Skip to main content

डेस्टिनेशन ∞

अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे

चांदणचुर्‍याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे

प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे

दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे

मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे

आता फक्त यान कुठचे
इंधन साठवायला कॅन कुठचे
उकडले तर फॅन कुठचे
ह्या प्रश्नांशी लढतो आहे

अनंताच्या यात्रेसाठी
फक्त निघायचं बाकी आहे

प्रभुदेसाई Sat, 06/03/2021 - 17:07

एक मिनिट. मी पण येतो. प्रवासात तुमच्या कविता चूप चाप ऐकेन. बोअर पण करणार नाही..प्रॉमिस !

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 19:51

In reply to by प्रभुदेसाई

तुमच्या विज्ञानकथा चमत्कारिक असतात. (सुरससुद्धा असतात.) तुमची इथली गरज तथा तुमचे इहलोकीचे कार्य अद्याप (तरी) संपलेले नाही. तुम्ही (सध्या तरी) इथेच थांबा!

(बाकी, विज्ञानकथा लिहिणाऱ्याने 'अनंताच्या प्रवासा'त वगैरे दिलचस्पी दाखवावी, हे अंमळ रोचक वगैरे आहे. असो चालायचेच.)

----------

कमिंग फ्रॉम मी, प्लीज़ टेक दॅट ॲज़ अ काँप्लिमेंट.

चिमणराव Sat, 06/03/2021 - 17:53

हुएनसंग इकडे नालंदाला आला होता त्याचे चित्र आठवले. त्या वेळचा ब्याकप्याक, काठीला लोंबकळणारा कंदील वगैरे.

तिरशिंगराव Sat, 06/03/2021 - 18:10

यावे, मी वाट पहात आहे.

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 20:03

In reply to by तिरशिंगराव

तुम्ही इतकेही 'पोचलेले' असाल, याची कल्पना नव्हती. असो चालायचेच.

प्रभुदेसाई Sat, 06/03/2021 - 20:42

In reply to by तिरशिंगराव

अनंत यात्री
तिरशिंगरावांनी इन्फिनिटी आधीच सर केली आहे असे दिसते. . आता आपण गेलो तर आपली अवस्था कप्तान स्कॉट प्रमाणे होईल. तर मग आपण मायनस इन्फिनिटी कडे जायचे का?

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 21:49

In reply to by anant_yaatree

थोडक्यात, अनंत अनंत आहेत, असे सुचवायचे आहे काय?

कल्पना रोचक आहे.

प्रभुदेसाई Sat, 06/03/2021 - 22:04

In reply to by anant_yaatree

हे लोक सुक्ष्म देहाने इन्फिनिटीवर गेले असणार किंवा घरी बसून म्हणत असतील “हीच माझी इन्फिनिटी.” After all my Infinity is not equal to your Infinity.

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 21:44

In reply to by प्रभुदेसाई

नील आर्मस्ट्राँग जेव्हा चंद्रावर उतरला, तेव्हा त्याचे स्वागत करायला (नि त्यास आल्याआल्या कॉफी नि इडली ऑफर करायला) तेथे एक मद्राशी अगोदरच पोहोचला होता, अशी एक (तत्कालीन) आख्यायिका आहे.

तसेही, कोलंबस जेव्हा 'नव्या जगा'त पोहोचला, तेव्हा तेथे अगोदरच माणसे नव्हती काय? परंतु तरीही, 'नव्या जगा'च्या शोधाचे श्रेय आपण (तथाकथित 'कॅन्सल कल्चर' नॉटविथस्टँडिंग) कोलंबसास देतोच ना?

तेव्हा, तुम्ही नि:शंकपणे अनंताकडे जा. तिरशिंगराव तेथे अगोदरच पोहोचलेले आहेत, याची फिकीर करू नका. हवे तर, माझा अनुभव (प्रेरणा म्हणून) लक्षात घ्या. कोलंबसास १४९२ साली 'नव्या जगा'चा (स्पेसिफिकली: बहामामधील एका बेटाचा) शोध लागला. तेव्हा त्या परिसरात अगोदरच लोकवस्ती होती. त्यानंतर ५०० वर्षांनी, १९९२ साली, मलाही 'नव्या जगा'चा (स्पेसिफिकली: सान फ्रान्सिस्को विमानतळाचा) शोध लागला. तेव्हाही (आणि त्या परिसरातही) अगोदरच लोकवस्ती होती. मग कोलंबसात नि माझ्यात नक्की फरक तो काय? आजमितीस मी "१९९२ सालच्या नोव्हेंबराअखेरीस मी 'नव्या जगा'चा शोध लावला", असे लोकांस सांगत हिंडतो. तुम्हीही माझा कित्ता गिरवा.

आणि तसेही, तुम्ही केवळ तिरशिंगराव अनंतापर्यंत पोहोचले आहेत, याची चिंता करीत आहा. लक्षात घ्या, आजमितीस आतापावेतो पिढ्यानपिढ्यांतून कित्येक जण (लक्षावधी? कोट्यवधी?) अनंतात विलीन झाले असतील; एकट्या तिरशिंगरावांचे काय घेऊन बसलात? यावरून, तुमची चिंता किती कोती आहे, क्षुल्लक आहे, हे तुमच्या लक्षात यावे, अशी अपेक्षा करतो. Think big, man!

----------

तळटीपा:

तत्कालीन शब्द. आजकाल हा स्लर मानला जातो. (बहुधा तेव्हाही मानला जात असावा, परंतु तरीही, लोक तेव्हा तो सर्रास वापरीत. असो.)

'हे मद्राशी साले जगात कुठेही कडमडतील!' हा मुद्दा ठसविण्यार्थ रचलेली तत्कालीन आख्यायिका. वर्ड-ऑफ-मौथने आमच्या कानी (बऱ्याच नंतर) आलेली. (हो, आम्ही लहान होतो, आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तेव्हा.)

चिमणराव Sun, 07/03/2021 - 05:27

In reply to by 'न'वी बाजू

चंद्रावर हवा नाही म्हणून ते वाजवण्याकरता महागडा ओक्सीजन शिलेंडर वापरत नाही. आपण सोडलेला कार्बनडाय वायू भरून वापरायची कल्पना अमलात आणली असेल आतापर्यंत.

चिमणराव Sun, 07/03/2021 - 05:19

In reply to by प्रभुदेसाई

जाण्यात आहे. त्यांची पोहोचण्यात.
-------------------
लहानपणी चांदोबात वाचलेली गोष्ट आठवली. त्यावर चित्र होते - एका माणसाच्या डोक्यावर एक बैलगाडीच्या चाकाएवढे चाक असते ते फिरत असते. आणि दुसरा एक तिकडे येताना पाहून त्याला आनंद झालेला असतो.

एक माणूस खडतर प्रवास करून एका ठिकाणी जातो तर तिथे तो माणूस आणि त्याच्या डोक्यावर चाक दिसते. त्याला तो विचारतो अरे हे काय? तू इथे काय करतो आहेस असे हे डोक्यावर चाक ठेवून?
हा प्रश्न विचारताच आधीच्या माणसास आनंद होतो कारण ते चाक त्याच्या डोक्यावरून उडून नवीन माणसाच्या डोक्यावर बसते.
.
" आता वाट पाहात उभा राहा इथेच, कुणी नवीन येऊन तुला हाच प्रश्न विचारेल तेव्हा सुटका होईल. मी चाललो."

------------
मी नाही येत. तो चांदणचुरा ड्रॉप.

सामो Mon, 08/03/2021 - 06:23

In reply to by चिमणराव

मला ती कथा व ते चित्र नीट आठवते. काटेरी जड चक्र असते. त्या चक्राचे नाव असते 'असिधरा चक्र'
आपण म्हणुनच म्हणतो ना - असिधरा व्रत.

'न'वी बाजू Mon, 08/03/2021 - 07:43

In reply to by सामो

असिधारा व्रताबद्दल इथे.

डोक्यावरच्या चक्राची ष्टोरी इथे.

कशाचाही कशाशीही संबंध नाही.

निदान एकविसाव्या शतकात तरी गूगल आपला मित्र आहे. उगाच आपले 'ठोकून देतो(ते) ऐसा(सी) जे' करण्यापूर्वी थोडे संदर्भ तपासले (आपले बरोबर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी), तर तो फौजदारी गुन्हा ठरत नाही.

असो चालायचेच.

प्रभुदेसाई Mon, 08/03/2021 - 08:02

In reply to by 'न'वी बाजू

मला जे माझ्या लहानपणी सांगितले गेले ते असे.
कडक ब्रह्मचर्याचे पालन करायचे असते तेव्हा व्रत करणारा रात्री झोपताना आपल्या व आपल्या पत्नीच्या मध्ये धारदार(धारा) तलवार(असि) ठेवत असे. जास्त उकल करून सांंगायची गरज नाही.

'न'वी बाजू Wed, 10/03/2021 - 08:33

In reply to by सामो

त्या लिंकेवरची ती कथा वाचून देवदत्तच्या लाकूडतोड्याच्या गोष्टींची आठवण झाली. वाटेल त्या लोककथा आणि वाटेल ते शब्द छानपैकी रँडमली एकमेकांत घुसडून दिलेले आहेत, झाले.

देवदत्तने निदान तसे ते जाणूनबुजून, विनोदनिर्मितीसाठी केले आहे, असे मानायला जागा आहे. त्यामुळे, त्याच्या लाकूडतोड्या कथांत काही लॉजिकल सीक्वेन्स आहे, एका कथेवरून दुसऱ्या कथेवर घसरताना सांधेपालट सहज आहे, सीमलेस आहे. इथे म्हणजे, सगळाच रँडम मामला. भांग खाऊन ष्टोरी प्रसवल्यासारखी वाटते.

असिधाराचक्र? बोले तो, तलवारीच्या धारेचे चक्र??? म्हणजे??? तलवारीच्या धारेचा नि (त्या, किंवा अन्य कोणत्याही) चक्राचा संबंध काय? उगाच काहीही? आणि उगाच ष्टोरीत बुद्धदेव कुठेतरी ओढूनताणून घुसडून दिले - ना आगा, ना पीछा - की झाली कहाणी???

लोक काहीही छापतात - ठीक आहे, त्यांचे ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण म्हणून तुम्हीही ते डोळे झाकून, छाननी न करता, तसेच उचलावे? फार काही नाही, तरी स्वतःच्या डोक्याची चाळणी लावून कसाला लावून बघायला नको?

धन्य आहे, एवढेच म्हणू शकतो.

असो चालायचेच.

तिरशिंगराव Wed, 10/03/2021 - 11:15

In reply to by 'न'वी बाजू

लिंक दाबल्याबरोबर आधी रेल्वेचे रुळ दिसले. त्यामुळे त्यावर मान ठेवल्यावर रेल्वेचे असिधाराचक्र मानेवरुन गेल्यावर काय होते, त्याची माहिती असेल असे वाटले. त्यानंतर भारताचे बजेट कसे तयार करतात याविषयी माहिती वाचली. त्यातील वित्तमंत्री आणि त्याखालील गोष्टीतल्या मित्रविंद या दोन्ही शब्दांत थोडे साम्य वाटले. गोष्टही वाचली, पण मनांत अनेक शंका उभ्या राहिल्या.
१. चित्रातील मित्रविंद म्हागुरुंसारखा का दिसतो?
२. पिशाच्चिनींबरोबर विलास म्हणजे नक्की काय?
३. चढत्या भाजणीत इतक्या पिशाच्चिनींबरोबर विलास केला तरी तो जिवंत कसा राहिला?
या प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही दिली नाहीत तर वाचणाऱ्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्यांना शंभर नव्या बाजू दिसू लागतील!

सामो Wed, 10/03/2021 - 19:15

In reply to by 'न'वी बाजू

नबा, मी कुठे वाचली ती गोष्ट- मी फक्त चित्र पाहीले व मला पूर्वी ती चांदोबात वाचली होती असे ८०% वाटले. बाकीचे २०% मला वेगळच चित्र आठवतय. पण तुम्ही दिलेल्या दुव्यावरची कथा (ती ही मी वाचली नाहीच), पण चाळली - चाळ्यानंतर माझ्या लक्षात आले की मी लहानपणी ती गोष्ट वाचलीच नाहीये. म्हणुन मी फक्त या ८०% गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधले.

प्रभुदेसाई Sat, 06/03/2021 - 18:57

हे पहा .अजून एक अनंत यात्री !
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

....सहकार्यानो,का ही खंती जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापारी असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला धाम
....
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 19:12

१. मी झोपतो करून हिमालयाची उशी!
२. वचने किं दरिद्रता|

असो. प्रवासाकरिता शुभेच्छा. शुभस्य शीघ्रम्| (सूनर यू दॅन मी!)

(हातावर दही देऊ?)

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 20:04

आपण सर्वच जण एका अर्थाने अनंताचे प्रवासी नव्हे काय? कदाचित अनिच्छेने, परंतु तरीही? (एकाच नावेचे प्रवासी?) तुझे आहे तुजपाशी...

(मग इतक्या जणांना लागत नाही, तर प्रस्तुत कवीलाच तेवढी इतकी तयारी का लागावी? हे एक गूढच आहे.)

----------

नाव नव्हे. तयारी.

anant_yaatree Sat, 06/03/2021 - 20:17

In reply to by 'न'वी बाजू

प्रवासी आहात. मी यात्री ( यात्रेकरू) आहे. प्रत्येक यात्रेकरू हा प्रवासी असतो पण प्रत्येक प्रवासी यात्रेकरू असतोच असे (मला वाटत) नाही. तस्मात् आमची तयारी वायली.

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 20:24

In reply to by anant_yaatree

पॉइंट टेकन.

(अवांतर: हे एकदा भारतीय रेल्वेस सुचवून पाहा. लेकाचे सगळ्यांनाच 'यात्री' कॅटेगरीत गणतात!)

'न'वी बाजू Sat, 06/03/2021 - 20:21

अनंताच्या यात्रेकरिता 'जय्यत' तयारीपेक्षा 'मय्यत' तयारी अधिक उपयुक्त ठरावी, नाही काय?

"Lao Tzu said: 'You must find the way!' I've found it. You must find it too... So I'm going to cut off your head. Then you'll know the truth!"

"Look, you needn't be afraid. I only have to cut your head off!"

"It won't take a minute, you'll see..."

- "The Adventures of Tintin: The Blue Lotus".

anant_yaatree Sat, 06/03/2021 - 20:30

In reply to by 'न'वी बाजू

करायला मी जय्यत तय्यार आहे. तेवढं एडिटिंगचं सांगून ठेवा.