'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३

ललित

'ब्रह्मघोटाळा' या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - ३

लेखक - ज्युनियर ब्रह्मे

आई-बाबांच्या भांडणात, परस्परांच्या चुका दाखवून देण्यासाठी बंडामामा आणि ब्रह्मेकुटुंब इतक्याच नातलगांचा उल्लेख होतो. पण केनियात तसं नसतं. तिथं सगळं जंगलच आपल्या नात्यात असतं. हसणारं तरस, नाचणारं माकड किंवा वटवट करणारी टिटवी- सगळे आपले आप्तच. त्यामुळं तिथल्या भांडणाची मजा काही औरच.

स्थळ - केनियातली बाओबाब कॉलनी, तिसरी फांदी : जंबो लुमुंबा यांचं घर
पात्रं - एलिआत्या, एलिआत्याचे मिस्टर जंबो लुमुंबा, आणि त्यांचा मुलगा हुलुलूलू

एलिआत्या : बेटा हुलुलूलू, खाली जाऊन तुझे बाबा बाजारात जायला निघालेत का बघ.
हुलुलूलू : हो आई.
एलिआत्या : मेल्या, लाज नाही वाटत आईला आई म्हणून हाक मारताना?

(टीपः केनियात कोणतंही नातं डायरेक्ट उच्चारत नाहीत. आईला आई किंवा बापाला बाप म्हणणं तिकडं उद्धटपणाचं समजतात. आपल्याकडे जसं मुन्नी की मां किंवा चुन्नू-मुन्नू के पापा असं म्हणायची पद्धत आहे तशी तिकडंही आहे. इतकंच काय, नवरा आपल्या बायकोला 'अगं अमुकतमुकच्या आईची सून' असं म्हणून बोलावतो. एकांतात मात्र 'अहो बबूनचे पप्पा' आणि 'काय गं पाणघोड्याच्या आई' असले चावट प्रकार चालतात म्हणे. काही तरुण मसाई तुर्क तर एकमेकांना डायरेक्ट नावाने हाका मारतात. जंबो बिचारा हाडाचाच गरीब असल्यानं पोरानं बाबा म्हणून हाक मारली तरी ओ देतो. टीप संपली.)

हुलुलूलू : अं, सॉरी, जंबोची बायको.
एलिआत्या : जा लवकर, शहामृगाच्या लेका...
(हुलुलूलू खोडाला हातापायांचा विळखा घालून घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : अहो जंबो लुमुंबा, तुम्ही बाजारात निघालाय का?
जंबो : हो रे. जा लवकर तुझ्या आईला वर जाऊन विचार काही आणायचंय का ते.
(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : एलिझाबेथ ब्रह्मे-लुमुंबा, बाजारातून काही आणायचंय का?
एलिआत्या : हो रे माकडा, वहीचं एक पान घेऊन ये, यादी करून देते.
(हुलुलूलू खोडाला धरून घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : बाबा, ही घ्या जंबोच्या बायकोच्या नवर्‍याच्या पत्नीनं दिलेली सामानाची यादी.
जंबो : किती घाणेरडं अक्षर आहे हे? कुणाचंय?
हुलुलूलू : तुमच्याच बायकोचं आहे.
जंबो : काय दिव्य अक्षर आहे. आणि हे काय रे? झेब्र्याची शिंगं कशाला?
हुलुलूलू : आमच्या शाळेत स्कूल प्रोजेक्टसाठी पाहिजे आहेत.
जंबो : अरे जिराफा, पण मागच्याच आठवड्यात तुला दोन शिंगं आणून दिली होती ना? शाळेत शिंगांनी टकराटकरी खेळता काय रे?
हुलुलूलू : अहो बाबा, ती शिंगं डुप्लिकेट होती. शिंगांवर मेड इन इंडिया लिहिलेलं बघितल्याबरोबरच समजायला पाहिजे होतं तुम्हांला.
जंबो : बरं बरं. आणि हे काय लिहिलंय? Ncoca Mgcola? याचा अर्थ काय?
हुलुलूलू : अहो बाबा, म्हणजे कोकाकोला.
जंबो : आता आपल्या घरात कोकाकोला कुणाला प्यायचाय?
हुलुलूलू : प्यायला नाही बाबा. कोकाकोलाच्या बाटलीत सुरण उगवण्याचा प्रयोग करायला सांगितलंय आम्हांला शाळेत.
जंबो : च्यायला, तुझी ही शाळा आहे की प्रयोगशाळा?
हुलुलूलू : जीवन हीच एक प्रयोगशाळा आहे असं आमचे शिकारीचे मास्तर म्हणायचे.
जंबो : येडाच आहे तुझा मास्तर.
हुलुलूलू : आहे नाही, होते! परवा मगरीच्या कातड्याचे कपडे घालून नदी पार करायचा त्यांचा प्रयोग अयशस्वी झाला. सध्या शाळेनं एका मगरीला शिकारीचे मास्तर म्हणून ठेवलंय.
जंबो : मरू दे तो मास्तर. आणि शहामृगाची अंडी कशाला लिहिलीत?
हुलुलूलू : बाबा, शाळेत परवा सेफ्टी डे आहे. त्यासाठी शहामृगाच्या अंड्याचं हेल्मेट करून आणायला सांगितलंय.
जंबो : शाळेत कसलेकसले डे करता रे तुम्ही? शाळेत हेच करायला जातोस का तू?
हुलुलूलू : हे मला नाही माझ्या मास्तरांना विचारा.
जंबो : जाऊ दे. बाकी मध, भाले, गेंड्याच्या शेपट्या, चकमकीचा दगड वगैरे काही आणायचंय का?
हुलुलूलू : माहीत नाही बाबा.
जंबो : जा गेंड्या, तुझ्या आईला विचारून ये.
(हुलुलूलू माकडासारखा उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : अगं जंबोची बायको, आणखी काही आणायचंय का?
एलिआत्या : अरे, चुकून निम्मीच यादी दिली मी. अजून बरंच काही सामान आणायचंय. यादी लिहायला मेली पेन्सिल मिळत नाहीय.
हुलुलूलू : सांग लवकर, नाहीतर जांबुवंतराव तसेच जातील.
एलिआत्या : मेली, त्यांची एक नुसती बाजारात जायची गडबड. जा, त्यांना सांग की थोडा कोळसा घेऊन या म्हणून.
(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : बाबा, आईनं कोळसा आणायला सांगितलाय.
जंबो : कशाला रे? तुझ्या आईला परत सुंदर दिसण्याचं खूळ लागलं वाटतं. जा, कशासाठी कोळसा पाहिजे ते विचारून ये.
(हुलुलूलू टणाटण उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : अगं जंबोची बायको, कोळसा कशासाठी पाहिजे?
एलिआत्या : मेल्या तुला कशाला रे नस्त्या चौकशा?
हुलुलूलू : हे मी नाही, तुझा नवरा विचारतोय.
एलिआत्या : इश्श्य! मी हल्ली किती गोरी दिसत्येय नै? परवा अमावास्येच्या अंधारातपण तुझ्या बाबांनी मला ओळखलं.
हुलुलूलू : बरोबर आहे. अंधारात तू हसलीस ना की तुझे दात चमकतात. त्यावरून ओळखता येतं.
एलिआत्या : जा, सांग त्यांना. आणि म्हणावं कोळसा जर बघून आणा. मागच्या वेळेस वाण्यानं दगडी कोळसा म्हणून कसला तरी भुसकट कोळसा दिला होता.
(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : बाबा, आईला अंगाला लावायला कोळसा पाहिजेय.
जंबो : या बायकांची नटायची हौस कधी जाते कुणास ठाऊक! हे वय आहे का नटण्या-मुरडण्याचं?
हुलुलूलू : हे जाऊन सांगू का तिला?
जंबो : थोबाड फोडेन झेब्र्या. इकडच्या गोष्टी तिकडं सांगून आमच्या सुखी संसारात खसखस कालवतोस का?
हुलुलूलू : नाही बाबा. मग काय सांगू आईला?
जंबो : तिला जाऊन विचार किती किलो कोळसा पाहिजे ते.
(हुलुलूलू फांद्यांना लोंबकळत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : अगं जंबोची बायको, कोळसा किती किलो पाहिजे असं विचारलंय बाबांनी.
एलिआत्या : म्हणावं दीड किलो आणा. नाहीतर असं करा म्हणावं एकदमच पाच किलो आणा, म्हणजे स्वस्त पडेल. येत्या महिन्यात थोरल्या सासूबाईंची धाकली सून येत्येय म्हणे. नाहीतर म्हणावं आणा दोन किलो, काय मेले बघून आणत नाहीत. मागल्या वेळी वर काळा रंग लावलेला पांढरा कोळसा आणून टाकला होता. नाहीतर असं करा म्हणावं…
हुलुलूलू : नक्की किती आणायचाय?
एलिआत्या : तुला एक भलतीच गडबड. जा, सांग त्यांना की अडीच किलो आणायला सांगितलाय म्हणून.
(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : बाबा, आईनं सांगितलंय अडीच किलो कोळसा आणा म्हणून.
जंबो : अडीच किलो? तेवढ्यात अर्धा मसाईमारा काळा होईल.
हुलुलूलू : बाबा, हे पण आईला सांगू?
जंबो : अरे, सांग सांग. घाबरतो काय?
हुलुलूलू : बघा हं. आईला हे कळलं तर झाडाच्या खोडाशीच लांडग्यांच्या संगतीत झोपावं लागेल रात्री.
जंबो : मी चेष्टा केली रे तुझी. (कपाळावरचा घाम पुसत) जा, खायला काही गवे-रेडे आणयाचेत का विचार तिला.
हुलुलूलू : हे विचारू आईला?
जंबो : हो बाळ, जा विचारून ये.
(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : आई गं, खायला काही आणायचंय का गं?
एलिआत्या : अरे हो, बरी आठवण केलीस. अरे नीलगाई संपल्यात. स्वस्त मिळाल्या तर पाचसहा नीलगाई आणा म्हणावं.
(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : बाबा, आईनं सांगितलंय की पाचसहा नीलगाई आणा म्हणून.
जंबो : एवढ्यात नीलगाई संपल्या? अरे, खाता की काय?
हुलुलूलू : हो बाबा. खाऊनच संपल्यात. एक नीलगाय आईनं कापून ठेवली होती. तिला त्से-त्से माशा लागल्या म्हणून टाकून दिली.
जंबो : टाकून दिली? ह्या म्हशीला गाईंची काही किंमत आहे की नाही? नीलगाई काय झाडाला लागतात का?
हुलुलूलू : बाबा, हेपण जाऊन आईला सांगू?
जंबो : दात काढून हातात देईन, वार्टहॉगच्या पोरा!
हुलुलूलू : बाबा, वॉर्टहॉग म्हणजे काय ते कळलं. पण बाबा, दात म्हणजे काय हो?
जंबो : अरे, ज्यांनी आपण चावतो ती तोंडातली पांढरी हाडं असतात ना ते म्हणजे दात. हत्तीला बघ कसे ते दोन मोठे पांढरे सुळे असतात ना, त्यांना दात म्हणतात.
हुलुलूलू (मुलं भुणभुण लावतात त्या सुरात) : बाबा बाबा बाबाबाबा ….
जंबो : ओ रे, आता आणखी काय पाहिजे तुला? आणि हाक मारताना अशी माझ्या कमरेची पानं ओढत जाऊ नकोस.
हुलुलूलू : बाबा, आपण माझ्यासाठी हत्तीचा दात आणूयात?
जंबो : नको. आपल्या इथं सगळे डुप्लिकेट दात मिळतात. सुट्टीत भारतात मामाच्या गावाला गेलास ना की मग तिथं घेऊ. भारतातल्या हत्तींचे दात फार चांगले असतात म्हणे.
हुलुलूलू : नक्की ना बाबा? प्रॉमिस?
जंबो : हो रे माझ्या चिम्पान्झी. अरे देवा, बाजारात जायचंय तर पिशवी घ्यायची विसरलोच होतो मी. बाळ हुलुलूलू, पटकन वर जा आणि माझी पिशवी, भाला आणि क्रेडिट कार्ड घेऊन ये बरं.
(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : आई आई, बाबांची पिशवी आणि क्रेडिट कार्ड दे. आणि भालापण.
एलिआत्या : त्यांना म्हणावं पिशवी सगळ्यात खालच्या फांदीवरच्या ढोलीत आहे. आणि क्रेडिट कार्ड ना, अं… काल त्यांनी जी पानं कमरेला बांधली होती त्यातच होतं. जरा विचार बरं, कालची पानं कुठं ठेवलीयत ते?
(हुलुलूलू घसरत तळमजल्यावर येतो)
हुलुलूलू : बाबा, आईनं विचारलंय काल तुम्ही जी पानं कमरेला बांधली होती ती कुठायत म्हणून?
जंबो : अरे, मी ती जिराफांना खायला घातली. का रे?
हुलुलूलू : त्यात तुमचं क्रेडिट कार्ड होतं.
जंबो : मेलो! आता एवढ्या मोठ्या कळपातल्या कोणत्या जिराफानं कार्ड खाल्लंय हे कसं शोधायचं? आणि क्रेडिट कार्ड नाही तर खरेदी तरी कशी करणार?
हुलुलूलू : बाबा, आता आपण गरीब झालो का हो?
जंबो : गप रे गाढवा. ह्या चिचुंद्रीला साधं कार्डपण सांभाळता येत नाही.
हुलुलूलू : बाबा, हे पण जाऊन सांगू आईला?
जंबो : सांग जाऊन! आणि म्हणावं पैसे दे आता. च्यायला, आता नवीन कार्ड येईपर्यंत पैशाची थैली सांभाळत बसायला लागणार. जा लवकर, पैसे घेऊन ये.
(हुलुलूलू उड्या मारत तिसऱ्या मजल्यावर येतो)
हुलुलूलू : आई, बाबांनी पैसे मागितलेत. क्रेडिट कार्ड जिराफांनी खाल्लं.
एलिआत्या : खाल्लं? मग आता आपण काय खायचं? जिराफ??
हुलुलूलू : माहीत नाही. बाबांनी पैसे मागितलेत.
एलिआत्या : घ्या. ह्यांना एवढंसं क्रेडिट कार्ड सांभाळता येत नाही. आणि हे आम्हाला काय सांभाळणार? ते बघ कोपऱ्यात चिचोक्यांचं पोतं दिसतंय ना, ते उचल आणि दे नेऊन तुझ्या बापाला.
हुलुलूलू : आई आई...
एलिआत्या : काय रे?
हुलुलूलू : आणि बाबा ना, तुला चिचुंद्री म्हणाले.
एलिआत्या : मला अस्सं म्हणाला तो साळिंदर? येऊ दे घरी, मग बघतेच त्याला.
(हुलुलूलू झाड उतरून तळमजल्यावर येतो)
जंबो : अरे माझ्या इंपाला हरणा, तुला बराच वेळ लागला यायला?
हुलुलूलू : मग? पंधरा किलोचं चिंचोक्यांचं पोतं उचलून खाली आणायचं म्हणजे चेष्टा वाटली काय तुम्हांला?
जंबो : आणि माझा भाला कुठाय? भाल्याशिवाय मी इतक्या लांब कसा पळत जाऊ?
हुलुलूलू : तुमचा भाला ना? रामाला मारला. च्यायला, एवढीशी चिल्लर खरेदी करायचीय आणि मला दहादा वरखाली करायला लावताय. अरे, मुलगा म्हणजे काय लिफ्ट समजलात काय? बाजार करा नाहीतर बसा कोळसा उगाळत!

(संपूर्ण)

field_vote: 
1.25
Your rating: None Average: 1.3 (4 votes)

प्रतिक्रिया

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चिं वि जोशींच्या लेखनाची आठवण आली.

एके काळी चिं वि जोशींचे लेखन प्रचंड आवडत असे, या दृष्टिकोनातून बघितल्यास माझे वाक्य प्रशंसा म्हणून मानता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, चिं.वि.च कशाला, चिं.वि. तर प्राचीन झाले. बोले तो, त्या काळात तर असले विनोद खपून जायचेच जायचे. पण अर्वाचीन काळात अगदी पु.लं.च्या तुलनेने अलीकडच्या लिखाणातसुद्धा ("प्रसिद्ध नायजीरियन कवी ठोम्बे घृअंकृम्फे छुक् छुकुम्बा यांच्या 'कानिबाल हुप् कानिबाल' या काहिली भाषेतील कवितेचा 'माणसा माणसा हुप' हा बंब बेलापूरकरकृत मराठी अध:पात" वगैरे वगैरे; संग्रह: 'अघळपघळ') अशा प्रकारचा विनोद वाचल्याचे आणि वाचून गंमत वाटल्याचे आठवते. एक तर आमची समजही (व्यक्ती म्हणून आणि समाजघटक म्हणूनसुद्धा) त्या काळी तितपतच होती; पोलिटिकल करेक्टनेसची संकल्पना आणि तिचे गांभीर्य (बोले तो, कोणी ऐकल्यास काय होईल किंवा कोणाच्या भावना दुखावतील म्हणून नव्हे, तर हे निखालस चूक आहे म्हणून अशा गोष्टी टाळाव्यात, वगैरे) टाळक्यात अजून रुजलेले नव्हते. शिवाय, आपण भारतवंशीय रेशिष्ट नसतो असे कोण म्हणतो?

पण आता ज़माना बदल गया है असे वाटते, नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी , अगदी सहमत ...शिवाय केनियात 'जंगले ' नाहीत , आणि लुमुंबा हे सर्वसाधारणपणे पश्चिम व मध्य आफ्रिकेतील आडनाव, केनिया पूर्व आफ्रिकेत वगैरे तांत्रिक चुका न काढताही ..बाप रे म्हणावेसे वाटले .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0