फ्लश करा व विसरून जा !

शहरी भागात फ्लॅट विकत घेताना किंवा शहरात वा खेड्यात बंगला/घर बांधताना फ्लश प्रकारच्या संडासांचा आग्रह नेहमीच धरला जातो. पांढऱ्या स्वच्छ सिरॅमिक फरशा त्यावर ठेवलेले संडासपात्र, त्यामागे असलेली पाण्याची नाजूक टाकी....बोटाने कळ दाबल्यानंतर धबधब्यासारखे सळसळत वाहणारे स्वच्छ पाणी... व मलमूत्र गायब! जे दिसत नाही त्याबद्दल विचार करायचे नाही या मानसिकतेमुळे फ्लश संडासातील घन व द्रव पदार्थांचे काय होते याची काळजी कुणीही करत नाही. बिल्डर, काँट्रक्टर, इंजिनीअर, नगरपालिका, शासन, इत्यादींचा तो प्रश्न आहे, ते बघून घेतील, अशी मनाची समजूत करून घेत आपण स्वस्थ असतो.

खरे पाहता फ्लश संडास, सांडपाणी वाहून नेणारे बंदिस्त पाइप व दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अतीखर्चिक आणि पाण्याचा अपव्यय करणारी अशी व्यवस्था आहे, याची अनेकाना कल्पना नाही. शहरी भागात स्वच्छ व निर्धोक पाणी पुरवठा व्हावा म्हणून नद्यांना धरणे बांधून पाणी साठवतात. मोठमोठी तलावं बांधल्या जातात. बंद वा उघड्या कॅनालमधून प्रसंगी शंभर किलोमीटर्स दूरवरून पाणी आणतात. त्यावर काही रासायनिक प्रक्रिया करून बंद पाइपमधून नळाद्वारे घरोघरी पाणी पोचवतात. आपण मात्र त्यातील बहुतांश पाणी संडासात ओतून टाकतो. आणि परत एकदा घाण पाणी मजल दरमजल करत सांडपाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचविण्याचा आटापिटा करतो. या अतिखर्चिक तंत्रज्ञान प्रक्रियेमधील देखभालीत थोडीशी जरी चूक झाली तरी रोगराईंना आमंत्रण!

शहरातसुद्धा साठत असलेल्या सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रक्रिया करण्याइतपत यंत्रणा सुसज्ज नसते. वाढत्या लोकसंख्येमुळे आहे ती यंत्रणा अपुरी पडते. मग प्रक्रिया न झालेले अशुद्ध पाणी बिनदिक्कतपणे जवळच वाहत असलेल्या नदी/ओढ्यात सोडू नदीकाठच्या पुढील गावातील जनतेच्या आरोग्याला धोक्यात आणतात. नद्या तर मृतावस्थेत आहेत. केव्हातरी प्रशासनाला जाग येते. यमुना नदी कृती योजना, गंगा शुद्धीकरण, गोदावरी योजना वा भारतीय नदी कृती योजना असे गोंडस नाव देऊन काही कागदी घोडे अधून मधून काही काळ नाचविले जातात. थातुर मातुर काम करतात. प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करतात. परंतु जनसामान्याच्या पदरात काहीही पडत नाही. व काही दिवसानी गाशा गुंडाळतात. परत येरे माझ्या मागल्या!

स्वातंत्र्यापेक्षा आरोग्य रक्षण (sanitation) जास्त महत्वाचे आहे असे महात्मा गांधीजींना वाटत असे. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पासष्ठ वर्षात आरोग्य रक्षण दुर्लक्षितच राहिले आहे हे वेगळे सांगायला नको. शहरी भागात ६०-७० टक्के तर ग्रामीण भागात ५-१० टक्के एवढेच हे प्रमाण असेल. शहरी भागात ( व काही प्रमाणात खेड्यातसुद्धा) पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी पाण्याचा निचरा व मैला वाहून नेणाऱ्या गटारांच्या बाबतीत प्रशासन उदासीन आहे व प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहे.

पाणी पुरवठा व मलनिःसारण खर्चिक वाटत असले तरी या गोष्टीवर लक्ष केंद्रित न केल्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची किंमत कित्येक पटीत असू शकेल. सार्वजनिक आरोग्यरक्षण (sanitation) व्यवस्था कोलमडल्यास समाजाला जबरदस्त किंमत मोजावी लागेल. पाकिस्तानच्या कराची शहराच्या एका सर्वेक्षणानुसार आरोग्यरक्षण वा आरोग्याबद्दलची प्राथमिक माहितीसुद्धा नसलेल्या शहरवासीयांचा रोगोपचाराचा खर्च इतरांपेक्षा सहा पट जास्त होता. भारतातील ग्रामीण भागातील गरीब दरडोई दरवर्षी किमान १००० रुपये पटकी, अतीसार, अशा दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगाच्या उपचारासाठी खर्च करतात. सरकारी माहितीनुसार हा आकडा दरवर्षी १०००० कोटी रूपये एवढा आहे. केंद्र शासनाचे आरोग्य मंत्रालय किंवा शिक्षणमंत्रालय यांसाठी केलेल्या वार्षिक आर्थिक तरतूदीपेक्षा हा आकडा नक्कीच जास्त आहे. हे रोग असेच कुठूनतरी उदभवतात असे नाही. दूषित पर्यावरणामुळे पॅथोजिन्स चक्राद्वारे या रोगांची लागण लागते. या चक्राचा भेद करणे म्हणजेच आरोग्यरक्षण, आरोग्यरक्षण माणूस व रोगजंतूच्या मध्ये भिंतीसारखे उभी राहू शकते. ही भिंत रासायनिक वा अवाकाशीय असू शकेल. फक्त संडास व मलनि:सारण यंत्रणा या गोष्टिंचा उपयोग करतात. फ्लश केल्यानंतर पॅथोजिनयुक्त मलमूत्र आपल्यापासून दूर नेले जाते. गटारव्यवस्था माणूस व पॅथोजिन्समध्ये अंतर निर्माण करते. शेवटी मलनि:स्सारण यंत्रणा रासायनिक प्रक्रिया करून पॅथोजिन्सचा नाश करते.

शहरी भागातील साधे संडास व गटारव्यवस्था मध्यम व उच्च मध्यम वर्गासाठी पुरेसे आहेत. पंरतु ‘फ्लश करा व विसरून जा’ आणि ‘जे डोळ्यांना दिसत नाही ते अस्तित्वात नाही’. ही मानसिकता बळावत असल्यामुळे नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फ्लश केल्यानंतर संडासपात्रातील पाण्याच्या प्रवाहामुळे घन व द्रव पदार्थ पाईपमधून बाहेरच्या गटारात जाऊन मिसळतात. ही प्रक्रिया खर्चिक नसल्यास असे करण्यास हरकत नव्हती. परंतु संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतल्यास यातील त्रुटी समजतात. पाण्याच्या अपव्ययाची कल्पना येते व यातील भयानकता जाणवू लागते. अशा प्रकारच्या सांडपाण्याच्या (अ)व्यवस्थेमुळे नैसर्गिक क्रियेतसुध्दा अडथळा येतो. अन्नामधील मायक्रोन्यूट्रियंटस गटारगंगेत वाहून गेल्यामुळे शेतजमीन न्यूट्रियंटसविना पीक देते. व तेच आहारपदार्थ आपण खात अस्लयामुळे काही रोगांना बळी पडतो. मायक्रोन्यूट्रियंटस जमिनीत गेल्यास जमीन सकस होते. मग त्यासाठी कृत्रिम खतांची गरज भासणार नाही.

शहरातील सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था सरळ रेषेत होत असलेली प्रक्रीया आहे. फ्लश केल्यानंतर जास्त प्रमाणात वाहणारे पाणी विष्टा व मूत्र यांना संडासातील ‘एस’ आकारच्या भांड्यात ढकलले जाते. विष्टेच्या मिश्रणाचे काळ्या रंगाचे पाणी व आघोंळ, धुणे, भांडी यांचे करड्या रंगाचे पाणी घराघरातून वाहून नगरपालिकेच्या गटाराच्या पाईपमध्ये जाऊन मिसळते. छोट्या छोट्या गटारांना मोठ्या गटाराला जोडलेले असते. मोठ्या गटारातून मैला वाहून जाताना आणखी पाणी सोडले जाते. शेवटी ही गटारव्यवस्था शहरातील वेगवेगळ्या भागातील मैला घेऊन मलनिःसारण प्रक्रीया क्रेंद्रात पोचते. येथे घनपदजार्थ, सेद्रींय व इतर पदार्थ वेगवेगळे करण्याची सोय असते. पॅथोजिनयुक्त मिश्रणावर रासायनिक प्रक्रिया करून किमान स्वच्छतेच्या पातळीवर मिश्रण आणले जाते. घन पदार्थ खत किंवा भराव भरण्यासाठी वापरले जाते. ‘स्वच्छ’ पाणी शेतीसाठी वापरले जाते.

कागदावर तरी या प्रक्रीयेत काही दोष दिसत नाहीत. परंतु प्रत्यक्षात या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. मुळात आपल्या देशात मलनिःसारण यंत्रणा फक्त काही शहरांतच आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील शहरात रोज ३००० कोटी लिटर्स मैलापाण्याचा साठा होत असतो. त्यातील केवळ १५० कोटी लिटर्सवर प्रक्रीया केली जाते. हा आकडा फक्त ५ टक्के आहे. याचाच अर्थ असा की प्रक्रीया न केलेले पॅथोजिनयुक्त मैलापाणी व इतर सर्व तरंगणारी घाण तशीच्या तशी शहरापाशी वाहत असलेल्या छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांत बिनदिक्कतपणे सोडली जाते. आपल्या देशांतील बहुतेक शहरे नदीच्या काठीच असल्यामुळे नदीच्या ‘पाण्याचा’ वापर पिण्यासाठी व सांडपाणी सोडण्यासाठीच केला जात आहे. मैलाप्रक्रीया यंत्रणा खर्चिक बाब आहे. १५ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दहा मोठ्या शहरांत ही यंत्रणा उभी करण्यास २५००ते ३००० कोटी रूपये खर्च होतील, असा अंदाज आहे. अशा यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागेल. दैनंदिन देखभालीचा खर्च वेगळा.

शहरी भागात एकूण पाण्याच्या उपयोगाच्या तुलनेने पिण्याचे पाणी किरकोळ असते. ढोबळपणे माणशी आरोग्यरक्षणासाठी २० लिटर्स, आंघोळ, धुणे, भांडी इत्यादीसाठी १५ लिटर्स, अन्न पदार्थ शिजविण्यासाठी १० लिटर्स व पिण्यासाठी ५ लिटर्स एवढ्या पाण्याची रोजची गरज असते. जास्त पाणी सांडपाण्याच्या गटारासाठी लागते. कुठलीही प्रशासन व्यवस्था असू दे, आरोग्य रक्षण आणि पाणीपुरवठा नाकारू शकत नाही. गरीबांच्या नावाने केलेल्या खर्चाचा लाभ श्रीमंत करून घेत आहेत, हे नाकारण्यात हशील नाही. खरे पाहता खर्चाची वसूली उत्पन्नानुसार व्हायला हवी. आपल्या प्रचलित व्यवस्थेत अशा गोष्टींना वाव नाही. उदारीकरणाचा डिंडोरा पिटत असलेले, पाणीपुरवठ्यासाठी खाजगीकरण करण्यास तयार होतील. परंतु सांडपाणी व्यवस्था मात्र सार्वजनिक खर्चातूनच!

अजूनही काही शहरातील संडास गटारांना न जोडता सेप्टिक टँकशी जोडलेले दिसतील. शहरी भागात झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. झोपडपट्ट्या ‘कायद्या’त बसत नसल्यामुळे शहरी सुखसोई व सुविधांपासून त्या कायम वंचित राहतात. शहर सुधार योजनेत त्यांना डावलले जात असते. मुंबईतील १३० लाख लोकांपैकी निम्मे लोक झोपडपट्टीत वा फुटपाथवर राहणारे असतात. या ७०-७५ लाख लोंकासाठी १० टक्के जमीन उपलब्ध आहे. त्यांच्या आरोग्यरक्षणाची काहीही तरतूद नाही. संडास नाहीत. असले तरी पाण्याची सोय नाही. किमान स्वच्छता नाही. त्यामुळे त्यांना बंदिस्त गटारांचा काही उपयोग नाही. काही स्वयंसेवी संस्थामुळे वा जनरेट्यामुळे आणि न्यायालयांच्या दबावामुळे झोपडपट्टीत ही सुविधा पुरवायची असल्यास फ्लश संडासांचाच विचार केला जातो. परंतु आर्थिक दृष्ट्या त्या परवडत वाहीत. सुमारे ५०० लोकांच्यासाठी अशा ठिकाणी एकच संडास असल्यामुळे त्याची दैनंदिन देखभाल करणे जिकिरीचे होते. दुर्लक्षित होत असल्यामुळे दुर्गंधी वाढते. पुढे त्याचा वापर होत नाही.

१९९३मध्ये डोक्यावरून मैला नेण्यास मनाई असूनसुद्धा तुरळक ठिकाणी अजूनही नेला जातो. हाताने विष्ट्याची घाण उपसू नये यासाठी कोर्टाने कितीही मनाई केली असली तरी त्यातून काही पळवाटा काढून ही अमानुषता अजूनही ठिकठिकाणी लादली जात आहेच. पुरेशी आर्थिक तरतूद नसल्यामुळे परिस्थिती चिघळत आहे. परंपरागत संडास व्यवस्थेत सुधारणा करण्यास वाव होता. परंतु शासनाच्या हेकेखोरपणामुळे (व खाजगी कंत्राटदारांना ‘खूश’ करण्याच्या वृत्तीमुळे) मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही अगदी नगण्य प्रमाणात संडास गटारांना जोडलेले आहेत. पूर्णपणे पाण्यावर निर्भर असलेले हे तंत्रज्ञान सर्व संडासांमध्ये वापरावयाचे असल्यास फार मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागेल. मूलभूत सोई, नित्य वापराचा खर्च व फ्लश संडासांची वाढती मागणी यामुळे शासन पेचात सापडले आहे. २० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात मलनिःसारण यंत्रणा राबवण्याचे ठरल्यास केंद्र व राज्य शासनाला ही जबाबदारी उचलावी लागेल व यासाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहील.

मुळात सांडपाण्याच्या गटारांचीसुद्धा देखभाल केली जात नाही. नद्यांच्या शुद्धीकरणाच्या योजनेत मोठ्या प्रमाणात पैशाची तरतूद असूनसुद्धा त्या फक्त कागदावरच दिसतात. तुटक्या-फुटक्या गटार नाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. दूषित पाण्यामुळे अल्पावधीतच रोगराई पसरून शेकड्यांनी बळी जाऊ शकतात. काही वर्षापूर्वीचा सुरत शहराचा अनुभव याला साक्षी आहे. काही शहरात गटार-नाले तुंबलेलेच असतात. घाण पाण्याच्या साठलेल्या डबक्यामुळे अलीगढ शहरातील घराच्या प्लिंथची उंची मुद्दामहून जास्त ठेवली जाते. डबके भरून काढणयासाठी शेतातील मातीचा उपसा करतात. त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी होत जाते.

आजच पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणेचा खर्च भरून निघत नाही. पाण्याचा प्रती लिटर उत्पादन खर्च दिवसेनदिवस वाढत आहे. सबसिडीचा टेकू दिल्याशिवाय किंमती परवडत नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचाच खर्च वाढत असल्यामुळे सांडपाण्याचे शुद्धीकरण फार लांबची गोष्ट ठरत आहे.

शहरीकरणाचा वेग वाढत आहे. उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवले जात आहे. परंतु शहर नियोजनामध्ये या प्रश्नाचा गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही. ग्राहकांना हवे असतात म्हणून पाण्याचा बेसुमार वापर करणारे फ्लश संडास (काही वेळा घरटी दोन दोन तीन संडास!) बांधले जात आहेत. शहरातील बांधकाम व्यावसायिकसुद्धा ग्राहकांचे प्रबोधन करून यासाठी पर्यायी व्ववस्था असू शकते असे सांगू धजत नाहीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी विकेंद्रीकरणाची गरज आहे. सेप्टिक टँक हे काही उत्तर होऊ शकत नाही. कारण यामुळे भूगर्भातील जलस्रोतांना धक्का लागण्याची, प्रदूषणयुक्त होण्याची भीती आहे. म्हणून या सगळ्यासाठी मुळातच नवीन तंत्रज्ञानाची गरज भासत आहे. तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक संडास पुरविल्याने स्वच्छतेच्या योजनेस विशेष मदत होत नाही हे स्पष्ट होत आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र संडास हवाच, यात शंका नसावी. आरोग्याला उपयुक्त असे अनेक प्रकारचे संडासरचना उपलब्ध आहेत. थोडीशी मनाला मुरड घातल्यास व स्वतःचे घाण स्वतः उपसण्यासाठी मनाची तयारी असल्यास पर्यायांचा विचार करता येईल. मूलभूत संशोधन करून तंत्रज्ञान विकसित केल्यास पाण्याची बचत होईल. भंगी व्यवस्था नष्ट होईल. व हे जितके लवकर होईल तितके हितकारक ठरेल.

या अगोदर संबंधितांनी या गोष्टींकडे बघण्याची मानसिकता बदलल्यास योग्य दिशेने एक पाऊल पुढे.. असे म्हणता येईल.

संदर्भ १ आणि २
(टीपः या लेखातील सर्व आकडेवारी ढोबळ स्वरूपात असून प्रश्नांची भयानकता समजण्यासाठी दिलेल्या आहेत. नेमके आकडे गूगल केल्यास सहजपणे मिळतील.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

हा प्रश्न मोठा आहेच, आणि सरकार म्हणजे एखादी खाजगी कंपनी असल्यासारखे "फायदा" हे अर्थव्यवस्थझ व कायद्यात तितकी मॅच्युरीटी यायच्या आधीच मुलतत्त्व बनल्याने विकसनशील देशांत हा प्रश्न अधिकच व्यापक व सोडवण्यास कठीण झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. एकेका विषयावर तुम्ही संयमितपणे लिहिता ते आवडते.
या प्रश्नावरचे उपाय अधिक खुलासेवार सांगितले असते तर आणखी बरे झाले असते. बहुतेक प्रश्नांवर सुधारित तंत्रज्ञान हेच उत्तर असते का? स्वतःच स्वतःच्या घाणीची विल्हेवाट लावायची म्हटली तरी ती नेमकी कशी लावणार? इथे स्वतःचं घर स्वतःच झाडायला-पुसायला रोजच्या रोज वेळ होत नाही; त्यासाठी वेगळी व्यक्ती कामावर ठेवावी लागते.
मुळात हा प्रकार सिव्हिलायझेशनचा स्थायीभाव आहे. सिव्हिलायझेशन म्हणजे खेडी आणि शहरांची व्यवस्था. बाहेरुन शहरात सगळं आणायचं; वापरायचं आणि कचरा कुठेतरी नेऊन टाकायचा हीच पद्धत पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. हा प्रश्न फक्त त्याचे एक उदाहरण आहे.
दुसरे उदाहरण म्हणजे खाणीतून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम आणून त्याच्या खतावर शेतात धान्य पिकवायचे आणि तिथून ते शहरात आणायचे असे केल्याने नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमचे नैसर्गिकरित्या होणारे रिसायकलिंग होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन व फॉस्फरसचा रन ऑफ होतो. त्याने नद्या, तळी व समुद्रांतली जीवसंस्था बिघडते. पाण्याचंही तसंच आणि इतर अनेक गोष्टींचंही तसंच. मुळात व्यवस्थेचा गुणधर्मच तो असल्यावर असा एकेक प्रश्न वेगळा काढून सुटणार का?
वापरुन झाल्यावर प्रत्येक पदार्थ त्या-त्या ठिकाणी नेऊन टाकायचा ज्यायोगे नैसर्गिकरित्या रिसायकल होईल असे करायचे म्हटले तर जास्त ऊर्जा लागणार. शहरातच रिसायकल करायचा म्हटलं तरी जास्त ऊर्जा व जागा लागणारच.
नुसती आहे तीच व्यवस्था मेन्टेन करायला एन्ट्रॉपी वाढल्याने अधिकाधिक ऊर्जा खर्च करावी लागते
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेन्सिबल लिखाण लपवून ठेवण्याचे कारण लक्षात आले नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख आवडला ! पण तो वाचल्यामुळे आमच्यासारख्या शहरवासीयांना कानकोंडे / अपराधी वाटण्यापलीकडे जास्त काही करता येईल असे वाटत नाही. निदान पर्यायी व अंमलात आणता येऊ शकतील अशा उपायांची माहिती दिली असती तर जास्त बरे झाले असते.
आमच्यापेक्षा झोपडपट्टीत राहणारे आणि रेल्वे ट्रॅकवर शौचविधी उरकणारे पब्लिक जास्त पर्यावरणस्नेही आहे असे म्हणायला वाव आहे. कमीतकमी ते आमच्यापेक्षा पाण्याचा वापर कमीतकमी करतात व पाणी वाचवतात हे ही नसे थोडके.
त्यामुळे तुमच्या लेखाचे शीर्षक 'फ्लश करा (वाचा) व विसरुन जा' हे अतिशय समर्पक आहे असे निरिक्षण नोंदवितो.

टीप : मी आपल्या धाग्यावर नेहमी नकारात्मक प्रतिसाद देतो असा तुमचा समज होणे स्वाभाविक आहे. पण या प्रतिसादास नकारात्मक / खोडसाळ समजू नये ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>निदान पर्यायी व अंमलात आणता येऊ शकतील अशा उपायांची माहिती दिली असती तर जास्त बरे झाले असते.

पूर्वीच्या काळी संडासातील मलमूत्र सेप्टिक टँक मध्ये जात असे. त्यावर नैसर्गिक प्रक्रिया होऊन त्यातला मैला बराचसा डीकम्पोझ होत असे आणि बर्‍या क्वालिटीचे पाणी उरत असे. ती सिस्टिम बंद होऊन हे मलमूत्र डायरेक्ट नाल्यात सोडण्याची पद्धत का सुरू झाली हा प्रश्न बर्‍याचदा पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घरातला संडास जमीनीखालच्या पाईपलाईनीला जोडून, विभागवार सक्क्षन मशीन्स तो मैला एकत्र करून अल्टिमेटली भल्या प्रचण्ड सेफ्टी टँकमधे नेतात. हा सिवेज डिस्पोजल प्लांट मोठ्या प्रमाणावरील ऑरगॅनिक वेस्ट डिस्पोज ऑफ करण्यासाठी सक्षम असतो. व योजनेचा सर्वात मोठा खर्च यावर होत असतो
आपल्या कडे चोर लोक संपूर्ण योजनेचा खर्च खाऊन फक्त रस्ते खोदून पाईप तयार करतात, अन ते पाईप दूरवरच्या नाल्यात सोडतात. पुढे रामभरोसे. मुख्य प्लांट "खाऊन टाकला" जातो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>: मी आपल्या धाग्यावर नेहमी नकारात्मक प्रतिसाद देतो असा तुमचा समज होणे स्वाभाविक आहे. पण या प्रतिसादास नकारात्मक / खोडसाळ समजू नये ही विनंती.>>मीही हेच म्हणतो.

हे सर्व शालेय लेखात लिहून गुण मिळण्याची खात्री आहे.विद्यार्थी शाळेबाहेर येतो आणि पाहतो की निबंधातली एकही गोष्ट अवलंबली जात नाही. फक्त ढोंगीपणा आहे.
मुद्दे पुन्हा लिहून वात आणत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्यापेक्षा झोपडपट्टीत राहणारे आणि रेल्वे ट्रॅकवर शौचविधी उरकणारे पब्लिक जास्त पर्यावरणस्नेही आहे असे म्हणायला वाव आहे.

या विष्ठाविसर्जनातून जीवाणूंची पैदास होते. ती सगळ्यानांच, अगदी घरात चार संडास बांधण्याची पत असणाऱ्यांनाच, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असते. या जीवाणूंमुळे मुलांच्या आरोग्य, वाढीवर विपरीत परिणाम होतो.

लेखातल्या मुद्द्याबद्दल सहमती.
आंघोळ, भांड्यांसाठी वापरलेलं करडं पाणी झाडांना, गवताला घालता येईल, फक्त मैल्यासाठी वापरलेल्या काळ्या पाण्यावर खर्चिक प्रक्रिया करावी लागेल, अशा अर्थाचा लेख काही काळापूर्वी वाचला होता. (कदाचित न्यू यॉर्करमध्ये.) बदलापूरमधल्या एका इमारतीत वरच्या मजल्या‌वर वॉशिंग मशीनने वापरलेलं पाणी खालच्या मजल्यावर फ्लशसाठी वापरतात अशी बातमीही ऐकली होती.

पाण्याचा बेसुमार वापर करणारे फ्लश संडास (काही वेळा घरटी दोन दोन तीन संडास!) बांधले जात आहेत.

यात दोन-तीन संडास बांधण्याचा मुद्दा नीटसा समजला नाही. संडांसांची संख्या कितीही वाढवली तरीही फ्लश करण्याची संख्या बेसुमार वाढणार नाही. (त्यासाठी कोणीतरी आधुनिक महात्मा फुले निघाले पाहिजेत; त्यांनी घरचा हौद खुला करून दिला, आता घरचे फ्लश टँक खुले करणारे झाले पाहिजेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यात दोन-तीन संडास बांधण्याचा मुद्दा नीटसा समजला नाही. संडांसांची संख्या कितीही वाढवली तरीही फ्लश करण्याची संख्या बेसुमार वाढणार नाही

हाच मुद्दा मांडणार होतो. एखाद्या फ्लॅट मधे तीन टॉयलेट आहेत व दुसर्‍या फ्लॅट मधे दोन आहेत व कुटुंबातील व्यकितंची संख्या सारखीच आहे तर त्यामुळे फ्लशची संख्या कशी वाढते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कुटुंबातील व्यकितंची संख्या सारखीच आहे तर त्यामुळे फ्लशची संख्या कशी वाढते?

कदाचित जास्त टॉयलेट्स असल्यामुळे घरातल्या मंडळीची तिथे जाऊन बसण्याची उर्मी वाढत असेल!
खरांखोटां देव जाणे!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित जास्त टॉयलेट्स असल्यामुळे घरातल्या मंडळीची तिथे जाऊन बसण्याची उर्मी वाढत असेल!

Say's law चे हे उत्तम उदाहरण.

( अजुन एक जार्गन फेकून इम्प्रेस करायचा क्षीण यत्न. माझ्याकडून. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी शिरीष कणेकरांचे लेखन वाचायला टॉयलेटसारखी दुसरी जागा नाही!
माझ्याकडे बहुतेक समग्र शिरीष कणेकर आहे आणि तो सगळा माझ्या टॉयलेटमध्ये मौजूद आहे!!!
एकतर त्यांचे लेख छोटे असल्याने लवकर संपतात, टॉयलेटमधील कामाप्रमाणेच!
आणि पुन्हा टॉयलेटला येईपर्यंत आधीचं काही लक्षात ठेवायची गरज नसते!!!!!
फ्लश करा आणि विसरून जा!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून या सगळ्यासाठी मुळातच नवीन तंत्रज्ञानाची गरज भासत आहे. तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता आहे.

आणि

संबंधितांनी या गोष्टींकडे बघण्याची मानसिकता बदलल्यास योग्य दिशेने एक पाऊल पुढे

हे या धाग्याचे सार आहे.बाकी अन्य माहीती सर्वसाधारणपणे (वयोगट- अभ्यासक्रम इ. नुसार) शाळा ते महाविद्यालय इथे शिकवली जातेच. (माणसं असल्या शिकवणुकींकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात, हा भाग वेगळा!). या माहीतीबरोबरच पर्याय काय आहेत याची माहीती असेल म्हणून शेवटपर्यंत नेटाने लेख वाचला. उदा: आमच्याकडे एका मोठ्या रुग्णालयात सगळ्या 'लिक्विड वेस्ट' वर प्रक्रिया करून मिळणारे पाणीच फ्लशिंगसाठी वापरतात. किंवा अलिकडे विकसित होत असलेले बायो टॉयलेटस. अर्थात हे ही खर्चिकच पर्याय आहेत. असं अजून काय-काय आहे, असू शकतं यावर अधिक चर्चा हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

फ्लश संडास व त्यासंबंधीची यंत्रणा हरप्पा – मोहंजोदारो, रोमन संस्कृतीच्या कालापासून मूळ ढाचा न बदलता काही जुजबी बदलासकट आजसुद्धा वापरात आहे. म्हणूनच याबद्दल पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांच्या संदर्भात संडासांचे डिझाइन, मलनिःसारण यंत्रणेतील त्रुटी व वापरणाऱ्यांची मानसिकता प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे लेख लिहावासा वाटला.
ही संपूर्ण यंत्रणा व त्यासाठी जे काही करावयाचे आहे ते सर्व शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे वैयक्तिकरित्या आपण फार काही करू शकत नाही, हे मान्य करायला हवे. त्यामुळे आपल्याला अपराधीपणा (guilt conscious) जाणवण्याचे काही कारण नाही. तरीसुद्धा आपल्या मनाच्या समाधानासाठी - एका प्रतिसादात उल्लेख केल्याप्रमाणे – स्वच्छ व शुद्ध पाणी न वापरता कपडे – भांडी धुतल्यानंतरच्या करड्या पाण्याचा (gray water) वापर संडासासाठी होऊ शकतो. किंवा संडासपात्राच्या पाठीमागील टाकीला सुट्टी देऊन बादलीतल्या पाण्याचाही वापर संडासासाठी करू शकतो. यातूनही पाण्याची बचत होईल. परंतु हे सगळे जुजबी उपाय असून शासनाकडूनच यासंबंधीची हालचाल अपेक्षित आहे.

उदाहरणार्थ, ९०च्या दशकापूर्वी अमेरिकेतील फ्लश संडासासाठी प्रत्येक वेळी १३ लिटर पाणी वापरले जात होते. शासनाने १९९७मध्ये कायदा करून संडासाच्या टाकीच्या डिझाइनमध्येच ६ लिटरपेक्षा जास्त पाणी वापरली जाऊ नये हा नियम केला. व या कायद्याचे तंतोतंत पालन करण्यास बिल्डर, आर्किटेक्ट व संडास भांडीच्या उत्पादकांना भाग पाडले. लोकांनी तक्रारी केल्या. कुरकुर केली. परंतु शासन ठाम राहिले व high efficiency toilets or HETs चा वापर होऊ लागला.

आपल्या येथे मात्र अजूनही १० लिटरच्या टाकीला पर्याय नाही. शासनाच्या मनात आल्यास करड्या पाण्याचा वापर संडासासाठी करण्यास योग्य ती यंत्रणा उभी करण्यास भाग पाडू शकते. शहरात भरमसाठ प्रमाणात नाट्गृहे, पुतळे वा उद्यांनांचे जाळे उभे करण्यापेक्षा मलनिःसारण व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी जागा उपलब्ध करू शकते. चेन्नई शहरात शासनाच्या कडक धोरणामुळे वर्षभरात घरोघरी rain harvesting यंत्रणा उभी झाली व बोरवेलच्या पाण्याची पातळी बघता बघता शंभर – दीडशे मीटरवरून ३०-४० मीटरपर्यंत आली. आपल्या राज्यातील शासनाच्या उदासीनतेमुळे कायदेही होत नाहीत व त्यांची अंमल बजावणीही होत नाही.

(तीन – तीन, चार - चार फ्लश संडास असलेल्या फ्लॅटमुळे पाण्याच्या वापरात काही फरक पडत नाही हे जरी खरे असले तरी समाजात एक वेगळा मेसेज जातो व परवडो वा न परवडो – सर्व जण तशीच मागणी करू लागतात. मलनिःसारण यंत्रणा उभी करताना संडासांच्या संख्येप्रमाणे अंदाज केले जातात. त्या अंदाजाप्रमाणे पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा कार्यान्वित होते. त्यामुळे जास्त प्रमाणात संडास असून त्यांचा वापरच होत नसल्यास यंत्रणेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. व कारण नसताना बजेट एस्टिमेट वाढत जाण्याची शक्यता आहे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विमानातील टॉयलेट्समध्ये फ्लशमध्ये पाण्याऐवजी हवेचा दाब वापरला जातो. त्यामुळे पाण्याचा वापर खूपच कमी होतो..
ते तंत्र विमानाशिवाय बाकी कुठे पहायला मिळत नाही. त्याचे कारण काय असावे???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याने स्वच्छता नीट होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते तंत्र पाणी वापरण्यापेक्षा जास्त खर्चिक असावं.
शिवाय विमानात वजनाचा प्रश्न असल्याने जास्त पाणी वर नेण्यापेक्षा हवा वापरणं जास्त स्वस्त पडत असावं...
विमानात वजनाची समस्या सगळ्यात मोठी असते. त्यासाठी इंधन देखील मोजून मापून भरलं जातं.
अवांतरः मागे एकदा सहार वरून न्यूआर्कसाठी उड्डाण केलेला एअर इंडियाचा एक वैमानिक विमानात बिघाड आहे म्हणून अर्ध्या तासात परतला. पण पुन्हा सहारला लॅन्ड करण्याआधी अधिकचं इंधन समुद्रात फेकून द्यायला विसरला.
परिणाम म्हणजे लॅन्ड करताक्षणी ते अधिकचं ओझं सहन न होउन विमानाचे टायर फुटले.
ही त्याच विमानात असलेल्या एका जाणकाराने सांगितलेली कथा असल्याने ती सत्य आहे हे मानायला प्रत्यवाय नसावा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

रोम शहराच्या दक्षिणेस जेथे टायबर नदी समुद्राला मिळते तेथे रोमन साम्राज्याच्या काळात रोमचे बंदर होते. 'ऑस्टिया अँटिका' ह्या नावाने त्याचे अवशेष अजूनहि पाहायला मिळतात आणि तेहि रोममधील एक प्रवासी आकर्षण आहे. मी तेथे दोन वर्षांपूर्वी गेलो असता तेथील सार्वजनिक स्वच्छता गृहाची पुढील छायाचित्र काढली होती. ह्या धाग्याच्या संदर्भात ती मनोरंजक ठरावी. रोमन संस्कृति गुलामांच्या पाठीवर चालत असल्याने येथे स्वच्छतेचे काम गुलाम करीत असत.

'ऑस्टिया अँटिका'चे वर्णन माझ्या ह्या धाग्यात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजलबद्दलचा लेखही तुमचाच होता ना?

यासंदर्भातले काही विचार टंकतो आहे.

१. घरोघरी संडास ही कल्पना भारतात जमणे कठीण आहे, कारण पिण्याचे बादलीभर पाणी आणायला जिथे ५ किमी पायपीट करावी लागते, तिथे 'धुवायचे' दीड बादली पाणी कुठून फेकणार? त्यापेक्षा उघड्यावर गावाबाहेर केलेले मलनि:सारण जास्त हायजिनिक होईल, हे मी आधीही इथे लिहिलेच आहे.
२. फ्लश करून पाण्याचा अपव्यय होतो हे ठीकेय, पण त्यासाठीच्या सॅनिटेशन व्यवस्था नीट चालवणे यासाठीच तर स्थानिक स्वराज्यसंस्था अस्तित्वात आहेत. कितीही म्हटलं तरी शहरातल्या सगळ्यांनाच मोकळ्या शेतात जाऊन कार्यभाग उरकणे शक्य होणार नाही. या व्यवस्था तशा चालवणे हे शहरी जीवनपद्धतीत अनिवार्य आहे, व लोकल बॉडी टॅक्सेस अर्थात घरपट्टी, जकात इ. रूपांनी शहरवासी याची किंमत चुकवीतच असतात. मीटर लावून विकत घेतलेलेल पाणी फेकून द्यायला कितीही वाईट वाटत असले, तरी नाईलाज असतो.
२.अ. यामुळेच याला पर्याय म्हणून 'डायरेक्ट नदीचे, "पिण्यासाठी अयोग्य" असे लेबल वाले पाणी वेगळ्या पाईपलायनीतून व "पिण्याचे पाणी' वेगळ्या पाईपातून वेगवेगळ्या किमतीस रहिवाशांपर्यंत पोहोचविणे, व त्याचे वेगळे चार्जेस घेणे, हा मधला मार्ग होतो.
अर्थात, मुन्शिपाल्टीत निवडून दिलेले हरामखोर तुम्ही धुणीभांडी करता ते पाणी जमवून तुम्हीच तुमच्या घरी वापरा, पण आम्हाला टॅक्स द्याच हाच रस्ता वापरतील याची ग्यारंटी आहे.
३. सेप्टिक उर्फ 'सेफ्टी' टँक हा एक महत्वाचा भाग यात आहे. या टँकमधे विष्ठेचे व्यवास्थित जैविक विघटन होऊन ऑल्मोस्ट क्लीन अ‍ॅफ्लुअंट बाहेर येते. याचा घरोघरचा वापर अवाढव्य सोसायट्या, स्कायस्क्रेपर्स बांधल्याने अव्यवहार्य ठरला, तरी डायरेक्ट ड्रेनेज स्युएज लाईन्स हा मेट्रोजसाठीचा पर्याय असावा. मध्यम व छोट्या शहरांतून संडास डयरेक्ट गटारीस जोडण्याची यंत्रणा फक्त पैसे खाण्यासाठी बांधली जाते, हे स्पष्ट सत्य आहे.
४. आपल्या घरातले संडासपात्र हे त्यातील वक्र नलिकेतले पाणी "पिता येईल इतके स्वच्छ" ठेवण्याचा दावा करणारी अनेक हार्पिकस्टाईल जंतूनाशके आपण अतिरेकी प्रमाणात वापरतो. ही जंतूनाशके, साबण, अ‍ॅसिड्स बाहेर जाऊन ज्याठिकाणी या एकत्रित विष्ठेचे जैविक विघटन होते, तिथल्या 'गुड बॅक्टेरियांचा' जीव घेऊन ती प्रक्रिया बाधित करीत असतात, हे आपण लक्षात घेतो काय?

असो.
सध्या इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हार्पिकस्टाईल जंतूनाशकांना काही जैविक (ऑरगॅनिक) पर्याय आहे का? (मला व्यक्तिश: त्यांचा वास अजिबात सहन होत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.