Skip to main content

इजराईल -इराण युद्ध

इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.

इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.

इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.

या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

विवेक पटाईत Tue, 03/03/2026 - 15:50

ज्यांनी स्वत:च्या देशातील लाखो लोकांना फासावर चढविले आहे, अश्या कट्टर जिहादी राष्ट्राला कुणीही समजवू शकत नाही. दुसरी कडे इजराईलचे अस्तित्व भविष्यात राहणार की नाही, हे ह्या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे. या शिवाय "सुपर पावर" भविष्यात सुपर पावर राहणार की नाही हे ही या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 20:21

In reply to by विवेक पटाईत

या शिवाय "सुपर पावर" भविष्यात सुपर पावर राहणार की नाही हे ही या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे.

असे नोस्त्रोदामसकाकांनी सांगून ठेवलेले आहे काय?

सई केसकर Tue, 03/03/2026 - 19:19

इस्रायलचा नाश व्हायच्या आधी धनंजय माने यांचं डायबेटिसचं औषध मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना..

सई केसकर Tue, 03/03/2026 - 20:38

In reply to by 'न'वी बाजू

आता इतक्या वर्षांचं इन्फ्लेशन वगैरे...शिवाय आज ब्रेंट क्रूडच $७०/बॅरल झालं. इस्लामी वर्चस्व हटवायची किंमत तर द्यावीच लागेल ना पुणेकरांना!

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 21:02

In reply to by सई केसकर

...पुण्यावरील इस्लामी वर्चस्व हटविण्याची चिंता दिल्लीकरांना कधीपासून (नि काय म्हणून) पडू लागली, इतकाच प्रश्न आहे.

(शिवाय, त्यांचे मूळसुद्धा पुणेरी नव्हे. (नागपूर की कायसेसे ऐकून आहे.) अर्थात, पुणेरी लोकांच्या डोक्यांत इस्लामी वर्चस्वाच्या भीतीचे खूळ घुसवून देण्याची नागपूरकरांची परंपरा अंमळ जुनीच आहे, म्हणा.)

(बाकी, 'सदाशिव पेठेवरील इस्लामी वर्चस्व' वगैरे कल्पनांनी अंमळ महिरून वगैरे गेलो, हे नमूद करणे येथे प्राप्त आहे. चालायचेच.)

सई केसकर Wed, 04/03/2026 - 16:03

In reply to by अबापट

अहो अहो अहो! मूळ सिनेमात पुण्यातला एक बंगला, बालगंधर्व रंगमंदिर वगैरे आहे म्हणून पुणे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/03/2026 - 07:24

In reply to by सई केसकर

तो मित्र वारला तसं औषध वारलं नाही म्हणजे मिळवलं!

'न'वी बाजू Thu, 05/03/2026 - 08:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तो पिच्चर कधीचा? किती वर्षे झाली त्याला? आता, औषध म्हटले, की त्याला काहीतरी एक्स्पायरी डेट असणारच की!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/03/2026 - 07:59

In reply to by 'न'वी बाजू

अहो, इस्रायलवरून आणायचं औषध आहे. अशी कशी एक्स्पायरी असेल त्याला! काहीही हं तुमचं, 'न'बा!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/03/2026 - 07:56

In reply to by 'न'वी बाजू

मला फायरफॉक्सातून पैसे न देता फोटो बघता आले. मी ॲडब्लॉकला एकरकमी पैसे दिले आहेत, एका वर्षाचे, म्हणून असेल का?

'न'वी बाजू Fri, 06/03/2026 - 08:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन पर्याय देतोय.

१. पहिल्या वर्षाकरिता $४९ आणि त्यानंतर प्रतिवर्षी $१४९, किंवा
२. पहिले दोन आठवडे फुकट (साइनअप करून) आणि त्यानंतर प्रति-चार आठवडे $१२.९५

पेवॉलचा आणि ॲडब्लॉकरची वार्षिक वर्गणी भरलेली असण्याचा अर्थाअर्थी संबंध (बहुधा) नसावा. (चूभूद्याघ्या.)

(कदाचित तुम्ही बिझनेसइनसायडरची वर्गणी भरली असावी काय? किंवा, गेला बाजार, बिझनेसइनसायडरला इतक्यात कधी साइनअप केले असावे काय?)

(समजा, ॲडब्लॉकरने काही जुगाड़ करून तुम्हाला एक वेळेस पेवॉलला ओव्हरराइड करू जरी दिले — ज्याची शक्यता मला मुळात नगण्य वाटते — तरीसुद्धा, असा परिणाम कायमस्वरूपी अथवा दीर्घकाळ टिकून राहू शकेल, याबद्दल प्रचंड साशंक आहे.)

असो.

अमित.कुलकर्णी Wed, 04/03/2026 - 10:54

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम!

२ मुद्द्यांविषयी माझी मते -

१. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. - "भारता"ने आपली राजवट तिथे स्थापन करावी. "अपॉरचुनीटी है, बेनिफिट ले सकते हैं." - हे यापूर्वी कुणालाही न सुचू शकणारे चतुर धोरण या वेळी अनुसरता येईल.

२. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. - विश्वगुरू असलेल्या भारताकडे का नाही बरे? "आमचे नेतृत्व करा" अशी गळ ते घालताना आम्हाला आत्तापासून दिसत आहेत.

विवेक पटाईत Thu, 05/03/2026 - 17:25

In reply to by अमित.कुलकर्णी

या घटकेला रशिया आणि चीन नंबर दोन आणि तीन वर आहेत. बाकी भारतालाही मोठ्या प्रमाणाव शस्त्रांचे ऑर्डर मिळतील. युद्धाचा निकाल काही लागो पण स्वतःची रक्षा स्वतः करायची असते हे प्रत्येक देशाला चांगले कळून जाईल. त्याचा फायदा भारतालाही होईल.

चिंतातुर जंतू Thu, 05/03/2026 - 18:06

काय सांगता! फॉरेन सेक्रेटरींनी अगदीच माती खाल्ली की!

India's foreign secretary Vikram Misri at Iran Embassy, meets Iran Ambassador Dr Mohammad Fathali. Pays condolences over the demise of supreme leader Khamenei.

India's foreign secretary Vikram Misri at Iran Embassy

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/03/2026 - 07:58

म्हणे भारतानं बोलावलेली युद्धनौका होती; त्यात काही शस्त्रास्त्रं नव्हती; ती श्रीलंकेजवळ भारताच्या हद्दीबाहेर अमेरिकेनं बुडवली. काय म्याटर झाला त्याचा?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/03/2026 - 02:05


मी आज टॅक्सी करून विमानतळावर गेले. जुन्या मित्राला भेटायला अल्बुकर्कीला चालले आहे.

टॅक्सीवाला इराणी होता. आॅस्टिनातल्या हवेनुसार टीशर्ट-शाॅर्ट्स घालून आला होता. त्याला म्हणाले, "I am sorry for what is going on in your country and happening to your people." आधी आम्ही दोघांनी धर्म, राजकारणी, अयातोल्ला सगळ्यांना नावं ठेवली.

हल्लीच झालेल्या सरकारविरोधी निदर्शनात ३६,००० लोक मारले. त्यांच्या दफनासाठी आधी नातेवाइकांकडून गोळ्यांचे पैसे घेतले, ज्या त्यांच्यावरच झाडल्या आणि मारलं. दफनाला दहा-पंधरा दिवस लागले. तो म्हणे, "यांच्या कर्माचं फळ पाहा! आता अयातोल्लाचं दफन करता येत नाहीये बाँब पडतील म्हणून."

तो ४२ वर्षांचा आहे. त्याला आठवतं तेव्हापासून दर शुक्रवारी टीव्हीवर 'अमेरिकेचं वाटोळं होवो', आणि 'इस्रायलचा नायनाट होवो' असं सतत चालायचं. इराणकडे किती मिसाईल आहेत, ड्रोन आहेत याची भर पडली. मग म्हणे, "बाँबहल्ले सुरू झाले आहे, आणि दोन तासांत अयातोल्लावरही बाँब पडला. काय फायदा या मिसाईलांचा!"

"इराणमध्ये खूप लाचखोरी आणि भ्रष्टाचार आहे. किती इराणी अधिकारी मोसादसाठी बातम्या पुरवत असतील पाहा! इतक्या सहज यांना अयातोल्ला आणि लष्करी अधिकारी कुठे आहेत, हे एरवी समजलं असतं का?"

"लोकांना फक्त स्वातंत्र्य हवं आहे. सरकारकडून, व्यवस्थेकडून आम्ही फार अपेक्षा धरतच नाही. मी काही वर्षं इराणमध्ये द. कोरियाच्या वकिलातीत काम केलं. तिथे मदत मागायला कुणी कोरियन आले तर त्यांना मदत करणं हे आपलं परमकर्तव्य असल्याचं लोक मानायचे. मी इथे इराणी वकिलातीत गेलो तर ते लोक माझा चेहरा, कपडे बघतील. लांब, मुसलमानी दाढी नाही; आणि बंद गळ्याची शेरवानी नाही; टीशर्ट-शाॅर्ट्स आहेत म्हणजे 'हा आपल्यातला नाही' आणि ते लोक मला मदत करणार नाहीत."

"तुम्हाला सरकार आवडत नसेल तर देश सोडून जा, असं म्हणायचे हे लोक. आता अयातोल्लाला मारला तर कित्येक देशांत इराणी वकिलातींसमोर लोक नाचताना दिसले. चिलेमध्ये इराणी लोक असतील असं मला वाटलंही नव्हतं. त्यांचे आताचे नाचतानाचे व्हिडिओ बघून मला समजलं."

इराणमध्ये महागाई खूप आहे, १००% आयातकर आहे, अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था बुडीतखाती गेली आहेत; लोकांनी जगायचं कसं! मग चोऱ्यामाऱ्या चिकार! त्याचाही एक फोन चोरीला गेल्याचं सांगितलं.

मग म्हणे, "भारतीय मुसलमान आणि पाकिस्तानी लोक अयातोल्लाच्या मरणाचा मातम करताना दिसत आहेत, काळे कपडे घालून! त्यांना माहीत आहे का नुकतेच त्यानं किती मुसलमान मारले, ३६,०००! मुसलमान म्हणून कुणालाही जवळ करायचं का! मी सांगतो तुला, जगातले सगळ्यांत बिनडोक लोक कोण, तर पाकिस्तानी. त्यानंतर अफगाण - विमानतळांवर नमाज पडताना दिसतात. आपला धर्म ठेवा आपल्याकडेच! आणि तिसऱ्या नंबरवर आमचे सत्ताधारी. मूर्ख लोक."

'परदुःख शीतल' याचं जेमतेम भाषांतर मी त्याला सांगितलं. फेसबुकवर मराठी पुरोगाम्यांनीही(!) अयातोल्लाचे फोटो लावलेले मी दोन दिवसांपूर्वी बघितले होते. आपल्याच लोकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणारा, स्त्रियांनी डोकं झाकलंच पाहिजे म्हणून लोकांना मारणारा अयातोल्ला.

विमानतळाजवळ आल्यावर म्हणाला, "ज्यांची मुलं या लोकांनी मारली त्या आया आता आपापल्या घरांच्या गच्चीवर जाऊन नाचत आहेत. धर्म आणि कट्टरपणानं माझ्या देशाची धूळधाण उडवली आहे."

मी शेवटी एवढंच म्हणाले, "युद्ध सामान्य लोकांच्या हिताचं कधीच नसतं. आत्ता मी फक्त आशा धरू शकते की हे युद्ध लवकरच संपेल. इराणी लोकांना पुन्हा आपला समाज आणि देश उभारता येईल. आणि मुख्य म्हणजे कट्टरवादी लोकांना सत्ता मिळणार नाही."

माझ्या आणखी एका मैत्रिणीचं कुटुंब इराणमध्ये आहे. त्यांची ख्यालीखुशाली तिला अजूनही समजलेली नाही.