा लंबक तरी होणार नाही ह्या कारणानं माझी काळजी थोडीशी हलकी झाली.

सुधीचं एडिटिंगचं काम पूर्ण झालं तेव्हा त्याने खोलीबाहेर येऊन दिवे लावले. मला एकदम जाग आल्यासारखं झालं. तो येण्याआधी कितीतरी वेळापूर्वी मशिदीतून लाऊडस्पीकरवरुन बांग ऐकू आली होती. ती माझ्या डोक्यात अजूनपर्यंत रेंगाळली होती. सुधीच्या चेहर्‍याकडे बघून मी समजले की ह्याच्या डोळ्यात आणि थोबाडावर हासू दिसतंय म्हणजे ह्याने फिल्ममध्ये आपली काहीतरी गंमत केली असणार. मी त्याच्याकडे बघून हसले. आम्ही असे एकमेकांकडे बघून पहिल्यांदाच पूर्ण हसलो होतो. त्यावर आम्ही एकमेकांना का हसतोयस किंवा का हसतेयस असे प्रश्न विचारले नाहीत. त्याने डोकं आऊट झाल्यासारखं एक गाणं जुळवलं – “तुमने दिलकी बात कभी नही सुनी की मुझे भूक लगी है, तुमने दिलको पास ना बुलाया के मुझे उपास हुआ है...” मी ते ऐकून गडाबडा लोळले आणि मला हसण्याचा लूप लागला. लाटालाटांनी माझ्यातून हसणं बाहेर पडत होतं. तो वेडे चाळे शोधून शोधून चेष्टा करत होता. आणि मला थांबताच येत नव्हतं. शेवटी मी त्याला रिक्वेस्ट केली की आता थांब, माझा आवाज बाहेर फुटत नव्हता, माझे डोळे हसून हसून पाणावले होते. तो गप्प बसला त्याचंही मला हसू आलं. ताठ शरीरानं, लंगडी घालत तो माझ्याजवळ आला आणि माझ्या पाठीत एक गुद्दा घातला, त्यानं तिथे माझ्या हसण्याला थोडा ब्रेक लागला. तरी पुढे अधूनमधून ढेकर यावा तसं हसू फुटत होतंच मला.

मग त्यानं एखादं रिच्युअल करावं तशा हालचाली केल्या आणि पिस्ता कलरच्या एन्वलोपमध्ये दडवलेल्या दोन सीडीज माझ्या हातात दिल्या. त्यावर त्यानं त्याच्या बेशिस्त सुंदर अक्षरात लिहिलं होतं – पास टाईम १ आणि पास टाईम २. मी भुवयांनी त्याला आश्चर्य दाखवलं तसं त्याला बरं वाटलं. त्याने मला कटाक्षानं दोन्ही पार्ट्स एका पाठोपाठ बघायचे असं बजावलं. मला कुतूहल होतं मी त्यात कशी दिसतेय. काय करतेय. म्हणजे रोजचीच कामं करताना मी कशी दिसतेय. मला माहीत असताना मी त्या शूटिंगला कसं तोंड दिलंय. आयुष्यात पहिल्यांदा कोणी तरी मला असं प्रॉपर शूट केलं होतं. सुधी टिंगल करत म्हणायचा तसं सहेतुक वगैरे.

ज्या दिवशी त्याने शूटिंग केलं त्याच्या दोन दिवस आधी त्याने कॅमेरा वापरण्याचा खेळ शोधून काढला होता. दिवसभर त्याचा जीव त्यात बुडाला होता. त्यामुळे मला तो म्हणाला की आपण परवा एक अख्खा दिवस शूट करु या. रविवार होता त्यामुळे मी शॉपला जाणार नव्हते. मी म्हणाले करु या. सुधीच्या ह्या एक्सरसाईझमध्ये माझं मॉडेल झालं होतं. खरं तर सुधीला ही फिल्म शूट करायची प्रेरणा शॉपमधूनच मिळाली होती. माझ्या एका क्लायन्टकडे ऑर्डर पोचवायची होती. एक हमाल मिळत नव्हता म्हणून मी सुधीला विचारलं तू जाशील का? तो प्रचंड चिडला, आडवंतिडवं बोलला आणि घराबाहेर गेला. मी त्याला जाऊ दिला, घर लॉक केलं आणि त्याला शोधायला बाहेर पडले. त्याच्या एकाही मित्राचा, मैत्रिणीचा माझ्याकडे फोन नंबर नव्हता. त्याच्या आईला फोन करून काहीच झालं नसतं. म्हणून मी आपली काहीही न ठरवता चालू पडले. मला ठाऊक होतं की सुधीला शोधायचं असं न ठरवून शोधकाम सुरू केलेलंच चांगलं. मला तो दांड्याजवळ भुर्जीपाव खाताना सापडला. त्यानं मला बघितलं तर त्याच्या डोळ्यात कडवटपणाचा लवलेशही नव्हता. अजागळासारखा शियर खात होता. शियर!

मग मी त्याला दंडाला धरून रस्त्यावर खेचला आणि घराकडे चालायला लागायला भाग पाडलं. मी त्याला सॉरी म्हणाले नाही, त्याने माझ्याकडे गळा काढला नाही. आम्ही आमचं आमचं काय ते समजून घेतलं होतं. मला मनापासून त्याला सॉरी म्हणावंसं वाटतंय हे त्याला कळलं आहे की नाही याबद्दल माझ्या मनात थोडी धुगधुग होती. पण मी तोंड उघडू शकले नाही. स्वभावाला वळवू शकले नाही. तरीही आम्ही रस्त्यावरुन गुरुशिष्यासारखे एकत्र चालत होतो ह्याचं मला गोड कौतुक वाटतं. आणि म्हणूनच मी त्याला तुला दूर केलं तसं झिडकारू शकत नाही.

त्याला घरी आणून टाकला. मोकाट घोड्यांना रांचमध्ये आणून सोडतात तसा. काहीही खाल्लं नव्हतं म्हणून खूप भूक लागली होती. मी मेन्यु-फाईल काढली. त्यातून एकदम वीस=-तीस हॉटेल्सच्या मेन्यु-कार्डाचे टेकअवे कागद खाली पडले. मी ऑर्डर दिली आणि सुधीच्या खोलीशी जाऊन उभी राहिले. दरवाज्यापाशी रेंगाळले. त्याने वळून माझ्याकडे बघितलं आणि स्वत:च्या कामाला लागला. सीडीज बघणार नाहीयेस का म्हणाला. बघेन असं म्हणून मी बराच वेळ रेंगाळले. जेव्हा केव्हा तो आपल्याकडे बघेल, तेव्हा त्या क्षणी जसं वाटतंय तसं रिऍक्ट व्हायचं असं ठरवून टाकलं. त्याने झटक्यात वळून बघितलं तसं मी झटक्यात सॉरी म्हणाले. आणि मग खूप मोट्ठा पॉझ घेऊन म्हणाले की मी तुला नीट विचारलं नाही, नीट सांगितलं नाही म्हणून. तो जवळ आला आणि म्हणाला, खरं सांगू का, मला बाहेर पडायचं होतं. एडिटिंग करून कंटाळा आला होता. म्हणून मी बाहेर गेलो. त्यात तू मला हाफ व्हॉली दिल्यावर मी सिक्सर मारुन टाकला. मला काय रागबिग आला नव्हता. अशी अधनमधनं सॉरी म्हणत गेलीस तर तुझं वजन नक्की कमी होणार नाही.

डिनर करताना मी हातावर फटके मारूनसुद्धा सुधीनं माझ्या ऑर्डरमधलं थोडंसं खाल्लंच. आणि दुसर्‍या दिवशी हमाल म्हणून कामाला गेला. आला तर ग्लॅमवर्ल्डवर डोकं खपवत खपवत त्याची एक भूमिका तयार झाली होती. माझ्या क्लायन्टचा नंतर मला फोन आला, तुम्हारा लेबर क्या आय आय टीसे रिक्रूट होता है क्या? कभी भेजना उसे दोबारा. कहना मैने बुलाया है. मला त्याच्या स्टेटसप्रमाणे त्याच्याशी व्यवस्थित चांगलंचुंगलं बोलावं लागलं. पण त्याला काय सांगू, की बाबा तुझ्या एकाही पिक्चरची सीडी सुधी कचर्‍यातसुद्धा स्वहस्ते टाकण्याचे कष्ट घेणार नाही.

मी बडीशेप तोंडात टाकली,तिचा झणझणीत गंध तोंडातून नाकात आणि मग नाकातून मेंदूपर्यंत पोचला. मी एसी लावला, तलम कॉटनचा निळा नाईट सूट घातला. बेडवर पहुडले. मला डोळा लागला. मी मस्त स्वप्न पाहू लागले. अचानक नंतर कधी तरी मला जाग आली आणि मी तडक उठून त्या दोन सीडीज घेतल्या. त्यातली पहिली सावकाश काढत सीडी रॉममध्ये टाकली आणि नीट पाहू लागले. व्ही एलसी प्लेयरचा ट्रॅफिक ट्रायंगल सारखा आयकॉन आला. प्लेयरचा प्रोग्रॅम रन झाला. तासाभराची फाईल होती. मी अधाशासारखी प्लेयरच्या टाईमलाईनवर कर्सर नेऊन मागे पुढे करत होते. मग मला शांतपणे सिरियसली ते सगळं बघावंसं वाटलं. मी एकूण किती वेळ ते बघायला जाईल ते बघण्यासाठी म्हणून दुसरी सीडी घातली आणि ती फाईल ओपन करून बघू लागले. मला काहीतरी फरक जाणवला. सुधीनं त्या सीडीजवर एक आणि दोन असे अंक टाकले होते. तरीही त्या सीडीज एकाच मोठ्या रेकॉर्डिंगचे दोन तुकडे नव्हत्या. त्या सीडीजचा विषय आणि आशय सर्वस्वी निराळा होता. सुधीनं फारच हुशारीनं गंमत केली होती. आणि त्याला माझ्यावर हसण्याचा पूर्ण हक्क होता.

बाबांच्या लेखनाबद्दल आणि अर्जुनच्या चित्रांबद्दल मी सुधीशी बोलले होते. तुझ्याविषयी आणि तुझ्या टॅलेंटविषयी बोलले होते. माझी तुमच्या बाबतीतली तक्रार मी त्याला सांगितली होती. त्याच्याविषयीची तर आणखी बोचर्‍या शब्दात मांडली होती. त्यावर त्याचा जो रिप्लाय आला, त्यावरून मला मी एका मोठ्या हॉलमध्ये एकटी उभी राहून माईक घेऊन किंचाळतेय असं वाटलं. मला वाटायचं की स्वत:चा वेळ घेऊन कोणत्याही गोष्टीला रिऍक्ट होणारी सगळ्यात धीमी चँपियन ती मीच. पण सुधीनं जवळजवळ चार महिने माझी बकबक ऐकून घेतली आणि मला खिजवायचं की काय म्हणून ह्या सीडीजचं बूच माझ्या तोंडात चोखायला दिलं.

मी दोन्ही सीडीज एकामागून एक बघितल्या. पहिलीत सुधीनं माझं हॅण्डहेल्ड कॅमेर्‍याने शूटिंग केलं होतं. त्यात मी सकाळी बेडवर झोपले होते आणि मला जाग आल्यावर मी दिलेली पहिली जांभई होती. तिथून उठून टेरेसमध्ये जाऊन मी पहिल्यांदा झाडांना पाणी घातलं होतं. त्यानंतर मी जिन्यातून खाली उतरत असताना दूधवाला बिलाचे पैसे घ्यायला आला होता. त्याच्याकडून दूध घेतलं, पैसे दिले आणि हे सगळं करताना सुधी पडला होता. म्हणून कॅमेरा रँडमली पॅन झाला होता. तेव्हा त्यात मॅगी आता पहिल्या मजल्यापर्यंत खिडकीच्या ग्रिलवरून चढतचढत आरामात जाऊ शकत होता हे शूट झालं होतं. मग त्यादिवशी ब्रेकफास्ट मी केला होता तो. मग सुधीने तो कसा खाल्ला ते. मग आम्ही दोघांनी भांडी कशी घासली ते. कॅमेरा खिडकीत स्टेडी. मग मी आंघोळीला गेले. त्याने कँडिड शॉट्स मिळवलेच काही. माझं थोडसं अंगप्रदर्शनही झालं. ते त्याने तसंच ठेवलं होतं. मी त्याला उडवायला सांगूनही. मग मी शॉपमध्ये जायची तयारी करू लागले. त्याला माझ्या खोलीत मी कपडे बदलताना येऊन शूटिंग करायचं होतं. मी त्याच्या कॅमेर्‍यावरच धाडकन दरवाजा आपटला होता. मग मी किती वेळ कपडे बदलत होते ते काउंट करून स्क्रीन फास्ट फॉरवर्ड करून तो आकडा सांगितला होता आणि मी बाहेर पडताना कशी बावळट दिसते ते दाखवलं होतं. माझ्या कपड्यांचे क्लोज अप काढले होते. टॉप अँगलने माझे केस जिथे विरळ झाले होते ती जागा दाखवली होती. माझे हिप्स, छाती कोणत्याही बाबतीत लाज न बाळगता शूटिंग केलेलं होतं. मी बाहेरुन घरी आले, मग बाबा आले, मग बाबा माझ्याशी बोलू लागले, मग आम्ही भेळपुरी मागवली, मग चहा प्यायलो, मॅगीबरोबर खेळलो, हे सगळं सुधीनं कॅप्चर केलं होतं.

मग मी दुसरी सीडी बघितली. त्यात सी.सी.टीव्हीसारखे घरातल्या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांवर त्याने छोटे छोटे कॅमेरे लपवले होते. मला हे त्याने कळू दिलं नव्हतं. आधीच्या सीडीतल्या सगळ्या गोष्टी त्यात होत्या. सुधी कॅमेरा घेऊन सगळीकडे हिंडत होता ते होतं. बाथरूममध्ये मी व्यवस्थित आंघोळ करताना दिसले होते. पण ह्याबरोबरीनं त्यात वेगळं काही तरी होतं. सगळ्या घटनांना, हालचालींना एक निश्चित स्थैर्य होतं. कॅमेर्‍याचं. त्याची लेन्स मर्यादित होती. त्याची फ्रेम ठरलेली होती. तिच्या बाहेरचं काहीही त्यात उतरत नव्हतं. त्यामुळे ऑथेंटिक असूनही मला दुसर्‍या सीडीतला सगळा ऐवज कोरडा वाटला. मला पहिल्या सीडीतला तो दरवाजा कॅमेर्‍यावर आपटला आणि कॅमेरा वाचवण्यासाठी धडपडताना सुधीच्या हाताची झालेली हालचाल जास्त इंटरेस्टिंग वाटत होती. पॉर्नसारखंच घडल्याबरहुकूम शूट झालेलं सगळं काही नीरस वाटत होतं. आणि पहिल्या सीडीत जिथे सुधीनं सगळं शूटिंग स्वत:च्या बुद्धीनं आणि लहरीनुसार केलं होतं त्यात त्याच्या बॉडीची, विचारांची सगळी एनर्जी उतरली होती.

मी खाडकन तरतरीत झाले. माझी झोपच उडाली. मला त्या दोन्ही सीडीजमुळे खूप त्रास होऊ लागला. वाटलं, का आपण त्याला शूट करू दिलं? छोट्या छोट्या मोहांनी पुढे भले मोठे क्लेश होतात हे मनाच्या दरवाजावर घट्ट का नाही कोरून घेत आपण? लहानपणापासून वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर काढलेले फोटो, केलेले व्हिडिओ साठवून ठेवण्याने स्वत:लातरी पुढे काहीच उपयोग होत नाही. होतं ते फक्त स्मरण रंजन. मग तरी हे शूटिंग का? ते करून बघण्याचा मोह का? ते करून झाल्यावर ते जपण्याचा मोह का? वयाची चौतीस वर्ष संपून गेली, ह्या वेळी मी ही अशी दिसत होते, ही अशी उठत-बसत, हसत-ओरडत होते. माझं हे आत्तापर्यंतचं आयुष्य मी माझ्या जनुकातनं आलेल्या ह्या साठवणुकीच्या इन्स्टिंक्टला अर्पण करते. एवढ्या रॅशनली सोडवत गेलं तरीसुद्धा क्लेशाचं गणित हे नि:शेष काही सुटत नाही. त्याला हातचा म्हणून इच्छा येतेच. मोह येतोच.

§§§

सुधीने काही दिवस खरोखरच हमाल म्हणून नोकरी केली आणि तो माझ्यासाठी काम करू लागला. त्याने माझ्या क्लायन्टला बौद्धिक लळा लावून धंद्याचं भलं केलं. मी त्याला म्हणाले असते, तू त्याची शुद्ध फसवणूक करतोयस. त्याला जाळ्यात पकडलास आणि माझा फायदा करून दिलास तरी तू करत असलेल्या पापाचा हिशेब तुझा तुलाच चुकता करायचा आहे. पण मी तसं केलं नाही. काही लोकांच्या हेतूंबद्दल त्यांना नसेल इतका आपल्याला विश्वास वाटत असतो. आणि त्यांच्या कृती चुकीच्या मार्गाने जाताना दिसत असल्या तरी त्यांच्यामागे आपल्याला न उमगणार्‍या एखाद्या कारणाचं भक्कम पाठबळ असेल असं आपल्याला वाटत असतं. आपल्याला वाटत असतं म्हणजे मला असं वाटतंय. कारण सुधी हा हा म्हणता म्हणता त्या क्लायन्टला त्याच्या पुढच्या फिल्ममध्ये एडी म्हणून जॉईन झाला. माझा विश्वास बसेना. मी त्याला विचारलं तुला कसा काय बाबा घेतला असिस्टंट म्हणून. डिरेक्टरचा असिस्टंटच इतका गबाळा असेल तर डिरेक्टर फारच कमालीचा शिस्तशीर आणि शिक्षकी पेशाचा असला पाहिजे. सुधीनं शांतपणे चादर बाजूला केली. माझ्याकडे बघितलं. मी दरवाज्यात उभी राहून सकाळचा चहा-ब्रेकफास्ट बनवायला निघाले होते, तेव्हा वाटेत त्याला डिवचायचं म्हणून तिथे थांबले होते. तो उभा राहिला. कपडे ठीक केले. केस विसकटले. आणि मला एक लंबी स्टोरी सांगत तो मला किचनमध्ये घेऊन गेला. त्याने पाणी गरम केलं. ते दात घासण्यापूर्वी तो प्यायला. मग दात घासत घासत तो बेसिनच्या आरशात बघून माझ्याशी बोलू लागला. मी त्याला ते त्याचं सगळं पुराण बंद करायला सांगितलं, कारण मला त्याच्या तोंडातली पेस्ट कधीही कुठेही सांडेल याची भीती वाटत होती. त्याच्या सगळ्या म्हणण्याचा गोषवारा मी त्याला सांगून मोकळी झाले आणि त्याला म्हणाले की - जरी हे खरं असलं की तू त्याच्याकडे निव्वळ फिल्ममेकिंग शिकायला गेला आहेस तरी - त्याचं तुझ्यावरचं प्रेम काही जुन्या मराठी नॉव्हेल्समध्ये असायचं तसं अस्फुट अजिबात नव्हतं. तो तुझ्यावर क्लियरली लाईन मारत असतो आणि तू कितीही तटस्थ देवतेसारखा त्याला बगल देत राहिलास तरी एक ना एक दिवस असा एक क्षण येईलच जेव्हा तुला काठावर राहता यायचं नाही. त्याक्षणी तुला त्याला एक तर जवळ किंवा दूर करावंच लागणार आहे. तर तो शांत वृक्षासारखा मुळं रोवून उभा राहिला माझ्यासमोर. माझ्या डोळ्यात त्याने त्याच्या डोळ्यातलं विलक्षण स्थैर्य ओतलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला गप्प केलं. बर्‍याच वेळानंतर मी चहा गाळू लागले, तेव्हा त्याने मागून एक वाक्य फेकलं. समांतर कठड्यांवरून चालणार्‍या दोन व्यक्तींना एकत्र हातात हात घालून एकाच वेगानं चालायचं असेल तर त्यासाठी दोघांत एकाच वेळी मानसिक आणि शारीरिक संतुलन असणं गरजेचं आहे. एकानं जरी ते बिघडवलं तरी दुसर्‍यानं हात सोडून द्यावा. नाहीतर दोघंही खाली पडणार हे निश्चित. मला एकदम तुझी आठवण आली. आपले समांतर कठडे कसे आपोआप लांब लांब होत गेले. आयुष्यात एका बिंदूवर क्रॉस होणार्‍या रेषा पुढे हातात हात घालून समांतर चालवायच्या असतील तर भूमितीचे, निसर्गाचे, विज्ञानाचे सारे नियम धाब्यावर बसवावे लागणार. मग तुझ्या दुबळ्या मनाला हे खरखरीत सत्य कसं काय पचणार ह्याची काळजी करत मी किती रात्री घालवल्या हे मी आठवलं. धागधुगीनं माझा जीव कासावीस होऊ शकतो हे मला किती सहज कळून चुकलं.

मला चार-पाच दिवस कुठेतरी भटकून यावंसं वाटत होतं. मी निर्णय करू शकत नव्हते. संध्याकाळी काळोख सुरू होत असताना यावी तशी ऍंग्झायटी आली होती. सगळ्या घराच्या मी चकरा काय मारत होते, सुधीनं विचारल्यावर त्याला हुशार उत्तरं काय देत होते! मला त्याला माझ्या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायचं नव्हतं आणि मी इथे नसताना हा वेंधळा मुलगा घराची नीट काळजी घेणार नाही याविषयी मला खात्री होती. शेवटी त्याच्या बाबांच्या दुकानाचं रेनोव्हेशन करायचं ठरलं होतं म्हणून त्याला जावं लागलं आणि माझ्या डोक्यावरचं ओझं जरा कमी झालं. मी गोव्याला गेले आणि चांगली आठवडाभर तिथे रमले. खूप मज्जा केली. प्रिन्सी नावाची माझी मैत्रीण आहे तिच्याबरोबरीनं खूप फोटो काढले. पण जेव्हा फ्लाईटमधून खाली मुंबईचा कोलाज बघितला तेव्हा लक्षात आलं - मी कितीही म्हटलं की मी कोणाला बांधलेली नाही, तरी ह्या घराशी का होईना, एक स्प्रिंग बांधली गेलीच आहे माझी. मी स्वत: ती तशी अडकवून घेतली आहे. तू, मी आणि सुधी – स्वत:ला कोणाचेही न म्हणवणारे आपण. आपल्या आतल्या स्प्रिंग्ज किती घट्ट आहेत ह्या घराबद्दल. मी आत्ता एवढ्याश्या फडतूस अंतरावरून जर एवढी होमसिक झाले तर तू परत येताना विमान किती फोर्सने लॅण्ड होईल याची कल्पनाच न केलेली बरी. अर्थात मी तुझ्यावर एवढा विश्वास दाखवतेय. कारण मला माहितीये तू इथून जी एक्झिट घेतली आहेस ती माझा खूप राग आल्यामुळेच. तुझा राग कधी ना कधी निवळेल. आणि तोपर्यंत तुझ्या मनातलं ह्या घराविषयीचं प्रेम तू प्रयत्नपूर्वक जपशील. तुला हे ठाऊक आहे की मी कोणत्याही इमोशनल अत्याचाराला बळी पडणार नाही. आणि म्हणूनच तू हा असा डिसइंटरेस्टेड पवित्रा घेतलायस. तुला अशी खात्री असेल की तुझ्या जाण्यानं माझ्यावर काहीच फरक पडणार नाही, आणि पडलाच तर तो मी तुला कळू देणार नाही, तर ती खरीच आहे. पण हेही लक्षात ठेव की मला तुला सरप्राईज द्यायला प्रचंड आवडायचं. आणि आताही तुला सरप्राईज देण्याची वेळ आलेली आहे.

§§§

एक दोन तीन आणि चार अशी एका मागोमाग एक चार कचकचीत अंडी फोडून सुधीनं कढईत सोडली आणि सगळ्या घरभर पसरलेल्या कांद्याच्या खमंग वासावर अंड्याच्या बलकाचा गंध चढला. कालथा कढईत ठाणठाण वाजवत त्याने भुर्जी केली, तवा तापवून त्यावर पाव भाजले. फ़्रीजमध्ये मिळतील ते सगळे मसाले एकत्र करून एक मिक्स्ड मसाला भुर्जीपाव तयार केला आणि मला खाऊ घातला. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी एखाददुसरी कला किंवा स्किल पुरेसं असतं. उदाहरणार्थ स्वैंपाक किंवा घरकाम किंवा संगीत किंवा हिशेब. ह्यांपैकी काहीही बाजूला काढलं असतं तरी सुधी पास झाला असता. पण मला आता तो कधीच एकएकटा दिसत नव्हता. मला जेव्हा जेव्हा त्याच्याविषयी आपुलकी वाटे तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण होई. तुझ्यावरचं माझं प्रेम जरी मी तुला कधीच शब्दात सांगितलं नसलं तरी तुझ्या मनातलं जे काय ते तू मला नाना प्रकारे कळवलं होतंस. त्यामुळे मला सुधीबरोबरचा ह्यापुढचा एकही अनुभव शुद्ध घेता आला नाही. त्याला तुझ्या असण्यानसण्याचे सगळे भावनिक किनारे लावून मला गळी उतरवावा लागला.

माझं कुतूहल जरा जास्त जागृत झालं होतं. सुधी भुर्जी करता करता त्याच्या नव्या मैत्रिणीशी मोबाईलवर चॅट करत होता. मला कधीच स्मार्टफोन्स आवडले नाहीत. अर्जुननं माझ्यासाठी आणि बाबांसाठी एकदम टॅब घेऊन टाकले. मला न विचारता. बाबांना टॅब चक्क जमला. आणि त्यांनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. पण मी अजूनही नोकिया झिंदाबाद करत कीपॅडवरची बटन्स टुकटुक दाबत फोनाफोनी करणं पसंत करायचे. त्यामुळे मुळात आधी तो स्वैपाक करता करता फोनवर काही तरी रचतोय हे बघूनच माझी सटकली होती. पण मी काही बोलले नाही. बोलले असते तर त्याने फोन बंद केला असता. आणि गप्पा मारत मारत माझ्या तावडीतून सुटला असता. मी कटाक्षानं मैत्रिणीविषयी विचारायचं टाळलं. मला माहीत होतं ती कोण आहे. त्यानेच सांगितलं होतं आणि दाखवलं होतं. तो प्रसंगही फार मजेशीर होता. पण त्याने स्वत:हून सांगितलेल्या त्याच्या मैत्रिणीविषयी मी त्याला या अशा वेळी विचारणं म्हणजे मला फार ऑबवियस वाटत होतं. मला जनरलीच लोक कोणाकोणात गुंतलेत ते जाणून घ्यायला आवडतं हे सुधीला एव्हाना कळलं होतंच. पण इथे तो स्वत: चित्रात असल्यामुळे माझं त्याच्याविषयीचं कुतूहल हे कोणत्या वेगळ्या पातळीला पोहोचलेलं नाही असं मला खात्रीलायकरीत्या त्याच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आणि मला अजून आत्मविश्वास वाटत नव्हता. पुढे जेव्हा त्याची मैत्रीण हे जग सोडून गेली तेव्हा मला तिच्याविषयी ह्या दिवशी वाटलेल्या केसाएवढ्या मत्सराची आठवण झाली.

§§§

परंपरेला बासनांत गुंडाळून ठेवण्याची एक लांबसडक परंपरा झाली की एक मौजिया क्रिएटिव्ह गोंधळ उडणं स्वाभाविकच. ज्या परंपरेला विरोध करणारे आपण मोठे क्रांतिकारी पाथब्रेकर असतो तीच मग उद्गाता ह्या नात्याने आपल्या ढुंगणाशी चिकटते.

मी तुला हे सारं सांगतेय हीतरी कुठे एक लांबलचक सलग आठवण आहे? जगून फेकलेल्या आयुष्याची फोलपटं राहतात मनात. त्यांची कलाकुसर करायची आणि आनंद घ्यायचा एवढंच तर एक काम साधता येईल ह्या प्रपंचानं. खरं सांगायचं तर मला ह्या एक्सरसाईजमधून जितका आनंद मिळतोय, तितका कदाचित त्याहून जास्त, माझं मीच एन्काउंटर केल्याचा फील येतोय.

जेव्हा एखादा कवी मरतो तेव्हा समाजाचं नक्की काय कमी होत असतं? कवी काम करतो ते स्वत:शी प्रामाणिक राहून. स्वत:च्या सत्याशी एकनिष्ठ राहून. समाजाच्या लाग्याबांध्यांचं त्याच्या सत्यावर कोणत्याही प्रकारचं आरोपण होऊ नये अशी अपेक्षा असते. पण कवी मरतो तेव्हा समाजाचं निश्चित काही तरी नुकसान होत असतं. कवी कितीही छोटा किंवा मोठा प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध असला, तरी त्याच्यात समाजाला एक कोनाडा सापडलेला असतो. कवी जातो आणि समाजाला आपली सत्य, गुपितं आणि मूलतत्त्व सापडलेला हा कोनाडा विनाश पावतो.

§§§
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त! आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले इतकेच म्हणतो. बरेच काही गोवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या कथेबद्दल माझी जरा गोचीच झाली.

अगदी पहिल्यांदा वाचताना शैलीनंच दिपून जायला झालं. तिच्यावरचा गौरी देशपांडेचा प्रभाव सरळच आहे. नुसत्या भाषाशैलीत नव्हे, पात्रांची रेखाटनं, त्यांच्या निष्ठा आणि जीवनव्यवहार (हुह), इत्यादी सगळ्यांवरच. मग 'हो, झोपलीस बाई तू ३ पुरुषांबरोबर. तुला मजा आली. मग आम्ही काय करू?' अशा टँजण्ट भिवया उंचावून गौरीला निकालात काढणार्‍या पुरुषमित्रांवरच्या रागापोटी मी गोष्ट उगाच आवडवून घेतली.

पण परत वाचताना नुसती खोटी जर, बेगड, घोटीव कागद, जिग आणि झिरमिळ्या दिसाव्यात आणि माणसाचा सोडा, मुखवट्याचाही पत्ता नसावा, तसं काहीतरी झालं.

तर - मी ऑफिशिअली खांदे उडवलेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाचलं पण शैलीपलीकडे काही फारसं उमगलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी हेच्च.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0