सूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण - चार्ल्स कोरिया

संकल्पनाविषयक चार्ल्स कोरिया

सूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण

- चार्ल्स कोरिया

भाषांतर - .सारिका

भाषांतरकाराचे दोन शब्द -
विख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्या 'A place in the shade' या पुस्तकातल्या 'A place in the sun' या लेखातून हा उतारा घेतला आहे. या पुस्तकात कोरियांनी वास्तुकलेतल्या आणि नागर समस्यांवर भाष्य केलं आहे. आपले अधिवास हे नेहेमीच 'पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक मूल्यं दर्शवणारे असावेत' याकडे ते वास्तुकलेचं मूलभूत मूल्य म्हणून बघतात. आणि यासाठी आपलं आपल्या वास्तूशी, आजूबाजूच्या परिसराशी आणि वातावरणाशी असलेलं नातं समजून घेणं हीच नव-वास्तुकलेची संकल्पना आहे अशी त्यांची भूमिका आहे. 'आपण आणि वास्तुरचना यामधलं नातं' या विषयाशी संलग्न असलेला उताऱ्यातला वेचक भाग भाषांतरासाठी निवडला आहे.

थॉमस क्युबिट लेक्चर, रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडन (१९८५)

ब्रिटनपासून खूप दूर असणाऱ्या एका जगातल्या स्थापत्याविषयी मी आज बोलणार आहे. जिथल्या कित्येक गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत असं हे जग म्हणजे भारत. ऋतुमान, उर्जेची संसाधनं, सामाजिक चालीरीती किंवा सांस्कृतिक मूल्यं अशा सर्व बाबींत भारत इथल्याहून वेगळा आहे. म्हणूनच मी माझ्या व्याख्यानाचं शीर्षक 'A place in the sun' असं ठेवलं आहे. [...] तर त्या शीर्षकाचा आधार घेत आपण एका क्षणात या गोठवणाऱ्या युरोपीय हवामानातून बाहेर पडू आणि जिथे मंद आणि उबदार वारे वाहातात अशा वेगळ्याच वातावरणाच्या आणि आपली मन:स्थिती बदलून टाकणाऱ्या त्या अत्यंत दूरच्या प्रदेशात जाऊ.

हा कल्पनाविलास आपण जर करू शकलो, तर आपण घालतो ते कपडे, आपण बसलो आहोत ती खोली - किंवा अगदी आपली इथे बसण्याची पद्धतदेखील - अशा आपल्या आजूबाजूच्या कित्येक गोष्टींकडे आपण नव्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात करू शकू असं मला वाटतं. बांधीव रूपाकारांकडे (built-form) पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात आणि बांधीव रूपाकारविषयक आपल्या गरजांमध्ये हवामानामुळे मूलभूत बदल घडतात. उत्तरेकडच्या प्रदेशांमध्ये थंडी तीव्र असते. त्यामुळे तापमानरोधक आणि हवामानरोधक बंद पेटीच्या रचनानिकषांच्या मर्यादांमध्येच तिथल्या वास्तुविशारदाला सीमित राहावं लागतं. आपण एकतर या बंदिस्त पेटीच्या आत असतो किंवा बाहेर असतो. यांपैकी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी दर्शनी दरवाजाची टणक आणि सुस्पष्ट अशी मर्यादा पार करावी लागते. 'आत' आणि 'बाहेर' या एका निखालस द्वैतातल्या परस्परविरोधी बाजू होतात. (वास्तुविशारद मीस व्हॅन डर रोह याचं वर्णन एका सुस्पष्ट समीकरणाद्वारे करतात : खुल्या अवकाशरूपी सागरात ठेवलेली स्टील आणि काचेची पेटी)

लाल किल्ला स्किमॅटिक
लाल किल्ल्याची अंतर्गत रचना दर्शवणारी आकृती

फत्तेपूर सिक्री
फत्तेपूर सिक्रीचा आतला भाग

उबदार हवामानात बांधीव रूपाकारांचे जे गुंतागुंतीचे अवतार पाहायला मिळतात त्यांच्याशी याची तुलना करूयात. बंद पेटी आणि आकाशाखालची खुली जागा ह्या दोन टोकांच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारांची आणि (बाह्य वातावरणापासून) कमीअधिक बचावाच्या विविध स्तरांची एक लांबलचक श्रेणी आहे. बंद पेटीतून बाहेर आल्यावर आपण व्हरांड्यात पोहोचतो; तिथून अंगणात जातो आणि नंतर झाडाखाली आणि मग त्या पलीकडे बांबूच्या मांडवाला (Pergola) वेलींनी आच्छादलेल्या गच्चीवर, नंतर कदाचित परत एका खोलीमध्ये आणि मग सज्जावर, वगैरे. या विविध विभागांमधल्या सीमारेषा औपचारिक किंवा काटेकोरपणे आखलेल्या नसून त्या साध्या आणि धूसर असतात. छायाप्रकाशातले छोटेछोटे फरक, किंवा वातावरणातले सूक्ष्म बदल अशा माध्यमांतून आपल्या संवेदनांना त्यांची जाणीव होते.

हवा महल
जयपूरचा हवा महल

भारतीय खिडक्या
कोरड्या, उष्ण, वाळवंटी भागासाठी बनवल्या गेलेल्या खिडक्या

ही बहुविधता आणि ही संदिग्धता उष्ण हवामानातल्या बांधीव रूपाकारांची सारभूत वैशिष्ट्यं आहेत असं मी मानतो. अभिजात युरोपीय वास्तुकला ग्रीक बेटांमधून बाहेर पडून आधी वर रोममध्ये, मग 'हाय रनेसांस'मधून अखेर थ्रेडनीडल स्ट्रीटवरच्या बँकांमध्ये विसावली, तेव्हा या प्रवासात ती नेमकं हेच वैशिष्ट्य गमावून बसली. इतकंच नव्हे, तर भारतामधल्या आमच्यासारख्यांसाठी ही अवकाशीय बहुविधता समजून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे कारण तीच आमच्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर गुरुकिल्ली आहे असं मी मानतो. आज आपण यातल्या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा बांधीव रूपाकारांशी आपलं नातं यासंबंधी आहे. दुसरा मुद्दा उर्जेचा अतिरिक्त वापर न करणाऱ्या इमारतींची (https://en.wikipedia.org/wiki/Zero-energy_building) वास्तुरचना आणि तिसरा म्हणजे नागर भागातल्या गरिबांसाठी गृहनिर्मिती. [...] जवळपास गेली तीन दशकं एक वास्तुविशारद आणि नियोजक म्हणून काम केल्यावर मागे वळून बघताना असं जाणवतं, की वरवर पाहता वेगवेगळ्या भासणाऱ्या ह्या तीन मुद्द्यांना मी माझ्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवलंय. या सर्वेक्षणात मी त्यांचं परस्परांशी असलेलं नातं विशद करण्याचा प्रयत्न करेन आणि एका चौथ्या मुद्द्याच्या संदर्भचौकटीत त्यांना उभं करेन. भारतासाठी (खरं तर सर्वच विकसनशील राष्ट्रांसाठी) अत्यंत निर्णायक असलेला हा चौथा मुद्दा म्हणजे परिवर्तनाचं स्वरूप.

सुरुवातीला आपण पहिला मुद्दा विचारात घेऊया - बांधीव रूपाकारांशी आपलं नातं. थोडक्यात सांगायचं झालं तर उबदार हवामानातलं जगणं थंड हवामानाच्या तुलनेनं खूप अधिक व्यापक नैसर्गिक परिस्थितीमध्ये घडत असतं. खोली, व्हरांडा, गच्ची आणि अंगण अशा अनेक पायऱ्यांची ही श्रेणी आहे. विशेष म्हणजे एकमेकांलगत असलेल्या ह्या पायऱ्यांदरम्यानच्या सीमा इतक्या धूसर आणि ऐसपैस आहेत की एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर अगदी सहजपणे जाता येतं.

फत्तेपूर सिक्री खास महाल
फत्तेपूर-सिक्रीचा खास महाल

अशा परिस्थितीत लोकांचा वास्तुकलेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. वर्षभरातल्या त्यांच्या बऱ्याचशा कृतींसाठी 'बंद पेटी' हा एकमेव पर्याय नाही आणि तो सर्वोत्तमही नाही हे लोकांच्या लक्षात येतं. व्यवहाराच्या पातळीवर, उपयुक्ततेच्या पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवरही ह्याचे खोलवर परिणाम होतात. उदाहरणार्थ, शाळेची छोटीशी लाल इमारत हे उत्तर अमेरिकेत शाळेचं प्रतीक असतं; भारतात (आणि जवळपास संपूर्ण आशिया खंडात) मात्र वृक्षाखाली बसलेला गुरु हे पूर्वापार शाळेचं प्रतीक राहिलेलं आहे. बुद्ध आणि पिंपळाचं झाड ह्या प्रतिमा फक्त सांस्कृतिक संचिताची आठवण करून देणाऱ्या किंवा ज्ञानप्रबोधनाला पूरक नाहीत, तर (प्रत्यक्षात) कोंदट, जुनाट बंद पेटीत बसण्यापेक्षा झाडाखाली बसणं (आरामशीरपणाच्या दृष्टीनं) खूप जास्त शहाणपणाचंसुद्धा आहे. वरवर पाहता असं वाटू शकतं की वऱ्हांडा, लतामंडप इत्यादी प्रकारचे खुल्या जागांचे पर्यायी वापर म्हणजे टिकाऊ बांधकामासाठी स्वस्त आणि मनमानी पर्याय आहेत. खरं तर, वर्षातल्या विशिष्ट काळात आणि दिवसाच्या विशिष्ट प्रहरांत काही कृतींसाठी ते वातावरण अत्यंत साजेसं आणि प्रसन्न ठरतं.

अर्थात, वास्तुरचनाशास्त्रानुसार इष्ट काय आणि मर्म कशात आहे ह्याबद्दलचा आपला दृष्टिकोनच ह्यामुळे बदलून जातो. आपण जर थंड हवामानात राहात असलो आणि सतत बंदिस्त पेट्या (किंवा त्यांच्या कमीअधिक फरकांच्या आवृत्त्या) बांधण्यात मग्न असलो, तर आपण त्या पेट्यांच्या साच्यांनी आणि त्यांच्या रचनातत्त्वांनी झपाटून जातो. वर्तमानपत्रांतली आणि नियतकालिकांमधली वास्तुकलेची छायाचित्रं ह्या झपाटण्याला बळकटीच देतात कारण छापील प्रतिमा द्विमितीय साच्यांनाच नाट्यमय उठाव देतात, पण भवतालातल्या हवेची अनुभूती देण्याची क्षमता मात्र त्यांच्यात नसते.

ही खरोखरच मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरून आल्यावर किंवा वाळवंट पार करून आल्यावर जेव्हा आपण अंगण असणाऱ्या घरात प्रवेशतो, तेव्हा तो अनुभव निव्वळ सुंदरशा छायाचित्रात बंदिस्त करण्याजोगा नसतो, तर खूप पलीकडचा असतो. अशा वेळी अचानक आपल्या मनात काही प्रतिसाद उमटतात. जीवसृष्टीनं ह्या पृथ्वीतलावर हजारो पिढ्या घालवल्यानंतरच्या संस्कारांतून ते प्रतिसाद येतात. किंवा, कदाचित ते प्रतिसाद एखाद्या आदिम निसर्गदृश्याच्या किंवा हरपलेल्या नंदनवनाच्या अर्धविस्मृत आठवणी असतील. ते काहीही असो, वास्तुरचनेच्या विविध श्रेणींपैकी खुल्या आभाळाखालच्या रचनांकडे आपण जेव्हा येऊ लागतो तेव्हा आपल्या जाणिवांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडतो.

मदुरैचं मीनाक्षी मंदिर
मदुराईचं मीनाक्षी मंदिर

आणि म्हणूनच युरोपमध्ये वास्तुकलेचं उगमस्थान हे नेहेमीच भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये राहिलं आहे. तिथल्या स्तंभमालिका म्हणजे निव्वळ मागचे बांधीव रूपाकार नजरेला खुले करणारी बोजड कळ नसते. तिथे तुम्ही दिवसभर रेंगाळू शकता. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातली मदुराई, तंजावर किंवा श्री रंगम इथल्या भव्य मंदिरांची अनुभूती केवळ गोपुरांचे आणि श्रद्धास्थळांचे समूह म्हणून घ्यायची नसते. त्या रूपाकारांच्या दरम्यानच्या पवित्र अवकाशातून विधिवत करायची मार्गक्रमणा (यात्रा!) त्यातून सूचित केलेली असते. खरंतर खुल्या आभाळाखालच्या अशा मार्गक्रमणांना मोठ्या पातळीवर धार्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व आहे. पृथ्वीवरच्या उबदार हवामान असणाऱ्या सर्व प्रदेशांमध्ये हे आढळतं - मॅक्सिकोमधल्या सूर्य मंदिरांमध्ये पिरॅमिड्स आणि (सर्वात महत्वाचं म्हणजे) त्यांच्या दरम्यान असणाऱ्या धर्मविधींसाठीच्या खुल्या जागा आढळतात; तर बालीच्या मंदिरांमध्ये ही विधिवत मार्गक्रमणं डोंगरांवर चढत जाणाऱ्या वाटांमधून आणि धारदार कडांच्या दरवाज्यांमधून जातात.

खुल्या आभाळाखालच्या अशा मार्गक्रमणांना आणि ते करताना मनात उत्पन्न होणाऱ्या गूढानुभूतींना आशियाई धार्मिक विधींमध्ये नेहेमीच महत्त्व दिलं गेलंय. म्हणजे, युरोपातली कथीड्रल्स 'बंद पेटी' प्रारूपाचे वेगवेगळे आविष्कार आहेत; तर दिल्लीतल्या आणि लाहोरमधल्या मशिदी या श्रेणीव्यवस्थेमध्ये अगदी दुसऱ्या टोकाला आहेत. कारण, त्यांचा परिसर मुख्यत्वे खुल्या अवकाशानं व्यापलेला आहे आणि त्यांतलं बांधीव रूपाकारांचं प्रमाण आपल्याला एका वास्तूच्या 'आत' असण्याची अनुभूती यावी इतपतच असतं. त्यातलं रचनाकौशल्य खरोखर अगदी तलम असतं.

हे केवळ मंदिर-मशिदींपुरतं मर्यादित नाही. अगदी निधर्मी रूपाकारांतही त्याची उदाहरणं आढळतात. आपण ज्या मुद्द्यांविषयी इथे चर्चा करतो आहोत त्यांच्यासाठी अगदी नमुनेदाखल वास्तू म्हणून फत्तेपूर-सिक्रीकडे निर्देश करता येईल. इतकंच नाही, तर अगदी घरगुती पातळीवरच्या वास्तुरचनेतही अशी अनुभूती येते. तुमच्यापैकी कुणी उबदार हवामानात राहिला असाल, तर सकाळी सकाळी हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उघड्यावर काही काळ बसल्यानंतर वातानुकूलित पेटीत परत आत जाण्याची कल्पनादेखील कशी घुसमटून टाकणारी वाटू शकते याची अनुभूती तुम्हाला कदाचित आली असेल.

पार्थेनॉन
अथेन्सच्या अॅक्रोपोलिसमधलं पार्थेनॉन

अथेन्समधलं अॅक्रोपोलिस हे कदाचित सर्वांच्याच परिचयाचं उदाहरण असेल. विविध पातळ्यांवरच्या ज्या संवेदनांची अनुभूती तिथे मिळते ती अद्भुत आणि हेलावून टाकणारी असते. उदाहरणार्थ, आपल्या त्वचेवर जाणवणाऱ्या हवेच्या मंद झुळकांच्या स्पर्शसंवेद्य अनुभूतीही तिथे मिळतात; आणि जसजसं आपण खुल्या अवकाशात वर चढू लागतो तसतशा काही अधिभौतिक संवेदनांचीही आपण अनुभूती घेतो.) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण जसजसे उत्तरेकडे जातो, तसतशा ह्या अनुभूती विरून जातात. उदाहरणार्थ, पॅरिसमध्ये कोरब्यूझिएनं वास्तुरचना केलेल्या 'आर्मे द्यू साल्यू' (चित्र इथे) इमारतीमध्येदेखील पायवाट आहे; मात्र, थंड हवामानामुळे झपाझप पळत किंवा उड्या मारतच ती पार करावी लागते.

थोडक्यात सांगायचं, तर तिथीनुसार साजरे करायचे सणवार वर्षभरात वाटेल तेव्हा जसे साजरे करता येत नाहीत तद्वत अॅक्रोपोलिसदेखील वाटेल तिथे उभं करता येत नाही.

---

चार्ल्स कोरिया यांच्या कामावर अरुण खोपकर यांनी केलेला माहितीपट 'व्हॉल्यूम झीरो' या दुव्यावर पाहता येईल.

सर्व चित्रं आंतरजालावरून

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

राजस्थानातले वाडे ,हवेल्या पाहिल्यावर समजू शकते इथे लोक राहात होते. मुसलमान,मोगल सत्ता एवढी प्रबळ असतानाही त्यांची कमानीवाले बांधकाम पाहून वाटत नाही तिथे राहात असावेत . खोल्या अशा नाहितच.बय्राचशा कबरीच आपण पाहतो पण वाडे कुठे आहेत? मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय? त्यांच्या घरांची रचना कशी होती?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> पण वाडे कुठे आहेत? मांडूचंही तेच. राजांची ही परिस्थिती तर इतरांचे काय? त्यांच्या घरांची रचना कशी होती? <<

खरं तर अजूनही दिल्लीच्या जुन्या भागात आणि उत्तरेत इतरत्रही कोरियांनी वर्णन केलेल्यासारख्या हवेल्या पाहायला मिळतात. दर्शनी दरवाजा म्हणजे एक भलंमोठं गेट असतं. त्यातून आत शिरल्यावर अंगण, कारंजं, बाग वगैरे लागते. तिथून मग व्हरांडा असलेलं बैठं घर किंवा सज्जे असलेलं बहुमजली घर असतं. आत पुन्हा एका आभाळाला खुल्या चौकोनाभोवती घरातल्या खोल्या रचलेल्या असतात. त्या चौकोनातही छोटंसं चाफ्याचं झाड किंवा छोटंसं कारंजं वगैरे. शिवाय दोन खोल्यांना जोडणारा भाग गच्चीसारखा खुला आणि त्यावर लतामंडप वगैरे असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही खोलीत असाल तरी तुम्हाला एका बाजूला अंगण झाडं वगैरे दिसतात; तर दुसर्‍या बाजूनं मधला चौकोन दिसतो; शिवाय एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातानादेखील तुम्ही आभाळाखालून जाता. कमीअधिक फरकाची अशी रचना अगदी महाराष्ट्रापासून स्पेनपर्यंत पसरलेली दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा! वेगळीच दृष्टी देणारा फार सुंदर लेख आहे हा. खूप एन्जॉय केला. मी पहील्यांदा वास्तुरचनेवरील लेख वाचला.
.

तर त्या शीर्षकाचा आधार घेत आपण एका क्षणात या गोठवणाऱ्या युरोपीय हवामानातून बाहेर पडू आणि जिथे मंद आणि उबदार वारे वाहातात अशा वेगळ्याच वातावरणाच्या आणि आपली मन:स्थिती बदलून टाकणाऱ्या त्या अत्यंत दूरच्या प्रदेशात जाऊ.

भारताचे हे हवामान मी फार मिस करते.
.
सज्जा हा अतिव सुंदर शब्द किती दिवसांनी ऐकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या घराला चौक असलेलं घर म्हणतात ते उप्र,बिहारमध्ये पुर्वी होतं. कधीतरी केरळच्या बेकरलाही आणा.
कोकणातलं पारंपरिक घर असतं त्यातल्या माडीवरच्या भागाचा वापर करताना फारच कमी ठिकाणी दिसून आलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0