थरार..... ! फ़क्त (?) आठ सेकंदांचा !!

मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्‍या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली.

Wow, exciting. Is there any concert or what? आमचा अज्ञ प्रश्न आणि अमेलियाची 'हे येडं कुठून आलं इथे?' अशी प्रश्नार्थक चर्चा.

It's Rodeo sport Vishal and not a musical concert. अमेलियाचे उत्तर.

"After watching rodeo, you are going to experience 'the most dangerous eight seconds of the sports' Vishal.", शेजारीच उभ्या असलेल्या लुईस रॉसने अजुन एक बाऊन्सर टाकला...

Is it? इति अस्मादिक...

कळले तर अजुनही काही नव्हते, पण (आम्हीसुद्धा गेली अडीच वर्षे पुण्यात राहतोय म्हटलं) Ohh Sorry, I heard it 'Radios' असं काहीतरी थातुरमातुर बोलून तात्पुरती वेळ मारून नेली आणि लगेचच 'गुगलबाबाला' साकडे घातले. गुगलबाबाने लगेचच सांगितले की Rodeo हा मुळ स्पॅनीश शब्द आहे. ज्याचा अर्थ 'राऊंड अप' किंवा 'टू सराऊंड' असा काहीसा होतो. अधिक खोलात जाण्यासाठी विकीबाबाच्या दारात जाऊन पोचलो, त्याने बरीच माहिती दिली.

रोडीओज रोडीओज

"बुल रायडींग" - (फोटो आंतरजालावरून साभार) "बुल रायडींग" - (फोटो आंतरजालावरून साभार)

रोडीओ बद्दल तर कळलं पण ते 'धोकादायक आठ सेकंद' ते काय प्रकरण आहे? हे मात्र कळायला मार्ग नव्हता. शेवटी स्वत:च्याच अज्ञानाची किव करत गुगलवर हेच शब्द सर्चला टाकले. उत्तरात गुगलबाबाचा पहिलाच दुवा होता "बुल रायडींग" थोडी फार माहिती वाचून मी गुगलबाबाला लगेचच 'बाय-बाय' केलं, कारण तो अनुभव प्रत्यक्ष याची देही, याची डोळा अनुभवण्यातली रंगत, तो थरार कमी करायचा नव्हता मला.

संध्याकाळी सातला शो सुरू होणार होता. फायनल्स होते. सुरूवातीच्या एकुण ९० स्पर्धकांमधून १२ कि १४ जण फायनल्सपर्यंत येवुन पोचले होते. आम्ही संध्याकाळी साडे पाच वाजता हॉटेल सोडले. शो सुरू होण्याच्या आधी डिनर उरकून घ्यायचे आणि मग शो बघायला जायचे अशी योजना होती. नेमका मी जाताना त्या गडबडीत माझा कॅमेरा बरोबर घ्यायचे विसरलो. त्यामुळे शक्य तेवढे फोटो मोबाईल कॅमेरा वापरुनच काढलेले आहेत. सगळे मिळून जवळ-जवळ २२ जण होतो आम्ही. त्यामुळे सगळे एकत्र येवून जमा व्हायला, निघायला तसा जरा उशीरच झाला होता. पण तरीही आम्ही तासभर आधी पोहोचलो.

’डेनवर कलोसियम’ जिथे या मॅचेस घेतल्या जातात, मोठ्या दिमाखात झळकत होते. त्या दिवसात नेमका अमेरिकन फ़ुटबॉलचाही ज्वर असल्यामुळे सगळीकडे लोकल फ़ुटबॉल टीम ब्रॉंकोस चे बॅनर्स, पोस्टर्स लागलेले. आम्ही डिनर आटपून घेण्यासाठी म्हणून आधीच बुक केलेल्या रेस्टरॉमध्ये पोचलो. वेळ कमी असल्याने पटापट उरकण्याचे एकमेकाला पुन्हा-पुन्हा सांगत जेवण सुरू झाले. पण तरीही बराचसा वेळ 'दर्दीं' लोकांच्या गप्पांनीच घेतला. मग जेवण घाई-घाईत उरकले आणि जेवण आटपून सगळी गॅंग कलोसियमच्या दारात येवून पोचली. आम्ही गेलो त्यावेळी स्टेडियम फ़ायनल्स पाहायला आलेल्या माणसांच्या जथ्थ्यांनी गच्च भरलेली होती. असो.. आम्ही स्टेडीयममध्ये आपापल्या जागा पटकावल्या. स्टेडियम मात्र लोकांनी खचाखच भरलेले होते.

DSC_7126

DSC_7130

स्टेडियमच्या मधोमध उंचावर एकमेकाशी संलग्न असे एक चौकोन तयार करणारे चार मोठे स्क्रीन्स टांगलेले होते. ज्यावर सलग स्टेडियमच्या वेगवेगळ्या भागातली दृष्य़े प्रसारीत केली जात होती. अगदी मैदानात उतरणार्‍या प्रत्येक स्पर्धकाची पुर्वतयारीसुद्धा लाईव्ह पाहता येत होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गेल्या दहा वर्षातील चॅंपीयन्सबद्दल बरीच माहिती पुरवण्यात आली. एवढेच नव्हे तर एका सहा घोडे जोडलेल्या उघड्या टपाच्या बग्गीतून या सर्व माजी विजेत्यांची एक जंगी मिरवणूक त्या अ‍ॅरेनातून काढण्यात आली.

कॉमेंटेटर अतिशय अभिमानाने प्रत्येक चॅंपीयनबद्दल माहिती देत होता. त्यांची नावे पुकारताना त्यात एखाद्या डेनवरच्या स्थानिक हिरोचे नाव आले की प्रेक्षकातून उठणारा आनंदाचा, अभिमानाचा हुंकार या खेळाबद्दलचे, खेळाडुंबद्दलचे त्यांचे प्रेम स्पष्ट करत होता.

नंतर तर माझ्या असे लक्षात आले की स्पर्धक स्थानिक असो वा बाहेरुन आलेला (इथे अगदी जर्मनीपासून ब्राझीलपर्यंत वेगवेगळ्या देशाचे स्पर्धक हजर होते) असो, प्रत्येकाच्या बहाद्दरीला मिळणारा सन्मान, टाळ्या , प्रोत्साहन सारख्याच पातळीवर होते.

20140115_195948

20140115_200126

 

रोडीओ स्पोर्ट्स

साधारण अठराव्या शतकाच्या प्रारंभी या साहसी खेळाची कल्पना कुठल्यातरी मेक्सिकन गुराख्याच्या सुपीक डोक्यात आली असावी. कारण १८२० ते १८३० च्या दरम्यान रोडीओजचे खेळ चांगलेच भरात आलेले होते. पुर्वीच्या काळी इतस्ततः पसरलेली गुरेढोरे एकत्र आणून त्यांना त्यांच्या संबंधीत तबेल्याकडे/मध्ये ढकलण्यासाठी तिथल्या काऊबॉईजनी (गुराख्यांला काऊबॉय कसं रुबाबदार वाटतं ना म्हणायला Wink ) ही पद्धती विकसीत केली होती.

३ किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने असलेले काऊबॉईज घोड्यावर बसून इतस्तत: विखुरलेल्या गुरा-ढोरांना गराडा घालत त्यांना त्यांच्या तबेल्यापर्यंत आणून सोडायचे काम करत. नंतर १८२० ते १८३० च्या दरम्यान काऊबॉईजचे हे स्किल तिकीट लावून लोकांसमोर आणण्याचे शो आयोजीत करणे सुरू झाले. आणि त्याला नाव दिले गेले Rodeo Sport. तसं सोपं वाटतं पण एकेक जनावर घोड्यावरून पाठलाग करत बरोबर तबेल्यात आणून कोंडायचं हे काम खुप कठीण आहे. कारण मोकळी सोडलेली ही जनावरं फार नाठाळ असतात. कधी हुलकावणी देवून सटकतील काही नेम नाही. त्यांना पळवत-पळवत बरोबर तबेल्यात / गोठ्यात (Ranch) मध्ये आणून सोडणं हे किती कौशल्याचे काम आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा का होइना हे Rodeo Sport अनुभवणं आवश्यक आहे. गंमत म्हणजे हा खेळ अमेरिकनांच्या रोजच्या आयुष्यात इतका भिनलाय की इथे बर्‍याचदा लोकांना "This is not his first rodeo" असं म्हणताना ऐकलं होतं. पण रोडीओ हा प्रकारच माहिती नसल्याने ते काय म्हणताहेत ते लक्षातच यायचं नाही. जेव्हा रोडियो स्पोर्ट्स बघितले तेव्हा "This is not his first rodeo", म्हणजे "गडी अनुभवी आहे" हे कळालं.

खरेतर स्पेन, मेक्सिको इथे सुरू होऊन नंतर अमेरिकेचे पश्चिमी परगणे आणि मग खाली झिरपत झिरपत कॅनडा, दक्षीण अमेरिका, ते थेट ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड इथपर्यंत या खेळाचे लोण पसरत गेले असावे. हळु-हळू हा खेळाची व्याप्ती वाढायला लागली. आजघडीला जगभरात जिथे जिथे हा खेळ खेळला जातो तिथे, तिथे घोड्यांबरोबर इतर सजीव जनावरांचाही समावेश केला जाऊ लागलेला आहे. यात त्या त्या भागात उपलब्ध असणार्‍या प्राण्यांचा समावेश आहे. मग यात अगदी घोडे, बैल, मेंढ्यांपासून ते उंटापर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश होतो. अर्थात अमेरिकेत मात्र हा खेळ खास करून घोडे, गाई-गुरे आणि बैल यांच्या वापरापुरताच मर्यादीत आहे.

Horse Riding-1-24

Horse Riding-1-25

Horse Riding-1-37 - Copy

एकदा उत्पन्न दिसायला लागले की मग कुठल्याही गोष्टीला व्यावसायिक स्वरूप यायला लागते, त्याला वेळ लागत नाही. या खेळाचेही तसेच झाले. मुळातच हा साहसी खेळ. खेळाडुंच्या कुशल क्षमतेचा, त्याच्या वेगाचा किंबहुना वेगवान हालचालींचा, निर्णय क्षमतेचा कस लावणारा हा खेळ अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाला. मग त्यातुनच सहभागी स्पर्धकांच्या क्षमतेची कसोटी पाहणार्‍या, त्यांची क्षमता पारखणार्‍या विविध खेळांच्या संकल्पना जन्माला आल्या. आजच्या घडीला अमेरिकन पद्धतीचे 'व्यावसायिक रोडीओज' फक्त घोडेस्वारांच्या खेळापुरतेच मर्यादीत राहीलेले नाहीये. त्यात अनेक थरारक, छातीचा ठोका रोखून धरणार्‍या अनेकविध खेळांचा समावेश झालाय. उदा.tie-down roping, team roping, steer wrestling, saddle bronc riding, bareback bronc riding, bull riding and barrel racing.

आज अमेरिकन पद्धतीच्या रोडीओजमध्ये यापैकी बहुतेक खेळ खेळले जातात. पण सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे "बुल रायडींग" अर्थातच The most dengerous eight seconds in the sports ! आपण लवकरच तिथे येवूच.

१८९० ते १९१० च्या दरम्यान रोडीओज हा एक सार्वजनीक खेळ बनून गेला होता. लोकांच्या करमणुकीचे मुख्य साधन म्हणून ओळखला जावू लागला होता. तत्कालीन रोडीओचे सुपरस्टार्स होते 'बफेलो बिल' कोडी, अ‍ॅनी ओकले ई.

'विल्यम फ्रेडरीक कोडी' ! अमेरिकन सैन्यातला अमेरिकेच्या सैनिकी गौरव पदकाने सन्मानीत असलेला 'कोडी' या रोडीओजच्या खेळातला सुरुवातीचा सुपरस्टार म्हणून गणला जातो. तो कायम 'बफेलो बिल' या टोपण नावानेच ओळखला गेला. त्याच्या "बफेलो बिल्स वाईल्स वेस्ट शो" या खेळाने त्याला आणि एकुणच रोडीओजचा प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. १९६० मध्ये जन्मलेली 'अ‍ॅनी' पुढे बिलच्या 'वाईल्ड वेस्ट शो'ची सुपरस्टार ठरली. आपला पुर्ण टृप घेवून 'बिल' सगळ्या युरोपभर 'वाईल्ड वेस्ट' चे शो करत असे. रोडीओजना खर्‍या अर्थाने प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळवून देण्याचे श्रेय 'बफेलो बिल' लाच जाते.

बफ़ेलो बिल - (छायाचित्र : आंतरजालावरून साभार - प्रताधिकारमुक्त छायाचित्र) (बफ़ेलो बिल - (छायाचित्र : आंतरजालावरून साभार - प्रताधिकारमुक्त छायाचित्र)

मला उत्कंठा लागलेली होती त्या "धोकादायक आठ सेकंदांची"...... !

स्पर्धा सुरू झाली. मी... किंबहुना आम्ही सगळेच नाक मुठीत धरुन वगैरे म्हणतात तसे, किंवा प्राण डोळ्यात आणुन म्हणतात तसे पाहात होतो. एकामागुन एक स्पर्धक मैदानात येत होते. बहुतेक जण ४ ते ५ सेकंदात बाद होत होते. कुणीतरी ’रिसेंडे’ म्हणून ब्राझिलियन स्पर्धकाने ती स्पर्धा जिंकली. आपला स्थानिक स्पर्धक जरी हरला असला तरी तिथल्या प्रेक्षकांनी विजेत्याला त्याच्या धैर्याच्या, विजयाच्या सन्मानार्थ दिलेले ’स्टॅंडींग अवेशन’ फ़ार बोलके होते. पंधरा मिनीटे सलग टाळ्यांचा कडकडाट होत होता. भडकत्या ज्वालांच्या साह्याने विजेत्याला मानाचा मुजरा करण्यात आला.

DSC_7118

तो सगळाच प्रकार प्रचंड थरारक, विलक्षण होता. त्या राक्षसी बैलांशी बेदरकारपणे झुंजणार्‍या,(हो मी तर त्याला झुंजणेच म्हणेन. भले ते थेट लढणे नसेल. पण झुंज नक्कीच आहे.

आता थोडंसं त्या ’धोकादायक आठ सेकंदांबद्दल....." या खेळाचे स्वरूप साधारण असे आहे. यात वापरलेले जे बैल असतात ते अक्षरश: राक्षसी म्हणता येतील असे अवाढव्य असतात. स्पर्धक स्वत:चा एक हात एका मजबूत रस्सीने या बैलाच्या पाठीशी जखडून घेतो, दुसरा हात त्याला कायम हवेत मागच्या बाजुला फ़डकवत ठेवावा लागतो. (सतत उड्या मारणार्‍या बैलावर जास्तीत जास्त वेळ जम बसवण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी याचा उपयोग होतो) . या बैलांना आपल्या पाठीवर बसलेल्या स्पर्धकाला, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला खाली पाडण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आलेले असते. त्यामुळे तो बैल सतत उड्या मारत त्या स्पर्धकाला आपल्या पाठीवरून पाडण्याचा प्रयत्न करत असतो.

आपण अजुन जरा जास्त या खेळाच्या गर्भात शिरण्याचा प्रयत्न करुयात. बुल रायडींगची मुळे आपल्याला थेट सोळाव्या शतकापर्यंत घेवून जातात.  १६ व्या शतकात मेक्सिकोच्या काही भागातून हा खेळ खेळला जात असे. त्याला तिथे तेव्हा ’जारीपो’ (Jaripeo) या नावाने ओळखले जात होते. सुरुवातीला हा खेळ जास्त धोकादायक होता. बैलावर स्वार होणार स्पर्धक किंवा बैल यापैकी कोणीतरी एकजण मृत्युमुखी पडेपर्यंत ही झुंज चालत असे. नंतर हळु हळू सुधारणा होत गेल्या. त्यानंतर जो पर्यंत बैल उसळी मारणे थांबवत नाही तोपर्यंत, (अर्थात तेवढा वेळ स्पर्धक बैलाच्या पाठीवर टिकला तर) आणि तोपर्यंतच ही झुंज रंगवली जाते. स्पर्धक बैलाच्या पाठीवरून पडला की तिथे खेळ संपतो.  त्या फ़ेरीपुरता तो स्पर्धक बाद अथवा वेळ चांगली दिलेली असेल तर पुढच्या फ़ेरीत जातो.  अर्थात याचबरोबर बैल दमला आणि त्याचे उसळणे बंद झाले तरी तेवढ्यापुरता खेळ तिथेच संपतो.  पण ही शक्यता खुप कमी असते. या प्रकाराला ’शॅर्र्डा’ (charreada) असे नाव आहे. खासकरून मेक्सीकन अथवा स्पॅनीश लोकात हा प्रकार जास्त लोकप्रिय आहे.

या सर्व प्रकारापेक्षा अमेरिकन बुल रायडींग खुप वेगळे आहे. तिथे स्पर्धकाला एक ठरावीक काळापर्यंतच उसळत्या बैलाच्या पाठीवर बैठक जमवून टिकाव धरायचा असतो. ते सुद्धा फ़क्त (?) "आठ सेकंद" ! असो त्याबद्दल नंतर बोलुच आपण. सद्ध्या आपण बोलतोय ते मेक्सीकन बुल रायडींग अर्थात जारिप्यो (Jaripeo) बद्दल. हा खेळही मेक्सिको आणि स्पेन तसेच इतर काही देशात चार वेगवेगळ्या पद्धतींनी खेळला जातो.

चॅरो अथवा शॅरो पद्धत (Charro) : ही पद्धत आता फ़ारशी वापरली जात नाही, कारण यात फक्त लहान चणीच्या बैलाचा वापर केला जात असे. नव्या युगातील स्पर्धा आणि लोकांच्या आवडी-निवडीनुसार आता बुल रायडींगमध्ये १८०० ते २२०० पौंडाचे  अवाढव्य बैल वापरले जातात. सान लुई पोटोसी (San Luis Potosi) हा साधारणपणे चॅरोच्याच धर्तीचा प्रकार आहे. हे नाव ’सान लुइस पोटोसी’ या मेक्सीकन शहराच्या नावावरून आलेला आहे.

टिएरा कॅलींटे (Tierra Caliente) : ही अजुनही मेक्सिकोमध्ये सगळीकडे सर्रास वापरली जाणारी पद्धत आहे. तरीसुधा वादग्रस्त आहे कारण या खेळात बैल आणि स्पर्धक दोघांनाही समसमान आणि तुलनेने जास्त धोका असतो. यात स्पर्धकाच्या पायातील काऊबॉय शुजना लावलेली दातेरी चाकं (spurs) विलक्षण टोकदार असतात. स्पर्धकाचा बैलावर असलेल्या त्याच्या पकडीपेक्षा पायातल्या या Spurs वर जास्त विश्वास असतो. ही दातेरी चाकांची ब्लेड्स जितकी शार्प तितका जास्त वेळ आपण बैलाच्या पाठीवर जम बसवून राहू असा स्वाराचा विश्वास असतो. पण अलिकडे याला खुप विरोध होवू लागलाय. कारण या काटेरी ब्लेड्स (spurs) मुळे बैलाला तर जखमा होतातच , पण स्पर्धकाला सुद्धा इजा होवू शकते. बैलाने पाठीवरून उधळून दिल्यावर हि बुटाची काटेरी दातरे बैलाच्या कातडीत अथवात त्याच्या पाठीला बांधलेल्या दोरीत अडकून स्वार बैलाबरोबर खेचला जाण्याच्या, त्याच्या पायाखाली तुडवल्या जाण्याच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने त्या पद्धतीला सर्व स्तरातून विरोध होतोय.

या चारही प्रकारात सगळ्यात वेगळा आणि अवघड, जास्त धोकादायक प्रकार म्हणजे ’कोलिमा’ स्टाईल बुल रायडींग. दक्षीणी मेक्सिकोच्या ’कोलीमा’ (Colima) या परगण्यात बुल रायडींगचा थरार या पद्धतीने अनुभवला जातो त्यामुळे त्याला कोलिमा स्टाईल म्हटले जातात. या प्रकाराचे वेगळेपण म्हणजे इतर सर्व प्रकारात बैलाच्या पाठीवर बसलेल्या स्वाराचे पाय त्याच्या पोटापाशी (खालच्या बाजुला) मोकळे सोडलेले असतात, त्यामुळे पकड पक्की ठेवायला तसेच संतुलन साधायला मदत होते. पण ’कोलिमा स्टाईलमध्ये’ स्पर्धकाचे दोन्ही पाय बैलाच्या मानेवर पक्के रुतवून ठेवले जातात.इथे बैलाच्या पाठीवरचा दोर सुद्धा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्या दोराच्या मागच्या बाजुला दोन धातुची कडी (rings) बसवलेली असतात जेणेकरुन स्वाराला दोर नीट पकडता यावा. पण खुपदा या रिंग्जमुळे होते काय की बैल जेव्हा  स्पर्धकाला आपल्या पाठीवरून भिरकावून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो शक्यतो आपले पाठीमागचे दोन्ही पाय हवेत उंच उडवून त्याला पाडण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी या रिंग पकडलेल्या असल्याने स्वार एकतर बैलाच्या समोर अर्धवट हवेत लटकतो किंवा बर्‍याच वेळा थेट त्याच्या शिंगावरच पडतो. यात स्वाराच्या, स्पर्धकाच्या मृत्युचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे या प्रकारालाही विरोध वाढत चालला आहे.

बुलरायडींगसाठी वापरले जाणारे बैल :

थोडंसं धक्कादायक वाटू शकेल पण या खेळासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी बैलाची जात  ’ब्रह्मा’ किंवा ’ब्राहमान’ बैल (The Brahman or Brahma ) या नावाने ओळखली जाते. आणि या प्रजातीचा उगम भारतातील गुजरात, गीर या प्रदेशात आहे. खरेतर ही एकप्रकारे संकरीत जात आहे. अर्थात रोडीओजसाठी कुठल्याही विशिष्ठ जातीचेच बैल वापरले जावेत अशी कुठलीही अट किंवा नियम नाही. शक्यतो रोडिओज सादर करणारे बहुतेक गृप्स वेगवेगळ्या जातींचा संकर घडवून त्यातुन निर्माण झालेल्या संकरीत प्रजातीचा वापर करतात. यात ब्राहमान बरोबरच मेक्सीकन, स्पॅनीश बैलही खुप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. बहुतांशी या संकरातील एक प्रजाती ब्राहमान असतेच. ब्राहमान आणि इतर प्रजातींमधील फ़रक ओळखायची खुण म्हणजे ब्राहमान जातीच्या बैलात पाठीवर असलेला उंटाच्या मदारीसारखा दिसणारा उंचवटा. तो इतर जातीतील बैलाच्या पाठीवरील उंचवट्यापेक्षा आकाराने मोठा आणि उठून दिसणारा असतो. (भारतीय बैलांप्रमाणेच). बुल रायडींगमध्ये वापरल्या जाणार्‍या बैलांचे वजन साधारणत: १७०० ते १८०० पौंडाच्या दरम्यान असावे लागते. काही बैल २२०० पौंडांचेही असतात. तसे बैलाच्या निवडीसाठी काही खास नियम नाहीत. साधारण एक वर्ष वय असलेले बैल यात वापरले जातात. (२ वर्षापेक्षा जास्त वय असलेला बैल वापरला जात नाही, कारण त्याचा चपळपणा कमी झालेला असतो.)

800px-Brahman_(EMAPA)_110307_REFON_2 " Brahma or Brahman " Bull

Spanish_Fighting_Bull_II_by_Alexander_Fiske-Harrison "Spanish Fighter"

१९३० च्या दशकात बुल रायडींगचा हा मेक्सिकन प्रकार अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असा जगभर लोकप्रिय होत गेला. या खेळाला अधिकृत रुप देण्यासाठी ’रोडीओ काऊबॉय असोसिएशन’ ची स्थापना झाली, जी पुढे १९३६ पासून प्रोफ़ेशनल रोडीओ काऊबॉय असोसिएशन म्हणून ओळखली जावू लागली.

अमेरिकन रोडीओमध्ये खेळाच्या नियमानुसार पात्र ठरण्यासाठी स्पर्धकाला कमीत कमी आठ सेकंद त्या बैलाच्या पाठीवर बैठक जमवणे आवश्यक असते. त्यापेक्षा जास्ती वेळ तो त्याचा बोनस आणि जो जास्त वेळ टिकेल तो जिंकला. ८ सेकंद खुप कमी वाटतात आपल्याला. पण इथे स्पर्धकाची खरोखर अग्निपरीक्षा असते. कारण बैल सारखा हवेत उड्या मारत असतो. कधी-कधी तर या उड्या ६-७ फ़ुटापेक्षा जास्त उंचीच्या असतात. बैलावर खोगीर किंवा पाय अडकवण्यासाठी रिकीब नावाची सोय अजिबात नसते. फ़क्त एक हाताने बैलाच्या पाठीला बांधलेला दोर धरायचा आणि दुसरा हात हवेत ठेवत संतुलन साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यातुनही स्पर्धक खाली पडल्यावर बैल शांतपणे "मी जिंकलो" असे म्हणून प्रेक्षकांना हात दाखवत मैदानाच्या बाहेर निघून जात नाही. तर तो प्रचंड संतापलेला असतो. स्पर्धक खाली पडल्यावर सुद्धा काही काळ त्याचे उड्या मारणे चालुच असते. अश्या वेळी खाली पडल्या-पडल्या लगेच तोल सावरून सुरक्षीत जागी पळावे लागते. नाहीतर थयाथया तांडव करणारा तो बैल त्याला आपल्या पायाखाली तुडवण्याची शक्यता अधिक असते. हे सगळे घडते ते १० ते १५ सेकंदाच्या कालावधीत. त्यातही त्यातले किमान आठ सेकंद जर स्पर्धक त्या बैलाच्या पाठीवर टिकाव धरु शकला तर ठिक नाहीतर ३-४ सेकंदातच सगळाच "खेळ" आटोपण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते आठ सेकंद "अतिशय धोकादायक आठ सेकंद" म्हणून ओळखले जातात.  मुळात खेळाडुचे गुण मोजायला सुरुवातच होते आठ सेकंदानंतर. ’आठ सेकंद’ ही मुलभूत पात्रता आहे या स्पर्धेत योग्य ठरण्यासाठी. स्पर्धकाने  बैलाच्या पाठीवर काढलेला ’आठ सेकंदानंतरचा’ काळ, त्यावर त्याला गुण दिले जातात.   हा खेळ म्हणजे निव्वळ प्राणाशी गाठ असते. चपळता, ताकद, एकाग्रता या सगळ्यांचाच कस लावणारा हा खेळ......

Bull Riding-1-23

Bull Riding-1-28

Bull Riding-1-16 - Copy

Bull Riding-1-8

खेळाचे नियम : इथे प्रत्येक बैलाला एक विशिष्ठ नाव आणि नंबर दिला जातो जेणेकरून नंतर वर्गीकरण करणे सोपे जावे. स्पर्धेसाठी म्हणून बैल निवडताना त्यांची उंची, वजन, वैद्यकीय क्षमता (फ़िटनेस), वय या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या जातात. स्पर्धेच्या साधारण काही तास आधी स्पर्धकाला त्याचा बैल (स्पर्धक) ठरवून दिला जातो, त्याला त्या बैलाबरोबर थोडा वेळ ही दिला जातो.... सरावासाठी. अमेरिकन पीबीआर रोडिओज मध्ये काही ज्येष्ठ आणि पूर्व विजेत्या स्पर्धकांना आपला बैल स्वत:च निवडायची परवानगी मिळते. पण हे खुप कमी जणांच्या बाबतीत होते. अन्यथा जो बैल ठरवून दिला जाईल त्याच्यावर सवारी करणे हेच स्पर्धकाचे प्राक्तन असते.  वर दिल्याप्रमाणे मार्कींगची (गुण देण्याची) सुरूवात ८ सेकंदांच्या नंतर होते. जर स्पर्धक आठ सेकंद टिकाव धरु शकला तर त्यानंतर त्याला गुण मिळतात. हे गुण "०० ते २००" च्या दरम्यान दिले जातात. कमीतकमी ८० गुण मिळवणे हे चांगल्या स्वाराचे लक्षण मानले जाते.

इथे खोच अशी आहे की उड्या मारणार्या घोड्यांपेक्षा, उसळलेल्या बैलाच्या शरीरात ताकद आणि चपळपणा जास्त असते, त्यामुळे अशा बैलावर आठ सेकंद टिकाव धरणे हे काम अतिशय कौशल्याचे आणि तितकेच धोक्याचेही असते. इथे स्पर्धकाचा गणवेश, खेळासाठी वापरली जाणारी साधने सुद्धा खुप काळजीपूर्वक तपासून घेतलेली असतात. ही साधने जितकी पक्की तितकी स्वाराची सुरक्षीतता पक्की. तर असा हा बुलरायडींगचा धोकादायक पण तितकाच चित्तथरारक खेळ. साहसी आणि धाडसी अमेरिकन्सचा त्यांच्यासारखाच रांगडा, मर्दानी खेळ. आयुष्यात एकदा का होइना हा अनूभव घ्याअयलाच हवा. अर्थात खेळ बघण्याचा, खेळणे आपल्याला या जन्मात शक्य होइलसे वाटत नाही..

या खेळाबद्दल सविस्तर माहिती विकीपिडीयावर उपलब्ध आहे. http://en.wikipedia.org/wiki/Bull_riding  !

**********************************************

त्या दिवशी रात्रभर डोळ्यासमोर ते राक्षसी बैल आणि त्यांच्याशी झुंजणारे ते असामान्य इच्छाशक्तीचे मानवच दिसत होते. त्या अदम्य इच्छाशक्तीला आणि साहसाला दाद देतच कुठल्यातरी बेसावध क्षणी निद्रादेवीला शरण गेलो.

विशाल कुलकर्णी

 

तळटिप :

या लेखातील सर्व छायाचित्रे प्रताधिकारमुक्त आहेत

काही छायाचित्रे मी स्वत: काढलेली आहेत, काही आंतरजालावरून (त्यांची प्रताधिकार मुक्तता तपासून) घेतलेले आहेत.

हॉर्स रायडींग तसेच बुल रायडींगची छायाचित्रे माझे  अमेरिकास्थीत स्नेही आणि मायबोलीकर (मराठी संस्थळ) श्री. राजेश भारांबे यांनी काढलेली आहेत. त्यांनी ही छायाचित्रे या लेखात वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांच्याशी अजून माहितीसाठी संपर्क साधायचा झाल्यास खालील विरोपपत्त्यावर साधता येइल.

श्री. राजेश भाराम्बे -  rajeshbharambe@yahoo.com 

वरील लेख ’मित्रांगण’ या त्रैमासिकाच्या ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेलाआहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान वर्णन!
हाफिसातून फटू न दिसल्यानेही वैट वाटले. आता घरी जाऊन नेट चालु करणे आले! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीपूर्ण लेख. अमेरिकेविषयी भारतात जी माहिती असते ती सिनेमांमधून किंवा मध्यमवर्गीयांच्या डोळ्यांतून दिसलेली असते. अमेरिकन वेस्टर्न्समधून दिसणारं जग जरी नाहीसं झालेलं असलं तरी त्याच्या खुणा अजून जिवंत आहेेत. काउबॉयीजबद्दल असलेलं आकर्षण अशा खेळांमधून प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. अमेरिकेच्या या आगळ्या अंगाचं दर्शन वाचकांना घडवल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या दिवशी रात्रभर डोळ्यासमोर ते राक्षसी बैल आणि त्यांच्याशी झुंजणारे ते असामान्य इच्छाशक्तीचे मानवच दिसत होते.

वा. अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

PETA - People for Ethical Treatment of Animals अशासारख्या संघटनांच्या दबावामुळे सर्कसमध्ये प्राणी वापरणे ह्यावर खूपच बंधने आली आहेत. त्यातून आजवर रोडिओ कसा दूर राहिला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरात आरामात टेबलखुर्चीवर बसून या खेळा(!)बद्दल माहिती वाचताना फार विचित्र वाटलं नाही. पण एकूणच अशा हिंस्र खेळांबद्दल फार प्रेम नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.