दुपारच्या (वा एक वेळच्या) जेवणाची भ्रांत असलेली मुलं सहसा शाळेला जात नाहीत, या प्रत्यक्ष अनुभवावरून 2001 साली अत्युच्च न्यायालयाने शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक वेळ (चौरस, सकस) मोफत जेवण पुरविण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले. नेहमीप्रमाणे प्रशासनांच्या मगरमिठीतून व लालफितीतून मुलांपर्यंत जेवणाचे ताट येण्यासाठी भरपूर पावसाळे गेले. आताशीच कुठे तरी बहुतेक
राज्यामध्ये जेवण पुरवणाऱ्या व्यवस्थेची घडी बसलेली असून बहुतांश विद्यार्थ्यांना जेवण मिळत असावे असे म्हणता येईल. अजूनही महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही योजना पूर्णपणे पोचलेली आहे की नाही या बद्दल शंका वाटते. परंतु शेजारच्या कर्नाटक राज्याने बंगळूरू येथील अक्षयपात्र फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकाऱ्याने शालेय विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण पुरवण्यात यशस्वी झालेली आहे.
अक्षयपात्र फौंडेशनची स्थापना 2000 साली झाली. बेंगळूरू येथील पाच शाळेतील 1500 विद्यार्थ्यांना दुपारचे मोफत जेवण पुरविण्याची जबाबदारी या संस्थेने घेतली होती. लोकांच्या उदार देणगीतून हा उपक्रम राबवला जात होता. 2006 साली मिलेनियम डेव्हलपमेंट गोलची पूर्तता करण्याच्या उद्देशाने दुपारचे मोफत जेवणाची जबाबदारी घेऊ शकणारी पब्लिक-प्रायव्हेट भागीदारीसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. अक्षयपात्र फौंडेशनने काही अटीवर ही जबाबदारी घेतली. आज भारतभरातील 9 राज्यात हे फौंडेशन कार्यरत आहे. 9692 शाळेतील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यापर्यंत दुपारचे जेवण नियमितपणे पोचविण्यात ती यशस्वी झालेली आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असून दुपारचे गरम सत्वयुक्त जेवण विद्यार्थ्यांच्या ताटात पोचवणे फौंडेशनला शक्य होत आहे.
मोठ्या प्रमाणात सामाजिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या काही मोजक्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना पोटभर जेवणाची हमी याला प्राधान्यक्रम द्यावे लागेल. व्यवस्थापन, तंत्रज्ञान, कार्यक्षमता व आर्थिक तरतूद इत्यादींच्या बळावर फौंडेशन हा उपक्रम राबवत आहे. एकाच वेळी एक लाख विद्यार्थ्यासाठी जेवण बनविण्याची किमया बेंगळूरू येथील त्यांच्या किचन युनिटमध्ये होत असून त्याचा थोडक्यात आढावा येथे घेतला आहे.
हे स्वयंपाकघर तीन मजली असून येथील मशीनरीमध्ये गुरुत्व बळाचा मुबलक प्रमाणात वापर केलेला आहे. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळी कामं केली जातात. येथे रोज 7-8 टन तांदूळ शिजविले जाते. 6-7 टन भाजी व 2 टन डाळीपासून येथील विद्यार्थ्यांना आवडणारे सांबार बनवले जाते. यातील प्रत्येक किचन युनिटची क्षमता 50000 ते 150000 जेवणाचे ताट बनवण्याइतकी आहे. ही संस्था स्थानिक बाजारातूनच तांदूळ, भाज्या व डाळ यांची खरेदी करत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होतो व ने-आणीतील नुकसान टाळता येऊ शकते.
रात्रीच्या 3 वाजता स्वयंपाकाला सुरुवात होते. पुढील 3 तासात स्वयंपाक तयार होऊन डब्यात भरण्यासाठी सज्ज झालेली असते. जेथे शक्य आहे तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात व जास्त वेगाने आणि गुणवत्तेत कुठेही तडजोड न करता हा उपक्रम फौडेशन राबवत आहे. स्वयंपाकासाठीचे जळण म्हणून उसाच्या चिपाड्यापासून बनवलेले बायो फ्युएलच्या विटा वापरल्या जातात.
वरच्या मजल्यावर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आहारपदार्थांची पूर्व तयारी केली जाते. भाज्या चिरणे, तंदूळ – डाळी निवडणे, भिजत ठेवणे इत्यादी कामे येथे केल्या जातात. पाण्याच्या तीन टाक्यांचा वापर करून भाज्या स्वच्छ व निर्जंतुक केल्या जातात. पहिल्या टाकीतील साध्या पाण्यात, दुसऱ्या टाकीतील 50-100 ppm क्लोरीन असलेल्या पाण्यात (10 मिनिटं भिजत ठेऊन) व तिसऱ्या टाकीतील पुनः एकदा साध्या पाण्यात, अशा प्रकारे भाज्या धुतल्या जातात. भाज्या चिरण्यासाठी मशीन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एका तासात सुमारे अर्धा टन भाजी चिरणे शक्य आहे. चिरून वा कापून झाल्यानंतर ही भाजी chute मार्फत खालच्या मजल्यावर पाठवले जाते.
या दुसऱ्या मजल्यावर भात, सांबार शिजवले जातात. वाफेचा जास्तीत जास्त वापर येथे करत असल्यामुळे जास्त कार्यक्षमपणे स्वयंपाक बनवणे शक्य होत आहे. यातील एकेका भांड्यात 1200 विद्यार्थ्यांसाठी लागणारे 100 किलो भात तयार होऊ शकते. निवडून स्वच्छ केलेले तांदूळ chute द्वारे तिसऱ्या मजल्यावरून या भांड्यात आपोआप येऊन पडते. जेवण बनवताना माणसांच्या हाताचा स्पर्श पूर्णपणे टाळला जातो. भांड्यात 2 टन डाळ व 6-7 टन भाज्या शिजवून सांबार तयार केले जाते. यासाठी सुमारे 2 तास वेळ लागतो. व 6500 विद्यार्थ्यांना पुरेल एवढे सांबार या भांड्यात केले जाते.
भात शिजविल्यानंतर तळ मजल्यावरील पॅकिंग क्षेत्रात chuteमधून भात खाली येतो. हा भात स्टेनलेस स्टीलच्या हवानियंत्रित डब्यात भरला जातो. व हे डबे शाळेत पोचवल्या जातात. डबे भरताना वा पोचवताना स्वच्छतेची भरपूर काळजी घेतली जाते. डबे हाताळणारे पायात विशिष्ट प्रकारचे गमबूट, हातमोजे व डोक्यावर शेफची टोपी व तोंडाला रुमाल बांधून डबे भरतात. येथील कामगारांना व बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांना विशेष प्रकारचे शूज वापरूनच आत जाण्याची सक्ती केली जाते.
सांबारसुद्धा विशेष chute मधूनच वरच्या मजल्यावरून तळमजल्या-वरील भांड्यात येऊन पडते. दर आठवड्याला एका दिवशी गोड पदार्थाचा एक वेगळा डबाही शाळेला पाठवला जातो. दुपारच्या जेवणाचा मेनू त्या त्या जिल्ह्यातील खाण्याच्या आवडी निवडीप्रमाणे थोडा फार बदललेला असतो. उत्तर कर्नाटकातील विद्यार्थ्यांना जास्त भाताऐवजी भाकरी/चपातीची सोय केलेली असते. बहुतेक ठिकाणी स्थानिक स्वैपाक्यांना पसंत केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरातलेच जेवण खाल्यासारखे वाटते. समतोल आहाराचे निकष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेवणात दहीचे पाकीट असते. व ही दही स्थानिक सहकारी दूध उत्पादक संघातून खरेदी केलेली असते.
जेवणाचे डबे भरून झाल्यानंतर स्वयंपाकाची सर्व खरकटे भांडी कुंडी, भाजी चिरण्याची/कापण्याची साधनं, सर्व chute, सांबाराच्या टाक्या, पळी, चमचे इत्यादी सर्व साहित्य गरम पाण्याच्या फवाऱ्याने धुवून वाळवल्या जातात. व दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकासाठी सज्ज ठेवल्या जातात.
जेवणाचे डबे शाळेत पोचवण्यासाठी खास प्रकारच्या गाड्या वापरल्या जातात. रस्ते, शाळेचे ठिकाण, व तेथे पोचणारे डबे यांचे नियोजन केलेले असते. कमीत कमी वेळेत डबे पोचतील याची काळजी घेतलेली असते. ताट, वाट्यांची सोयसुद्धा केलेली असते.
या सर्व गाड्या सकाळच्या सहा वाजल्यापासून जेवणाचे डबे नेण्यासाठी सज्ज झालेले असतात. जेवणाच्या वेळेपर्यंत ग्रामीण भागातील अगदी टोकाच्या खेड्यातील शाळेपर्यंत त्या पोचतात. या निळ्या गाडीची विद्यार्थी वाटच पाहत असतात. जेवणापूर्वीच्या प्रार्थनेनंतर ओळीने येऊन डब्यातील जेवण ताट – वाट्यात वाढून घेतात. किती वेळा पाहिजे तेवढे वेळा अन्न पदार्थ मागून घेण्याची मुभा येथे आहे.
सरकारी अनुदानातून ही योजना राबवत असले तरी हे अनुदान अपुरे पडत असल्यामुळे अक्षयपात्र फौंडेशन देणगी स्वरूपात पैसे गोळा करून हा उपक्रम राबवत आहे. फौंडेशनचा पसारा वाढल्यामुळे स्वयंपाकाचे विकेंद्रीकरण करत असून त्यात स्थानिक महिलांना स्वच्छता, गुणवत्ता इत्यादी बाबतीत प्रशिक्षित करून त्यांचा सहभाग वाढवत आहे. गुणवत्ता, रुचकरपणा, कार्यक्षमता व सकस आहार याकडे विशेष लक्ष दिले जाते.
दुपारच्या वेळी विद्यार्थ्यापर्यंत गरम व सकस जेवण पोचविण्यात ही संस्था यशस्वी होत आहे.
माध्यान्ह भोजनाच्या बाबतीतही राज्य निहाय खूप तफावत दिसून येते. सच्चर समितीच्या अहवालातील आकडेवारी पाहता हे प्रमाण सरासरी 26.8% इतके अखिल भारतीय स्तरावर दिसून येते. महाराष्ट्राचे प्रमाण 31.4% इतके आहे महाराष्ट्राशी शेजारील राज्याची तुलना केली असता हेच प्रमाण कर्नाटक 45.8%, आंध्र प्रदेश 29.9%, गुजरात 33.0%, तर तमिळनाडू 53.5% इतके आहे आपल्या शेजारील राज्यांशी तुलना करता आर्थिक दृष्ट्या सर्वात प्रगती पथावर असलेला
महाराष्ट्र सामाजिक बाबतीत सगळ्यात पिछाडीवर असल्याचे दिसते. ही फारच गंभीर बाब आहे. माध्यान्ह भोजन आणि शाळेत टिकण्याचा संबंध सर्वश्रुतच आहे, त्यामुळे शाळा गळतीचे प्रमाण कमी करायचे तर त्यासाठी माध्यान्ह भोजनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची गरजेचे आहे. तसेच हे भोजन चांगल्या दर्जाचे असते का याची शहानिशाही व्हायला हवी.
अक्षयपात्र फौंडेशनसारखे तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवणे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही हा प्रश्न संबंधितांना विचारावासा वाटतो.
संस्थापक "हरे राम हरे कृष्ण"
संस्थापक "हरे राम हरे कृष्ण" वाले आहेत का? कारण या प्रकारची एक अतिशय उत्तम डॉक्युमेंट्री पाहीली आहे. पाहून, भारावून गेले होते. लेख सावकाश वाचते. पण उत्तम आहे हे निर्विवाद (चाळण्या उपरांत)
उत्तेजक माहिती.
असे कार्यक्रम भारतात केव्हाच सुरू व्हायला हवे होते पण हरकत नाही आता सुरू झाले आहेत!
'अक्षयपात्र'बाबत अनेक विडीओ क्लिप्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत. उदा. ही पहा. इन्फोसिस आणि नारायण मूर्ति ह्या योजनेमागे आहेत असे दिसते.
छान लेख!
छान लेख!
याच मध्यान्ह भोजन योजनेसंदर्भातील आकडेवारी मागे मी ऐसीवरच दिली होती त्याचा हा दुवा