जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..6

मॅग्नाकार्टा (1215)

xxx ब्रिटिश राज्यघटनेचा हा दस्तावेज मुळात तेराव्या शतकातील राजकीय उलथापालथ व अराजकतेतून बाहेर पडण्यासाठी लिहिलेला तहनामा होता. हा दस्तावेज करून घेण्यामागे राजकीय स्वार्थ असला तरी या स्वार्थाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने शासन व समाज, स्वातंत्र्य व हक्क, कायदा व न्याय, इत्यादींचा पण त्यात समावेश केल्यामुळे व्यक्ती, समाज, राज्यकर्ते, राजेशाही, प्रशासन, न्यायव्यवस्था, इत्यादी सर्व घटकांना मॅग्नाकार्टा मार्गदर्शी ठरला आहे. आठशे वर्षापूर्वी लिहिलेला मॅग्नाकार्टा केवळ ब्रिटनचाच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, भारत, ऑस्ट्रेलिया, एशिया व आफ्रिका खंडातील लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनांचा संदर्भग्रंथ व मूळ आधार म्हणून ओळखला जातो. ब्रिटनमधील राजघराण्यांना मॅग्नाकार्टामध्ये उल्लेख केलेल्या मर्यादेतच राज्यकारभार करण्यास भाग पाडले आहे. माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानी आयुष्य जगण्यासाठी, जुलमी प्रशासनाच्या अनिर्बंध सत्तेला वेसण घालण्यासाठी ही लिखित कृती स्फूर्तिदायी ठरलेली आहे.

जगभरातील स्वातंत्र्यप्रेमींना लढण्यासाठी बळ देणारा हा दस्तावेज मुळात इंग्लंडचा सर्वात दुर्बळ राजा म्हणून ओळखलेला किंग जॉन आणि त्याचे सरदार, जहागिरदार, सामंत व पाद्री-बिशप यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी लिहिलेले करारपत्र आहे. इंग्लंडमधील चर्चसुध्दा राजेशाहीच्या मनमानीला कंटाळलेले होते. राजे व चर्च यांच्यामधील कुरघोडीमुळे प्रजेचे हाल होत होते. किंग जॉन आणि त्याच्या सरदारामधील भांडण विकोपाला गेले. राजा या सरदार-जहागिरदारांनाच भरपूर त्रास देत होता. त्यामुळे भडकलेले सर्व सरदार राजाशी युध्द करण्याच्या तयारीला लागले. दुर्बल राजानी आपली कुवत ओळखून माघार गेतली. सरदारांनी आपले स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून काही करारांचा मसुदा तयार केला. व राजाला त्या मसुद्यास संमती देण्यास भाग पाडले. 1215 मध्ये लिहिलेल्या लॅटिन भाषेतील या करारपत्राचे 1225 मध्ये इंग्रजीत भाषांतर करून सरदार जहागिरदारांना वाटण्यात आले. कारण अनेक सरदारांना लॅटिन भाषा येत नव्हती.

या करारपत्रातील कलमामध्ये राजाच्या जहागिरदारांच्या हक्कासंबधी त्यांच्या वारसासंबंधी काही अटी घातलेल्या आहेत. विधवाविवाह, राजघराण्यातील स्त्रियांचे हक्क, वारसा हक्क, मालमत्तेतील वाटणी, शहरा-शहरातील मालमत्ता, बंदरातील जहाजांचे नियंत्रण, व्यापार करण्याचे स्वतंत्र्य, न्याययंत्रणा, विवाद मिटवण्यासाठी न्यायाधीशांच्या नेमणुकीसंबंधीचे नियम, प्रतयेक व्यक्तीला जिवंत राहण्याचा, स्वातंत्र्याचा व संपत्ती मिळवण्याचा हक्क, वजनकाटा-मोजमाप विषयीचे नियम, तुरुंगातील वागणूक, अटकेची कारणे समजून घेण्याचा हक्क, असे अनेक विषय त्यात शब्दबध्द केले आहेत. यातील प्रत्येक कलमाचा कायद्यासाठी संदर्भ म्हणून आजही वापरात येऊ शकते. गायीच्या वासराच्या त्वचेवर ओक झाडाच्या डिंकापासून तयार केलेली शाई वापरून बोरूने लिहिलेल्या या मूळ करारपत्राचे आता केवळ चार प्रती शिल्लक आहेत. दोन प्रती लंडन लायब्ररीत, प्रत्येकी एक प्रत लिंकन व सॅलिस्बरी चर्चमध्ये सुरक्षित आहेत. लिहिताना प्रत्येक दहा ओळीनंतर बोरू बदलावे लागत होते.

किंग जॉन याने सही केल्यानंतरसुध्दा करारपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी मागे पुढे पाहात होता. त्याला युध्दाची धमकी दिली. परतु याच वेळी त्याचा आजार बळावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नऊ वर्षे वयाच्या वारसदाराने संमती दिल्यामुळे पुढचे युध्द टाळले. यानंतरचे राजे थोडीशी जरी कुरघोडी केली तरी नागरिक मॅग्नाकार्टाचा हवाला देत त्यांना नियंत्रणाखाली ठेऊ लागले. 1863मध्ये कायदा सुधारणा विधेयक पास करताना मॅग्नाकार्टामधील कलमांचाच आधार घेतला होता. त्यामुळे ब्रिटिश राजेशाहीला व प्रशासनाला प्रजेवर जुलुम करणे शक्य झाले नाही. याच कायद्यांच्या आधारे भारतासारख्या वसाहती देशांनासुध्दा ब्रिटिश अंमलदारावर अंकुश ठेवता आले. प्रसंगी त्यांना न्यायालयासमोर खेचण्यातसुध्दा मागे पुढे पाहिले नाही.

सतराव्या शतकात अमेरिकेतील वसाहतीचा प्रन तीव्र झाल्यानंतर मॅग्नाकार्टा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला. त्यामुळे अमेरिकेच्या संविधानातील अनेक कायदे मॅग्नाकार्टातील कलमानुसार बेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ, कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय कुठल्याही नागरिकाला जिवंत राहण्यापासून, स्वातंत्र्यापासून, मालमत्तेच्या हक्कापासून वंचित ठेवता येत नाही. न्यायालयाच्या संमतीविना कुठल्याही स्वतंत्र व्यक्तीला तुरुंगात डांबून ठेवता येत नाही. त्याचे स्वातंत्र्याचे हक्क व मालमत्ता हिसकावून घेता येत नाही.

गेली आठशे वर्षे मॅग्नाकार्टा प्रत्येक उदारमतवादी, विचारवंत व विवेकी माणसाच्या मनात घर करून बसलेले आहे. व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मॅग्नाकार्टाचाच आधार घेतला जातो. प्रत्येक लोकशाही समाजातील नागरिकाना सन्मानाने जीवन जगण्यासाठी मॅग्नाकार्टा स्फूर्ती देत आली आहे. सुसंस्कृत समाजरचनेसाठी मॅग्नाकार्टाने आखून ठेवलेले नियम अत्यंत स्पृहणीय आहेत. दुसऱ्या महायुध्दानंतर पुनरुज्जीवित झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कासंबंधी जाहीरनामा प्रसृत केला. त्यातही 1215 साली लिहिलेल्या मॅग्नाकार्टामधील - कुठल्याही व्यक्तीला मनमानीपणाने अटक, स्थानबध्द, किंवा हद्दपार करता येणार नाही - याच नियमाचा उल्लेख आहे.

लिखित शब्द इतिहासाला कलाटणी देऊ शकतात हेच मॅग्नाकार्टाने सिध्द केले आहे.

(क्रमशः)

1..... प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2..... ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3...... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी
4….. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड
5......ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet